व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

माझ्या सर्व निराशेत मला सांत्वन मिळालं

माझ्या सर्व निराशेत मला सांत्वन मिळालं

९ नोव्हेंबर १९२९ मध्ये माझा जन्म सिंधू नदीच्या पश्‍चिमेकडील काठावरच्या सक्कूर नावाच्या प्राचीन शहरात झाला. ती नदी सध्या पाकिस्तानात आहे. त्या वेळी माझ्या आईबाबांना एका मिशनरीकडून भडक रंग असलेल्या पुस्तकांचा संच मिळाला होता. मोठं होत असताना या बायबल आधारित पुस्तकांमुळे सत्य शिकायला मला प्रोत्साहन मिळालं.

त्या पुस्तकांना “सप्तरंगी संच” म्हटलं जायचं. मी जेव्हा ती पुस्तकं चाळायचो, तेव्हा त्यातील चित्रं पाहून माझी कल्पनाशक्‍ती जागृत व्हायची. आणि त्यामुळेच अगदी लहान वयात त्या पुस्तकांत जे बायबलचं ज्ञान होतं, ते ज्ञान घेण्याची भूक माझ्यात वाढू लागली.

दुसऱ्‍या महायुद्धाच्या वादळाची झळ जेव्हा भारताला लागू लागली तेव्हा माझं जग जणू दोन भागात विभागलं. माझे आईबाबा आधी विभक्‍त झाले, मग त्यांनी घटस्फोट घेतला. मी ज्या दोन लोकांवर प्रेम करतो ते एकत्र का राहू शकत नाही, हे मी समजू शकत नव्हतो. मी भावनिक रीत्या अगदी खचून गेलो होतो आणि मला एकटं पडल्यासारखं वाटलं. मी एकुलता असल्यामुळे मला जे सांत्वन हवं होतं आणि जी मदत हवी होती ती द्यायला माझ्यासोबत कोणीच नव्हतं.

मी राजधानी असलेल्या कराची शहरात आईसोबत राहायचो. एकदा फ्रेड हॉर्डेकर नावाचे यहोवाचे साक्षीदार असलेले वयस्कर डॉक्टर आमच्या घरी आले. माझ्या कुटुंबाला ज्या मिशनरीने ती पुस्तकं दिली होती ते यहोवाचे साक्षीदार होते. त्यांनी माझ्या आईला बायबल अभ्यासासाठी विचारलं, पण तिने नकार दिला. मला कदाचित अभ्यास करायला आवडेल असं तिने त्यांना माझ्याबद्दल सांगितलं. पुढच्याच आठवड्यात ब्रदर हॉर्डेकर यांनी माझ्यासोबत बायबल अभ्यास सुरू केला.

काही आठवड्यांनी मी ब्रदर हॉर्डेकर यांच्या दवाखान्यात चालवल्या जाणाऱ्‍या ख्रिस्ती सभांना जाऊ लागलो. तिथे जवळजवळ १२ वयस्कर साक्षीदार यायचे. त्यांनी मला खूप सांत्वन दिलं आणि आपल्या मुलासारखं मला जपलं. मला अजूनही आठवतं, माझ्याशी बोलण्यासाठी ते खाली वाकायचे. आणि अगदी जिवलग मित्रासारखं माझ्याशी बोलायचे. अशा सांत्वनाची त्या वेळी मला खूप गरज होती.

लवकरच ब्रदर हॉर्डेकर यांनी मला त्यांच्यासोबत क्षेत्रसेवेत प्रचार करण्यासाठी बोलवलं. त्यांनी मला पोर्टेबल फोनोग्राफचा वापर कसा करायचा ते शिकवलं. त्यामुळे त्याचा वापर करून आम्ही रेकॉर्ड केलेली संक्षिप्त बायबल भाषणं लोकांना ऐकवू शकलो. पण त्यातली काही भाषणं अगदीच सडेतोड होती त्यामुळे मग काही घरमालकांना त्यांतला संदेश आवडला नाही. पण मला इतरांना प्रचार करायला खूप मजा वाटायची. बायबल सत्याबद्दल मला खूप आवेश होता आणि त्याबद्दल इतरांना सांगायला मला मनापासून आवडायचं.

भारतावर जपानी सैन्य हल्ला करणार होतं तेव्हा ब्रिटिश अधिकारी यहोवाच्या साक्षीदारांवर दबाव आणत होते. शेवटी १९४३ च्या जुलै महिन्यात या दबावाचा परिणाम माझ्यावरही झाला. माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला शाळेतून काढून टाकलं. ते इंग्लंडमधल्या चर्चचे पाळक होते. त्यांनी माझ्या आईला हे कारण सांगितलं की यहोवाच्या साक्षीदारांबरोबरची माझी मैत्री इतर विद्यार्थ्यांवर वाईट प्रभाव पाडणारी आहे. हे ऐकून ती खूपच घाबरली आणि तिने मला साक्षीदारांपासून दूर राहण्यासाठी बजावलं. नंतर तिने मला उत्तरेकडे जवळजवळ ८५० मैलावर (१,३७० कि.मी.) असलेल्या पेशावर शहरात, माझ्या बाबांकडे राहायला पाठवलं. आध्यात्मिक अन्‍न आणि संगत न मिळाल्यामुळे मी जणू आध्यात्मिक रीत्या कुपोषित झालो.

आध्यात्मिक रीत्या सुदृढ

१९४७ साली मी नोकरीच्या शोधात परत कराचीत आलो. तिथे असताना डॉ. हॉर्डेकर यांच्या दवाखान्यात मी गेलो. त्यांनी माझं अगदी मनापासून आनंदाने स्वागत केलं.

त्यांना वाटलं, मी आजारी आहे आणि त्यांच्याकडे उपचारासाठी आलो आहे. त्यांनी मला विचारलं, “काय झालं? तुला बरं वाटत नाहीये का?”

मी त्यांना म्हटलं, “डॉक्टर, माझी तब्येत ठीक आहे, पण मी आध्यात्मिक रीत्या आजारी आहे. मला बायबल अभ्यासाची गरज आहे.”

त्यांनी विचारलं, “कधी सुरू करायचा मग अभ्यास?”

मी उत्तर दिलं, “आता लगेच, जर शक्य असेल तर!”

ती संध्याकाळ खरंच खूप सुंदर होती कारण आम्ही ती संध्याकाळ बायबल अभ्यास करण्यात घालवली. मला असं वाटलं जणू मी आध्यात्मिक रीत्या घरी परत आलो होतो! मी साक्षीदारांना भेटू नये म्हणून माझ्या आईने मला रोखण्याचा खूप प्रयत्न केला; पण या वेळी मात्र माझा निश्‍चय पक्का होता. मला सत्य आपलंसं करायचं होतं. ३१ ऑगस्ट, १९४७ ला यहोवाला केलेल्या समर्पणाचं चिन्ह म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा घेतला. लवकरच मी पायनियर म्हणून कार्य करू लागलो. त्या वेळी मी १७ वर्षांचा होतो.

आनंददायी पायनियर सेवा

पायनियर म्हणून माझी पहिली नेमणूक आधी ब्रिटिशांच्या सैन्यतळ असलेल्या क्वेटा या ठिकाणी झाली. १९४७ ला झालेल्या फाळणीत भारत हा देश भारत आणि पाकिस्तान * असा विभागला गेला. यामुळे सगळीकडे धर्मावरून हिंसेचे प्रकार झाले आणि पूर्वी कधीही झालं नव्हतं असं मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर त्या वेळी झालं. जवळजवळ १ कोटी ४० लाख निर्वासित लोकांचं स्थलांतर झालं होतं. भारतातले मुस्लिम पाकिस्तानात राहायला गेले आणि पाकिस्तानातले हिंदू आणि शिख भारतात राहायला गेले होते. या सगळ्या गोंधळात मी कराचीतून क्वेटाला जाण्यासाठी ट्रेन पकडली. गर्दीने खचाखच भरलेल्या त्या ट्रेनमधून मी अक्षरशः लटकत गेलो.

१९४८ साली भारतात झालेल्या विभागीय संमेलनाला मी उपस्थित राहिलो

क्वेटामध्ये मी जॉर्ज सिंग नावाच्या विशीतल्या एका खास पायनियरला भेटलो. डोंगराळ क्षेत्रात साक्षकार्यासाठी जाता यावं म्हणून त्याने त्याची जुनी सायकल मला दिली. बहुतेक वेळा मी एकटाच प्रचार करायचो. सहा महिन्यातच माझ्याकडे १७ बायबल अभ्यास होते आणि त्यातले नंतर काही सत्यातही आले. त्यांच्यापैकी एक होता सादिक मसीह. हा सैन्यात अधिकारी होता. या बांधवाने मला आणि जॉर्जला काही बायबल प्रकाशनांचं उर्दूमध्ये भाषांतर करायला मदत केली. उर्दू पाकिस्तानाची राष्ट्रीय भाषा आहे. कालांतराने सादिक एक आवेशी प्रचारक बनला.

क्वीन एलिझाबेथ जहाजामधून गिलियड प्रशालेला जाताना

नंतर मी कराचीत परत आलो आणि गिलियड प्रशालेतून आलेले नवीन मिशनरी हेन्री फिंच आणि हॅरी फोरेस्ट यांच्यासोबत सेवा करू लागलो. त्यांच्याकडून मला खूप मौल्यवान ईश्‍वरशासित प्रशिक्षण मिळालं. एकदा मी प्रचार कार्यासाठी ब्रदर फिंचसोबत उत्तर पाकिस्तानात गेलो होतो. तिथल्या उंच डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावात आम्हाला अनेक नम्र मनाचे, उर्दू बोलणारे लोक भेटले. बायबल सत्य जाणून घेण्याची भूक त्यांच्यात होती. दोन वर्षानंतर मला गिलियडला जायची संधी मिळाली. त्यानंतर मी पाकिस्तानात थोड्या वेळासाठी विभागीय पर्यवेक्षक म्हणून कार्य केलं. लाहोरमधल्या मिशनरी गृहात मी इतर तीन मिशनरी बांधवांसोबत राहिलो.

समस्येतून बाहेर येताना

दुःखाची गोष्ट म्हणजे १९५४ साली लाहोरच्या मिशनरीगृहात राहणाऱ्‍यांचं एकमेकांसोबत पटत नव्हतं. म्हणून मग शाखा कार्यालयाने त्यांची पुन्हा दुसऱ्‍या ठिकाणी नेमणूक केली. विचार न करता वादात एकाची बाजू घेतल्यामुळे मला कडक शब्दात ताडन मिळालं. यामुळे मला खूप वाईट वाटलं. असं वाटलं की मी आध्यात्मिक रीत्या हरलो आहे. मी परत कराचीला आलो आणि त्यानंतर लंडनला गेलो. दुसरीकडे जाऊन मला नव्याने साक्षकार्य सुरू करायचं होतं.

लंडनमध्ये मी ज्या मंडळीत जायचो तिथे बेथेलमधले अनेक सदस्य होते. प्राइस ह्‍यूज या बांधवाने मला आधार दिला. ते शाखा सेवक होते. एकदा त्यांनी मला एक किस्सा सांगितला. त्यांना ब्रदर जोसेफ एफ. रदरफर्ड यांच्याकडून कडक शब्दांत ताडन मिळालं होतं. त्या काळी ब्रदर रदरफर्ड जगभरात चालणाऱ्‍या प्रचारकार्याची देखरेख करायचे. जेव्हा ब्रदर ह्‍यूज यांनी कारणं द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना ब्रदर रदरफर्डने परत सुनावलं. पण ही आठवण सांगताना ब्रदर ह्‍यूज हसत होते. मला ते पाहून खूप आश्‍चर्य वाटलं. ते म्हणाले की या घटनेमुळे पहिल्यांदा त्यांना खूप वाईट वाटलं, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना अशा कडक सल्ल्याची गरज होती आणि तो खरंतर यहोवाच्या प्रेमाचा पुरावा होता. (इब्री १२:६) त्यांचं हे बोलणं माझ्या मनाला स्पर्श करून गेलं आणि त्यामुळे पुन्हा आनंदाने सेवा करायला मला मदत मिळाली.

त्या वेळेदरम्यान माझी आई लंडनला राहायला आली होती. तेव्हा तिने जॉन इ. बार, जे नंतर नियमन मंडळाचे सदस्य बनले यांच्याकडून बायबल अभ्यास घेतला. तिने नंतर चांगली प्रगती केली आणि १९५७ साली बाप्तिस्मा घेतला. नंतर मला कळलं की माझ्या बाबांनीही मृत्यूआधी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास केला होता.

१९५८ मध्ये मी लंडनमध्ये राहणाऱ्‍या लेनी नावाच्या डॅनीश मुलीशी लग्न केलं. पुढच्याच वर्षी आम्हाला कन्यारत्न लाभलं आणि तिचं नाव आम्ही जेन ठेवलं. नंतर आम्हाला आणखी चार मुलं झाली. मला फुलहॅम मंडळीत सेवा करण्याचा बहुमानही मिळाला. पण नंतर लेनीची तब्येत बिघडल्यामुळे आम्हाला उष्ण वातावरण असलेल्या ठिकाणी जावं लागलं. म्हणून १९६७ मध्ये आम्ही ऑस्ट्रेलियातल्या अॅडिलेड या ठिकाणी राहायला गेलो.

एक दुःखदायी समस्या

अॅडिलेडमधल्या आमच्या मंडळीत १२ वयस्कर अभिषिक्‍त ख्रिस्ती होते. प्रचारकार्यात ते आवेशाने भाग घ्यायचे. आमचा आध्यात्मिक दिनक्रम नव्याने सुरू करायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही.

१९७९ मध्ये आमच्या पाचव्या बाळाचा जन्म झाला. त्याचं नाव आम्ही डॅनिएल ठेवलं. त्याला डाऊन सिड्रोम * झाला होता आणि तो जास्त काळ जगू शकत नव्हता. आम्हाला त्या वेळी ज्या मानसिक दुःखाचा सामना करावा लागला, तो आठवला की आजही अंगावर काटा येतो. आम्ही त्याची काळजी घेण्यासाठी स्वतःला झोकून दिलं; पण आमच्या इतर चार मुलांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता आम्ही बाळगली. डॅनिएलच्या हृदयाला दोन छिद्रं होती. त्यामुळे त्याला ऑक्सिजनचा पुरवठा मिळणं बंद झालं की त्याचं शरीर नीळं पडायचं. मग आम्हाला त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागायचं. पण त्याची तब्येत एवढी नाजूक असूनही तो खूप हुशार होता आणि स्वभावानेही खूप प्रेमळ होता. यहोवावरही त्याचं खूप प्रेम होतं. आम्ही जेवणाआधी प्रार्थना करायचो तेव्हा आपले चिमुकले हात जोडून, तो त्याचे डोके हलवायचा आणि मनापासून “आमेन” म्हणायचा. मगच तो जेवायचा!

डॅनिएल चार वर्षांचा झाला तेव्हा त्याला ल्यूकेमिया नावाचा कॅन्सर झाला. लेनी आणि मी मानसिक व शारीरिक रीत्या खूप थकलो होतो. माझं मानसिक संतुलन बिघडत आहे की काय असं वाटत होतं. एके दिवशी आम्ही खूपच निराश झालो होतो. आमचे विभागीय पर्यवेक्षक ब्रदर नेविल ब्रॉमीच आमच्या घरी आले. ती रात्र आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यांनी आम्हाला जवळ घेतलं व आमच्यासोबत ते खूप रडले. त्यांच्या प्रेमळ आणि दयाळू शब्दांनी आम्हाला खूप सांत्वन मिळालं. अगदी शब्दांत वर्णन न करता येणारं! ते ब्रदर पहाटे एक वाजेपर्यंत आमच्यासोबत होते. त्यानंतर लगेच डॅनिएलचा मृत्यू झाला. ती आमच्या आयुष्यातली सर्वात दुःखदायक घटना होती. पण आम्ही त्यातून सावरलो. आम्हाला या गोष्टीची पक्की खात्री आहे की कोणतीही गोष्ट, अगदी मृत्यूही डॅनिएलला यहोवाच्या प्रेमापासून दूर करू शकत नाही. (रोम. ८:३८, ३९) देवाच्या नव्या जगात तो पुन्हा जिवंत होईल. त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत!—योहा. ५:२८, २९.

इतरांना मदत करून आनंद मिळवताना

पक्षघाताचे दोन झटके येऊनही मी सध्या मंडळीत वडील म्हणून कार्य करत आहे. माझ्या अनुभवांमुळे इतरांसोबत दयेने आणि समभावाने वागायचा मी विशेष प्रयत्न करतो; खासकरून जे समस्यांचा सामना करत आहेत त्यांच्यासोबत. मी त्यांचा न्याय करण्याचा प्रयत्न करत नाही. याउलट मी स्वतःला हे प्रश्‍न विचारतो: ‘त्यांना आयुष्यात जे अनुभव आलेत त्यामुळे ते असा विचार करत असावेत का? मला त्यांची काळजी आहे हे मी त्यांना कसं दाखवू शकतो? यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागायला मी त्यांना कसं प्रोत्साहन देऊ शकतो?’ मला मंडळीत कळपाची देखरेख करायला खूप आवडतं. मी जेव्हा इतरांना सांत्वन देतो आणि आध्यात्मिक रीत्या टवटवीत राहायला मदत करतो, तेव्हा जणू मी स्वतःलाच सांत्वन देत असतो आणि ताजंतवाणं करत असतो.

मेंढपाळ भेटी घेताना मला आजही समाधान मिळतं

माझ्या भावना स्तोत्रकर्त्याप्रमाणेच आहेत. तो म्हणतो: “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून [यहोवापासून] लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.” (स्तो. ९४:१९) कौटुंबिक समस्या, धार्मिक विरोध, खिन्‍नता आणि निराशा यांचा सामना करण्यासाठी यहोवाने मला मदत केली. खरंच यहोवा माझा खऱ्‍या अर्थाने पिता आहे!

^ परि. 19 सुरुवातीला पाकिस्तान हा देश पश्‍चिम पाकिस्तान (सध्याचं पाकिस्तान) आणि पूर्व पाकिस्तान (सध्याचं बांग्लादेश) यांनी मिळून बनला होता.

^ परि. 29 टेहळणी बुरूज१० ४/१५ पृ. १६ “परीक्षांमुळे यहोवावरील आमचा भरवसा आणखी वाढला,” हा लेख पाहा.