व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या गौरवासाठी “तुमचा प्रकाश” झळकू द्या

यहोवाच्या गौरवासाठी “तुमचा प्रकाश” झळकू द्या

“तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या, म्हणजे ते . . . तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करतील.”—मत्त. ५:१६.

गीत क्रमांक: ४७, 

१. कोणत्या खास कारणामुळे आपल्याला आनंद होतो?

देवाचे सेवक आपला प्रकाश झळकू देत आहेत, हे पाहून आपल्या सर्वांनाच खूप आनंद होतो. मागच्या वर्षी आपण १ कोटीपेक्षा जास्त बायबल अभ्यास चालवले. तसंच, लाखो आस्थेवाईक लोक स्मारकविधीसाठी उपस्थित राहिले होते. यामुळे त्यांना यहोवाची प्रेमळ तरतूद, खंडणी याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली.—१ योहा. ४:९.

२, ३. (क) “जगामध्ये प्रकाशाप्रमाणे चमकत” राहण्यापासून कोणती गोष्ट आपल्याला रोखू शकत नाही? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

जगभरात यहोवाचे साक्षीदार अनेक वेगवेगळ्या भाषा बोलतात. पण संघटित जगव्याप्त कुटुंब म्हणून यहोवाची स्तुती करण्यासाठी ही गोष्ट एक अडथळा ठरत नाही. (प्रकटी. ७:९) आपली भाषा कोणतीही असो अथवा आपण कुठेही राहत असू, आपण “जगामध्ये प्रकाशाप्रमाणे चमकत” राहू शकतो.—फिलिप्पै. २:१५.

आपलं सेवाकार्य, आपलं ख्रिस्ती ऐक्य आणि अंत जवळ असल्याची जाणीव या गोष्टींमुळे यहोवाचा गौरव होतो. या तीन क्षेत्रांत आपण आपला प्रकाश कशा प्रकारे झळकवू शकतो हे आपण या लेखात पाहणार आहोत.—मत्तय ५:१४-१६ वाचा.

यहोवाची सेवा करण्यासाठी इतरांना मदत करा

४, ५. (क) प्रचार करण्यासोबतच आपण आणखी कोणत्या मार्गाने आपला प्रकाश झळकवतो? (ख) प्रेमळपणे वागल्याने कोणते चांगले परिणाम घडून येऊ शकतात? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

आपला प्रकाश झळकवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे प्रचार करणं आणि शिष्य बनवणं. (मत्त. २८:१९, २०) १ जून १९२५ साली प्रकाशित झालेल्या द वॉचटॉवर मध्ये “लाईट इन द डार्कनेस” या लेखात म्हटलं होतं की शेवटच्या दिवसांत प्रभूला विश्‍वासू राहण्यासाठी एका व्यक्‍तीला आपला प्रकाश झळकवत राहण्याची गरज आहे. त्यात पुढे म्हटलं होतं: “ती व्यक्‍ती जगभरातल्या लोकांना आनंदाचा संदेश सांगण्याद्वारे आणि यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार जगण्याद्वारे हे करू शकते.” प्रचार करण्यासोबतच आपण ज्या प्रकारे वागतो त्याद्वारेही यहोवाचा गौरव होतो. आपण आनंदाचा संदेश सांगतो तेव्हा बऱ्‍याच लोकांचं आपल्यावर लक्ष असतं. आपण जेव्हा त्यांना पाहून स्मितहास्य करतो, प्रेमाने नमस्ते किंवा हॅलो म्हणतो, तेव्हा ते आपल्याबद्दल व आपण ज्या देवाची उपासना करतो त्याच्याबद्दल चांगला विचार करतात.

येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं: “एखाद्या घरात गेल्यावर घरातल्या लोकांना नमस्कार करा आणि त्यांना शांती मिळो अशी सदिच्छा व्यक्‍त करा.” (मत्त. १०:१२) येशूने ज्या क्षेत्रात प्रचार केला तिथे अनोळखी लोकांना घरात बोलवण्याची रीत होती. पण आज बऱ्‍याच ठिकाणी अशी पद्धत नाही. एखाद्या अनोळखी व्यक्‍तीने आपल्या घराचं दार वाजवलं तर आज सहसा लोक घाबरतात किंवा चिडतात. पण आपण जर त्यांच्याशी मैत्रीपूर्ण आणि प्रेमळ रीत्या संवाद साधला तर तेही आपल्याशी बोलताना कचरणार नाहीत. साक्षकार्यात ट्रॉलीजवळ उभे असताना आपण सहसा स्मितहास्य करून लोकांना मैत्रीपूर्ण अभिवादन करतो. यामुळे लोकांना ट्रॉलीजवळ येऊन साहित्य घ्यायला संकोच वाटत नाही. काही वेळा तर ते आपल्याशी चर्चा करायलाही तयार होतात.

६. सेवाकार्यात आवेशी राहण्यासाठी एका वयस्क जोडप्याला कशामुळे मदत मिळाली?

इंग्लंडमध्ये राहणाऱ्‍या एका वयस्क जोडप्याला खालावलेल्या तब्येतीमुळे आता आधीसारखं घरोघरचं प्रचारकार्य करणं जमत नाही. यामुळे त्यांच्या घराबाहेरच एका टेबलावर ते आपली साहित्यं ठेवतात आणि ये-जा करणाऱ्‍यांना प्रचार करतात. ते एका शाळेजवळ राहत असल्यामुळे मुलांना घ्यायला येणाऱ्‍या पालकांना आवडतील असे साहित्य ते टेबलावर ठेवतात. काही पालकांनी क्वेश्‍चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क, खंड १ आणि २ व इतर साहित्यं घेतली आहेत. एक पायनियर बहीण सहसा या जोडप्यासोबत टेबलाजवळ उभी राहते. तिचं वागणं मैत्रीपूर्ण आहे आणि त्या जोडप्याला इतरांना मदत करण्याची मनापासून इच्छा आहे, ही गोष्ट बऱ्‍याच पालकांच्या लक्षात आली आहे. त्यांच्यापैकी एकाने तर बायबल अभ्यासदेखील सुरू केला आहे.

७. तुमच्या परिसरात राहणाऱ्‍या निर्वासित लोकांना तुम्ही कशी मदत करू शकता?

गेल्या काही वर्षांत अनेक लोकांना आपला देश सोडून दुसऱ्‍या देशात निर्वासित म्हणून राहावं लागलं आहे. तुमच्या परिसरात राहणाऱ्‍या निर्वासित लोकांना यहोवाबद्दल जाणून घ्यायला तुम्ही कशी मदत करू शकता? सर्वात आधी त्यांच्या भाषेत नमस्ते कसं म्हणतात, हे तुम्ही शिकू शकता. त्यासोबतच, JW लँग्वेज अॅपचा वापर करून तुम्ही त्यांच्या भाषेतील काही सोपी वाक्यंही शिकू शकता. तुम्ही त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत आहात हे पाहून कदाचित त्यांना तुमच्याशी चर्चा करावीशी वाटेल. त्यानंतर तुम्ही jw.org वरून त्यांच्या भाषेत उपलब्ध असलेले व्हिडिओ आणि साहित्यं त्यांना दाखवू शकता.—अनु. १०:१९.

८, ९. (क) आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेमुळे आपल्याला कशी मदत होते? (ख) पालक मुलांना आणखी चांगल्या प्रकारे उत्तरं देण्यासाठी कशी मदत करू शकतात?

प्रभावीपणे प्रचारकार्य करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची आवश्‍यकता आहे त्या यहोवा पुरवतो. उदाहरणार्थ, ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य या सभेद्वारे आपल्याला खूपकाही शिकायला मिळतं. यामुळे आपल्याला कुशलतेने पुनर्भेट घ्यायला आणि बायबल अभ्यास सुरू करायला मदत होते.

नवीन लोक आपल्या सभेला येतात तेव्हा सहसा लहान मुलांची उत्तरं ऐकून ते खूप प्रभावीत होतात. यामुळे तुमच्या मुलांना तुम्ही आपल्या शब्दांत उत्तरं द्यायला शिकवू शकता. मुलांची सोप्या शब्दांत व मनापासून दिलेली उत्तरं ऐकून, काही लोकांना सत्य शिकून घ्यायचं प्रोत्साहनही मिळालं आहे!—१ करिंथ. १४:२५.

ऐक्याचं बंधन मजबूत करा

१०. कौटुंबिक उपासनेमुळे कुटुंबात ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी कशी मदत होते?

१० आपल्या कुटुंबात ऐक्य आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण जेव्हा मेहनत घेतो, तेव्हा आपण यहोवाचा गौरव करत असतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही पालक असाल तर नियमितपणे कौटुंबिक उपासना करण्याचा प्रयत्न करा. अनेक कुटुंबं एकत्र बसून JW ब्रॉडकास्टिंग पाहतात आणि त्यानंतर शिकलेल्या गोष्टी जीवनात कशा लागू कराव्यात यावर ते चर्चा करतात. लक्षात असू द्या, की एका लहान मुलाला आणि तरुण मुलाला वेगवेगळ्या मार्गदर्शनाची गरज असते. कौटुंबिक उपासनेतून प्रत्येक सदस्याला फायदा व्हावा म्हणून होता होईल तितके प्रयत्न करा.—स्तो. १४८:१२, १३.

वयस्क जणांसोबत वेळ घालवल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं (परिच्छेद ११ पाहा)

११-१३. मंडळीतलं ऐक्याचं बंधन आणखी मजबूत करण्यासाठी आपण कसा हातभार लावू शकतो?

११ तरुणांनो मंडळीत ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आणि इतरांवर तुमचा प्रकाश झळकवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? एक मार्ग म्हणजे, वयस्क बंधुभगिनींसोबत मैत्री करणं. बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत राहण्यासाठी त्यांना कशामुळे मदत झाली हे तुम्ही त्यांना विचारू शकता. तुम्हाला त्यांच्याकडून खूपकाही शिकायला मिळेल. यामुळे तुम्हाला आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल. तसंच, आपण सर्वच, मग आपण तरुण असो वा वृद्ध, मंडळीत येणाऱ्‍या नवीन लोकांचं मनापासून स्वागत करू शकतो. आपण स्मितहास्य करून त्यांना नमस्ते बोलू शकतो. त्यांना बसायला जागा शोधून देऊ शकतो व त्यांची इतरांशी ओळख करून देऊ शकतो. सभेला आल्यावर त्यांना आपल्या लोकांमध्ये आल्यासारखं वाटायला पाहिजे.

१२ तुम्ही क्षेत्र सेवेची सभा घेताना वयोवृद्ध लोकांना त्यांचा प्रकाश झळकवण्यासाठी मदत करू शकता. त्यांना प्रचार करणं शक्य होईल अशा क्षेत्रात पाठवा. तरुणांना त्यांच्यासोबत असू द्या. वयस्क बंधुभगिनींना आणि शारीरिक समस्या असलेल्यांना सहसा निराशेचा सामना करावा लागतो कारण ते आधीसारखं प्रचार करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही त्यांची काळजी घेता आणि त्यांची परिस्थिती समजून घेता तेव्हा त्यांना बरं वाटतं. त्यांना जरी सत्यात बरीच वर्षं झाली असली किंवा त्यांचं वय खूप झालं असलं, तरी त्यांच्याशी दयाळूपणे वागल्यामुळे त्यांना आवेशाने प्रचार करत राहण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकतं.—लेवी. १९:३२.

१३ इस्राएली लोक मिळून आनंदाने यहोवाची सेवा करायचे. स्तोत्रकर्त्याने लिहिलं: “पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!” (स्तोत्र १३३:१, २ वाचा.) त्याने या ऐक्याची तुलना अभिषेक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या तेलाशी केली. या तेलामुळे त्वचेला तजेला मिळायचा आणि त्याचा सुगंधही खूप छान असायचा. अशाच प्रकारचा तजेला आपल्या बांधवांना देण्यासाठी आपण प्रेमळ आणि दयाळू असणं गरजेचं आहे. यामुळे मंडळीत असलेलं ऐक्याचं बंधन आणखी मजबूत होतं. तुम्ही तुमच्या मंडळीतल्या बांधवांशी आणखी ओळख वाढवण्याचा प्रयत्न करू शकता का?—२ करिंथ. ६:११-१३.

१४. तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी तुमचा प्रकाश कसा झळकवू शकता?

१४ तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहत असला तरी तुम्ही तुमचा प्रकाश झळकवू शकता. दयाळूपणे वागल्याने तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्‍या लोकांना यहोवाविषयी शिकण्यासाठी मदत होऊ शकते. स्वतःला विचारा: ‘माझे शेजारी माझ्याबद्दल काय विचार करतात? मी माझं घर, घराभोवतीचा परिसर स्वच्छ आणि टापटिप ठेवतो का? शेजाऱ्‍यांच्या मदतीला मी धावून जातो का?’ तसंच, तुम्ही इतर बांधवांना त्यांचा अनुभवही विचारू शकता. दयाळूपणे वागल्याने व त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे नातेवाइकांवर, शेजाऱ्‍यांवर, शाळेत किंवा सोबत काम करणाऱ्‍यांवर याचा कसा परिणाम झाला आहे हे तुम्ही त्यांना विचारू शकता.—इफिस. ५:९.

जागृत राहा

१५. आपण नेहमी जागृत राहणं का गरजेचं आहे?

१५ तेजस्वीपणे आपला प्रकाश झळकवत राहण्यासाठी आपण कोणत्या काळात जगत आहोत याची जाणीव असणं गरजेचं आहे. येशूने अनेक वेळा आपल्या शिष्यांना म्हटलं: “जागृत राहा.” (मत्त. २४:४२; २५:१३; २६:४१) “मोठं संकट” यायला अजून खूप वेळ आहे असा जर आपण विचार केला, तर यहोवाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असलेल्यांना मदत करण्याच्या प्रत्येक संधीचा आपण फायदा करून घेणार नाही. (मत्त. २४:२१) उलट अशा नकारात्मक विचारामुळे, तेजस्वीपणे चमकण्याऐवजी आपला प्रकाश हळूहळू कमी होऊ लागेल आणि तो पूर्णपणे नाहीसा होण्याचीही शक्यता आहे.

१६, १७. अंत जवळ आहे याची जाणीव असण्यासाठी आपण काय करू शकतो?

१६ आज कधी नव्हे इतकं जास्त जागृत राहण्याची आपल्याला गरज आहे. जगाची परिस्थिती जरी दिवसेंदिवस खालावत चालली असली तरी एका गोष्टीची आपल्याला खातरी आहे; यहोवाने ठरवलेल्या योग्य वेळी अंत नक्की येईल. (मत्त. २४:४२-४४) तोपर्यंत भविष्यात आपल्यासाठी जे राखून ठेवलं आहे, त्यावर धीराने आपलं लक्ष केंद्रित करून ठेवू शकतो. दररोज बायबलचं वाचन करण्यासोबत आपण यहोवाला प्रार्थनाही केली पाहिजे. (१ पेत्र ४:७) त्यासोबतच, यहोवाची अनेक वर्षं सेवा करणाऱ्‍या बंधुभगिनींकडून आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, बांधवांच्या जीवन कथा वाचणं. उदाहरणार्थ, १५ एप्रिल २०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या टेहळणी बुरूजाच्या पृ. १८-२१ मध्ये “सत्तर वर्षांपासून मी एका यहुद्याचा पदर धरून आहे” हा लेख तुम्ही वाचू शकता.

१७ यहोवाच्या सेवेत नेहमी व्यस्त राहा. इतरांना दया दाखवून त्यांना मदत करा आणि आपल्या बंधुभगिनींसोबत वेळ घालवा. यामुळे तुम्हाला आनंदी राहण्यासाठी मदत तर होईल पण त्यासोबतच वेळ अगदी भरभर जात आहे असंदेखील तुम्हाला वाटेल. (इफिस. ५:१६) गेल्या शंभर वर्षांत यहोवाच्या सेवकांनी बरंचसं काम केलं आहे. पण त्या मानाने आज कल्पनाही करू शकत नाही इतकं जास्त काम आपल्याकडे आहे. आणि ते आपण यहोवाच्या मदतीने साध्यही करत आहोत. एका अर्थी, आपला प्रकाश आणखी तेजस्वीपणे झळकत आहे!

मेंढपाळ भेटींमुळे देवाच्या वचनातला सुज्ञ सल्ला जाणून घेण्याची संधी मिळते (परिच्छेद १८, १९ पाहा)

१८, १९. यहोवाची सेवा आवेशाने करायला वडील आपली कशी मदत करू शकतात? याचं एक उदाहरण द्या.

१८ आपल्या हातून बऱ्‍याच चुका घडत असल्या, तरी यहोवा आपल्याला त्याची सेवा करू देत आहे. त्याने आपल्या मदतीसाठी “माणसांच्या रूपात देणग्या” असणारे मंडळीतले वडील आपल्याला दिले आहेत. (इफिसकर ४:८, ११, १२ वाचा.) त्यामुळे जेव्हा वडील तुम्हाला भेट देऊन काही सांगतात, सल्ला देतात तेव्हा त्यातून फायदा मिळवा.

१९ इंग्लंडमध्ये राहणाऱ्‍या एका जोडप्याचं उदाहरण लक्षात घ्या. त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या उद्‌भवल्या होत्या आणि म्हणून त्यांनी दोन वडिलांकडे मदत मागितली. पत्नीला वाटत होतं की यहोवाच्या सेवेत पती पुढाकार घेत नाही आणि पतीला वाटत होतं की तो एक चांगला शिक्षक नाही. तसंच, घरात नियमितपणे कौटुंबिक उपासना होत नाही हेदेखील त्याने सांगितलं. वडिलांनी त्या जोडप्याला येशूच्या उदाहरणाबद्दल विचार करायला सांगितलं. येशूने आपल्या शिष्यांची कशी काळजी घेतली याचं अनुकरण करण्यासाठी वडिलांनी पतीला प्रोत्साहन दिलं. तसंच, पत्नीने आपल्या पतीशी धीराने वागावं असं त्यांनी पत्नीला प्रोत्साहन दिलं. आपल्या दोन मुलांसोबत कौटुंबिक उपासना कशी करता येईल याबद्दल वडिलांनी त्यांना काही सल्लेही दिले. (इफिस. ५:२१-२९) त्या पतीने कुटुंबप्रमुखाची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याने धीर सोडू नये आणि यहोवाच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहावं असं प्रोत्साहन वडिलांनी दिलं. खरंच, वडिलांनी दाखवलेल्या प्रेमामुळे आणि दयाळूपणामुळे त्या कुटुंबाला खूप मदत झाली!

२०. तुमचा प्रकाश झळकवत ठेवल्यामुळे कोणते चांगले परिणाम होतील?

२० “जो पुरुष परमेश्‍वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य!” (स्तो. १२८:१) तुमचा प्रकाश झळकवत राहिल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. म्हणून इतरांना देवाबद्दल सांगा. आपल्या कुटुंबात व मंडळीत असलेलं ऐक्याचं बंधन मजबूत करण्यासाठी तुम्ही होता होईल तितका प्रयत्न करा आणि जागृत राहा. इतर जण जेव्हा तुमचं चांगलं उदाहरण पाहतील तेव्हा आपला पिता यहोवा याचा गौरव करण्याची त्यांचीही इच्छा होईल.—मत्त. ५:१६.