व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कर्ण्याच्या आवाजाला प्रतिसाद द्या

कर्ण्याच्या आवाजाला प्रतिसाद द्या

या “शेवटच्या दिवसांत” यहोवा त्याच्या सेवकांना मार्गदर्शन देत आहे आणि त्याच्यासोबत एक घनिष्ठ नातं टिकवून ठेवायला मदत करत आहे. (२ तीम. ३:१) पण यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आपण आपली तुलना अरण्यात असलेल्या इस्राएली लोकांशी करू शकतो. कर्णा वाजवला जायचा तेव्हा इस्राएली लोकांना त्यानुसार कार्य करावं लागायचं.

यहोवाने मोशेला सांगितलं होतं, की त्याने हातोडीने ठोकून चांदीचे दोन कर्णे बनवावेत. मोशेला त्यांचा वापर मंडळीला बोलावण्यासाठी आणि तळ उठवण्यासाठी करायला सांगितला होता. (गण. १०:२) याजकांना निर्देशन होतं, की त्यांनी कर्णा वेगवेगळ्या पद्धतीने वाजवावा. यामुळे लोकांना समजायचं, की त्यांनी काय केलं पाहिजे. (गण. १०:३-८) आज देवाच्या लोकांना वेगवेगळ्या मार्गांनी निर्देशन मिळत आहे. या लेखात आपण निर्देशन मिळण्याच्या तीन मार्गांवर चर्चा करणार आहोत. याची तुलना आपण प्राचीन काळात इस्राएली लोकांना निर्देशन देण्यासाठी कर्णा वाजवला जायचा याच्याशी करणार आहोत. देव आपल्याला तीन मार्गांनी निर्देशन देतो. ते मार्ग म्हणजे: (१) देवाच्या लोकांना अधिवेशनांसारख्या मोठ्या कार्यक्रमांसाठी एकत्र बोलवलं जातं, (२) मंडळीतल्या वडिलांना प्रशिक्षण देण्यासाठी बोलवलं जातं, (३) मंडळीच्या व्यवस्थेत फेरबदल करायला सांगितलं जातं.

मोठ्या संख्येने जमा होण्यासाठी

जेव्हा यहोवाला सर्व मंडळीला दर्शन मंडपाच्या पूर्वेकडल्या दाराजवळ एकत्र जमवायचं असायचं तेव्हा याजक दोन्ही कर्णे वाजवायचे. (गण. १०:३) दर्शनमंडपाच्या चारही दिशांना असणाऱ्‍या वंशांना कर्ण्यांचा विशिष्ट आवाज ऐकू जायचा. ज्यांचे तंबू दर्शनमंडपाच्या जवळ होते ते काही मिनिटांतच तिथे पोहोचायचे. पण दर्शनमंडपापासून लांब राहणाऱ्‍या लोकांना पोहोचायला वेळ लागायचा आणि त्यांना जास्त चालावंही लागायचं. इस्राएली लोक दूर राहत असोत किंवा जवळ यहोवाची इच्छा होती, की सर्वांनी  एकत्र यावं आणि तो देत असलेल्या मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा.

आज आपण दर्शनमंडपाजवळ एकत्र येत नाही. पण यहोवा आज आपल्याला प्रांतीय अधिवेशनांसाठी आणि इतर खास कार्यक्रमांसाठी एकत्र यायला सांगतो. तिथे आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती आणि निर्देशनं मिळतात. जगभरात यहोवाचे लोक कुठेही असोत ते एकसारख्याच कार्यक्रमाचा आनंद घेतात. याचाच अर्थ, जो कोणी हे आमंत्रण स्वीकारतो तो एका मोठ्या आनंदी समूहाचा भाग बनतो. काही लोकांना इतरांपेक्षा जास्त प्रवास करावा लागतो. पण हे आमंत्रण स्वीकारणारे मान्य करतात, की त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा त्यांना फायदाच होतो.

पण सर्वच भाऊबहिणांना या खास कार्यक्रमांना आणि अधिवेशनांना उपस्थित राहणं शक्य होत नाही. मग, दूरवर राहणारे भाऊबहीण यातून कसा फायदा मिळवतात? आधुनिक तंत्रज्ञानामुळे अशा भाऊबहिणींना या कार्यक्रमांचा फायदा घेता आला आहे, आणि त्यांनासुद्धा मोठ्या समूहाचा भाग असण्याचा आनंद अनुभवता आला आहे. उदाहरणार्थ, एकदा मुख्यालयाच्या प्रतिनिधींनी भेट दिली असताना बेनीन शाखा कार्यालयाने तिथे झालेला कार्यक्रम आर्लेट या लहानशा ठिकाणी असलेल्या भाऊबहिणींसाठी प्रसारित केला. हे ठिकाण सहारा वाळवंटात आहे. आर्लेट नायजेरमध्ये आहे आणि तिथे भरपूर खाणी आहेत. तो कार्यक्रम पाहण्यासाठी २१ भाऊबहीण आणि १६ आस्थेवाईक लोक तिथे उपस्थित राहिले. आर्लेटमधले भाऊबहीण जरी त्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले, तरी ४४,१३१ जणांच्या मोठ्या समूहाचा भाग असल्याचा ते आनंद घेऊ शकले. एक बांधवाने त्याबद्दल लिहिलं: “हा कार्यक्रम आमच्यापर्यंत प्रसारित केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही खरंच आमच्यावर खूप प्रेम करता हे आम्हाला समजलं.”

प्रमुखांना बोलवण्यासाठी

जेव्हा एकच कर्णा वाजवला जायचा तेव्हा सरदारांनी, म्हणजे इस्राएलच्या घराण्यातल्या प्रमुखांनी दर्शनमंडपाजवळ यावं असं अपेक्षित होतं. (गण. १०:४) तिथे त्यांना मोशेकडून माहिती आणि प्रशिक्षण मिळायचं. यामुळे त्यांना त्यांच्या वंशातल्या लोकांची चांगल्या रितीने काळजी घेता येणार होती. तुम्ही जर त्या प्रमुखांपैकी एक असता तर तिथे उपस्थित राहण्यासाठी आणि त्यातून फायदा मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला नसता का?

आज मंडळीतले वडील इस्राएलच्या घराण्यातल्या प्रमुखांसारखे नाहीत, आणि ते देवाच्या कळपावर अधिकार गाजवत नाहीत. (१ पेत्र ५:१-३) पण ते मेंढरांची काळजी घेण्यासाठी आपल्याकडून होता होईल तितका प्रयत्न करतात. म्हणून जेव्हा त्यांना प्रशिक्षणासाठी बोलवलं जातं तेव्हा ते लगेच ते आमंत्रण स्वीकारतात. राज्य सेवा प्रशाला ही त्यांपैकी एक आहे. या प्रशालेत वडिलांना मंडळीची काळजी चांगल्या प्रकारे कशी घ्यावी याबद्दल प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणामुळे मंडळीतले वडील आणि इतर जण यहोवाच्या आणखीन जवळ जाऊ शकतात. तुम्ही जरी या प्रशिक्षणाला उपस्थित राहिले नसाल, तरी जे या प्रशिक्षणाला उपस्थित राहिले आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण तिथे शिकलेल्या गोष्टी ते मंडळीत लागू करत असतील.

फेरबदल करण्यासाठी

इस्राएली याजक कधीकधी चढत्या-उतरत्या स्वरात कर्णा वाजवायचे. अशा प्रकारच्या आवाजाने समजायचं, की आता यहोवाची इच्छा आहे, की सर्व इस्राएली लोकांनी दुसरीकडे जायला निघावं. (गण. १०:५, ६) सर्व इस्राएली लोक जेव्हा दुसरीकडे जायला निघायचे तेव्हा ते हे काम खूप सुव्यवस्थितपणे करायचे. पण यात खूप मेहनतसुद्धा असायची. काही इस्राएली लोकांना दुसरीकडे जायला कदाचित संकोचही वाटत असावा. पण असं का?

काहींना कदाचित वाटत असावं, की दुसरीकडे जाण्यासाठी वाजवला जाणारा कर्णा बऱ्‍याच वेळा आणि त्यांना अपेक्षा नव्हती तेव्हा वाजवला जात आहे. बायबल म्हणतं की “कधीकधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत” राहायचा. आणि कधीकधी तो “दोन दिवस, एक महिना किंवा त्याहून अधिक काळ” राहायचा. (गण. ९:२१, २२) सर्व इस्राएली लोकांनी एकूण किती वेळा तळ हलवला? गणना याच्या ३३ व्या अध्यायात म्हटलं आहे, की इस्राएली लोक ४० वेगवेगळ्या ठिकाणी राहिले.

काही वेळा इस्राएली लोकांना सावली असलेलं ठिकाण मिळायचं. साहजिकच त्यांना अशा एखाद्या ठिकाणी थांबायला आवडत असावं, कारण सगळीकडे “मोठे व भयानक रान” होते. (अनु. १:१९) म्हणून त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जायला सांगितलं जायचं, तेव्हा ते त्यांना कठीण जात असेल. त्यांना असं ठिकाण परत मिळेल का, अशी शंका वाटत असेल.

इस्राएली लोकांना दुसरीकडे निघायला सांगितलं जायचं, तेव्हा काही वंशांना आपली निघायची वेळ येत नाही तोपर्यंत थांबावं लागायचं. चढत्या-उतरत्या कर्ण्याचा आवाज सगळ्यांनाच ऐकू जायचा, पण सर्वच जण एकत्र निघू शकत नव्हते. विशिष्ट कर्णा ऐकू आल्यावर पूर्वेकडल्या वंशांना जसं की यहूदा, इस्साखार आणि जबुलून यांना कळायचं, की त्यांनी आता निघायचं आहे. (गण. २:३-७; १०:५, ६) ते निघाल्यावर याजक पुन्हा चढत्या-उतरत्या स्वरात कर्णा वाजवायचे. त्यामुळे दक्षिणेकडल्या तीन वंशांना कळायचं, की आता त्यांनी निघायचं आहे. पुढे सर्व इस्राएली लोक निघत नाहीत, तोपर्यंत याजक अशाच पद्धतीने कर्णा वाजवायचे.

आपल्या संघटनेने आपल्याला काही फेरबदल करायला सांगितलं तेव्हा कदाचित आपल्याला ते कठीण गेले असावेत. पण असं का झालं असावं? आपल्याला कदाचित वाटलं असावं, की एक नाही तर अनेक फेरबदल करावे लागणार आहेत. कदाचित आपल्याला वाटलं असावं, की ‘आधी जसं होतं, ते बरं होतं; अमुक गोष्टीत फेरबदल करायला नको होते.’ कारण काहीही असो आपल्याला धीर दाखवायला आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला कठीण गेलं असेल. पण हे बदल स्वीकारल्यावर आपल्याला जाणवेल की हे आपल्याच फायद्याचं होतं, आणि यामुळे यहोवाचं मन आनंदित होतं.

मोशेच्या दिवसांत यहोवाने अरण्यात असताना लाखो स्त्री-पुरुषांचं आणि मुलांचं मार्गदर्शन केलं. त्याचं मार्गदर्शन आणि निर्देशन यांशिवाय ते जिवंत राहू शकले नसते. आजसुद्धा यहोवा आपल्याला या शेवटल्या दिवसांत मार्गदर्शन देत आहे. तो आपल्याला त्याच्यासोबतची आपली मैत्री टिकवून ठेवायला आणि विश्‍वासात मजबूत राहायला मदत करतो. तेव्हा ज्या प्रकारे इस्राएली लोक कर्ण्याच्या विशिष्ट प्रकारच्या आवाजाला प्रतिसाद देऊन आज्ञाधारकता दाखवायचे, त्याच प्रकारे आपणही यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू या.