व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २३

“तुझे नाव पवित्र मानले जावो”

“तुझे नाव पवित्र मानले जावो”

“हे यहोवा, तुझे नाव सर्वकाळ टिकेल.”—स्तो. १३५:१३, पं.र.भा.

गीत ९ यहोवाचा जयजयकार करा!

सारांश *

१-२. यहोवाच्या साक्षीदारांसाठी कोणते दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत?

आज आपल्या सर्वांसमोर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, यहोवालाच पूर्ण विश्‍वावर राज्य करण्याचा अधिकार आहे. आणि दुसरा, त्याचं नाव पवित्र करणं. आपण यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे हे विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पण यहोवालाच शासन करण्याचा अधिकार आहे या गोष्टीचं समर्थन करणं आणि त्याचं नाव पवित्र करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? नाही. असं आपण का म्हणू शकतो, हे आता आपण जाणून घेऊ या.

आपण बायबलमधून शिकलो, की यहोवाचं नाव पवित्र करणं गरजेचं आहे. तसंच, मानवांवर तोच चांगल्या प्रकारे राज्य करू शकतो हे सिद्ध होणं गरजेचं आहे हेही आपण शिकलो. आणि हे दोन्ही मुद्दे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

३. यहोवाच्या नावात कोणकोणत्या गोष्टी सामील आहेत?

खरंतर यहोवा या नावात त्याच्याबद्दल असलेल्या सगळ्याच गोष्टी सामील आहेत. त्याची शासन करण्याची पद्धत कशी आहे हे यात सामील आहे. तसंच, यहोवाच्या नावावर लागलेला कलंक मिटेल तेव्हा हेही  सिद्ध होईल, की शासन करण्याची त्याचीच पद्धत योग्य आहे. यावरून हे समजतं, की यहोवाचं नाव आणि संपूर्ण जगावर राज्य करण्याचा त्याचा अधिकार या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहे.—“ सर्वात महत्त्वाच्या मुद्यात कोणत्या गोष्टी सामील आहेत?” ही चौकट पाहा.

४. स्तोत्र १३५:१३ या वचनात देवाच्या नावाबद्दल काय म्हटलं आहे, आणि या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

यहोवा हे नाव खूप विशेष आहे. (स्तोत्र १३५:१३ वाचा. *) देवाचं नाव इतकं विशेष का आहे? पहिल्यांदा त्याच्या नावावर कलंक कसा लावण्यात आला? देव त्याच्या नावावर लागलेला कलंक कसा मिटवतो? आणि त्याचं नाव पवित्र करण्यासाठी आपण काय करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं आता आपण जाणून घेऊ या.

नावाचं महत्त्व

५. यहोवाचं नाव पवित्र करणं याबद्दल काहींच्या मनात कोणता प्रश्‍न येईल?

“तुझं नाव पवित्र मानलं जावो.” (मत्त. ६:९) प्रार्थना करताना ही विनंती सर्वात महत्त्वाची असली पाहिजे असं येशूने म्हटलं. येशूच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय होता? त्याला असं म्हणायचं होतं, की यहोवाच्या नावावर लागलेला कलंक मिटवला जावो किंवा त्याला शुद्ध केलं जावो. पण काहींच्या मनात असा प्रश्‍न येईल: ‘यहोवाचं नाव तर पवित्रच आहे. मग त्याचं नाव पवित्र करण्याचा नेमका काय अर्थ होतो?’ या प्रश्‍नाचं उत्तर जाणण्याआधी आपण हे समजून घेणं गरजेचं आहे, की एखाद्या व्यक्‍तीच्या नावात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो.

६. एका व्यक्‍तीच्या नावाला कशामुळे महत्त्व मिळतं?

नावाचं महत्त्व फक्‍त कागदावर लिहिण्यापुरतं किंवा फक्‍त हाक मारण्यापुरतं मर्यादित आहे का? बायबल म्हणतं: “पुष्कळ धनापेक्षा नावलौकिक .  . . उत्तम आहे.” (नीति. २२:१, पं.र.भा.; उप. ७:१) नावाला इतकं महत्त्व का दिलं जातं? कारण एका व्यक्‍तीच्या नावावरून चारचौघांत तिची काय ओळख आहे हे समजतं. तेव्हा एका व्यक्‍तीचं नाव कसं लिहिलं जातं किंवा उच्चारलं जातं यापेक्षा, लोक जेव्हा तिचं नाव ऐकतात किंवा पाहतात तेव्हा ते तिच्याबद्दल काय विचार करतात हे जास्त महत्त्वाचं आहे.

७. लोकांनी देवाचं नाव कसं बदनाम केलं आहे?

लोक जेव्हा यहोवाबद्दल खोट्या गोष्टी पसरवतात तेव्हा खरंतर ते इतरांना त्याच्याबद्दल वाईट विचार करायला लावत असतात. आणि असं केल्यामुळे ते त्याचं नाव बदनाम करायचा प्रयत्न करत असतात. यहोवाच्या नावाची बदनामी सर्वातआधी एदेन बागेत करण्यात आली. त्या वेळी जे घडलं त्यातून आपण काय शिकू शकतो, हे आता आपण पाहू या.

पहिल्यांदा देवाचं नाव कसं बदनाम करण्यात आलं?

८. आदाम आणि हव्वा यांना काय माहीत होतं आणि त्यांच्याबद्दल कोणते प्रश्‍न उभे राहतात?

आदाम आणि हव्वा यांना देवाचं नाव यहोवा आहे हे माहीत होतं. तसंच, त्यांना त्याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा माहीत होत्या. जसं की, तो त्यांचा निर्माणकर्ता आहे आणि त्याने त्यांना जीवन, सुंदर घर व परिपूर्ण सोबती दिला आहे ही गोष्ट त्यांना माहीत होती. (उत्प. १:२६-२८; २:१८) पण यहोवाने त्यांच्यासाठी जे काही केलं होतं त्याबद्दल त्यांनी विचार केला का? यहोवाबद्दल त्यांनी प्रेम आणि कदर वाढवली का? देवाच्या शत्रूने जेव्हा त्यांची परीक्षा घेतली तेव्हा त्यांनी काय केलं यावरून या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला मिळतात.

९. उत्पत्ति २:१६, १७ आणि ३:१-५ या वचनांनुसार यहोवाने पहिल्या जोडप्याला काय सांगितलं, आणि सैतानाने त्यांना यहोवाबद्दल चुकीचा विचार करायला कसा लावला?

उत्पत्ति २:१६, १७; ३:१-५ वाचा. सैतानाने सापाचा वापर करून हव्वाला असा प्रश्‍न विचारला: “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” यहोवा खोटं बोलत आहे अशी शंका निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याने हव्वाला असा प्रश्‍न विचारला. देवाने आदाम-हव्वा यांच्यासाठी बागेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली होती. आणि ते त्यांची फळं खाऊ शकत होते. (उत्प. २:९) यहोवा नक्कीच एक उदार देव आहे. पण एका विशिष्ट झाडाविषयी यहोवाने म्हटलं होतं, की आदाम-हव्वाने त्याचं फळ खाऊ नये. त्यामुळे सैतानाने हव्वाला प्रश्‍न विचारला तेव्हा तिच्या मनात शंका निर्माण झाली, आणि तिला असं वाटू लागलं, की यहोवा हा उदार देव नाही. ‘देव आपल्याकडून कोणतीतरी चांगली गोष्ट लपवून ठेवत आहे का?’ असा विचार तिच्या मनात आला असेल.

१०. सैतानाने देवाच्या नावावर कसा कलंक लावला, आणि याचे काय परिणाम झाले?

१० सैतानाने हव्वाला प्रश्‍न विचारला तोपर्यंत ती यहोवाला आपला शासक मानत होती. कारण यहोवाने तिला जे निर्देशन दिलं होतं ते तिने सैतानाला सांगितलं. तिने त्याला असंही सांगितलं, की त्या झाडाला ते स्पर्शही करू शकत नाहीत. तिला माहीत होतं की देवाची आज्ञा मोडली तर ते मरतील. पण सैतानाने तिला म्हटलं “तुम्ही खरोखर मरणार नाही.” (उत्प. ३:२-४) ही गोष्ट बोलून, यहोवा खोटं बोलत आहे असंच फक्‍त सैतान सुचवत नव्हता, तर तो सरळसरळ त्याच्या नावाची निंदा करत होता. आणि असं करून तो दियाबल किंवा निंदक बनला. (१ तीम. २:१४) हव्वा पूर्णपणे फसली आणि तिने सैतानावर विश्‍वास ठेवला. तिने यहोवापेक्षा सैतानावर जास्त भरवसा ठेवला. यामुळे तिने आपल्या जीवनात सर्वात चुकीचा निर्णय घेतला. तिने यहोवाची आज्ञा मोडायचं ठरवलं. तिने मनाई केलेलं फळ खाल्लं आणि त्यानंतर ते आदामलासुद्धा दिलं.—उत्प. ३:६.

११. आदाम आणि हव्वा काय करू शकले असते, पण त्यांनी काय केलं?

११ हव्वाने सैतानाला काय उत्तर द्यायला हवं होतं याबद्दल जरा विचार करा. ‘मला माहीत नाही तू कोण आहेस. पण मी माझ्या पित्याला, यहोवाला ओळखते. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्यावर पूर्ण भरवसा आहे. आदाम आणि माझ्याकडे जे काही आहे ते सर्व आम्हाला यहोवाने दिलं आहे. त्याच्याबद्दल अशी वाईट गोष्ट तू बोलूच कसा शकतोस. चालता हो इथून!’ समजा असं उत्तर जर तिने दिलं असतं तर यहोवाला आपल्या मुलीबद्दल, हव्वाबद्दल किती अभिमान वाटला असता! (नीति. २७:११) पण हव्वाचं यहोवावर एकनिष्ठ प्रेम नव्हतं. शिवाय, आदामही यात कमी पडला. आदाम आणि हव्वा यांचं आपल्या पित्यावर प्रेम नव्हतं. आणि म्हणून सैतानाने जेव्हा यहोवाच्या नावावर दोष लावला तेव्हा ते त्याच्या बाजूने बोलू शकले नाहीत.

१२. सैतानाने हव्वाच्या मनात शंका कशी उत्पन्‍न केली, आणि आदाम व हव्वा काय करू शकले नाहीत?

१२ आधी चर्चा केल्याप्रमाणे सैतान हव्वाच्या मनात शंका उत्पन्‍न करू लागला. त्याने तिला असा विचार करायला लावला की यहोवा एक चांगला पिता नाही. असं करून त्याने यहोवाच्या नावावर कलंक लावला. त्यानंतर आदाम आणि हव्वा, यहोवावर लावलेला दोष खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या बाजूने बोलले नाहीत. याउलट, सैतानाने सुचवलेली गोष्ट त्यांनी ऐकली आणि त्यांनी यहोवाविरुद्ध बंड केलं. सैतान आजही अशाच पद्धतीचा वापर करत आहे. तो यहोवाबद्दल खोटं बोलून त्याच्या नावाची बदनामी करत आहे. आणि जे लोक त्याच्या प्रभावाखाली येतात ते यहोवाला आपला शासक मानत नाहीत.

यहोवा त्याचं नाव पवित्र करतो

१३. यहेज्केल ३६:२३ या वचनानुसार बायबलचा मुख्य संदेश काय आहे?

१३ यहोवा आपल्या नावावर लागलेला कलंक मिटवण्यासाठी काहीच करणार नाही का? तो नक्कीच करेल! संपूर्ण बायबलमध्ये सांगितलं आहे, की यहोवाच्या नावावर लागलेला कलंक मिटवण्यासाठी त्याने कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत. (उत्प. ३:१५) खरंतर, बायबलचा मुख्य संदेशसुद्धा हाच आहे की यहोवा त्याच्या मुलाच्या राज्याद्वारे त्याचं नाव पवित्र करेल आणि पृथ्वीवर पुन्हा नीतिमत्त्व आणि शांती आणेल. यहोवा आपलं नाव कसं पवित्र करेल हे बायबलमध्ये सांगितलं आहे.—यहेज्केल ३६:२३ वाचा.

१४. एदेन बागेत झालेल्या बंडाळीला यहोवाने ज्या प्रकारे प्रतिसाद दिला त्यामुळे त्याचं नाव कसं पवित्र झालं?

१४ सैतानाची इच्छा नाही, की यहोवाचा उद्देश पूर्ण व्हावा आणि यासाठी त्याने पुरेपूर प्रयत्न केले आहेत. पण सैतान यात एकदा नाही, तर अनेकदा अपयशी ठरला आहे. यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत काय केलं आहे, हे आपल्याला बायबलमधून कळतं. यावरून हे सिद्ध झालं आहे, की यहोवा सर्वात चांगला शासक आहे. हे खरं आहे, की सैतान आणि त्याच्या बाजूने असलेल्या लोकांच्या बंडाळीमुळे यहोवाचं मन दुखावलं आहे. (स्तो. ७८:४०) पण, यहोवाच्या नावावर दोष लावण्यात आला तेव्हा त्याने ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे हाताळली. त्याने विचारपूर्वक, न्यायीपणे आणि धीराने काम केलं. तसंच, त्याने अनेक वेळा आपली अपार शक्‍ती दाखवली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने आपल्या प्रत्येक कामातून आपला मुख्य गुण, प्रेम दाखवला आहे. (१ योहा. ४:८) यहोवाने आपलं नाव पवित्र करण्यासाठी आतापर्यंत अनेक गोष्टी केल्या आहेत आणि आजही तो करत आहे.

सैतानाने हव्वाला यहोवाबद्दल खोटं सांगितलं आणि तो अनेक शतकांपासून यहोवाच्या नावाची बदनामी करत आहे (परिच्छेद ९-१०, १५ पाहा) *

१५. सैतान आज यहोवाच्या नावाची बदनामी कशी करत आहे? आणि त्याचे काय परिणाम दिसून येत आहेत?

१५ सैतान आजही यहोवाच्या नावाला कलंक लावत आहे. देव शक्‍तिशाली, न्यायी, बुद्धिमान आणि प्रेमळ आहे की नाही अशी शंका तो लोकांच्या मनात निर्माण करतो. उदाहरणार्थ, देव नाही असा तो लोकांना विश्‍वास करायला लावतो. आणि जर त्यांचा देवावर विश्‍वास असला तर तो लोकांना असं मानायला लावतो, की देवाचे नियम सोपे नाहीत. इतकंच काय, तर तो लोकांना असाही विश्‍वास करायला लावतो, की यहोवा खूप क्रूर आहे आणि तो लोकांना नरकाग्नीत जाळतो. लोक जेव्हा या खोट्या गोष्टींवर विश्‍वास ठेवतात, तेव्हा ते यहोवाचं शासन नाकारतात. यहोवा जोपर्यंत सैतानाचा नाश करत नाही, तोपर्यंत तो त्याला बदनाम करतच राहील. तो तुम्हालाही यहोवाच्या विरोधात नेण्याचा प्रयत्न करत राहील. पण असं करण्यात तो यशस्वी होईल का?

तुम्ही कोणाची बाजू घ्याल?

१६. आदाम आणि हव्वा जे करू शकले नाहीत ते तुम्ही कसं करू शकता?

१६ यहोवाने अपरिपूर्ण मानवांनाही त्याचं नाव पवित्र करण्याची संधी दिली आहे. आदाम आणि हव्वा जे करू शकले नाही ते तुम्ही करू शकता. आज पाहिलं तर जगात असे बरेच लोक आहेत जे यहोवाच्या नावाला दोष लावत आहेत. पण यहोवाची बाजू मांडण्याची एक संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही त्याच्याबद्दल हे सत्य सांगू शकता की तो पवित्र, नीतिमान, चांगला आणि प्रेमळ आहे. (यश. २९:२३) तुम्ही दाखवून देऊ शकता, की तुम्हाला त्याचं शासन मान्य आहे. तसंच, यहोवाच योग्य पद्धतीने मानवांवर शासन करू शकतो, आणि त्याचंच शासन सगळीकडे शांतीचं व आनंदाचं वातावरण आणू शकतं, हेही तुम्ही लोकांना सांगू शकता.—स्तो. ३७:९, ३७; १४६:५, ६, १०.

१७. येशूने यहोवाचं नाव कसं प्रकट केलं?

१७ आपण जेव्हा यहोवाची बाजू मांडतो तेव्हा खरंतर आपण येशूचं अनुकरण करत असतो. (योहा. १७:२६) येशूने लोकांना फक्‍त यहोवाचं नावच सांगितलं नाही, तर त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दलही सांगितलं. उदाहरणार्थ, परूशी लोक इतरांच्या मनात यहोवाविषयी चुकीचं चित्र उभं करत होते. ते लोकांना असं मानायला भाग पाडत होते की यहोवा खूप कठोर आहे, तो लोकांकडून खूप अपेक्षा करतो, तो त्यांचा मित्र बनू शकत नाही आणि दया दाखवत नाही. याउलट, यहोवा नेमका कसा आहे हे येशूने लोकांना सांगितलं. त्याने शिकवलं की त्याचा पिता लोकांकडून जास्त अपेक्षा करत नाही, तो धीराने व प्रेमाने वागतो आणि तो क्षमाशील आहे. त्यासोबतच, येशूने इतरांशी वागताना आपल्या पित्याचं अनुकरण केलं. त्यामुळे यहोवा नेमका कसा आहे हे लोक समजू शकले.—योहा. १४:९.

१८. सैतानाने यहोवाविषयी पसरवलेल्या गोष्टी खोट्या आहेत हे आपण कसं सिद्ध करू शकतो?

१८ येशूप्रमाणे आपणही लोकांना सांगू शकतो की यहोवा हा प्रेमळ आणि दयाळू देव आहे. असं करण्याद्वारे, सैतानाने यहोवाविरुद्ध बोललेल्या गोष्टी खोट्या आहेत हे आपण सिद्ध करतो. तसंच, यामुळे यहोवाचं नाव पवित्र होतं आणि लोकांच्या मनात त्याच्याविषयी आदर वाढतो. आपण अपरिपूर्ण असलो तरी यहोवाचं अनुकरण करू शकतो. (इफिस. ५:१, २) आपल्या वागण्याबोलण्यातून लोकांना समजलं पाहिजे, की यहोवा नेमका कसा आहे. यामुळे यहोवाचं नाव पवित्र होतं. तसंच देवाविषयीचे गैरसमज दूर करण्याद्वारेही आपण त्याचं नाव पवित्र करतो. याशिवाय, अपरिपूर्ण मानव यहोवाला एकनिष्ठ राहू शकतात हेसुद्धा आपण सिद्ध करतो.—ईयो. २७:५.

यहोवा दयाळू आणि प्रेमळ देव आहे हे आपल्या बायबल विद्यार्थ्यांना समजायला मदत करा (परिच्छेद १८-१९ पाहा) *

१९. यशया ६३:७ या वचनानुसार लोकांना शिकवण्याचा आपला मुख्य उद्देश काय असला पाहिजे?

१९ यहोवाचं नाव आपण आणखी एका मार्गाने पवित्र करू शकतो. आपण लोकांना बायबलमधली सत्यं शिकवतो तेव्हा यहोवालाच शासन करण्याचा अधिकार आहे यावर सहसा जोर देतो. हे खरं आहे की आपण लोकांना देवाच्या नियमांबद्दल आणि त्यांचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे हे शिकवतो. पण आपला मुख्य उद्देश लोकांना आपल्या पित्यावर, म्हणजे यहोवावर प्रेम करायला आणि त्याला विश्‍वासू राहायला शिकवणं हा आहे. म्हणून लोकांना शिकवताना आपण यहोवाच्या सुंदर गुणांवर भर दिला पाहिजे. तसंच, यहोवा हे नाव असलेल्या देवाचं व्यक्‍तिमत्त्व कसं आहे हे लोकांना समजायला मदत केली पाहिजे. (यशया ६३:७ वाचा.) अशा प्रकारे शिकवल्यामुळे लोक यहोवाला एकनिष्ठ राहतील. तसंच, यामुळे ते यहोवावर प्रेम करतील आणि त्याच्या आज्ञांचंही पालन करतील.

२०. पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

२० आपल्या वागण्याबोलण्याद्वारे आणि आपण लोकांना जे शिकवतो त्याद्वारे ते यहोवाच्या नावाचा महिमा करायला आणि त्याच्यासोबत मैत्री करायला प्रेरित होऊ शकतात. पण आपण हे कसं करू शकतो याबद्दल आपण पुढच्या लेखात चर्चा करू या.

गीत १ यहोवाचे गुण

^ परि. 5 आज सर्व मानवांसमोर आणि देवदूतांसमोर कोणता महत्त्वाचा मुद्दा आहे? हा मुद्दा इतका महत्त्वाचा का आहे? आणि आपण यात कसे सामील आहोत? या प्रश्‍नांची आणि यांसारख्या इतर प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेतल्यामुळे यहोवासोबत आपलं नातं घनिष्ठ होईल.

^ परि. 4 स्तोत्र १३५:१३, (पं.र.भा.): “हे यहोवा, तुझे नाव सर्वकाळ टिकेल; हे यहोवा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या टिकणारे आहे.”

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: सैतानाने हव्वाला यहोवाबद्दल खोटं बोलून त्याच्या नावावर दोष लावला. अनेक शतकांपासून सैतान यहोवाविषयी खोट्या गोष्टी पसरवत आहे. जसं की यहोवा क्रूर आहे आणि त्याने मानवांना निर्माण केलेलं नाही.

^ परि. 64 चित्रांचं वर्णन: एक बांधव बायबल अभ्यासादरम्यान यहोवाच्या गुणांवर जोर देत आहे.