व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २४

तुझ्या नावाचं भय धरण्यासाठी माझं चित्त एकाग्र कर

तुझ्या नावाचं भय धरण्यासाठी माझं चित्त एकाग्र कर

“तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जिवेभावे तुझे गुणगान गाईन.”—स्तो. ८६:११, १२.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

सारांश *

१. देवाचं भय बाळगणं याचा काय अर्थ होतो, आणि यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांनी अशा प्रकारचं भय बाळगणं का गरजेचं आहे?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं देवावर प्रेम आहे आणि ते त्याचं भयसुद्धा बाळगतात. काही लोकांना मात्र वाटेल की या तर दोन विरुद्ध गोष्टी आहेत. पण हे एक विशेष प्रकारचं भय आहे. आपण घाबरून जाऊ अशा प्रकारचं हे भय नाही. ज्या लोकांना अशा प्रकारचं भय असतं ते देवाचा मनापासून आदर करतात. त्यांना आपल्या स्वर्गात राहणाऱ्‍या पित्याला दुखवायचं नसतं, कारण त्याच्यासोबतची मैत्री त्यांना मोडायची नसते.—स्तो. १११:१०; नीति. ८:१३.

२. स्तोत्र ८६:११ या वचनात दावीदने जे म्हटलं त्यावर आधारित कोणत्या दोन गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत?

स्तोत्र ८६:११ वाचा. या वचनात दिलेल्या शब्दांवरून समजतं की, यहोवाबद्दल गाढ आदर असणं महत्त्वाचं आहे हे दावीद राजाला माहीत होतं. दावीदने प्रार्थनेत जे म्हटलं, ते आपण जीवनात कसं लागू करू शकतो यावर आता आपण चर्चा करू या. सर्वातआधी, देवाच्या नावाबद्दल आपल्याला गाढ आदर का असला पाहिजे याची काही कारणं आपण पाहू या. मग, रोजच्या जीवनात देवाच्या नावाबद्दल आदर असल्याचं आपण कसं दाखवू शकतो यावर आपण चर्चा करू या.

देवाच्या नावाबद्दल गाढ आदर असणं का गरजेचं आहे?

३. कोणत्या अनुभवामुळे मोशेला देवाच्या नावाबद्दल भय बाळगत राहण्यासाठी मदत झाली असेल?

मोशेसोबत एकदा काय घडलं हे आता आपण पाहू या. तो खडकाच्या मोठ्या भेगेत लपला होता आणि यहोवाचं तेज समोरून जात होतं. ते पाहून त्याला कसं वाटलं असेल याचा जरा विचार करा. खरंच, कोणत्याही मानवासाठी हा एक अनोखाच अनुभव असला असेल! त्या वेळी देवदूताने म्हटलेले शब्द मोशेने ऐकले. त्याने म्हटलं: “यहोवा, यहोवा, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, आणि प्रेमदया व सत्य यात उदंड, हजारोंवर दया करणारा, अन्याय व अपराध व पाप यांची क्षमा करणारा आहे.” (निर्ग ३३:१७-२३; ३४:५-७, पं.र.भा.) पुढे जेव्हा मोशेने यहोवाचं नाव वापरलं असेल, तेव्हा त्याला ही घटना नक्कीच आठवली असेल. आणि म्हणूनच मोशेने नंतर इस्राएली लोकांना “या प्रतापी व भययोग्य नावाचे भय” बाळगण्याचा इशारा दिला.—अनु. २८:५८.

४. आपल्या मनात यहोवाबद्दल आदर वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो?

आपण जेव्हा यहोवा या नावाचा विचार करतो, तेव्हा आपण त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचाही विचार केला पाहिजे. आपण त्याची शक्‍ती, बुद्धी, न्याय आणि प्रेम या गुणांवर विचार केला पाहिजे. त्याच्या या आणि इतर गुणांवर विचार केल्यामुळे, आपल्या मनात त्याच्याबद्दल आणखी आदर वाढेल.—स्तो. ७७:११-१५.

५-६. (क) देवाच्या नावाचा काय अर्थ होतो? (ख) निर्गम ३:१३, १४ आणि यशया ६४:८ या वचनांनुसार यहोवा आपला उद्देश कसा पूर्ण करू शकतो?

देवाच्या नावाच्या अर्थाबद्दल आपल्याला काय माहीत आहे? अनेक विद्वान हे मान्य करतात की यहोवा या नावाचा अर्थ ‘तो व्हायला लावतो’ असा होतो. या अर्थावरून आपल्याला समजतं की यहोवाला त्याची इच्छा पूर्ण करण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. तसंच तो गोष्टी घडवूनही आणू शकतो. ते कसं?

यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते तो करू शकतो. (निर्गम ३:१३, १४ वाचा.) * आपल्या प्रकाशनांतून आपल्याला अनेकदा या अद्‌भुत गोष्टीवर मनन करण्याची आठवण करून देण्यात येते. इतकंच काय, तर यहोवा आपल्या अपरिपूर्ण सेवकांनासुद्धा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी, किंवा त्यांना त्याची सेवा करता यावी यासाठी जे गरजेचं आहे ते व्हायला लावू शकतो. (यशया ६४:८ वाचा.) अशा प्रकारे यहोवा त्याची इच्छा पूर्ण करतो, आणि कोणतीच गोष्ट त्याला त्याचा उद्देश पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही.—यश. ४६:१०, ११.

७. स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या पित्याबद्दल आपण आपली कदर कशी वाढवू शकतो?

स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या पित्याने आपल्यासाठी जे काही केलं आहे आणि आपल्याला जे काही करायला मदत केली आहे, त्यावर मनन केल्यामुळे आपली त्याच्याबद्दलची कदर वाढू शकते. उदाहरणार्थ, सृष्टीतल्या ज्या अद्‌भुत गोष्टी यहोवाने निर्माण केल्या आहेत, त्यांवर आपण खोलवर विचार करतो तेव्हा आपण अगदी चकित होतो! (स्तो. ८:३, ४) तसंच, त्याची इच्छा पूर्ण करता यावी म्हणून त्याने ज्या प्रकारे आपल्याला मदत केली आहे त्यावर विचार केल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल गाढ आदर वाटतो. खरंच, यहोवा हे नाव ऐकून आपल्या मनात त्याच्याबद्दल आदरयुक्‍त भय निर्माण होतं. त्या नावात बऱ्‍याच गोष्टी गोवलेल्या आहेत. त्यात आपल्या पित्याचं व्यक्‍तिमत्त्व, त्याने जे काही केलं आहे, आणि भविष्यात तो जे काही करणार आहे या सगळ्या गोष्टी गोवलेल्या आहेत.—स्तो. ८९:७, ८.

“मी यहोवाचे नाव गाजवून सांगेन”

मोशेने इस्राएली लोकांना जे शिकवलं त्यामुळे त्यांना तजेला मिळाला. कारण त्याने जे काही शिकवलं ते यहोवाच्या नावावर आणि त्याच्या व्यक्‍तिमत्त्वावर केंद्रित होतं (परिच्छेद ८ पाहा) *

८. अनुवाद ३२:२, ३ ही वचनं वाचल्यावर देवाच्या नावाबद्दल कोणती गोष्ट लक्षात येते?

इस्राएली लोकांनी वचन दिलेल्या देशात प्रवेश केला त्याच्या थोड्याच काळाआधी यहोवाने मोशेला एक गीत शिकवलं. (अनु. ३१:१९) पुढे मोशेला हे गीत इस्राएली लोकांना शिकवायचं होतं. (अनुवाद ३२:२, ३ वाचा. *) आपण जेव्हा २ आणि ३ वचनांवर मनन करतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते; ती म्हणजे आपलं नाव लोकांपासून लपून ठेवलं जावं किंवा ते खूप पवित्र असल्यामुळे उच्चारलं जाऊ नये अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही. उलट, सगळ्यांना आपलं नाव माहीत असावं असं त्याला वाटतं. मोशेकडून यहोवाबद्दल आणि त्याच्या गौरवशाली नावाबद्दल ऐकणं हा इस्राएली लोकांसाठी खरंच किती मोठा बहुमान होता! पावसाच्या बारीक सरींमुळे जशी रोपं वाढतात, अगदी तसंच मोशेने इस्राएली लोकांना शिकवलेल्या गोष्टींमुळे त्यांचा विश्‍वास वाढला आणि त्यांना प्रोत्साहन मिळालं. आपण जेव्हा लोकांना शिकवतो तेव्हा त्यांच्या मनावरसुद्धा असाच परिणाम व्हावा यासाठी आपण काय करू शकतो?

९. आपण देवाचं नाव पवित्र करण्यासाठी काय करू शकतो?

आपण जेव्हा घरोघरचं किंवा सार्वजनिक साक्षकार्य करतो, तेव्हा आपण बायबलमधून लोकांना देवाचं नाव यहोवा आहे हे दाखवू शकतो. तसंच आपण त्यांना आपलं साहित्य, आपले व्हिडिओ आणि वेबसाईटवर असलेली माहिती दाखवून यहोवाच्या नावाचा गौरव करू शकतो. याशिवाय आपण कामावर, शाळेत किंवा प्रवास करत असताना आपल्या प्रिय देवाबद्दल लोकांशी बोलू शकतो. यहोवा आपल्यासाठी आणि या पृथ्वीसाठी किती चांगल्या गोष्टी करणार आहे हे आपण त्यांना सांगू शकतो. या गोष्टी ऐकल्यावर कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या लक्षात येईल की यहोवा किती प्रेमळ आहे. आपण जेव्हा इतरांना आपल्या प्रेमळ देवाबद्दलचं सत्य सांगतो तेव्हा त्याचं नाव पवित्र करायला मदत करत असतो. त्यांना देवाबद्दल खोट्या गोष्टी शिकवण्यात आल्या आहेत हे आपण त्यांना समजून घ्यायला मदत करत असतो. आपण त्यांना बायबलमधून जे काही शिकवतो त्यामुळे त्यांना खूप तजेला मिळू शकतो.—यश. ६५:१३, १४.

१०. बायबल अभ्यास चालवताना आपण विद्यार्थ्यांना फक्‍त देवाचे नीतिनियम आणि स्तर शिकवणंच पुरेसं का नाही?

१० बायबल अभ्यास चालवताना आपण आपल्या विद्यार्थ्यांना देवाचं नाव जाणून घ्यायला मदत केली पाहिजे आणि त्यांना ते वापरण्याचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. याशिवाय, आपण त्यांना यहोवाचं व्यक्‍तिमत्त्व पूर्णपणे समजून घ्यायलाही मदत केली पाहिजे. पण आपण जर त्यांना फक्‍त देवाचे नीतिनियम आणि स्तर शिकवले तर ते त्याला चांगल्या प्रकारे समजू शकतील का? एक चांगला विद्यार्थी कदाचित देवाचे नीतिनियम शिकेल आणि त्याला ते आवडतीलही. पण त्याचं देवावर प्रेम असणं खूप गरजेचं आहे. त्याचं देवावर प्रेम असेल तरच तो त्याच्या आज्ञांचं पालन करेल. आदाम आणि हव्वा यांच्या बाबतीत काय घडलं ते आठवा. हव्वाला देवाचे नीतिनियम माहीत होते, पण तिचं देवावर प्रेम नव्हतं. आणि आदामचंही देवावर प्रेम नव्हतं. त्यामुळे त्यांनी देवाची आज्ञा मोडली. (उत्प. ३:१-६) म्हणून लोकांना फक्‍त देवाचे नीतिनियम आणि स्तर शिकवणं पुरेसं नाही, तर आपण त्यांना देवावर प्रेम करायलाही शिकवलं पाहिजे.

११. आपण आपल्या विद्यार्थ्यांना देवाच्या नीतिनियमांवर प्रेम करण्यासोबतच देवावरही प्रेम करायला कशी मदत करू शकतो?

११ यहोवाचे नीतिनियम आणि स्तर चांगले आहेत आणि ते आपल्याच फायद्यासाठी आहेत. (स्तो. ११९:९७, १११, ११२) पण जोपर्यंत आपल्या बायबल विद्यार्थ्यांना हे समजणार नाही की यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि म्हणून त्याने आपल्याला नियम दिले आहेत, तोपर्यंत यहोवाचे नियम चांगले आहेत आणि आपल्याच फायद्याचे आहेत हे त्यांना पटणार नाही. त्यामुळे अभ्यास चालवताना आपण आपल्या विद्यार्थ्याला असं विचारू शकतो, की ‘तुम्हाला काय वाटतं अमुक एक गोष्ट करा किंवा अमुक एक गोष्ट करू नका असं यहोवा का म्हणतो? यावरून यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?’ आपण जर आपल्या विद्यार्थ्यांना यहोवाबद्दल विचार करायला आणि त्याच्या नावावर मनापासून प्रेम करायला मदत केली, तर आपण त्यांच्या मनापर्यंत पोहोचू शकतो. मग आपले विद्यार्थी फक्‍त देवाच्या नियमांवरच नाही, तर देवावरही प्रेम करतील. (स्तो. ११९:६८) आणि यामुळे त्यांचा विश्‍वास वाढेल आणि कठीण परीक्षांचा सामना करण्यासाठी त्यांना मदत होईल.—१ करिंथ. ३:१२-१५.

‘आम्ही यहोवाच्या नावाने चालत राहू’

दावीदने एका प्रसंगी आपलं मन भरकटू दिलं (परिच्छेद १२ पाहा)

१२. एका प्रसंगी दावीदचं मन कसं भरकटलं, आणि त्याचा काय परिणाम झाला?

१२ स्तोत्र ८६:११ मध्ये दावीद राजाने यहोवाकडे एक महत्त्वाची विनंती केली. तो म्हणाला: “माझे चित्त एकाग्र कर.” कारण आपलं चित्त किंवा मन किती सहज भरकटू शकतं हे त्याने आपल्या जीवनकाळात अनुभवलं होतं. एकदा दावीद राजा आपल्या महालाच्या छतावर फिरत होता, तेव्हा त्याला एका दुसऱ्‍या माणसाची स्त्री अंघोळ करताना दिसली. त्या वेळी दावीदचं मन एकाग्र राहिलं की ते भरकटू लागलं? या बाबतीत देवाचा स्तर काय आहे हे त्याला माहीत होतं. “आपल्या शेजाऱ्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको,” असं नियमशास्त्रात सांगितलं आहे हे त्याला माहीत होतं. (निर्ग. २०:१७) पण तरीसुद्धा तो बघत राहिला. त्याचं मन यहोवाला खूश करण्यावर एकाग्र राहिलं नाही तर ते त्या स्रीकडे, बथशेबाकडे भरकटू लागलं. खरंतर दावीदने नेहमीच यहोवावर प्रेम केलं होतं, त्याचं भय बाळगलं होतं. पण या प्रसंगी त्याने काही चुकीच्या गोष्टी केल्या. तो यहोवाचा उपासक असल्यामुळे यहोवाचं नाव बदनाम झालं. याशिवाय, त्याच्या या कृत्यामुळे त्याच्या कुटुंबावर आणि निरपराध लोकांवर भयंकर संकट ओढवलं.—२ शमु. ११:१-५, १४-१७; १२:७-१२.

१३. दावीदने आपलं मन पुन्हा एकाग्र केलं असं का म्हणता येईल?

१३ यहोवाने दावीदला शिक्षा केली तेव्हा त्याने आपली चूक कबूल केली. आणि तो पुन्हा एकदा यहोवासोबत आधीसारखं चांगलं नातं जोडू शकला. (२ शमु. १२:१३; स्तो. ५१:२-४, १७) आपलं मन भरकटू दिल्यामुळे जे संकट आणि दुःख दावीदवर ओढवलं ते तो कधीच विसरला नाही. म्हणूनच स्तोत्र ८६:११ मध्ये दावीदने देवाकडे अशी विनंती केली “माझे चित्त एकाग्र कर.” मग यहोवाने दावीदला त्याचं मन एकाग्र करायला मदत केली का? हो नक्कीच केली. कारण बायबल पुढे म्हणतं की “दावीद याचे मन परमेश्‍वराकडे पूर्णपणे” होते.—१ राजे ११:४; १५:३.

१४. आपण स्वतःला कोणता प्रश्‍न विचारला पाहिजे आणि का?

१४ दावीदच्या उदाहरणावरून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. पण त्याच्या या उदाहरणावरून आज देवाच्या लोकांना एक इशाराही मिळतो. आपण नुकतीच यहोवाची सेवा करायला सुरुवात केलेली असो किंवा आपण अनेक वर्षांपासून त्याची सेवा करत असू, आपण सगळ्यानीच स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे, ‘यहोवाच्या सेवेपासून माझं मन भरकटावं यासाठी सैतान जे काही प्रयत्न करतोय त्याचा मी विरोध करतोय का?’

तुमचं मन विभाजित करण्याचा सैतान पुरेपूर प्रयत्न करेल. पण त्याला तसं करू देऊ नका! (परिच्छेद १५-१६ पाहा) *

१५. मनात अनैतिक विचार निर्माण करणारी चित्रं समोर आली तर यहोवाचं भय कशा प्रकारे आपलं संरक्षण करू शकतं?

१५ उदाहरणार्थ, तुमच्या मनात अनैतिक विचार येतील असं एखादं चित्र तुम्ही टिव्हीवर किंवा इंटरनेटवर पाहिलं तर तुम्ही काय कराल? तुम्ही कदाचित तुमच्या मनाला अशी समजूत घालाल, की हे चित्र किंवा चित्रपट काही अश्‍लील नाही. पण तुमचं मन विभाजित करण्यासाठी सैतानाने केलेला हा प्रयत्न असू शकतो का? (२ करिंथ. २:११) त्या चित्राची तुलना एका कुऱ्‍हाडीशी केली जाऊ शकते. लाकडाचा मोठा ओंडका कापण्यासाठी सुरुवातीला कुऱ्‍हाडीने घाव घालून त्यावर छोटीशी चीर पाडली जाते. त्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा-पुन्हा घाव घालून त्या ओंडक्याचे दोन तुकडे केले जातात. अगदी त्याचप्रमाणे, मनात अनैतिक विचार निर्माण करणारं ते चित्रसुद्धा आपलं मन विभाजित करू शकतं. सुरुवातीला आपल्याला वाटेल की हे चित्र इतकं काही वाईट नाही. पण अशी चित्रं वारंवार पाहिल्यामुळे एखाद्याच्या हातून पाप घडू शकतं. आणि याचा परिणाम म्हणजे तो यहोवाला विश्‍वासू राहणार नाही. म्हणून तुमचं मन विभाजित होईल अशी कोणतीही गोष्ट तुमच्या मनात शिरू देऊ नका. यहोवाचं भय बाळगण्यासाठी आपलं मन एकाग्र करा.

१६. आपल्यासमोर प्रलोभनं येतात तेव्हा आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१६ आपल्याला मोहात पाडण्यासाठी सैतान अश्‍लील चित्रांचा वापर करण्यासोबतच इतर अनेक गोष्टींचा वापर करतो. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? आपल्या मनाची समजूत घालण्यासाठी आपण कदाचित असा विचार करू की ‘यासाठी मला मंडळीतून बहिष्कृत केलं जाणार नाही. म्हणजेच ही काही एवढी गंभीर चूक नाही.’ पण असा विचार करणं अगदीच चुकीचं आहे. अशा वेळी आपण स्वतःला पुढे दिलेले प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘माझं मन भरकटावं म्हणून सैतान या गोष्टीचा वापर करत आहे का? मी जर चुकीच्या इच्छांना बळी पडलो तर त्यामुळे यहोवाच्या नावाची बदनामी होईल का? मी जर हे काम केलं तर मी यहोवाच्या आणखी जवळ जाईन की दूर जाईन?’ या प्रश्‍नांची तुम्हाला प्रामाणिक उत्तरं देता यावीत म्हणून बुद्धीसाठी यहोवाकडे विनंती करा. (याको. १:५) यामुळे तुमचं संरक्षण होईल. येशूसमोर जेव्हा परीक्षा आल्या तेव्हा त्याने ठामपणे म्हटलं “अरे सैताना! चालता हो!” अगदी तसंच तुमच्यासमोर प्रलोभनं आली तर तुम्हीसुद्धा त्यांचा ठामपणे विरोध करू शकाल.—मत्त. ४:१०.

१७. आपलं मन विभाजित असणं का चांगलं नाही? उदाहरण देऊन समजवा.

१७ आपलं मन जर एकाग्र नसेल, म्हणजेच ते जर विभाजित असेल तर ते आपल्यासाठी चांगलं नाही. अशा एका स्पोर्ट्‌स टीमची कल्पना करा ज्यातल्या खेळाडूंचं एकमेकांशी पटत नाही. टीममधल्या काही खेळाडूंना सगळं श्रेय आपल्याला मिळावं असं वाटतं; तर इतर काही जण खेळाच्या नियमांप्रमाणे खेळत नाहीत. आणि असेही काही आहेत जे कोचचा अजिबात आदर करत नाहीत. टीममधले खेळाडू असे असतील तर त्यांचं मॅच जिंकणं कठीण आहे. याउलट ज्या टीममध्ये एकी असते तिची मॅच जिंकण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे तुमच्या मनातल्या इच्छा, विचार यहोवाची सेवा करण्यावर एकाग्र असतील, तर तुमचं मन त्या यशस्वी टीमसारखं असू शकतं. पण तुमचं मन एकाग्र असावं अशी सैतानाची मुळीच इच्छा नाही. उलट त्याची अशी इच्छा आहे की तुमचे विचार, इच्छा आणि भावना या यहोवाच्या स्तरांच्या विरोधात असाव्यात. पण यहोवाची सेवा करायची असेल तर आपलं मन एकाग्र किंवा पूर्ण असणं खूप महत्त्वाचं आहे. (मत्त. २२:३६-३८) तेव्हा सैतानाला तुमचं मन विभाजित करू देऊ नका!

१८. मीखा संदेष्ट्याप्रमाणेच आपणही काय निर्धार करू शकतो?

१८ दावीदप्रमाणे तुम्हीसुद्धा यहोवाला अशी प्रार्थना करू शकता: “तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.” आणि या प्रार्थनेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. देवाच्या नावाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही दररोज जे काही निर्णय घ्याल, मग ते लहान असोत किंवा मोठे त्यांवरून हे दाखवून द्या की तुम्हाला यहोवाच्या पवित्र नावाबद्दल गाढ आदर आणि भय आहे. यामुळे यहोवाच्या नावाचा गौरवच होईल. (नीति. २७:११) मग मीखा संदेष्ट्याप्रमाणेच आपल्यालाही असं म्हणता येईल: “आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालत जाऊ.”—मीखा ४:५, पं.र.भा.

गीत ६ देवाच्या सेवकाची प्रार्थना

^ परि. 5 स्तोत्र ८६:११, १२ यांत दावीद राजाच्या प्रार्थनेचा जो भाग नमूद करण्यात आला आहे त्यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत. यहोवाच्या नावाचं भय बाळगण्याचा काय अर्थ होतो? आपल्याला यहोवाच्या महान नावाबद्दल गाढ आदर का असला पाहिजे? देवाचं योग्य भय असल्यामुळे मोहापासून आपलं संरक्षण कसं होतं?

^ परि. 6 निर्गम ३:१४ मधला “मी आहे तो आहे” हा वाक्यांश “मला जे व्हायचं आहे, ते मी होईन” असाही भाषांतरित केला जाऊ शकतो.

^ परि. 8 अनुवाद ३२:२, ३ (पं.र.भा): “पावसाप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होईल; माझे वचन दहिंवरासारखे पाझरेल, जसा बारीक पाऊस कोवळ्या गवतावर आणि जसा वर्षाव हिरवळीवर तसे ते होईल. कारण मी यहोवाचे नाव गाजवून सांगेन; आमच्या देवाला तुम्ही थोरपण द्या.”

^ परि. 55 चित्रांचं वर्णन: मोशेने इस्राएली लोकांना यहोवाचा सन्मान करणारं एक गीत शिकवलं.

^ परि. 59 चित्रांचं वर्णन: हव्वाने चुकीच्या इच्छांचा विरोध केला नाही. आपण मात्र अशी कोणतीही चित्रं पाहणार नाही किंवा मेसेजेस वाचणार नाही ज्यांमुळे मनात चुकीच्या इच्छा निर्माण होतील आणि देवाच्या नावाची निंदा होईल.