व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २६

“माझ्याकडे परत या”

“माझ्याकडे परत या”

“माझ्याकडे परत या आणि मी तुमच्याकडे परत येईन.”—मला. ३:७, ईझी-टू-रीड व्हर्शन.

गीत ३८ आपला भार यहोवावर टाका

सारांश *

१. यहोवाचा एखादा सेवक त्याच्याकडे परत येतो तेव्हा त्याला कसं वाटतं?

आधीच्या लेखात आपण चर्चा केली होती, की यहोवा एका अशा मेंढपाळासारखा आहे जो आपल्या कळपातल्या प्रत्येक मेंढराची प्रेमळपणे काळजी घेतो. आणि कळपातलं एक जरी मेंढरू भरकटलं तरी तो त्याला शोधून काढतो. जे इस्राएली लोक यहोवापासून दूर गेले होते त्यांना तो म्हणाला: “माझ्याकडे परत या आणि मी तुमच्याकडे परत येईन.” आज यहोवापासून दूर गेलेल्यांबद्दलही त्याच्या अशाच भावना आहेत. कारण तो म्हणतो: “मी कधीही बदलत नाही.” (मला. ३:६, ७, ईझी-टू-रीड व्हर्शन) यहोवापासून दूर गेलेला एक जरी सेवक त्याच्याकडे परत आला तर यहोवाला आणि देवदूतांना खूप आनंद होतो असं येशूने म्हटलं.—लूक १५:१०,३२.‏

२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आता आपण येशूने दिलेल्या तीन उदाहरणांवर चर्चा करणार आहोत. या उदाहरणांवरून आपल्याला शिकता येईल, की यहोवापासून दूर गेलेल्यांना आपण कशी मदत करू शकतो. यहोवाच्या हरवलेल्या मेंढरांना त्याच्याकडे परत यायला मदत करण्यासाठी आपल्यात कोणते विशिष्ट गुण असणं गरजेचं आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. तसंच, अक्रियाशील झालेल्यांनी यहोवाकडे परत यावं म्हणून आपण मेहनत घेतो तेव्हा आपल्याला किती आनंद मिळतो यावरही आपण चर्चा करणार आहोत.

हरवलेलं नाणं शोधून काढणं

३-४. लूक १५:८-१० मध्ये उल्लेख केलेल्या स्त्रीने हरवलेलं नाणं शोधण्यासाठी इतकी मेहनत का घेतली?

यहोवाकडे ज्यांना परत येण्याची इच्छा आहे अशांना मदत करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली पाहिजे. लूकच्या शुभवर्तमानात येशूने एका अशा स्त्रीचं उदाहरण दिलं जिचं मौल्यवान नाणं हरवलं होतं. ते नाणं शोधण्यासाठी त्या स्त्रीने किती मेहनत घेतली हा त्या उदाहरणातला मुख्य मुद्दा आहे.लूक १५:८-१० वाचा.

हरवलेलं नाणं सापडल्यावर त्या स्त्रीला कसं वाटलं याचं वर्णन येशूने केलं. येशूच्या काळात एका इस्राएली मुलीचं लग्न व्हायचं तेव्हा तिची आई तिला दहा चांदीची नाणी भेट म्हणून द्यायची. कदाचित ते हरवलेलं नाणं या दहापैकीच एक असावं. नाणं घरातच कुठेतरी पडलं असावं असं त्या स्त्रीला वाटतं. म्हणून ती दिवा लावून घरभर शोधते. पण कदाचित दिव्याच्या कमी प्रकाशामुळे तिला ते सापडत नाही. शेवटी ती संपूर्ण घर नीट झाडून काढते, आणि तिला ते चांदीचं चकाकणारं नाणं दिसतं! तेव्हा कुठे तिच्या जिवात जीव येतो. ती लगेच जाऊन तिच्या मैत्रिणींना आणि शेजाऱ्‍यांना जाऊन बोलवते आणि त्यांना ही आनंदाची बातमी सांगते.

५. अक्रियाशील झालेल्यांना शोधून काढण्यासाठी मेहनत का घ्यावी लागू शकते?

येशूने सांगितलेल्या उदाहरणातून आपण काय शिकतो? हेच की एखादी हरवलेली गोष्ट शोधून काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचप्रमाणे मंडळीतून दूर गेलेल्या लोकांना शोधून काढण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागू शकते. त्यांना कदाचित मंडळीपासून दूर जाऊन खूप वर्षं झाली असतील. ते कदाचित अशा ठिकाणी राहायला गेले असतील जिथले भाऊबहीण त्यांना ओळखत नसतील. पण यांपैकी काही जण यहोवाकडे परत येण्यासाठी आसुसलेले असतील. त्यांना पुन्हा आपल्या भाऊबहिणींसोबत यहोवाची सेवा करण्याची इच्छा असेल. आणि आपण जर त्यांना मदत केली तर त्यांना तसं करणं शक्य होईल.

६. मंडळीतले सर्वच जण अक्रियाशील झालेल्यांना शोधण्यासाठी कसा हातभार लावू शकतात?

अक्रियाशील झालेल्यांना शोधण्यासाठी कोण मदत करू शकतं? मंडळीतले वडील, पायनियर, प्रचारक, त्या व्यक्‍तीच्या कुटुंबातले सदस्य असे सगळेच त्या व्यक्‍तीला शोधून काढण्यासाठी मदत करू शकतात. तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक अक्रियाशील झाला आहे का? किंवा घरोघरचं साक्षकार्य करताना, सार्वजनिक साक्षकार्य करताना तुमची एखाद्या अक्रियाशील व्यक्‍तीशी भेट झाली आहे का? तर मग तुम्ही त्या व्यक्‍तीला समजावून सांगू शकता, की मंडळीच्या वडिलांनी तिची भेट घ्यावी अशी जर तिची इच्छा असेल तर ती तिचा पत्ता आणि फोन नंबर आपल्याला देऊ शकते,  म्हणजे आपल्याला ती माहिती पुढे मंडळीतल्या वडिलांना देता येईल.

७. थॉमस नावाच्या वडिलांकडून आपण काय शिकतो?

अक्रियाशील झालेल्यांना यहोवाकडे परत यायला मदत करण्याची मुख्य जबाबदारी मंडळीतल्या वडिलांची आहे. त्यासाठी ते कोणती व्यावहारिक पावलं उचलू शकतात? स्पेनमध्ये राहणारे थॉमस नावाचे वडील काय करतात याकडे लक्ष द्या. * त्यांनी ४० हून अधिक भाऊबहिणींना यहोवाकडे परत यायला मदत केली आहे. ते म्हणतात: “सर्वात आधी मी प्रचारकांना विचारतो, की त्यांना असं कोणी माहीत आहे का ज्यांनी सभांना यायचं बंद केलं आहे. तसंच, सध्या ते कुठे राहतात हेही मी त्यांना विचारतो. बहुतेक भाऊबहीण मदत करायला आनंदाने तयार होतात. कारण अक्रियाशील झालेल्यांना शोधण्यात आपलाही हातभार लागतो या विचाराने त्यांनाही समाधान वाटतं. मग अक्रियाशील भाऊबहिणींना भेटल्यावर मी त्यांना त्यांच्या मुलांबद्दल आणि इतर नातेवाइकांबद्दल विचारतो. यांच्यापैकी काही जण आपल्या मुलांना सभांना घेऊन यायचे. कदाचित त्यांची ही मुलं एकेकाळी प्रचारकही असतील. त्यामुळे यहोवाकडे परत यायला आपण त्यांनासुद्धा मदत करू शकतो.”

यहोवाच्या मुलांना परत यायला मदत करणं

८. लूक १५:१७-२४ यांत दिलेल्या उदाहरणात घरी परत आलेल्या मुलाशी वडील कसे वागतात?

ज्यांना यहोवाकडे परत यायची इच्छा आहे त्यांना मदत करण्यासाठी आपल्यात कोणते गुण असणं गरजेचं आहे? येशूने घर सोडून गेलेल्या उधळ्या मुलाचं जे उदाहरण सांगितलं त्यातून आपण काय शिकू शकतो याकडे लक्ष द्या. (लूक १५:१७-२४ वाचा.) तो मुलगा शेवटी कसा भानावर आला आणि त्याने घरी परतण्याचा निर्णय कसा घेतला हे येशूने त्या उदाहरणात समजावलं. मुलगा घरी परत आला तेव्हा वडील धावत त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला प्रेमाने मिठी मारली. असं करून त्यांनी दाखवून दिलं की त्यांचं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे. मुलाने जे काही केलं होतं त्याबद्दल त्याचं मन त्याला खात होतं. आणि मुलगा म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही असंही त्याला वाटत होतं. त्याने आपल्या भावना वडिलांना सांगितल्या तेव्हा वडिलांना त्याचा कळवळा आला. वडिलांनी त्याच्यासाठी अशा काही गोष्टी केल्या ज्यांवरून मुलाला खातरी पटली की आपल्या वडिलांचं अजूनही आपल्यावर प्रेम आहे. त्यांनी त्याला दास किंवा नोकर म्हणून नाही तर आपला प्रिय मुलगा म्हणून स्वीकारलं. हे दाखवून देण्यासाठी वडिलांनी आपल्या मुलाकरता सर्वात चांगल्या कपड्यांची व्यवस्था केली आणि एक मोठी मेजवानीही ठेवली.

९. अक्रियाशील झालेल्यांना यहोवाकडे परत यायला मदत करण्यासाठी आपल्यात कोणते गुण असले पाहिजेत? (“ ज्यांना यहोवाकडे परत यायची इच्छा आहे अशांना आपण कशी मदत करू शकतो?” ही चौकट पाहा.)

यहोवा, येशूने दिलेल्या त्या उदाहरणातल्या पित्यासारखा आहे. अक्रियाशील झालेल्या आपल्या भाऊबहिणींवर त्याचं अजूनही प्रेम आहे आणि त्यांनी त्याच्याकडे परत यावं अशी त्याची इच्छा आहे. यहोवाचं अनुकरण करण्याद्वारे आपण त्यांना त्याच्याकडे परत यायला मदत करू शकतो. आणि यासाठी आपल्याला धीर, सहानुभूती आणि प्रेम दाखवण्याची गरज आहे. हे विशिष्ट गुण आपण का आणि कसे दाखवू शकतो?

१०. एखाद्याला यहोवाकडे परत यायला मदत करण्यासाठी आपल्याला धीर दाखवण्याची गरज का आहे?

१० यहोवाकडे परत यायला एखाद्याला वेळ लागू शकतो, म्हणून आपल्याला धीर दाखवण्याची गरज आहे. एकेकाळी अक्रियाशील झालेले अनेक जण म्हणतात की मंडळीतले वडील आणि इतर जण त्यांना वारंवार येऊन भेटल्यामुळे ते पुन्हा एकदा यहोवाची सेवा करू लागले. दक्षिणपूर्व आशिया इथे राहणारी नॅन्सी नावाची बहीण म्हणते: “मंडळीतल्या एका बहिणीने मला खूप मदत केली. एका मोठ्या बहिणीसारखं तिने माझ्यावर प्रेम केलं. आधी आम्ही एकत्र जे आनंदाचे क्षण घालवले होते त्यांची तिने मला आठवण करून दिली. मी तिच्याजवळ आपलं मन मोकळं करायचे तेव्हा ती धीराने ऐकून घ्यायची आणि गरज पडल्यावर ती मला सल्लाही द्यायची. मला जेव्हा-जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा-तेव्हा मदत करून तिने दाखवून दिलं की ती माझी खरी मैत्रीण आहे.”

११. ज्यांचं मन दुखावलं गेलं आहे त्यांना सहानुभूती दाखवण्याची गरज का आहे?

११ आपण जेव्हा एखाद्या व्यक्‍तीकडून दुखावलो जातो, तेव्हा जणू आपल्याला एक जखम होते. आणि ती जखम भरून काढण्यासाठी सहानुभूती एका गुणकारी औषधासारखं काम करू शकते. अक्रियाशील झालेले काही जण कदाचित अनेक वर्षांआधी मंडळीतल्या एखाद्या व्यक्‍तीकडून दुखावले गेले असतील. आणि त्या गोष्टीचा राग अजूनही त्यांच्या मनात असेल. त्यामुळे त्यांना यहोवाकडे परत यायची इच्छा होत नाही. तर असेही काही असतील ज्यांना असं वाटत असेल की त्यांच्यासोबत अन्याय झाला आहे. अशा वेळी त्यांना कदाचित अशा एका व्यक्‍तीची गरज असेल जी त्यांचं धीराने ऐकून घेईल आणि त्यांच्या भावना समजून घेईल. (याको. १:१९) पूर्वी काही काळासाठी अक्रियाशील असलेली मरिया नावाची एक बहीण म्हणते: “मला अशा एका व्यक्‍तीची गरज होती, जी धीराने माझं ऐकून घेईल, माझं सांत्वन करेल, मला चांगला सल्ला देईल आणि मला मदत करेल.”

१२. यहोवाच्या प्रेमाची तुलना एका दोरीसोबत कशी करण्यात आली आहे? एक उदाहरण द्या.

१२ यहोवाला आपल्या लोकांबद्दल जे प्रेम वाटतं त्याची तुलना बायबलमध्ये एका दोरीसोबत करण्यात आली आहे. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. अशी कल्पना करा, की तुम्ही एका खोल खड्ड्यात पडला आहात. तो इतका खोल आहे, की तुम्हाला स्वतःहून त्यातून बाहेर येणं शक्य नाही. त्यातून बाहेर येण्याचा एकच मार्ग आहे; तो म्हणजे, कोणीतरी तुमच्याकडे दोरी फेकावी आणि तुम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढावं. यहोवापासून दूर गेलेल्या इस्राएली लोकांबद्दल यहोवाने हीच गोष्ट म्हटली होती. तो म्हणाला: “प्रीतीच्या दोरांनी मी त्यांना ओढले.” (होशे. ११:४, पं.र.भा.) आज ज्यांनी यहोवाची सेवा करायचं थांबवलं आहे, आणि जे समस्यांनी व चिंतांनी दबून गेले आहेत त्यांच्याबद्दल यहोवाला असंच वाटतं. ते जणू एका खोल खड्ड्यात पडले आहेत. यहोवाचं त्यांच्यावर प्रेम आहे हे त्यांना समजावं अशी त्याची इच्छा आहे. तसंच, त्यांना प्रेमाच्या दोरांनी आपल्याजवळ आणावं असंही त्याला वाटतं. आणि त्यासाठी तो तुमचा उपयोग करू शकतो.

१३. अक्रियाशील झालेल्या भाऊबहिणींवर आपल्या प्रेमाचा काय परिणाम होऊ शकतो? एक उदाहरण द्या.

१३ अक्रियाशील झालेल्या लोकांना याचं आश्‍वासन देणं खूप गरजेचं आहे, की यहोवाचं आणि आपलंसुद्धा त्यांच्यावर प्रेम आहे. आधीच्या लेखात उल्लेख केलेले पाब्लो नावाचे बांधव ३० पेक्षा जास्त वर्षं अक्रियाशील होते. ते म्हणतात: “एकदा सकाळी मी घरातून निघालो तेव्हा एक वयस्कर बहीण मला भेटली. ती माझ्याशी खूप प्रेमाने बोलली. तिच्या बोलण्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला, की मी एका लहान मुलासारखा रडू लागलो. मी त्या बहिणीला म्हटलं: “नक्कीच यहोवाने तुम्हाला माझ्याशी बोलायला पाठवलंय. आणि त्याच क्षणी मी ठरवलं, की मी यहोवाकडे परत येणार.”

कमजोर झालेल्यांना प्रेमळपणे मदत करणं

१४. लूक १५:४, ५ यांत दिलेल्या उदाहरणानुसार, हरवलेलं मेंढरू सापडल्यावर मेंढपाळ काय करतो?

१४ अक्रियाशील झालेले भाऊबहीण सापडल्यावर त्यांना मदत करत राहणं आणि प्रोत्साहन देत राहणं खूप गरजेचं आहे. येशूने दिलेल्या उदाहरणातल्या उधळ्या मुलाला खूप काही सोसावं लागलं होतं. त्याचप्रमाणे, अक्रियाशील झालेल्या भाऊबहिणींनाही खूप काही सोसावं लागलं असेल. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना कदाचित खूप वेळ लागू शकतो. याशिवाय, सैतानाच्या जगात राहिल्यामुळे त्यांचं यहोवासोबतचं नातंही कमजोर झालं असेल. त्यामुळे, यहोवावरचा त्यांचा विश्‍वास पुन्हा मजबूत करण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे. येशूने सांगितलेल्या हरवलेल्या मेंढराच्या उदाहरणात, मेंढपाळाला आपलं हरवलेलं मेंढरू सापडतं तेव्हा तो कशा प्रकारे त्याला कळपात परत आणतो याचं वर्णन येशूने केलं. हरवलेलं मेंढरू शोधण्यासाठी मेंढपाळाने आधीच बराच वेळ खर्च केला होता आणि खूप मेहनत घेतली होती. पण त्याला जेव्हा दिसतं, की मेंढरू कमजोर झालं आहे आणि ते कळपापर्यंत स्वतःहून चालत येऊ शकत नाही, तेव्हा तो त्याला उचलून खांद्यावर घेतो आणि कळपात परत आणतो.—लूक १५:४, ५ वाचा.

१५. यहोवाकडे परत यायची इच्छा असलेल्यांना आपण कशी मदत करू शकतो? (“ एक अनमोल साधन,” ही चौकट पाहा.)

१५ अक्रियाशील झालेल्यांना पुन्हा एकदा यहोवाची सेवा करायची इच्छा असते. पण एखाद्या समस्येमुळे त्यांना ते करणं कठीण जात असेल. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला बराच वेळा द्यावा लागेल आणि मेहनत घ्यावी लागेल. यहोवाचा पवित्र आत्मा, त्याचं वचन बायबल आणि संघटनेने पुरवलेली प्रकाशनं यांच्या साहाय्याने आपण त्यांना पुन्हा यहोवासोबत नातं जोडायला मदत करू शकतो. (रोम. १५:१) त्यांना मदत करण्यासाठी आपण या गोष्टींचा कसा उपयोग करू शकतो? एक अनुभवी वडील म्हणतात: “भाऊबहीण जेव्हा यहोवाकडे परत येण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेकांसोबत पुन्हा बायबल अभ्यास करणं गरजेचं आहे.” * त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या अक्रियाशील व्यक्‍तीचा बायबल अभ्यास घ्यायला सांगितला तर तुम्ही आनंदाने तयार व्हाल का? ते वडील पुढे असंही म्हणतात: “त्यांचा अभ्यास घेणाऱ्‍या प्रचारकाने त्यांच्याशी चांगली मैत्री केली पाहिजे. त्यामुळे अक्रियाशील झालेल्या व्यक्‍तीला त्याच्यावर भरवसा ठेवता येईल आणि त्याच्याकडे आपलं मन मोकळं करता येईल.”

स्वर्गात आणि पृथ्वीवर आनंद होतो

१६. अक्रियाशील झालेल्यांना शोधण्यासाठी देवदूत आपल्याला कशी मदत करतात?

१६ अनेक अनुभव दाखवून देतात, की ज्यांना यहोवाकडे परत येण्याची इच्छा आहे अशा अक्रियाशील जणांना शोधून काढण्यासाठी देवदूत आपली मदत करत आहेत. (प्रकटी. १४:६) उदाहरणार्थ, एक्क्‌वाडॉरमध्ये राहणारे सिल्वीयो नावाचे बांधव, यहोवाला कळकळून प्रार्थना करत होते की मंडळीत परत येण्यासाठी कोणीतरी त्यांना मदत करावी. ते प्रार्थना करतच होते इतक्यात त्यांच्या दारावरची बेल वाजली! दोन वडील त्यांना भेटायला आले होते. त्यांनी त्याच भेटीपासून त्याला यहोवाकडे परत येण्यासाठी लागणारी मदत द्यायला सुरू केली.

१७. अक्रियाशील झालेल्यांना मदत केल्यामुळे आपल्याला कसं वाटेल?

१७ आध्यात्मिक रीत्या कमजोर झालेल्यांना यहोवाकडे परत येण्यासाठी मदत केल्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. साल्वडोर नावाचे पायनियर बांधव अक्रियाशील झालेल्यांना मदत करण्यासाठी खूप मेहनत घेतात. ते म्हणतात, “अक्रियाशील झालेले भाऊबहीण यहोवाकडे परत आलेले पाहून मला इतका आनंद होतो की मला माझे अश्रू आवरत नाहीत. यहोवाने सैतानाच्या जगातून आपल्या प्रिय मेंढराला वाचवलं, आणि या कार्यात यहोवासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद होतो.”—प्रे. कार्ये २०:३५.

१८. तुम्ही अक्रियाशील झाला असाल तर तुम्ही कोणती खातरी बाळगू शकता?

१८ तुम्ही जर अक्रियाशील झाला असाल तर या गोष्टीची खातरी बाळगा, की यहोवाचं तुमच्यावर अजूनही प्रेम आहे आणि तुम्ही त्याच्याकडे परत यावं अशी त्याची इच्छा आहे. पण यासाठी तुम्हाला काही पावलं उचलावी लागतील. येशूने दिलेल्या उदाहरणातल्या पित्याप्रमाणेच, यहोवा तुमच्या परत येण्याची वाट पाहत आहे. आणि तुम्ही परत याल तेव्हा तो तुमचं आनंदाने स्वागत करेल.

गीत ४२ “दुर्बळांना साहाय्य करावे”

^ परि. 5 यहोवाची अशी इच्छा आहे, की जे अक्रियाशील झाले आहेत त्यांनी त्याच्याकडे परत यावं. “माझ्याकडे परत या,” असं यहोवा त्यांना आर्जवतो. यहोवाच्या या प्रेमळ विनंतीला प्रतिसाद द्यायला आपण या भाऊबहिणींना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपल्याला हे कसं करता येईल याची चर्चा आपण या लेखात करणार आहोत.

^ परि. 7 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 15 अक्रियाशील झालेल्या काहींचा बायबल अभ्यास घेताना त्यांच्यासोबत, देवाच्या प्रेमात टिकून राहा!  या पुस्तकातल्या काही भागांची चर्चा केली जाऊ शकते; तर इतर काहींसोबत, यहोवा के करीब आओ  या पुस्तकातल्या काही अध्यायांवर चर्चा केली जाऊ शकते. या भाऊबहिणींचा बायबल अभ्यास कोणी घ्यायचा हे मंडळीची सेवा समिती ठरवते.

^ परि. 68 चित्रांचं वर्णन: तीन बांधव अशा एका बांधवाची मदत करत आहेत ज्याला यहोवाकडे परत यायची इच्छा आहे. ते त्याच्याशी नियमितपणे बोलतात, त्याचं ऐकून घेतात आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तसंच, त्याला या गोष्टीचं आश्‍वासनही देतात की भाऊबहिणीचं त्याच्यावर प्रेम आहे.