व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

गलतीकर ५:२२, २३ यांत उल्लेख केलेलेच गुण ‘पवित्र आत्म्याच्या फळाचे’ पैलू आहेत का?

या वचनांत नऊ गुणांचा उल्लेख केला आहे. त्यात म्हटलं आहे, “आत्म्याचे फळ म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्‍वास, सौम्यता, आत्मसंयम.” पण देवाचा पवित्र आत्मा फक्‍त आपल्याला हेच गुण विकसित करायला मदत करेल असा याचा अर्थ होत नाही. आपण असं का म्हणू शकतो.

पौल याआधीच्या वचनांमध्ये काय म्हणाला याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं, “शरीराची कामे . . . म्हणजे, अनैतिक लैंगिक कृत्ये, अशुद्धपणा, निर्लज्ज वर्तन, मूर्तिपूजा, भूतविद्या, वैर, भांडणे, हेवेदावे, रागाने भडकणे, मतभेद, फुटी, वेगवेगळे पंथ निर्माण करणे, ईर्ष्या, दारुडेपणा, बेलगाम मौजमस्ती आणि अशाच इतर गोष्टी.” (गलती. ५:१९-२१) ‘शरीराच्या कामांमध्ये’ पौल इतर गोष्टींचा, म्हणजे कलस्सैकर ३:५ यात सांगितलेल्या गोष्टींचाही उल्लेख करू शकला असता. तसंच, गलतीकर ५:२३ मध्ये नऊ चांगल्या गुणांचा उल्लेख केल्यानंतरही त्याने हीच पद्धत वापरली. त्याने म्हटलं: “अशा गोष्टींविरुद्ध कोणताही नियम नाही.” त्यामुळे आपण म्हणू शकतो की, पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण विकसित करू शकतो अशा सगळ्याच गुणांचा पौलने उल्लेख केला नाही.

पवित्र आत्म्याच्या फळाची तुलना आपण प्रकाशाच्या फळाशी केली तर आपल्याला ही गोष्ट आणखीन चांगल्या प्रकारे समजते. त्याबद्दल पौलने इफिसच्या मंडळीला लिहिलं, “प्रकाशाचे फळ म्हणजे सर्व प्रकारचा चांगुलपणा, नीती व सत्य आहे.” (इफिस. ५:८, ९) या वचनावरून कळतं की नीती व सत्य यासोबतच “चांगुलपणा” हा ‘प्रकाशाच्या फळाचा’ एक भाग आहे. पण तो ‘आत्म्याच्या फळाचा’ पैलूसुद्धा आहे.

पौलने तीमथ्यला सहा गुण विकसित करण्याचं प्रोत्साहन दिलं. ते सहा गुण म्हणजे, “न्याय, सुभक्‍ती, विश्‍वास, प्रेम, धीर आणि सौम्यता” (१ तीम. ६:११) या वचनांत उल्लेख केलेले तीन गुण, म्हणजे विश्‍वास, प्रेम आणि सौम्यता हे पवित्र आत्म्याच्या फळाचे पैलू आहेत. तीमथ्यला या गुणांसोबत न्याय, सुभक्‍ती आणि धीर हे गुणसुद्धा विकसित करायचे होते. आणि त्याला माहीत होतं की यासाठी त्याला पवित्र आत्म्याची मदत लागेल.—कलस्सैकर ३:१२; २ पेत्र १:५-७ या वचनांसोबत तुलना करा.

तेव्हा एका ख्रिस्ती व्यक्‍तीने विकसित केले पाहिजेत अशा सर्वच गुणांचा गलतीकर ५:२२, २३ या वचनांत उल्लेख केलेला नाही. देवाचा आत्मा आपल्याला ‘पवित्र आत्म्याच्या फळाचे’ नऊ पैलू विकसित करायला मदत करेल. पण एक प्रौढ ख्रिस्ती बनण्यासाठी आणि “देवाच्या इच्छेनुसार निर्माण करण्यात आलेले, तसेच खरे नीतिमत्त्व आणि एकनिष्ठता यांवर आधारित असलेले नवे व्यक्‍तिमत्त्व” धारण करण्यासाठी आपल्याला यांशिवाय आणखी गुण विकसित करण्याची गरज आहे.—इफिस. ४:२४.