व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २२

आपल्या बायबल विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा घ्यायला मदत करा

आपल्या बायबल विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा घ्यायला मदत करा

“तुमच्यापैकी प्रत्येकाने . . . बाप्तिस्मा घ्या.”—प्रे. कार्यं २:३८.

गीत १० “हा मी आहे, मला पाठीव!”

सारांश *

१. यरुशलेममध्ये जमलेल्या लोकांना काय समजलं, आणि पेत्रने त्यांना काय सांगितलं?

इ. स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी यरुशलेममध्ये खूप लोक जमले होते. जगाच्या कानाकोपऱ्‍यांतून आलेले हे लोक वेगवेगळ्या भाषा बोलत होते. त्या दिवशी एक आश्‍चर्यकारक गोष्ट घडली. काही यहुदी अचानक इतर देशांतून आलेल्या लोकांच्या भाषेत बोलू लागले. हे पाहून जमलेले लोक खूप चकित झाले. पण त्या यहुद्यांनी आणि प्रेषित पेत्रने जे  सांगितलं ते ऐकून तर ते आणखीनच चकित झाले. कारण त्यांना समजलं, की आपण जर येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवला तर आपलं जीवन वाचू शकतं. ही गोष्ट थेट त्यांच्या मनाला भिडली. इतकी की ते म्हणाले, “आता आम्ही काय करू?” तेव्हा पेत्र त्यांना म्हणाला, “तुमच्यापैकी प्रत्येकाने . . . बाप्तिस्मा घ्या.”—प्रे. कार्यं २:३७, ३८.

एक भाऊ एका तरुण मुलाच्या बायबल अभ्यासाला आपल्या पत्नीला घेऊन गेला आहे. ते कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातून अभ्यास करत आहेत (परिच्छेद २ पाहा)

२. आता आपण कशावर चर्चा करणार आहोत? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

त्यानंतर जे घडलं त्याची तर कुणी कल्पनाही केली नसेल. त्या दिवशी जवळजवळ ३,००० लोकांनी बाप्तिस्मा घेतला आणि ते येशूचे शिष्य बनले. येशूने आपल्या अनुयायांना शिष्य बनवण्याचं जे मोठं काम दिलं होतं त्याची ही फक्‍त सुरुवात होती; आणि ते काम आजही चालू आहे. पण पहिल्या शतकासारखं आपण एखाद्या व्यक्‍तीशी काही तास चर्चा केली आणि तिने लगेच बाप्तिस्मा घेतला तसं आज होत नाही. त्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला काही महिने किंवा काही वर्षंही लागू शकतात. आपल्याला माहीत आहे, की एखाद्याला येशूचा शिष्य बनायला मदत करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे आपल्या बायबल विद्यार्थ्याला बाप्तिस्मा घ्यायला आपण कशी मदत करू शकतो, याची चर्चा आता आपण करू या.

विद्यार्थ्यांना शिकलेल्या गोष्टी लागू करायला मदत करा

३. मत्तय २८:१९, २० या वचनांत सांगितल्याप्रमाणे बाप्तिस्मा घेण्याआधी आपल्या विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे?

बाप्तिस्मा घेण्याआधी विद्यार्थ्याने बायबलमधून शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू केल्या पाहिजेत. (मत्तय २८:१९, २० वाचा.) विद्यार्थी असं करतो तेव्हा तो येशूने दिलेल्या उदाहरणातल्या त्या बुद्धिमान माणसासारखं बनतो, जो आपलं घर बांधण्यासाठी जमिनीत खोलपर्यंत खोदून खडकावर पाया घालतो. (मत्त. ७:२४, २५; लूक ६:४७, ४८) तर मग, शिकलेल्या गोष्टी लागू करायला आपण विद्यार्थ्याला कशी मदत करू शकतो? यासाठी तीन गोष्टी आपण पाहू या.

४. विद्यार्थ्याला बाप्तिस्मा घ्यायला आपण कशी मदत करू शकतो? (“ विद्यार्थ्याला ध्येयं ठेवायला आणि ती गाठायला तुम्ही कशी मदत करू शकता?” ही चौकटसुद्धा पाहा.)

विद्यार्थ्याला ध्येयं ठेवायला मदत करा.  असं करणं का गरजेचं आहे? त्यासाठी एक उदाहरण पाहू या. समजा तुम्ही तुमच्या गाडीतून एका लांबच्या प्रवासाला चालला आहात. पण मधे कुठेही न थांबता तुम्ही सतत प्रवास करत राहिलात तर तुम्हाला तो प्रवास खूप लांबचा वाटेल. पण तेच जर रस्त्यात येणारी सुंदर ठिकाणं पाहण्यासाठी तुम्ही अधेमधे थांबलात तर तुम्हाला तो प्रवास मुळीच लांबचा वाटणार नाही. त्याप्रमाणे बायबल विद्यार्थी आपल्या जीवनात छोटीछोटी ध्येयं ठेवून ती गाठतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की बाप्तिस्म्याचं ध्येय गाठणं कठीण नाही. विद्यार्थ्याला ध्येयं ठेवायला मदत करण्यासाठी, कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातली “ध्येय” ही चौकट वापरा. प्रत्येक चौकटीत एक ध्येय दिलं आहे. हे ध्येय शिकलेल्या गोष्टी लागू करायला विद्यार्थ्याला कशी मदत करू शकतं, याची प्रत्येक धड्यानंतर त्याच्यासोबत चर्चा करा. तुमच्या विद्यार्थ्याने दुसरं एखादं ध्येय ठेवावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर “यासोबतच” याच्या खाली ते लिहा. विद्यार्थ्याने ठेवलेली छोटीमोठी ध्येयं गाठण्यासाठी तो काय करत आहे याची चर्चा करण्यासाठी नेहमी या चौकटीचा उपयोग करा.

५. मार्क १०:१७-२२ या वचनांत येशूने एका श्रीमंत माणसाला काय करायला सांगितलं, आणि का?

विद्यार्थ्याला जीवनात बदल करायला मदत करा.  (मार्क १०:१७-२२ वाचा.) एखाद्या श्रीमंत माणसाला आपली सगळी मालमत्ता विकून टाकणं किती कठीण असू शकतं हे येशूला माहीत होतं. (मार्क १०:२३) पण तरीसुद्धा त्याने एका श्रीमंत माणसाला आपली सगळी मालमत्ता विकायला सांगितली. येशूने त्याला असं का सांगितलं? कारण येशूचं त्याच्यावर प्रेम होतं. काही वेळा आपण आपल्या विद्यार्थ्याला शिकलेल्या गोष्टी लागू करायला सांगत नाही. कारण आपल्याला वाटतं, की तो अजून बदल करायला तयार नाही. हे खरं आहे, की जुन्या सवयी सोडून देण्यासाठी आणि स्वतःमध्ये बदल करण्यासाठी काहींना वेळ लागू शकतो. (कलस्सै. ३:९, १०) पण याबद्दल तुम्ही जितक्या लवकर आपल्या विद्यार्थ्याशी बोलाल तितक्या लवकर तो आपल्या जीवनात बदल करायला लागेल. अशा प्रकारे त्याच्याशी उघडपणे बोलून तुम्ही दाखवून द्याल की तुम्हाला त्याची काळजी आहे.—स्तो. १४१:५; नीति. २७:१७.

६. विद्यार्थ्याला प्रश्‍न विचारणं का महत्त्वाचं आहे?

एखाद्या विषयाबद्दल विद्यार्थ्याला काय वाटतं किंवा त्याबद्दल त्याचं काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी त्याला प्रश्‍न विचारणं महत्त्वाचं आहे. यावरून, शिकत असलेल्या गोष्टी त्याला समजतात का किंवा तो काय मानतो हे आपल्याला कळेल. तुम्ही वेळोवेळी विद्यार्थ्याला प्रश्‍न विचारले, तर ज्या गोष्टी विद्यार्थ्याला मान्य करणं कठीण आहे त्या गोष्टींबद्दल बोलायला पुढे तुम्हाला सोपं जाईल. असे अनेक प्रश्‍न कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकात दिले आहेत. जसं की, चवथ्या धड्यात म्हटलं आहे: “आपण यहोवाचं नाव वापरतो तेव्हा त्याला कसं वाटतं?” आणि नवव्या धड्यात म्हटलं आहे: “तुम्हाला कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करावीशी वाटते?” सुरुवातीला अशा प्रश्‍नांची उत्तरं देणं विद्यार्थ्याला कठीण वाटू शकतं. त्यासाठी तुम्ही त्याला पुस्तकात दिलेल्या शास्त्रवचनांचा आणि चित्रांचा उपयोग करून उत्तर द्यायला सांगू शकता.

७. विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी तुम्ही अनुभवांचा चांगल्या प्रकारे उपयोग कसा करू शकता?

आपल्याला काय बदल करायची गरज आहे हे विद्यार्थ्याला समजलं, की मग आपल्या भाऊबहिणींचे अनुभव सांगून तो बदल करायला त्याला मदत करा. जसं की, विद्यार्थी जर नियमितपणे सभांना येत नसेल, तर तुम्ही त्याला यहोवाने माझी काळजी घेतली,  हा व्हिडिओ दाखवू शकता. हा व्हिडिओ चौदाव्या अध्यायातल्या “हेसुद्धा पाहा” या चौकटीत दिला आहे. असे अनुभव, कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातल्या अनेक धड्यांमध्ये “आणखी जाणून घेऊ या” किंवा “हेसुद्धा पाहा” या भागांत तुम्हाला मिळतील. * पण विद्यार्थ्याला अनुभव सांगताना एक काळजी घ्या. “जर ते भाऊबहीण करू शकतात तर तुम्हीसुद्धा करू शकता,” असं म्हणू नका. याची विद्यार्थ्याला स्वतःला जाणीव होऊ द्या. व्हिडिओमधल्या भावाला किंवा बहिणीला बायबलमधून शिकलेल्या गोष्टी लागू करायला कोणत्या गोष्टींमुळे मदत झाली याबद्दल बोला. जसं की, कोणत्या वचनामुळे त्यांना मदत झाली किंवा बदल करायला त्यांनी स्वतः काय केलं याबद्दल बोला. आणि यहोवाने त्या बहिणीला किंवा भावाला कशी मदत केली हे त्याला सांगा.

८. विद्यार्थ्याला यहोवावर प्रेम करायला आपण कशा प्रकारे मदत करू शकतो?

विद्यार्थ्याला यहोवावर प्रेम करायला शिकवा.  आपण ते कसं करू शकतो? संधी मिळेल तेव्हा आपल्या विद्यार्थ्याला यहोवाच्या गुणांबद्दल सांगा. यहोवा हा आनंदी देव आहे आणि जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासोबत तो नेहमी असतो ही गोष्ट आपल्या विद्यार्थ्याला समजायला मदत करा. (१ तीम. १:११; इब्री ११:६) तसंच, विद्यार्थ्याला सांगा की शिकलेल्या गोष्टी लागू केल्यामुळे त्याला बरेच फायदे होतील. यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच तो आपल्याला या गोष्टी शिकवतो. आणि म्हणून आपल्याला हे फायदे होतात हे विद्यार्थ्याला समजायला मदत करा. (यश. ४८:१७, १८) जितकं जास्त त्याचं यहोवावरचं प्रेम वाढत जाईल तितकं जास्त त्याला स्वतःमध्ये बदल करावासा वाटेल.—१ योहा. ५:३.

विद्यार्थ्याची इतर भाऊबहिणींशी ओळख करून द्या

९. मार्क १०:२९, ३० या वचनांनुसार कोणती गोष्ट विद्यार्थ्याला त्याग करायला मदत करू शकते?

बाप्तिस्मा घेण्यासाठी एका विद्यार्थ्याला आपल्या जीवनात बरेच त्याग करावे लागतात. आपण जसं पाहिलं, की येशूने त्या श्रीमंत माणसाला आपल्या मालमत्तेचा त्याग करायला सांगितलं होतं. तशाच प्रकारचा त्याग काही विद्यार्थ्यांना करावा लागू शकतो. जसं की, जर त्यांची नोकरी बायबलच्या तत्त्वांनुसार नसेल तर त्यांना ती बदलावी लागू शकते. काहींना असे मित्र सोडावे लागू शकतात जे यहोवाची उपासना करत नाहीत. आणि काहींच्या बाबतीत तर असं होतं, की ते साक्षीदार बनल्यामुळे त्यांच्या घरचेच लोक त्यांना सोडून देतात. अशा प्रकारचे त्याग करणं काहींना कठीण जाऊ शकतं हे येशूने मान्य केलं. पण जे आपले शिष्य बनतील ते कधीच एकटे पडणार नाहीत; उलट त्यांना एक प्रेमळ आध्यात्मिक कुटुंब मिळेल असं वचन येशूने दिलं. (मार्क १०:२९, ३० वाचा.) तुमच्या विद्यार्थ्याने स्वतःला या कुटुंबाचा भाग समजावं यासाठी तुम्ही काय करू शकता?

१०. मॅन्युएलच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१० विद्यार्थ्याशी मैत्री करा.  तुम्हाला आपल्या विद्यार्थ्याची काळजी आहे हे त्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. का? याबद्दल मेक्सिको देशात राहणाऱ्‍या मॅन्युएल नावाच्या भावाने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. तो बायबलचा अभ्यास करत होता ते दिवस आठवून तो म्हणतो, “बायबल अभ्यास सुरू करण्याआधी माझ्यासोबत अभ्यास करणारा भाऊ नेहमी माझी विचारपूस करायचा. त्यामुळे मला खूप बरं वाटायचं. आणि कुठल्याही विषयावर अगदी मनमोकळेपणे मी त्याच्याशी बोलायचो. त्याला माझी किती काळजी आहे हे मला जाणवायचं.”

११. विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवल्यामुळे त्यांना कसा फायदा होऊ शकतो?

११ येशूने जसा आपल्या शिष्यांसोबत वेळ घालवला तसंच तुम्हीसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवा. (योहा. ३:२२) जर तुमचा बायबल विद्यार्थी प्रगती करत असेल तर तुम्ही त्याला चहा-कॉफीसाठी, जेवणासाठी किंवा एखादं ब्रॉडकास्ट पाहण्यासाठी घरी बोलवू शकता. खासकरून, त्याच्या घरचे लोक आणि मित्र सणवार साजरे करत असतात तेव्हा. कारण त्या वेळी कदाचित त्याला खूप एकटं वाटत असेल. अशा वेळी जर तुम्ही त्याला घरी बोलवलं तर त्याला ते नक्कीच आवडेल. युगांडामध्ये राहणारा काजिब्वे म्हणतो, “यहोवाबद्दल मी बायबलच्या अभ्यासातून जितकं शिकलो तितकंच माझा अभ्यास घेणाऱ्‍या भावासोबत वेळ घालवल्यामुळे मी शिकलो. यहोवा त्याच्या लोकांची किती काळजी घेतो आणि ते किती आनंदी आहेत हे मी पाहिलं. आणि मलाही तसंच जीवन हवं होतं.”

आपण वेगवेगळ्या भाऊबहिणींना बायबल अभ्यासाला घेऊन गेलो तर विद्यार्थ्याला सभांना यायला सोपं जाईल (परिच्छेद १२ पाहा) *

१२. आपण बायबल अभ्यासाला वेगवेगळ्या प्रचारकांना का घेऊन गेलं पाहिजे?

१२ बायबल अभ्यासाला वेगवेगळ्या प्रचारकांना घेऊन जा.  बायबल अभ्यासाला एकटंच जाणं किंवा नेहमी त्याच प्रचारकाला घेऊन जाणं कधीकधी आपल्याला सोईस्कर वाटू शकतं. पण आपण अधूनमधून वेगवेगळ्या प्रचारकांना बायबल अभ्यासाला घेऊन गेलो, तर विद्यार्थ्याला याचा खूप फायदा होऊ शकतो. याबद्दल मॉल्डोवामध्ये राहणारा दिमित्री म्हणतो, “माझा बायबल अभ्यास घेणाऱ्‍यासोबत जे वेगवेगळे प्रचारक यायचे त्या प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असायची. त्यामुळे शिकलेल्या गोष्टी मी वेगवेगळ्या मार्गाने कशा प्रकारे लागू करू शकतो हे मला समजायचं. इतकंच नाही, तर मी पहिल्यांदा सभेला गेलो तेव्हा मला अवघडल्यासारखं वाटलं नाही. कारण तिथल्या बऱ्‍याचशा भाऊबहिणींशी माझी आधीच भेट झाली होती.”

१३. आपण विद्यार्थ्याला सभांना यायचं प्रोत्साहन का दिलं पाहिजे?

१३ बायबल विद्यार्थ्याला सभांना यायचं प्रोत्साहन द्या.  असं करणं का महत्त्वाचं आहे? कारण यहोवाने आपल्या सेवकांना एकत्र मिळून त्याची उपासना करण्याची आज्ञा दिली आहे. म्हणून सभांना जाणं हा आपल्या उपासनेचा भाग आहे. (इब्री १०:२४, २५) याशिवाय मंडळीतले आपले भाऊबहीण आपल्या कुटुंबासारखेच आहेत. त्यामुळे जेव्हा आपण सभांना जातो तेव्हा आपण जसं काय त्यांच्यासोबत मिळून एका स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेत असतो. तसंच, सभांना आल्यामुळे विद्यार्थ्याला बाप्तिस्मा घ्यायलाही मदत होते. पण काही समस्यांमुळे विद्यार्थ्याला सभांना येणं कठीण जाऊ शकतं. अशा समस्यांवर मात करण्यासाठी कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे पुस्तक विद्यार्थ्याला कसं मदत करू शकतं ते आता आपण पाहू या.

१४. विद्यार्थ्याला सभांना यायला मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो?

१४ आपल्या बायबल विद्यार्थ्याला सभांना यायला मदत करण्यासाठी कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकाच्या दहाव्या धड्याचा उपयोग करा. हे पुस्तक प्रकाशित करण्याआधी काही अनुभवी भाऊबहिणींना आपल्या विद्यार्थ्यांसोबत या धड्यावर चर्चा करायला सांगण्यात आलं होतं. त्या भाऊबहिणींनी सांगितलं, की या धड्यामुळे त्यांना खूप मदत झाली आणि बायबल विद्यार्थी सभांना येऊ लागले. पण विद्यार्थांना सभांना यायला सांगण्यासाठी दहाव्या धड्यापर्यंत थांबू नका. त्यांना लवकरात लवकर सभांना यायला सांगा आणि वेळोवेळी त्याबद्दल सांगत राहा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या समस्या वेगळ्या असू शकतात. त्यामुळे त्यांना कशाची गरज आहे याकडे लक्ष द्या आणि व्यावहारिक मार्गांनी त्यांना मदत करायचा प्रयत्न करा. पण सभांना यायला त्यांनी सुरुवात केली नसेल तर निराश होऊ नका. धीर धरा आणि त्यांना सभांना यायचं प्रोत्साहन देत राहा.

विद्यार्थ्याला मनातली भीती घालवायला मदत करा

१५. आपल्या विद्यार्थ्याच्या मनात कोणती भीती असू शकते?

१५ तुम्ही बायबलचा अभ्यास करत होता तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटत होती ते आठवा. तुम्हाला वाटलं असेल, की तुम्ही घरोघर जाऊन कधीच प्रचार करू शकणार नाही. किंवा मग, आपल्या घरातले लोक किंवा आपले मित्र आपला विरोध करतील अशी भीती कदाचित तुमच्या मनात होती. त्यामुळे विद्यार्थ्याला वाटत असलेली भीती समजण्यासारखी आहे. भीती वाटणं साहजिक आहे असं येशूनेही म्हटलं. पण भीतीमुळे आपण यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ नये असंही येशूने शिष्यांना सांगितलं. (मत्त. १०:१६, १७, २७, २८) मग शिष्यांच्या मनात असलेली भीती घालवून द्यायला येशूने त्यांना कशी मदत केली? आणि तशीच मदत आपण आपल्या विद्यार्थांना कशी करू शकतो?

१६. बायबलबद्दल इतरांशी बोलायला आपण विद्यार्थ्याला कशी मदत करू शकतो?

१६ शिकत असलेल्या गोष्टींबद्दल इतरांशी बोलायला विद्यार्थ्याला मदत करा.  येशूने आपल्या शिष्यांना प्रचार करायला पाठवलं तेव्हा कदाचित त्यांना भीती वाटली असेल. पण कुणाला प्रचार करायचा आणि काय बोलायचं हे येशूने त्यांना शिकवलं आणि त्यांच्या मनातली भीती नाहीशी केली. (मत्त. १०:५-७) येशूसारखंच तुम्ही आपल्या विद्यार्थ्याला कशी मदत करू शकता? विद्यार्थी बायबलबद्दल कोणाकोणाशी बोलू शकतो, याचा विचार करायला त्याला मदत करा. जसं की, बायबलमधून शिकलेल्या एखाद्या गोष्टीचा कुणाला फायदा होऊ शकतो याचा विचार करायला त्याला सांगा. मग ती गोष्ट सोप्या पद्धतीने कशी सांगता येईल, याची तयारी करायला विद्यार्थ्याला मदत करा. याशिवाय, नवीन पुस्तकात “काही जण म्हणतात” आणि “काही जण म्हणतील” हे दोन भाग दिले आहेत. यांचा वापर करून तुम्ही विद्यार्थ्यासोबत सराव करू शकता. इतरांशी बोलताना बायबलचा उपयोग करायला आणि विचार करून बोलायला विद्यार्थ्याला शिकवा.

१७. आपल्या विद्यार्थ्याला यहोवावर भरवसा ठेवायला मदत करण्यासाठी मत्तय १०:१९, २०, २९-३१ या वचनांचा आपण कसा वापर करू शकतो?

१७ विद्यार्थ्याला यहोवावर भरवसा ठेवायला मदत करा.  येशूने आपल्या शिष्यांना आश्‍वासन दिलं, की यहोवाचं त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे तो त्यांना नक्कीच मदत करेल. (मत्तय १०:१९, २०, २९-३१ वाचा.) त्याचप्रमाणे, ‘यहोवा तुम्हालाही मदत करेल’ असं विद्यार्थ्याला सांगा. विद्यार्थ्याने जी ध्येयं ठेवली आहेत त्यांबद्दल त्याच्यासोबत मिळून यहोवाला प्रार्थना करा. असं करून तुम्ही त्याला यहोवावर भरवसा ठेवायला मदत करू शकता. पोलंडमध्ये राहणारा फ्रान्सीस * म्हणतो: “माझ्यासोबत बायबल अभ्यास करणारा भाऊ प्रार्थनेत नेहमी माझ्या ध्येयांबद्दल बोलायचा. यहोवाने त्याच्या प्रार्थनांचं कसं उत्तर दिलं हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा मीसुद्धा प्रार्थना करू लागलो. मी नवीनच एका ठिकाणी कामाला लागलो होतो. तेव्हा मला सभांसाठी आणि अधिवेशनासाठी सुट्टी हवी होती. त्याबद्दल माझ्या बॉसशी बोलायला यहोवाने मला मदत केली हे मला जाणवलं.”

१८. यहोवाच्या सेवेमध्ये आपण जी काही मेहनत घेतो त्याबद्दल त्याला कसं वाटतं?

१८ आपल्या बायबल विद्यार्थ्यांची यहोवाला खूप काळजी आहे. लोकांना सत्यात आणण्यासाठी आपण किती मेहनत घेतो हे तो पाहतो आणि म्हणून तो आपल्यावर खूप प्रेम करतो. (यश. ५२:७) सध्या तुमच्याकडे बायबल अभ्यास नसला तरी वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही इतर प्रचारकांच्या बायबल अभ्यासाला जाऊ शकता आणि त्यांच्या बायबल विद्यार्थ्यांना बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करायला मदत करू शकता.

गीत ४४ कापणीत आनंदाने सहभागी व्हा!

^ परि. 5 येशूने लोकांना शिष्य बनायला कशी मदत केली आणि तेच आपणही कसं करू शकतो याची चर्चा या लेखात केली जाईल. त्यासाठी कायम जीवनाचा आनंद घ्या!  या नवीन पुस्तकाचा वापर आपण कसा करू शकतो हेसुद्धा आपण पाहू. हे पुस्तक अशा प्रकारे तयार करण्यात आलं आहे, की विद्यार्थ्यांना प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला मदत होईल.

^ परि. 7 भाऊबहिणींचे आणखी अनुभव पाहण्यासाठी, (१) यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  यात “बायबल” या विषयाखाली “रोजच्या जीवनात उपयोगी” याखाली “बायबलने बद्दलले जीवन! (टेहळणी बुरूज मालिका)” हे पाहा. किंवा मग (२) JW लायब्ररी यात मिडिया या भागामध्ये “मुलाखती आणि अनुभव” हे पाहा.

^ परि. 17 नाव बदलण्यात आलं आहे.

^ परि. 63 चित्राचं वर्णन: एक भाऊ एका तरुण मुलाच्या बायबल अभ्यासाला आपल्या पत्नीला घेऊन गेला आहे. अधूनमधून तो इतर भावांनासुद्धा अभ्यासाला घेऊन जातो.