व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

येशूच्या काळात लोकांना कोणकोणत्या गोष्टींसाठी कर भरावे लागायचे?

इस्राएली लोक अनेक वर्षांपासून खऱ्‍या उपासनेसाठी पैशाच्या रूपात दान द्यायचे. पण येशूच्या काळापर्यंत यहुद्यांना अनेक गोष्टींसाठी पैसे किंवा कर द्यावे लागायचे. हे त्यांच्यासाठी एका ओझ्यासारखं झालं होतं.

प्रत्येक यहुद्याला दरवर्षी खऱ्‍या उपासनेसाठी अर्धा शेकेल (दोन ड्राखमा) दान द्यावं लागायचं. येशूच्या दिवसांत या कराचा उपयोग हेरोदने बांधलेल्या मंदिराच्या देखरेखीसाठी आणि तिथे दिल्या जाणाऱ्‍या बलिदानांसाठी केला जायचा. येशू हा कर देतो का, याबद्दल काही यहुद्यांनी पेत्रला विचारलं. तेव्हा येशूने म्हटलं, की हा कर भरणं चुकीचं नाही. उलट तो कर भरण्यासाठी पेत्रला नाणं कुठून मिळेल हे त्याने त्याला सांगितलं.—मत्त. १७:२४-२७.

त्या काळात देवाच्या लोकांना दशांशसुद्धा द्यावा लागायचा. म्हणजे त्यांना त्यांच्या मिळकतीतला किंवा शेताच्या पिकाचा किंवा झाडांच्या फळांचा दहावा भाग द्यावा लागायचा. (लेवी. २७:३०-३२; गण. १८:२६-२८) पण शास्त्री आणि परूशी, लोकांना असं सांगायचे, की त्यांनी प्रत्येक भाजीचा, अगदी “पुदीना, बडीशेप आणि जिरं” यांचाही दहावा भाग दिलाच पाहिजे. दशांश देणं चुकीचं आहे असं येशूने कधीच म्हटलं नाही. तर हे धर्मगुरू दशांशाचा नियम ज्या प्रकारे लागू करत होते ते चुकीचं आहे असं त्याने म्हटलं.—मत्त. २३:२३.

त्या काळात रोमी सरकार राज्य करत होतं. आणि त्यांनी अनेक गोष्टींवर कर बसवले होते. त्यामुळे यहुद्यांना त्यांनासुद्धा कर द्यावे लागायचे. जसं की, ज्यांची स्वत:च्या मालकीची जमीन होती त्यांना पैशाच्या रूपात किंवा वस्तूच्या रूपात कर भरावा लागायचा. हा कर त्यांच्या जमिनीच्या उत्पन्‍नाचा २० ते २५ टक्के होता. याशिवाय, प्रत्येक यहुद्याला आणखी एक कर द्यावा लागायचा. याच कराबद्दल परूश्‍यांनी येशूला प्रश्‍न विचारला होता. यावर येशू त्यांना म्हणाला होता, “जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, पण जे देवाचं आहे ते देवाला द्या.” (मत्त. २२:१५-२२) येशूच्या या उत्तरावरून कर भरण्याच्या बाबतीत आपण कसा विचार केला पाहिजे हे दिसून येतं.

इतकंच नाही, तर शहरात जे सामान आणलं जायचं किंवा शहरातून बाहेर नेलं जायचं त्याचाही यहुद्यांना कर भरावा लागायचा. हा कर बंदरांजवळ, पुलांजवळ, चौकांत किंवा शहराच्या किंवा बाजाराच्या प्रवेशांजवळ गोळा केला जायचा.

रोमी सरकारने लादलेल्या अशा सगळ्या करांच्या ओझ्याखाली लोक पार दबून गेले होते. येशू पृथ्वीवर होता तेव्हा सम्राट तिबिर्य राज्य करत होता. त्या काळाबद्दल रोमी इतिहासकार टॅसिटस म्हणतो, “सीरिया आणि यहूदीयाच्या लोकांना कर भरणं इतकं कठीण झालं होतं, की त्यांनी अक्षरश: ते कमी करण्यासाठी गयावया केली.”

त्या काळात ज्या प्रकारे कर गोळा केला जायचा त्यामुळेसुद्धा लोकांचं जगणं मुश्‍किल झालं होतं. जकातदाराच्या कामासाठी जो कोणी जास्त पैसे देईल त्याला ते काम दिलं जायचं. पुढे कर गोळा करण्यासाठी तो काही माणसांना आपल्या हाताखाली ठेवायचा. कर गोळा करताना ही माणसंसुद्धा लोकांना लुबाडायची. असं दिसतं की जक्कयच्या हाताखालीसुद्धा अशी माणसं होती. (लूक १९:१, २) म्हणूनच, त्या काळात लोकांना कर वसूल करणाऱ्‍यांचा किंवा जकातदारांचा राग यायचा आणि ते त्यांना तुच्छ लेखायचे.