व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २५

“या लहानांपैकी” एकाचंही मन दुखावू नका

“या लहानांपैकी” एकाचंही मन दुखावू नका

“या लहानांपैकी एकालाही कधी तुच्छ लेखू नका.”—मत्त. १८:१०.

गीत ३९ शांतीचा ठेवा

सारांश *

१. यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे असं का म्हणता येईल?

जगातल्या लाखो-करोडो लोकांची मनं पाहताना यहोवाला तुमच्यात काहीतरी चांगलं दिसलं. त्याने पाहिलं, की तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि त्याच्यावर मनापासून प्रेम कराल. (१ इति. २८:९) म्हणूनच त्याने तुम्हाला त्याच्याकडे आणलं. (योहा. ६:४४) यावरून कळतं, की यहोवा तुम्हाला ओळखतो, समजून घेतो, तुमच्यावर प्रेम करतो. हे जाणून खरंच किती बरं वाटतं!

२. यहोवाला आपल्या प्रत्येक मेंढराची काळजी आहे हे समजावण्यासाठी येशूने कोणतं उदाहरण दिलं?

यहोवाला तुमची काळजी तर आहेच पण त्यासोबतच त्याला इतर भाऊबहिणींचीसुद्धा काळजी आहे. हे समजावण्यासाठी येशूने एक उदाहरण दिलं. त्यात त्याने यहोवाची तुलना एका मेंढपाळाशी केली. १०० मेंढरांपैकी १ मेंढरू कळपापासून भरकटतं तेव्हा एक मेंढपाळ काय करतो? ‘तो ९९ मेंढरांना डोंगरावर तसंच सोडून, त्या वाट चुकलेल्या एका मेंढराला शोधायला जातो.’ आणि जेव्हा त्याला ते मेंढरू सापडतं तेव्हा तो त्याच्यावर ओरडत नाही, तर आनंद करतो. या उदाहरणातून येशूला हेच सांगायचं होतं, की यहोवासाठी त्याचं प्रत्येक मेंढरू खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच तो असं म्हणाला, “या लहानांपैकी एकाचाही  नाश व्हावा अशी स्वर्गातल्या माझ्या पित्याची इच्छा नाही.”—मत्त. १८:१२-१४.

३. या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जावं असं आपल्यापैकी कोणालाही वाटत नाही. पण आपल्या नकळत कधीकधी असं होऊ शकतो. मग, आपल्याकडून कोणाचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल? आणि कोणी जर आपलं मन दुखावलं तर आपण काय करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला या लेखात मिळतील. पण त्याआधी आपण हे पाहू, की मत्तयच्या १८ व्या अध्यायात येशूने ‘लहान’ असं जे म्हटलं ते कोणाबद्दल म्हटलं.

ज्यांना ‘लहान’ असं म्हटलं आहे ते कोण आहेत?

४. ज्यांना ‘लहान’ असं म्हटलं आहे ते कोण आहेत?

येशूने ज्यांना ‘लहान’ म्हटलं ते खरंतर त्याचे शिष्य आहेत. ते सगळ्या वयाचे आहेत. त्यांचं वय कितीही असलं, तरी त्यांना “लहान मुलांसारखं” म्हटलं आहे. कारण ते येशूकडून शिकायला नेहमी तयार असतात. (मत्त. १८:३) ते वेगवेगळ्या संस्कृतीचे असले, त्यांची मतं वेगळी असली, त्यांचा स्वभाव वेगळा असला तरी ते सगळे येशूवर विश्‍वास ठेवतात. आणि येशूसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करतो.—मत्त. १८:६; योहा. १:१२.

५. कोणी यहोवाच्या सेवकांचं मन दुखावतं तेव्हा यहोवाला कसं वाटतं?

“या लहानांपैकी” प्रत्येकावर यहोवाचं खूप प्रेम आहे. आपलं मुलांवर प्रेम असतं अगदी तसंच. लहान मुलांकडे मोठ्यांसारखी ताकद, अनुभव आणि समजबुद्धी नसते. त्यामुळे आपण त्यांना खूप जपतो. मोठ्यांना कोणी त्रास दिला तर आपल्याला वाईट वाटतं. आणि मुलांच्या बाबतीत जर कोणी असं केलं तर आपल्याला आणखीनच वाईट वाटतं, रागही येतो. अगदी तसंच, यहोवाही आपल्या सेवकाला जपतो. कोणी त्याच्या सेवकाचं मन दुखावलं तर त्याला खूप वाईट वाटतं, रागही येतो.—यश. ६३:९; मार्क ९:४२.

६. १ करिंथकर १:२६-२९ या वचनांप्रमाणे जगाचे लोक येशूच्या शिष्यांबद्दल कसा विचार करतात?

येशूचे शिष्य आणखी कोणत्या अर्थाने ‘लहान’ आहेत? आज जगात सहसा पैसा, नाव, सत्ता असलेल्या लोकांना जास्त महत्त्व दिलं जातं. पण येशूच्या शिष्यांकडे सहसा या गोष्टी नसतात. त्यामुळे जगाचे लोक त्यांना महत्त्व देत नाही. जगासाठी ते ‘लहान’ आहेत. (१ करिंथकर १:२६-२९ वाचा.) पण यहोवा त्यांच्याबद्दल तसा विचार करत नाही.

७. आपण आपल्या भाऊबहिणींबद्दल कसा विचार करावा असं यहोवाला वाटतं?

यहोवासाठी त्याचे सगळेच सेवक महत्त्वाचे आहेत. मग ते सत्यात नवीन असोत किंवा बऱ्‍याच वर्षांपासून. त्यामुळे आपणसुद्धा आपल्या भाऊबहिणींना तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आपण आपल्या “संपूर्ण  बंधुसमाजावर” प्रेम केलं पाहिजे, फक्‍त काही लोकांवर नाही. (१ पेत्र २:१७) आणि आपल्याकडून त्यांचं मन दुखावलं जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. असं काही आपल्याकडून झालं आहे हे आपल्या लक्षात आलं, तर त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करू नये. आणि असा विचार करू नये, की त्या व्यक्‍तीने आपल्याला माफ करावं आणि झालं गेलं ते विसरून जावं. पण एखाद्याला पटकन वाईट का वाटू शकतं? काही जण ज्या वातावरणात वाढले आहेत त्यामुळे त्यांना कदाचित स्वतःबद्दल खूप कमीपणा वाटत असेल. तर काही जण सत्यात नवीन असतात. कोणी आपलं मन दुखावलं तर आपण त्यांना माफ केलं पाहिजे ही गोष्ट शिकायला त्यांना वेळ लागू शकतो. कारण काहीही असो, आपसातली शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण एकमेकांना माफ केलं पाहिजे. तसंच, जी व्यक्‍ती प्रत्येक छोटीमोठी गोष्ट मनाला लावून घेते तिने हे ओळखलं पाहिजे की हे चांगलं नाही; आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. असं केल्यामुळे ती आनंदी राहील आणि इतरांसोबत तिचं नातंही चांगलं असेल.

इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा

८. येशूच्या काळातले यहुदी सहसा कोणत्या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचे?

येशू ‘या लहानांबद्दल’ का बोलला? कारण शिष्यांनी त्याला विचारलं होतं, “स्वर्गाच्या राज्यात सगळ्यात मोठा कोण” आहे. (मत्त. १८:१) त्या काळात यहुद्यांना, समाजात मानाचं पद हवं होतं. आणि लोकांनी त्यांना खूप महत्त्व द्यावं असंही त्यांना वाटत होतं. एका लेखकाने त्यांच्याबद्दल असं म्हटलं, की “आदर, मानसन्मान, मोठं नाव या गोष्टी त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या होत्या.”

९. येशूच्या शिष्यांना कशासाठी मेहनत घ्यायची गरज होती?

बहुतेक यहुदी असा विचार करायचे, की आपण इतरांपेक्षा फार श्रेष्ठ आहोत. येशूचे शिष्यही असाच विचार करायचे. त्यामुळे शिष्यांना आपली ही विचारसरणी बदलायला खूप मेहनत घ्यावी लागेल हे येशूला माहीत होतं. तो त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जो श्रेष्ठ आहे त्याने सगळ्यात लहान झालं पाहिजे. आणि पुढाकार घेणाऱ्‍याने इतरांची सेवा केली पाहिजे.” (लूक २२:२६) आपण “इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ” समजतो तेव्हा आपण स्वतःला “लहान” समजतो. (फिलिप्पै. २:३) आपण नेहमी असं वागलो तर आपण इतरांचं मन दुखावणार नाही.

१०. पौलने दिलेला कोणता सल्ला आपण लागू केला पाहिजे?

१० आपण इतरांमधल्या चांगल्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येकामध्ये आपल्यापेक्षा काही ना काही चांगलं आहे हे आपल्या लक्षात येईल. पौलने करिंथकरांना असा सल्ला दिला, “तुमच्यामध्ये विशेष असं काय आहे? खरंतर, तुमच्याजवळ असं काय आहे, जे तुम्हाला देण्यात आलेलं नाही? मग, जर तुम्हाला ते देण्यात आलं आहे, तर तुम्ही ते स्वतःच्या बळावर मिळवल्यासारखी बढाई का मारता?” (१ करिंथ. ४:७) या सल्ल्यावर आपणसुद्धा विचार केला पाहिजे. इतरांनी आपली वाहवा करावी अशी अपेक्षा आपण करू नये, किंवा आपण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू नये. जसं की, एखादा भाऊ चांगली भाषणं देत असेल किंवा एखादी बहीण भरपूर बायबल अभ्यास घेत असेल तर त्यांनी याचं सगळं श्रेय यहोवाला दिलं पाहिजे.

“मनापासून” क्षमा करा

११. एका राजाचं आणि त्याच्या दासाचं उदाहरण देऊन येशूने आपल्याला काय शिकवलं?

११ आपण इतरांना अडखळायला लावू नये किंवा इतरांची मनं दुखावू नये, हे समजावल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना एका राजाचं आणि त्याच्या दासाचं उदाहरण दिलं. त्या दासाने राजाकडून खूप मोठं कर्ज घेतलं होतं. पण तो ते फेडू शकला नाही. म्हणून राजाने त्याचं सगळं कर्ज माफ केलं. या दासाने मात्र दुसऱ्‍या दासाला माफ केलं नाही. त्याला तर त्याने खूप छोटं कर्ज दिलं होतं. तरीसुद्धा त्याने ते माफ केलं नाही. राजाला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने त्या निर्दयी दासाला तुरुंगात टाकलं. यातून आपण काय शिकतो? येशू म्हणाला, “त्याच प्रकारे, तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या भावाला मनापासून क्षमा केली नाही, तर स्वर्गातला माझा पिताही तुमच्याशी असाच व्यवहार करेल.”—मत्त. १८:२१-३५.

१२. आपण जर एखाद्याला माफ केलं नाही तर काय होऊ शकतं?

१२ त्या निर्दयी दासाने जे केलं त्याचा त्याला स्वतःलाच नाही तर इतरांनाही त्रास झाला. एकतर त्याने त्या दुसऱ्‍या दासाला त्याचं पूर्ण कर्ज फेडेपर्यंत तुरुंगात टाकलं. आणि दुसरं म्हणजे, त्याचं हे वागणं इतर दासांनी पाहिलं तेव्हा त्यांनाही खूप त्रास झाला. बायबल म्हणतं, “इतर दासांनी हे सगळं पाहिलं, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं.” अगदी तसंच, आपल्या वागण्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. एखादा आपल्याशी वाईट वागला आणि आपण त्याला माफ केलं नाही तर काय होऊ शकतं? एक म्हणजे, आपण जेव्हा त्याला माफ करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्याच्याशी प्रेमाने वागत नाही तेव्हा आपण त्याचं मन दुखावतो. दुसरं म्हणजे, आपण त्या व्यक्‍तीशी नीट वागत नाही हे पाहून मंडळीतल्या इतरांनाही वाईट वाटतं.

तुम्ही मनात राग धराल की मोठ्या मनाने क्षमा कराल? (परिच्छेद १३-१४ पाहा) *

१३. एका पायनियर बहिणीच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१३ आपण आपल्या भाऊबहिणींना माफ करतो तेव्हा फक्‍त आपल्यालाच नाही तर इतरांनाही बरं वाटतं. क्रिस्टीना * नावाच्या पायनियर बहिणीचाच विचार करा. मंडळीतल्या एका बहिणीने तिचं मन दुखावलं होतं. त्याबद्दल ती म्हणते, “कधीकधी ती इतकं टोचून बोलायची की मनाला खूप लागायचं. तिच्यासोबत प्रचाराला जायलाही मला आवडायचं नाही. त्यामुळे सेवेतला माझा आवेश आणि आनंदही हळूहळू कमी होऊ लागला.” त्या बहिणीबद्दल आपल्याला जे वाटतं ते योग्यच आहे असं क्रिस्टीनाला वाटलं. पण म्हणून ती त्या बहिणीबद्दल मनात राग धरून बसली नाही. किंवा फक्‍त स्वतःचाच विचार करत राहिली नाही. १५ ऑक्टोबर १९९९ टेहळणी बुरूज  अंकातला “मनापासून क्षमा करा,” हा लेख तिने वाचला आणि त्यातला सल्ला नम्रपणे लागू केला. तो लेख वाचल्यावर तिने त्या बहिणीला माफ केलं. क्रिस्टीना पुढे म्हणते, “आता मला समजलंय की आपण सगळेच स्वतःमध्ये बदल करत राहायचा प्रयत्न करतो आणि यहोवा आपल्याला मोठ्या मनाने दररोज माफ करतो. आता मला खूप बरं वाटतं आणि मी खूश आहे.”

१४. मत्तय १८:२१, २२ या वचनांप्रमाणे प्रेषित पेत्रला कोणती समस्या असावी, आणि येशूने त्याला जे उत्तर दिलं त्यातून आपल्याला कोणत्या तीन गोष्टी शिकायला मिळतात?

१४ आपल्याला माहीत आहे की इतरांना माफ करणं चांगलं असतं. पण तसं करणं नेहमी सोपं नसतं. प्रेषित पेत्रलाही काही वेळा असं वाटलं असेल. (मत्तय १८:२१, २२ वाचा.) मग इतरांना माफ करायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? पहिली गोष्ट म्हणजे, आजपर्यंत यहोवाने आपल्याला किती वेळा माफ केलं याचा विचार करा. (मत्त. १८:३२, ३३) आपण माफी मिळण्याच्या लायकीचे नाहीत, पण तरीसुद्धा तो मोठ्या मनाने आपल्याला माफ करतो. (स्तो. १०३:८-१०) त्याच वेळी “आपलंही एकमेकांवर प्रेम करायचं कर्तव्य आहे.” त्यामुळे भाऊबहिणींना माफ करायचं की नाही हे आपल्यावर सोडलेलं नाही. आपल्याला त्यांना माफ करायचंच आहे. (१ योहा. ४:११) दुसरी गोष्ट म्हणजे, आपण एखाद्याला माफ करतो तेव्हा काय होतं याचा विचार करा. त्या व्यक्‍तीचं भलं होतं, मंडळीतली शांती आणि यहोवासोबतचं आपलं नातं टिकून राहतं आणि आपल्या मनावरचा भार कमी होतो. (२ करिंथ. २:७; कलस्सै. ३:१४) तिसरी गोष्ट म्हणजे, इतरांना माफ करण्यासाठी यहोवाला प्रार्थनेत मदत मागा. सैतान भाऊबहिणींसोबत आपलं शांतीचं नातं तोडायचा प्रयत्न करतो, पण तसं करायची त्याला संधी देऊ नका. (इफिस. ४:२६, २७) त्यामुळे मंडळीतली शांती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज आहे.

इतरांचं वागणं मनाला लावून घेऊ नका

१५. एखाद्या भावाच्या किंवा बहिणीच्या वागण्याचा आपल्याला त्रास होत असेल तर कलस्सैकर ३:१३ या वचनाप्रमाणे आपण काय केलं पाहिजे?

१५ एखाद्या भावाच्या किंवा बहिणीच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास होत असेल तर आपण काय केलं पाहिजे? अशा वेळी आपण शांती टिकवायचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. त्याबद्दल आपल्याला कसं वाटतं हे आपण यहोवाला सांगितलं पाहिजे. त्या भावासाठी किंवा बहिणीसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि ज्या गुणांमुळे यहोवा त्यांच्यावर प्रेम करतो ते गुण आपल्यालाही दिसावेत यासाठी आपण त्याच्याकडे मदत मागितली पाहिजे. (लूक ६:२८) त्यांनी केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला कठीण जात असेल तर अशा वेळी आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांनी मुद्दाम आपलं मन दुखावलं आहे असा आपण कधीच विचार करू नये. (मत्त. ५:२३, २४; १ करिंथ. १३:७) ते आपल्याशी असं का वागले हे जेव्हा ते आपल्याला सांगतात तेव्हा आपण त्यावर विश्‍वास ठेवला पाहिजे. एवढं करूनसुद्धा समोरची व्यक्‍ती मतभेद मिटवायला तयार नसेल तर बायबल म्हणतं, की तिचं “सहन करत राहा,” तिच्याशी धीराने वागा. (कलस्सैकर ३:१३ वाचा.) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्‍तीबद्दल आपण मनात राग ठेवू नये. नाहीतर यहोवासोबतचं आपलं नातं बिघडेल. इतरांचं वागणं-बोलणं आपण कधीच मनाला लावून घेऊ नये. असं करून आपण दाखवून देऊ, की दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा यहोवावर आपलं सगळ्यात जास्त प्रेम आहे.—स्तो. ११९:१६५.

१६. आपल्यापैकी प्रत्येकाने कोणता प्रयत्न केला पाहिजे?

१६ आपण सगळे ‘एका मेंढपाळाच्या’ मार्गदर्शनाखाली “एक कळप” होऊन यहोवाची सेवा करत आहोत याचा आपल्याला खूप आनंद आहे. (योहा. १०:१६) यहोवा की मरजी पूरी करने के लिए संगठित  या पुस्तकाच्या १६५ पानावर असं म्हटलं आहे: “भाऊबहिणींमधल्या एकतेचा आनंद घेत असताना ती एकता टिकवून ठेवण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे.” त्यासाठी “यहोवा जसं आपल्या भाऊबहिणींना पाहतो तसंच आपणही पाहिलं पाहिजे.” यहोवासाठी प्रत्येक व्यक्‍ती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्यासाठीसुद्धा आपले भाऊबहीण खूप महत्त्वाचे असले पाहिजेत. त्यांना मदत करण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी आपण जे काही करतो ते यहोवा पाहतो आणि त्याची खूप कदर करतो.—मत्त. १०:४२.

१७. आपण काय निश्‍चय केला पाहिजे?

१७ आपलं आपल्या भाऊबहिणींवर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर “ठेच लागण्यासारखं किंवा अडखळण्यासारखं काहीही न ठेवायचा आपण निश्‍चय करू या.” (रोम. १४:१३) आपण त्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजू या. त्यांना मनापासून क्षमा करू या. त्यांचं वागणं कधीच आपण मनाला लावून घेऊ नये. उलट, “शांतीसाठी आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करू या.”—रोम. १४:१९.

गीत ३५ देवाच्या धीराबद्दल कृतज्ञता

^ परि. 5 अपरिपूर्ण असल्यामुळे आपण कधीकधी असं काही बोलतो किंवा करतो ज्यामुळे आपल्या भाऊबहिणींचं मन दुखावलं जातं. अशा वेळी आपण काय करतो? आपण लवकरात लवकर ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो का? आपण लगेच माफी मागायला तयार असतो का, की आपण असं म्हणतो: ‘त्यांना वाईट वाटलं हा त्यांचा प्रॉब्लम आहे माझा नाहीए?’ किंवा मग, इतरांचं वागणं-बोलणं आपण लगेच मनाला लावून घेतो आणि असं म्हणतो का, की ‘माझा स्वभाव तर असाच आहे, मी असाच राहणार?’ की आपण हे मान्य करतो, की आपलं कुठेतरी चुकत आहे, आपण आपला स्वभाव बदलला पाहिजे?

^ परि. 13 नाव बदलण्यात आलं आहे.

^ परि. 54 चित्राचं वर्णन: एक बहीण मंडळीतल्या दुसऱ्‍या एका बहिणीवर रागावली आहे. त्या दोघी आपसातली समस्या सोडवतात आणि सगळं काही विसरून एकत्र आनंदाने सेवा करतात.