अभ्यास लेख २७
आपण यहोवाची भीती का बाळगली पाहिजे?
“जे यहोवाची भीती बाळगतात, त्यांच्याशी त्याची जवळची मैत्री असते.”—स्तो. २५:१४.
गीत ८ यहोवा आमचा गड
सारांश a
१-२. स्तोत्र २५:१४ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवासोबत जवळची मैत्री करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
एखाद्यासोबत जर जवळची मैत्री टिकवून ठेवायची असेल तर कोणते गुण जास्त महत्त्वाचे आहेत असं तुम्हाला वाटतं? तुम्ही कदाचित असं म्हणाल, की जवळच्या मित्रांमध्ये जिव्हाळा असला पाहिजे, त्यांनी नेहमी एकमेकांना साथ दिली पाहिजे. पण चांगल्या मैत्रीसाठी भीती हा गुण महत्त्वाचा आहे असं कदाचित तुम्हाला कधीच वाटणार नाही. तरीसुद्धा या लेखाच्या मुख्य वचनात, ज्यांना यहोवाशी जवळची मैत्री करायची आहे त्यांनी त्याची “भीती” बाळगली पाहिजे असं म्हटलंय.—स्तोत्र २५:१४ वाचा.
२ आपण बऱ्याच काळापासून यहोवाची सेवा करत असलो तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या मनात त्याच्याबद्दल नेहमी भीती असली पाहिजे. पण देवाबद्दल भीती असणं म्हणजे नेमकं काय? देवाची भीती बाळगण्यासाठी आपण काय करू शकतो? आणि देवाची भीती बाळगण्याबद्दल आपण बायबल काळातला एक अधिकारी ओबद्या, महायाजक यहोयादा, आणि यहोआश राजाकडून काय शिकू शकतो?
देवाची भीती बाळगणं म्हणजे काय?
३. आपल्याला भीती का वाटू शकते आणि अशा प्रकारची भीती असणं का चांगलं आहे?
३ एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला दुखापत होणार आहे असं जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटते. अशा प्रकारची भीती असणं चांगली गोष्ट आहे, कारण त्यामुळे आपण योग्य ती खबरदारी घेतो. जसं की आपण जर डोंगरावर असू, तर आपण जास्त कडेला जात नाही. कारण आपण खाली पडू अशी भीती आपल्याला असते. आपल्याला दुखापत होऊ शकते या भीतीमुळे, आपण एखाद्या धोकादायक परिस्थितीतून लगेच पळ काढतो. आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासोबत असलेली आपली मैत्री तुटेल या भीतीमुळे, आपण त्यांना काही चुकीचं बोलत नाही किंवा त्यांच्याशी वाईट वागत नाही.
४. सैतानाची काय इच्छा आहे?
४ सैतानाची अशी इच्छा आहे, की लोकांनी यहोवाला घाबरावं. अलीफजने ईयोबला जे म्हटलं तेच तो आपल्या मनात घालायचा प्रयत्न करतो. ते म्हणजे यहोवा खूप रागीट आहे, तो नेहमी शिक्षा देतो आणि आपण त्याला कधीच खूश करू शकत नाही. (ईयो. ४:१८, १९) आपण यहोवाला इतकं घाबरावं की आपण त्याची सेवाच करायचं सोडून द्यावं असं सैतानाला वाटतं. पण सैतानाच्या या जाळ्यात अडकू नये म्हणून आपण यहोवाबद्दल आपल्या मनात योग्य प्रकारची भीती निर्माण केली पाहिजे.
५. देवाची भीती बाळगणं म्हणजे काय?
५ ज्या व्यक्तीच्या मनात यहोवाबद्दल योग्य भीती असते, त्याचं यहोवावर प्रेम असतं. आणि त्याला असं काहीही करायचं नसतं ज्यामुळे त्याचं आणि यहोवाचं नातं धोक्यात येईल. येशू कधीच यहोवाला घाबरत नव्हता. (यश. ११:२, ३) तर, त्याच्या मनात यहोवाबद्दल योग्य भीती होती. (इब्री ५:७) तसंच, येशूचं यहोवावर खूप प्रेम होतं. आणि त्याला स्वतःहून त्याची आज्ञा पाळायची होती. (योहा. १४:२१, ३१) येशूसारखाच, आपल्याही मनात यहोवाबद्दल गाढ आदर आहे. आणि त्याचं प्रेम, त्याची बुद्धी, न्याय आणि सामर्थ्य पाहून आपण भारावून जातो. शिवाय, आपल्याला हेही माहीत आहे की यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आणि तो आपल्याला शिकवतो तेव्हा आपण त्याला कसा प्रतिसाद देतो या गोष्टीची त्याला काळजी असते. जेव्हा आपण त्याच्या आज्ञा मोडतो तेव्हा त्याला दुःख होतं. पण जेव्हा आपण त्याच्या इच्छेप्रमाणे करतो तेव्हा त्याला आनंद होतो.—स्तो. ७८:४१; नीति. २७:११.
आपण देवाची भीती बाळगायला शिकू शकतो
६. देवाची भीती बाळगायला शिकण्याचा एक मार्ग कोणता? (स्तोत्र ३४:११)
६ जन्मतःच आपल्यात देवाची भीती नसते. तर आपल्याला ती उत्पन्न करावी लागते. (स्तोत्र ३४:११ वाचा.) आणि असं करायचा एक मार्ग म्हणजे सृष्टीचं परीक्षण करणं. आपण जितकं जास्त देवाने ‘निर्माण केलेल्या गोष्टींचं’ परीक्षण करू आणि त्यातून त्याची बुद्धी, त्याचं सामर्थ्य आणि आपल्याबद्दल असलेलं त्याचं प्रेम कसं दिसतं यावर विचार करू, तितकं आपल्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आणि आदर वाढेल. (रोम. १:२०) एड्रियन नावाची एक बहीण म्हणते, “सृष्टीत दिसणारी यहोवाची बुद्धी पाहून मी थक्क होते. आणि त्यावरून मला हे समजतं की माझ्यासाठी सगळ्यात चांगलं काय हे यहोवालाच चांगलं माहीत आहे.” ती या गोष्टीवर नेहमी विचार करते आणि म्हणून ती असं म्हणते: “ज्याने मला जीवन दिलं त्या यहोवा देवासोबत माझं नातं बिघडेल, अशी एखादी गोष्ट मी का करेन?” या आठवडी, थोडा वेळ काढून देवाने निर्माण केलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हीसुद्धा विचार करू शकता का? असं केल्यामुळे देवाबद्दल तुमच्या मनात असलेला आदर आणि प्रेम आणखीनच वाढेल.—स्तो. १११:२, ३.
७. आपल्या मनात यहोवाबद्दल योग्य भीती उत्पन्न करायला, प्रार्थनांमुळे आपल्याला कशी मदत होते?
७ आणखी एक मार्गाने आपण देवाबद्दल भीती बाळगायला शिकू शकतो. तो म्हणजे त्याला नियमितपणे प्रार्थना करणं. जितकं जास्त आपण यहोवाला प्रार्थना करू, तितकं जास्त तो एक खरीखुरी व्यक्ती आहे हे आपल्याला जाणवू लागेल. जेव्हा जेव्हा एखाद्या परीक्षेचा सामना करताना आपण यहोवाकडे शक्ती मागतो, तेव्हा तेव्हा तो किती शक्तिशाली आहे याची आठवण आपल्याला होईल. खंडणी बलिदानासाठी त्याने स्वतःच्या मुलाला दिलं याबद्दल आपण जेव्हा त्याचे आभार मानतो, तेव्हा त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला जाणवेल. आणि एखाद्या समस्येसाठी जेव्हा आपण त्याच्याकडे मदत मागतो, तेव्हा तो किती बुद्धिमान आहे हे आपल्याला दिसून येईल. अशा प्रार्थनांमुळे यहोवा देवाबद्दल आपल्या मनात असलेला आदर आणखी वाढेल. तसंच, या प्रार्थनांमुळे यहोवा देवासोबत असलेल्या आपल्या मैत्रीला धोका निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट न करण्याचा आपला निश्चय आणखी दृढ होईल.
८. आपल्या मनात यहोवाची भीती टिकवून ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
८ आपल्या मनात देवाबद्दलची भीती टिकवून ठेवण्यासाठी आपण बायबलचा अभ्याससुद्धा केला पाहिजे. त्यात दिलेल्या चांगल्या आणि वाईट उदाहरणांमधून आपण शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. तर चला आता आपण यहोवाच्या दोन विश्वासू सेवकांचा, म्हणजे अहाब राजाच्या महालाची व्यवस्था पाहणारा ओबद्या आणि महायाजक यहोयादा यांच्या उदाहरणांकडे लक्ष देऊ या. आणि मग आपण यहूदाचा राजा यहोआश याच्या उदाहरणातून शिकायचा प्रयत्न करू या. त्याने यहोवाची सुरवातीला मनापासून सेवा तर केली पण नंतर त्याला सोडून दिलं.
देवाची भीती बाळगणाऱ्या ओबद्यासारखंच धैर्यवान असा
९. यहोवाची भीती बाळगल्यामुळे ओबद्याला कशी मदत झाली? (१ राजे १८:३, १२)
९ ओबद्याची b ओळख करून देताना बायबल आपल्याला सांगतं की, तो “यहोवाला फार भिऊन वागायचा.” (१ राजे १८:३, १२ वाचा.) देवाची भीती असल्यामुळेच ओबद्या खूप प्रामाणिक आणि भरवशालायक होता. आणि त्यामुळेच राजाने त्याला, राजमहालाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी दिली होती. (नहेम्या ७:२ तुलना करा.) देवाची भीती असल्यामुळे त्याला असाधारण धैर्य दाखवता आलं. आणि या गुणाची त्याला खरंच गरज होती. कारण तो दुष्ट राजा अहाब याच्या काळात राहत होता. आणि “अहाब हा त्याच्याआधी होऊन गेलेल्या सगळ्यांपेक्षा [सगळ्या राजांपेक्षा] जास्त दुष्ट होता.” (१ राजे १६:३०) तसंच, बआल दैवताची उपासना करणारी अहाबची पत्नी ईजबेल हिला यहोवाबद्दल खूप तिटकारा होता. त्यामुळे तिने इस्राएलच्या दहा वंशाच्या राज्यातून यहोवाच्या सर्व उपासकांना मारून टाकायचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर तिने यहोवाच्या बऱ्याच संदेष्ट्यांना ठार मारलं. (१ राजे १८:४) ओबद्या खरंच खूप कठीण काळात यहोवाची उपासना करत होता यात काहीच शंका नाही.
१०. ओबद्याने असाधारण धैर्य कसं दाखवलं?
१० ओबद्याने असाधारण धैर्य कसं दाखवलं? ईजबेल राणी जेव्हा देवाच्या संदेष्ट्यांना मारून टाकण्यासाठी त्यांना शोधत होती, तेव्हा ओबद्याने ‘१०० संदेष्ट्यांना ५०-५० च्या गटांत गुहांमध्ये लपवलं आणि तो त्यांना अन्नपाणी पुरवत’ राहिला. (१ राजे १८:१३, १४) ही गोष्ट जर ईजबेल राणीला कळली असती तर तिने ओबद्याला मारून टाकलं असतं. ओबद्या नक्कीच घाबरला असेल, कारण तोही एक माणूसच होता. पण स्वतःच्या जिवापेक्षा ओबद्याचं यहोवावर आणि त्याच्या सेवकांवर जास्त प्रेम होतं.
११. आजच्या काळातले आपले भाऊबहीण ओबद्यासारखं धैर्य कसं दाखवत आहेत? (चित्रसुद्धा पाहा.)
११ आज आपले बरेच भाऊबहीण अशा देशांत राहतात जिथे आपल्या कामावर बंदी आहे. ते तिथल्या अधिकाऱ्यांचा आदर तर करतात, पण ओबद्यासारखंच ते यहोवाची सेवा करायचं सोडत नाहीत. (मत्त. २२:२१) माणसांऐवजी देवाची आज्ञा पाळून ते दाखवतात, की त्यांच्या मनात देवाची भीती आहे. (प्रे. कार्यं ५:२९) म्हणून ते यहोवाची उपासना करण्यासाठी सावधपणे प्रचार करत राहतात आणि गुप्तपणे सभेसाठी एकत्र येतात. (मत्त. १०:१६, २८) तसंच त्या ठिकाणी राहणाऱ्या इतर भाऊबहिणींनाही बायबलवर आधारित साहित्य मिळावं याची ते काळजी घेतात. आफ्रिकेतल्या एका देशात एके काळी आपल्या कामावर बंदी होती. तिथे राहणाऱ्या हेन्री नावाच्या भावाचं उदाहरण घ्या. त्या काळात आपल्या भाऊबहिणींना बायबल आधारित साहित्य पुरवण्याचं काम करण्यासाठी हेन्री पुढे आला होता. तो म्हणतो: “माझा स्वभाव लाजाळू आहे, त्यामुळे मला असं वाटतं की यहोवाबद्दल माझ्या मनात गाढ आदर असल्यामुळेच मी हे काम धैर्याने करू शकलो.” येणाऱ्या काळात तुम्हीसुद्धा हेन्रीसारखंच धैर्य दाखवाल का? तुमच्याही मनात जर देवाबद्दल योग्य भीती असेल, तर तुम्ही हे नक्की करू शकाल.
देवाची भीती असलेल्या महायाजक यहोयादासारखंच एकनिष्ठ राहा
१२. महायाजक यहोयादा आणि त्याच्या बायकोने, ते यहोवाला एकनिष्ठ असल्याचं कसं दाखवलं?
१२ महायाजक यहोयादाच्या मनात यहोवाची भीती होती. त्यामुळेच तो त्याला एकनिष्ठ राहू शकला आणि खऱ्या उपासनेला पाठिंबा देऊ शकला. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा ईजबेलच्या मुलीने म्हणजे अथल्याने यहूदाचं राजपद बळकावलं. लोक तिला खूप घाबरायचे. कारण ती खूप निर्दयी होती. तिला सत्तेची इतकी हाव होती की तिने राजघराण्यातल्या सगळ्या वारसदारांना म्हणजे स्वतःच्या नातवंडांना मारून टाकायचा प्रयत्न केला. (२ इति. २२:१०, ११) पण त्यांच्यापैकी एका मुलाला, म्हणजे यहोआशला यहोयादाच्या बायकोने म्हणजे यहोशबाथने वाचवलं. तिने आणि तिच्या पतीने मुलाला लपवून ठेवलं आणि त्याची काळजी घेतली. आणि अशा प्रकारे त्यांनी दावीदच्या राजघराण्याचा नाश होऊ दिला नाही. यहोयादा यहोवाला एकनिष्ठ होता आणि तो अथल्याला घाबरला नाही.—नीति. २९:२५.
१३. यहोआश सात वर्षांचा होता तेव्हा यहोयादाने पुन्हा एकदा तो यहोवाला एकनिष्ठ असल्याचं कसं दाखवलं?
१३ यहोआश सात वर्षांचा होता तेव्हा यहोयादाने पुन्हा एकदा दाखवलं की तो यहोवाला एकनिष्ठ होता. त्याने एक योजना आखली. ही योजना जर सफल झाली असती तर दावीदच्या घराण्यातून येणारा यहोआश राजा बनला असता. पण जर या योजनेप्रमाणे घडलं नसतं तर यहोयादाला आपला जीव नक्कीच गमवावा लागला असता. पण यहोवाच्या आशीर्वादाने ही योजना सफल झाली. प्रमुखांनी आणि लेव्यांनी यहोयादाला पाठिंबा दिला. त्यांनी यहोआशला राजा बनवलं आणि अथल्याला मृत्युदंड दिला. (२ इति. २३:१-५, ११, १२, १५; २४:१) “मग यहोयादाच्या मार्गदर्शनाखाली राजाने आणि प्रजेने यहोवासोबत करार केला, की ते यहोवाचे लोक म्हणून राहतील.” (२ राजे ११:१७) “याशिवाय यहोयादाने यहोवाच्या मंदिराच्या दरवाजांजवळ द्वारपाल नेमले. म्हणजे अशुद्ध असलेला कोणीही, मग तो कोणत्याही प्रकारे अशुद्ध असो, मंदिरात येणार नाही.”—२ इति. २३:१९.
१४. यहोयादाने यहोवाचा आदर केल्यामुळे यहोवानेही त्याचा आदर कसा केला?
१४ यहोयादाने जे काही यहोवासाठी केलं होतं ते यहोवा विसरला नाही. यहोवाने एकदा असं म्हटलं होतं: “जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन.” आणि त्याने यहोयादाच्या बाबतीत असंच केलं. (१ शमु. २:३०) उदाहरणार्थ, या महायाजकाने केलेल्या चांगल्या कामांबद्दल यहोवाने त्याच्या वचनात आपल्या मार्गदर्शनासाठी लिहून ठेवलं. (रोम. १५:४) आणि पुढे जेव्हा यहोयादाचा मृत्यू झाला तेव्हा यहोवाने त्याला एक खास बहुमान दिला. बायबल म्हणतं, “त्यांनी त्याला दावीदपुरात राजांच्या कबरेत दफन केलं. कारण, त्याने खरा देव आणि त्याचं मंदिर यांच्या बाबतीत इस्राएलमध्ये चांगली कामं केली होती.”—२ इति. २४:१५, १६.
१५. आपण यहोयादाच्या अहवालावरून काय शिकू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१५ यहोयादाचं उदाहरण आपल्याला यहोवाची भीती बाळगायला मदत करतं. मंडळीतले वडीलसुद्धा यहोयादाप्रमाणे सावध राहून देवाच्या कळपाचं एकनिष्ठपणे संरक्षण करतात. (प्रे. कार्यं २०:२८) मंडळीतले वृद्ध भाऊबहीणसुद्धा यहोयादाच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. त्यांनी जर यहोवाची भीती बाळगली आणि ते जर त्याला एकनिष्ठ राहिले, तर यहोवा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी नक्की त्यांचा वापर करेल. तो त्यांना कधीच आपल्यापासून दूर करणार नाही. यहोवा यहोयादाशी कसा वागला, हे मंडळीतले तरुणसुद्धा लक्षात घेऊ शकतात. आणि तेसुद्धा त्याचं अनुकरण करून मंडळीतल्या वृद्ध भाऊबहिणींना, खासकरून जे बऱ्याच काळापासून यहोवाची विश्वासूपणे सेवा करत आहेत त्यांना आदर आणि सन्मान देऊ शकतात. (नीति. १६:३१) यासोबतच, आपण सर्व जण यहोयादाला पाठिंबा देणाऱ्या लेव्यांचं आणि प्रमुखांचं अनुकरण करू शकतो. तर चला आपण नेहमी “जे [आपलं] नेतृत्व करत आहेत” त्यांच्या अधीन राहून त्यांना एकनिष्ठपणे पाठिंबा देत राहू या.—इब्री १३:१७.
यहोआश राजासारखं असू नका
१६. यहोआश भित्रा होता हे कशावरून कळतं?
१६ यहोयादाच्या चांगल्या उदाहरणामुळे यहोआश राजाला फायदा झाला. (२ राजे १२:२) आणि त्यामुळेच या राजाला यहोवाचं मन आनंदित करायचं होतं. पण यहोयादाच्या मृत्यूनंतर, तो खोटी उपासना करणाऱ्या यहूदाच्या प्रमुखांचं ऐकू लागला. यामुळे काय झालं? यामुळे यहोआश आणि त्याची प्रजा “पूजेच्या खांबांची व मूर्तींची उपासना” करू लागली. (२ इति. २४:४, १७, १८) हे पाहून यहोवाला खूप दुःख झालं. आणि तो “त्यांना आपल्याकडे परत आणण्यासाठी संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठवत राहिला. . . . पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही.” त्यांनी यहोयादाच्या मुलाचं म्हणजे जखऱ्याचंसुद्धा ऐकलं नाही. तो यहोवाचा संदेष्टा आणि याजक तर होताच, पण यहोआशचा भाऊसुद्धा लागत होता. खरंतर, यहोयादाच्या कुटुंबाचे यहोआशवर खूप मोठे उपकार होते. पण याची त्याने कदर केली नाही आणि जखऱ्याला मारून टाकलं.—२ इति. २२:११; २४:१९-२२.
१७. यहोआशचं शेवटी काय झालं?
१७ यहोआशने यहोवाची भीती बाळगायचं सोडून दिलं. आणि यामुळे त्याला पुढे खूप वाईट परिणाम भोगावे लागले. यहोवाने म्हटलं होतं: “जे माझा अपमान करतात त्यांचा मी तिरस्कार करीन.” (१ शमु. २:३०) सीरियाच्या एका छोट्याशा सैन्याने योआशच्या ‘मोठ्या सैन्याला’ हरवलं आणि त्याला “जबर जखमी” केलं. सीरियाचं सैन्य परत गेल्यानंतर यहोआशच्या सेवकांनीच जखऱ्याला मारल्याबद्दल त्याचा खून केला. c लोकांनी त्या दुष्ट राजाला “राजांच्या कबरेत” दफन करायच्या लायकीचंसुद्धा समजलं नाही.—२ इति. २४:२३-२५.
१८. आपल्याला यहोआशसारखं बनायचं नसेल तर यिर्मया १७:७, ८ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे?
१८ यहोआशच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? तो अशा एका झाडासारखा होता ज्याची मुळं खोलवर गेलेली नव्हती आणि ज्याला आधाराची गरज होती. जेव्हा तो आधार म्हणजे यहोयादा गेला आणि यहोआश खोटी उपासना करणाऱ्या प्रमुखांचं ऐकू लागला, तेव्हा जणू तो वाऱ्याने झुकला आणि यहोवाला एकनिष्ठ राहू शकला नाही. या जबरदस्त उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळतं की फक्त आपल्या भाऊबहिणींचं किंवा आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचं आपल्यासमोर चांगलं उदाहरण आहे म्हणून आपण यहोवाची भीती बाळगली नाही पाहिजे. तर, आध्यात्मिक रीतीने मजबूत राहण्यासाठी, नियमितपणे अभ्यास, मनन आणि प्रार्थना करून यहोवाबद्दल आपल्या मनात असलेलं प्रेम आणि आदर वाढवला पाहिजे.—यिर्मया १७:७, ८ वाचा; कलस्सै. २:६, ७.
१९. यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
१९ यहोवा आपल्याकडून खूप जास्त गोष्टींची अपेक्षा करत नाही. तो आपल्याकडून काय अपेक्षा करतो याचा सारांश उपदेशक १२:१३ मध्ये सांगितला आहे. तिथे म्हटलं आहे: “खऱ्या देवाचं भय मान आणि त्याच्या आज्ञा पाळ; हेच माणसाचं कर्तव्य आहे.” आपण यहोवाची भीती बाळगली तर पुढे येणाऱ्या परीक्षांमध्ये आपण ओबद्या आणि यहोयादासारखंच टिकून राहू शकू. आणि कोणत्याही गोष्टीमुळे आपली यहोवासोबतची मैत्री धोक्यात येणार नाही.
गीत ३ यहोवा आपलं बळ आणि आसरा
a बायबलमध्ये “भीती” हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरण्यात आलाय. मागचा-पुढचा संदर्भ लक्षात घेतला तर काही ठिकाणी या शब्दाचा अर्थ घाबरणं असा होतो. तर, काही ठिकाणी एखाद्याबद्दल मनात आदर असणं किंवा आश्चर्याची भावना असणं असाही होतो. या लेखामध्ये आपण अशा प्रकारच्या भीतीबद्दल जाणून घेऊ या, ज्यामुळे आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याची धैर्याने आणि एकनिष्ठपणे सेवा करायला मदत होईल.
b राजमहालाची व्यवस्था पाहणारा ओबद्या, संदेष्टा ओबद्या नाही. संदेष्टा ओबद्या, या ओबद्याच्या बऱ्याच शतकांनंतर आला आणि त्याने बायबलमधलं ओबद्या नावाचं पुस्तक लिहिलं.
c मत्तय २३:३५ सांगतं की, जखऱ्या बरख्याचा मुलगा होता. असं दिसतं की, बायबलमधल्या बऱ्याच लोकांप्रमाणे यहोयादाचीसुद्धा दोन नावं असावीत. (मत्त ९:९ सोबत मार्क २:१४ ची तुलना करा) किंवा बरख्या जखऱ्याचा आजोबा किंवा त्याचा पूर्वज असावा.
d चित्रांचं वर्णन: एका नाट्यरूपांतरात एक भाऊ आपल्या कामावर बंदी असताना आपल्या भाऊबहिणींपर्यंत बायबल आधारित साहित्य पोचवत आहे.
e चित्रांचं वर्णन: फोनवरून प्रचार कसा करायचा हे एक तरुण बहीण एका वयस्कर बहिणीकडून शिकत आहे; एक वृद्ध भाऊ धैर्याने सार्वजनिक साक्षकार्य करून एक चांगलं उदाहरण मांडत आहे; एक वयस्कर भाऊ, राज्य सभागृहाची देखरेख कशी करायची याचं इतरांना प्रशिक्षण देत आहे.