अभ्यास लेख २८
देवाची भीती बाळगल्यामुळे नेहमी फायदा होतो!
“जो सरळपणे चालतो, तो यहोवाला भिऊन वागतो.”—नीति. १४:२.
गीत १२२ निर्भय व निश्चयी राहा!
सारांश a
१-२. लोटसारखंच, आज खऱ्या ख्रिश्चनांना कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं?
या जगातले नैतिक स्तर आज दिवसेंदिवस घसरत चालले आहेत. हे सगळं पाहून लोटला जसं वाटत होतं, तसंच आपल्यालाही वाटतं. त्याच्याबद्दल म्हटलंय, की “तो दुष्ट लोकांच्या निर्लज्ज वर्तनामुळे खूप दुःखी होता.” कारण त्याला माहीत होतं, की यहोवा अशा गोष्टींचा द्वेष करतो. (२ पेत्र २:७, ८) आपल्या मनात देवाबद्दल भीती आणि प्रेम असल्यामुळे लोटला त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या अनैतिक जीवनशैलीचा तिरस्कार वाटत होता. आजसुद्धा आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना यहोवाच्या नैतिक स्तरांबद्दल खूप कमी कदर आहे किंवा त्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही. पण आपण जर देवाबद्दल आपल्या मनात प्रेम टिकवून ठेवलं आणि त्याच्याबद्दलची भीती मनात उत्पन्न केली तर आपण नैतिक रीत्या शुद्ध राहू शकतो.—नीति. १४:२.
२ असं करण्यासाठी यहोवा आपल्याला नीतिवचनांच्या पुस्तकाद्वारे प्रोत्साहन आणि उत्तेजन देतो. प्रत्येक ख्रिस्ती स्त्री-पुरुषाला किंवा तरुण व वृद्ध व्यक्तीला या पुस्तकात दिलेल्या सल्ल्यांमुळे फायदा होऊ शकतो.
देवाची भीती बाळगल्यामुळे आपलं संरक्षण होतं
३. नीतिवचनं १७:३ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयाचं रक्षण का केलं पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)
३ आपल्या हृदयाचं रक्षण करण्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे, की यहोवा आपल्या हृदयाचं परीक्षण करतो. याचा अर्थ इतर जण आपल्याला जसं पाहतात, त्याच्याही पलीकडे जाऊन आपण आतून कशा प्रकारची व्यक्ती आहोत हे तो पाहतो. (नीतिवचनं १७:३ वाचा.) त्याने त्याच्या वचनात बऱ्याच बुद्धीच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. या गोष्टी मानल्यामुळे त्याला आनंद होतो आणि आपल्याला जीवन मिळू शकतं. (योहा. ४:१४) आपण जर या गोष्टींवर मनन करत राहिलो, तर सैतानाच्या या जगात विषाप्रमाणे पसरलेल्या अनैतिक आणि खोट्या गोष्टींसाठी आपल्या मनात जागा उरणार नाही. (१ योहा. ५:१८, १९) आपण जर यहोवाच्या आणखी जवळ गेलो तर त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदर आणखी वाढेल. आपल्या स्वर्गीय पित्याला आवडणार नाही अशी कोणतीही गोष्ट करायची आपली इच्छा नाही. त्यामुळे पाप करायच्या विचाराचीसुद्धा आपल्याला घृणा वाटेल. जेव्हा एखादी चुकीची गोष्ट करायचा मोह होतो तेव्हा आपण स्वतःला विचारलं पाहिजे: ‘ज्याचं माझ्यावर इतकं प्रेम आहे त्याला मी जाणूनबुजून कसं काय दुःखावू शकतो?’—१ योहा. ४:९, १०.
४. यहोवाची भीती बाळगल्यामुळे वाईट गोष्टी करण्यापासून एका बहिणीचं कसं संरक्षण झालं?
४ क्रोएशीयामध्ये राहणाऱ्या मार्टा नावाच्या बहिणीला एकदा अनैतिक काम करायचा मोह झाला होता. ती म्हणते: “मला नीट विचार करता येत नव्हता आणि पाप करून मिळणारं क्षणिक सुख भोगायचा मोह आवरणं मला कठीण जात होतं. पण यहोवाची भीती मनात असल्यामुळे माझं संरक्षण झालं.” b यहोवाची भीती असल्यामुळे या बहिणीचं संरक्षण कसं होऊ शकलं? मार्टा म्हणते, की या गोष्टीचे कोणते वाईट परिणाम तिला भोगावे लागतील यावर तिने विचार केला. आपणही तेच करू शकतो. अशा गोष्टी करण्याचा सगळ्यात वाईट परिणाम म्हणजे आपण यहोवाचं मन दुःखावू आणि त्याची उपासना करायची संधी कायमची गमावून बसू.—उत्प. ६:५, ६.
५. लिओच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
५ आपल्या मनात यहोवाची भीती असते तेव्हा आपण वाईट कामं करणाऱ्या लोकांसोबत मैत्री करायचा प्रयत्न करत नाही. काँगो देशात राहणाऱ्या लिओलासुद्धा हेच शिकायला मिळालं. त्याचा बाप्तिस्मा झाल्याच्या चार वर्षांनंतर तो वाईट गोष्टी करणाऱ्या लोकांशी मैत्री करू लागला. त्याला असं वाटायचं, की ‘या लोकांसोबत मैत्री करण्यात काय हरकत आहे. कारण त्यांच्याशी मैत्री करून मी स्वतःहून तर काही पाप करत नाही.’ पण लवकरच अशा संगतीमुळे तो दारूच्या आहारी गेला आणि त्याच्या हातून अनैतिक गोष्ट घडली. मग तो आपल्या ख्रिस्ती पालकांनी शिकवलेल्या गोष्टींचा आणि यहोवाची सेवा करत असताना त्याला पूर्वी जो आनंद मिळायचा, या गोष्टींचा विचार करू लागला. याचा काय परिणाम झाला? तो भानावर आला. आणि मंडळीतल्या वडिलांच्या मदतीने तो यहोवाकडे परत आला. आज तो मंडळीत वडील आणि खास पायनियर म्हणून आनंदाने यहोवाची सेवा करत आहे.
६. आपण कोणत्या दोन लाक्षणिक स्त्रियांबद्दल चर्चा करणार आहोत?
६ आता आपण नीतिवचनांच्या ९ व्या अध्यायावर चर्चा करू या. या अध्यायात बुद्धी आणि मूर्खतेला दोन लाक्षणिक स्त्रियांची उपमा देण्यात आली आहे. (रोमकर ५:१४ सोबत तुलना करा; गलतीकर ४:२४.) चर्चा करत असताना, ही गोष्ट लक्षात घ्या, की सैतानाचं हे जग लैंगिक अनैतिकता आणि पोर्नोग्राफीने (अश्लील साहित्याने) झपाटलेलं आहे. (इफिस. ४:१९) म्हणून आपल्या मनात देवाची भीती विकसित करणं आणि या गोष्टीपासून दूर पळणं खूप महत्त्वाचं आहे. (नीति. १६:६) त्यामुळे साहजिकच या अध्यायातून आपल्या सर्वांना फायदा होईल; मग आपण स्त्री असो किंवा पुरुष. या अध्यायात दोन्ही स्त्रिया ज्यांना “समज नाही” अशांना आमंत्रण देत असल्याचं वर्णन करण्यात आलंय. आणि या दोन्ही स्त्रिया असं म्हणत आहेत, की ‘या आणि माझ्या घरी जेवण करा.’ (नीति. ९:१, ५, ६, १३, १६, १७) पण या दोघींचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर जे परिणाम होतात त्यात जमीन आस्मानाचा फरक आहे.
मूर्खपणाच्या मार्गावर चालू नका
७. नीतिवचनं ९:१३-१८ मध्ये सांगतिल्याप्रमाणे, जे मूर्ख स्त्रीचं आमंत्रण स्वीकारतात त्यांच्यासोबत काय होतं? (चित्रसुद्धा पाहा.)
७ “मूर्ख स्त्री” देत असलेल्या आमंत्रणाचा विचार करा. (नीतिवचनं ९:१३-१८ वाचा.) ज्यांना समज नाही त्यांना ती निर्लज्जपणे आवाज देत आहे आणि म्हणत आहे, की “त्यांनी इथे यावं” आणि मेजवाणीचा आनंद घ्यावा. पण याचा काय परिणाम होतो? बायबल म्हणतं, की “तिचं घर म्हणजे मृतांचं घर” आहे. तुम्हाला आठवत असेल, की नीतिवचनांच्या आधीच्या काही अध्यायांमध्ये अशाच प्रकारच्या स्त्रीबद्दल सावध करण्यात आलंय. ती वाईट चालीची आणि अनैतिक कामं करणारी आहे. तिथे म्हटलंय, की “तिच्या घरी जाणं मृत्यूकडे जाण्यासारखं आहे.” (नीति. २:११-१९) नीतिवचनं ५:३-१० मध्ये आणखी एका “वाईट चालीच्या” स्त्रीबद्दल सांगितलंय, जिचे “पाय खाली मृत्यूकडे जातात.”
८. आपल्याला कोणती निवड करावी लागू शकते?
८ जे ‘मूर्ख स्त्रीचं’ ऐकतात त्यांना एक निवड करावी लागते. ती म्हणजे तिचं आमंत्रण स्वीकारायचं की नाकारायचं. आपल्यावरही कदाचित अशी निवड करायची पाळी येऊ शकते. प्रसार माध्यमांवर किंवा इंटरनेटवर आपल्यासमोर लैंगिक अनैतिकता किंवा अश्लीलता दाखवणारी एखादी गोष्ट येते तेव्हा आपण कोणती निवड करणार?
९-१०. लैंगिक अनैतिकतेपासून दूर राहण्याची काही महत्त्वाची कारणं कोणती आहेत?
९ आपण लैंगिक अनैतिकतेपासून दूर का राहिलं पाहिजे याची काही महत्त्वाची कारणं आहेत. वचनात उल्लेख केलेली ‘मूर्ख स्त्री’ म्हणते की, “चोरलेलं पाणी गोड लागतं.” पण “चोरलेलं पाणी” म्हणजे काय? बायबलमध्ये पती आणि पत्नीमध्ये असलेल्या लैंगिक संबंधाची तुलना तजेला देणाऱ्या पाण्याशी करण्यात आली आहे. (नीति. ५:१५-१८) ज्या स्त्री-पुरुषाचं कायदेशीररीत्या लग्न झालं आहे, तेच फक्त योग्य प्रकारच्या लैंगिक संबंधाचा आनंद घेऊ शकतात. पण ‘चोरलेल्या पाण्याच्या’ बाबतीत असं म्हणता येणार नाही. इथे चोरलेलं पाणी कदाचित अनैतिक लैंगिक संबंधाला सूचित करत असावं. जसा एक चोर लपून चोरी करतो तसं अनैतिक काम करणारे लोक सहसा इतरांपासून लपून अशा गोष्टी करतात. आणि जेव्हा अशा लोकांना वाटतं की आपण जे केलंय ते इतरांना कळणार नाही, तेव्हा खासकरून त्यांना हे “चोरलेलं पाणी” गोड लागू शकतं. पण हा त्यांचा किती मोठा गैरसमज आहे, कारण यहोवा सगळं काही बघू शकतो. यहोवाची मर्जी गमावणं ही एखाद्याच्या आयुष्यातली सगळ्यात कटू गोष्ट आहे. इतकी मोठी गोष्ट गमवावी लागत असेल तर या गोष्टीला “गोड” कसं म्हणता येईल? (१ करिंथ. ६:९, १०) पण लैंगिक अनैतिकतेचे आणखी वाईट परिणामसुद्धा आहेत.
१० लैंगिक अनैतिकतेमुळे आपल्याला स्वतःचीच लाज वाटते आणि आपण आपल्याच नजरेत पडतो. शिवाय, यामुळे नको असलेली गर्भधारणा आणि कुटुंब विस्कळीत होणं यांसारख्या समस्यांनाही तोंड द्यावं लागतं. त्यामुळे स्पष्टच आहे की मूर्ख स्त्रीचं आमंत्रण न स्वीकारणं आणि तिच्या “घरी” मेजवानीला न जाणं यातच शहाणपण आहे. अशा प्रकारची कामं करणाऱ्या लोकांचं यहोवासोबत असलेलं नातं तर तुटतंच, पण वेगवेगळ्या रोगांची लागण झाल्यामुळे त्यांचा अकाली मृत्यूसुद्धा होतो. (नीति. ७:२३, २६) ९ व्या अध्यायाच्या १८ व्या वचनात शेवटी असं म्हटलंय: “तिच्या घरी जाणारे कबरेच्या खोल ठिकाणांत जातात.” पण इतके वाईट परिणाम असतानाही बरेच लोक या स्त्रीच्या आमंत्रणाला बळी का पडतात?—नीति. ९:१३-१८.
११. पोर्नोग्राफी पाहणं इतकं धोकादायक का आहे?
११ याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे पोर्नोग्राफी. काहींना वाटतं, की पोर्नोग्राफी पाहण्यात काहीच धोका नाही. पण याच्या अगदी उलट पोर्नोग्राफीमुळे खूप नुकसान होतं. स्वतःच्याच नजरेत आपली किंमत घसरते, आपण दुसऱ्यांनाही वाईट नजरेने पाहू लागतो आणि पोर्नोग्राफी पाहण्याची सवय लागते. अनैतिक दृश्यं मनात कायमचं घर करतात. आणि त्यांना पूर्णपणे मनातून काढून टाकणं खूप कठीण असतं. शिवाय, पोर्नोग्राफीमुळे वाईट इच्छा मारल्या जात नाहीत तर त्या आणखी प्रबळ होतात. (कलस्सै. ३:५; याको. १:१४, १५) पोर्नोग्राफी पाहणारे बरेच लोक पुढे अनैतिक काम करून बसतात.
१२. आपल्या मनात अनैतिक विचार येऊ नयेत म्हणून आपण काय केलं पाहिजे?
१२ जर आपल्यासमोर अचानक एखादं अश्लील दृश्य आलं तर आपण काय केलं पाहिजे? आपण लगेच त्यापासून आपली नजर फिरवली पाहिजे. यहोवासोबतचं आपलं नातं सगळ्यात मौल्यवान आहे ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर असं करायला आपल्याला सोपं जाईल. सहसा, अश्लील न वाटणारी चित्रंसुद्धा लैंगिक इच्छा उत्तेजित करू शकतात. अशी चित्र पाहायचंसुद्धा आपण का टाळलं पाहिजे? कारण अशी कोणतीही गोष्ट करायची आपली इच्छा नाही ज्यामुळे आपल्या मनात वाईट विचार येतील आणि आपण मनात व्यभिचार करून बसू. (मत्त. ५:२८, २९) थायलँडमध्ये राहणारे डेवीड नावाचे मंडळीतले एक वडील म्हणतात: “मी नेहमी स्वतःला विचारतो, ‘हे दृश्य जरी अश्लील नसलं तरी ते मी पाहत राहिलेलं यहोवाला आवडेल का?’ अशा प्रकारे विचार केल्यामुळे मला सुज्ञपणे वागायला मदत होते.”
१३. सुज्ञपणे वागायला आपल्याला कशामुळे मदत होईल?
१३ यहोवाला न आवडणारी एखादी गोष्ट केल्यामुळे त्याचं मन दुखावेल अशी भीती आपल्या मनात असेल तर आपण सुज्ञपणे वागू. यहोवाची भीती बाळगणं हीच “बुद्धीची सुरुवात” आहे. (नीति. ९:१०) नीतिवचनं पुस्तकातल्या ९ व्या अध्यायाच्या सुरवातीला याबद्दल सांगितलं आहे. तिथे आपण आणखी एका स्त्रीबद्दल वाचतो जिची तुलना ‘खऱ्या बुद्धीशी’ केली आहे.
‘खऱ्या बुद्धीकडून’ मिळणारं आमंत्रण स्वीकारा
१४. नीतिवचनं ९:१-६ मध्ये आपल्याला कोणत्या आमंत्रणाबद्दल वाचायला मिळतं?
१४ नीतिवचनं ९:१-६ वाचा. या वचनात खऱ्या बुद्धीचा स्रोत आणि आपला बुद्धिमान निर्माणकर्ता यहोवा, याने दिलेल्या आमंत्रणाबद्दल वाचायला मिळतं. (नीति. २:६; रोम. १६:२७) या वचनात असं कल्पनाचित्र दाखवण्यात आलं आहे, की एक मोठं घर सात खांबांवर उभारण्यात आलं आहे. यातून असं सूचित होतं की यहोवा उदार आहे आणि त्याच्याकडून शिकून ज्यांना बुद्धिमान व्हायचं आहे, त्यांचं तो स्वागत करतो.
१५. यहोवाची काय इच्छा आहे?
१५ यहोवा खूप उदार देव आहे आणि तो आपल्याला भरपूर प्रमाणात चांगल्या गोष्टी पुरवतो. हीच गोष्ट नीतिवचनांच्या ९ व्या अध्यायात ‘खऱ्या बुद्धीला’ सूचित करणाऱ्या स्त्रीच्या बाबतीतही दिसून येते. या अध्यायात म्हटलंय, की तिने तिच्या घरी मांस शिजवून ठेवलंय; चवदार द्राक्षारस तयार केलाय; आणि आपलं मेजही सजवलंय. (नीति. ९:२.) ज्यांना समज नाही त्यांना ती ४ आणि ५ वचनांत असं म्हणते: “या, माझ्याकडची भाकर खा.” पण आपण खऱ्या बुद्धीचं आमंत्रण स्वीकारून ती देत असलेलं अन्न का खाल्लं पाहिजे? कारण आपण बुद्धिमान बनावं आणि सुरक्षित राहावं असं यहोवाला वाटतं. आयुष्यात आपल्याला ठेच लागावी आणि मग त्यातून आलेल्या वाईट अनुभवातून, पस्तावा करून आपण धडा घ्यावा असं त्याला वाटत नाही. त्यामुळेच “तो सरळ लोकांसाठी व्यावहारिक बुद्धी राखून ठेवतो.” (नीति. २:७) आपल्या मनात जर यहोवाबद्दल योग्य भीती असेल तर आपण नेहमी त्याचं मन आनंदित करायचा प्रयत्न करू. आपण त्याचा सुज्ञ सल्ला नेहमी ऐकू आणि तो आनंदाने आपल्या जीवनात लागू करू.—याको. १:२५.
१६. देवाबद्दलची भीती मनात असल्यामुळे ॲलनला योग्य निर्णय घ्यायला कशी मदत झाली आणि त्याचा काय परिणाम झाला?
१६ देवाची भीती मनात असल्यामुळे ॲलन नावाच्या भावाला योग्य निर्णय घ्यायला कशी मदत झाली याचा विचार करा. हा भाऊ मंडळीत एक वडील आहे आणि तो शाळेत एक शिक्षक म्हणूनसुद्धा काम करतो. तो म्हणतो: “माझ्या कामावरचे लोक असं मानायचे की पोर्नोग्राफी पाहणं एक प्रकारचं लैंगिक शिक्षण आहे.” पण ॲलन त्यांच्या बोलण्यात फसला नाही. तो म्हणतो: “देवाबद्दलची भीती असल्यामुळे मी त्यांना असे चित्रपट पाहण्यासाठी ठामपणे नकार दिला. आणि मी ते का पाहत नाही याबद्दल त्यांना समजवून सांगितलं.” ॲलन, “समजशक्तीच्या मार्गाने पुढे चालत राहा” हा ‘खऱ्या बुद्धीकडून’ मिळणारा सल्ला लागू करत होता. (नीति. ९:६) ॲलनच्या ठाम निर्णयामुळे त्याच्यासोबतचे काही शिक्षक आता बायबल अभ्यास करत आहेत आणि ते ख्रिस्ती सभांनाही उपस्थित राहत आहेत.
१७-१८. ‘खऱ्या बुद्धीचं’ आमंत्रण स्वीकारणाऱ्यांना कोणता फायदा होतो आणि त्यांचं भविष्य कसं असेल? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ यहोवाने या दोन स्त्रियांचं उदाहरण देऊन, एक चांगलं भविष्य मिळवण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे ते समजावून सांगितलंय. जे लोक मोठमोठ्याने बोलणाऱ्या ‘मूर्ख स्त्रीचं’ आमंत्रण स्वीकारतात त्यांना गुप्तपणे केल्या जाणाऱ्या अनैतिक कामांची मजा घ्यायची असते. आणि म्हणूनच त्यांना ती कामं “गोड” वाटतात. क्षणिक सुख मिळवण्याच्या मागे लागल्यामुळे पुढे काय होईल याकडे ते लक्ष देत नाहीत. शेवटी त्यांचा अंत “कबरेच्या खोल ठिकाणांत” होतो.—नीति. ९:१३, १७, १८.
१८ पण ‘खऱ्या बुद्धीचं’ आमंत्रण स्वीकारणाऱ्या लोकांचं भविष्य किती वेगळं आहे! यहोवाच्या जवळ राहण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळत असल्यामुळे ते खूप आनंदित आहेत. (यश. ६५:१३) यशया संदेष्ट्याद्वारे यहोवाने असं म्हटलं: “माझं लक्षपूर्वक ऐका आणि चांगलं ते खा, म्हणजे चमचमीत अन्न खाऊन तुम्हाला आनंद मिळेल.” (यश. ५५:१, २) म्हणून यहोवा ज्या गोष्टींवर प्रेम करतो त्यांवर प्रेम करायला आणि ज्या गोष्टींचा तो द्वेष करतो त्यांचा द्वेष करायला आपण शिकत आहोत. (स्तो. ९७:१०) शिवाय, इतरांना ‘खऱ्या बुद्धीचा’ फायदा व्हावा म्हणून आपण त्यांनाही आमंत्रण देतो आणि त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. आपण जणू अशा सेवकांसारखे आहोत, जे शहराच्या उंच ठिकाणांहून अशी घोषणा करतात, की “जे भोळे आहेत, त्यांनी इथे यावं.” जे खऱ्या बुद्धीचं आमंत्रण स्वीकारतात त्यांना फक्त आज आणि आत्तापूरताच फायदा होत नाही तर भविष्यातही फायदा होतो. ते कायम “जिवंत” राहतील आणि “समजशक्तीच्या मार्गाने” पुढे चालत राहतील.—नीति. ९:३, ४, ६.
१९. उपदेशक १२:१३, १४ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काय करायचा निर्धार केला पाहिजे? (“ देवाच्या भीतीमुळे आपला फायदा होतो” ही चौकटसुद्धा पाहा.)
१९ उपदेशक १२:१३, १४ वाचा. आजच्या या शेवटच्या आणि दुष्ट काळात आपल्या हृदयाचं संरक्षण करण्यासाठी आणि नैतिक आणि आध्यात्मिक रीत्या शुद्ध राहण्यासाठी देवाची भीती आपल्याला मदत करत राहो. ‘खऱ्या बुद्धीचा’ जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा म्हणून त्यांना आमंत्रण देत राहायची प्रेरणा आपल्याला देवाच्या भीतीमुळे मिळत राहो.
गीत ३९ देवाच्या नजरेत चांगलं नाव मिळवू या
a ख्रिश्चनांनी देवाबद्दल योग्य प्रकारची भीती बाळगायला शिकलं पाहिजे. अशा प्रकारची भीती आपल्या हृदयाचं रक्षण करते आणि लैंगिक अनैतिकता आणि पोर्नोग्राफीसारख्या गोष्टींपासून आपलं संरक्षण करते. या लेखात आपण नीतिवचनं पुस्तकाच्या ९ व्या अध्यायावर चर्चा करणार आहोत. या अध्यायामध्ये बुद्धी आणि मूर्खपणा यांची तुलना दोन लाक्षणिक स्त्रियांशी करण्यात आली आहे. या अध्यायात दिलेल्या सल्ल्यामुळे आपल्याला आज आणि भविष्यातही फायदा होऊ शकतो.
b काही नावं बदलण्यात आली आहेत.