अभ्यास लेख २५
मंडळीतल्या वडिलांनो—गिदोनच्या उदाहरणातून शिका
‘जर मी गिदोन संदेष्ट्याबद्दल सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही.’—इब्री ११:३२.
गीत ११९ खरा विश्वास बाळगू या!
सारांश a
१. १ पेत्र ५:२ प्रमाणे वडिलांना कोणता बहुमान मिळाला आहे?
ख्रिस्ती वडिलांवर यहोवाच्या मौल्यवान मेंढरांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या विश्वासू बांधवांना भाऊबहिणींची सेवा करण्याचा जो बहुमान मिळाला आहे, त्याची त्यांना खूप कदर आहे. आणि देवाच्या कळपाचा ‘मनापासून सांभाळ’ करण्यासाठी ते खूप मेहनत घेतात. (यिर्म. २३:४; १ पेत्र ५:२ वाचा.) खरंच, आपल्या मंडळीत असे वडील आहेत, याबद्दल आपण किती आभार मानले पाहिजेत!
२. काही वडिलांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
२ आपली जबाबदारी पार पाडत असताना मंडळीतल्या वडिलांना बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावं लागतं. मंडळीची काळजी घेण्यासाठी वडिलांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. आपण किती काम स्वीकारू शकतो याबद्दल आपण आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत, हे अमेरिकेत राहणाऱ्या टोनी नावाच्या वडिलांना शिकायला मिळालं. ते म्हणतात: “कोव्हिड माहामारीची सुरवात झाली तेव्हा प्रचार आणि सभांचं नियोजन करण्यासाठी मी खूप जास्त काम करू लागलो. पण कितीही केलं तरी काही-ना-काही काम उरायचंच. या कामात मी इतका व्यस्त झालो होतो की मला बायबल वाचन, वैयक्तिक अभ्यास आणि प्रार्थनेसाठी वेळच मिळत नव्हता.” कोसोवोमध्ये राहणाऱ्या इलीर नावाच्या वडिलांसमोर एक वेगळंच आव्हान होतं. युद्धाच्या काळात त्यांना संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे चालणं खूप अवघड गेलं. ते म्हणतात: “धोकादायक क्षेत्रात राहणाऱ्या भाऊबहिणींना मी मदत करू शकतो का, असं शाखा कार्यालयाने मला विचारलं. त्या वेळी त्यांना मदत करण्यासाठी धाडस दाखवायला मला खूप कठीण गेलं. मी खूप घाबरलो. संघटनेच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालणं कठीण आहे असं मला वाटलं.” आशियामध्ये राहणाऱ्या टिम नावाच्या मिशनरी भावावर त्याच्या कामाचा व्याप इतका जास्त होता की सगळी कामं रोजच्या रोज करणं त्याला कठीण जात होतं. तो म्हणतो: “कधीकधी तर भावनिक आणि मानसिकरीत्या मी अक्षरशः थकून जायचो.” मग, अशा प्रकारच्या आव्हानांचा सामना करणाऱ्या वडिलांना कशामुळे मदत होऊ शकते?
३. न्यायाधीश असलेल्या गिदोनच्या उदाहरणातून आपल्या सगळ्यांना कसा फायदा होतो?
३ याबाबतीत गिदोनच्या उदाहरणातून वडिलांना बरंच काही शिकता येईल. (इब्री ६:१२; ११:३२) मेंढपाळ या नात्याने देवाच्या लोकांचा सांभाळ करण्याची आणि त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. (शास्ते २:१६; १ इति. १७:६) त्याच प्रकारे आजच्या कठीण काळात आपल्या लोकांचा सांभाळ करण्यासाठी देवाने वडिलांना नियुक्त केलं आहे. (प्रे. कार्यं २०:२८; २ तीम. ३:१) आपल्या मर्यादा ओळखून काम करण्याच्या बाबतीत, नम्रता दाखवण्याच्या बाबतीत आणि आज्ञा पाळण्याच्या बाबतीत आपण गिदोनकडून बरंच काही शिकू शकतो. आपली जबाबदारी पार पाडत असताना त्याच्या सहनशक्तीची परीक्षा झाली. आपण मंडळीत वडील असलो किंवा नसलो तरी आपण मंडळीतल्या वडिलांबद्दल मनात कदर बाळगली पाहिजे. तसंच, मंडळीत मेहनत घेणाऱ्या या वडिलांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी मदत केली पाहिजे.—इब्री १३:१७.
आपल्या मर्यादा ओळखणं आणि नम्र राहणं कठीण असतं तेव्हा
४. गिदोनने मर्यादांची जाणीव असल्याचं आणि नम्र असल्याचं कसं दाखवलं?
४ गिदोनला त्याच्या मर्यादांची जाणीव होती आणि तो एक नम्र व्यक्ती होता. b जेव्हा यहोवाच्या स्वर्गदूताने गिदोनला सांगितलं, की शक्तिशाली मिद्यानी लोकांपासून इस्राएली लोकांची सुटका करण्यासाठी त्याला निवडण्यात आलं आहे, तेव्हा त्याने म्हटलं: “मनश्शेच्या वंशात माझं घराणं सगळ्यात लहान आहे. आणि माझ्या वडिलांच्या घरात तर मी फार छोटा माणूस आहे.” (शास्ते ६:१५) ही जबाबदारी पार पाडायच्या पात्रतेचे आपण नाही असं त्याला वाटत होतं. पण यहोवाला माहीत होतं की तो हे करू शकतो. आणि यहोवाच्या मदतीने गिदोनने आपली जबाबदारी पार पाडली.
५. आपल्या मर्यादा ओळखणं आणि नम्र राहणं वडिलांना केव्हा कठीण जाऊ शकतं?
५ आपल्या मर्यादा ओळखून काम करण्यासाठी आणि नम्र राहण्यासाठी वडील पुरेपूर प्रयत्न करतात. (मीखा ६:८; प्रे. कार्यं २०:१८, १९) ते आपल्या कामांबद्दल किंवा कौशल्यांबद्दल बढाई मारत नाहीत. किंवा त्यांच्या चुकांमुळे किंवा कमतरतांमुळे ‘आपण काहीच कामाचे नाही,’ असा विचार ते करत नाहीत. पण तरीसुद्धा कधीकधी वडिलांना त्यांच्या मर्यादा ओळखणं आणि नम्र राहून काम करणं कठीण जाऊ शकतं. उदाहरणार्थ, एखादा वडील कदाचित खूप जबाबदाऱ्या घेईल. पण त्याला त्या सगळ्या पूर्ण करणं कठीण जाऊ शकतं. तसंच, तो ज्या प्रकारे जबाबदाऱ्या पार पाडत आहे त्यासाठी काही जण त्याची प्रशंसा करतील, तर काही जण त्याची टीका करतील. अशा वेळी स्वतःच्या मर्यादा ओळखून नम्र राहणं त्याला कठीण जाऊ शकतं. मग, अशा परिस्थितींमध्ये काय करावं यासाठी गिदोनच्या उदाहरणामुळे वडिलांना मदत होऊ शकते. ती कशी?
६. आपल्या मर्यादा ओळखण्याच्या बाबतीत मंडळीतले वडील गिदोनकडून काय शिकू शकतात? (चित्रसुद्धा पाहा.)
६ इतरांची मदत घ्या. ज्या व्यक्तीला आपल्या मर्यादांची जाणीव असते, तिला माहीत असतं की काही गोष्टी करणं तिच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. गिदोनलासुद्धा माहीत होतं की त्याला सगळ्या गोष्टी स्वतःहून करायला जमणार नाहीत. म्हणून त्याने इतरांची मदत घेतली. (शास्ते ६:२७, ३५; ७:२४) मंडळीतले वडीलसुद्धा असंच करू शकतात. आधी उल्लेख केलेले टोनी म्हणतात: “मी अशा वातावरणात लहानाचा मोठा झालो होतो, जिथे मला माझ्या क्षमतेपेक्षा जास्त काम करायची सवय लागली होती. म्हणून मग मी कौटुंबिक उपासनेत ‘आपल्या मर्यादांची जाणीव असणं का गरजेचं आहे,’ या विषयावर चर्चा करायचं ठरवलं. मी माझ्या पत्नीलाही विचारलं, की तिला याबद्दल माझ्याविषयी काय वाटतं. तसंच मी jw.org वर येशूप्रमाणं इतरांना प्रशिक्षण द्या, भरवसा दाखवा आणि जबाबदारी सोपवा हा व्हिडिओसुद्धा पाहिला.” मग, टोनी आपल्या कामांमध्ये इतरांची मदतसुद्धा घेऊ लागले. याचा काय परिणाम झाला? ते म्हणतात: “आता मंडळीतली कामं व्यवस्थितपणे पूर्ण होत आहेत. आणि मला यहोवासोबत माझं नातं आणखी मजबूत करायलासुद्धा वेळ मिळतो.”
७. टीका केली जाते तेव्हा मंडळीतले वडील गिदोनच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतात? (याकोब ३:१३)
७ टीका केली जाते तेव्हा सौम्यपणे उत्तर द्या. जेव्हा वडिलांची टीका केली जाते तेव्हा सौम्यपणे उत्तर देणं त्यांना कधीकधी कठीण जाऊ शकतं. अशा वेळी ते गिदोनचं उदाहरण लक्षात घेऊ शकतात. एफ्राईमच्या लोकांनी जेव्हा गिदोनची टीका केली, तेव्हा त्याने सौम्यपणे उत्तर दिलं. कारण आपल्यातसुद्धा कमतरता आहेत हे त्याला माहीत होतं. (शास्ते ८:१-३) तो त्यांच्याशी रागाने बोलला नाही. उलट, ते लोक जी तक्रार करत होते, ती त्याने नम्रपणे ऐकून घेतली आणि तो त्यांच्याशी सौम्यपणे बोलला. अशा प्रकारे त्याने त्यांचा राग शांत केला. वडिलांची टीका केली जाते तेव्हा तेसुद्धा गिदोनप्रमाणे समोरच्याचं लक्ष देऊन ऐकू शकतात आणि सौम्यपणे उत्तर देऊ शकतात. (याकोब ३:१३ वाचा.) असं करून ते मंडळीतली शांती टिकवून ठेवू शकतात.
८. जबाबदार बांधवांची प्रशंसा केली जाते तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे? उदाहरण द्या.
८ स्वतःची नाही तर यहोवाची स्तुती होऊ द्या. मिद्यानी लोकांवर विजय मिळवल्यानंतर गिदोनची स्तुती होऊ लागली तेव्हा त्याने लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधण्याऐवजी यहोवाची स्तुती होऊ दिली. (शास्ते ८:२२, २३) आज जबाबदार बांधव गिदोनचं अनुकरण कसं करू शकतात? ते जे काही करतात त्याचं श्रेय ते यहोवाला देऊ शकतात. (१ करिंथ. ४:६, ७) उदाहरणार्थ, आपल्या शिकवण्याच्या कौशल्यासाठी जेव्हा एखाद्या वडिलांची प्रशंसा केली जाते, तेव्हा ते सांगू शकतात की त्यांनी जे काही शिकवलं ते देवाच्या वचनातून होतं. किंवा संघटनेकडून मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळेच त्यांना चांगल्या प्रकारे शिकवता आलं. तसंच, आपण इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधायचा प्रयत्न करत आहोत का याबद्दल वडिलांनी स्वतःचं परीक्षण करणंही गरजेचं आहे. तिमथी नावाच्या वडिलांच्या अनुभवाकडे लक्ष द्या. ते वडील म्हणून काम करू लागले तेव्हा त्यांना जाहीर भाषण द्यायला खूप आवडायचं. ते म्हणतात: “मी भाषणात खूप लांबलचक प्रस्तावना आणि गुंतागुंतीची उदाहरणं वापरायचो. त्यामुळे लोक नेहमी माझी प्रशंसा करायचे. पण त्यामुळे त्यांचं लक्ष बायबल किंवा यहोवाऐवजी माझ्याकडेच वेधलं जात होतं.” पुढे या भावाला स्वतःकडे विनाकारण लोकांचं लक्ष वेधलं जाऊ नये म्हणून आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करायची गरज आहे हे जाणवलं. (नीति. २७:२१) याचा काय परिणाम झाला? ते म्हणतात: “आता बरेच भाऊबहीण मला सांगतात, की माझ्या भाषणामुळे त्यांना समस्यांना तोंड देण्यासाठी, परीक्षेत टिकून राहण्यासाठी आणि यहोवाच्या आणखी जवळ येण्यासाठी कशा प्रकारे मदत झाली. काही वर्षांआधी माझी प्रशंसा केली जायची तेव्हा मला जितका आनंद व्हायचा त्यापेक्षा जास्त आनंद आता होतो.”
तुम्हाला आज्ञा पाळणं आणि धैर्य दाखवणं कठीण जातं तेव्हा
९. गिदोनला आज्ञा पाळणं आणि धैर्य दाखवणं कठीण का गेलं? (सुरवातीचं चित्र पाहा.)
९ गिदोनला जेव्हा न्यायाधीश म्हणून नेमण्यात आलं तेव्हा आज्ञा पाळणं आणि धैर्य दाखवणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं. आपल्याच वडिलांनी बांधलेल्या बआल दैवताच्या वेद्या पाडण्याची एक अवघड जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. (शास्ते ६:२५, २६) नंतर, जेव्हा त्याने सैन्य गोळा केलं तेव्हा यहोवाने दोनदा त्याला त्या सैनिकांची संख्या कमी करायला सांगितली. (शास्ते ७:२-७) आणि शेवटी अगदी मध्यरात्री त्याला शत्रूंच्या छावणीवर हल्ला करायला सांगण्यात आलं.—शास्ते ७:९-११.
१०. वडिलांना आज्ञाधारक राहणं कधी कठीण जाऊ शकतं?
१० वडिलांनी नेहमी “आज्ञाधारक” असलं पाहिजे. (याको. ३:१७) आज्ञाधारक वडील नेहमी शास्त्रवचनातला सल्ला आणि यहोवाच्या संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन स्वीकारायला तयार असतात. अशा प्रकारे ते इतरांसमोर एक चांगलं उदाहरण मांडतात. पण तरी आज्ञाधारक राहणं काही वेळा त्यांना कठीण जाऊ शकतं. उदाहरणार्थ, काही सूचना दिल्या जातात किंवा त्या सूचनांमध्ये काही बदल केले जातात, तेव्हा त्याप्रमाणे चालणं त्यांना कठीण वाटू शकतं. काही वेळा तर संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन खरंच व्यावहारिक आणि समंजसपणाचं आहे का असंही त्यांना वाटू शकतं. किंवा मग त्यांना असं एखादं काम करण्यासाठी सांगितलं जाईल ज्यामुळे त्यांना अटक होऊ शकते. अशा परिस्थितींमध्ये मंडळीतले वडील गिदोनच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतात?
११. आज्ञाधारक राहायला वडिलांना कशामुळे मदत होऊ शकते?
११ मिळणारं मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे वागा. यहोवाने गिदोनला त्याच्या वडिलांनी बांधलेली वेदी नष्ट कशी करायची, तसंच यहोवासाठी नवीन वेदी कुठे बांधायची आणि त्यावर कोणत्या प्राण्याचं अर्पण करायचं याबद्दल सूचना दिल्या. गिदोनने याबद्दल कोणताही प्रश्न विचारला नाही किंवा त्याने वेगळं काही करायचा प्रयत्न केला नाही, तर या सूचनांचं जसंच्या तसं पालन केलं. आजसुद्धा वडिलांना पत्रांद्वारे, घोषणांद्वारे आणि इतर मार्गांनी यहोवाच्या संघटनेकडून मार्गदर्शन मिळत असतं. त्यामुळे यहोवाच्या आणखी जवळ यायला आणि सुरक्षित राहायला आपल्याला मदत होते. वडील या मार्गदर्शनाचं विश्वासूपणे पालन करतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला खूप कदर वाटते. शिवाय, यामुळे मंडळीलासुद्धा खूप फायदा होतो.—स्तो. ११९:११२.
१२. संघटनेकडून फेरबदल करण्यासाठी सांगितलं जातं तेव्हा इब्री लोकांना १३:१७ मधला सल्ला वडील कसा लागू करू शकतात?
१२ फेरबदल करायला तयार असा. यहोवाने सांगितल्यामुळे गिदोनने जवळजवळ ९९ टक्क्यांपेक्षा जास्त सैन्य कमी केलं होतं. (शास्ते ७:८) ‘असं करणं खरंच गरजेचं आहे का?’ किंवा ‘एवढं कमी सैन्य घेऊन युद्ध करता येईल का?’ असा विचार कदाचित त्याच्या मनात आला असेल. पण तरीसुद्धा त्याने मिळालेल्या मार्गदर्शनाचं पालन केलं. आजसुद्धा संघटनेकडून काही फेरबदल करायला सांगितले जातात तेव्हा गिदोनप्रमाणेच वडील ते लागू करतात. (इब्री लोकांना १३:१७ वाचा.) उदाहरणार्थ, २०१४ मध्ये नियमन मंडळाने राज्य सभागृह आणि संमेलन गृह यांच्या बांधकामासाठी ज्या प्रकारे निधी पुरवला जायचा, त्याच्या पद्धतीत बदल केला. (२ करिंथ. ८:१२-१४) पहिल्यांदा बांधकामासाठी संघटनेकडून मंडळ्यांना निधी पुरवला जायचा आणि नंतर त्या मंडळ्यांना तो निधी संघटनेला परत करावा लागायचा. पण आता तसं करायची गरज पडत नाही. कारण आता संघटना जगभरातल्या मंडळ्यांकडून मिळालेल्या दानाचा त्यासाठी वापर करते. यामुळे गरज असलेल्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी या निधीचा वापर केला जातो; मग हा निधी परत करण्याची त्या मंडळीची क्षमता नसली तरी. होजे नावाच्या बांधवाला जेव्हा या बदलाविषयी कळलं तेव्हा त्याला असं वाटलं की, ‘आता एकही राज्य सभागृह बांधून होणार नाही. कारण आमच्या इथे ही पद्धत चालणार नाही.’ मग कोणत्या गोष्टीमुळे होजेला संघटनेच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालायला मदत झाली? तो म्हणतो: “नीतिवचनं ३:५, ६ मधल्या शब्दांनी मला यहोवावर भरवसा ठेवायची आठवण करून दिली. संघटनेच्या या निर्णयाचे खूप चांगले परिणाम दिसून आले. यामुळे जास्तीत जास्त राज्य सभागृह बांधणं शक्य झालंय. आणि आता वेगवेगळ्या पद्धतीने दान द्यायलाही आम्ही शिकलो आहोत. त्यामुळे एखाद्याच्या समृद्धीतून दुसऱ्याची गरज भागवली जाऊन समानता घडून आली आहे.”
१३. (क) गिदोनला कशाची खातरी होती? (ख) वडील गिदोनचं अनुकरण कसं करू शकतात? (चित्रसुद्धा पाहा.)
१३ धैर्याने यहोवाच्या इच्छेप्रमाणे करत राहा. गिदोनवर सोपवलेल्या कामात धोका होता आणि त्याला भीतीही वाटत होती तरी त्याने यहोवाची इच्छा पूर्ण केली. (शास्ते ९:१७) यहोवा त्याच्यासोबत आहे यावर गिदोनला पूर्ण विश्वास होता. त्यामुळे देवाच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी यहोवा त्याला मदत करेल याची त्याला पक्की खातरी होती. आज आपल्या कामावर जिथे बंदी आहे त्या ठिकाणी राहणारे वडील गिदोनच्या उदाहरणाचं अनुकरण करायचा प्रयत्न करतात. अटक होण्याचा, अधिकाऱ्यांकडून चौकशी होण्याचा, नोकरी गमावण्याचा किंवा मारहाण होण्याचा धोका असला तरीही ते सभा आणि प्रचार कार्यात धैर्याने पुढाकार घेतात. c मोठ्या संकटाच्या वेळीसुद्धा वडिलांना अशा सूचना मिळतील ज्यांत धोका असेल. पण त्या वेळीसुद्धा त्यांना धैर्य दाखवून ते पाळायची गरज असेल. उदाहरणार्थ, त्या वेळी न्यायाचा संदेश कसा सांगायचा आणि गोगच्या हल्ल्यातून कसं वाचायचं याबद्दल सूचना दिल्या जातील.—यहे. ३८:१८; प्रकटी. १६:२१.
जबाबदारी पूर्ण करणं कठीण जातं तेव्हा
१४. गिदोनला त्याची जबाबदारी पार पाडणं का कठीण गेलं असेल?
१४ न्यायाधीश म्हणून गिदोन काम करत होता तेव्हा त्याला बरंच मेहनतीचं काम करावं लागायचं. मध्यरात्रीच्या वेळी जेव्हा मिद्यानी सैन्य युद्ध सोडून पळू लागलं तेव्हा गिदोनने इज्रेलच्या खोऱ्यापासून ते यार्देन नदीपर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्या भागात कदाचित खूप झाडंझुडपं होती. (शास्ते ७:२२) पण गिदोन यार्देनजवळच थांबला का? नाही. तो आणि त्याचे ३०० सैनिक थकलेले असतानाही ते मिद्यानी सैनिकांचा पाठलाग करत राहिले. शेवटी त्यांनी मिद्यानी लोकांना गाठलं आणि त्यांना हरवलं.—शास्ते ८:४-१२.
१५. मंडळीतल्या वडिलांना त्यांची जबाबदारी पार पाडणं कधीकधी कठीण का जाऊ शकतं?
१५ मंडळीची आणि कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी पार पाडत असताना वडिलांना शारीरिक, मानसिक आणि भावनिकरीत्या खूप थकून गेल्यासारखं वाटू शकतं. अशा परिस्थितींमध्ये मंडळीतले वडील गिदोनच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतात?
१६-१७. कठीण असतानाही गिदोनला त्याची जबाबदारी पूर्ण करायला कशामुळे मदत झाली आणि वडील कोणता भरवसा ठेवू शकतात? (यशया ४०:२८-३१) (चित्रसुद्धा पाहा.)
१६ यहोवा तुम्हाला ताकद देईल असा भरवसा ठेवा. गिदोनला पूर्ण भरवसा होता की यहोवा त्याला ताकद देईल आणि त्याने तसंच केलं. (शास्ते ६:१४, ३४) एकदा गिदोन आणि त्याची माणसं दोन मिद्यानी राजांचा पाठलाग करत होती. हे राजे उंटांवर होते आणि गिदोन व त्याची माणसं पळून त्यांचा पाठलाग करत होती. (शास्ते ८:१२, २१) पण देवाच्या मदतीने इस्राएली लोकांनी त्या मिद्यानी राजांवर विजय मिळवला. वडीलसुद्धा यहोवावर पूर्ण भरवसा ठेवू शकतात. कारण “तो कधीही थकत नाही किंवा दमत नाही.” त्यांना ताकदीची गरज असते तेव्हा तो नक्की त्यांना ती देईल.—यशया ४०:२८-३१ वाचा.
१७ हॉस्पिटल संपर्क समितीचे सदस्य असलेले मॅथ्यू नावाचे वडील काय म्हणतात याकडे लक्ष द्या. कठीण वाटत असतानाही जबाबदाऱ्या पूर्ण करायला त्यांना कशामुळे मदत झाली? ते म्हणतात: “फिलिप्पैकर ४:१३ मधले शब्द किती खरे आहेत हे मी स्वतः अनुभवलंय. बऱ्याच वेळा माझ्यामध्ये ताकदच उरायची नाही आणि आता मी हे काम करूच शकत नाही असं मला वाटायचं. अशा वेळी मी यहोवाला प्रार्थना करायचो, की ‘मला भाऊबहिणींना मदत करायची आहे. आणि त्यासाठी तू मला तशी इच्छा आणि ताकदही दे.’ त्या वेळी मला जाणवलं की यहोवा त्याची पवित्र शक्ती देऊन मला माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायला आणि त्यात टिकून राहायला बळ देत होता.” मंडळीची काळजी घेताना वडिलांना गिदोनसारखेच बरेच परिश्रम घ्यावे लागू शकतात. पण तरीही ते त्यांची जबाबदारी निःस्वार्थपणे पूर्ण करतात. हे खरं आहे, की असं करत असताना, ‘आपण सगळंच काम करू शकत नाही, आपल्याही मर्यादा आहेत’ याची जाणीव ठेवणंही महत्त्वाचं आहे. पण वडील हा भरवसा ठेवू शकतात, की त्यांनी मदतीसाठी यहोवाकडे केलेली प्रार्थना तो ऐकेल आणि त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ताकद देईल.—स्तो. ११६:१; फिलिप्पै. २:१३.
१८. या लेखात चर्चा केल्याप्रमाणे वडील गिदोनचं अनुकरण कसं करू शकतात?
१८ गिदोनच्या उदाहरणातून मंडळीतले वडील बरंच काही शिकू शकतात. आपण किती प्रमाणात काम स्वीकारू शकतो याबद्दल आपल्या मर्यादांची जाणीव असणं, तसंच आपली स्तुती केली जाते किंवा टीका केली जाते तेव्हा नम्र राहणं महत्त्वाचं आहे, हे मंडळीतले वडील लक्षात ठेवू शकतात. या जगाचा अंत जसजसा जवळ येत आहे तसतसं त्यांनी आज्ञा पाळणं आणि धैर्य दाखवणं आणखी जास्त गरजेचं आहे. तसंच कितीही कठीण आव्हानं आली तरी त्यांचा सामना करण्यासाठी यहोवा त्यांना बळ देईल असा भरवसा त्यांनी ठेवला पाहिजे. खरंच अशा मेहनती वडिलांची आपण “नेहमी कदर” करतो.—फिलिप्पै. २:२९.
गीत १३ ख्रिस्ताचा आदर्श
a इस्राएल राष्ट्राच्या इतिहासात एक अतिशय कठीण काळ होता. या काळात आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचं नेतृत्व करण्यासाठी यहोवाने गिदोनला नियुक्त केलं होतं. जवळजवळ ४० वर्षं गिदोनने ही जबाबदारी पार पाडली. पण या काळात त्याला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला. आजच्या काळातसुद्धा मंडळीतल्या वडिलांना परीक्षांचा सामना करावा लागतो, त्यामुळे गिदोनचं उदाहरण त्यांना कशी मदत करू शकतं याबद्दल या लेखात चर्चा केली जाईल.
b मर्यादांची जाणीव असणं आणि नम्र असणं यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. मर्यादांची जाणीव असल्यामुळे एक व्यक्ती फक्त स्वतःबद्दल विचार करत नाही. शिवाय, काही गोष्टी आपल्या क्षमतेपलीकडे आहेत हेही तिला माहीत असतं. नम्र व्यक्ती इतरांचा आदर करते आणि स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व देते. (फिलिप्पै. २:३) सहसा, ज्या व्यक्तीला आपल्या मर्यादांची जाणीव असते ती व्यक्ती नम्रसुद्धा असते.