व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २६

यहोवाच्या दिवसासाठी तयार राहा

यहोवाच्या दिवसासाठी तयार राहा

“रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा दिवस येत आहे.”​—१ थेस्सलनी. ५:२.

गीत १४४ नवे जग डोळ्यांपुढे ठेवा!

सारांश a

१. यहोवाच्या दिवसातून वाचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

 बायबलमध्ये “यहोवाचा दिवस” अशा काळाला म्हटलं आहे जेव्हा यहोवा त्याच्या शत्रूंचा न्याय करेल आणि त्याच्या लोकांना वाचवेल. पूर्वीसुद्धा यहोवाने काही राष्ट्रांवर त्याचा न्यायदंड बजावला आहे. (यश. १३:१, ६; यहे. १३:५; सफ. १:८) आपल्या काळात “यहोवाचा दिवस” मोठ्या बाबेलवर होणाऱ्‍या हल्ल्याने सुरू होईल आणि हर्मगिदोनच्या युद्धाने संपेल. त्या ‘दिवसातून’ वाचण्यासाठी आपण आत्तापासूनच तयारी केली पाहिजे. येशूने आपल्याला जे सांगितलं, त्यावरून त्याला असं म्हणायचं होतं, की ‘मोठ्या संकटासाठी’ आपण फक्‍त तयार  असून चालणार नाही तर कायम  तयार असलं पाहिजे.​—मत्त. २४:२१; लूक १२:४०.

२. थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रातून आपल्याला कसा फायदा होतो?

प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने थेस्सलनीकाकरांना पहिलं पत्र लिहिलं. या पत्रात, यहोवाच्या न्यायाच्या महान दिवसासाठी तयार राहायला ख्रिश्‍चनांनी काय करणं गरजेचं आहे हे त्यांना समजून सांगायला त्याने बरीच उदाहरणं वापरली. त्या काळात यहोवाचा दिवस येणार नाही हे पौलला माहीत होतं. (२ थेस्सलनी. २:१-३) तरीसुद्धा तो दिवस जणू उद्याच येणार आहे असं समजून भाऊबहिणींनी त्या दिवसासाठी तयार असावं अशी विनंती त्याने केली. आणि आज आपणसुद्धा त्या सल्ल्याचं पालन केलं पाहिजे. तर आता खाली दिलेल्या गोष्टींबद्दल प्रेषित पौलने काय म्हटलं त्याकडे आपण लक्ष देऊ या: (१) यहोवाचा दिवस कसा येईल? (२) त्या दिवसातून कोण वाचणार नाहीत? आणि (३) त्या दिवसातून वाचण्यासाठी आपण कसं तयार राहू शकतो?

यहोवाचा दिवस कसा येईल?

थेस्सलनीकाकरांना पहिलं पत्र लिहिताना प्रेषित पौलने अशा उदाहरणांचा वापर केला ज्यांचा आज आपल्यालाही फायदा होतो (परिच्छेद ३ पाहा)

३. यहोवाचा दिवस रात्रीच्या वेळी येणाऱ्‍या चोरासारखा कसा येईल? (चित्रसुद्धा पाहा.)

“रात्रीच्या वेळी जसा चोर येतो,”  तसा. (१ थेस्सलनी. ५:२) यहोवाचा दिवस कसा येईल हे सांगण्यासाठी प्रेषित पौलने वापरलेल्या तीन शब्दचित्रांपैकी हे पहिलं आहे. चोर अचानक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत लोक बेसावध असताना येतो. यहोवाचा दिवससुद्धा असाच अचानक येईल आणि बहुतेक लोक त्या वेळी बेसावध असतील. इतकंच नाही, तर तो दिवस येईल तेव्हा घटना ज्या वेगाने घडतील त्यामुळे खऱ्‍या ख्रिश्‍चनांनासुद्धा मोठा धक्का बसेल! पण एक गोष्ट आहे, की दुष्ट लोकांप्रमाणे आपला नाश होणार नाही.

४. यहोवाचा दिवस प्रसूतीच्या वेळी होणाऱ्‍या वेदनांसारखा कसा असेल?

“गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे प्रसूतिवेदना सुरू होतात,”  त्याप्रमाणे येईल. (१ थेस्सलनी. ५:३) गरोदर स्त्रीला प्रसूतीच्या वेदना नेमक्या कधी सुरू होतील हे माहीत नसतं. पण त्या लवकरच सुरू होतील यात तिला काही शंका नसते. आणि जेव्हा त्या वेदना सुरू होतात तेव्हा त्या अचानक आणि खूप जोरात सुरू होतात. शिवाय त्या थांबवताही येत नाहीत. त्याचप्रमाणे यहोवाचा दिवस कोणत्या दिवशी आणि नेमक्या कोणत्या वेळी येईल हे आपल्याला माहीत नाही. पण तो खातरीने येईल आणि जेव्हा येईल तेव्हा अचानक येईल आणि त्यातून कोणीही दुष्ट व्यक्‍ती वाचू शकणार नाही, हे आपल्याला माहीत आहे.

५. मोठं संकट हे दिवसाच्या प्रकाशासारखं कसं आहे?

दिवसाच्या प्रकाशासारखा असेल.  पौलने दिलेल्या या तिसऱ्‍या शब्दचित्रात तो अंधारात चोरी करायला येणाऱ्‍या चोराचंच उदाहरण देतो. पण या वेळी तो यहोवाच्या दिवसाची तुलना दिवसाच्या प्रकाशासोबत करतो. (१ थेस्सलनी. ५:४) कधीकधी असं होऊ शकतं की रात्रीच्या वेळी येणारा चोर, चोरी करण्यात इतका गुंतून जाईल की त्याला वेळेचं भानच राहणार नाही. आणि मग दिवस उजाडला की दिवसाच्या प्रकाशात तो पकडला जाईल. त्याचप्रमाणे मोठ्या संकटादरम्यानसुद्धा देवाला न आवडणाऱ्‍या गोष्टी करण्यासाठी ज्यांना चोरासारखं अंधारातच राहायला आवडतं अशा लोकांना उघड केलं जाईल. पण आपण मात्र यहोवाला न आवडणाऱ्‍या गोष्टींचा तिरस्कार करून आणि “सर्व प्रकारचा चांगुलपणा, नीती आणि सत्य” मिळवण्याचा प्रयत्न करून त्या दिवसासाठी तयार राहू शकतो. (इफिस. ५:८-१२) पण त्या दिवसातून जे वाचणार नाहीत त्यांच्याबद्दल सांगताना पौल आणखी दोन उदाहरणं देतो.

यहोवाच्या दिवसातून कोण वाचणार नाहीत?

६. आज बरेच लोक कोणत्या अर्थाने झोपेत आहेत? (१ थेस्सलनीकाकर ५:६, ७)

‘जे झोपेत आहेत.’  (१ थेस्सलनीकाकर ५:६, ७ वाचा.) पौल यहोवाच्या दिवसातून न वाचणाऱ्‍या लोकांची तुलना झोपेत असलेल्या लोकांशी करतो. झोपेत असलेल्या व्यक्‍तीला आपल्या अवतीभोवती काय चाललं आहे आणि वेळ कसा निघून चालला आहे, हे कळत नाही. त्यामुळे जेव्हा महत्त्वाच्या घडामोडी घडतात तेव्हा त्याला त्या समजत नाहीत आणि काही करताही येत नाही. आज बरेच लोक आध्यात्मिक रीतीने झोपेत आहेत. (रोम. ११:८) आपण “शेवटच्या दिवसांत” जगत आहोत आणि मोठं संकट आता लवकरच सुरू होणार आहे या गोष्टींच्या पुराव्यांवर ते विश्‍वास ठेवत नाहीत. तसंच दुसरीकडे पाहता, मोठमोठ्या घडामोडी काही जणांचं लक्ष वेधून घेतली आणि त्यामुळे ते राज्याच्या संदेशाला थोडाफार प्रतिसाद दाखवतील. पण बरेच जण जागं राहण्याऐवजी पुन्हा झोपी जातील. इतकंच काय तर ज्यांना न्यायाचा दिवस येणार आहे हे खातरीने माहीत आहे त्यांनासुद्धा तो यायला अजून वेळ आहे असं वाटेल. (२ पेत्र ३:३, ४) त्यामुळे सावध राहण्याबद्दल आपल्याला जो सल्ला देण्यात आलाय, तो जसजसे दिवस जातील तसतसा जास्तच महत्त्वाचा बनत चालला आहे.

७. ज्यांच्यावर देवाचा क्रोध भडकेल ते लोक दारू पिऊन झिंगणाऱ्‍यांसारखे आहेत असं का म्हणता येईल?

‘जे दारू पिऊन झिंगतात.’  ज्यांच्यावर देवाचा क्रोध भडकेल अशांची तुलना पौल दारू पिऊन झिंगणाऱ्‍या व्यक्‍तीशी करतो. दारूच्या नशेत असलेल्या व्यक्‍तीला आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे याचं भान नसतं. शिवाय तिला योग्य निर्णयसुद्धा घेता येत नाहीत. त्याच प्रकारे दुष्ट लोकसुद्धा देवाच्या इशाऱ्‍यांना काहीच प्रतिसाद देत नाहीत. ते अशा प्रकारचं जीवन निवडतात ज्यामुळे शेवटी त्यांचा नाश होतो. पण ख्रिश्‍चनांना असं सांगण्यात आलंय की त्यांनी नेहमी जागं आणि सावध राहावं. (१ थेस्सलनी. ५:६) एक बायबल विद्वान असं म्हणतो, की “जागी आणि सावध असलेली व्यक्‍ती समोर असणाऱ्‍या गोष्टींची तुलना करून आणि त्यांचा व्यवस्थित अंदाज घेऊन योग्य निर्णय घेण्यासाठी शांत आणि स्थिर मनाने विचार करते.” पण शांत आणि स्थिर मनःस्थिती असणं का गरजेचं आहे? कारण अशी मनोवृत्ती ठेवल्यामुळे आपण सामाजिक आणि राजकीय वादविषयांमध्ये गुरफटून जाणार नाही. जसजसा यहोवाचा दिवस जवळ येत जाईल तसतशी कोणाची तरी बाजू घेण्याचा दबाव आपल्यावर वाढत जाईल. पण ती परिस्थिती आपण कशी हाताळू याबद्दल आपल्याला जास्त चिंता करत बसण्याची गरज नाही. कारण देवाची पवित्र शक्‍ती आपल्याला शांत आणि स्थिर मन ठेवून योग्य निर्णय घ्यायला मदत करेल.​—लूक १२:११, १२.

यहोवाच्या दिवसासाठी तयार राहायला आपण काय करू शकतो?

आज बऱ्‍याच लोकांना वेळेचं भान नसलं, तरी आपण मात्र विश्‍वास आणि प्रेमाचं कवच घालून आणि आशेचा टोप घालून यहोवाच्या दिवसासाठी तयार राहतो (परिच्छेद ८, १२ पाहा)

८. जागं आणि सावध राहण्यासाठी १ थेस्सलनीकाकर ५:८ मध्ये सांगितलेल्या कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला मदत होऊ शकते? (चित्रसुद्धा पाहा.)

‘कवच आणि टोप घाला.’  पौल आपली तुलना युद्धासाठी सावध आणि तयार असलेल्या सैनिकांशी करतो. (१ थेस्सलनीकाकर ५:८ वाचा.) युद्धाच्या वेळी सैनिकाने लढण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजे अशी अपेक्षा केली जाते. ही गोष्ट आपल्या बाबतीतही आहे. आपणसुद्धा विश्‍वासाचं आणि प्रेमाचं कवच आणि तारणाच्या आशेचा टोप घालून यहोवाच्या दिवसासाठी तयार असलं पाहिजे. कारण या गोष्टींमुळे आपल्याला खूप मदत होऊ शकते.

९. विश्‍वासामुळे आपलं संरक्षण कसं होतं?

जसं कवच एका सैनिकाच्या हृदयाचं रक्षण करतं, तसं विश्‍वास आणि प्रेम आपल्या लाक्षणिक हृदयाचं रक्षण करतं. त्यामुळे देवाची सेवा करत राहायला आणि येशूचं अनुकरण करायला आपल्याला मदत होते. पूर्ण मनाने यहोवाचा शोध केल्याने तो आपल्याला प्रतिफळ देईल याची खातरी आपल्याला विश्‍वासामुळे मिळते. (इब्री ११:६) तसंच कठीण परिस्थितीतही आपलं नेतृत्व करणाऱ्‍या येशूला एकनिष्ठ राहण्याची प्रेरणासुद्धा आपल्याला त्यामुळे मिळते. जीवनात येणाऱ्‍या कठीण परीक्षांचा सामना करण्यासाठी आपण आपला विश्‍वास मजबूत करू शकतो. आणि त्यासाठी ज्यांनी आर्थिक अडचणींचा किंवा छळाचा सामना करत असतानाही एकनिष्ठा टिकवून ठेवली, अशा आजच्या काळातल्या भाऊबहिणींचा आपण विचार करू शकतो. तसंच राज्याच्या कामाला पहिलं स्थान देण्यासाठी ज्यांनी आपली जीवनशैली साधी ठेवली आहे, त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करून आपण धनसंपत्तीच्या मागे लागण्याच्या मोहापासूनसुद्धा दूर राहू शकतो. b

१०. देवावर आणि लोकांवर असलेल्या प्रेमामुळे आपल्याला प्रचार कार्य करत राहायला कशी मदत होऊ शकते?

१० जागं आणि सावध राहण्यासाठी प्रेमसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. (मत्त. २२:३७-३९) प्रचार कार्यात कितीही अडचणी आल्या तरी देवावरचं प्रेम आपल्याला प्रचार कार्य करत राहायला मदत करेल. (२ तीम. १:७, ८) कारण देवाची सेवा न करणाऱ्‍या लोकांवरसुद्धा आपलं प्रेम असल्यामुळे आपण आपल्या क्षेत्रात प्रचार कार्य करत राहतो, तसंच फोन आणि पत्राद्वारेसुद्धा लोकांना साक्ष देतो. लोक एक-न्‌-एक दिवस बदलतील आणि जे योग्य आहे ते करतील अशी आशा आपण सोडत नाही.​—यहे. १८:२७, २८.

११. भाऊबहिणींवर असलेल्या प्रेमामुळे आपल्याला काय करणं शक्य होतं? (१ थेस्सलनीकाकर ५:११)

११ आपले भाऊबहीणसुद्धा आपले शेजारी आहेत आणि त्यामुळे आपण त्यांच्यावरसुद्धा प्रेम केलं पाहिजे. ‘एकमेकांना प्रोत्साहन देऊन आणि एकमेकांना बळकट करून’ आपण हे प्रेम दाखवू शकतो. (१ थेस्सलनीकाकर ५:११ वाचा.) खांद्याला खांदा लावून लढणाऱ्‍या सैनिकांप्रमाणेच आपणसुद्धा एकमेकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. युद्धाच्या वेळी चुकून एखादा सैनिक आपल्यासोबत लढणाऱ्‍या एका सैनिकाला जखमी करू शकतो. पण तो मुद्दामहून असं कधीच करणार नाही. त्याचप्रमाणे आपण कधीच जाणूनबुजून आपल्या भाऊबहिणींना दुखावणार नाही किंवा वाइटाची फेड वाईटाने करणार नाही. (१ थेस्सलनी. ५:१३, १५) तसंच मंडळीत नेतृत्त्व करणाऱ्‍या बांधवांचा आदर करूनसुद्धा आपण आपलं प्रेम दाखवू शकतो. (१ थेस्सलनी. ५:१२) पौलने जेव्हा हे पत्र लिहिलं तेव्हा थेस्सलनीका इथल्या मंडळीची स्थापना होऊन एक वर्षसुद्धा झालं नव्हतं. तिथे पुढाकार घेणारे भाऊ कदाचित अनुभवी नसतील आणि त्यांच्या हातून काही चुकासुद्धा झाल्या असतील. तरीसुद्धा ते जी मेहनत घेत होते त्यामुळे भाऊबहिणींनी त्यांचा आदर करणं गरजेचं होतं. मार्गदर्शनासाठी आज आपण मंडळीतल्या वडिलांवर अवलंबून आहोत. पण मोठं संकट जसजसं जवळ येत आहे तसतसं आपल्याला त्यांच्यावर अवलंबून राहण्याची आणखी जास्त गरज आहे. येणाऱ्‍या दिवसांमध्ये कदाचित जागतिक मुख्यालयाशी किंवा शाखा कार्यालयाशी आपला संपर्क तुटू शकतो. त्यामुळे आत्ताच आपण त्यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदर वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आपण सावध राहू या. आणि वडिलांच्या कमतरतांकडे लक्ष देण्याऐवजी, यहोवा येशूद्वारे या विश्‍वासू बांधवांना मार्गदर्शन पुरवत आहे या गोष्टीवर लक्ष देऊ या.

१२. आशेमुळे आपल्या विचारांचं कशा प्रकारे संरक्षण होतं?

१२ जसं टोप घातल्यामुळे सैनिकाच्या डोक्याचं संरक्षण होतं त्याचप्रमाणे तारणाच्या आशेमुळे आपल्या विचारसरणीचं संरक्षण होतं. आपली आशा एकदम पक्की असल्यामुळे आपल्याला माहीत आहे की या जगातल्या गोष्टी व्यर्थ आहेत. (फिलिप्पै. ३:८) आपल्या आशेमुळे आपल्याला मन स्थिर आणि शांत ठेवायला मदत होते. आफ्रिकेत सेवा करणाऱ्‍या वॉलेस आणि लॉरिंडानेसुद्धा हेच अनुभवलं. तीन आठवड्यातच वॉलेसच्या आईचा आणि लॉरिंडाच्या वडिलांचा मृत्यू झाला. आणि या काळात कोव्हिड महामारी असल्यामुळे त्यांना घरीसुद्धा जाता आलं नाही. वॉलेस म्हणतो: “पुनरुत्थानाच्या आशेमुळे मला ते त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये कसे होते यावर नाही, तर नवीन जगात ते कसे असतील यावर विचार करायला मदत होते. तसंच त्यांच्या आठवणीने मी खूप निराश होतो किंवा मला खूप वाईट वाटतं तेव्हा या आशेमुळेच माझं मन शांत ठेवायला मला मदत होते.”

१३. पवित्र शक्‍ती मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो?

१३ “पवित्र शक्‍तीची आग विझवू नका.”  (१ थेस्सलनी. ५:१९) प्रेषित पौलने पवित्र शक्‍तीची तुलना एका अशा आगीशी केली जी जणू आपल्या आत जळत आहे. देवाची पवित्र शक्‍ती आपल्याला मिळते तेव्हा योग्य ते करण्यासाठी आपल्यात एक प्रकारचा आवेश आणि उत्साह निर्माण होतो. आणि यहोवाची सेवा आपण जोमाने करू लागतो. (रोम. १२:११) मग देवाची पवित्र शक्‍ती मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो? त्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो, देवाच्या प्रेरित वचनाचा अभ्यास करू शकतो आणि त्याच्या पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्‍या संघटनेला जडून राहू शकतो. असं केल्यामुळे “पवित्र शक्‍तीचं फळ” उत्पन्‍न करायला आपल्याला मदत होईल.​—गलती. ५:२२, २३.

स्वतःला विचारा, ‘देवाची पवित्र शक्‍ती मिळत राहावी अशी माझी इच्छा आहे, हे माझ्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतं का?’ (परिच्छेद १४ पाहा)

१४. देवाची पवित्र शक्‍ती मिळवायची असेल तर आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? (चित्रसुद्धा पाहा.)

१४ देवाकडून पवित्र शक्‍ती मिळाल्यानंतर आपण ‘पवित्र शक्‍तीची आग विझवू नये’ म्हणून सावध असलं पाहिजे. यहोवा आपली पवित्र शक्‍ती फक्‍त अशा लोकांनाच देतो ज्यांची विचारसरणी आणि वागणं शुद्ध आहे. आपण जर अशुद्ध विचारांना आपल्या मनात घर करू दिलं आणि त्याप्रमाणे वागत राहिलो तर यहोवा त्याची पवित्र शक्‍ती आपल्याला देणार नाही. (१ थेस्सलनी. ४:७, ८) शिवाय, आपल्याला जर पवित्र शक्‍ती मिळत राहावी असं वाटत असेल तर आपण ‘भविष्यवाण्यांनासुद्धा तुच्छ लेखू नये.’ (१ थेस्सलनी. ५:२०) देवाच्या पवित्र शक्‍तीने देण्यात आलेल्या संदेशाला या ठिकाणी “भविष्यवाण्या” म्हटलं आहे. यामध्ये यहोवाच्या दिवसाबद्दल आणि तो दिवस किती जवळ आहे याबद्दल दिलेल्या गोष्टीसुद्धा येतात. त्यामुळे यहोवाचा दिवस यायला अजून वेळ आहे किंवा हर्मगिदोन आपल्या काळात येणार नाही असा विचार आपण करू नये. उलट तो दिवस लवकरच येणार आहे असा विचार आपण केला पाहिजे आणि आपलं वागणंबोलणं शुद्ध ठेवून “देवाच्या भक्‍तीची कार्यं” करण्यात व्यस्त राहिलं पाहिजे.​—२ पेत्र ३:११, १२.

“सगळ्या गोष्टींची खातरी करा”

१५. दुष्ट स्वर्गदूतांनी प्रेरित केलेल्या खोट्या गोष्टींमुळे आपण फसू नये म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे? (१ थेस्सलनीकाकर ५:२१)

१५ लवकरच देवाचे विरोधक कोणत्या न कोणत्या मार्गाने “शांती आहे, सुरक्षा आहे!” अशी घोषणा करतील. (१ थेस्सलनी. ५:३) दुष्ट स्वर्गदूतांनी प्रेरित केलेली अशी चुकीची माहिती संपूर्ण पृथ्वीवर पसरेल आणि बहुतेक लोकांची त्यामुळे फसवणूक होईल. (प्रकटी. १६:१३, १४) पण मग आपल्या बाबतीत काय? आपण जर ‘सगळ्या गोष्टींची खातरी केलेली’ असेल तर आपण अशा गोष्टींना फसणार नाही. (१ थेस्सलनीकाकर ५:२१ वाचा.) या वचनात “खातरी करा” असं ज्या ग्रीक शब्दाचं भाषांतर केलं आहे तो शब्द सहसा सोन्याचांदीसारख्या मौल्यवान घातूंची पारख करण्यासाठी वापरला जायचा. त्यामुळे आपणसुद्धा ऐकलेल्या किंवा वाचलेल्या एखाद्या गोष्टीवर विश्‍वास ठेवण्याआधी ती खरी आहे का याची पारख करणं गरजेचं आहे. थेस्सलनीका इथल्या ख्रिश्‍चनांसाठी ही गोष्ट खूप गरजेची होती आणि मोठं संकट इतकं जवळ असताना आज आपल्यासाठीसुद्धा ही गोष्ट त्याहूनही जास्त गरजेची आहे. म्हणून सगळ्याच गोष्टींवर डोळे झाकून विश्‍वास ठेवण्याऐवजी आपण आपल्या विचारशक्‍तीचा वापर केला पाहिजे. आणि आपण जे काही वाचतो किंवा ऐकतो त्याची तुलना बायबल आणि यहोवाची संघटना आपल्याला जे सांगते त्याच्याशी केली पाहिजे. असं केल्यामुळे दुष्ट स्वर्गदूतांनी प्रेरित केलेल्या आणि दिशाभूल करणाऱ्‍या गोष्टींमुळे आपण फसणार नाही.​—नीति. १४:१५; १ तीम. ४:१.

१६. आपल्याला कोणती पक्की आशा आहे आणि आपण काय करायचा निश्‍चय केला पाहिजे?

१६ एक गट या नात्याने देवाच्या लोकांचा मोठ्या संकटातून नक्की बचाव होईल. पण आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीत उद्या काय होईल हे सांगता येत नाही. (याको. ४:१४) कदाचित मोठं संकट आपण पार करू किंवा त्याच्या आधीच आपला मृत्यू होईल. पण एक गोष्ट मात्र पक्की आहे, की आपण जर विश्‍वासू राहिलो तर कायमच्या जीवनाचं प्रतिफळ आपल्याला मिळेल. अभिषिक्‍त जन येशूसोबत स्वर्गात असतील आणि दुसरी मेंढरं पृथ्वीवरच्या नंदनवनात असतील. तेव्हा ही सुंदर आशा आपण आपल्या डोळ्यांसमोर नेहमी ठेवू या आणि यहोवाच्या दिवसासाठी तयार राहू या!

गीत १४९ यहोवाच्या विजयाचं गीत

a पहिले थेस्सलनीकाकर पुस्तकाच्या ५ व्या अध्यायात भविष्यात येणाऱ्‍या देवाच्या दिवसाबद्दल बरीच उदाहरणं देण्यात आली आहेत. तो “दिवस” काय आहे आणि तो कसा येईल? त्यातून कोण वाचतील आणि कोण वाचणार नाहीत? आपण त्या दिवसासाठी कशी तयारी करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण या लेखात प्रेषित पौलच्या शब्दांवर विचार करू या.