व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २४

गीत २४ यहोवाच्या पर्वतावर चला!

यहोवाचे पाहुणे बनून राहा!

यहोवाचे पाहुणे बनून राहा!

“हे यहोवा, तुझ्या तंबूत राहण्यासाठी तू कोणाचं स्वागत करशील?”​—स्तो. १५:१.

या लेखात:

यहोवासोबत मैत्रीचं नातं टिकवून ठेवण्यासाठी काय करायची गरज आहे आणि त्याच्या मित्रांसोबत आपण कसं वागावं अशी त्याची इच्छा आहे, ते पाहा.

१. स्तोत्र १५:१-५ वर विचार करणं आपल्या फायद्याचं का आहे?

 आधीच्या लेखात आपण पाहिलं, की ज्यांनी यहोवाला आपलं जीवन समर्पित केलंय आणि ज्यांचं त्याच्यासोबत एक जवळचं नातं असतं ते यहोवाच्या लाक्षणिक तंबूत त्याचे पाहुणे म्हणून राहू शकतात. पण यहोवासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी आपल्याला काय करायची गरज आहे? १५ व्या स्तोत्रात याबद्दल बऱ्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. (स्तोत्र १५:१-५ वाचा.) यात अशा काही व्यावहारिक गोष्टी आहेत, ज्यांमुळे देवासोबत आपल्याला जवळचं नातं जोडता येईल.

२. यहोवाच्या तंबूबद्दल बोलताना दावीदच्या मनात काय होतं?

स्तोत्र १५ मध्ये सुरुवातीला असं म्हटलंय: “हे यहोवा, तुझ्या तंबूत राहण्यासाठी तू कोणाचं स्वागत करशील? तुझ्या पवित्र पर्वतावर कोण राहू शकतं?” (स्तो. १५:१) यहोवाच्या ‘तंबूबद्दल’ बोलताना स्तोत्रकर्ता दावीद कदाचित उपासना मंडपाचा विचार करत असावा. हा उपासना मंडप काही काळासाठी गिबोनमध्ये होता. तसंच दावीदने ‘पवित्र पर्वताचाही’ उल्लेख केला. आणि त्या वेळी तो यरुशलेममधल्या सीयोन पर्वतावरच्या तंबूचा विचार करत असावा. गिबोनच्या दक्षिणेकडे काही किलोमीटर अंतरावर दावीदने एक तंबू उभा केला होता आणि मंदिराचं बांधकाम होईपर्यंत कराराची पेटी त्या ठिकाणी ठेवली होती.​—२ शमु. ६:१७.

३. स्तोत्र १५ मध्ये काय म्हटलंय ते समजून घेण्याची आपल्याला का गरज आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

हे खरंय की उपासना मंडपात खूप कमी इस्राएली लोक जाऊन सेवा करू शकत होते. त्यापेक्षाही खूप कमी लोक तंबूमध्ये जिथे कराराची पेटी ठेवण्यात आली होती त्या ठिकाणी जाऊ शकले असतील. पण ज्यांनी यहोवासोबत मैत्रीचं नातं जोडलंय आणि ते टिकवून ठेवलंय ते सगळेच यहोवाचे विश्‍वासू सेवक त्याच्या लाक्षणिक तंबूमध्ये त्याचे पाहुणे म्हणून जाऊ शकतात. आपल्या सगळ्यांचीही अशीच इच्छा आहे. आणि नेमकं याबद्दलच म्हणजे यहोवासोबत आपली मैत्री टिकवून ठेवण्यासाठी कोणते गुण वाढवायची आणि दाखवायची गरज आहे याबद्दल स्तोत्र १५ मध्ये सांगण्यात आलंय.

दावीदच्या दिवसांतले इस्राएली लोक यहोवाच्या तंबूत पाहुणे असण्याची कल्पना करू शकत होते (परिच्छेद ३ पाहा)


निर्दोषपणे चाला आणि योग्य ते करत राहा

४. यहोवा आपल्याकडून फक्‍त बाप्तिस्म्याचीच अपेक्षा करत नाही हे आपल्याला कसं कळतं? (यशया ४८:१)

स्तोत्र १५:२ मध्ये अशा माणसाबद्दल सांगितलंय “जो निर्दोषपणे चालतो” आणि “योग्य ते करतो.” या अशा गोष्टी आहेत ज्या देवासोबत मैत्री असलेल्या व्यक्‍तीने करत राहिल्या पाहिजेत. पण आपण खरंच ‘निर्दोषपणे चालू’ शकतो का? हो. आपण सगळेच अपरिपूर्ण आहोत, पण जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, तेव्हा यहोवा आपल्याला ‘निर्दोषपणे चालणारे’ म्हणून पाहील. जेव्हा आपण आपलं जीवन समर्पित करतो आणि बाप्तिस्मा घेतो, तेव्हा देवासोबतचा आपला प्रवास नुकताच चालू झालेला असतो. लक्षात घ्या, की बायबल काळात फक्‍त इस्राएली असल्यामुळे एक व्यक्‍ती आपोआपच यहोवाच्या तंबूत त्याचा पाहुणा बनू शकत नव्हता. कारण काही जण “खरेपणाने आणि नीतीने” त्याला प्रार्थना करत नव्हते. (यशया ४८:१ वाचा.) त्यामुळे एका प्रामाणिक इस्राएली व्यक्‍तीला यहोवाच्या त्याच्याबद्दल काय अपेक्षा आहेत हे समजून घेणं आणि त्याप्रमाणे चालणं गरजेचं होतं. त्याचप्रमाणे आजसुद्धा आपल्याला देवाला खूश करायचं असेल तर फक्‍त बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार असणंच पुरेसं नाही, तर आपण जे ‘योग्य आहे ते करत राहिलं पाहिजे.’ मग यामध्ये कोणत्या गोष्टी सामील आहेत?

५. सर्व बाबतींत यहोवाच्या आज्ञा पाळणं म्हणजे काय?

यहोवाच्या दृष्टिकोनातून ‘निर्दोषपणे चालत’ राहणं किंवा ‘योग्य ते करत राहणं’ म्हणजे उपासनेशी संबंधित कामांमध्ये नियमितपणे सहभाग घेणं इतकंच नाही. (१ शमु. १५:२२) तर जीवनाच्या प्रत्येक पैलूत आपण त्याच्या आज्ञा पाळायचा प्रयत्न केला पाहिजे; मग आपण अगदी एकटे असतो तेव्हासुद्धा. (नीति. ३:६; उप. १२:१३, १४) अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्येसुद्धा आपण यहोवाच्या आज्ञा पाळायचा प्रयत्न करणं खूप महत्त्वाचंय. असं केल्यामुळे आपलं त्याच्यावर खरोखर प्रेम असल्याचं दिसून येईल. आणि त्यामुळे यहोवाचंसुद्धा आपल्यावरचं प्रेम वाढेल.​—योहा. १४:२३; १ योहा. ५:३.

६. इब्री लोकांना ६:१०-१२ प्रमाणे आपण पूर्वी विश्‍वासूपणे केलेल्या गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे?

आपण पूर्वी विश्‍वासूपणे यहोवासाठी जे काही केलंय त्या गोष्टींची त्याला खूप कदर आहे. पण यहोवाच्या तंबूत त्याचे पाहुणे बनून राहण्यासाठी फक्‍त एवढ्याच गोष्टी पुरेशा नाहीत. हीच गोष्ट इब्री लोकांना ६:१०-१२ मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. (वाचा.) यहोवा आपण पूर्वी केलेल्या चांगल्या गोष्टी कधीच विसरत नाही. पण आपण भविष्यात “शेवटपर्यंत” आणि पूर्ण मनाने त्याची उपासना करत राहावं असं त्याला वाटतं. आणि असं करण्यात जर आपण “खचून गेलो नाही,” तर त्याच्यासोबतची आपली मैत्री कायम टिकून राहील.​—गलती. ६:९.

मनातसुद्धा खरं बोला

७. मनात खरं बोलणं याचा काय अर्थ आहे?

यहोवाच्या तंबूत पाहुणे म्हणून राहायची जर आपली इच्छा असेल, तर आपण “मनातसुद्धा खरं” बोललं पाहिजे. (स्तो. १५:२) याचा अर्थ फक्‍त खोटं न बोलणं इतकाच नाही, तर आपण प्रत्येक बाबतीत प्रामाणिक राहावं असा होतो. आणि हीच यहोवाची इच्छा आहे. (इब्री १३:१८) हे महत्त्वाचंय “कारण यहोवाला कपटी माणसाची घृणा वाटते, पण सरळ माणसाशी त्याची जवळची मैत्री असते.”​—नीति. ३:३२.

८. आपण कोणती वृत्ती टाळली पाहिजे?

आपल्या ‘मनातसुद्धा खरं बोलणारी’ व्यक्‍ती फक्‍त लोकांसमोर देवाची आज्ञा पाळत नाही, तर एकटं असतानासुद्धा देवाची आज्ञा पाळते. (यश. २९:१३) ती कपटीपणे वागत नाही. कारण यहोवाचे नियम नेहमीच आपल्या भल्याचे असतात यावर एक कपटी व्यक्‍ती शंका घेऊ शकते. (याको. १:५-८) ती कदाचित स्वतःला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत, त्याबाबतीत देवाच्या आज्ञा पाळणार नाही. आणि मग त्याचा काही वाईट परिणाम होत नाही, असं तिला दिसू लागतं तेव्हा ती आणखी गंभीर गोष्टींमध्ये देवाच्या आज्ञा मोडायचं धाडस करू लागते. मग तिची उपासना ही फक्‍त उपासना राहत नाही, तर ढोंगीपणा बनतो. (उप. ८:११) पण आपल्याला मात्र या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत प्रामाणिक राहायचं आहे.

९. येशू जेव्हा पहिल्यांदा नथनेलला भेटला तेव्हा जे घडलं त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (चित्रसुद्धा पाहा.)

येशू जेव्हा नथनेलला पहिल्यांदा भेटला, तेव्हा जे घडलं त्यावरून प्रामाणिक असणं का महत्त्वाचं आहे, हे आपल्याला कळतं. फिलिप्प आपला मित्र नथनेल याला येशूची भेट घालून देण्यासाठी त्याच्याजवळ आणतो, तेव्हा एक विशेष गोष्ट घडते. येशू पूर्वी कधीच नथनेलला भेटला नव्हता. पण तरीसुद्धा येशू त्याला म्हणतो: “पाहा, हा एक खरा इस्राएली आहे. याच्यात जराही कपट नाही.” (योहा. १:४७) येशूच्या नजरेत इतर शिष्यसुद्धा नक्कीच प्रामाणिक होते. पण नथनेलचा प्रामाणिकपणा येशूला खूप विशेष वाटला. आपल्याप्रमाणेच नथनेलसुद्धा अपरिपूर्ण होता. पण त्याच्यामध्ये कुठलाही खोटेपणा किंवा दिखाऊपणा नव्हता. हीच गोष्ट येशूला आवडली आणि म्हणून त्याने त्याची प्रशंसा केली. आपल्या बाबतीतही जर येशूने असंच म्हटलं असतं, तर आपल्यासाठी ती किती विशेष गोष्ट असती!

येशू जेव्हा नथनेलला पहिल्यांदा भेटला तेव्हा तो म्हणाला की ‘त्याच्यात जराही कपट नाही.’ मग आपल्याबद्दलही असंच म्हणता येईल का? (परिच्छेद ९ पाहा)


१०. आपण आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा गैरवापर का करू नये? (याकोब १:२६)

१० देवाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत याबद्दल १५ व्या स्तोत्रात बरंच काही सांगितलंय. आणि यांपैकी बऱ्‍याच गोष्टी आपण इतरांशी कसं वागतो याच्याशी संबंधित आहेत. स्तोत्र १५:३ मध्ये म्हटलंय, की यहोवाच्या तंबूमध्ये असलेला पाहुणा “आपल्या जिभेने बदनामी करत नाही, आपल्या शेजाऱ्‍याचं वाईट करत नाही, आणि आपल्या मित्रांची निंदा करत नाही.” आपण जर आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा गैरवापर केला, तर इतरांचं खूप नुकसान होऊ शकतं. आणि आपण जर असं केलं तर आपल्याला यहोवाच्या तंबूत पाहुणे म्हणून राहता येणार नाही.​—याकोब १:२६ वाचा.

११. बदनामी म्हणजे काय आणि बदनामी करणाऱ्‍या अपश्‍चात्तापी व्यक्‍तीला काय केलं जातं?

११ स्तोत्रकर्त्याने स्तोत्र १५:३ मध्ये खासकरून बदनामी करण्याविषयी म्हटलंय. पण बदनामी म्हणजे काय? अगदी साध्या शब्दात सांगायचं, तर बदनामी म्हणजे अशी एखादी खोटी गोष्ट सांगणं ज्यामुळे एखाद्याचं नाव खराब होऊ शकतं. अशा बदनामी करणाऱ्‍या आणि पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या व्यक्‍तीला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केलं जातं.​—यिर्म. १७:१०.

१२-१३. कोणत्या परिस्थितींमध्ये आपल्याकडून नकळत आपल्या मित्रांची बदनामी होऊ शकते? (चित्रसुद्धा पाहा.)

१२ स्तोत्र १५:३ मध्ये आपल्याला याची आठवण करून दिली आहे, की यहोवाचे पाहुणे त्यांच्या शेजाऱ्‍यांचं काहीही वाईट करत नाहीत. आणि ते आपल्या मित्रांची निंदा करत नाहीत. मग निंदा करण्यात कोणकोणत्या गोष्टी येतात?

१३ एखाद्याबद्दल वाईट गोष्ट पसरवून आपण नकळत एखाद्याची निंदा करू शकतो. उदाहरणार्थ, या परिस्थितींचा विचार करा: (१) एक बहीण पायनियर सेवा करायचं थांबवते, (२) एक विवाहित जोडपं आता बेथेलमध्ये सेवा करत नाही, (३) एक भाऊ आता वडील किंवा सहायक सेवक म्हणून सेवा करत नाही. हे नेमकं कोणत्या कारणांमुळे घडलं असेल याबद्दल काहीतरी अंदाज बांधून, तो इतरांना सांगणं योग्य ठरेल का? त्यांनी असं का केलं असेल याची बरीच कारणं असतील जी आपल्याला माहीत नाहीत. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की यहोवाच्या तंबूतला पाहुणा “आपल्या शेजाऱ्‍याचं वाईट करत नाही, आणि आपल्या मित्रांची निंदा करत नाही.”

इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी पसरवणं खूप सोपं असतं. पण यामुळे त्यांची बदनामी होऊ शकते (परिच्छेद १२-१३ पाहा)


यहोवाचं भय मानणाऱ्‍यांचा आदर करा

१४. यहोवाचे पाहुणे ‘वाईट कामं करणाऱ्‍यांपासून’ दूर कसं राहू शकतात?

१४ स्तोत्र १५:४ म्हणतं, की यहोवाचा मित्र “वाईट कामं करणाऱ्‍यांना तुच्छ लेखतो.” मग आपण वाईट कामं करणाऱ्‍या व्यक्‍तीला कसं ओळखू शकतो? खरंतर अपरिपूर्ण असल्यामुळे आपण वाईट कामं करणाऱ्‍या व्यक्‍तीला ओळखू शकत नाही. का? कारण ज्यांचा स्वभाव आपल्या स्वभावाशी जुळतो अशा लोकांशी आपण मैत्री करतो आणि जे लोक आपल्याला चीड आणतात, त्यांच्यापासून आपण दूर राहतो. हा आपला स्वभावच आहे. पण आपण अशाच लोकांपासून दूर राहिलं पाहिजे, ज्यांना यहोवा  ‘वाईट कामं करणारे’ म्हणून बघतो. (१ करिंथ. ५:११) यामध्ये असे लोक येतात, जे पश्‍चात्ताप न करता चुकीची कामं करत राहतात, आपल्या विश्‍वासाचा अनादर करतात किंवा यहोवासोबतचं आपलं नातं तोडायचा प्रयत्न करतात.​—नीति. १३:२०.

१५. ‘यहोवाचं भय मानणाऱ्‍यांचा’ आपण कोणत्या एका मार्गाने आदर करू शकतो?

१५ स्तोत्र १५:४ मध्ये आपल्याला ‘यहोवाचं भय मानणाऱ्‍यांचा’ आदर करायला सांगितलंय. म्हणून आपण यहोवाच्या मित्रांना दया आणि आदर दाखवण्याचे मार्ग शोधत असतो. (रोम. १२:१०) आपण ते कसं करू शकतो? एक मार्ग स्तोत्र १५:४ मध्ये सांगितलाय. तो म्हणजे यहोवाच्या तंबूतला पाहुणा ‘नुकसान सहन करावं लागलं, तरी दिलेला शब्द मोडत नाही.’ पण आपण जेव्हा दिलेला शब्द मोडतो तेव्हा इतरांना वाईट वाटू शकतं. (मत्त. ५:३७) उदाहरणार्थ, यहोवाची अशी इच्छा आहे की पती-पत्नीने त्यांचं लग्नाचं वचन पाळावं. त्यासोबतच आईवडील जेव्हा मुलांना दिलेलं वचन पाळतात तेव्हा त्याला आनंद होतो. देवावर आणि शेजाऱ्‍यांवर असलेल्या प्रेमामुळे दिलेल्या शब्दाप्रमाणे वागायला आपण जमेल ते करू.

१६. यहोवाच्या मित्रांना आदर दाखवण्याचा आणखी एक मार्ग कोणता?

१६ यहोवाच्या मित्रांना आदर दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्यांचा पाहुणचार करणं आणि त्यांना उदारता दाखवणं. (रोम. १२:१३) जेव्हा आपण भाऊबहिणींसोबत वेळ घालवतो तेव्हा त्यांच्यासोबत आणि यहोवासोबतची आपली मैत्री आणखी मजबूत करता येते. त्यासोबतच जेव्हा आपण पाहुणचार दाखवतो तेव्हा आपण यहोवाचं अनुकरण करत असतो.

पैशाच्या प्रेमापासून दूर राहा

१७. १५ व्या स्तोत्रात पैशाबद्दल का सांगण्यात आलंय?

१७ आपण पुढच्या वचनात वाचतो, की यहोवाच्या तंबूत असणारा पाहुणा “व्याजाने पैसे उसने देत नाही आणि निर्दोष माणसाविरुद्ध लाच घेत नाही.” (स्तो. १५:५) पण या स्तोत्रात मध्येच पैशांबद्दल का बोलण्यात आलंय? कारण जर पैशांबद्दल आपला योग्य दृष्टिकोन नसेल, तर आपण इतरांचं मन दुखावू शकतो आणि देवासोबतची आपली मैत्री बिघडू शकते. (१ तीम. ६:१०) बायबल काळात काही लोकांनी गरीब भाऊबहिणींना दिलेल्या पैशावर व्याज लावून त्यांचा फायदा घेतला. तर काही न्यायाधीशांनी लाच घेऊन निष्पाप लोकांना चुकीचा न्याय दिला. आणि त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला. अशा गोष्टींची यहोवाला घृणा वाटते.​—यहे. २२:१२.

१८. पैशाबद्दल आपला दृष्टिकोन तपासण्यासाठी आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकतो? (इब्री लोकांना १३:५)

१८ पैशाबद्दल आपला दृष्टिकोन तपासणं चांगलंय. म्हणून स्वतःला विचारा: ‘मी नेहमी पैशांबद्दल आणि पैशांनी काय विकत घेता येईल याबद्दलच विचार करतो का? मी जर पैसे उधार घेतले असतील तर ज्याच्याकडून मी पैसे घेतलेत त्याला पैशाची गरज नाही असं समजून मी ते परत द्यायला उशीर लावतो का? पैशामुळे माझं महत्त्व वाढतंय असं मी समजतो का? पण उदारता दाखवायला मला कठीण जातं का? माझ्या भाऊबहिणींकडे पैसा आहे म्हणून त्यांचं यहोवापेक्षा पैशावर जास्त प्रेम आहे असं मी समजतो का? गरीब लोकांना जास्त महत्त्व न देता मी फक्‍त श्रीमंत लोकांशी मैत्री करतो का?’ हे लक्षात घ्या की आपल्याला यहोवाचे पाहुणे बनण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे आपण आपलं जीवन पैशाच्या प्रेमापासून दूर ठेवून या संधीला जपू शकतो. आपण असं केलं तर यहोवा आपल्याला कधीच सोडणार नाही!​—इब्री लोकांना १३:५ वाचा.

यहोवा त्याच्या मित्रांवर प्रेम करतो

१९. यहोवा आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो त्या मागचा मूळ उद्देश काय?

१९ १५ व्या स्तोत्राचा शेवट या शब्दांनी होतो: “जो कोणी या गोष्टी करतो, तो कधीच डळमळणार नाही.” (स्तो. १५:५) इथे स्तोत्रकर्ता देवाच्या आपल्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत त्याबद्दलचा मुख्य उद्देश स्पष्ट करतो. आणि तो म्हणजे आपण नेहमी आनंदी असावं. म्हणूनच तो आपल्याला असं मार्गदर्शन देतो ज्यामुळे आपल्याला आशीर्वाद आणि संरक्षण मिळेल.​—यश. ४८:१७.

२०. यहोवाच्या पाहुण्यांना कोणत्या गोष्टीची आशा आहे?

२० यहोवाने ज्यांना त्याच्या तंबूत पाहुणे म्हणून बोलवलंय त्यांच्यापुढे एक उज्वल भविष्य आहे. यहोवाच्या विश्‍वासू अभिषिक्‍त जणांना येशूने स्वर्गात तयार केलेल्या ‘जागा’ मिळतील. (योहा. १४:२) तर पृथ्वीवर जगण्याची आशा असलेले प्रकटीकरण २१:३ मध्ये दिलेलं अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. खरंच यहोवाने आपल्याला त्याचे कायमचे पाहुणे होण्यासाठी जे आमंत्रण दिलंय ती आपल्यासाठी एक बहुमानाची गोष्ट आहे!

गीत ३९ देवाच्या नजरेत चांगलं नाव मिळवू या