व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २६

गीत ८ यहोवा आमचा गड

यहोवाला आपला खडक बनवा

यहोवाला आपला खडक बनवा

“आमच्या देवासारखा भक्कम खडक दुसरा कोणीही नाही.”​—१ शमु. २:२.

या लेखात:

कोणत्या गुणांमुळे यहोवाला खडक म्हटलंय आणि या गुणांचं आपण कसं अनुकरण करू शकतो, याबद्दल जाणून घ्या.

१. स्तोत्र १८:४६ मध्ये दावीदने यहोवाची तुलना कशासोबत केली?

 आपण अशा जगात राहतो जिथे अनपेक्षित घटना कधीही घडू शकतात. आणि त्यामुळे आपलं पूर्ण जीवनच बदलू शकतं. पण मदतीसाठी आपण यहोवाकडे वळू शकतो याबद्दल आपण त्याचे खरंच खूप आभारी आहोत. मागच्या लेखात आपल्याला आठवण करून देण्यात आली होती, की यहोवा हा जिवंत देव आहे आणि तो आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो. जेव्हा आपल्याला त्याची मदत अनुभवायला मिळते, तेव्हा आपल्याला याची खातरी होते, की यहोवा खरंच “जिवंत देव आहे.” (स्तोत्र १८:४६ वाचा.) पण हे सांगितल्यावर दावीदने देवाला ‘माझा खडक’ असं म्हटलं. तो एका जिवंत देवाची, यहोवाची तुलना खडकासारख्या निर्जीव वस्तूशी का करत होता?

२. दावीदने यहोवाला ‘माझा  खडक’ म्हटलं यावरून आपल्याला कोणत्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत?

या लेखात आपण, यहोवाला खडक का म्हटलंय आणि या तुलनेवरून आपल्याला त्याच्याबद्दल काय शिकायला मिळतं, यावर विचार करू या. तसंच दावीदने म्हटलं त्याप्रमाणे आपणही त्याला आपला  खडक म्हणून कसं पाहू शकतो तेसुद्धा शिकू या. आणि शेवटी ज्या गुणांमुळे यहोवाला खडक म्हटलंय त्या गुणांचं आपण कोणकोणत्या मार्गांनी अनुकरण करू शकतो यावर चर्चा करू या.

यहोवाला खडक का म्हटलंय?

३. बायबलमध्ये बहुतेक वेळा “खडक” या शब्दाचा कसा वापर करण्यात आलाय? (चित्रसुद्धा पाहा.)

बायबलमध्ये “खडक” या शब्दचित्रावरून आपल्याला यहोवाच्या गुणांबद्दल शिकून घ्यायला मदत होते. बायबलच्या बऱ्‍याच उताऱ्‍यांमध्ये यहोवासारखं दुसरं कोणीच नाही हे सांगण्यासाठी आणि त्याची स्तुती करण्यासाठी या शब्दचित्राचा वापर करण्यात आलाय. “खडक” म्हणून सगळ्यात पहिला उल्लेख अनुवाद ३२:४ मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हन्‍नासुद्धा आपल्या प्रार्थनेत म्हणते “देवासारखा भक्कम खडक दुसरा कोणीही नाही.” (१ शमु. २:२) तसंच, हबक्कूकनेसुद्धा देवाला “माझ्या खडका” असं म्हटलं. (हब. १:१२) ७३ व्या स्तोत्राच्या लेखकानेसुद्धा देवाबद्दल बोलताना “देव माझा खडक आहे, तो माझ्या मनाला बळ देतो” असं म्हटलं. (स्तो. ७३:२६) आणि अगदी यहोवानेसुद्धा एका ठिकाणी स्वतःला ‘खडक’ म्हटलं. (यश. ४४:८) यहोवाच्या कोणत्या तीन गुणांमुळे त्याला खडक म्हटलंय यावर आता आपण चर्चा करू या. आणि आपण त्याला ‘आपला  खडक’ कसं बनवू शकतो ते पाहू या.​—अनु. ३२:३१.

यहोवाचे लोक त्याच्याकडे एक आश्रय देणारा खडक असं पाहतात (परिच्छेद ३ पाहा)


४. यहोवा एक सुरक्षित आश्रय कसा आहे? (स्तोत्र ९४:२२)

यहोवा सुरक्षित आश्रय आहे.  ज्याप्रमाणे एका भयंकर वादळापासून लपून राहायला एका व्यक्‍तीला खडकाचा किंवा खडकाच्या गुहेचा आश्रय मिळतो, त्याचप्रमाणे धोकादायक परिस्थितीत यहोवा आपलं संरक्षण करतो. (स्तोत्र ९४:२२ वाचा.) म्हणजे तो त्याच्यासोबतचं आपलं नातं जपायला आपल्याला मदत करतो आणि आपल्याला अशी खातरी देतो की आज जरी आपल्याला त्रास सहन करावा लागला तरी त्यामुळे आपलं कायमचं नुकसान होणार नाही. इतकंच नाही, तर तो असंही वचन देतो की भविष्यात आपल्या शांती आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्‍या प्रत्येक गोष्टीला काढून टाकेल.​—यहे. ३४:२५, २६.

५. यहोवा एका खडकासारखा आपला आश्रय कसा बनू शकतो?

एका खडकासारखं यहोवाला आपला आश्रय बनवण्याचा एक मार्ग म्हणजे त्याला प्रार्थना करणं. जेव्हा आपण त्याला प्रार्थना करतो, तेव्हा तो आपल्याला त्याची “शांती” देतो आणि त्यामुळे आपल्या मनाचं आणि बुद्धीचं रक्षण होतं. (फिलिप्पै. ४:६, ७) आर्टेम नावाच्या एका बांधवाचा विचार करा. त्याला त्याच्या विश्‍वासामुळे तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्याची वारंवार चौकशी करणाऱ्‍या एका अधिकाऱ्‍याने त्याच्यावर दबाव आणण्याचा आणि त्याला अपमानित करायचा प्रयत्न केला. तो म्हणतो: “जेव्हा तो अधिकारी मला बोलवायचा तेव्हा मला खूप टेंशन यायचं. . . . मी नेहमी यहोवाला प्रार्थना करायचो. त्याने माझं मन शांत करावं आणि मला बुद्धी द्यावी अशी मी त्याला विनंती करायचो. त्यामुळे त्यांचे डावपेच माझ्यावर चालले नाहीत. . . . कारण यहोवा माझ्या पाठीशी उभा होता. मला असं वाटत होतं की जणू मी एका दगडी भिंतीच्या मागे उभा आहे.”

६. आपण यहोवावर नेहमी भरवसा का ठेवू शकतो? (यशया २६:३, ४)

यहोवा भरवशालायक आहे.  ज्याप्रमाणे एक खडक एका जागी स्थिर उभा असतो, त्याप्रमाणे यहोवा आपल्या मदतीसाठी नेहमी आपल्यामागे स्थिर उभा असतो. आपण त्याच्यावर भरवसा ठेवू शकतो कारण तो “सर्वकाळ टिकून राहणारा खडक आहे.” (यशया २६:३, ४ वाचा.) त्याने दिलेली अभिवचनं पूर्ण करण्यासाठी, आपल्या प्रार्थना ऐकण्यासाठी आणि आपल्याला आवश्‍यक असलेली मदत पुरवण्यासाठी तो नेहमी जिवंत असेल. त्याची सेवा करणाऱ्‍यांसोबत तो एकनिष्ठ असल्यामुळेसुद्धा आपण त्याच्यावर अवलंबून राहू शकतो. (२ शमु. २२:२६) आपण जे काही करतो ते तो कधीच विसरणार नाही. आणि तो आपल्याला नेहमीच त्याचं प्रतिफळ देईल.​—इब्री ६:१०; ११:६.

७. आपण जेव्हा यहोवावर भरवसा ठेवतो तेव्हा आपल्याला कोणती गोष्ट अनुभवायला मिळते? (चित्रसुद्धा पाहा.)

जेव्हा आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवतो, तेव्हा आपण त्याला आपला खडक म्हणून पाहत असतो. आपल्याला या गोष्टीचा भरवसा आहे, की कठीण काळात आपण त्याच्या आज्ञांचं पालन करतो तेव्हा आपल्याला नेहमी फायदाच होईल. (यश. ४८:१७, १८) जसजसं आपण त्याची मदत अनुभवतो तसतसं आपला त्याच्यावरचा भरवसा आणखी वाढत जाईल. त्यामुळे आपण अशा परीक्षांना तोंड द्यायला आणखी चांगल्या प्रकारे तयार असू. कारण आपल्याला माहीत असेल की फक्‍त यहोवाच आपल्याला यांतून सोडवू शकतो. बऱ्‍याच वेळा अशा परिस्थितीत जेव्हा मदतीसाठी दुसरं कोणीच नसतं तेव्हा यहोवा किती भरवशालायक आहे, याची आपल्याला जाणीव होते. व्लादिमीर नावाचा एक भाऊ म्हणतो: “मी जेलमध्ये घालवलेला तो काळ देवासोबतच्या माझ्या नात्यातल्या सगळ्यात चांगला काळ होता. मी यहोवावर जास्त भरवसा ठेवायला शिकलो कारण मी एकटा होतो आणि परिस्थिती माझ्या हाताबाहेर होती.”

जेव्हा आपण यहोवावर पूर्णपणे विसंबून असतो तेव्हा आपण त्याला आपला खडक मानत असतो (परिच्छेद ७ पाहा)


८. (क) यहोवा कधीही न बदलणारा आहे असं आपण का म्हणू शकतो? (ख) खडकाप्रमाणे कधीही न बदलणारा देव असल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो? (स्तोत्र ६२:६, ७)

यहोवा कधीही न बदलणारा देव आहे.  एका मोठ्या खडकाप्रमाणेच यहोवा खंबीर आणि स्थिर आहे. त्याचं व्यक्‍तिमत्त्व आणि त्याचा उद्देश कधीच बदलत नाही. (मला. ३:६) एदेन बागेत बंडाळी झाली तेव्हासुद्धा तो डगमगला नाही. प्रेषित पौलने लिहिल्याप्रमाणे यहोवाला ‘त्याच्या स्वभावाच्या विरोधात वागणं शक्य नाही.’ (२ तीम. २:१३) याचा अर्थ, काहीही झालं आणि इतरांनी काहीही केलं तरी यहोवा कधीही त्याचे गुण, त्याचा उद्देश किंवा त्याचे स्तर बदलत नाही. आपल्या अशा कधीही न बदलणाऱ्‍या देवावर भरवसा ठेवून आपण तारणासाठी आणि कठीण काळात मदतीसाठी त्याच्याकडे पाहू शकतो.​—स्तोत्र ६२:६, ७ वाचा.

९. तातियानाच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

यहोवा कशा प्रकारची व्यक्‍ती आहे या गोष्टीवर लक्ष लावल्यामुळे आणि त्याचा उद्देश आपल्या मनात पक्का केल्यामुळे आपण त्याला आपला खडक बनवू शकतो. असं केल्यामुळे आपण परीक्षांना तोंड देत असताना भावनिक रित्या स्थिर राहायला आपल्याला मदत होऊ शकते. (स्तो. १६:८) तातियाना नावाच्या एका बहिणीच्या बाबतीतसुद्धा हे खरं ठरलं. तिला तिच्या विश्‍वासामुळे नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. ती म्हणते: “मी अक्षरशः एकटी पडले असं मला वाटत होतं. सुरुवातीला मला हे खूप कठीण वाटलं आणि त्यामुळे मी निराशसुद्धा झाले होते.” पण तिने तिच्यावर आलेल्या छळाचा आणि यहोवाच्या उद्देशाचा कसा संबंध आहे या गोष्टीवर विचार केला. आणि त्यामुळे तिला या परिस्थितीला तोंड द्यायला आणि भावनिक रित्या खंबीर राहायला मदत झाली. ती म्हणते: “हे सगळं माझ्यासोबत का घडतंय ते समजून घेतल्यामुळे मला हे लक्षात घ्यायला मदत झाली की माझं यहोवावर प्रेम असल्यामुळेच आणि त्याचं मन आनंदित करायची इच्छा असल्यामुळेच खरंतर मी या परिस्थितीत आहे. आणि त्यामुळे मी स्वतःबद्दल जास्त विचार करायचं सोडून दिलं.”

१०. यहोवाला आपण आपला खडक कसा बनवू शकतो?

१० येणाऱ्‍या दिवसांमध्ये आपल्यावर अशा परीक्षा येतील ज्यांमुळे आपल्याला कधी नव्हे इतकं यहोवावर विसंबून राहावं लागेल. या परीक्षांना विश्‍वासूपणे सहन करण्यासाठी आपल्याला ज्याची गरज आहे ते सगळं यहोवा आपल्याला पुरवेल अशी खातरी आपण ठेवू शकतो. आणि ही खातरी भक्कम करण्याची हीच वेळ आहे. मग आपण ते कसं करू शकतो? आपण बायबल काळातल्या देवाच्या विश्‍वासू सेवकांचे आणि अलिकडच्या काळातल्या भाऊबहिणींचे अनुभव वाचू शकतो. देवाने त्याच्या सेवकांना कसा आधार दिला ते आपण पाहू शकतो. तसंच या अहवालांवर आपण खोलवर विचार करू शकतो. असं करून आपण यहोवाला आपला  खडक बनवत असतो.

यहोवाच्या गुणांचं अनुकरण करा

११. आपण यहोवाच्या गुणांचं अनुकरण का केलं पाहिजे? (“ तरुण भावांसाठी एक ध्येय” ही चौकटसुद्धा पाहा.)

११ यहोवाला खडक का म्हटलंय ते आपण पाहिलं. आता आपण त्याला ज्या गुणांमुळे खडक म्हटलंय त्या गुणांचं अनुकरण कसं करू शकतो ते पाहू या. आपण हे जितकं चांगल्या प्रकारे करू, तितकंच मंडळीला आणखी भक्कम करण्यासाठी आपण तयार असू. उदाहरणार्थ, येशूने शिमोनला केफा (ग्रीकमध्ये “पेत्र”) नाव दिलं. याचा अर्थ “खडकाचा तुकडा” असा होतो. (योहा. १:४२) यावरून हे सूचित होणार होतं, की तो पुढे मंडळीतल्या भाऊबहिणींना सांत्वन देऊन त्यांचा विश्‍वास भक्कम करणार होता. मंडळीतल्या वडिलांचं वर्णनसुद्धा “मोठ्या खडकाची सावली” असं करण्यात आलंय. यावरून ते भाऊबहिणींना कसं संरक्षण देतात हे स्पष्ट होतं. (यश. ३२:२) साहजिकच जेव्हा भाऊबहीण यहोवाच्या गुणांचं अनुकरण करतात, तेव्हा मंडळीला नक्कीच फायदा होतो.​—इफिस. ५:१.

१२. आपण कोणकोणत्या मार्गांनी आपल्या भाऊबहिणींसाठी आश्रय बनू शकतो?

१२ आसरा व्हा.  जेव्हा एखादी नैसर्गिक विपत्ती येते, सामाजिक अशांतता निर्माण होते किंवा युद्धाचं वातावरण असतं, तेव्हा आपल्या भाऊबहिणींसाठी आपण शब्दशः आसरा होऊ शकतो. “शेवटच्या दिवसांत” परिस्थिती आणखीनच कठीण होत जाईल. आणि अशा वेळी एकमेकांना मदत करायच्या अनेक संधी आपल्याजवळ असतील यात शंका नाही. (२ तीम. ३:१) अशा परिस्थितीत आपण आपल्या भाऊबहिणींसाठी भावनिक आणि आध्यात्मिक रितीनेसुद्धा आश्रयस्थान होऊ शकतो. असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, राज्य सभागृहात जेव्हा आपले भाऊबहीण येतात तेव्हा आपण त्यांचं स्वागत करू शकतो आणि मंडळीच्या प्रेमळ आणि प्रोत्साहनदायक वातावरणाला टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावू शकतो. आपण सध्या अशा जगात जगत आहोत जिथे लोक एकमेकांना खूप कठोरतेने वागवतात. त्यामुळे आपल्या भाऊबहिणींना खूप तणावात असल्यासारखं वाटतं किंवा त्यांना खूप कठोरतेने वागवलं जात आहे असं वाटू शकतं. त्यामुळे जेव्हा आपले भाऊबहीण सभांना येतात, तेव्हा त्यांना प्रेम दाखवण्यासाठी किंवा त्यांना ताजंतवानं आणि सुरक्षित वाटावं म्हणून आपण होता होईल तितकं करायचा प्रयत्न करतो.

१३. वडील भाऊबहिणींसाठी आसरा कसा बनू शकतात? (चित्रसुद्धा पाहा.)

१३ खरोखरचं वादळ असो किंवा वादळासारखी परिस्थिती, मंडळीतले वडील भाऊबहिणींसाठी आश्रय बनू शकतात. जेव्हा नैसर्गिक विपत्ती येते किंवा तातडीची वैद्यकीय परिस्थीती निर्माण होते, तेव्हा वडील व्यावहारिक मदत पुरवण्यासाठी पुढाकार घेतात. आणि यासोबतच ते त्यांना आध्यात्मिक रितीने मदत देतात. एखादा वडील सौम्यतेने वागणारा, सहानुभूती दाखवणारा आहे आणि तो ऐकायला नेहमी तयार असतो हे जेव्हा भाऊबहीण ओळखतात तेव्हा ते आपोआपच संकोच न बाळगता त्याच्याकडे मदत मागायला येतात. वडील असे गुण दाखवतात तेव्हा कुणालातरी आपली काळजी आहे, याची भाऊबहिणींना जाणीव होते. आणि त्यामुळे वडील त्यांना जे बायबल आधारित मार्गदर्शन देत आहेत, त्याचं पालन करायला सोपं जातं.​—१ थेस्सलनी. २:७, ८, ११.

खरोखरचं वादळ येतं किंवा वादळासारखी परिस्थिती येते तेव्हा मंडळीतले वडील भाऊबहिणींसाठी आश्रय असतात (परिच्छेद १३ पाहा) a


१४. आपण भरवशालायक आहोत हे आपण कसं दाखवू शकतो?

१४ भरवशालायक व्हा.  इतरांनी आपल्यावर, खासकरून कठीण काळात भरवसा ठेवावा अशी आपली इच्छा आहे. (नीति. १७:१७) यासाठी आपण काय करू शकतो? आपण प्रत्येक वेळी यहोवाचे गुण दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे. जसं की, दिलेला शब्द पाळणं आणि वेळेच्या बाबतीत प्रामाणिक असण्याचा होता होईल तितका प्रयत्न करणं. (मत्त. ५:३७) तसंच, गरज असते तेव्हा आपण भाऊबहिणींना व्यावहारिक मदतसुद्धा पुरवू शकतो. शिवाय दिलेल्या सूचनांप्रमाणे आपण मंडळीच्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करत आहोत याचीसुद्धा आपण खातरी केली पाहिजे.

१५. वडील जेव्हा भरवशालायक असतात तेव्हा मंडळीला कसा फायदा होतो?

१५ वडील जेव्हा भरवशालायक असतात तेव्हा मंडळीला त्याचा फायदा होतो. कसा? प्रचारक जेव्हा वडिलांना, जसं की गट पर्यवेक्षकांना सहजपणे संपर्क करू शकतात, तेव्हा त्यांना आधार वाटतो. तसंच वडील आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतात, हे जेव्हा त्यांना कळतं, तेव्हा वडिलांना आपली काळजी आहे, या गोष्टीची त्यांना जाणीव होते. यासोबतच, वडील जेव्हा स्वतःच्या नाही तर बायबलच्या आणि विश्‍वासू दासाने पुरवलेल्या प्रकाशनांच्या आधारावर सल्ला देतात, तेव्हा प्रचारकांना विश्‍वास ठेवायला सोपं जातं. जेव्हा वडील प्रचारकांच्या खासगी गोष्टी गोपनीय ठेवतात आणि दिलेला शब्द पाळतात तेव्हा प्रचारकांना त्यांच्यावर भरवसा ठेवायला आणखी एक कारण मिळतं.

१६. आपण खंबीर आणि स्थिर असतो तेव्हा आपल्याला आणि इतरांना कसा फायदा होतो?

१६ खंबीर आणि स्थिर असा.  आपण जे योग्य आहे त्यासाठी ठाम राहिलो आणि बायबल तत्त्वांच्या आधारावर निर्णय घेतले, तर इतरांवर त्याचा चांगला प्रभाव होऊ शकतो. जसजसं आपण विश्‍वासात आणि अचूक ज्ञानात वाढत जाऊ, तसतसं सत्यात आपण आणखी खंबीर होत जाऊ. त्यामुळे खोट्या शिकवणींचा आणि जगाच्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव होणार नाही आणि आपण योग्य निर्णय घेऊ. (इफिस. ४:१४; याको. १:६-८) तसंच जेव्हा वाईट बातमी ऐकायला मिळते तेव्हा यहोवा आणि त्याच्या अभिवचनावर भरवसा असल्यामुळे आपल्याला शांत राहायला मदत होईल. (स्तो. ११२:७, ८) शिवाय संकटांचा सामना करणाऱ्‍यांनासुद्धा आपल्याला मदत करता येईल.​—१ थेस्सलनी. ३:२, ३.

१७. वडील मंडळीतल्या भाऊबहिणींना कशी मदत करतात?

१७ वडील संयमी, समंजस, सुव्यवस्थित आणि समजूतदार असतात. तसंच इतरांना शांत राहायला आणि देवावर मजबूत विश्‍वास ठेवायलाही ते इतरांना मदत करतात. यासोबतच ते “विश्‍वसनीय वचनाला धरून” मंडळीला भक्कम करायचा प्रयत्न करतात. (तीत १:९; १ तीम. ३:१-३) त्यांच्या उदाहरणातून आणि मेंढपाळ म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडून ते प्रचारकांना नियमितपणे सभेला, प्रचारकार्याला यायला आणि वैयक्‍तिक अभ्यास करायला मदत करतात. तसंच जेव्हा भाऊबहिणींच्या जीवनात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते, तेव्हा यहोवा आणि त्याच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करायचं प्रोत्साहन देऊन ते बरंच काही करू शकतात.

१८. आपल्याला यहोवाची स्तुती करावीशी आणि त्याच्या जवळ राहावंसं का वाटतं? (“ यहोवाच्या जवळ जाण्याचा एक मार्ग” ही चौकटसुद्धा पाहा.)

१८ यहोवाच्या अद्‌भुत गुणांवर विचार केल्यामुळे आपणसुद्धा दावीद राजासारखं म्हणू शकतो: “यहोवा माझा खडक आहे, त्याची स्तुती असो!” (स्तो. १४४:१) आपण नेहमी यहोवावर भरवसा ठेवू शकतो. आणि पुढे आयुष्यभर, मग आपण म्हातारे झालो तरी, तो नेहमी आपल्याला त्याच्या जवळ राहायला मदत करेल अशी खातरी ठेवू शकतो. आणि म्हणून आपणही म्हणू शकतो: तो “माझा  खडक आहे.”​—स्तो. ९२:१४, १५.

गीत १५० आपल्या तारणासाठी यहोवाला शोधा!

a चित्रांचं वर्णन: राज्य सभागृहात असताना एक बहीण वडिलांसोबत मोकळेपणाने बोलत आहे.