व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २३

गीत २८ यहोवा तुझे मित्र कोण?

यहोवा आपल्याला पाहुणे म्हणून बोलवतो

यहोवा आपल्याला पाहुणे म्हणून बोलवतो

“माझा तंबू त्यांच्यामध्ये असेल. मी त्यांचा देव होईन.”​—यहे. ३७:२७.

या लेखात:

यहोवा त्याच्या लाक्षणिक तंबूमध्ये आपल्याला त्याचे पाहुणे म्हणून जे आमंत्रण देतोय आणि तो ज्या प्रकारे आपली काळजी घेतोय, त्याबद्दल आपण आपली कदर कशी वाढवू शकतो, ते पाहा.

१-२. यहोवाने त्याच्या एकनिष्ठ सेवकांना कोणतं आमंत्रण दिलंय?

 यहोवा तुमच्यासाठी कोण आहे? तुम्ही कदाचित म्हणाल, ‘यहोवा माझा पिता आहे, तो मला माझ्या मित्रासारखा आहे, तो माझा देव आहे.’ कदाचित आणखी काही शब्दांनी तुम्ही यहोवासोबतच्या तुमच्या नात्याचं वर्णन कराल. यहोवाने त्याच्या तंबूत तुम्हाला पाहुणे म्हणून बोलवलंय, या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे कधी पाहिलंय का?

दावीद राजाने आपली तुलना यहोवाच्या पाहुण्यांसोबत आणि यहोवाची तुलना आपल्याला आमंत्रण देणाऱ्‍यासोबत केली आहे. त्याने म्हटलं: “हे यहोवा, तुझ्या तंबूत राहण्यासाठी तू कोणाचं स्वागत करशील? तुझ्या पवित्र पर्वतावर कोण राहू शकतं?” (स्तो. १५:१) या शब्दांवरून कळतं की आपण यहोवाचे पाहुणे बनू शकतो, म्हणजेच आपण त्याचे मित्र बनू शकतो. खरंच, यहोवाकडून मिळालेलं हे किती मोठं आमंत्रण आहे!

आपण यहोवाच्या तंबूत यावं अशी त्याची इच्छा आहे

३. यहोवाचा पहिला पाहुणा कोण होता, आणि त्या दोघांना एकमेकांबद्दल कसं वाटतं?

सर्वकाही निर्माण करण्याआधी यहोवा एकटाच होता. पण नंतर त्याने त्याच्या पहिल्या मुलाला निर्माण केलं. त्याने एक प्रकारे त्याच्या लाक्षणिक तंबूत आनंदाने त्याच्या पहिल्या पाहुण्याचं स्वागत केलं. बायबल म्हणतं की यहोवाला त्याचा मुलगा “खूप प्रिय वाटू” लागला. आणि त्याचा पहिला पाहुणाही नेहमी “त्याच्यासमोर आनंदी” असायचा.​—नीति. ८:३०.

४. यहोवाने नंतर आणखी कोणाला त्याच्या तंबूत बोलवलं?

त्यानंतर यहोवाने स्वर्गदूतांना निर्माण केलं. आणि त्यांनासुद्धा त्याचे पाहुणे म्हणून बोलवलं. बायबलमध्ये त्यांना ‘देवाची मुलं’ म्हटलंय. ते यहोवासोबत आनंदी आहेत, असंही म्हटलंय. (ईयो. ३८:७; दानी. ७:१०) बऱ्‍याच वर्षांपर्यंत फक्‍त स्वर्गात राहणारेच यहोवाचे पाहुणे होते. पण नंतर त्याने माणसांनाही त्याच्या तंबूत बोलवलं. त्या तंबूत हनोख, नोहा, अब्राहाम आणि ईयोबसुद्धा होते. या विश्‍वासू सेवकांचं वर्णन देवाचे मित्र किंवा ‘खऱ्‍या देवासोबत चालणारे’ म्हणूनसुद्धा करण्यात आलंय.​—उत्प. ५:२४; ६:९; ईयो. २९:४; यश. ४१:८.

५. यहेज्केल ३७:२६, २७ मधल्या भविष्यवाणीवरून आपल्याला काय समजतं?

बऱ्‍याच शतकांपासून यहोवा त्याच्या मित्रांना त्याच्या तंबूत यायचं आमंत्रण देत आलाय. (यहेज्केल ३७:२६, २७ वाचा.) उदाहरणार्थ, यहेज्केलच्या भविष्यवाणीवरून कळतं की यहोवाच्या सेवकांनी त्याच्यासोबत जवळचं नातं जोडावं अशी त्याची मनापासून इच्छा आहे. तो “त्यांच्यासोबत शांतीचा एक करार” करण्याचं वचन देतो. तसंच यहेज्केलची भविष्यवाणी अशा एका काळाबद्दल सांगते जेव्हा स्वर्गाची आणि पृथ्वीची आशा असणाऱ्‍यांना “एक कळप” म्हणून त्याच्या लाक्षणिक तंबूत एकत्र केलं जाईल. (योहा. १०:१६) आणि आत्ता ती वेळ आहे!

आपण कुठेही असलो तरी यहोवाला आपली काळजी आहे

६. यहोवाच्या तंबूत पाहुणे बनण्यासाठी काय करावं लागेल आणि यहोवाचा तंबू कुठे आहे?

बायबल काळात, तंबू एका व्यक्‍तीचं आराम करायचं आणि ऊन-वाऱ्‍यापासून सुरक्षित राहायचं ठिकाण होतं. या तंबूमध्ये यायचं आमंत्रण देणारा आपली चांगली काळजी घेईल असं आलेला पाहुणा अपेक्षा करायचा. जेव्हा आपण समर्पण करतो, तेव्हा आपण यहोवाच्या तंबूत त्याचे पाहुणे म्हणून येत असतो. (स्तो. ६१:४) या तंबूमध्ये आपण भरपूर प्रमाणात मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नाचा फायदा घेऊ शकतो. इतकंच नाही तर आपण यहोवाच्या इतर पाहुण्यांसोबतही मैत्रीचा आनंद घेऊ शकतो. यहोवाचा हा लाक्षणिक तंबू एखाद्या विशिष्ट ठिकाणीच नाही, तर तो सगळ्या देशांमध्ये आहे. त्यामुळे कदाचित तुम्ही दुसऱ्‍या ठिकाणी किंवा दुसऱ्‍या देशात तिथल्या खास अधिवेशनासाठी गेला असाल, तर यहोवाच्या तंबूत पाहुणे म्हणून आलेल्या इतर भाऊबहिणींनासुद्धा तुम्ही भेटला असाल. यावरून म्हणता येईल की जिथे-जिथे यहोवाचे आज्ञाधारक उपासक आहेत तिथे-तिथे हा लाक्षणिक तंबू असतो.​—प्रकटी. २१:३.

७. मृत्यू झालेले यहोवाचे विश्‍वासू सेवक अजूनही यहोवाच्या तंबूत त्याचे पाहुणे आहेत असं का म्हणता येईल? (चित्रसुद्धा पाहा.)

पण यहोवाच्या ज्या विश्‍वासू सेवकांचा मृत्यू झालाय, त्यांच्याबद्दल काय? ते अजूनही यहोवाच्या तंबूत त्याचे पाहुणे आहेत असं म्हणता येईल का? हो नक्कीच म्हणता येईल! कारण ते अजूनही यहोवाच्या आठवणीत जिवंत आहेत. येशूने म्हटलं: “मेलेल्यांना पुन्हा उठवलं जाईल याबद्दल मोशेनेही झुडपाच्या अहवालात सांगितलं होतं. तिथे त्याने यहोवाला, ‘अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव’ म्हटलं. तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. कारण त्याच्या दृष्टीने ते सगळे जिवंतच आहेत.”​—लूक २०:३७, ३८.

मृत्यू झालेले यहोवाचे विश्‍वासू सेवकसुद्धा त्याच्या तंबूत पाहुणे आहेत असं आपण म्हणू शकतो (परिच्छेद ७ पाहा)


आशीर्वादांसोबत जबाबदाऱ्‍यापण

८. यहोवाच्या तंबूत असल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

जसं खरोखरच्या तंबूत आराम करता येतो आणि ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण मिळतं, त्याचप्रमाणे यहोवाच्या तंबूमुळे त्याच्या पाहुण्यांना आध्यात्मिक धोक्यांपासून संरक्षण मिळतं आणि आशाही मिळते. आपण जेव्हा यहोवाच्या जवळ जातो, तेव्हा सैतान कधीच आपलं कायमचं नुकसान करू शकणार नाही. (स्तो. ३१:२३; १ योहा. ३:८) नवीन जगात यहोवा त्याच्या विश्‍वासू मित्रांचं फक्‍त आध्यात्मिक धोक्यांपासूनच संरक्षण करणार नाही, तर मृत्यूपासूनसुद्धा संरक्षण करेल.​—प्रकटी. २१:४.

९. तंबूतल्या पाहुण्यांनी कसं वागावं अशी यहोवाची इच्छा आहे?

यहोवाच्या तंबूत त्याचे पाहुणे म्हणून राहणं हा खरंच एक बहुमान आहे. त्यामुळे आपण त्याच्यासोबत एक कायमचं व्यक्‍तिगत नातं अनुभवत असतो. पण आपल्याला यहोवाचे पाहुणे म्हणून राहायचंय तर आपण काय केलं पाहिजे? जर आपल्याला कोणी त्यांच्या घरी बोलवलं, तर आपण त्यांना बरं वाटेल अशाच प्रकारे वागायचा प्रयत्न करू. उदाहरणार्थ, कदाचित त्यांची इच्छा असेल की आपण चपला बाहेर काढून घरात यावं, तर आपणही तसंच करू. त्याचप्रमाणे यहोवाच्या तंबूत आपल्याला त्याचे पाहुणे म्हणून राहायचं असेल तर आपल्यालासुद्धा त्याच्या अपेक्षा माहीत असल्या पाहिजेत. यहोवावर प्रेम असल्यामुळेच आपण “त्याला पूर्णपणे संतुष्ट” करायचा प्रयत्न करू. (कलस्सै. १:१०) हे खरंय की यहोवा आपला मित्र आहे, पण त्यासोबतच तो आपला देव आणि पितासुद्धा आहे हे आपण कधीच विसरत नाही. त्यामुळे आपल्या मनात त्याच्याबद्दल गाढ आदर असला पाहिजे. (स्तो. २५:१४) त्याच्याबद्दल आपल्या मनात अशी भावना असल्यामुळे त्याचं मन दुखावेल अशी कोणतीही गोष्ट आपण करणार नाही. उलट, आपण त्याच्यासोबत “नम्रपणे चालत” राहायचाच प्रयत्न करू.​—मीखा ६:८.

यहोवाने इस्राएली लोकांसोबत भेदभाव केला नाही

१०-११. यहोवा त्याच्या कोणत्याही पाहुण्यासोबत भेदभाव करत नाही हे कोणत्या उदाहरणातून कळतं?

१० यहोवा त्याच्या कोणत्याही पाहुण्याबरोबर भेदभाव करत नाही. (रोम. २:११) याचं एक उदाहरण म्हणजे सीनायच्या ओसाड रानात तो इस्राएली लोकांसोबत ज्या प्रकारे वागला.

११ इजिप्तच्या गुलामगिरीतून आपल्या लोकांना सोडवल्यानंतर यहोवाने उपासना मंडपात म्हणजे त्याच्या पवित्र तंबूत सेवा करण्यासाठी याजकांना नेमलं. आणि इतर कामं करायला त्याने लेव्यांना नेमलं. मग जे उपासना मंडपात सेवा करत होते किंवा जे त्याच्या जवळ राहत होते त्यांची यहोवा इतरांपेक्षा जास्त काळजी घेत होता का? नाही. त्याने सगळ्यांची सारखीच काळजी घेतली. कारण तो भेदभाव करत नाही.

१२. यहोवा ओसाड रानात इस्राएली लोकांशी जसा वागला त्यावरून तो भेदभाव करत नाही हे कसं दिसून येतं? (निर्गम ४०:३८) (चित्रसुद्धा पाहा.)

१२ प्रत्येक इस्राएली व्यक्‍ती यहोवाचा जवळचा मित्र बनू शकत होता, मग तो उपासना मंडपात सेवा करत असो किंवा नसो किंवा तो उपासना मंडपाच्या जवळ राहत असो किंवा नसो. उदाहरणार्थ, यहोवाने जेव्हा उपासना मंडपावर ढगाचा खांब आणि आगीचा खांब उभा केला, तेव्हा तो संपूर्ण राष्ट्राला  दिसेल असा होता. (निर्गम ४०:३८ वाचा.) तो ढग जेव्हा दिशा बदलायचा तेव्हा उपासना मंडपापासून दूर राहत असलेल्या लोकांनासुद्धा दिसायचा. मग ते बघून लोक आपलं सामानसुमान बांधून इतर लोकांसोबत तिथून निघायचे. (गण. ९:१५-२३) चांदीच्या दोन कर्ण्यांचा मोठा आवाज सगळ्यांनाच ऐकू जायचा आणि मग ते तिथून आपला तळ हालवायचे. (गण. १०:२) यावरून कळतं, की जर एखादी व्यक्‍ती उपासना मंडपाच्या जवळ राहत असेल तर तिचं यहोवासोबत चांगलं नातं आहे असं नव्हतं. उलट, यहोवाने स्थापित केलेल्या राष्ट्रात कोणीही त्याचे पाहुणे म्हणून येऊ शकत होतं, तसंच तो आपल्याला मार्गदर्शन देईल आणि सुरक्षित ठेवेल याची खातरी ठेवू शकत होतं. त्याचप्रमाणे आजही, आपण जगाच्या पाठीवर कुठेही राहत असलो तरी यहोवा आपल्यावर प्रेम करेल, आपली काळजी घेईल आणि आपल्याला सुरक्षित ठेवेल.

देवाने उपासना मंडपाची जी व्यवस्था केली होती, त्यावरून तो भेदभाव करत नाही हे दिसून येतं (परिच्छेद १२ पाहा)


यहोवा आजही भेदभाव करत नाही

१३. यहोवा आजही भेदभाव करत नाही असं आपण का म्हणून शकतो?

१३ देवाच्या लोकांपैकी काही जण यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयाच्या किंवा शाखा कार्यालयाच्या शेजारी राहतात. काही जण तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी सेवा करतात. त्यामुळे तिथे चाललेल्या बऱ्‍याच कामांमध्ये त्यांना सहभाग घेता येतो. आणि खासकरून जे पुढाकार घेतात, त्यांच्यासोबत मिळून काम करता येतं. तसंच, काही जण प्रवासी कार्यात सेवा करत आहेत. तर काही जण इतर प्रकारच्या खास पूर्णवेळेच्या सेवेत आहेत. पण असे बरेच जण आहेत जे सध्या अशा प्रकारच्या सेवेत सहभाग घेऊ शकत नाहीत. तुम्ही जर त्यांच्यापैकीच एक असाल, तर तुम्ही या गोष्टीची खातरी बाळगू शकता, की तुम्ही अजूनही यहोवाचे पाहुणे आहात आणि त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. तसंच, तो त्याच्या सगळ्याच  सेवकांची वैयक्‍तिक रित्या काळजी घेतो. (१ पेत्र ५:७) यहोवा त्याच्या सगळ्याच सेवकांना आध्यात्मिक भरणपोषण, मार्गदर्शन आणि हवं असलेलं संरक्षण पुरवतो.

१४. यहोवा भेदभाव करत नाही याचं आणखी एक उदाहरण कोणतं?

१४ यहोवा भेदभाव करत नाही, याचं आणखी एक उदाहरण म्हणजे त्याने आज जगभरातल्या सगळ्या लोकांसाठी बायबल उपलब्ध करून दिलंय. पवित्र शास्त्र मुळात तीन भाषांमध्ये लिहिण्यात आलं होतं: हिब्रू, ॲरामेईक आणि ग्रीक. मग इतर लोकांच्या तुलनेत बायबलच्या या तीन भाषा ज्यांना वाचता येत होत्या त्यांचं यहोवासोबत जास्त जवळचं नातं होतं का? नाही, तसं नव्हतं.​—मत्त. ११:२५.

१५. आणखी कोणत्या गोष्टीमुळे यहोवा भेदभाव करत नाही हे दिसून येतं? (चित्रसुद्धा पाहा.)

१५ आपल्याला बायबलच्या मूळ भाषा येतात की नाही किंवा आपलं शिक्षण किती झालंय या गोष्टींच्या आधारावर यहोवा आपल्याला त्याच्या तंबूत पाहुणे म्हणून बोलवत नाही. तसंच, तो फक्‍त जास्त शिक्षण झालेल्या लोकांना त्याच्या वचनात असलेला सल्ला आणि मार्गदर्शन देत नाही. उलट तो जगभरातल्या सगळ्या लोकांना त्याची बुद्धी देतो. मग त्यांचं जास्त शिक्षण झालेलं असो किंवा नसो. त्याच्या प्रेरित वचनाचं, बायबलचं आज हजारो भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलंय. त्यामुळे जगभरातल्या सगळ्या लोकांना त्याच्या शिकवणींचा फायदा घेता येतो आणि त्याच्यासोबत मैत्री कशी करता येईल, हे शिकून घेता येतं.​—२ तीम. ३:१६, १७.

बायबल खूपसाऱ्‍या भाषांमध्ये उपलब्ध आहे यावरून देव भेदभाव करत नाही हे कसं कळतं? (परिच्छेद १५ पाहा)


यहोवाने आपला “स्वीकार” करावा असं वागा

१६. प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५ प्रमाणे यहोवाने आपल्याला स्वीकारावं म्हणून आपण काय करू शकतो?

१६ यहोवा त्याच्या लाक्षणिक तंबूत पाहुणे म्हणून आपलं स्वागत करतो, हा खरंच आपल्यासाठी खूप मोठा बहुमान आहे! त्याच्यासारखा दयाळू आणि प्रेमळ कोणीच नाही. इतकंच नाही, तर आपण कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारे तो आपला पाहुणचार करतो. यासोबतच तो भेदभाव करत नाही. आपलं ठिकाण, आपली पार्श्‍वभूमी, शिक्षण, वंश, समाज, वय काहीही असो किंवा मग आपण स्त्री किंवा पुरुष असो, तो कोणताही भेदभाव न करता आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पण तो फक्‍त अशा लोकांनाच आपल्या तंबूत पाहुणे म्हणून बोलवतो, जे त्याच्या स्तरांनुसार जगतात.​—प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५ वाचा.

१७. यहोवाच्या तंबूत पाहुणे म्हणून राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दल जास्त माहिती आपल्याला कुठे मिळेल?

१७ स्तोत्र १५:१ मध्ये दावीद म्हणतो: “हे यहोवा, तुझ्या तंबूत राहण्यासाठी तू कोणाचं स्वागत करशील? तुझ्या पवित्र पर्वतावर कोण राहू शकतं?” १५ व्या स्तोत्रात यहोवाने दावीदचा वापर करून या प्रश्‍नांची उत्तरं दिली आहेत. यहोवाने आपल्याला स्वीकारावं असं वागण्यासाठी आपण कोणत्या काही विशिष्ट गोष्टी करू शकतो याबद्दल पुढच्या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

गीत ३२ यहोवाला इमानी राहा!