अभ्यास लेख २५
गीत ७ यहोवा आमचं बळ
यहोवा “जिवंत देव” आहे हे विसरू नका!
“यहोवा जिवंत देव आहे!”—स्तो. १८:४६.
या लेखात:
आपण ज्या देवाची उपासना करतो तो “जिवंत देव” आहे हे लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो ते पाहा.
१. समस्यांचा सामना करावा लागत असताना यहोवाच्या लोकांना त्याची उपासना करत राहायला कोणत्या गोष्टीमुळे मदत होते?
बायबल सांगतं, की आपण खूप कठीण काळात जगत आहोत. (२ तीम. ३:१) यहोवाच्या लोकांना जगातल्या लोकांसारख्या समस्या तर आहेतच, पण त्यासोबतच त्यांना विरोधाचा आणि छळाचासुद्धा सामना करावा लागतो. मग समस्या असतानाही यहोवाची उपासना करत राहायला कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होते? एका महत्त्वाच्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होते. ती म्हणजे, आपण यहोवाची मदत अनुभवली आहे आणि तो “जिवंत देव” आहे हे आपण ओळखलंय.—यिर्म. १०:१०; २ तीम. १:१२.
२. यहोवा कोणत्या अर्थाने एक जिवंत देव आहे?
२ यहोवा एक अशी खरीखुरी व्यक्ती आहे, जी आपल्याला परीक्षांमध्ये टिकून राहायला मदत करते आणि ती नेहमी आपल्या पाठीशी असते. (२ इति. १६:९; स्तो. २३:४) यहोवाकडे एक जिवंत देव म्हणून बघितल्यामुळे आपल्यासमोर येणाऱ्या कोणत्याही परीक्षेचा आपण यशस्वीपणे सामना करू शकतो. दावीद राजाच्या बाबतीत ही गोष्ट कशी खरी होती, याचा विचार करा.
३. “यहोवा जिवंत देव आहे!” असं जेव्हा दावीदने म्हटलं तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं?
३ दावीद यहोवाला ओळखत होता आणि तो त्याच्यावर विसंबून होता. जेव्हा शौल राजा आणि त्याचे इतर शत्रू त्याचा पाठलाग करत होते तेव्हा दावीदने मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली. (स्तो. १८:६) देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्यावर आणि त्याला सोडवल्यावर दावीद म्हणाला: “यहोवा जिवंत देव आहे!” (स्तो. १८:४६) दावीद जेव्हा हे म्हणाला तेव्हा त्याला फक्त एवढंच म्हणायचं नव्हतं की देव अस्तित्वात आहे. एका संदर्भानुसार यहोवा “आपल्या लोकांसाठी सतत कार्य करणारा जिवंत देव आहे” असा भरवसा दावीद इथे व्यक्त करत होता. खरंच, आपल्या वैयक्तिक अनुभवावरून दावीदला हे माहीत होतं की देव जिवंत आहे. आणि या खातरीमुळे त्याची उपासना आणि स्तुती करायचा त्याचा निश्चय आणखी भक्कम झाला.—स्तो. १८:२८, २९, ४९.
४. यहोवा एक जिवंत देव आहे हे लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला कसा फायदा होईल?
४ यहोवा एक जिवंत देव आहे याची खातरी असल्यामुळे आपल्याला आवेशाने त्याची सेवा करत राहायला मदत होऊ शकते. त्यामुळे परीक्षांना तोंड द्यायची ताकद आणि मेहनतीने त्याची सेवा करत राहायची प्रेरणा आपल्याला मिळेल. तसंच त्याच्या जवळ राहायचा आपला निश्चयही पक्का होईल.
जिवंत देव तुम्हाला ताकद देईल
५. आपण यशस्वीपणे परीक्षांचा सामना करू शकतो याची खातरी आपल्याला कुठून मिळू शकते? (फिलिप्पैकर ४:१३)
५ यहोवा जिवंत देव आहे आणि तो आपल्याला टिकून राहायला मदत करेल, हे लक्षात ठेवल्यामुळे छोट्यामोठ्या अशा कोणत्याही परीक्षांचा आपल्याला सामना करता येईल. कारण शेवटी आपल्याला सहन करावी लागणारी कुठलीही समस्या त्याच्यासमोर अगदी किरकोळ आहे. कारण तो सर्वशक्तिमान देव आहे आणि तो आपल्याला सहन करायची शक्ती देऊ शकतो. (फिलिप्पैकर ४:१३ वाचा.) त्यामुळे आपल्यासमोर येणाऱ्या कुठल्याही परीक्षेचा आपण पूर्ण भरवशाने सामना करू शकतो. छोट्या परीक्षांमध्ये यहोवा आपल्यासोबत आहे हे अनुभवल्यामुळे मोठ्या परीक्षांमध्येही तो आपल्याला मदत करेल याची आपल्याला खातरी मिळते.
६. तरुणपणी दावीदला आलेल्या कोणत्या अनुभवांमुळे यहोवावारचा त्याचा भरवसा वाढला?
६ दावीदच्या अशा दोन वैयक्तिक अनुभवांचा विचार करा, ज्यांमुळे यहोवावरचा त्याचा भरवसा वाढला. तरुण असताना जेव्हा तो एक मेंढपाळ म्हणून काम करत होता, तेव्हा एकदा अस्वलाने आणि एकदा सिंहाने त्याच्या वडिलांची मेंढरं नेली. या दोन्ही घटनांमध्ये, दावीदने धाडसाने या जनावरांचा पाठलाग केला आणि त्यांच्या तावडीतून मेंढरं सोडवली. तरी या धाडसी कामाचं श्रेय दावीदने स्वतःकडे घेतलं नाही. कारण त्याला माहीत होतं, की या सगळ्यांमागे यहोवा होता. (१ शमु. १७:३४-३७) दावीद त्याला आलेले हे अनुभव कधीच विसरला नाही. या दोन्ही घटनांवर विचार करत राहिल्यामुळे, जिवंत देव यहोवा त्याला पुढेही बळ देईल हा भरवसा त्याला होता.
७. दावीदचं कोणत्या गोष्टीवर लक्ष होतं आणि त्यामुळे त्याला गल्याथचा सामना करता आला असं का म्हणता येईल?
७ नंतर, दावीद तरुणच होता, तेव्हा तो इस्राएलच्या सैन्याच्या छावणीत गेला. त्याने पाहिलं की सैनिक खूप घाबरले होते, कारण गल्याथ नावाचा एक महाकाय पलिष्टी “इस्राएलच्या सैन्याला आव्हान” देत होता. (१ शमु. १७:१०, ११) आपल्यासमोर असलेल्या या महाकाय गल्याथवर आणि त्याच्या आव्हानांवर सैनिकांचं लक्ष होतं. त्यामुळे सैनिक खूप घाबरून गेले होते. (१ शमु. १७:२४, २५) पण दावीद मात्र या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत होता. जे काही चाललंय ते इस्राएलच्या सैन्याच्या विरोधात नाही, तर ‘जिवंत देवाच्या सैन्याच्या’ विरोधात चाललंय, या दृष्टिकोनातून तो त्याकडे पाहत होता. (१ शमु. १७:२६) दावीद त्या गल्याथचा नाही तर यहोवाचा विचार करत होता. मेंढपाळ असताना ज्या देवाने त्याला मदत केली, तो आताही त्याला मदत करेल असा भरवसा त्याला होता. देवाच्या पाठिंब्यामुळेच दावीद गल्याथचा सामना करू शकला आणि साहजिकच तो जिंकला!—१ शमु. १७:४५-५१.
८. कठीण परीक्षांमध्ये यहोवा आपल्याला मदत करेल असा भरवसा आपण कसा वाढवू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
८ जिवंत देव आपल्याला मदत करायला तयार आहे, हे लक्षात ठेवल्यामुळे आपणही यशस्वीपणे परीक्षांचा सामना करू शकतो. (स्तो. ११८:६) त्याने पूर्वी आपल्याला कशी मदत केली आहे याच्यावर विचार केल्यामुळे तो आताही आपल्याला मदत करेल असा भरवसा आपण वाढवू शकतो. यासाठी तुम्ही यहोवाने आपल्या सेवकांना कसं वाचवलं याची आठवण करून देणारे बायबलमधले अहवाल वाचू शकता. (यश. ३७:१७, ३३-३७) तसंच, अलीकडच्या काळात यहोवाने आपल्या भाऊबहिणींना कशी मदत केली याची माहिती तुम्ही jw.org वर वाचू शकता किंवा पाहू शकता. शिवाय यहोवाने तुम्हाला कशी मदत केली आहे तेही आठवा. तुमच्या आयुष्यात दावीदप्रमाणे सिंहाशी किंवा अस्वलाशी लढण्यासारखे भयंकर अनुभव आले नसतील, पण यहोवाने नक्कीच तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या असतील. जसं की, त्याने तुम्हाला मैत्रीचा हात दिला. (योहा. ६:४४) अगदी आजसुद्धा तुम्ही त्याच्या मदतीमुळेच सत्यात आहात. तसंच यहोवाने तुमच्या प्रार्थनांचीसुद्धा उत्तरं दिली असतील, अगदी योग्य वेळेला तुम्हाला मदत केली असेल किंवा कठीण परिस्थितीत टिकून राहायला तुम्हाला शक्ती दिली असेल. या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आठवण व्हावी म्हणून त्याला प्रार्थना करा. यांसारख्या अनुभवांवर विचार केल्यामुळे यहोवा पुढेही तुम्हाला मदत करत राहील हा तुमचा भरवसा आणखी मजबूत होईल.
९. परीक्षांचा सामना करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? (नीतिवचनं २७:११)
९ यहोवाकडे एक जिवंत व्यक्ती म्हणून पाहिल्यामुळे आपल्याला आपल्या परीक्षांकडे योग्य दृष्टिकोनातून बघायला मदत होते. ते कसं? कारण त्यामुळे आपल्या परीक्षा यहोवा आणि सैतानामध्ये असलेल्या एका मोठ्या वादाचा भाग आहेत, या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे बघू. सैतान असा दावा करतो, की जेव्हा आपल्यावर संकटं येतात तेव्हा आपण यहोवाला सोडून देऊ. (ईयो. १:१०, ११; नीतिवचनं २७:११ वाचा.) पण जेव्हा आपण परीक्षांचा यशस्वीपणे सामना करतो तेव्हा आपण यहोवावर प्रेम असल्याचं दाखवत असतो आणि हे सिद्ध करत असतो की सैतान खोटा आहे. तुम्हाला सरकारकडून विरोध होतोय का? आर्थिक अडचणी आहेत का? प्रचारात लोक तुमचं ऐकत नाहीत का? किंवा तुम्हाला यांसारख्या इतर कुठल्या समस्या आहेत का? जर असतील तर हे लक्षात ठेवा, की तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला यहोवाचं मन आनंदित करायची संधी मिळत आहे. हेही लक्षात ठेवा, की यहोवा तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त परीक्षा तुमच्यावर कधीच येऊ देणार नाही. (१ करिंथ. १०:१३) उलट, ते सहन करायची ताकद तो तुम्हाला देईल.
जिवंत देव तुम्हाला प्रतिफळ देईल
१०. जिवंत देव यहोवा त्याच्या उपासकांसाठी काय करेल?
१० यहोवा त्याची उपासना करणाऱ्यांना प्रतिफळ देतो. (इब्री ११:६) तो सध्या आपल्याला शांतीने आणि समाधानाने जीवन जगायला मदत करतोय. पण त्यासोबतच तो भविष्यात आपल्याला सर्वकाळाचं जीवनही देईल. आपण त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो, की आपल्याला प्रतिफळ द्यायची त्याची इच्छा आहे आणि तशी ताकदही आहे. याच खातरीमुळे आपल्याला प्राचीन काळातल्या त्याच्या विश्वासू सेवकांप्रमाणेच त्याच्या सेवेत व्यस्त राहायची प्रेरणा मिळते. या बाबतीत पहिल्या शतकातल्या तीमथ्यचं उदाहरण घेता येईल.—इब्री ६:१०-१२.
११. तीमथ्यला कशामुळे मंडळीत मेहनत घ्यायची प्रेरणा मिळाली? (१ तीमथ्य ४:१०)
११ १ तीमथ्य ४:१० वाचा. तीमथ्यला जिवंत देवावर पूर्ण भरवासा होता. म्हणूनच इतरांसाठी आणि यहोवासाठी मेहनत करायला तो तयार होता. हे त्याने कसं केलं? प्रेषित पौलने त्याला प्रचारात आणि मंडळीत एक चांगला शिक्षक बनण्याचं प्रोत्साहन दिलं. त्यासोबतच त्याला तरुण आणि वृद्ध अशा सगळ्या भाऊबहिणींसमोर एक चांगलं उदाहरण मांडायचं होतं. शिवाय त्याला काही कठीण नेमणुकाही देण्यात आल्या होत्या. यामध्ये गरज असलेल्यांना अगदी ठाम शब्दांत पण प्रेमळपणे सल्ला देणंही सामील होतं. (१ तीम. ४:११-१६; २ तीम. ४:१-५) तीमथ्यला याची खातरी होती, की आपण केलेली चांगली कामं कोणाच्या लक्षात आली नाहीत किंवा त्यासाठी कोणी आपली प्रशंसा केली नाही, तरी यहोवा मात्र आपल्याला नक्कीच प्रतिफळ देईल.—रोम. २:६, ७.
१२. आपल्या कामांत व्यस्त राहायला वडिलांना कोणत्या गोष्टींमुळे प्रेरणा मिळते? (चित्रसुद्धा पाहा.)
१२ आज मंडळीतले वडीलसुद्धा याची खातरी ठेवू शकतात, की यहोवा त्यांची चांगली कामं पाहतो आणि त्याची कदर करतो. वडील मंडळीत मेंढपाळ म्हणून काम करतात, मंडळीला शिकवतात आणि प्रचारकार्य करतात. पण ही सगळी कामं करण्यासोबतच बरेच वडील बांधकाम विभागात आणि नैसर्गिक विपत्ती मदतकार्यातसुद्धा काम करतात. इतर काही वडील रुग्ण भेट गट किंवा हॉस्पिटल संपर्क समितीमध्ये सेवा करतात. अशा कामांत भाग घेणारे वडील मंडळीला मानवांनी बनवलेली संस्था म्हणून नाही, तर यहोवाने घालून दिलेली व्यवस्था म्हणून पाहतात. आणि त्यामुळे त्यांची नेमणूक ते पूर्ण मनाने पार पाडतात आणि असा भरवसा ठेवतात, की ते जे काही करत आहेत त्याचं प्रतिफळ यहोवा त्यांना नक्की देईल.—कलस्सै. ३:२३, २४.
१३. यहोवाची सेवा करण्यासाठी आपण जी मेहनत घेतो त्याबद्दल त्याला कसं वाटतं?
१३ आपण सगळेच वडील म्हणून सेवा करू शकत नाही. पण आपल्या प्रत्येकाकडे यहोवाला देण्यासाठी काही ना काही आहे. जेव्हा आपण त्याची सेवा करण्यासाठी आपल्या परीने सगळ्यात चांगलं ते करायचा प्रयत्न करतो, तेव्हा तो त्याची कदर करतो. जगभरातल्या कामासाठी आपण देत असलेलं दान कितीही कमी असलं, तरी यहोवासाठी ते महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपल्या लाजाळू स्वभावावर मात करून सभांमध्ये उत्तर देण्यासाठी हात वर करतो, तेव्हा त्याला आनंद होतो. तसंच, आपल्या भाऊबहिणींच्या चुकांकडे दुर्लक्ष करून आपण जेव्हा त्यांना क्षमा करतो, तेव्हा तो खूप खूश होतो. शिवाय, तुम्हाला जर असं वाटत असेल, की आपल्याला हवंय तितकं करता येत नाही तर हे लक्षात ठेवा की तुम्ही जे काही करताय ते यहोवासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तो तुमच्यावर प्रेम करतो. तो नक्कीच तुम्हाला त्याचं प्रतिफळ देईल.—लूक २१:१-४.
जिवंत देवाच्या जवळ राहा
१४. यहोवाच्या जवळ राहिल्यामुळे त्याला विश्वासू राहायला आपल्याला कशी मदत होईल? (चित्रसुद्धा पाहा.)
१४ जर यहोवा आपल्यासाठी खरा असेल, तर त्याला विश्वासू राहायला आपल्याला सोपं जाईल. योसेफच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरली. त्याने अनैतिक काम करायला ठामपणे नकार दिला. देव त्याच्यासाठी खरा होता आणि तो नाराज होईल अशी कोणतीच गोष्ट त्याला करायची नव्हती. (उत्प. ३९:९) यहोवा आपल्यासाठीही एक खरीखुरी व्यक्ती असावी म्हणून आपण त्याला प्रार्थना करण्यासाठी आणि बायबलचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. असं केल्यामुळे त्याच्यासोबतची आपली मैत्री वाढत जाईल. योसेफप्रमाणे जर आपलंही यहोवासोबत एक जवळंच नातं असेल, तर तो नाराज होईल अशी कोणतीच गोष्ट आपल्याला करावीशी वाटणार नाही.—याको. ४:८.
१५. ओसाड रानात इस्राएली लोकांसोबत जे घडलं त्यावरून आपण काय शिकू शकतो? (इब्री लोकांना ३:१२)
१५ यहोवा एक जिवंत देव आहे, ही गोष्ट जे लोक विसरतात ते त्याच्यापासून सहज दूर जातात. ओसाड रानात असताना इस्राएली लोक कसं वागले त्याचा विचार करा. यहोवा खरंच आहे, हे त्यांना माहीत होतं. पण त्यांना अशी शंका वाटू लागली, की यहोवा खरंच आपल्या गरजा पुरवेल का? त्यांनी तर इथपर्यंत मजल मारली की ते म्हणाले, “यहोवा खरंच आपल्यामध्ये आहे का?” (निर्ग. १७:२, ७) नंतर त्यांनी बंड केलं. नक्कीच आज्ञा न मानणारी त्यांची मनोवृत्ती आपल्यासाठी एक इशारा आहे. आणि त्यांच्या अशा उदाहरणाचं आपल्याला नक्कीच अनुकरण करायचं नाही आहे.—इब्री लोकांना ३:१२ वाचा.
१६. कोणत्या गोष्टीमुळे आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते?
१६ या जगात यहोवासोबत एक जवळचं नातं टिकवून ठेवणं खूप कठीण आहे. कारण देव अस्तित्वात आहे, ही कल्पनाच अनेक जण नाकारतात. सहसा जे लोक देवाच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करतात त्यांचीच भरभराट होताना आपल्याला दिसते. आणि जेव्हा आपण हे पाहतो तेव्हा आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते. देव अस्तित्त्वात आहे, ही गोष्ट आपण नाकारत नसलो, तरी ‘तो आपल्यावतीने कार्य करेल का?’ अशी शंका आपल्या मनात येऊ शकते. ७३ व्या स्तोत्राच्या लेखकालाही असंच काहीसं वाटलं. त्याने पाहिलं, की त्याच्या काळातले लोक देवाच्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि तरी जीवनाचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे देवाची सेवा करणं खरंच गरजेचं आहे का, अशी शंका त्याच्या मनात आली.—स्तो. ७३:११-१३.
१७. यहोवाच्या जवळ राहायला कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होईल?
१७ शेवटी स्तोत्रकर्त्याचा दृष्टिकोन सुधारायला त्याला कशामुळे मदत झाली? जे यहोवाला विसरून जातात त्यांचं काय होईल, यावर त्याने मनन केलं. (स्तो. ७३:१८, १९, २७) तसंच, देवाची सेवा केल्यामुळे काय फायदे होतात याचाही त्याने विचार केला. (स्तो. ७३:२४) आपणसुद्धा यहोवाने दिलेल्या आशीर्वादांवर विचार करू शकतो. आणि त्याची तुलना आपण यहोवाची सेवा करत नसतो, तर काय झालं असतं याच्याशी करू शकतो. असं केल्यामुळे आपल्याला यहोवाला विश्वासू राहायला आणि स्तोत्रकर्त्याने जसं म्हटलं, तसं म्हणायला मदत होईल. त्याने म्हटलं: “माझ्यासाठी तर देवाच्या जवळ जाणं हेच हिताचं आहे.”—स्तो. ७३:२८.
१८. आपण पूर्ण आत्मविश्वासाने भविष्याचा सामना का करू शकतो?
१८ या शेवटच्या दिवसांत आपल्यापुढे कुठलीही समस्या आली, तरी आपण त्याचा सामना करू शकतो. कारण, आपण एका “जिवंत आणि खऱ्या देवाची सेवा करत आहोत.” (१ थेस्सलनी. १:९) आपला देव, ही एक अशी खरीखुरी व्यक्ती आहे, जी त्याची उपासना करणाऱ्यांच्या वतीने कार्य करते. भूतकाळात त्याने त्याच्या सेवकांची साथ कधीच सोडली नाही आणि तो आजही आपल्यासोबत आहे. आपण लवकरच या पृथ्वीवर येणाऱ्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करणार आहोत. पण त्या वेळी आपण एकटे नसू. (यश. ४१:१०) म्हणूनच आपण सगळे “धैर्याने असं म्हणू शकतो: ‘यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही.’”—इब्री १३:५, ६.
गीत ३ यहोवा आपलं बळ आणि आसरा