व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांनो तुम्ही आनंदी व्हावं अशी निर्माणकर्त्याची इच्छा आहे

तरुणांनो तुम्ही आनंदी व्हावं अशी निर्माणकर्त्याची इच्छा आहे

“तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो.”​—स्तो. १०३:५.

गीत क्रमांक: ११, 

१, २. जीवनात निर्णय घेताना आपल्या निर्माणकर्त्याचं ऐकणं सुज्ञपणाचं का आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेली चित्रं पाहा.)

तरुणांनो, भविष्यासाठी तुम्हाला कदाचित अनेक सल्ले मिळतील. तुम्हाला कदाचित शिक्षक, सल्लागार किंवा इतर जण म्हणतील की भरपूर पैसा कमवण्यासाठी उच्च शिक्षण किंवा चांगलं करियर करणं गरजेचं आहे. पण यहोवा तुम्हाला खूप वेगळा सल्ला देतो. त्याला वाटतं की स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्ही अभ्यासात मेहनत घ्यावी. (कलस्सै. ३:२३) पण त्याला हेही माहीत आहे की तरुण असताना तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि या निर्णयांचा तुमच्या भविष्यावर परिणाम होईल. म्हणूनच तुमचं मार्गदर्शन करण्यासाठी तो तुम्हाला तत्त्वं देतो. या तत्त्वांमुळे तुम्हाला शेवटच्या काळात त्याच्या मर्जीनुसार जीवन जगायला मदत होईल.​—मत्त. २४:१४.

यहोवाला सर्वकाही माहीत आहे हे लक्षात असू द्या. जसं की, भविष्यात कोणत्या गोष्टी घडणार आहेत आणि या व्यवस्थेचा शेवट किती जवळ आहे. (यश. ४६:१०; मत्त. २४:३, ३६) तसंच, यहोवाला तुमच्याबद्दलही माहीत आहे. कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद होतो आणि कोणत्या गोष्टीमुळे दुःख होतं हेदेखील तो जाणतो. मानवांनी दिलेले सल्ले आपल्याला चांगले वाटू शकतात. पण जर ते देवाच्या वचनावर आधारित नसले तर ते सुज्ञ नसतात.​—नीति. १९:२१.

बुद्धी यहोवाच देतो

३, ४. वाईट सल्ला ऐकल्यामुळे आदाम-हव्वा आणि त्यांच्या मुलांना कोणत्या परिणामांना तोंड द्यावं लागलं?

चुकीचा सल्ला मिळणं ही काय नवीन गोष्ट नाही. याला जुना इतिहास आहे. सर्वात आधी मानवांना वाईट सल्ला दिला तो सैतानाने! त्याने हव्वाला म्हटलं की तिने आणि आदामने जीवन कसं जगायचं हे स्वतः ठरवलं तर ते आनंदी होतील. (उत्प. ३:१-६) सैतान स्वार्थी होता! आदाम-हव्वा आणि त्यांच्या भावी मुलांनी यहोवाचं नाही तर सैतानाचं  ऐकावं व त्याची उपासना करावी अशी त्याची इच्छा होती. पण सैतानाने तर त्यांच्यासाठी काहीच केलं नव्हतं. खरंतर, यहोवानेच त्यांना सर्वकाही दिलं होतं. एक सुंदर घर, जीवनात साथ देणारा जोडीदार आणि अनंतकाळ टिकणारं परिपूर्ण शरीर.

दुःखाची गोष्ट म्हणजे आदाम-हव्वाने देवाची आज्ञा मोडली. असं करण्याद्वारे त्यांनी देवासोबत असलेलं त्यांचं नातं तोडलं. याचा खूप भयंकर परिणाम झाला. ज्या प्रकारे एखादं फूल झाडावरून तोडल्यामुळे कोमेजून मरतं, त्याच प्रकारे आदाम-हव्वा हळूहळू म्हातारे होऊन मेले. त्यांच्या मुलांना आणि आपल्या सर्वांनाही त्याची झळ लागली. (रोम. ५:१२) आज बरेच लोक देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत. (इफिस. २:१-३) याचे काय परिणाम झाले आहेत? बायबल म्हणतं की जेव्हा लोक यहोवाचा विरोध करतात तेव्हा त्यांच्यात “शहाणपण” उरत नाही.​—नीति. २१:३०.

५. मानवांबाबतीत यहोवाला कोणता भरवसा होता आणि तो बरोबर होता असं का म्हणता येईल?

असं असलं तरी काही लोक यहोवाला जाणून घेतील आणि त्याची उपासना करतील असा भरवसा त्याला होता. या लोकांमध्ये तरुणांचाही समावेश होतो. (स्तो. १०३:१७, १८; ११०:३) हे तरुण यहोवाच्या नजरेत खूप मौल्यवान आहेत! तुम्हीही त्यांपैकी एक आहात का? असल्यास तुम्हाला देवाकडून अनेक ‘उत्तम पदार्थ’ नक्कीच मिळत असतील आणि यामुळे तुम्ही जीवनात आनंदी असाल. (स्तोत्र १०३:५ वाचा; नीति. १०:२२) आता आपण या उत्तम पदार्थांमध्ये सामील असलेल्या पुढील गोष्टींवर चर्चा करणार आहोत. त्या म्हणजे, आध्यात्मिक अन्‍न, चांगले मित्र, अर्थपूर्ण ध्येयं आणि खरं स्वातंत्र्य.

यहोवा तुम्हाला आध्यात्मिक अन्‍न पुरवतो

६. आध्यात्मिक अन्‍न मिळवण्याकडे तुम्ही लक्ष का दिलं पाहिजे आणि यहोवा तुम्हाला मदत करण्यासाठी कोणत्या गोष्टी पुरवतो?

प्राण्यांना आध्यात्मिक गरज भासत नाही. पण आपल्याला मात्र आपल्या निर्माणकर्त्याला जाणून घ्यायची इच्छा असते. (मत्त. ४:४) जेव्हा आपण देवाचं ऐकतो तेव्हा आपल्याला समज, बुद्धी आणि आनंद मिळतो. येशूने म्हटलं: “जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात ते सुखी आहेत.” (मत्त. ५:३) देवाने आपल्याला बायबल दिलं आहे. तसंच, “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” याच्याद्वारे तो आपल्याला प्रकाशनं पुरवतो. (मत्त. २४:४५) या प्रकाशनांना आपण आध्यात्मिक अन्‍न असं म्हणतो कारण यामुळे आपला विश्‍वास आणि यहोवासोबतचं आपलं नातं आणखी मजबूत होतं. यहोवा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं उत्तम आध्यात्मिक अन्‍न पुरवतो!​—यश. ६५:१३, १४.

७. देवाकडून मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नामुळे तुम्हाला कशी मदत होईल?

आध्यात्मिक अन्‍नामुळे तुम्हाला बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता मिळू शकते. यामुळे तुमचं अनेक मार्गांनी संरक्षण होऊ शकतं. (नीतिसूत्रे २:१०-१४ वाचा.) तुम्हाला खोट्या शिकवणी ओळखता येतील. जसं की, निर्माणकर्ता अस्तित्वात नाही आणि पैसे व भौतिक गोष्टींमुळे तुम्ही आनंदी व्हाल. तसंच तुम्हाला नुकसान पोहोचवणाऱ्‍या वाईट इच्छा किंवा सवयी टाळायला मदत होईल. म्हणून तुम्ही सुज्ञ बनण्यासाठी आणि योग्य विचार करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा. असं केल्यावर तुम्हाला स्वतःला जाणवेल की यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला सर्वोत्तम देण्याची त्याची इच्छा आहे.​—स्तो. ३४:८; यश. ४८:१७, १८.

८. देवासोबत नातं घनिष्ठ करण्याची हीच वेळ का आहे आणि असं केल्यामुळे तुम्हाला भविष्यात कसा फायदा होईल?

लवकरच सैतानाच्या जगातल्या सर्व गोष्टींचा नाश केला जाईल. आणि त्या वेळी फक्‍त यहोवाच आपलं संरक्षण करू शकेल. कदाचित अन्‍नासाठीही आपल्याला त्याच्यावर अवलंबून राहावं लागेल! (हब. ३:२, १२-१९) त्यामुळे देवासोबत आपलं नातं घनिष्ठ करण्याची आणि त्याच्यावर भरवसा वाढवण्याची हीच वेळ आहे. (२ पेत्र २:९) जर तुम्ही असं कराल तर परिस्थिती कशीही असली तरी तुमच्या भावना दावीदसारख्या असतील. त्याने म्हटलं: “मी आपल्यापुढे परमेश्‍वराला नित्य ठेवले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.”​—स्तो. १६:८.

यहोवा तुम्हाला सर्वात चांगले मित्र देतो

९. (क) योहान ६:४४ या वचनानुसार यहोवा काय करतो? (ख) साक्षीदारांना भेटल्यावर त्यांच्याबद्दल कोणती गोष्ट विशेष असते?

सत्यात नसलेल्या एखाद्या व्यक्‍तीला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटता तेव्हा तुम्हाला तिच्याबद्दल केवढी माहिती असते? तिचं नाव, ती कशी दिसते यापलीकडे कदाचित तिच्याबद्दल तुम्हाला फार कमी माहिती असेल. पण सत्यात असलेल्या व्यक्‍तीबद्दल असं नसतं. अशा व्यक्‍तीला भेटल्यावर तुम्हाला माहीत असतं की तिचं यहोवावर प्रेम आहे. तसंच, यहोवाने तिच्यात काहीतरी चांगलं पाहिलं आणि त्याच्या उपासकांच्या कुटुंबात तिला सामील केलं हेदेखील तुम्हाला माहीत असतं. (योहान ६:४४ वाचा.) ती व्यक्‍ती वेगळ्या पार्श्‍वभूमीची, देशाची किंवा संस्कृतीची असली तरी तुम्हाला तिच्याबद्दल आणि तिला तुमच्याबद्दल बरंच काही माहीत असतं!

तुमचे मित्र चांगले असावेत आणि तुम्ही आध्यात्मिक ध्येयं ठेवावीत अशी यहोवाची इच्छा आहे (परिच्छेद ९-१२ पाहा)

१०, ११. यहोवाच्या सेवकांमध्ये कोणत्या गोष्टी समान आहेत आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होतो?

१० तुम्ही जेव्हा एका साक्षीदाराला भेटता तेव्हा तुमच्यात समान असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आधीच माहीत असते. तुम्ही दोघं जरी वेगवेगळ्या भाषा बोलत असलात, तरी तुम्ही सत्याची एकच “शुद्ध वाणी” बोलत असता. (सफ. ३:९) याचा अर्थ, तुम्ही दोघंही देवावर विश्‍वास ठेवता, समान नैतिक स्तरांनुसार जगता आणि भविष्यासाठी तुमच्या समान आशा असतात. या गोष्टींमुळे तुम्हाला एकमेकांवर भरवसा ठेवायला आणि कायम टिकणारी घनिष्ठ मैत्री जोडायला मदत होते.

११ त्यामुळे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की यहोवाचे उपासक असल्यामुळे तुमच्याकडे सर्वात चांगले मित्र आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र तुमचे मित्र आहेत. मग तुम्ही त्यांना अजूनपर्यंत भेटला नसलात तरीही! तुमच्या माहितीत यहोवाच्या साक्षीदारांशिवाय असे लोक आहेत का, जे या अनमोल भेटवस्तूचा आनंद लुटत आहे?

यहोवा तुम्हाला अर्थपूर्ण ध्येयं ठेवायला मदत करतो

१२. तुम्ही कोणती अर्थपूर्ण ध्येयं ठेवू शकता?

१२ उपदेशक ११:९–१२:१ वाचा. तुम्ही अशी काही ध्येयं ठेवली आहेत का, जी तुम्ही गाठण्याचा प्रयत्न करत आहात? कदाचित ती ध्येयं रोज बायबल वाचन करणं, सभांमध्ये चांगली उत्तरं देणं, भाग तयार करणं किंवा सेवाकार्यात आणखी कुशलपणे बायबलचा वापर करणं ही असतील. तुम्हाला जेव्हा तुमच्या प्रगतीबद्दल जाणवतं किंवा इतर जण तुम्हाला त्याबद्दल सांगतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला कदाचित खूप आनंद होतो आणि तो झालादेखील पाहिजे! असं का? कारण येशूसारखं तुम्हीही यहोवाच्या इच्छेनुसार कार्यं करत आहात.​—स्तो. ४०:८; नीति. २७:११.

१३. या जगातल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा देवाची सेवा करणं का उत्तम आहे?

१३ जेव्हा तुम्ही यहोवाच्या सेवेवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही आनंद देणारी कामं करत असता आणि यामुळे तुमच्या जीवनाला एक उद्देश लाभतो. पौलने सल्ला दिला: “खंबीर व स्थिर राहा; आणि प्रभूचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा. कारण, प्रभूच्या सेवेत तुमची मेहनत कधीही व्यर्थ जाणार नाही,  हे तुम्हाला माहीत आहे.” (१ करिंथ. १५:५८) पण जेव्हा लोक जगातली ध्येयं जसं की, पैसे कमवणं किंवा प्रसिद्धी मिळवणं यांवर लक्ष केंद्रित करतात, तेव्हा ते खऱ्‍या अर्थाने आनंदी नसतात. ते जरी यशस्वी असले तरी सहसा त्यांच्या जीवनात एक पोकळी असते. (लूक ९:२५) हे आपण शलमोन राजाच्या उदाहरणावरून शिकू शकतो.​—रोम. १५:४.

१४. शलमोनच्या अनुभवावरून तुम्ही कोणता धडा शिकू शकता?

१४ शलमोन खूप श्रीमंत आणि शक्‍तिशाली होता. एकदा त्याने स्वतःला म्हटलं: “मी तुला अजमावून पाहतो; तर आता तू सुख भोगून घे.” (उप. २:१-१०) म्हणून त्याने प्रशस्त घरं, सुंदर बाग-बगीचे बांधले आणि जे काही त्याला वाटलं ते त्याने केलं. पण यामुळे त्याला आनंद आणि संतुष्टी मिळाली का? नाही. कारण त्याने जेव्हा सर्व कामांचं निरीक्षण केलं तेव्हा तो म्हणाला की “सर्व काही व्यर्थ” व “वायफळ उद्योग होता.” (उप. २:११) शलमोनने जे केलं त्यावरून तुम्हाला महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला का?

१५. तुम्हाला विश्‍वासाची गरज का आहे आणि स्तोत्र ३२:८ या वचनानुसार तुम्हाला कशी मदत होऊ शकते?

१५ काही लोक आपल्या चुकांमुळे झालेल्या वाईट परिणामांतून शिकतात. तुमच्यासोबत असं व्हावं अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही. आपण यहोवाचं ऐकावं, त्याची आज्ञा पाळावी अशी त्याची इच्छा आहे आणि यासाठी विश्‍वास असणं गरजेचं आहे. अशा विश्‍वासामुळे घेतलेल्या निर्णयांचा तुम्हाला कधीच पस्तावा  होणार नाही. तसंच, यहोवाच्या “नावाबद्दल तुम्ही दाखवलेले प्रेम” तो कधीच विसरणार नाही. (इब्री ६:१०) म्हणून विश्‍वास वाढवण्यासाठी भरपूर मेहनत करा. यामुळे तुम्ही जीवनात चांगल्या गोष्टी निवडाल आणि स्वर्गात राहणारा पिता तुमच्या भल्याचाच विचार करतो हे तुम्हाला जाणवेल.​—स्तोत्र ३२:८ वाचा.

देव तुम्हाला खरं स्वातंत्र्य देतो

१६. आपण स्वातंत्र्याला मौल्यवान का लेखलं पाहिजे आणि त्याचा सुज्ञपणे वापर का केला पाहिजे?

१६ पौलने लिहिलं: “जिथे कुठे यहोवाचा आत्मा आहे, तिथे स्वातंत्र्य आहे.” (२ करिंथ. ३:१७) यहोवाला स्वातंत्र्य आवडतं आणि आपल्यालाही ते आवडतं, कारण त्याने आपली रचनाच तशी केली आहे. पण त्याची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याचा सुज्ञपणे वापर करावा. कारण यामुळे तुमचं रक्षण होतं. तुमचे काही सोबती कदाचित पोर्नोग्राफी बघत असतील, अनैतिक लैंगिक कार्यं करत असतील, जीव धोक्यात घालणारे खेळ खेळत असतील, अती प्रमाणात दारू किंवा ड्रग्सचं सेवन करत असतील. सुरुवातीला या गोष्टी कदाचित खूप मजेशीर वाटू शकतात, पण सहसा त्यांचे वाईट परिणामच घडून येतात. जसं की, एखादा आजार जडणं किंवा व्यसन लागणं. आणि कधीकधी तर यामुळे मरणही येतं. (गलती. ६:७, ८) जे तरुण अशा गोष्टी करतात त्यांना कदाचित वाटतं की ते स्वतंत्र आहेत. पण तसं नसतं, खरंतर ते स्वतःला फसवत असतात.​—तीत ३:३.

१७, १८. (क) देवाला आज्ञाधारक राहिल्यामुळे आपण खऱ्‍या अर्थाने कसं स्वतंत्र होतो? (ख) आजच्या मानवांपेक्षा आदाम-हव्वाकडे जास्त स्वातंत्र्य कसं होतं?

१७ दुसरीकडे पाहता, यहोवाला आज्ञाधारक राहिल्याने आपलं भलं होतं. त्यामुळे आपलं शारीरिक नुकसान होत नाही आणि आपण खऱ्‍या अर्थाने स्वतंत्र असतो. (स्तो. १९:७-११) तसंच स्वातंत्र्याचा सुज्ञपणे वापर करण्याद्वारे, म्हणजे यहोवाच्या परिपूर्ण नियमांचं व तत्त्वांचं पालन करण्याद्वारे तुम्ही देवाला आणि तुमच्या पालकांना दाखवत असता की तुम्ही एक जबाबदार व्यक्‍ती आहात. यामुळे कदाचित तुमच्या आईवडिलांचा तुमच्यावर आणखी भरवसा वाढेल आणि ते तुम्हाला जास्त स्वातंत्र्यही देतील. यहोवाने अभिवचन दिलं आहे की तो आपल्या सर्व विश्‍वासू सेवकांना परिपूर्ण स्वातंत्र्य देईल. बायबल याला “देवाच्या मुलांचे गौरवी स्वातंत्र्य” असं म्हणतं.​—रोम. ८:२१.

१८ आदाम-हव्वाला अशाच प्रकारचं स्वातंत्र्य होतं. एदेन बागेत असताना, देवाने त्यांना फक्‍त एकाच गोष्टीची मनाई केली होती. त्यांना एका विशिष्ट झाडाचं फळ खाण्याची परवानगी नव्हती. (उत्प. २:९, १७) देव त्यांच्यावर अन्याय करत आहे किंवा त्याने दिलेली ती आज्ञा खूप कठीण होती, असं होतं का? मुळीच नाही! आज मानवांनी बनवलेल्या आणि लोकांवर लादलेल्या असंख्य नियमांचा जरा विचार करा. याच्या तुलनेत यहोवाने मात्र आदाम-हव्वाला फक्‍त एकच नियम दिला होता.

१९. स्वतंत्र होण्यासाठी यहोवा आणि येशू आपल्याला काय शिकवत आहेत?

१९ यहोवा आपल्याशी ज्या प्रकारे वागतो त्यावरून आपल्याला त्याची सुज्ञता दिसून येते. अनेक नियम देण्याऐवजी त्याने आपल्याला एकच नियम, म्हणजे प्रेमाचा नियम दिला आहे. तो नियम कसा पाळावा याबद्दल तो अगदी धीराने आपल्याला शिकवतो. तो आपल्याला त्याच्या तत्त्वांचं पालन करायला आणि वाइटाचा द्वेष करायला शिकवतो. (रोम. १२:९) डोंगरावरील प्रवचनात त्याच्या पुत्राने, येशूने आपल्याला समजायला मदत केली की लोक वाईट गोष्टी का करतात. (मत्त. ५:२७, २८) तसंच, नवीन जगातही देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशू आपल्याला शिकवत राहील. यामुळे बरोबर काय व चूक काय यांबद्दल त्याच्या दृष्टिकोनाचं आपण हुबेहूब अनुकरण करू शकू. (इब्री १:९) येशू आपल्याला शारीरिक आणि मानसिक रीत्याही परिपूर्ण बनवेल. कल्पना करा, त्या वेळी वाईट गोष्टी करण्याचा आपल्याला मोह होणार नाही आणि अपरिपूर्णतेमुळे होणारं दुःख आपल्याला सहन करावं लागणार नाही! मग शेवटी यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे आपण ‘गौरवी स्वातंत्र्याचा’ आनंद लुटू.

२०. (क) यहोवा आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करतो? (ख) तुम्ही त्याचं अनुकरण कसं करू शकता?

२० पण नवीन जगात आपल्या स्वातंत्र्याला सीमा असेल. या स्वातंत्र्यावर प्रेमाचा अधिकार असेल. आपण जे काही करू ते देवावर आणि इतरांवर असलेल्या प्रेमामुळे प्रवृत्त होऊन करू. खरंतर यहोवाची इच्छा आहे की आपण त्याचं अनुकरण करावं. त्याच्याकडे अमर्यादित स्वातंत्र्य आहे. पण तरी तो प्रेमाने प्रवृत्त होऊन आपल्याशी वागतो. (१ योहा. ४:७, ८) म्हणून असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, की देवाचं अनुकरण केल्यानेच आपण खऱ्‍या अर्थाने स्वतंत्र होऊ शकतो.

२१. (क) दावीदला यहोवाबद्दल काय वाटलं? (ख) आपण पुढच्या लेखात कशावर चर्चा करणार आहोत?

२१ यहोवाने तुम्हाला ज्या सर्व चांगल्या गोष्टी दिल्या आहेत त्यांसाठी तुम्ही त्याचे आभारी आहात का? त्याने तुम्हाला आध्यात्मिक अन्‍न, चांगले मित्र, अर्थपूर्ण ध्येयं, भविष्यात परिपूर्ण स्वातंत्र्याची आशा आणि इतर अनेक सुंदर भेटवस्तू दिल्या आहेत. (स्तो. १०३:५) यामुळे तुम्हालाही कदाचित दावीदसारखं वाटत असेल. स्तोत्र १६:११ मध्ये त्याने केलेल्या प्रार्थनेत म्हटलं: “जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्‍निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.” पुढच्या लेखात आपण १६व्या स्तोत्रातल्या इतर मौल्यवान सत्यांवर चर्चा करणार आहोत. यामुळे सर्वात चांगलं जीवन कसं मिळवता येईल हे तुम्हाला समजायला मदत होईल.