व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

कोणत्या अर्थाने पौलला “तिसऱ्‍या स्वर्गात” आणि “नंदनवनात उचलून घेण्यात आले” होते?​—२ करिंथ. १२:२-४.

२ करिंथकर १२:२, ३ या वचनात पौल एका अशा माणसाबद्दल बोलत होता, ज्याला “तिसऱ्‍या स्वर्गात उचलून घेण्यात आले होते.” तो माणूस कोण होता? करिंथ मंडळीला पत्र लिहिताना, यहोवा पौलचा प्रेषित म्हणून उपयोग करत आहे यावर त्याने जोर दिला. (२ करिंथ. ११:५, २३) नंतर त्याने “अद्‌भुत दृष्टान्त आणि त्याच्याकडून प्रकट झालेल्या” गोष्टींचा उल्लेख केला. या ठिकाणी पौलने इतर बांधवांचा उल्लेख केला नाही. यावरून हे स्पष्ट होतं की अद्‌भुत दृष्टान्त आणि प्रकट झालेल्या गोष्टी पाहणारा मनुष्य म्हणून पौल स्वतः होता.​—२ करिंथ. १२:१, ५.

या गोष्टीवरून कळतं की “तिसऱ्‍या स्वर्गात” आणि “नंदनवनात उचलून घेण्यात” आलेला मनुष्य पौल होता. (२ करिंथ. १२:२-४) त्याने “प्रकट झालेल्या” या वाक्यांशाचा वापर केला. या वाक्यांशावरून कळतं की त्याला भविष्यात होणाऱ्‍या गोष्टींबद्दल सांगण्यात आलं होतं.

पौलने ‘तिसरं स्वर्ग’ म्हणून काय पाहिलं?

बायबलमध्ये स्वर्ग आकाशाला सूचित करू शकतं. (उत्प. ११:४; २७:२८; मत्त. ६:२६) पण स्वर्ग हा शब्द इतर अर्थानेही वापरण्यात आला आहे. कधीकधी हा शब्द मानवी शासनाला सूचित करतो. (दानी. ४:२०-२२) किंवा हा देवाच्या शासनाला म्हणजे देवाच्या राज्यालाही सूचित करू शकतो.​—प्रकटी. २१:१.

पौलने दृष्टान्तात ‘तिसरं  स्वर्ग’ पाहिलं. याचा काय अर्थ होतो? बायबलमध्ये कधीकधी एखाद्या गोष्टीवर जोर देण्यासाठी तीन वेळा त्याचा उल्लेख केला जातो. (यश. ६:३; यहे. २१:२७; प्रकटी. ४:८) असं दिसून येतं की पौल एका सर्वोच्च शासनाबद्दल बोलत होता. हे शासन म्हणजे मसीही राज्य. येशू ख्रिस्त त्याच्या १,४४,००० सहराजांसोबत हे राज्य चालवणार आहे. प्रेषित पेत्रने म्हटलं, की देवाच्या “अभिवचनानुसार आपण एका नव्या आकाशाची” वाट पाहत आहोत.​—२ पेत्र ३:१३.

पौलने उल्लेख केलेल्या ‘नंदनवनाचा’ काय अर्थ होतो?

नंदनवन या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. जसं की: (१) सुरुवातीला देवाचा मानवांसाठी जो उद्देश होता तो लक्षात घेता हे पृथ्वीवर लवकरच येणारं नंदनवन. (२) नवीन जगात देवाच्या लोकांची आध्यात्मिक स्थिती. (३) प्रकटीकरण २:७ या वचनात सांगितल्याप्रमाणे ‘देवाचं नंदनवन’ म्हणजे स्वर्गातली चांगली परिस्थिती.​—टेहळणी बुरूज  १५ जुलै, २०१५ पृ. ८ परि. ८ पाहा.

२ करिंथकर १२:४ मध्ये पौल आपल्या अनुभवाबद्दल सांगताना या तीनही अर्थांबद्दल बोलत असावा.

थोडक्यात:

२ करिंथकर १२:२ मध्ये उल्लेख करण्यात आलेलं ‘तिसरं स्वर्ग’ मसीही राज्याला सूचित करू शकतं. हे राज्य येशू ख्रिस्त त्याच्या १,४४,००० सहराजांसोबत चालवणार आहे. याला ‘नवीन आकाश’ असंही म्हणतात.​—२ पेत्र ३:१३.

देवाचं राज्य सर्वोच्च शासन असल्यामुळे याला ‘तिसरं स्वर्ग’ म्हणण्यात आलं आहे.

दृष्टान्तात पौलला ज्या “नंदनवनात” उचलण्यात आलं होतं ते कदाचित पुढील गोष्टींना सूचित करतं: (१) पृथ्वीवर येणारं खरोखरचं नंदनवन, (२) आता अस्तित्वात असलेल्या आध्यात्मिक नंदनवनापेक्षाही मोठं असलेलं नवीन जगातलं आध्यात्मिक नंदनवन आणि (३) नवीन जगासोबतच स्वर्गात असलेलं ‘देवाचं नंदनवन.’

याचाच अर्थ, नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीने मिळून नवीन जग बनेल. या नवीन व्यवस्थेत स्वर्गातलं सरकार आणि पृथ्वीवरच्या नंदनवनात यहोवाची सेवा करणारी मानवजात सामील असेल.