व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“नंदनवनात भेटू या!”

“नंदनवनात भेटू या!”

“तू माझ्यासोबत नंदनवनात असशील.”​—लूक २३:४३.

गीत क्रमांक: १९, ५५

१, २. लोकांच्या मनात नंदनवनाबद्दल कोणत्या वेगवेगळ्या धारणा आहेत?

वेगवेगळ्या देशातून बरेच बंधुभगिनी दक्षिण कोरियाच्या सोल शहरात अधिवेशनासाठी एकत्र जमले होते. अधिवेशन संपल्यावर स्टेडियममधून बाहेर निघताना तिथले स्थानिक साक्षीदार या बांधवांभोवती जमले. तो खूप भावुक क्षण होता आणि त्यांचा निरोप घेताना ते एकमेकांना म्हणत होते: “नंदनवनात भेटू या!” ते कोणत्या नंदनवनाबद्दल बोलत होते?

आज लोकांच्या मनात नंदनवनाबद्दल वेगवेगळ्या धारणा आहेत. काही लोक म्हणतात की नंदनवन फक्‍त एक कल्पना आहे. तर इतर काहींसाठी, ज्या ठिकाणी त्यांना आनंद मिळतो ते ठिकाण नंदनवन असतं. जसं की, मेजवानीला आलेल्या एका उपाशी माणसाला तो नंदनवनात असल्यासारखं वाटू शकतं. बऱ्‍याच वर्षांआधी, एका खोऱ्‍यातील सुंदर रानफुलं पाहून एक स्त्री इतकी भारावून गेली की तिने म्हटलं: “हे तर नंदनवन आहे!” आज त्या ठिकाणी दर वर्षी ५० फुट पेक्षा जास्त बर्फ पडत असला, तरी त्या ठिकाणाला पॅराडाईस या नावाने ओळखलं जातं. नंदनवन म्हणजे नेमकं काय? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नंदनवनाची आशा बाळगता का?

३. बायबलमध्ये नंदनवनाचा उल्लेख पहिल्यांदा कुठे आढळतो?

मानवांची निर्मिती करण्यात आली त्या काळात असलेल्या एका नंदनवनाबद्दल आणि भविष्यात येणाऱ्‍या एका नंदनवनाबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे. बायबलच्या पहिल्या पुस्तकात आपल्याला पहिल्यांदा नंदनवनाचा उल्लेख आढळतो. लॅटीन भाषेतून भाषांतर करण्यात आलेल्या कॅथलीक डूए व्हर्शन  या बायबलमध्ये उत्पत्ती २:८ वचन असं भाषांतरीत करण्यात आलं आहे: “देवाने सुरुवातीला आनंद देणारं नंदनवन  बनवलं, त्यात त्याने बनवलेल्या मानवाला ठेवलं.” * मूळ इब्री भाषेत या शब्दांऐवजी एदेनची बाग असं म्हटलं आहे. “एदेन” या शब्दाचा अर्थ ‘आनंद’ किंवा ‘सुख’ असा होतो आणि त्या बागेत राहणं आनंददायी होतं. ती बाग खरंच खूप सुंदर होती. त्यात भरपूर प्रमाणात अन्‍न उपलब्ध होतं आणि मानव व प्राणी यांच्यात शांती होती.​—उत्प. १:२९-३१.

४. एदेनच्या बागेला आपण नंदनवन का म्हणू शकतो?

‘बाग’ या शब्दासाठी जो इब्री शब्द आहे त्याचा ग्रीक भाषेतील प्रतिशब्द पॅराडायसोस  हा आहे. मॅक्लिंटॉक आणि स्ट्राँग यांच्या सायक्लोपिडिया  पुस्तकात त्यांनी म्हटलं की, पॅराडायसोस  हा शब्द ऐकल्यावर एका ग्रीक व्यक्‍तीच्या मनात एक सुंदर, सुरक्षित आणि खूप मोठ्या बागेचं चित्र उभं राहायचं. त्यात मोठमोठी झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फळं, स्वच्छ पाण्याचे झरे आणि हिरव्यागार गवतावर चरणारी हरणं व मेंढरं असं चित्र त्या व्यक्‍तीच्या मनात उभं राहायचं.​—उत्पत्ति २:१५, १६ पडताळून पाहा.

५, ६. आदाम-हव्वाने नंदनवनात राहण्याची संधी का गमावली आणि काहींच्या मनात कोणता प्रश्‍न येऊ शकतो?

यहोवाने आदाम आणि हव्वा यांना अशा प्रकारच्या बागेत म्हणजे एका सुंदर नंदनवनात ठेवलं होतं. पण यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे त्यांनी नंदनवनात सदासर्वकाळ राहण्याची संधी गमावली. त्यांच्या चुकीमुळे त्यांच्या मुलांनाही ती संधी गमवावी लागली. (उत्प. ३:२३, २४) त्यानंतर त्या नंदनवनात कोणी मानव राहत नसले, तरी असं दिसून येतं की नोहाच्या काळात जलप्रलय येईपर्यंत ते नंदनवन अस्तित्वात होतं.

काही लोक कदाचित विचार करतील, ‘पृथ्वीवर परत नंदनवन कधी येईल का?’ याबद्दल आपल्याजवळ कोणती माहिती आहे? आपल्या प्रिय जणांसोबत तुम्ही नंदनवनात राहण्याची आशा बाळगत आहात, तर त्या आशेला काही आधार आहे का? तुम्हाला त्याबद्दल खात्री का आहे हे तुम्ही समजावून सांगू शकता का?

भविष्यात येणाऱ्‍या नंदनवनाचे पुरावे

७, ८. (क) यहोवाने अब्राहामला कोणतं वचन दिलं? (ख) देवाने दिलेलं वचन ऐकून अब्राहामने कशाचा विचार केला असेल?

यहोवा देवाने सुरुवातीला नंदनवन बनवलं आणि त्यानेच आपल्याला बायबल दिलं आहे. त्यामुळे नंदनवनाबद्दल असलेल्या प्रश्‍नांची अचूक उत्तरं आपल्याला फक्‍त बायबलमध्येच मिळू शकतात. यहोवाने आपला मित्र अब्राहाम याला काय सांगितलं त्यावर विचार करा. देवाने त्याला म्हटलं की मी तुझी संतती “समुद्रतीरीच्या वाळूइतकी” करेन. मग यहोवाने अब्राहामला एक खूप महत्त्वाचं वचन दिलं: “तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे  तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.” (उत्प. २२:१७, १८) नंतर यहोवाने हेच वचन अब्राहामच्या मुलाला आणि नातवाला पुन्हा सांगितलं.​—उत्पत्ति २६:४; २८:१४ वाचा.

मानवांना हा आशीर्वाद स्वर्गात मिळेल असा अब्राहामने विचार केला, असं बायबल कुठेच सांगत नाही. त्यामुळे जेव्हा यहोवाने म्हटलं की “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे” आशीर्वादित होतील, तेव्हा याची पूर्णता पृथ्वीवर  होईल असा विचार अब्राहामने केला असेल. पण नंदनवन पृथ्वीवर असेल याचा हा एकच पुरावा आहे का?

९, १०. भविष्यात नंदनवन येईल ही खात्री देणारी आणखी कोणती अभिवचनं आहेत?

अब्राहामच्या वंशावळीतून आलेल्या दावीदला यहोवाने भविष्यातील एका काळाबद्दल लिहिण्याची प्रेरणा दिली. एका अशा काळाबद्दल ज्यात “दुर्जन नाहीसा होईल.” (स्तो. ३७:१, २, १०) पण याउलट त्या काळात “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील,” असं दावीदने लिहिलं. त्याने असंदेखील भाकीत केलं: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”  (स्तो. ३७:११, २९; २ शमु. २३:२) देवाची सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या लोकांवर या अभिवचनांचा कसा प्रभाव पडला? त्यांना आशा मिळाली की एक असा काळ येईल जेव्हा पृथ्वीवर फक्‍त नीतिमान लोक राहतील आणि पृथ्वी परत एदेन बागेसारखी नंदनवन बनेल.

१० कालांतराने यहोवाची उपासना करण्याचा दावा करणाऱ्‍या बऱ्‍याच इस्राएली लोकांनी यहोवाला आणि खऱ्‍या उपासनेला सोडून दिलं. त्यामुळे देवाने बाबेलच्या सैन्याला त्याच्या लोकांवर विजय मिळवू दिला, त्यांच्या देशाचा नाश होऊ दिला आणि बऱ्‍याच लोकांना बंदीवासात जाऊ दिलं. (२ इति. ३६:१५-२१; यिर्म. ४:२२-२७) पण संदेष्ट्यांनी भविष्यवाणी केली होती की यहोवाचे लोक ७० वर्षांनंतर आपल्या मायदेशी परततील. आणि त्या सर्व भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. पण त्यांतून आपण आजही बरंच काही शिकू शकतो. त्यांपैकी काहींवर आता आपण चर्चा करू या. असं करत असताना त्यातून आपल्याला भविष्यातील नंदनवनाची खात्री कशी मिळते यावर विचार करा.

११. यशया ११:६-९ यातील भविष्यवाणीची पहिली पूर्णता कधी झाली, पण आपल्या मनात कोणता प्रश्‍न येऊ शकतो?

११ यशया ११:६-९ वाचा. यहोवाने यशया संदेष्ट्याला भविष्यवाणी करायला सांगितली की इस्राएली लोक मायदेशी परतल्यावर तिथे शांती असेल. तसंच, प्राणी किंवा मानव हे त्यांच्यावर कधीच हल्ला करणार नाहीत असंही यशयाने सांगितलं. तरुण असो वा वृद्ध, सर्व जण सुरक्षित राहतील. या गोष्टी आपल्याला एदेनच्या बागेत असणाऱ्‍या शांतीपूर्ण परिस्थितीची आठवण करून देतात. (यश. ५१:३) यशयाने भविष्यवाणीत संपूर्ण पृथ्वीचा  उल्लेख केला, इस्राएल राष्ट्राचा नाही. त्याने म्हटलं की “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” मग ही भविष्यवाणी कधी पूर्ण होणार? ही नक्कीच भविष्यात पूर्ण होईल.

१२. (क) बाबेलवरून परत येणाऱ्‍या इस्राएली लोकांना कोणते आशीर्वाद मिळाले? (ख) यशया ३५:५-१० ही वचनं भविष्यातदेखील पूर्ण होतील असं आपण का म्हणू शकतो?

१२ यशया ३५:५-१० वाचा. या वचनांतही यशयाने म्हटलं की बाबेलवरून मायदेशी परतणाऱ्‍या इस्राएली लोकांवर मानव किंवा प्राणी हल्ला करणार नाहीत. त्याने म्हटलं की मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे जमीन खूप पीक देईल. एदेनच्या बागेत अशीच परिस्थिती होती. (उत्प. २:१०-१४; यिर्म. ३१:१२) पण ही भविष्यवाणी फक्‍त इस्राएली लोकांच्या काळासाठीच होती का? या भविष्यवाणीत असंदेखील सांगितलं होतं की आंधळे, लंगडे आणि बहिरे लोक बरे होतील. पण बाबेलवरून परत आलेल्या इस्राएली लोकांच्या बाबतीत हे घडलं नाही. यावरून आपण म्हणू शकतो की यहोवा हे सर्व भविष्यात करणार आहे.

१३, १४. इस्राएली लोक बाबेलवरून परतले तेव्हा यशया ६५:२१-२३ यातील भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? यातील कोणती गोष्ट अजून पूर्ण व्हायची आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१३ यशया ६५:२१-२३ वाचा. यहुदी लोक आपल्या मायदेशी परतले तेव्हा त्यांना आपली घरं बांधावी लागली आणि द्राक्षाचे मळे लावावे लागले. या गोष्टी त्यांच्यासाठी आधीच कोणी करून ठेवलेल्या नव्हत्या. पण यहोवाने त्यांच्या प्रयत्नांवर आशीर्वाद दिला आणि काळासोबत त्यांची परिस्थिती बदलली. बंदीवासातून परत आल्यावर त्यांना स्वतःची घरं बांधून त्यात राहण्यात आणि शेतात मेहनत करण्यात किती आनंद मिळाला असेल याची आपण कल्पना करू शकतो.

१४ या भविष्यवाणीत असं सांगण्यात आलं होतं की “वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे” आपलं आयुष्य असेल. काही झाडं हजारो वर्षं जगतात. पण मानवांना इतकी वर्षं जगायचं असेल तर त्यांना सुदृढ राहणं गरजेचं आहे. मानव जर यशयाने वर्णन केलेल्या शांतीपूर्ण आणि सुंदर परिस्थितीत राहिले तर ते त्यांच्यासाठी खऱ्‍या अर्थाने नंदनवन असेल. ही भविष्यवाणी नक्की पूर्ण होईल!

येशूने नंदनवनाबद्दल दिलेलं अभिवचन कसं पूर्ण होईल? (परिच्छेद १५, १६ पाहा)

१५. यशयाच्या पुस्तकात भविष्यातल्या कोणत्या आशीर्वादांबद्दल सांगितलं आहे?

१५ वर चर्चा केलेली अभिवचनं आपल्याला भविष्यातील नंदनवनाबद्दल काय सांगतात यावर विचार करा. संपूर्ण पृथ्वीवर असलेल्या लोकांना देव आशीर्वादित करेल. कोणालाच हिंसा करणाऱ्‍या मानवांची किंवा प्राण्यांची भीती नसेल. आंधळे, बहिरे आणि लंगडे या लोकांना बरं केलं जाईल. लोक स्वतःची घरं बांधून त्यात राहतील आणि मळे लावून त्यांची फळं खातील. त्यांचं आयुष्य झाडांपेक्षाही जास्त असेल. बायबलमध्ये दिलेल्या या पुराव्यांवरून दिसून येतं की नंदनवन लवकरच येईल. पण काही लोक कदाचित आपल्याला म्हणू शकतात की या भविष्यवाण्या असं कुठेच सांगत नाहीत की हे सर्व पृथ्वीवर घडेल. अशा लोकांना आपण काय उत्तर देऊ शकतो? नंदनवन पृथ्वीवरच येईल याचे आपल्याजवळ कोणते खात्रीलायक पुरावे आहेत? या पृथ्वीवर होऊन गेलेला सर्वश्रेष्ठ मनुष्य, येशू ख्रिस्त याने आपल्याला याबाबतीत एक खात्रीलायक पुरावा दिला.

तू नंदनवनात असशील!

१६, १७. येशूने कोणत्या परिस्थितीत नंदनवनाचा उल्लेख केला?

१६ येशूने कोणतीच चूक केली नव्हती, तरी त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं. त्याच्या दोन्ही बाजूला यहुदी गुन्हेगार होते. त्यांपैकी एकाला जाणीव झाली की येशू राजा आहे आणि म्हणून त्याने म्हटलं: “येशू, तू राजा होशील तेव्हा माझी आठवण ठेव.” (लूक २३:३९-४२) येशूने या गुन्हेगाराला जे अभिवचन दिलं त्याचा संबंध आपल्या भविष्याशीही आहे. लूक २३:४३ या वचनात येशूचे शब्द दिलेले आहेत. या वचनात स्वल्पविराम कोणत्या शब्दाआधी द्यायचा याबद्दल बऱ्‍याच बायबल विद्वानांचं वेगवेगळं मत आहे. ईझी-टू-रीड व्हर्शन  या बायबलमध्ये हे वचन पुढीलप्रमाणे दिलं आहे: “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.” पण येशूने “आज” हा शब्द वापरला तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं?

१७ आजच्या काळातील भाषांमध्ये वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी विरामचिन्हे जसं की स्वल्पविराम, अपूर्णविराम किंवा मग वाक्यरचनेतील बदल यांचा वापर केला जातो. पण मूळ ग्रीक हस्तलिखितांमधून आपल्याला कळतं की त्या काळात विरामचिन्हांचा जास्त वापर केला जात नव्हता. त्यामुळे येशू त्या गुन्हेगाराला नेमकं काय म्हणाला याबद्दल प्रश्‍नं उभे राहतात. येशू त्याला असं म्हणाला का: “मी तुला खरं सांगतो, तू आज माझ्यासोबत नंदनवनात असशील,” की येशूला असं म्हणायचं होतं: “आज मी तुला खरं सांगतो, तू माझ्यासोबत नंदनवनात असशील.” बायबल भाषांतरकारांनी कदाचित वाक्यरचनेत बदल केला असेल किंवा मग त्या वचनाबद्दल त्यांच्या समजुतीनुसार विरामचिन्ह दिलं असेल. हे आपण कशावरून म्हणू शकतो? कारण वेगवेगळ्या भाषांतरांमध्ये हे वचन वेगवेगळ्या प्रकारे मांडण्यात आलं आहे.

१८, १९. येशूच्या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होते?

१८ हे वचन समजून घेण्यासाठी, येशूने आपल्या मृत्यूबद्दल शिष्यांना जे सांगितलं त्यावर विचार करणं गरजेचं आहे. त्याने म्हटलं: “मनुष्याचा पुत्र तीन दिवस आणि तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.” त्याने असंदेखील म्हटलं: “मनुष्याच्या पुत्राचा विश्‍वासघात करून त्याला लोकांच्या हाती धरून दिलं जाईल, आणि ते त्याला ठार मारतील आणि तिसऱ्‍या दिवशी त्याला उठवलं जाईल.” (मत्त. १२:४०; १६:२१; १७:२२, २३; मार्क १०:३४) या गोष्टी खरोखर घडल्या असं प्रेषित पेत्रने सांगितलं. (प्रे. कार्ये १०:३९, ४०) यावरून आपल्याला कळतं की येशूने त्या गुन्हेगाराला वचन दिलं त्या दिवशी तो नंदनवनात गेला नाही. बायबल सांगतं की देवाने येशूचं पुनरुत्थान करेपर्यंत तो तीन दिवस “कबरेत” होता.​—प्रे. कार्ये २:३१, ३२. *

१९ म्हणून आपण म्हणू शकतो की येशूने, “आज मी तुला खरं सांगतो” हे शब्द त्या गुन्हेगाराला दिलेल्या वचनाच्या सुरुवातीला वापरले. मोशेच्या काळातही अशा प्रकारे बोलण्याची पद्धत प्रचलित होती. मोशेने एकदा असं म्हटलं होतं: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव.”​—अनु. ६:६; ७:११; ८:१; ३०:१५.

२०. येशूच्या शब्दांचा आपण जसा अर्थ लावतो, त्याला आणखी कोणता आधार आहे?

२० येशू ज्या क्षेत्रातला होता त्या भागातल्या एका बायबल भाषांतरकाराने असं म्हटलं: “या वचनात ‘आज’ या शब्दावर जोर दिला गेला आहे. आणि त्यामुळे ते पुढील प्रकारे वाचण्यात यावं, ‘आज मी तुला खरं सांगतो, तू माझ्यासोबत नंदनवनात असशील.’ येशूने हे वचन त्या दिवशी दिलं आणि त्याची पूर्णता भविष्यात होणार होती.” त्या भाषांतरकाराने असंदेखील म्हटलं की त्या क्षेत्रातील लोक सहसा अशा पद्धतीने बोलतात. आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा असतो की “एका विशिष्ट दिवशी ते वचन देण्यात आलं आणि ते वचन नक्की पाळलं जाईल.” पाचव्या शतकातील सिरियाक भाषेतील बायबलमध्ये हे वचन पुढीलप्रमाणे देण्यात आलं आहे: “आमेन, मी आज तुला सांगतो की तू माझ्यासोबत एदेनच्या बागेत असशील.” येशूने दिलेल्या या अभिवचनामुळे आपल्या सर्वांनाच उत्तेजन मिळतं.

२१. त्या गुन्हेगाराला कोणता बहुमान देण्यात आला नाही आणि का?

२१ येशू त्या गुन्हेगाराशी नंदनवनाबद्दल बोलला तेव्हा तो स्वर्गातील नंदनवनाबद्दल बोलत नव्हता. आपण असं कोणत्या आधारावर म्हणू शकतो? याचं एक कारण म्हणजे त्या गुन्हेगाराला हे माहीत नव्हतं की येशूने आपल्या विश्‍वासू प्रेषितांसोबत स्वर्गात राज्य करण्याचा करार केला आहे. (लूक २२:२९) तसंच, त्या गुन्हेगाराचा बाप्तिस्माही झाला नव्हता. (योहा. ३:३-६, १२) यावरून आपण म्हणू शकतो की येशूने त्या गुन्हेगाराला अभिवचन दिलं, तेव्हा तो पृथ्वीवर येणाऱ्‍या नंदनवनाबद्दल बोलत होता. बऱ्‍याच वर्षांनंतर प्रेषित पौलने एका दृष्टांताबद्दल सांगितलं की एका मानवाला “नंदनवनात उचलून नेण्यात आले.” (२ करिंथ. १२:१-४) पौल आणि इतर प्रेषितांना स्वर्गात जाण्याची आणि येशूसोबत राज्य करण्याची आशा होती, तरी या वचनात तो भविष्यातील नंदनवनाबद्दल बोलत होता. * पण, हे नंदनवन पृथ्वीवर असणार का? तुम्ही त्यात असाल का?

आपण कशाची अपेक्षा करू शकतो?

२२, २३. आपण कशाची आशा बाळगू शकतो?

२२ दावीदने अशा काळाबद्दल सांगितलं जेव्हा “नीतिमान  पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तो. ३७:२९; २ पेत्र ३:१३) हे अभिवचन आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. या वचनात दावीद एका अशा काळाबद्दल सांगत होता जेव्हा पृथ्वीवरील सर्व लोक यहोवाच्या नीतिमान स्तरांचे पालन करतील. यशया ६५:२२ मध्ये अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे: “वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल.” यावरून आपल्याला कळतं की नवीन जगात यहोवाची उपासना करणारे लोक हजारो वर्षं जगतील. आपल्यालाही हे आशीर्वाद मिळतील का? हो नक्कीच मिळतील. कारण प्रकटीकरण २१:१-४ या वचनांनुसार देव संपूर्ण मानवजातीला अनेक आशीर्वाद देईल आणि त्यांपैकी एक म्हणजे तेव्हा “मरण नसेल.”

२३ नंदनवनाबद्दल बायबल जे काही शिकवतं ते अगदी स्पष्ट आहे. आदाम-हव्वाने नंदनवनात सदासर्वकाळ जगण्याची आशा गमावली, पण ही पृथ्वी पुन्हा एक नंदनवन बनेल. देवाने वचन दिल्याप्रमाणे तो पृथ्वीवर असलेल्या सर्व लोकांना आशीर्वाद देईल. दावीदने म्हटलं की नम्र आणि नीतिमान लोक पृथ्वीचे वतन पावतील आणि त्यात नेहमीकरता राहतील. तसंच, यशयाच्या पुस्तकातील भविष्यवाण्या आपल्याला नंदनवन झालेल्या सुंदर पृथ्वीवर राहण्याची आशा देतात. हे कधी घडेल? येशूने त्या गुन्हेगाराला दिलेलं अभिवचन पूर्ण होईल तेव्हा. आपण सर्व त्या नंदनवनाचा आनंद घेऊ शकू. आणि त्या वेळी, कोरीयामध्ये झालेल्या अधिवेशनातील बंधुभगिनींचे शब्द नक्की पूर्ण होतील: “नंदनवनात भेटू या!”

^ परि. 3 मूळ भाषेत तिरपे वळण नाही.

^ परि. 18 प्राध्यापक मार्विन पेट यांनी आपल्या लिखाणात असं सांगितलं: बरेच विद्वान असं मानतात की “आज” या शब्दाचा उपयोग करून येशूला म्हणायचं होतं की त्याच्या मृत्यूनंतर तो त्याच दिवशी किंवा २४ तासांच्या आत नंदनवनात असेल. हे प्राध्यापक पुढे म्हणतात: पण हा विचार बायबलमध्ये दिलेल्या इतर गोष्टींशी मेळ खात नाही. उदाहरणार्थ, बायबल म्हणतं की मृत्यूनंतर येशू कबरेत होता आणि त्यानंतर तो स्वर्गात गेला.​—मत्त. १२:४०; प्रे. कार्ये २:३१; रोम. १०:७.

^ परि. 21 या अंकातील “वाचकांचे प्रश्‍न” पाहा.