व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“परमेश्‍वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल”

“परमेश्‍वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल”

डायनाने त्यांची ऐंशी ओलांडली आहे आणि त्यांनी मागील काही वर्षांपासून खूप सोसलं आहे. त्यांचे पती नर्सिंग होममध्ये असताना अल्झायमर्स नावाच्या आजाराने वारले. मग त्यांची दोन मुलंही वारली आणि त्यांना स्वतःला स्तनाच्या कर्करोगाशी झुंजावं लागलं. पण जेव्हा बंधूभगिनी डायनाला सभेत किंवा सेवाकार्यात पाहतात तेव्हा त्या त्यांना नेहमी आनंदी दिसतात.

जॉन ४३ वर्षांपेक्षा जास्त वर्षं प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करत होते. त्यांना त्यांचं काम खूप आवडायचं आणि ते काम त्यांच्यासाठी जीव की प्राण होतं. पण एका आजारी नातेवाइकाची काळजी घेण्यासाठी त्यांना त्यांची सेवा सोडावी लागली. जॉनला ओळखणारे बंधूभगिनी जेव्हा त्यांना संमेलनामध्ये किंवा अधिवेशनामध्ये भेटतात तेव्हा त्यांच्यात काही बदल झाला आहे असं त्यांना वाटत नाही. ते आजही आनंदी आहेत.

डायना आणि जॉनला अशा परिस्थितीतही आनंदी राहणं कशामुळे शक्य झालं? एखाद्याला जीवनात खूप त्रास सहन करावा लागतो किंवा आपली प्रिय असलेली नेमणूक सोडून द्यावी लागते तेव्हा तो आनंदी कसा राहू शकतो? बायबल याचं उत्तर देतं. त्यात म्हटलं आहे: “परमेश्‍वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल.” (स्तो. ६४:१०) हे वचन चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण जाणून घेतलं पाहिजे की आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे कायम टिकणारा आनंद मिळू शकतो आणि कोणत्या नाही.

तात्पुरता आनंद

काही गोष्टींद्वारे आपल्याला नेहमीच आनंद मिळतो. उदाहरणार्थ, प्रेमात असणाऱ्‍या एका अशा जोडप्याचा विचार करा जे लग्न करतं. किंवा बाळ झालेल्या आईवडिलांचा विचार करा अथवा यहोवाच्या सेवेत नवीन नेमणूक मिळालेल्या व्यक्‍तीचा विचार करा. या सर्व गोष्टींमुळे आनंद होतो कारण या यहोवाकडून आपल्याला मिळालेल्या भेटी आहेत. यहोवाने विवाहाची योजना केली, मुलं होण्याची क्षमता दिली आणि त्याच्या संघटनेत काम दिलं.​—उत्प. २:१८, २२; स्तो. १२७:३; १ तीम. ३:१.

पण हा आनंद काही गोष्टींमुळे नेहमीसाठी टिकून राहत नाही. जसं की, विवाह सोबती धोका देऊ शकतो किंवा मृत्यूमुखी पडू शकतो. (यहे. २४:१८; होशे. ३:१) मुलं आपल्या आईवडिलांच्या आणि देवाच्या आज्ञांचं उल्लंघन करू शकतात. तसंच ते कदाचित बहिष्कृतही होऊ शकतात. उदाहरणार्थ, शमुवेलच्या मुलांनी यहोवाच्या इच्छेनुसार त्याची सेवा केली नाही. तसंच, बथशेबासोबत व्यभिचार केल्यामुळे दावीदच्या कुटुंबावर अनेक समस्या ओढवल्या. (१ शमु. ८:१-३; २ शमु. १२:११) अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आनंदाऐवजी आपल्याला दुःख व त्रासच होतो.

तसंच कधीकधी आपल्याला यहोवाच्या सेवेत आपली नेमणूक पूर्ण करणं शक्य नसू शकतं. याची बरीच कारणं असतील. जसं की आजारपण, कुटुंबाची जबाबदारी किंवा संघटनेतला एखादा बदल. यामुळे अनेकांना त्यांची नेमणूक सोडून द्यावी लागली आहे. ते म्हणतात की त्यांच्या सेवेतून मिळणाऱ्‍या समाधानाची त्यांना खूप आठवण होते.

यावरून आपल्याला समजतं की या गोष्टींमुळे मिळणारा आनंद कायम टिकत नाही. मग असा एखादा आनंद आहे का, जो समस्येत असतानाही टिकून राहतो? शमुवेल, दावीद आणि इतर सेवकांनी समस्यांचा सामना करूनही आपला आनंद टिकून ठेवला. यावरून कळतं की आपण असा आनंद अनुभवू शकतो.

कायम टिकणारा आनंद

आनंद म्हणजे काय आहे हे येशूला माहीत होतं. बायबल आपल्याला सांगतं की पृथ्वीवर येण्याआधी यहोवासमोर तो “सर्वदा हर्ष पावत असे.” (नीति. ८:३०) पण पृथ्वीवर आल्यावर त्याला कधीकधी कठीण समस्यांचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीतही त्याला देवाची इच्छा पूर्ण करण्यात आनंद मिळाला. (योहा. ४:३४) मृत्यूआधी शेवटच्या काही तासांत येशूला अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. त्याबद्दल बायबल सांगतं: “जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी त्याने . . . वधस्तंभ सोसला.” (इब्री १२:२) येशूने खऱ्‍या आनंदाबद्दल ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्यातून आपण बरंच काही शिकू शकतो.

एकदा ७० शिष्य प्रचारकार्य करून येशूकडे परतले. ते खूप आनंदी होते. कारण त्यांनी बरीच मोठी कामं केली होती. जसं की त्यांनी दुरात्म्यांना काढलं होतं. पण येशू त्यांना म्हणाला: “दुरात्मे तुमच्या अधीन करण्यात आले आहेत यामुळे आनंदी होऊ नका, तर स्वर्गात तुमची नावं लिहिण्यात आली आहेत यामुळे आनंदी व्हा.” (लूक १०:१-९, १७, २०) खरंच, कोणत्याही खास नेमणूकीपेक्षा यहोवाकडून मिळणारी पसंती सर्वात जास्त महत्त्वाची आहे. यामुळे आपल्याला खूप आनंद होतो.

दुसऱ्‍या प्रसंगी जेव्हा येशू एका जमावाशी बोलत होता तेव्हा एक यहुदी स्त्री त्याच्या शिकवणीने प्रभावीत झाली. त्याच्या आईला त्याचं खूप कौतुक वाटत असेल असं ती येशूला म्हणाली. पण तो म्हणाला: “नाही, उलट जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!” (लूक ११:२७, २८) आपण आपल्या मुलांचं कौतुक केल्यामुळे आपल्याला आनंद होतो. यहोवाचं ऐकल्यामुळे आणि त्याच्यासोबत चांगले नातेसंबंध जोडल्यामुळे आपल्याला कायम टिकणारा आनंद मिळतो.

यहोवा आपल्याला त्याची पसंती देतो हे जाणून आपल्याला खूप आनंद होतो. आणि यामुळे समस्येत असताना आपला आनंद हिरावला जात नाही. खरंतर आपण जेव्हा समस्येत विश्‍वासू राहतो तेव्हा आपण आणखीन आनंदी होतो. (रोम. ५:३-५) तसंच यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना तो पवित्र आत्मा देतो. आणि आनंद हा पवित्र आत्म्याच्या फळाचा एक पैलू आहे. (गलती. ५:२२) यामुळे आपल्याला स्तोत्र ६४:१० मधलं वचन समजायला मदत होते. त्यात म्हटलं आहे: “परमेश्‍वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल.”

कोणत्या गोष्टीमुळे जॉनला आनंदी राहायला मदत मिळाली?

या वचनावरून आपल्याला समजतं की समस्यांचा सामना करत असताना डायना आणि जॉन आपला आनंद का टिकवून ठेवू शकले. डायना सांगतात: “एक मूल जसं आपल्या आईवडिलांच्या आश्रयात असतं, तसंच मीही यहोवाचा आश्रय घेतला आहे.” त्या पुढे म्हणतात: “मला वाटतं की त्याने मला हसतमुखाने नियमित प्रचार करत राहण्याची क्षमता दिली आहे.” जॉनच्या बाबतीत काय? कोणत्या गोष्टीमुळे नेमणूक सोडून दिल्यावरही त्यांना विश्‍वासू राहण्यासाठी आणि सेवाकार्यात व्यस्त राहण्यासाठी मदत मिळाली? ते म्हणतात: “मला १९९८ साली सेवा प्रशिक्षण प्रशालेतल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नेमण्यात आलं होतं. तेव्हापासून मी जास्त वैयक्‍तिक अभ्यास करू लागलो आहे.” ते सांगतात की त्यांना आणि त्यांच्या पत्नीला जे बदल करावे लागले ते करणं त्यांना सोपं गेलं. कारण ते यहोवाने सांगितल्यानुसार करायला तयार होते. जॉन पुढे म्हणतात: “आम्हाला या सर्वांचा कधीच पस्तावा झाला नाही.”

अनेकांना स्तोत्र ६४:१० मधले शब्द खरे असल्याचा अनुभव आला आहे. ३० पेक्षा जास्त वर्षं अमेरिकेच्या बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या एका जोडप्याचं उदाहरण घ्या. त्यांना नंतर खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. ते म्हणतात: “तुम्हाला प्रिय असलेली गोष्ट तुम्ही जेव्हा गमावता तेव्हा तुम्हाला खूप दुःख होतं.” पण पुढे ते म्हणतात: “तुम्ही नेहमीच यामुळे दुःखी राहू शकत नाही.” त्यांनी त्यांच्या नवीन नेमणुकीची सुरुवात केली आणि ते मंडळीसोबत प्रचार करू लागले. त्यांनी हेही म्हटलं: “आम्ही काही विशिष्ट गोष्टींसाठी देवाला प्रार्थना केली. आमच्या प्रार्थनांचं उत्तर मिळत होतं. हे पाहून आम्हाला खूप प्रोत्साहन आणि आनंद मिळाला. आम्ही जेव्हा मंडळीत आलो त्यानंतर लगेचच अनेक बंधूभगिनींनी पायनियर सेवा सुरू केली. तसंच आम्हाला दोन प्रगतिशील बायबल अभ्यासही मिळाले.”

“सदा आनंदी व्हा”

आनंदी राहणं नेहमीच सोपं नसतं. कधीकधी आपल्या जीवनात चढ-उतार येऊ शकतात. पण यहोवा आपल्याला स्तोत्र ६४:१० मधल्या शब्दांनी आश्‍वासन देतो. आपण जरी निराश झालो तरी आपण एका गोष्टीची खातरी बाळगू शकतो. ती म्हणजे आपण कोणत्याही परिस्थितीतून जात असलो तरी विश्‍वासू राहिल्यामुळे आपण यहोवाच्या ठायी आनंदी राहू शकतो. तसंच आपण अशा वेळेची वाट पाहू शकतो ज्या वेळी यहोवा “नवे आकाश व नवी पृथ्वी” हे अभिवचन पूर्ण करेल. त्या वेळी सर्व जण परिपूर्ण होतील आणि यहोवाने जे केलं आहे त्यामुळे ते नेहमी आनंदी व उल्लासित असतील.​—यश. ६५:१७, १८.

त्या वेळी परिस्थिती किती सुंदर असेल याची कल्पना करा! आपल्याला परिपूर्ण आरोग्य लाभेल आणि प्रत्येक दिवशी आपण नव्या जोमाने उठू. कदाचित आपल्या जीवनात आधी अशा समस्या आल्या असतील, ज्यामुळे आपण खूप दुःखी झालो असू. पण भविष्यात ही सर्व दुःखं कायमची काढून टाकली जातील. यहोवा आपल्याला आश्‍वासन देतो की “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.” तसंच त्या वेळी आपण मृत पावलेल्या प्रियजनांचं स्वागत करू. येशूने १२ वर्षांच्या मुलीचं पुनरुत्थान केलं त्या वेळी तिच्या आईवडिलांना जसं वाटलं तसंच आपल्यालाही वाटेल. बायबल त्यांच्याबद्दल सांगतं: “त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही.” (मार्क ५:४२) कालांतराने पृथ्वीवर राहणारे सर्व जण खऱ्‍या अर्थाने नीतिमान असतील आणि ते कायमस्वरूपी ‘यहोवाच्या ठायी आनंद पावतील.’