व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५२

कठीण परिस्थितींचा सामना करण्यासाठी इतरांना मदत करा

कठीण परिस्थितींचा सामना करण्यासाठी इतरांना मदत करा

“ज्यांचं भलं केलं पाहिजे, त्यांचं भलं करण्याची तुझ्यात ताकद असेल, तर तसं करण्यापासून मागे हटू नकोस.”​—नीति. ३:२७.

गीत १०२ दुर्बळांना मदत करू या

सारांश a

१. यहोवा त्याच्या सेवकांच्या प्रार्थनेचं उत्तर कसं देतो?

 तुम्हाला माहीत आहे का, एखाद्याने केलेल्या कळकळीच्या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी यहोवा तुमचा उपयोग करू शकतो? तुम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करत असाल, सहायक सेवक असाल, पायनियर किंवा प्रचारक असाल, तरुण किंवा वयस्कर असाल, तरीसुद्धा यहोवा तुमचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करू शकतो. यहोवावर प्रेम करणारी व्यक्‍ती जेव्हा त्याच्याकडे मदतीसाठी प्रार्थना करते, तेव्हा तो मंडळीतल्या वडिलांचा किंवा त्याच्या विश्‍वासू सेवकांचा उपयोग तिला सांत्वन देण्यासाठी करतो. (कलस्सै. ४:११) खरंच, यहोवाची आणि आपल्या भाऊबहिणींची अशा प्रकारे सेवा करायचा हा किती मोठा बहुमान आपल्याकडे आहे! महामारी, विपत्ती किंवा छळ यांसारखी कठीण परिस्थिती येते, तेव्हा खासकरून भाऊबहिणींना मदत करायची संधी आपल्याजवळ असते.

महामारीच्या काळात

२. महामारीच्या काळात इतरांना मदत करणं कठीण का असू शकतं?

महामारी पसरते तेव्हा एकमेकांना मदत करायचं खूप कठीण असतं. उदाहरणार्थ, आपल्या भाऊबहिणींना भेटावं असं आपल्याला खूप वाटतं, पण अशा वेळी त्यांना भेटणं सुरक्षित नसतं. पैशाची अडचण असलेल्या एखाद्या कुटुंबाला आपल्या घरी जेवायला बोलवायची आपली इच्छा असते. पण अशा वेळी तेही शक्य नसतं. किंवा कदाचित असंही होऊ शकतं, की आपल्याला इतरांना मदत करायची इच्छा आहे, पण आपल्याच घरचे लोक आजारी असल्यामुळे किंवा पैशाची अडचण असल्यामुळे आपल्याला तसं करता येत नाही. पण जेव्हा आपल्या भाऊबहिणींसाठी काही-ना-काही करायची आपली इच्छा असते आणि त्यासाठी शक्य तितकं करायचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा यहोवाला ते पाहून आनंद होतो. (नीति. ३:२७; १९:१७) मग महामारीच्या काळात आपण इतरांना कशी मदत करू शकतो?

३. डेझीच्या मंडळीतल्या वडीलांकडून आपल्याला काय शिकायला मिळतं? (यिर्मया २३:४)

मंडळीतले वडील काय करू शकतात?  तुम्ही एक वडील म्हणून सेवा करत असाल, तर तुमच्या मेंढरांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. (यिर्मया २३:४ वाचा.) आधीच्या लेखात उल्लेख केलेली डेझी नावाची बहीण म्हणते, “माझ्या प्रचारकार्याच्या गटातले वडील माझ्यासोबत आणि इतरांसोबत नेहमी प्रचार करायचे आणि ते इतर वेळीही आमच्यासोबत वेळ घालवायचे.” b जेव्हा कोव्हिड महामारीची सुरवात झाली आणि डेझीच्या घरच्या काही लोकांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला, तेव्हा या वडिलांना तिला मदत करणं त्यामुळे आणखी सोपं गेलं.

४. मंडळीतले वडील डेझीला का मदत करू शकले आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

डेझी म्हणते, “माझ्या मंडळीतले वडील माझ्यासाठी मित्रांसारखेच आहेत. मला नेमकं कसं वाटतंय, मला कोणत्या गोष्टींची चिंता आहे हे मी त्यांना अगदी मनमोकळेपणाने बोलू शकले.” यातून मंडळीतले वडील काय शिकू शकतात? समस्या येण्याआधीच  आपल्या मेंढरांना चांगल्या प्रकारे ओळखण्याचा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासोबत मैत्री करा. महामारीच्या काळात त्यांना प्रत्यक्ष भेटणं शक्य नसलं, तरी इतर मार्गांनी त्यांच्या संपर्कात राहायचा प्रयत्न करा. डेझी म्हणते, “कधी-कधी तर असंही झालंय की बऱ्‍याच वडिलांनी मला एकाच दिवशी कॉल किंवा मेसेज केला आणि काही वचनं सांगितली. ही वचनं जरी मी आधी वाचलेली होती, तरी त्या वेळी पुन्हा वाचल्यामुळे मला खूप हिंमत मिळाली.”

५. भाऊबहिणींना कशाची गरज आहे, हे मंडळीतले वडील कसं जाणून घेऊ शकतात आणि त्यांना कशी मदत करू शकतात?

आपल्या भाऊबहिणींना कशाची गरज आहे हे जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे, त्यांना अवघडल्यासारखं किंवा वाईट वाटणार नाही अशा प्रकारे प्रश्‍न विचारणं. (नीति. २०:५) तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्यांना विचारू शकता. जसं की त्यांच्याजवळ खाण्यापिण्याच्या वस्तू, औषधं, आणि गरजेचं सामान आहे का? त्यांना आपली नोकरी जाण्याची भीती आहे का? घरभाडं देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत का? शासनाने केलेल्या तरतुदींचा फायदा घेण्यासाठी त्यांना मदत हवी आहे का? डेझीला तिच्या भाऊबहिणींकडून मदत मिळाली. पण मंडळीतल्या वडिलांनी तिला जो भावनिक आधार दिला आणि वचनांमधून जे प्रोत्साहन दिलं त्यामुळे खासकरून तिला या परिस्थितीतून सावरायला मदत झाली. ती म्हणते: “वडीलांनी माझ्यासोबत मिळून प्रार्थना केली. त्यांनी प्रार्थनेत त्या वेळी काय म्हटलं ते मला आता आठवत नाही. पण त्या वेळी मला असं वाटलं जणू यहोवाच मला म्हणतोय, ‘तू एकटी नाहीस, मी तुझ्या सोबत आहे.’”​—यश. ४१:१०, १३.

भाग हाताळणाऱ्‍या एका भावाला सभेत उपस्थित असलेल्या भाऊबहिणींची आणि व्हिडिओ कॉलवर असलेल्या एका आजारी भावाची उत्तरं ऐकून आनंद होत आहे (परिच्छेद ६ पाहा)

६. भाऊबहिणींना मदत करण्यासाठी मंडळीतले इतर जण काय करू शकतात? (चित्र पाहा.)

इतर जण काय करू शकतात?  मंडळीतल्या वडीलांनी भाऊबहीणींची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. पण आपण सर्वांनीही एकमेकांना प्रोत्साहन द्यावं आणि एकमेकांना मदत करावी असं यहोवाला वाटतं. (गलती. ६:१०) आपण केलेल्या छोट्या गोष्टींमुळेसुद्धा आजारी असलेल्या भावाला किंवा बहिणीला प्रोत्साहन मिळू शकतं. जसं की, प्रोत्साहन मिळेल म्हणून लहान मुलं त्यांना एखादं कार्ड किंवा चित्र काढून पाठवू शकतात. तरुण भाऊबहीण त्यांना काही गोष्टी खरेदी करून आणायला मदत करू शकतात. किंवा त्यांचं एखादं बाहेरचं काम करून देऊ शकतात. इतर जण कदाचित त्यांच्यासाठी जेवण तयार करून ते त्यांच्या घरापर्यंत सुरक्षितपणे पोचवू शकतात. शिवाय महामारी पसरते, तेव्हा फक्‍त आजारी असलेल्यांनाच नाही तर सगळ्यांनाच धीराची गरज असते. म्हणून सभा संपल्यानंतर राज्य सभागृहात किंवा व्हिडिओ कॉलवर थोडं जास्त वेळ थांबून तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता. तसंच, मंडळीतल्या वडिलांनासुद्धा प्रोत्साहनाची गरज असते. महामारीदरम्यान त्यांचं काम आणखी वाढतं. म्हणून काही भाऊबहिणींनी त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना मेसेज केलाय किंवा कार्ड पाठवलंय. तर चला आपणसुद्धा अशा प्रकारे एकमेकांना प्रोत्साहन देऊ या आणि एकमेकांना बळकट करत राहू या!​—१ थेस्सलनी. ५:११.

विपत्तीच्या काळात

७. विपत्ती येते तेव्हा काय होऊ शकतं?

विपत्तीचा सामना करावा लागतो तेव्हा लोकांच्या जीवनात उलथापालथ होऊन जाते. एका क्षणातच त्यांचं जीवन बदलून जातं. त्यांच्या मालमत्तेचं आणि त्यांच्या घराचं मोठं नुकसानही होऊ शकतं. इतकंच काय, तर त्यांच्या जवळच्या लोकांचा मृत्युसुद्धा होऊ शकतो. अशा गोष्टी आपल्या भाऊबहिणींच्या बाबतीतही घडू शकतात. पण मग आपण त्यांना कशी मदत करू शकतो?

८. विपत्ती येण्याआधीच मंडळीतले वडील आणि कुटुंबप्रमुख काय करू शकतात?

मंडळीतले वडील काय करू शकतात?  विपत्ती येण्याआधीच मंडळीतले वडील भाऊबहिणींना त्यासाठी तयार राहायला मदत करू शकतात. विपत्ती येते तेव्हा सुरक्षित राहण्यासाठी आणि आपल्या मंडळीतल्या वडिलांना संपर्क करण्यासाठी त्यांनी काय करणं गरजेचं आहे, हे वडील त्यांना सांगू शकतात. मागच्या लेखात उल्लेख केलेली मार्गारेट म्हणते: “मंडळीच्या गरजांमध्ये वडीलांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं, की आपल्या भागात जंगलात आग लागण्याची अजूनही शक्यता आहे. त्यामुळे अधिकाऱ्‍यांनी जर तिथून निघायला सांगितलं किंवा जास्त धोका आहे असं जर तुम्हाला जाणवलं तर ताबडतोब निघून जा. वडिलांनी या सूचना अगदी योग्य वेळी दिल्या होत्या. कारण याच्या पाच आठवड्यानंतरच जंगलात आग लागली आणि लोकांना तिथून निघून जावं लागलं.” तुम्ही जर कुटुंब प्रमुख असाल, तर आपल्या कुटुंबासोबत या गोष्टींवर चर्चा करा. अशा वेळी प्रत्येकाने काय केलं पाहिजे हे त्यांना सांगा. तुम्ही आणि तुमची मुलं जर आधीपासूनच अशा प्रकारे तयार असतील, तर विपत्ती आल्यानंतर तुम्ही घाबरून जाणार नाही. उलट शांतपणे तुम्हाला ती परिस्थिती हाताळता येईल.

९. मंडळीतले वडील विपत्ती येण्याआधी आणि नंतर काय करू शकतात?

तुम्ही जर एक गट पर्यवेक्षक असाल, तर विपत्ती येण्याआधीच तुमच्या गटातल्या सगळ्या भाऊबहिणींचे फोन नंबर आणि पत्ते घेऊन ठेवा. त्याची एक लिस्ट बनवा. आणि ते बरोबर आहेत की नाही याची वेळोवेळी खातरी करून घ्या. त्यामुळे जेव्हा विपत्ती येते तेव्हा ज्या प्रचारकांना मदतीची गरज आहे, त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करता येईल. तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती मिळते तेव्हा लगेचच वडील वर्गाच्या संयोजकाला ती माहिती कळवा म्हणजे ते विभागीय पर्यवेक्षकांना त्याबद्दल सांगतील. अशा प्रकारे बांधव जेव्हा सोबत मिळून कार्य करतात, तेव्हा त्यांना मंडळीतल्या भाऊबहिणींची चांगल्या प्रकारे मदत करता येते. मार्गारेट राहते त्या भागात जेव्हा आग लागली, तेव्हा जवळजवळ ४५० भाऊबहिणींना त्यांचं राहतं ठिकाण सोडून जावं लागलं. त्यांना संपर्क करण्यासाठी आणि त्यांना लागणाऱ्‍या गोष्टी पुरवण्यासाठी वडिलांनी खूप मेहनत घेतली. आणि या वडिलांना मार्गदर्शन पुरवण्यासाठी विभागीय पर्यवेक्षक नेहमी त्यांच्या संपर्कात होते. त्यासाठी ते ३६ तास झोपलेसुद्धा नव्हते. (२ करिंथ. ११:२७) अशा प्रकारे सोबत मिळून काम केल्यामुळे या सगळ्या भाऊबहिणींना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली.

१०. भाऊबहिणींना मेंढपाळ भेटी देणं वडिलांसाठी का महत्त्वाचं आहे? (योहा. २१:१५)

१० विपत्ती येते तेव्हा मंडळीतल्या भाऊबहिणींना भावनिक आधार देणं आणि आध्यात्मिक रितीने त्यांना मदत करणं, हीसुद्धा मंडळीतल्या वडिलांची एक जबाबदारी आहे. (१ पेत्र ५:२) विपत्तीच्या काळात भाऊबहीण सुरक्षित आहेत का? त्यांच्याकडे खाण्यापिण्याच्या वस्तू, कपडे आणि राहण्याचं सुरक्षित ठिकाण आहे का, या गोष्टींची वडिलांनी खातरी करून घेणं गरजेचं आहे. विपत्ती येऊन गेल्यानंतरसुद्धा भाऊबहिणींना कदाचित बराच काळ किंवा बरेच महिने धीर देण्याची किंवा वचनांतून प्रोत्साहन देण्याची गरज पडू शकते. (योहान २१:१५ वाचा.) याबद्दल हेरल्ड नावाचे भाऊ काय म्हणतात ते पाहा. ते शाखा समितीचे सदस्य म्हणून सेवा करत आहेत. आणि त्यांनी बऱ्‍याच विपत्तीग्रस्त भाऊबहिणींना भेट दिली आहे. ते म्हणतात: “भाऊबहिणींना दुःखातून सावरायला वेळ लागू शकतो. ते कदाचित सावरतीलही. पण आपल्या जवळच्या व्यक्‍तीला किंवा जिवापाड जपलेल्या वस्तूंना गमावल्याचं दुःख त्यांना कदाचित लगेच विसरता येणार नाही. त्यांच्या आठवणी किंवा त्या भयंकर परिस्थितीतून ते कसे थोडक्यात वाचले होते, त्याच्या आठवणी पुन्हा-पुन्हा त्यांच्या डोळ्यांसमोर येतील. पण याचा अर्थ असा होत नाही, की त्यांचा विश्‍वास कमजोर आहे. कारण अशा प्रकारच्या भावना मनात येणं साहजिक आहे.”

११. मंडळीतले वडील कुटुंबाला कशी मदत करू शकतात?

११ “रडणाऱ्‍यांसोबत रडा,” हा बायबलमध्ये दिलेला सल्ला वडील पाळण्याचा प्रयत्न करतात. (रोम. १२:१५) ज्या भाऊबहिणींनी विपत्तीचा सामना केलाय त्यांच्यावर यहोवा अजूनही प्रेम करतो आणि इतर भाऊबहिणींचंही त्यांच्यावर प्रेम आहे, या गोष्टीची खातरी वडिलांनी त्यांना करून दिली पाहिजे. वडिलांनी त्यांना उपासनेशी संबंधित गोष्टी, जसं की प्रार्थना, वैयक्‍तिक अभ्यास, सभांना जाणं आणि प्रचारकार्यात सहभाग घेणं, अशा गोष्टी करत राहण्याचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. मंडळीतल्या वडिलांनी पालकांनासुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे, की त्यांनी त्यांच्या मुलांना धीर द्यावा आणि त्यांना सांगावं की विपत्तीमुळे आपण सर्वकाही गमावलं, तरी आपल्याकडे अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाहीत. जसं की, ते आपल्या मुलांना सांगू शकतात, की यहोवा अजूनही त्यांचा मित्र आहे आणि तो नेहमी त्यांच्यासोबत राहील. तसंच, ते त्यांना सांगू शकतात, की आपण जगभरातल्या एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहोत आणि अनेक भाऊबहीण आपल्याला नेहमी मदत करायला तयार असतात.​—१ पेत्र २:१७.

तुमच्या भागात विपत्ती आल्यानंतर तुम्ही मदतकार्यात स्वयंसेवक म्हणून काम करू शकता का? (परिच्छेद १२ पाहा) e

१२. विपत्ती येते तेव्हा इतर भाऊबहीण कशा प्रकारे मदत करू शकतात? (चित्र पाहा.)

१२ इतर जण काय करू शकतात?  जर तुमच्या जवळच्या ठिकाणी एखादी विपत्ती आली, तर त्या ठिकाणी कशी मदत करता येईल याबद्दल तुम्ही वडिलांना विचारू शकता. विपत्तीमुळे ज्या भाऊबहिणींना आपलं घर सोडावं लागलंय किंवा जे भाऊबहीण विपत्ती मदत कार्यासाठी स्वयंसेवक म्हणून आलेत, त्यांना तुम्ही आपल्या घरी राहण्यासाठी बोलवू शकता. तसंच ज्या भाऊबहिणींना खाण्यापिण्याच्या किंवा इतर वस्तूंची गरज आहे, त्यांना तुम्ही त्या पुरवू शकता. पण जर एखाद्या लांबच्या ठिकाणी विपत्ती आली असेल, तर तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता? अशा वेळी तुम्ही तिथल्या भाऊबहिणींसाठी प्रार्थना करू शकता. (२ करिंथ. १:८-११) तसंच, विपत्ती मदतकार्यात आपलाही हातभार लागावा म्हणून जगभरात चाललेल्या कार्यासाठी तुम्ही दान देऊ शकता. (२ करिंथ. ८:२-५) जर तुम्हाला तिथे जाऊन मदत करणं शक्य असेल, तर स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी तुम्ही वडिलांना विचारू शकता. जर तुम्हाला बोलवण्यात आलं तर जास्तीत जास्त मदत करता यावी म्हणून तुम्हाला प्रशिक्षणही देण्यात येईल.

छळ होत असताना

१३. ज्याठिकाणी आपल्या कार्यावर बंदी आहे त्या ठिकाणी भाऊबहिणींना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं?

१३ ज्या देशांमध्ये आपल्या कार्यावर बंदी घालण्यात आली आहे, त्या ठिकाणी परिस्थिती आणखीनच कठीण असते. अशा ठिकाणी बांधवांना छळासोबतच आर्थिक अडचणींचासुद्धा सामना करावा लागतो. तसंच, आजारपण आणि जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू यांसारख्या गोष्टींनासुद्धा त्यांना तोंड द्यावं लागतं. पण बंदी असल्यामुळे मंडळीतले वडील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्यक्ष भेटू शकत नाहीत किंवा त्यांच्याशी उघडपणे बोलू शकत नाहीत. आधीच्या लेखात उल्लेख केलेल्या आंद्रे यांच्या बाबतीतही हीच गोष्ट घडली. त्यांच्या प्रचारकार्याच्या गटातली एक बहीण आधीच आर्थिक अडचणींना तोंड देत होती. त्यात तिचा अपघातही झाला. अपघातामुळे तिचे बरेच ऑपरेशन झाले आणि त्यामुळे तिला काम करणंही शक्य नव्हतं. पण यहोवा तिची परिस्थिती पाहत होता. म्हणून त्याने भावांना तिला मदत करायची प्रेरणा दिली. आणि महामारी आणि बंदी असतानासुद्धा भावांनी त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं तिच्यासाठी केलं.

१४. कठीण परिस्थिती येते तेव्हा वडील यहोवावर भरवसा असल्याचं कसं दाखवू शकतात?

१४ मंडळीतले वडील काय करू शकतात?  भाऊ आंद्रे यांनी यहोवाला प्रार्थना केली. आणि त्यांच्या परीने जितकं शक्य होतं तितकं करायचा प्रयत्न केला. मग यहोवाने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर कसं दिलं? जे भाऊबहीण त्या बहिणीला जास्त मदत करू शकत होते, त्यांना यहोवाने प्रेरणा दिली. काही जण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तर काहींनी तिला पैशांची मदत केली. या भाऊबहिणींनी तिला जी काही मदत करायचा प्रयत्न केला त्यावर यहोवाने आशीर्वाद दिला आणि त्या बहिणीला ज्याची गरज होती त्या सगळ्या गोष्टी तिला मिळाल्या. (इब्री १३:१६) यातून मंडळीतले वडील काय शिकू शकतात? हेच, की जेव्हा आपल्या कार्यावर बंदी असते तेव्हा स्वतःच सगळ्या गोष्टी करत राहण्यापेक्षा भाऊबहिणींना काम वाटून दिलं पाहिजे. (यिर्म. ३६:५, ६) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवावर विसंबून राहिलं पाहिजे. आपल्या भाऊबहिणींची काळजी घेण्यासाठी तो नक्कीच तुम्हाला मदत करेल.

१५. छळ होतो तेव्हा आपण आपली एकता कशी टिकून ठेवू शकतो?

१५ इतर जण काय करू शकतात?  जिथे बंदी आहे अशा ठिकाणी आपल्याला छोट्या-छोट्या गटांमध्ये भेटावं लागेल. म्हणून आपण आत्तापासूनच भाऊबहिणींसोबत शांतीचं नातं टिकवून ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला एकमेकांशी नाही तर सैतानाशी लढायचं आहे. म्हणून आपल्या भाऊबहिणींच्या चुकांकडे जास्त लक्ष देऊ नका. किंवा मतभेद झाले तर ते लवकरात लवकर सोडवायचा प्रयत्न करा. (नीति. १९:११; इफिस. ४:२६) एकमेकांना मदत करायच्या बाबतीत पुढाकार घ्या. (तीत ३:१४) सर्व भाऊबहिणींनी मिळून जेव्हा त्या अपघात झालेल्या बहिणीला मदत केली, तेव्हा त्याचा चांगला परिणाम प्रचारकार्याच्या गटातल्या इतर भाऊबहिणींवरपण झाला. ते आणखी एकमेकांच्या जवळ आले आणि त्याच्यातलं नातं आणखी घट्ट झालं.​—स्तो. १३३:१.

१६. कलस्सैकर ४:३, १८ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण छळ होत असलेल्या आपल्या भाऊबहिणींची कशा प्रकारे मदत करू शकतो?

१६ आज बऱ्‍याच देशांमध्ये सरकारने आपल्या कामावर बंदी घातली आहे. पण अशा ठिकाणी आपले हजारो भाऊबहीण विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत. काहींना तर त्यांच्या विश्‍वासामुळे जेलमध्ये टाकण्यात आलंय. आपण अशा भाऊबहिणींसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करू शकतो. आपण अशा भाऊबहिणींसाठीही प्रार्थना करू शकतो जे जेलमध्ये असलेल्या या भाऊबहिणींना मदत करत आहेत. त्यांना माहीत आहे की आपल्यालाही अटक केली जाऊ शकते, पण तरीही न घाबरता ते जेलमध्ये असलेल्या या भाऊबहिणींना गरजेच्या वस्तू पुरवतात, त्यांना यहोवावर भरवसा ठेवायला उत्तेजन देतात आणि कोर्टात त्यांच्यावतीने लढतात. c (कलस्सैकर ४:३, १८ वाचा.) म्हणून, अशा भाऊबहिणींसाठी प्रार्थना केली नाही तरी काय फरक पडेल, असा विचार करू नका. कारण प्रार्थनेत जबरदस्त ताकद असते!​—२ थेस्सलनी. ३:१, २; १ तीम. २:१, २.

छळासाठी तुम्ही आत्तापासूनच तुमच्या कुटुंबाला कसं तयार करू शकता? (परिच्छेद १७ पाहा)

१७. छळाचा सामना करण्यासाठी आपण आत्तापासूनच कशी तयारी करू शकतो?

१७ तुम्ही आणि तुमचं कुटुंब आत्तापासूनच छळाचा सामना करण्यासाठी तयारी करू शकता. (प्रे. कार्यं १४:२२) छळ झाला तर आपल्यासोबत कोणकोणत्या वाईट गोष्टी घडतील यावर विचार करत बसू नका. उलट यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी भक्कम करा आणि तुमच्या मुलांनाही तसंच करण्याचं प्रोत्साहन द्या. तुम्हाला जर जास्तच चिंता वाटत असेल तर यहोवासमोर प्रार्थनेत आपलं मन मोकळं करा. (स्तो. ६२:७, ८) आपण यहोवावर का भरवसा ठेवू शकतो यावर कुटुंब मिळून चर्चा करा. d विपत्तीचा सामना करण्यासाठी जसं तुम्ही तुमच्या मुलांना तयार केलं होतं, तसंच छळाचा सामना करण्यासाठीही तुम्ही त्यांना तयार करू शकता. यहोवावर भरवसा ठेवायला शिकवल्यामुळे तेसुद्धा धैर्याने आणि शांत मनाने छळाला तोंड देऊ शकतील.

१८. भविष्यात यहोवा मानवांना काय देईल?

१८ देवाची शांती अनुभवल्यामुळे आपल्याला सुरक्षित वाटतं. (फिलिप्पै. ४:६, ७) आज आपल्याला वेगवेगळ्या रोगांचा, विपत्तींचा आणि छळाचा सामना करावा लागत आहे. पण देवाकडून मिळणाऱ्‍या शांतीमुळे आपल्याला आपलं मन स्थिर ठेवायला मदत होते. मंडळीतले वडील आपल्यासाठी खूप मेहनत घेतात. त्यांच्याद्वारे तो आपली काळजी घेतो. तसंच, एकमेकांना मदत करायची संधीसुद्धा त्याने आपल्याला दिली आहे. आज कदाचित काही जणांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत नसेल. तरी पुढे येणाऱ्‍या परीक्षांना तोंड देण्यासाठी, इतकंच नव्हे तर ‘मोठ्या संकटासाठी’ आपण सगळ्यांनीच आत्तापासूनच तयारी केली पाहिजे. (मत्त. २४:२१) त्या वेळी आपलं मन शांत ठेवायला आणि इतरांनाही तसं करायला मदत करायची गरज असेल. पण मोठ्या संकटानंतर आपल्याला कोणत्याही वाईट परिस्थितीचा सामना करायची आणि त्यासाठी चिंता करायची गरज पडणार नाही. कारण तेव्हा यहोवाचा उद्देश पूर्ण झालेला असेल. तो मानवांना अशी शांती देईल, जी सर्वकाळ टिकून राहील.​—यश. २६:३, ४.

गीत १०७ देवाच्या प्रीतीचा आदर्श

a जे भाऊबहीण कठीण परिस्थितीतून जात आहेत त्यांना मदत करण्यासाठी यहोवा त्याच्या विश्‍वासू सेवकांचा वापर करतो. यहोवा तुमच्याद्वारेही भाऊबहिणींना दिलासा आणि सांत्वन देऊ शकतो. तर चला, आपल्या भाऊबहिणींना गरज असते तेव्हा आपण त्यांना कशी मदत करू शकतो, ते पाहू या.

b काही नावं बदलण्यात आली आहेत.

c शाखा कार्यालयाला किंवा जागतिक मुख्यालयातल्या बांधवांना इतर भाऊबहिणींनी वैयक्‍तिक रीत्या लिहिलेली पत्र जेलमध्ये असलेल्या भाऊबहिणींना पाठवता येणं शक्य नाही.

d जुलै २०१९ च्या टेहळणी बुरूज  अंकातला, “छळाचा सामना करण्यासाठी आताच तयारी करा” हा लेख पाहा.

e चित्राचं वर्णन: विपत्तीनंतर तात्पुरत्या राहणाच्या ठिकाणी असलेल्या एका कुटुंबासाठी एक जोडपं खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन आलं आहे.