व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५१

कठीण परिस्थितीतही शांती अनुभवा

कठीण परिस्थितीतही शांती अनुभवा

“तुमची मनं अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा भीतीने खचू देऊ नका.”​—योहान १४:२७.

गीत ११३ शांतीचा ठेवा

सारांश a

१. “देवाची शांती” काय आहे, आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो? (फिलिप्पैकर ४:६, ७)

 बायबलमध्ये अशा शांतीबद्दल सांगितलंय, जिच्याबद्दल जगातल्या लोकांना काहीच माहीत नाही. या शांतीला बायबलमध्ये “देवाची शांती” असं म्हटलंय. आणि ही शांती स्वर्गातल्या पित्यासोबत असलेल्या जवळच्या नात्यामुळे आपण अनुभवू शकतो. जेव्हा आपल्याला ही शांती मिळते तेव्हा आपल्याला सुरक्षित वाटतं. (फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा.) यामुळे भाऊबहिणींसोबत आपली मैत्री आणखी घट्ट होते आणि शांतीच्या देवासोबत आपलं जे चांगलं नातं आहे, त्यातूनही आपल्याला आनंद मिळतो. (१ थेस्सलनी. ५:२३) जेव्हा आपण देवाला ओळखू लागतो, त्याच्यावर भरवसा ठेवतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो, तेव्हा देवाची शांती आपल्याला मिळते. आणि आपण कठीण परिस्थितीला तोंड देत असताना आपल्याला कितीही चिंता असल्या, तरी मन शांत ठेवायला आपल्याला मदत होते.

२. कठीण समस्या असतानासुद्धा आपण देवाची शांती अनुभवू शकतो असं का म्हणता येईल?

जेव्हा महामारी, विपत्ती, सामाजिक अशांतता आणि छळ यांसारखी मोठमोठी संकटं येतात तेव्हा देवाची शांती अनुभवणं खरंच शक्य आहे का? यांसारखी संकटं येतात तेव्हा आपण घाबरून जातो, पण येशूने आपल्या शिष्यांना काय म्हटलं होतं, त्याकडे लक्ष द्या: “तुमची मनं अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा भीतीने खचू देऊ नका.” (योहा. १४:२७) बऱ्‍याच भाऊबहिणींनी येशूच्या या सल्ल्याचं पालन केलं आहे. आणि यहोवाच्या मदतीने त्यांनी कठीण परिस्थितीतसुद्धा ही शांती अनुभवली आहे.

महामारीच्या काळात शांती अनुभवणं

३. साथीचे रोग किंवा महामारी आल्यामुळे आपली शांती कशी भंग होऊ शकते?

जेव्हा एखाद्या रोगाची साथ येते किंवा महामारी पसरते, तेव्हा आपलं जीवन विस्कळीत होऊन जातं. कोव्हिड महामारीमुळे लोकांवर जो परिणाम झाला त्याचाच विचार करा. या काळादरम्यान घेतलेल्या एका सर्वेतून दिसून आलं, की अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना नीट झोप लागत नव्हती. या महामारीच्या काळात बऱ्‍याच लोकांना चिंता आणि निराशा यांसारख्या मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. लोकांचं दारू आणि अंमली पदार्थ सेवन करायचं प्रमाणही वाढलं. त्यासोबतच घरात हिंसेचं प्रमाणसुद्धा वाढलं आणि बऱ्‍याच लोकांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. तुम्ही ज्या भागात राहता तिथे महामारी पसरली, तर खूप जास्त चिंता न करता देवाची शांती तुम्हाला कशी अनुभवता येईल?

४. शेवटच्या दिवसांबद्दल येशूने केलेली भविष्यवाणी लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे शांती मिळते?

येशूने आधीच सांगितलं होतं की शेवटच्या दिवसांत “ठिकठिकाणी” रोगांच्या साथी, म्हणजेच भयानक आजार पसरतील. (लूक २१:११) पण ही गोष्ट माहीत झाल्यामुळे आपल्याला शांती कशी मिळेल? येशूने आधीच सांगितलं होतं की या गोष्टी होतील. त्यामुळे जेव्हा अशा गोष्टी घडतात, तेव्हा आपल्याला त्याचं आश्‍चर्य वाटत नाही आणि आपण विनाकारण चिंता करत बसत नाही. उलट, या शेवटच्या काळात जगत असताना, आपण येशूने दिलेल्या सल्ल्याचं पालन करायचा प्रयत्न करतो. त्याने म्हटलं: “सांभाळा, घाबरून जाऊ नका.”​—मत्त. २४:६.

महामारीच्या काळात बायबलचे ऑडिओ रेकॉर्डींग ऐकल्यामुळे आपल्याला आपलं मन शांत ठेवायला मदत होईल (परिच्छेद ५ पाहा)

५. (क) महामारी पसरते तेव्हा आपण फिलिप्पैकर ४:८, ९ प्रमाणे कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना केली पाहिजे? (ख) बायबलचं ऑडिओ रेकॉर्डींग ऐकल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

महामारी पसरल्यामुळे आपण खूप गोंधळून जाऊ शकतो आणि आपल्याला भीती वाटू शकते. डेझी b नावाच्या बहिणीच्या बाबतीतही असंच झालं. तिच्या काकांचा, चुलत भावाचा आणि डॉक्टरांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला. त्यामुळे तिला अशी भीती वाटू लागली की आपल्यालाही कोव्हिड होईल आणि आपल्यामुळे आपल्या वयस्कर आईलासुद्धा होईल. शिवाय, या महामारीच्या काळात नोकरीचंही काही खरं नव्हतं. आपली नोकरी जर गेली तर खाण्यापिण्याचा आणि घरचा खर्च कसा चालेल याचीही चिंता तिला होती. या सगळ्या गोष्टी तिच्या मनात घोळत होत्या आणि त्यामुळे तिची रात्रीची झोप उडाली होती. मग या बहिणीने आपली शांती टिकवून ठेवण्यासाठी काय केलं? तिने खासकरून यहोवाकडे अशी प्रार्थना केली, की त्याने तिचं मन शांत ठेवायला आणि चांगल्या गोष्टींवर विचार करायला मदत करावी. (फिलिप्पैकर ४:८, ९ वाचा.) तिने बायबलचे ऑडिओ रेकॉर्डींग ऐकले, आणि असं करून जणू तिने यहोवाला तिच्यासोबत बोलू दिलं. ती म्हणते, “बायबलची वचनं ज्या प्रकारे वाचली गेली आहेत, त्यामुळे माझं मन स्थिर झालं आणि यहोवाला माझी किती काळजी आहे हे मला जाणवलं.”​—स्तो. ९४:१९.

६. वैयक्‍तिक अभ्यास केल्यामुळे आणि सभांना गेल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल?

जेव्हा महामारी पसरते तेव्हा आपल्या दररोजच्या जीवनातल्या बऱ्‍याचशा गोष्टी बदलून जातात. पण असं असलं तरी वैयक्‍तिक अभ्यास करणं आणि सभेला जाणं सोडू नका. आपल्या बऱ्‍याच प्रकाशनांमध्ये आणि व्हिडिओंमध्ये अशा भाऊबहिणींची उदाहरणं आहेत ज्यांनी अशाच कठीण परिस्थितींचा सामना केला आहे. पण तरी त्यांनी यहोवाची सेवा करायचं सोडलेलं नाही. (१ पेत्र ५:९) सभांना गेल्यामुळे तुम्हालाही बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींवर विचार करता येईल आणि त्यातून उत्तेजन मिळेल. शिवाय त्यामुळे तुम्हाला इतरांना प्रोत्साहन देता येईल आणि त्यांच्याकडूनही तुम्हालाही प्रोत्साहन मिळेल. (रोम. १:११, १२) आपले भाऊबहीण जेव्हा आजारी होते, घाबरलेले होते किंवा त्यांना एकटं वाटत होतं, तेव्हा यहोवाने त्यांना कशी मदत केली, यावर जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुमचा विश्‍वास वाढेल आणि यहोवा तुम्हालाही मदत करेल याची तुम्हाला पक्की खातरी होईल.

७. प्रेषित योहानच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

भाऊबहिणींच्या संपर्कात राहायचा नेहमी प्रयत्न करा. महामारीदरम्यान आपल्याला आपल्या भाऊबहिणींपासून सुरक्षित अंतर ठेवून राहावं लागत असेल. अशा वेळी तुम्हाला कदाचित प्रेषित योहानसारखं वाटेल. त्याला गायसला प्रत्यक्ष भेटायची इच्छा होती. (३ योहा. १३, १४) पण परिस्थितीमुळे आपल्याला असं करता येणार नाही हे त्याला माहीत होतं. मग अशा वेळेस योहानने काय केलं? त्याने त्याला जे शक्य होतं ते केलं. त्याने गायसला पत्र लिहिलं. तुम्हालाही जेव्हा आपल्या भाऊबहिणींना प्रत्यक्ष भेटता येत नाही, तेव्हा तुम्ही फोन, व्हिडिओ कॉल आणि मेसेज यांसारख्या गोष्टींचा वापर करून त्यांच्या संपर्कात राहू शकता. तुम्ही भाऊबहिणींच्या संपर्कात राहाल तेव्हा तुम्हाला एकटं-एकटं वाटणार नाही, आणि अशा परिस्थितीत तुम्हाला शांत राहायला मदत होईल. पण तरीही तुम्हाला जास्त चिंता वाटत असेल, तर तुम्ही मंडळीतल्या वडिलांकडून मदत घेऊ शकता. ते तुम्हाला नक्की प्रोत्साहन देतील.​—यश. ३२:१, २.

विपत्तीच्या काळात शांती अनुभवणं

८. विपत्तीच्या काळात आपली शांती कशी भंग होऊ शकते?

तुमच्या भागात कधी वणवे, पूर किंवा भूकंप झाले आहेत का? झाले असतील, तर या विपत्ती होऊन गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दल विचार करून त्रास होत असेल. अशा घटनांमुळे जर तुमच्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला असेल किंवा तुमच्या घराचं किंवा सामानाचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला नक्कीच खूप दुःख होईल. तुम्हाला निराश झाल्यासारखं वाटेल आणि खूप रागपण येईल. पण याचा अर्थ असा होत नाही की तुमच्यात विश्‍वासाची कमतरता आहे, किंवा तुम्हाला धनसंपत्तीची ओढ आहे. या कठीण परिस्थितीतून जात असताना अशा भावना येणं साहजिकच आहे. आणि लोकही ते समजून घेतील. (ईयो. १:११) पण अशा परिस्थितीतही तुम्ही मनाची शांती टिकवून ठेवू शकता. ते कसं?

९. येशूने असं काय सांगितलं ज्यामुळे आपण विपत्तींचा सामना करायला तयार राहू शकतो?

आज जगातल्या काही लोकांना असं वाटतं, की अशा प्रकारच्या विपत्तींना त्यांना तोंड द्यावं लागणार नाही. पण आपण ज्या काळात राहतो त्यात विपत्तींचं प्रमाण वाढत जाईल आणि आपल्याला अशा विपत्तींची झळ बसेल हे आपण ओळखतो. कारण येशूने केलेली भविष्यवाणी आपल्याला माहीत आहे. त्याने म्हटलं होतं की शेवटच्या दिवसांत “मोठमोठे भूकंप” होतील आणि इतर विपत्तींचा आपल्याला सामना करावा लागेल. (लूक २१:११) शिवाय, ‘अनीती वाढेल’ असंही येशूने सांगितलं होतं. आज गुन्हेगारी, हिंसा आणि दहशतवादी हल्ल्याचं जे प्रमाण वाढलंय त्यातून हे दिसून येतं. (मत्त. २४:१२) पण लक्षात घ्या, येशूने असं कधीच म्हटलं नव्हतं, की यहोवाला न मानणाऱ्‍या लोकांवरच अशी संकटं येतील. उलट, यहोवाच्या बऱ्‍याच विश्‍वासू सेवकांनासुद्धा अशा समस्यांना तोंड द्यावं लागलंय. (यश. ५७:१; २ करिंथ. ११:२५) अशी एखादी विपत्ती आली तर कदाचित यहोवा चमत्कार करून आपल्याला त्यातून सोडवणार नाही. पण अशा परिस्थितीत शांत आणि स्थिर राहायला तो आपल्याला मदत करेल अशी खातरी आपण ठेवू शकतो.

१०. विपत्तींसाठी आधीपासूनच तयारी केल्यामुळे आपण यहोवावर भरवसा असल्याचं कसं दाखवतो? (नीतिवचनं २२:३)

१० एखादा तातडीचा प्रसंग आल्यानंतर काय करायचं याबद्दल आपण आधीच तयारी केली, तर आपल्याला त्या परिस्थितीत शांत राहायला मदत होईल. पण आधीच तयारी केल्यामुळे यहोवावर आपला विश्‍वास नाही असा याचा अर्थ होतो का? नक्कीच नाही. उलट आधीच तयारी केल्यामुळे यहोवावर आपला विश्‍वास आहे  हे आपण दाखवत असतो. कारण विपत्ती येण्याच्या आधीच आपण तयारी करावी असं देवाच्या वचनात सांगितलंय. (नीतिवचनं २२:३ वाचा.) बऱ्‍याच वेळा मासिकांमध्ये आणि मंडळीच्या सभांमध्ये आपल्याला अशा विपत्तींसाठी तयार राहायला सांगितलं जातं. तसंच, याबद्दल वेळोवेळी घोषणासुद्धा केल्या जातात. c यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या सूचनांचं आपण आत्तापासून  पालन केलं तर आपण दाखवत असू की आपला त्याच्यावर भरवसा आहे.

आधीच तयारी केल्यामुळे विपत्तीचा सामना करायला आपल्याला मदत होईल (परिच्छेद ११ पाहा) d

११. मार्गरेट यांच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

११ मार्गरेट नावाच्या बहिणीच्या बाबतीत काय झालं त्याचा विचार करा. ती ज्या भागात राहत होती त्या ठिकाणी जंगलात आग लागली. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्‍यांनी तिला तिचं घर लगेच सोडायला सांगितलं. बरेच लोक त्या वेळी त्यांचं घर सोडून पळत होते. त्यामुळे रस्त्यावर गाड्यांची कोंडी झाली आणि ती त्यातच अडकली. वातावरणात सगळीकडे काळा धूर पसरला होता. त्यामुळे मार्गरेट तिच्या कारमध्येच अडकून राहिली. पण या बहिणीने आधीच तयारी केली होती आणि त्यामुळे ती वाचली. तिने तिच्या बॅगेत एक नकाशा ठेवला होता, आणि त्याच्या मदतीने तिला सुरक्षित मार्गाने जाता आलं. तातडीचा प्रसंग आला तर तिला या रस्त्याचा वापर करता येईल म्हणून तिने हा रस्ता आधीच पाहून ठेवला होता. अशा प्रकारे मार्गरेटने आधीच तयारी केल्यामुळे तिचा जीव वाचला.

१२. आपण अधिकाऱ्‍यांकडून आणि संघटनेकडून मिळणाऱ्‍या सूचनांचं पालन का केलं पाहिजे?

१२ सगळ्यांच्या सुरक्षेसाठी अधिकारी कदाचित संचारबंदी लागू करतील. किंवा आपल्याला आपलं ठिकाण सोडून जायला सांगतील किंवा इतर काही सूचना आपल्याला देतील. अशा वेळी कदाचित असं होऊ शकतं, की लोक लगेच या सूचनांचं पालन करणार नाहीत. कारण त्यांना आपल्या गोष्टी सोडून जाणं कठीण वाटू शकतं. पण अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? बायबल म्हणतं: “माणसांनी स्थापन केलेल्या प्रत्येक अधिकाराच्या अधीन राहा; राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा; तसंच, राजाने नेमलेल्या राज्यपालांच्या अधीन राहा.” (१ पेत्र २:१३, १४) यासोबतच देवाच्या संघटनेकडूनसुद्धा आपल्याला सुरक्षेसाठी काही मार्गदर्शन दिलं जातं. जसं की, बऱ्‍याच वेळा आपल्याला आपला फोन नंबर आणि पत्ता मंडळीतल्या वडिलांना द्यायला सांगितलं जातं. म्हणजे विपत्तीच्या वेळेस ते तुम्हाला लगेच संपर्क करू शकतील. मग तुम्ही असं केलं आहे का? कधीकधी आपल्याला असंही सांगितलं जाऊ शकतं, की आपण आपल्या घरातच राहावं. किंवा ती जागा सोडून इतर सुरक्षित ठिकाणी जावं. गरजेच्या वस्तू साठवून ठेवण्याबद्दल किंवा इतरांना केव्हा आणि कशी मदत करायची याबद्दलसुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. जर आपण या सूचनांचं पालन केलं नाही तर आपल्या स्वतःच्या आणि मंडळीतल्या वडिलांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून आपण मिळणाऱ्‍या सूचनांचं नेहमी पालन केलं पाहिजे. लक्षात ठेवा, हे विश्‍वासू बांधव आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी झटत असतात. (इब्री १३:१७) मार्गरेट म्हणते: “मंडळीतल्या वडिलांनी ज्या गोष्टी सांगितल्या आणि संघटनेकडून जे मार्गदर्शन मिळालं, त्यामुळेच माझा जीव वाचू शकला.”

१३. स्थलांतरित झालेल्या भाऊबहिणींना आपला आनंद आणि शांती कशी टिकवून ठेवता आली?

१३ बऱ्‍याच भाऊबहिणींना विपत्तीमुळे, युद्धामुळे किंवा सामाजिक अशांततेमुळे त्यांचं घर सोडून दुसऱ्‍या ठिकाणी जावं लागलंय. स्थलांतरित झालेल्या या भाऊबहिणींनी नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायचा आणि यहोवाच्या सेवेत स्वतःला व्यस्त ठेवायचा प्रयत्न केला आहे. छळामुळे स्थलांतरित झालेल्या पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांप्रमाणेच हे भाऊबहीणसुद्धा “आनंदाचा संदेश” घोषित करत राहिले. (प्रे. कार्यं ८:४) यामुळे त्यांना त्यांच्या कठीण परिस्थितीवर नाही, तर देवाच्या राज्यावर लक्ष केंद्रित करायला मदत झाली. याचा परिणाम म्हणजे, ते आपली शांती आणि आनंद टिकवून ठेवू शकले.

छळ होत असताना शांती अनुभवणं

१४. छळामुळे आपली शांती कशी भंग होऊ शकते?

१४ छळामुळे आपली शांती भंग होऊ शकते. सहसा जेव्हा आपण भाऊबहिणींना भेटतो, त्यांच्यासोबत मिळून प्रचार करतो आणि कोणतीही भीती न बाळगता उपासनेशी संबंधित इतर कामं करतो तेव्हा आपल्याला समाधान आणि आनंद मिळतो. पण जेव्हा आपल्याकडून उपासनेचं हे स्वातंत्र्य काढून घेतलं जातं किंवा आपल्याला अटक केली जाते, तेव्हा आपण घाबरून जाऊ शकतो आणि पुढे काय होईल याची आपल्याला चिंता वाटू शकते. असं वाटणं साहजिक आहे. त्यामुळे येशूने सांगितलेल्या गोष्टींच्या बाबतीत आपण सावध असलं पाहिजे. त्याने म्हटलं होतं, की छळामुळे आपला विश्‍वास डळमळू शकतो. (योहा. १६:१, २) तर मग छळ होत असतानाही आपण आपली शांती कशी टिकवून ठेवू शकतो?

१५. आपला छळ झाला तरी आपल्याला घाबरण्याची गरज का नाही? (योहा. १५:२०; १६:३३)

१५ बायबलमध्ये म्हटलंय: ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्‍ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्‍या सगळ्यांचा  छळ केला जाईल.” (२ तीम. ३:१२) पण आन्द्रे नावाच्या एका भावाला ही गोष्ट समजून घ्यायला कठीण गेलं. त्यांच्या देशात आपल्या कामावर बंदी घालण्यात आली होती. ते म्हणतात: ‘इथे तर इतके यहोवाचे साक्षीदार आहेत! मग अधिकारी या सगळ्यांना कसं काय अटक करू शकतात?’ पण असा विचार करत राहिल्यामुळे त्यांची चिंता कमी होण्याऐवजी जास्तच वाढली. त्यांनी पाहिलं की, ‘आपल्याला अटक होणारच नाही,’ असा विचार इतर भाऊबहीण करत नव्हते. तर त्यांनी सगळ्या गोष्टी यहोवाच्या हातात सोपवून दिल्या होत्या. त्यामुळे ते आन्द्रेएवढी चिंता करत नव्हते. तेव्हा आन्द्रे यांनीसुद्धा त्यांच्यासारखाच विचार करायचं ठरवलं आणि पूर्णपणे यहोवावर भरवसा ठेवला. असं केल्यामुळे त्यांना देवाची शांती अनुभवायला मिळाली. आणि आता ते समस्या असतानाही आनंदी आहेत. आपल्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. येशूने सांगितलं की आपला छळ होईल, पण त्याने या गोष्टीचीही खातरी दिली की तशा परिस्थितीत आपण विश्‍वासू राहू शकतो.​—योहान १५:२०; १६:३३ वाचा.

१६. आपल्या कामावर प्रतिबंध लावला जातो किंवा बंदी घातली जाते तेव्हा आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे?

१६ आपल्या कामावर प्रतिबंध लावला जातो किंवा बंदी घातली जाते तेव्हा आपल्याला शाखा कार्यालयाकडून आणि मंडळीतल्या वडिलांकडून काही सूचना मिळू शकतात. आपल्याला सुरक्षित राहता यावं, आध्यात्मिक अन्‍न मिळत राहावं आणि जितकं शक्य असेल तितकं प्रचारकार्य करता यावं, म्हणून या सूचना आपल्याला दिल्या जातात. या सूचना देण्यामागचं कारण जरी समजलं नसलं, तरी या सूचनांचं पूर्णपणे पालन करायचा प्रयत्न करा. (याको. ३:१७) तसंच आपल्या भाऊबहिणींबद्दल आणि मंडळीबद्दल ज्यांना जाणून घ्यायचा हक्क नाही अशा कोणत्याही व्यक्‍तीला त्याबद्दल सांगू नका.​—उप. ३:७.

कठीण काळातही शांती अनुभवायला तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल? (परिच्छेद १७ पाहा) e

१७. पहिल्या शतकातल्या प्रेषितांप्रमाणे आपणसुद्धा काय करू शकतो?

१७ देवाच्या लोकांसोबत युद्ध करायचं सैतानाचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ते “येशूबद्दल साक्ष देण्याचं कार्य” करतात. (प्रकटी. १२:१७) पण सैतान आणि त्याच्या दुष्ट जगाला घाबरू नका! कारण विरोध असतानाही जेव्हा आपण प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम करतो, तेव्हा आपल्याला आनंद आणि शांती मिळते. पहिल्या शतकातल्या यहुदी अधिकाऱ्‍यांनी प्रेषितांना त्यांचं प्रचारकार्य थांबवण्याची आज्ञा दिली, तेव्हा त्यांनी त्यांच्याऐवजी देवाची आज्ञा पाळायचं ठरवलं. ते प्रचारकार्य करत राहिले आणि त्यामुळे त्यांना खूप आनंद मिळाला. (प्रे. कार्यं ५:२७-२९, ४१, ४२) जेव्हा आपल्या कार्यावर बंदी घातली जाते, तेव्हा आपण योग्य ती खबरदारी घेऊन प्रचारकार्य केलं पाहिजे. (मत्त. १०:१६) आपण आपल्या परीने शक्य असेल तितका प्रयत्न करत राहिलो, तर यहोवाचं मन आनंदित केल्यामुळे आणि लोकांचा जीव वाचवणाऱ्‍या कामात सहभाग घेतल्यामुळे आपल्याला देवाकडून मिळणारी शांती अनुभवता येईल.

“शांतीचा देव तुमच्यासोबत राहील”

१८. खरी शांती आपल्याला कोण देऊ शकतं?

१८ परिस्थिती कितीही वाईट झाली तरी आपण याची खातरी बाळगू शकतो, की देवाकडून मिळणारी शांती आपल्याला अनुभवता येईल. अशा परिस्थितीत आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपल्याला देवाकडून  मिळणाऱ्‍या शांतीची गरज आहे आणि ती शांती फक्‍त यहोवाच आपल्याला देऊ शकतो. म्हणून जेव्हा महामारी पसरते, विपत्ती येतात आणि आपला छळ केला जातो तेव्हा यहोवावर विसंबून राहा. त्याच्या संघटनेला नेहमी जडून राहा. जे सुंदर भविष्य देव तुम्हाला देणार आहे, त्याबद्दल नेहमी विचार करत राहा. असं केल्यामुळे “शांतीचा देव तुमच्यासोबत राहील.” (फिलिप्पै. ४:९) आपल्यासारखंच आपले इतर भाऊबहीणसुद्धा कुठल्या-न्‌-कुठल्या समस्येला तोंड देत आहेत. आपण त्यांना देवाची शांती अनुभवायला कशी मदत करू शकतो, हे आपण पुढच्या लेखात पाहू या.

गीत ३८ तो तुला बळ देईल

a यहोवा त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या लोकांना शांती द्यायचं वचन देतो. देव देत असलेली शांती काय आहे आणि आपण ती कशी मिळवू शकतो? तसंच, “देवाची शांती” आपल्याला महामारींचा, विपत्तींचा आणि छळाचा सामना करायला कशी मदत करू शकते? या लेखात आपण या प्रश्‍नांवर चर्चा करू या.

b काही नावं बदलण्यात आली आहेत.

cजब कहर टूट पड़े​—कुछ कदम उठाएँ और जान बचाएँ” हा २०१७ च्या सजग होइए! क्र. ५ या अंकातला लेख पाहा.

d चित्रांचं वर्णन: तातडीच्या प्रसंगी घर सोडून जायला सोपं जावं म्हणून एका बहिणीने आधीपासूनच तयारी केली आहे.

e चित्रांचं वर्णन: प्रचार कार्यावर बंदी असलेल्या ठिकाणी राहणारा एक भाऊ योग्य ती सावधगिरी बाळगून प्रचारकार्य करत आहे.