व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही “पृथ्वीचा वारसा” मिळवायला तयार आहात का?

तुम्ही “पृथ्वीचा वारसा” मिळवायला तयार आहात का?

येशूचं हे अभिवचन पूर्ण होण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत: “जे नम्र ते सुखी आहेत, कारण त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल.” (मत्त. ५:५) अभिषिक्‍त जन येशूसोबत स्वर्गातून राजे म्हणून राज्य करतील आणि अशा रितीने त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल. (प्रकटी. ५:१०; २०:६) पण बहुतेक खऱ्‍या ख्रिश्‍चनांना शांती आणि आनंद असलेल्या पृथ्वीवर कायमचं परिपूर्ण जीवन जगण्याची आशा आहे. आणि या अर्थाने त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल. पण आशा प्रकारच्या सुंदर पृथ्वीवर राहण्यासाठी त्यांना बरीच महत्त्वाची कामं पार पाडावी लागतील. त्यांपैकी तीन कामं म्हणजे पृथ्वीला नंदनवन बनवणं, पुनरुत्थान झालेल्या लोकांची काळजी घेणं आणि त्यांना शिकवणं. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला सहभाग घ्यायची इच्छा आहे हे आपण आजसुद्धा कसं दाखवू शकतो, ते आता आपण पाहू या.

पृथ्वीला नंदनवन बनवण्यासाठी तुम्ही तयार आहात का?

“पृथ्वीला भरून टाका आणि तिच्यावर अधिकार चालवा,” अशी आज्ञा जेव्हा यहोवाने मानवांना दिली तेव्हा त्यावरून हे दिसून आलं, की मानवांनी संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवावं अशी त्याची इच्छा होती. (उत्प. १:२८) भविष्यात ज्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल त्यांना ही आज्ञा पूर्ण करावी लागेल. आदाम आणि हव्वाच्या बाबतीत पाहिलं तर त्यांच्याकडे एदेन बाग होती आणि त्यांना फक्‍त या बागेच्या सीमा वाढवायच्या होत्या. पण आज एदेन बाग अस्तित्वात नाही. उलट आज पृथ्वीचं आणि पर्यावरणाचं भरपूर नुकसान झालं आहे. आणि त्यामुळे ज्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल त्यांना पृथ्वीला स्वच्छ करण्यासाठी बरीच कामं करावी लागतील. हे खूप मोठं काम असेल!

यावरून, बाबेलमधून परत आल्यानंतर इस्राएली लोकांसमोर जे मोठं काम होतं त्याची आपल्याला आठवण होते. ७० वर्षांपर्यंत त्यांचा देश ओसाड पडला होता. पण यशयाने अशी भविष्यवाणी केली होती, की यहोवाच्या मदतीने ते त्यांच्या देशाला पुन्हा सुंदर बनवतील. यशयाने म्हटलं होतं: “तो तिचं ओसाड रान एदेनसारखं, आणि तिचा वाळवंटी प्रदेश यहोवाच्या बागेसारखा करेल.” (यश. ५१:३) आणि खरंच इस्राएली लोकांना यात यश मिळालं. त्याचप्रमाणे या पृथ्वीचा वारसा मिळालेले लोक यहोवाच्या आशीर्वादाने पृथ्वीला नंदनवन बनवण्यात यशस्वी होतील. तुम्हालाही या कामात सहभाग घ्यायची इच्छा आहे का? असेल तर तुम्ही ती इच्छा आत्तापासूनच तुमच्या कामांमधून दाखवू शकता.

असं करण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही तुमचं घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवायचा प्रयत्न करू शकता. मग तुमच्या शेजारपाजारचे लोक स्वच्छतेकडे लक्ष देत नसले तरी तुम्ही हे करू शकता. याशिवाय राज्य सभागृह आणि संमेलन गृह स्वच्छ करण्याच्या आणि त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामात तुम्ही सहभाग घेऊ शकता. तसंच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही विपत्ती मदतकार्यात स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी फॉर्म भरू शकता. यावरून दिसून येईल, की गरज असेल त्या वेळेला भाऊबहिणींना मदत करायला तुम्ही तयार आहात. या प्रकल्पांमध्ये काम केल्यामुळे तुम्हाला काही खास कौशल्यं शिकता येतील. आणि नवीन जगात राहायचा आशीर्वाद जर तुम्हाला मिळाला, तर तिथे तुम्हाला या कौशल्यांचा वापरही करता येईल.

पुनरुत्थान झालेल्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का?

याईरच्या मुलीला पुन्हा जिवंत केल्यानंतर येशूने ‘तिला काहीतरी खायला द्या’ असं सांगितलं. (मार्क ५:४२, ४३) त्या १२ वर्षांच्या मुलीची काळजी घेणं काही मोठी गोष्ट नव्हती. पण ‘स्मारक कबरींमध्ये असलेले सगळे येशूची हाक ऐकतील आणि बाहेर येतील,’ तेव्हा त्यांची काळजी घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील याचा विचार करा. (योहा. ५:२८, २९) बायबलमध्ये याबद्दल जास्त माहिती दिलेली नसली तरी या सगळ्यांना अन्‍न, वस्त्र आणि निवारा या गोष्टींची गरज असेल हे आपण समजू शकतो. पण तेव्हा तुम्ही मदत करायला तयार असाल हे तुम्ही आताच कसं दाखवू शकता? चला काही गोष्टींचा विचार करू या.

तुम्ही पृथ्वीचा वारसा मिळवायला आतुर आहात हे तुम्ही आत्तापासूनच कसं दाखवू शकता?

विभागीय पर्यवेक्षक तुमच्या मंडळीला भेट देणार आहेत अशी घोषणा केली जाते, तेव्हा त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवण्यासाठी तुम्ही आपलं नाव देता का? खास पूर्ण वेळेच्या सेवेत असलेल्या भाऊबहिणींना बेथेलमधून क्षेत्रात काम करण्यासाठी पाठवलं जातं किंवा विभागीय पर्यवेक्षकांच्या प्रवासी कार्याची नेमणूक संपते आणि ते तुमच्या मंडळीत येतात तेव्हा तुम्ही राहण्यासाठी जागा शोधायला मदत करू शकता का? जर तुमच्या शहरात प्रांतीय किंवा खास अधिवेशन भरवलं जाणार असेल तर अधिवेशनाच्या आधी किंवा नंतर स्वयंसेवक म्हणून काम करायला किंवा अधिवेशनासाठी येणाऱ्‍या भाऊबहिणींचं स्वागत करायला तुम्ही पुढे याल का?

पुनरुत्थान झालेल्यांना शिकवायला तुम्ही तयार आहात का?

प्रेषितांची कार्यं २४:१५ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण अशी अपेक्षा करू शकतो, की नवीन जगात लाखो-करोडो लोकांचं पुनरुत्थान होईल. यांपैकी बरेच जण असे असतील ज्यांना पूर्वी कधीच यहोवाबद्दल शिकायची संधी मिळाली नव्हती. पण पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांना ही संधी दिली जाईल. a आणि देवाचे विश्‍वासू आणि अनुभवी सेवक शिकवण्याच्या या कामात सहभाग घेतील. (यश. ११:९) शार्लट नावाची एक बहीण या कामात सहभाग घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिने युरोप, दक्षिण अमेरिकेत आणि आफ्रिकेत प्रचाराचं काम केलंय. ती खूप आनंदाने असं म्हणते: “पुनरुत्थान झालेल्या लोकांना शिकवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. पूर्वी होऊन गेलेल्या एखाद्या व्यक्‍तीबद्दल मी वाचते तेव्हा बऱ्‍याचदा माझ्या मनात असा विचार येतो, की ‘त्या व्यक्‍तीला यहोवाबद्दल माहीत झालं असतं तर तिचं जीवन किती वेगळं असतं.’ पुनरुत्थान झालेल्या लोकांना यहोवाबद्दल आणि त्याची सेवा केल्यामुळे किती आनंद मिळतो हे सांगायला मी खूप आतुर आहे.”

येशू पृथ्वीवर येण्याआधी यहोवाचे जे विश्‍वासू सेवक होऊन गेले त्यांनासुद्धा नवीन जगात बऱ्‍याच गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. दानीएलने बऱ्‍याच भविष्यवाण्या लिहिल्या पण त्यांचा अर्थ तो समजू शकला नाही. (दानी. १२:८) विचार करा, या भविष्यवाण्यांचा अर्थ त्याला समजून सांगणं हा आपल्यासाठी किती मोठा बहुमान आणि आनंदाची गोष्ट असेल! शिवाय रूथ आणि नामीचापण विचार करा. त्या मसीहाच्या पूर्वज होत्या हे त्यांना सांगायला आपल्याला किती आनंद होईल! नवीन जगात आजच्या दुष्ट जगातल्या वाईट गोष्टी आणि ताणतणाव नसेल. अशा सुंदर परिस्थितीत जो शैक्षणिक कार्यक्रम सबंध जगात राबवला जाईल, त्यात सहभाग घ्यायला आपल्याला खरंच किती आनंद होईल!

त्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग घ्यायला तुम्ही उत्सुक आहात हे तुम्ही आजसुद्धा कसं दाखवू शकता? एक मार्ग म्हणजे तुम्ही तुमचं शिकवण्याचं कौशल्य वाढवू शकता आणि आज जगभरात चाललेल्या प्रचारकार्यात जास्तीत जास्त सहभाग घेऊ शकता. (मत्त. २४:१४) वाढत्या वयामुळे किंवा परिस्थितीमुळे तुम्हाला आज जास्त प्रमाणात प्रचाराचं काम करता येत नसलं, तरी तुम्ही मनापासून जे प्रयत्न करता त्यावरून दिसून येईल, की तुम्ही पुनरुत्थान झालेल्यांना शिकवायला उत्सुक आहात.

तर मग तुम्ही खरंच पृथ्वीचा वारसा मिळवण्यासाठी आतुर आहात का? तुम्ही त्या काळाची वाट पाहत आहात का जेव्हा तुम्ही पृथ्वीला नंदनवन बनवण्याच्या, तसंच पुनरुत्थान झालेल्यांची काळजी घेण्याच्या आणि त्यांना शिकवण्याच्या कामात सहभाग घ्याल? जर तुम्ही खरंच यासाठी उत्सुक असाल तर पृथ्वीचा वारसा मिळवल्यानंतर जी कामं केली जातील, त्यांसारख्या कामांमध्ये आजच आवेशाने सहभाग घेण्याचा प्रयत्न करा!

a सप्टेंबर २०२२ च्या टेहळणी बुरूज अंकातला “अनेकांना नीतिमत्त्वाच्या मार्गावर आणणं” हा लेख पाहा.