व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५२

तरुण बहिणींनो​—आध्यात्मिक रितीने प्रौढ बना

तरुण बहिणींनो​—आध्यात्मिक रितीने प्रौढ बना

‘त्याच प्रकारे स्त्रियांनी संयमी आणि सर्व बाबतींत विश्‍वासू असावं.’​—१ तीम. ३:११.

गीत १३३ तारुण्यात यहोवाची सेवा करू!

सारांश a

१. आध्यात्मिक रित्या प्रौढ होण्यासाठी आपण काय करायची गरज आहे?

 मुलं किती पटकन मोठी होतात याचं कधीकधी आपल्याला आश्‍चर्य वाटतं. त्यांची शारीरिक वाढ जरी आपोआप होत असली, तरी आध्यात्मिक वाढ आपोआप होत नाही. b (१ करिंथ. १३:११; इब्री. ६:१) आध्यात्मिक रित्या प्रौढ होण्यासाठी यहोवासोबत एक व्यक्‍तिगत नातं असणं खूप गरजेचं आहे. त्यासोबत यहोवाला आवडतील असे गुण स्वतःमध्ये वाढवण्यासाठी, काही व्यावहारिक कौशल्यं शिकण्यासाठी आणि पुढे येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍यांसाठी तयार व्हायला आपल्याला देवाच्या पवित्र शक्‍तीचीही गरज आहे.​—नीति. १:५.

२. उत्पत्ती १:२७ मधून आपल्याला काय समजतं आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत?

यहोवाने मानवांना स्त्री आणि पुरुष असं बनवलं. (उत्पत्ती १:२७ वाचा.) स्त्री आणि पुरुष यांची शारीरिक रचना वेगवेगळी असली, तरी इतर बाबतीतही त्यांच्यात फरक आहे. उदाहरणार्थ, यहोवाने स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या दिल्या आहेत. आणि या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यासाठी त्यांना काही गुणांची आणि कौशल्यांची गरज असते. (उत्प. २:१८) आध्यात्मिक रित्या प्रौढ होण्यासाठी तरुण बहिणी काय करू शकतात हे आपण या लेखात पाहणार आहोत आणि तरुण भाऊ काय करू शकतात हे आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.

देवाला आवडतील असे गुण स्वतःमध्ये वाढवा

रिबका, एस्तेर आणि अबीगईल यांच्यासारख्या विश्‍वासू स्त्रियांच्या सुंदर गुणांचं अनुकरण केल्यामुळे तुम्ही एक प्रौढ ख्रिस्ती स्त्री बनू शकता (परिच्छेद ३-४ पाहा)

३-४. तरुण बहिणी कोणाचं अनुकरण करू शकतात? (चित्रसुद्धा पाहा.)

बायबलमध्ये अशा बऱ्‍याच स्त्रियांबद्दल सांगितलंय, ज्यांचं यहोवावर प्रेम होतं आणि ज्यांनी विश्‍वासूपणे त्याची सेवा केली. (jw.org वरचा “बाइबल में बतायी गयी औरतों से हम क्या सीख सकते हैं?” हा लेख पाहा.) या लेखाच्या मुख्य वचनात सांगितल्याप्रमाणे या स्त्रिया “संयमी” आणि “सर्व बाबतींत विश्‍वासू” होत्या. इतकंच नाही, तर तुम्हाला तुमच्या मंडळीतही अशा प्रौढ ख्रिस्ती स्त्रिया दिसतील, ज्यांचं तुम्ही अनुकरण करू शकता.

तरुण बहिणींनो, तुमच्या ओळखीच्या कोणी प्रौढ ख्रिस्ती बहिणी आहेत का, ज्यांच्या उदाहरणाचं तुम्ही अनुकरण करू शकता? त्यांच्यातले सुंदर गुण ओळखायचा प्रयत्न करा आणि आपल्यालाही ते गुण कसे दाखवता येतील याचा विचार करा. पुढच्या काही परिच्छेदांमध्ये आपण अशा तीन गुणांचा विचार करणार आहोत, जे एका प्रौढ ख्रिस्ती स्त्रीमध्ये असणं गरजेचंय.

५. एका प्रौढ खिस्ती बहिणीसाठी नम्रतेचा गुण का महत्त्वाचा आहे?

नम्रतेचा  गुण एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जी बहीण नम्र असते, तिचं यहोवासोबत आणि इतरांसोबत चांगलं नातं असतं. (याको. ४:६) उदाहरणार्थ, ज्या बहिणीचं यहोवावर प्रेम आहे, ती नम्रतेने १ करिंथकर ११:३ मध्ये सांगितलेल्या तत्त्वाचं पालन करते. आणि मंडळीत व कुटुंबात ज्यांना अधिकार दिला आहे त्यांच्या ती अधीन राहते. c

६. नम्र असण्याच्या बाबतीत तरुण बहिणी रिबकाच्या उदाहरणातून काय शिकू शकतात?

रिबकाचंच उदाहरण घ्या. ती एक बुद्धिमान स्त्री होती. तिने तिच्या संपूर्ण आयुष्यात धैर्याने निर्णय घेतले. तसंच, कधी काय करायचं आणि कसं वागायचं हे तिला माहीत होतं. (उत्प. २४:५८; २७:५-१७) असं असलं, तरी ती दुसऱ्‍यांचा आदर करायची आणि ज्यांना अधिकार देण्यात आला होता, त्यांच्या आज्ञेत राहायची. (उत्प. २४:१७, १८, ६५) तुम्हीसुद्धा रिबकासारखं नम्र राहिला आणि यहोवाने घालून दिलेल्या व्यवस्थेला पाठिंबा दिला, तर तुमच्या कुटुंबासमोर आणि मंडळीसमोर तुमचं एक चांगलं उदाहरण असेल.

७. तरुण बहिणी एस्तेरचं अनुकरण करून मर्यादांची जाणीव असल्याचं कसं दाखवू शकतात?

मर्यादांची जाणीव असणं  हा आणखी एक असा गुण आहे, जो सगळ्या ख्रिश्‍चनांमध्ये असला पाहिजे. बायबल सांगतं, “जे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतात, त्यांच्याकडे बुद्धी असते.” (नीति. ११:२) एस्तेरसुद्धा अशीच होती. ती देवाला विश्‍वासू होती आणि तिच्या मर्यादांची तिला जाणीव होती. आणि यामुळेच ती राणी बनल्यावर गर्वाने फुगली नाही. तिच्यापेक्षा वयाने मोठा असलेला तिचा चुलत भाऊ मर्दखय याचा सल्ला तिने ऐकला आणि त्याप्रमाणे ती वागली. (एस्ते. २:१०, २०, २२) तरुण बहिणींनो, तुम्हालाही मर्यादांची जाणीव ठेवून इतरांकडून सल्ला घेता येईल आणि तो लागू करता येईल.—तीत २:३-५.

८. पहिले तीमथ्य २:९, १० प्रमाणे मर्यादांची जाणीव असल्यामुळे एका बहिणीला पेहरावाच्या आणि सजण्या-सवरण्याच्या बाबतीत चांगले निर्णय घ्यायला कशी मदत होऊ शकते?

एस्तेरने आणखी एका मार्गाने मर्यादांची जाणीव असल्याचं दाखवलं. “ती दिसायला अतिशय सुंदर आणि बांधेसूद होती.” तरी तिने इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधलं नाही. (एस्ते. २:७, १५) एस्तेरच्या या उदाहरणातून ख्रिस्ती स्त्रियांना कसा फायदा होऊ शकतो? एक मार्ग १ तीमथ्य २:९, १० (वाचा.) मध्ये दिलाय. प्रेषित पौलने ख्रिस्ती स्त्रियांना शालीनतेने आणि विचारशीलपणे पेहराव करायचा सल्ला दिला. इथे ज्या ग्रीक शब्दांचा वापर करण्यात आलाय, त्यांवरून कळतं की ख्रिस्ती स्त्रियांचा पेहराव पाहून इतरांच्या मनात आदर निर्माण झाला पाहिजे. तसंच, त्या इतरांच्या भावनांचा आणि मतांचा विचार करतात हेही त्यांच्या पेहरावावरून दिसून आलं पाहिजे. ज्या ख्रिस्ती बहिणींचा असाच शालीन पेहराव असतो, त्यांचं आम्हाला खरंच कौतुक करावंसं वाटतं.

९. अबीगईलच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

समंजसपणा  हा आणखी एक असा गुण आहे, जो सगळ्या प्रौढ ख्रिस्ती बहिणींमध्ये असला पाहिजे. समंजसपणा म्हणजे काय? योग्य आणि अयोग्य यांतला फरक ओळखून योग्य ते करण्याची क्षमता म्हणजे समंजसपणा. अबीगईलचंच उदाहरण घ्या. तिच्या पतीने एक चुकीचा निर्णय घेतला होता आणि त्याचे गंभीर परिणाम त्याच्या संपूर्ण घराण्याला भोगावे लागणार होते. पण अबीगईलने लगेच पाऊल उचललं आणि तिने योग्य निर्णय घेतल्यामुळे बऱ्‍याच लोकांचा जीव वाचला. (१ शमु. २५:१४-२३, ३२-३५) समंजसपणामुळे आपल्याला कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं हे समजायला मदत होते. त्यासोबतच एक समंजस व्यक्‍ती इतरांची विचारपूस करताना त्यांच्या खाजगी गोष्टींबद्दल असं काही विचारणार किंवा बोलणार नाही, ज्यांमुळे त्यांना अवघडल्यासारखं वाटेल.—१ थेस्सलनी. ४:११.

काही व्यावहारिक कौशल्यं शिकून घ्या

चांगल्या प्रकारे लिहायला आणि वाचायला शिकल्यामुळे तुम्हाला कसा फायदा झालाय? (परिच्छेद ११ पाहा)

१०-११. चांगल्या प्रकारे लिहायला आणि वाचायला शिकून घेतल्यामुळे तुम्हाला आणि इतरांनाही कसा फायदा होऊ शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१० तरुण बहिणींनी काही व्यावहारिक कौशल्यं शिकून घेणंही खूप गरजेचं आहे. एक तरुण बहीण जेव्हा लहानपणापासूनच अशी कौशल्यं शिकते, तेव्हा तिला आयुष्यभर त्याचा फायदा होतो. यांपैकी काही कौशल्यं कोणती आहेत हे आता आपण पाहू या.

११ चांगल्या प्रकारे लिहायला आणि वाचायला शिका.  काही संस्कृतींमध्ये स्त्रियांना लिहिता-वाचता येणं गरजेचं नाही असं समजलं जातं. पण सगळ्याच ख्रिश्‍चनांना लिहिता-वाचता येणं गरजेचंय. d (१ तीम. ४:१३) त्यामुळे कोणताही अडथळा आला तरी लिहायला-वाचायला शिकायचं सोडू नका. याचा तुम्हाला कसा फायदा होईल? तुम्हाला तुमचा खर्च भागवण्यासाठी नोकरी मिळवता येईल. त्यासोबतच तुम्हाला देवाचं वचन चांगल्या प्रकारे शिकून घेता येईल आणि ते इतरांनाही सांगता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायबल वाचल्यामुळे आणि त्यावर मनन केल्यामुळे यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी घनिष्ठ होईल.—यहो. १:८; १ तीम. ४:१५.

१२. नीतिवचनं ३१:२६ मधून चांगल्या प्रकारे बोलायच्या कौशल्याबद्दल तुम्हाला काय शिकायला मिळतं?

१२ चांगल्या प्रकारे बोलायला शिका.  सर्वच ख्रिश्‍चनांना हे कौशल्य आलं पाहिजे. याबद्दल शिष्य याकोबने एक व्यावहारिक सल्ला दिला. त्याने म्हटलं: “प्रत्येकाने ऐकायला उत्सुक आणि बोलण्यात संयमी असावं.” (याको. १:१९) इतरांचं लक्ष देऊन ऐकल्यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल जिव्हाळा किंवा “सहानुभूती” असल्याचं दाखवत असता. (१ पेत्र ३:८) समोरची व्यक्‍ती काय बोलते किंवा तिला कसं वाटतंय हे तुम्हाला समजलं नाही, तर योग्य प्रश्‍न विचारून ते जाणून घ्या. मग बोलण्याआधी विचार करून बोला. (नीति. १५:२८, तळटीप) स्वतःला विचारा: ‘मला जे बोलायचं आहे ते खरं आणि इतरांना प्रोत्साहन देणारं आहे का? त्यातून प्रेम आणि आदर दिसून येईल का?’ ज्या बहिणींकडे हे कौशल्य आहे त्यांच्याकडून शिका. (नीतिवचनं ३१:२६ वाचा.) ते कसं बोलतात त्याकडे लक्ष द्या. हे कौशल्य तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे शिकून घ्याल, तितकं इतरांसोबतचं तुमचं नातं चांगलं होईल.

ज्या बहिणीला घर सांभाळायला चांगलं जमतं, तिच्या घरात नेहमी आनंदी वातावरण असतं. तसंच, कुटुंबासाठी आणि मंडळीसाठी ती एक आशीर्वाद असते (परिच्छेद १३ पाहा)

१३. तुम्ही घर सांभाळायला कसं शिकू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)

१३ घर सांभाळायला शिका.  बऱ्‍याच ठिकाणी घर सांभाळण्याची जबाबदारी स्त्रियांवरच असते. तुम्ही तुमच्या आईकडून किंवा दुसऱ्‍या एखाद्या बहिणीकडून यासाठी लागणारी कौशल्यं शिकू शकता. सिंडी नावाची बहीण म्हणते: “माझ्या आईने मला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवली. तिने मला शिकवलं की कष्ट करण्यातच आनंद असतो. तिने मला स्वयंपाक करायला, साफसफाई करायला, शिवणकाम करायला आणि बाजार करायला शिकवलं. त्यामुळे मला घर सांभाळायला सोपं जातं. आणि मी यहोवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे करू शकते. आईने मला घरी आलेल्या लोकांचा पाहुणचार करायलाही शिकवलं. त्यामुळे मला वेगवेगळ्या भाऊबहिणींना भेटता आलं आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं.” (नीति. ३१:१५, २१, २२) ज्या बहिणी मेहनती असतात, पाहुणचार दाखवतात आणि ज्यांना घर सांभाळायला चांगलं जमतं त्यांच्या घरात नेहमी आनंदी वातावरण असतं. कुटुंबासाठी आणि मंडळीसाठी त्या एक आशीर्वादच असतात.​—नीति. ३१:१३, १७, २७; प्रे. कार्यं १६:१५.

१४. क्रिस्टलच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि तुमचं लक्ष कोणत्या गोष्टींवर असलं पाहिजे?

१४ स्वावलंबी व्हा. स्वावलंबी असणं हा आणखी एक गुण आहे, जो सर्व ख्रिश्‍चनांमध्ये असला पाहिजे. (फिलिप्पै. ४:११) क्रिस्टल नावाची बहीण म्हणते: “कॉलेजमध्ये मी कोणता विषय निवडावा हे ठरवण्यासाठी माझ्या आईवडिलांनी मला मदत केली. मला असा एक विषय निवडायचा होता, ज्यामुळे मला व्यावहारिक कौशल्यं शिकता येतील. माझ्या वडिलांनी मला अकाउंटिंगचा विषय निवडायचं प्रोत्साहन दिलं. आणि त्यामुळे मला खूप फायदा झाला.” पैसे कमवता येतील असं एखादं कौशल्य शिकण्यासोबतच आपण आणखी एक गोष्ट शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण योग्य बजेट बनवून पैसे काळजीपूर्वक खर्च करायलाही शिकलं पाहिजे. (नीति. ३१:१६, १८) विनाकारण कर्ज घेण्यापेक्षा आपण आहे त्यात समाधानी राहायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक ध्येयांवर लक्ष देता येईल.​—१ तीम. ६:८.

पुढे येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या सांभाळण्यासाठी तयारी करा

१५-१६. अविवाहित बहिणींमुळे इतर भाऊबहिणींना कसा फायदा होऊ शकतो? (मार्क १०:२९, ३०)

१५ तुम्ही जर यहोवाला आवडतील असे गुण स्वतःमध्ये वाढवायचा आणि काही व्यावहारिक कौशल्यं शिकून घ्यायचा प्रयत्न केला, तर तुम्ही पुढे येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या सांभाळण्यासाठी स्वतःला तयार करू शकता. तर मग तुम्ही काय करू शकता?

१६ काही काळासाठी तुम्ही अविवाहित राहू शकता.  बऱ्‍याच संस्कृतींमध्ये अविवाहित राहणं चांगलं समजलं जात नाही. तरी काही बहिणी येशूने सांगितलेली गोष्ट लक्षात घेऊन अविवाहित राहायचा निर्णय घेतात. (मत्त. १९:१०-१२) तर इतर काही बहिणी त्यांच्या परिस्थितींमुळे कदाचित अविवाहित राहायचं निवडतात. पण याची खातरी असू द्या की यामुळे यहोवा आणि येशू तुम्हाला कमी समजत नाहीत. संपूर्ण जगभरात अविवाहित बहिणी मंडळ्यांसाठी एक आशीर्वादच आहेत. इतर भाऊबहिणींवर असलेल्या प्रेमामुळे आणि त्यांच्याबद्दल असलेल्या काळजीमुळेच त्या बऱ्‍याच जणांसाठी आध्यात्मिक अर्थाने आई आणि बहिणीसारख्या ठरल्या आहेत.​—मार्क १०:२९, ३० वाचा; १ तीम. ५:२.

१७. एक तरुण बहीण पूर्ण वेळच्या सेवेत जाण्यासाठी आता कशी तयारी करू शकते?

१७ तुम्ही पूर्ण वेळचे सेवक बनू शकता.  जगभरात चाललेल्या प्रचारकार्यात ख्रिस्ती बहिणींचा खूप मोठा वाटा आहे. (स्तो. ६८:११) तुम्हीसुद्धा पूर्ण वेळच्या सेवेत जायचा विचार करू शकता का? तुम्ही कदाचित एक पायनियर म्हणून, बांधकाम प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून किंवा बेथेलमध्ये सेवा करायचं ध्येय ठेवू शकता. त्यासाठी प्रार्थना करा. आणि ज्यांनी अशी ध्येयं गाठली आहेत त्यांच्याशी बोला, तसंच तुम्हाला त्यासाठी काय करता येईल, हे त्यांना विचारा. आणि मग चांगली योजना करा म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला काम करता येईल. पूर्ण वेळच्या सेवेत जायचं तुमचं ध्येय गाठल्यामुळे यहोवाची सेवा करायचे बरेच चांगले मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील.

तुम्ही जर लग्न करायचा विचार करत असाल, तर तुम्ही खूप विचार करून तुमचा जोडीदार निवडला पाहिजे (परिच्छेद १८ पाहा)

१८. एका बहिणीने विचार करून जोडीदार का निवडला पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)

१८ तुम्ही कदाचित लग्न करायचा विचार कराल.  आपण ज्या गुणांबद्दल आणि कौशल्यांबद्दल चर्चा केली त्यांमुळे तुम्हाला एक चांगली पत्नी बनायला मदत होईल. तुम्ही जर लग्न करायचा विचार करत असाल, तर तुम्ही खूप विचार करून तुमचा जोडीदार निवडला पाहिजे. कारण हा तुमच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक निर्णय आहे. लक्षात असू द्या की तुम्ही ज्या व्यक्‍तीसोबत लग्न कराल तो तुमचा मस्तक असेल. आणि तुम्हाला त्याच्या अधीन राहावं लागेल. (रोम. ७:२; इफिस. ५:२३, ३३) म्हणून स्वतःला विचारा: ‘मंडळीत त्याचं एक चांगलं उदाहरण आहे का? तो त्याच्या आयुष्यात आध्यात्मिक गोष्टींना पहिलं स्थान देतो का? तो योग्य निर्णय घेतो का? तो त्याच्या चुका कबूल करतो का? तो स्त्रीयांचा आदर करतो का? यहोवासोबतचं माझं नातं मजबूत करायला तो मला मदत करेल का आणि माझ्या गरजा पूर्ण करेल का? तो माझा चांगला मित्र बनू शकेल का? तो त्याच्या जबाबदाऱ्‍या चांगल्या प्रकारे पूर्ण करतो का? उदाहरणार्थ, मंडळीत त्याला कोणत्या जबाबदाऱ्‍या आहेत आणि तो त्या कशा पूर्ण करतो?’ (लूक १६:१०; १ तीम. ५:८) तुम्हाला एक चांगला पती हवा असेल, तर तुम्हीसुद्धा एक चांगली पत्नी असलं पाहिजे.

१९. “सहायक” असणं एक मोठी गोष्ट का आहे?

१९ बायबल म्हणतं की चांगली पत्नी “एक सहायक” असते. आणि तिच्या पतीसाठी “एक योग्य असा साथीदार” असते. (उत्प. २:१८) पण पत्नीबद्दल इथे जे म्हटलंय त्यावरून तिचा दर्जा कमी असल्याचं दिसतं का? नक्कीच नाही! उलट सहायक असणं ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण बायबलमध्ये यहोवालाही “सहायक” म्हटलंय. (स्तो. ५४:४; इब्री १३:६) एक पत्नी तिच्या पतीला कुटुंबासाठी योग्य निर्णय घ्यायला मदत करते आणि त्याला पाठिंबा देते, तेव्हा ती एक योग्य साथीदार असल्याचं दिसून येतं. तसंच, तिचं यहोवावर प्रेम असल्यामुळेच इतरांसमोर आपल्या पतीचं चांगलं नाव असावं म्हणून ती प्रयत्न करते. (नीति. ३१:११, १२; १ तीम. ३:११) म्हणून बहिणींनो, पुढे येणाऱ्‍या या जबाबदारीची तयारी करण्यासाठी तुम्ही यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत करू शकता, तसंच घरातल्या आणि मंडळीतल्या लोकांची मदत करून चांगली सहायक बनू शकता.

२०. एक बहीण जेव्हा चांगली आई बनायचा प्रयत्न करते, तेव्हा कुटुंबाला कसा फायदा होतो?

२० तुम्ही कदाचित आई बनायचा विचार कराल.  लग्नानंतर तुम्ही दोघं कदाचित मुलं होऊ द्यायचा निर्णय घ्याल. (स्तो. १२७:३) त्यामुळे एक चांगली आई बनण्यासाठी काय करणं गरजेचं आहे याचा तुम्ही आधीच विचार केला पाहिजे. आपण या लेखात ज्या गुणांबद्दल आणि कौशल्यांबद्दल पाहिलं, त्यांमुळे तुम्हाला एक चांगली पत्नी आणि आई व्हायला मदत होईल. पत्नी जेव्हा इतरांशी प्रेमाने वागते, इतरांची काळजी घेते आणि इतरांशी धीराने वागते, तेव्हा घरात चांगलं वातावरण असतं आणि मुलांनाही त्यामुळे सुरक्षित आणि आपलंसं वाटतं.—नीति. २४:३.

ज्या तरुण बहिणींनी बायबलमधून शिकलेल्या गोष्टी लागू केल्या आहेत, त्या आध्यात्मिक रितीने प्रौढ बनल्या आहेत (परिच्छेद २१ पाहा)

२१. आपल्या बहिणींबद्दल तुम्हाला कसं वाटतं आणि का? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

२१ बहिणींनो, यहोवासाठी आणि त्याच्या लोकांसाठी तुम्ही जे काही करता त्याबद्दल आम्हाला तुमचं खरंच खूप कौतुक करावंसं वाटतं! (इब्री ६:१०) देवाला आवडतील असे गुण स्वतःमध्ये वाढवण्यासाठी, स्वतःला आणि इतरांना फायदा व्हावा म्हणून काही कौशल्यं शिकण्यासाठी, तसंच पुढे येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या पार पाडायची तयारी करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेता. यहोवाच्या संघटनेसाठी तुम्ही खरंच एक आशीर्वाद आहात!

गीत १३७ विश्‍वासू स्त्रिया, आमच्या ख्रिस्ती बहिणी

a तरुण बहिणींनो, मंडळीत तुमचं एक महत्त्वाचं स्थान आहे. तुम्ही देवाला आवडतील असे गुण स्वतःमध्ये वाढवून, व्यावहारिक कौशल्यं शिकून आणि पुढे येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍यांसाठी तयारी करून एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनू शकता. त्यामुळे यहोवाच्या सेवेत तुम्हाला भरपूर आशीर्वाद अनुभवायला मिळतील.

b शब्दांचा अर्थ: एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती या जगाच्या नाही, तर देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाने चालते. तो किंवा ती येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करते, यहोवासोबत जवळचं नातं टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घेते आणि इतरांवर निःस्वार्थ प्रेम करते.

d वाचन करणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल jw.org वर असलेला “तुमच्या मुलांना वाचनाची व अभ्यासाची गोडी लावा” हा लेख पाहा.