व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५३

तरुण भावांनो​—आध्यात्मिक रितीने प्रौढ बना

तरुण भावांनो​—आध्यात्मिक रितीने प्रौढ बना

“बांधवांनो, समजण्याच्या बाबतीत लहान मुलांसारखं होऊ नका, तर . . . प्रौढांसारखं व्हा.”​—१ करिंथ. १४:२०.

गीत १३५ यहोवाची विनंती: “माझ्या मुला, सुज्ञपणे वाग”

सारांश a

१. यशस्वी व्हायचं असेल, तर ख्रिस्ती भावांनी काय केलं पाहिजे?

 प्रेषित पौलने करिंथकरांना असं उत्तेजन दिलं: “बांधवांनो, समजण्याच्या बाबतीत लहान मुलांसारखं होऊ नका, तर . . . प्रौढांसारखं व्हा.” (१ करिंथ. १४:२०) ज्यांना येशूचं अनुकरण करायचं आहे, त्यांनी या सल्ल्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यात यशस्वी व्हायचं असेल, तर त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूत देवाच्या नियमांचं पालन करायला आणि बायबल तत्त्वं लागू करायला शिकलं पाहिजे. (लूक २:५२) पण तरुण भावांनी एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनणं इतकं महत्त्वाचं का आहे?

२-३. तरुण भावांनी आध्यात्मिक रित्या प्रौढ बनणं का महत्त्वाचं आहे?

भावांना कुटुंबामध्ये आणि मंडळीमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या पार पाडायच्या असतात. त्यामुळे तरुण भावांनो, पुढे पार पाडाव्या लागणाऱ्‍या जबाबदाऱ्‍यांच्या बाबतीत तुम्ही नक्कीच विचार केला असेल. तुम्ही कदाचित पूर्ण वेळच्या सेवेत जायचं, एक सहायक सेवक बनायचं आणि नंतर मंडळीत वडील म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलं असेल. तसंच, लग्न करून आपलं कुटुंब वाढवायची तुमची इच्छा असेल. (इफिस. ६:४; १ तीम. ३:१) ही ध्येयं पूर्ण करायची असतील आणि त्यात यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला आध्यात्मिक रित्या प्रौढ असणं गरजेचं आहे. b

मग आध्यात्मिक रित्या प्रौढ होण्यासाठी तुम्हाला कशामुळे मदत होईल? त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गुणांमुळे आणि कौशल्यांमुळे मदत होईल. मग, पुढे येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तुम्ही आत्तापासूनच कशी तयारी करू शकता?

आध्यात्मिक रित्या प्रौढ बनण्यासाठी . . .

येशूच्या सुंदर गुणांचं अनुकरण केल्यामुळे तुम्हाला प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनायला मदत होईल (परिच्छेद ४ पाहा.)

४. तरुण भाऊ कोणाच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात? (चित्रसुद्धा पाहा.)

तुम्ही कोणाच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करू शकता याचा विचार करा.  बायबलमध्ये अशी बरीच चांगली उदाहरणं आहेत, ज्यांचं अनुकरण तुम्ही करू शकता. पूर्वीच्या काळात होऊन गेलेल्या या विश्‍वासू सेवकांचं देवावर प्रेम होतं आणि त्याच्या लोकांची काळजी घेण्यासाठी त्यांनी बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या पार पाडल्या. तसंच, तुमच्या स्वतःच्याच कुटुंबामध्ये आणि मंडळीमध्ये असे बरेच जण असतील, ज्यांच्या चांगल्या उदाहरणाचं तुम्ही अनुकरण करू शकता. (इब्री १३:७) यासोबतच येशूचं सगळ्यात चांगलं उदाहरणसुद्धा तुमच्यासमोर आहे. (१ पेत्र २:२१) या सर्व उदाहरणांचा अभ्यास करताना त्यांच्या चांगल्या गुणांबद्दल विचार करा. (इब्री १२:१, २) आणि मग तुम्ही त्यांचं अनुकरण कसं कराल याचा विचार करा.

५. विचारशक्‍ती वाढवणं का महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ती कशी वाढवू शकता? (स्तोत्र ११९:९)

विचारशक्‍ती वाढवा आणि तिचं रक्षण करा.  (नीति. ३:२१) विचार करून वागणारी व्यक्‍ती कोणतीही गोष्ट करण्याआधी तिच्या परिणामांचा काळजीपूर्वक विचार करते. म्हणून ही क्षमता वाढवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घ्या. का? कारण जगात तुम्हाला सगळीकडे असे तरुण पाहायला मिळतील, जे स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. त्यांचा तुमच्यावर प्रभाव पडू शकतो. (नीति. ७:७; २९:११) तसंच, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट आणि सोशल मीडियाचासुद्धा तुमच्यावर खूप जबरदस्त प्रभाव पडू शकतो. मग विचारशक्‍ती वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? सर्वात आधी बायबलमधली तत्त्वं शिकून घ्या आणि त्यांचं पालन केल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल याचा विचार करा. आणि मग यहोवाला आवडतील असे निर्णय घेण्यासाठी या तत्त्वांचा वापर करा. (स्तोत्र ११९:९ वाचा.) तुम्ही जर ही क्षमता स्वतःमध्ये विकसित केली, तर एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनण्यासाठी तुम्ही एक महत्त्वाचं पाऊल उचललंय असं म्हणता येईल. (नीति. २:११, १२; इब्री ५:१४) आता विचारशक्‍तीचा कोणत्या दोन परिस्थितींमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो याचा विचार करा: (१) बहिणींसोबत वागताना आणि (२) पेहरावाबद्दल किंवा दिसण्याबद्दल निर्णय घेताना.

६. विचारशक्‍तीमुळे एका तरुण भावाला बहिणींशी आदराने वागायला कशी मदत होईल?

तुमच्याकडे जर विचारशक्‍ती असेल, तर तुम्ही स्त्रियांशी आदराने वागाल. उदाहरणार्थ, एका तरुण भावाला मंडळीतली एखादी बहीण आवडत असेल आणि लग्नाच्या हेतूने तिच्याशी आणखी ओळख वाढवायची त्याची इच्छा असेल, तर यात चुकीचं काहीच नाही. पण जर तो भाऊ लग्नाचा विचार करत नसेल, तर त्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जसं की, त्या बहिणीशी वागताना तो असं काहीही बोलणार नाही, लिहिणार नाही किंवा करणार नाही, ज्यामुळे तिला असं वाटेल की तो लग्नाच्या विचाराने हे सगळं करत आहे. (१ तीम. ५:१, २) लग्न करायच्या हेतूने तो तिच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत असेल, तर त्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की तो तिला कधीही एकटं भेटणार नाही. तर तिला भेटताना नेहमी कोणीतरी मोठी व्यक्‍ती त्या बहिणीसोबत असेल याची तो खातरी करेल. आणि अशा प्रकारे तिचं नाव खराब होणार नाही याची तो नेहमी काळजी घेईल.​—१ करिंथ. ६:१८.

७. एका तरुण भावाला कपड्यांच्या आणि दिसण्याच्या बाबतीत निवड करताना विचारशक्‍तीमुळे कशी मदत होऊ शकते?

एक तरुण भाऊ कपड्यांच्या आणि दिसण्याच्या बाबतीत ज्या प्रकारचे निर्णय घेतो त्यावरूनसुद्धा त्याने विचारशक्‍ती विकसित केली आहे की नाही हे दिसून येतं. बऱ्‍याच वेळा लोकप्रिय असलेल्या स्टाईल आणि फॅशनचे कपडे असे लोक बनवतात, ज्यांना यहोवाच्या स्तरांबद्दल अजिबात आदर नसतो आणि ते अनैतिक जीवन जगत असतात. आणि त्यांच्या कपड्यांच्या स्टाईलवरून आणि ते ज्या प्रकारचे कपडे बनवतात त्यांवरूनसुद्धा त्यांची अनैतिक विचारसरणी दिसून येते. ते टाईट फिटिंगचे आणि ज्या कपड्यांमध्ये एक पुरुष स्त्रियांसारखा दिसतो अशा प्रकारचे कपडे तयार करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आध्यात्मिक रितीने प्रौढ बनण्याचा प्रयत्न करत असलेला भाऊ कपड्यांच्या बाबतीत निवड करताना बायबल तत्त्वांच्या आधारावर निवड करेल आणि मंडळीत ज्यांनी चांगलं उदाहरण मांडलंय त्यांचा पेहराव कसा आहे याचाही तो विचार करेल. तो स्वतःला विचारू शकतो: ‘माझ्या कपड्यांवरून मी समंजस आहे आणि इतरांचा विचार करतोय हे दिसून येतं का? मी खरंच देवाची उपासना करतोय हे दिसून येतं का?’ (१ करिंथ. १०:३१-३३; तीत २:६) ज्या तरुण भावाने विचारशक्‍ती विकसित केली आहे, त्याचा मंडळीतले भाऊबहीणसुद्धा आदर करतील आणि त्यासोबतच स्वर्गातला पितासुद्धा त्याच्यावर खूश असेल.

८. एक तरुण भाऊ भरवशालायक कसा बनू शकतो?

भरवशालायक असा.  भरवशालायक असलेला तरुण भाऊ, त्याच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतो. (लूक १६:१०) येशूचं या बाबतीत एक खूप सुंदर उदाहरण आहे. तो कधीच निष्काळजीपणे किंवा बेजबाबदारपणे वागला नाही. उलट, यहोवाने त्याला जी जबाबदारी सोपवली होती ती कठीण असतानासुद्धा त्याने ती पूर्ण केली. त्याचं लोकांवर, खासकरून त्याच्या शिष्यांवर प्रेम होतं, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने त्यांच्यासाठी आपलं जीवन दिलं. (योहा. १३:१) तुम्हीसुद्धा येशूचं अनुकरण करून तुम्हाला मिळालेली कोणतीही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मेहनत घेऊ शकता. जर तुम्हाला तुमची जबाबदारी कशी पूर्ण करायची हे समजत नसेल, तर नम्रपणे मंडळीतल्या प्रौढ भावांची मदत घ्या. फक्‍त नावापूरतं काम करू नका. (रोम. १२:११) उलट, ‘आपण जे काही करतो, ते माणसांसाठी नाही, तर यहोवासाठी करतो असं समजून’ आपली जबाबदारी पूर्ण करा. (कलस्सै. ३:२३) हे खरं आहे की आपण परिपूर्ण नाही, त्यामुळे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा आणि जेव्हा तुमच्या हातून चुका होतात तेव्हा त्या नम्रपणे कबूल करा.​—नीति. ११:२.

व्यावहारिक कौशल्यं शिकून घ्या

९. तरुण भावांनी व्यावहारिक कौशल्यं शिकून का घेतली पाहिजेत?

एक प्रौढ खिस्ती व्यक्‍ती बनण्यासाठी तुम्हाला काही व्यावहारिक कौशल्यंही शिकून घ्यावी लागतील. त्यामुळे तुम्हाला मंडळीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या सांभाळायला मदत होईल आणि इतरांसोबतचं तुमचं नातं चांगलं होईल. तसंच स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी तुम्हाला चांगली नोकरी शोधून ती टिकवून ठेवता येईल. आता काही महत्त्वाच्या कौशल्यांचा आपण विचार करू या.

चांगल्या प्रकारे लिहायला आणि वाचायला शिकल्यामुळे तुम्हाला आणि मंडळीला फायदा होईल (परिच्छेद १०-११ पाहा)

१०-११. तरुण भावांनो, तुम्ही जर चांगल्या प्रकारे लिहायला-वाचायला शिकलात, तर यामुळे तुम्हाला आणि मंडळीला कसा फायदा होऊ शकतो? (स्तोत्र १:१-३) (चित्रसुद्धा पाहा.)

१० चांगल्या प्रकारे लिहायला आणि वाचायला शिका.  बायबल सांगतं, की जी व्यक्‍ती दररोज देवाचं वचन ऐकते आणि त्यावर मनन करते ती आनंदी असते आणि प्रत्येक कामात यशस्वी होते. (स्तोत्र १:१-३ वाचा.) दररोज बायबल वाचल्यामुळे देव कशा प्रकारे विचार करतो हे तिला समजेल आणि त्याप्रमाणे विचार करायला तिला मदत होईल. त्यासोबतच बायबलची तत्त्वं कशी लागू करायची हेसुद्धा तिला कळेल. (नीति. १:३, ४) अशा भावांची मंडळीत खरंच खूप गरज आहे. का बरं?

११ कारण, भाऊबहिणींना बायबलमधून सूचना आणि सल्ला देऊ शकतील अशा भावांची गरज आहे. (तीत १:९) तुम्हाला जर चांगलं लिहिता-वाचता येत असेल, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे भाषण देण्यासाठी आणि उत्तरं देण्यासाठी तयारी करता येईल. तसंच, अभ्यास करताना आणि मंडळीच्या सभांमध्ये, संमेलनांमध्ये, अधिवेशनांमध्ये भाषणं ऐकताना तुम्हाला चांगल्या प्रकारे नोट्‌स घेता येतील. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा विश्‍वास वाढवायला आणि इतरांना प्रोत्साहन द्यायला मदत होईल.

१२. इतरांसोबत चांगल्या प्रकारे बोलण्याचं कौशल्य वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१२ चांगल्या प्रकारे बोलायचं कौशल्य वाढवा.  प्रत्येक खिस्ती भावाने हे कौशल्य शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याने इतरांचं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि त्यांचे विचार आणि भावना समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. (नीति. २०:५) त्याने समोरच्या व्यक्‍तीचे विचार आणि भावना समजून घेण्यासाठी त्याची बोलायची लकब, त्याचे हावभाव, त्याचं एकंदरीत व्यक्‍तिमत्त्व कसं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण यासाठी त्याला इतरांसोबत वेळ घालवावा लागेल. तुम्ही जर इतरांशी बोलायला नेहमीच इलेक्ट्रॉनिक साधनांचा जसं की, ई-मेल, मेसेज यांसारख्या गोष्टींचा वापर करत राहिलात, तर इतरांसोबत प्रत्यक्ष बोलायला तुम्हाला अवघड जाईल. म्हणून इतरांशी समोरासमोर भेटून बोलायचा प्रयत्न करा.​—२ योहा. १२.

नोकरी मिळवण्यासाठी एखादं कौशल्य शिकून घेणं नेहमीच चांगलं आहे (परिच्छेद १३ पाहा)

१३. एका तरुण भावाने आणखी काय शिकून घेतलं पाहिजे? (१ तीमथ्य ५:८) (चित्रसुद्धा पाहा.)

१३ स्वावलंबी व्हा.  ख्रिस्ती भावाला स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवता आल्या पाहिजेत. (१ तीमथ्य ५:८ वाचा.) काही देशांमध्ये तरुण भाऊ आपल्या वडिलांकडून किंवा नातेवाइकांकडून कामाचं कौशल्य शिकून घेतात. तर, इतर काही देशांमध्ये तरुण मुलं आपल्या शाळेतूनच व्यावसायिक कौशल्यं किंवा एखाद्या कामासाठी लागणारं कौशल्य शिकून घेतात. तुमच्या ठिकाणी यांपैकी कोणतेही पर्याय उपलब्ध असतील, तर तो पर्याय निवडून एखादं कौशल्य शिकून घ्या. त्यामुळे पुढे एक चांगली नोकरी मिळवता येईल. (प्रे. कार्यं १८:२, ३; २०:३४; इफिस. ४:२८) तेव्हा काम करण्यासाठी मेहनत घ्या आणि जे काम तुम्हाला सोपवण्यात आलंय, ते पूर्ण करायचा प्रयत्न करा. असं केल्यामुळे तुमचे प्रयत्न लोकांच्या लक्षात येतील आणि तुमचं चांगलं नाव होईल. शिवाय, तुम्हाला चांगली नोकरी शोधता येईल आणि ती टिकवून ठेवता येईल. या लेखात आपण ज्या गुणांबद्दल आणि कौशल्यांबद्दल शिकलो त्यामुळे एका तरुण भावाला पुढे येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या सांभाळायला मदत होऊ शकते. आता आपण अशाच काही जबाबदाऱ्‍यांबद्दल पाहू या.

भविष्यात येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍यांसाठी तयार व्हा

१४. पूर्ण वेळचा सेवक बनण्यासाठी एक तरुण भाऊ कशी तयारी करू शकतो?

१४ पूर्ण वेळचे सेवक.  बऱ्‍याच प्रौढ ख्रिस्ती भावांनी तरुण वयातच पूर्ण वेळची सेवा करायला सुरुवात केली आहे. पायनियर सेवा केल्यामुळे तरुण भावांना वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांसोबत चांगल्या प्रकारे काम करायला शिकता येईल. शिवाय, चांगलं बजेट बनवून त्यातच आपला खर्च भागवायलाही त्यांना शिकता येईल. (फिलिप्पै. ४:११-१३) पूर्ण वेळच्या सेवेची सुरुवात करण्यासाठी पहिली पायरी म्हणून ते सहायक पायनियर सेवा करू शकतात. बऱ्‍याच जणांनी काही काळ सहायक पायनियर म्हणून सेवा केली आहे आणि त्यामुळे पुढे पायनियर म्हणून सेवा करायला त्यांना मदत झाली आहे. पायनियर सेवा केल्यामुळे पूर्ण वेळची सेवा करायच्या इतर संधीसुद्धा तुमच्यासमोर खुल्या होतील. जसं की, बांधकाम प्रकल्पांत स्वयंसेवक म्हणून सेवा करणं किंवा मग बेथेलमध्ये सेवा करणं.

१५-१६. मंडळीत सेवा करण्यासाठी एक तरुण भाऊ कशा प्रकारे पात्र ठरू शकतो?

१५ सहायक सेवक किंवा वडील.  प्रत्येक ख्रिस्ती भावाने मंडळीत वडील म्हणून भाऊबहिणींची सेवा करण्यासाठी पात्र ठरायचा प्रयत्न केला पाहिजे. बायबल म्हणतं, की जी व्यक्‍ती अशा प्रकारे पात्र ठरायचा प्रयत्न करते, ती ‘चांगल्या कामाची इच्छा बाळगत’ असते. (१ तीम. ३:१) पण मंडळीत वडील म्हणून सेवा करण्याआधी एका भावाने सहायक सेवक बनण्यासाठी असणाऱ्‍या पात्रता पूर्ण केल्या पाहिजेत. सहायक सेवक मंडळीतल्या वडिलांना वेगवेगळ्या मार्गांनी व्यावहारिकपणे मदत करत असतात. तसंच, वडील आणि सहायक सेवक नम्रपणे भाऊबहिणींची सेवा करतात आणि प्रचारकार्यात आवेशाने सहभाग घेतात. एखाद्या तरुण भावाचं वय जरी कमी असलं, तरी तो मंडळीत सहायक सेवक म्हणून सेवा करण्यासाठी पात्र ठरू शकतो. शिवाय, एका चांगल्या सहायक सेवकाचं २०-२२ वय जरी असलं, तरी त्याला मंडळीत वडील म्हणून नियुक्‍त केलं जाऊ शकतं.

१६ या जबाबदाऱ्‍या पार पाडायला पात्र ठरण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्यासाठी काय करावं लागेल ते बायबलमध्ये सांगितलंय. बायबलमधल्या पात्रता यहोवासाठी, कुटुंबासाठी आणि मंडळीसाठी असलेल्या तुमच्या प्रेमावर आधारलेल्या आहेत. (१ तीम. ३:१-१३; तीत १:६-९; १ पेत्र ५:२, ३) तेव्हा या पात्रता चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि या पात्रता पूर्ण करता याव्यात म्हणून यहोवाकडे मदत मागा. c

पतीने आपल्या पत्नीवर आणि मुलांवर प्रेम करावं आणि त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक गोष्टींची काळजी घ्यावी अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो (परिच्छेद १७ पाहा)

१७. एक तरुण भाऊ पतीची आणि कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पेलण्यासाठी तयारी कशी करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१७ पती आणि कुटुंब प्रमुख.  येशूने सांगितल्याप्रमाणे काही भाऊ लग्न न करायचा विचार करतील. (मत्त. १९:१२) पण जर तुम्ही लग्न करायचं ठरवलं, तर तुम्हाला एक पती आणि कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडावी लागेल. (१ करिंथ. ११:३) एका पतीकडून यहोवा अपेक्षा करतो, की त्याने त्याच्या पत्नीवर प्रेम करावं आणि तिच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण कराव्यात. (इफिस. ५:२८, २९) एक चांगला पती बनायला या लेखात आपण अशाच काही गुणांवर आणि कौशल्यांवर चर्चा केली. उदाहरणार्थ, आपण पाहिलं की विचारशक्‍ती वाढवल्यामुळे, स्त्रियांचा आदर केल्यामुळे आणि भरवशालायक असल्यामुळे तुम्हाला एक चांगला पती बनता येईल. आणि एका पतीची आणि कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पेलायलाही तुम्ही तयार व्हाल.

१८. एक तरुण भाऊ चांगला पिता कसा बनू शकतो?

१८ पिता.  तुमचं लग्न झाल्यावर कदाचित तुम्ही मुलं होऊ द्यायचा निर्णय घ्याल. एक चांगला पिता होण्यासाठी तुम्ही यहोवाकडून बरंच काही शिकू शकता. (इफिस. ६:४) यहोवाचं आपल्या मुलावर, येशूवर प्रेम आहे आणि तो त्याच्यावर खूश आहे हे त्याने त्याला उघडपणे सांगितलं. (मत्त. ३:१७) तुम्ही पुढे एक पिता बनला, तर तुमच्या मुलांवर तुमचं प्रेम आहे या गोष्टीची वेळोवेळी त्यांना खातरी करून द्या. तसंच, त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी त्यांचं नेहमी कौतुक करा. जे वडील यहोवाच्या उदाहरणाचं अनुकरण करतात, ते आपल्या मुलांना प्रौढ ख्रिस्ती बनण्यासाठी मदत करत असतात. तुम्ही आत्तापासूनच या जबाबदारीसाठी तयारी करू शकता. त्यासाठी तुम्ही आपल्या कुटुंबातल्या लोकांची आणि मंडळीतल्या भाऊबहिणींची काळजी घेऊ शकता. त्यांच्यावर तुमचं प्रेम आहे आणि त्यांची तुम्ही कदर करता, हे त्यांना तुम्ही बोलून दाखवू शकता. (योहा. १५:९) असं केल्यामुळे पुढे एक पती आणि पिता बनण्यासाठी तुम्हाला मदत होईल. पण तोपर्यंत तुम्ही यहोवाची आवेशाने सेवा करू शकता आणि तुमच्या कुटुंबासाठी आणि मंडळीसाठी एक आशीर्वाद ठरू शकता.

तर मग तुम्ही आत्ता काय करू शकता?

ज्या तरुण भावांना शास्त्रवचनांतून शिक्षण मिळालं आहे आणि ज्यांनी शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू केल्या आहेत, ते प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनले आहेत (परिच्छेद १९-२० पाहा)

१९-२०. एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनण्यासाठी तरुण भावांना कशामुळे मदत होऊ शकते? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

१९ तरुण भावांनो, तुम्ही आपोआपच एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चांगलं उदाहरण असलेल्यांचं अनुकरण करावं लागेल, विचारशक्‍ती वाढवावी लागेल, भरवशालायक असावं लागेल आणि काही व्यावहारिक कौशल्यं शिकून घ्यावी लागतील. आणि यासोबतच तुम्हाला पुढे येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍यांसाठी तयारी करावी लागेल.

२० या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही कदाचित भारावून जाल. पण तुम्ही यशस्वी होऊ शकता. कारण हे नेहमी लक्षात ठेवा की यहोवा तुम्हाला मदत करायला आतुर आहे. (यश. ४१:१०, १३) तसंच, मंडळीतले भाऊबहीणसुद्धा तुम्हाला याबाबतीत नक्कीच मदत करतील. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक रित्या प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनाल, तेव्हा तुमचं जीवन आनंदी आणि समाधानी असेल. तेव्हा तरुण भावांनो, आम्हाला तुमचं खरंच खूप कौतुक करावंस वाटतं! प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घेत आहात त्यावर यहोवाचा आशीर्वाद असो!​—नीति. २२:४.

गीत ६५ प्रगती करू या!

a मंडळ्यांमध्ये आध्यात्मिक रितीने प्रौढ असलेल्या भावांची गरज आहे. म्हणून या लेखात आपण तरुण भाऊ प्रौढ ख्रिस्ती कसे बनू शकतात यावर चर्चा करू या.

b आधीच्या लेखात दिलेला “शब्दांचा अर्थ” पाहा.