तुम्हाला आठवतं का?
या वर्षाचे टेहळणी बुरूज अंक तुम्ही लक्ष देऊन वाचले आहेत का? तर मग, पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात का ते पाहा:
आपल्या विचारसरणीत बदल करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (रोम. १२:२)
आपल्या मनाचं नविनीकरण करण्यासाठी फक्त काही चांगली कामं करणंच पुरेसं नाही. तर आपण आतून कशा प्रकारची व्यक्ती आहोत, याचंसुद्धा खोलवर परीक्षण केलं पाहिजे. आणि यहोवाच्या स्तरांचं जवळून पालन करण्यासाठी, आपल्या जीवनात आवश्यक ते बदल आपण केले पाहिजेत.—टेहळणी बुरूज२३.०१, पान ८-९.
जगातल्या घडामोडींवर नजर ठेवत असतानाच आपण सावध आणि जागे कसे राहू शकतो?
जगभरात सध्या ज्या घटना घडत आहेत त्यांमुळे बायबलच्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होत आहेत हे पाहायची आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. याबाबतीत कोणताही अंदाज किंवा तर्क लावल्यामुळे मंडळीत फूट पडून तिची एकता धोक्यात येऊ शकते. त्याऐवजी, यहोवाच्या संघटनेने प्रकाशित केलेल्या माहितीच्या आधारावर आपण एकमेकांसोबत चर्चा केली पाहिजे. (१ करिंथ. १:१०)—टेहळणी बुरूज२३.०२, पान १६.
येशूचा बाप्तिस्मा त्याच्या शिष्यांच्या बाप्तिस्म्यापेक्षा वेगळा कसा आहे?
येशूला आपल्यासारखं समर्पण करायची गरज नव्हती, कारण तो देवाच्या समर्पित राष्ट्रात जन्माला आला होता. येशू परिपूर्ण होता आणि त्याने कोणतंही पाप केलं नव्हतं. त्यामुळे त्याला पश्चात्तापाची गरज नव्हती.—टेहळणी बुरूज२३.०३, पान ५.
सभेत जास्तीत जास्त लोकांना उत्तरं देता यावीत म्हणून आपण काय करू शकतो?
आपण थोडक्यात उत्तरं दिली पाहिजेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना उत्तर द्यायेची संधी मिळेल. तसंच आपण सगळेच मुद्दे सांगू नये. नाहीतर इतरांना सांगण्यासाठी काहीच उरणार नाही.—टेहळणी बुरूज२३.०४, पान २३.
यशया ३५:८ मध्ये सांगितलेला “पवित्रतेचा मार्ग” कशाला सूचित करतो?
बाबेलपासून इस्राएलला जाण्यासाठी यहुद्यांनी ज्या मार्गाचा वापर केला त्याला सर्वात पहिल्यांदा अलंकारिक भाषेत “पवित्रतेचा मार्ग” म्हटलंय. पण अलिकडच्या काळाबद्दल काय? १९१९ च्या बऱ्याच शतकांआधीपासून हा रस्ता तयार करण्याचं काम सुरू झालं होतं. म्हणजेच इतर कामांसोबत बायबलच्या भाषांतराचं आणि छपाईचं काम सुरू झालं. “पवित्रतेचा मार्ग” आपल्याला आध्यात्मिक नंदनवनातून भविष्यात देवाच्या राज्यात मिळणाऱ्या आशीर्वादांकडे घेऊन जाणार आहे.—टेहळणी बुरूज२३.०५, पान १५-१९.
नीतिवचनांच्या ९ व्या अध्यायात कोणत्या दोन लाक्षणिक स्त्रियांबद्दल सांगितलंय?
नीतिवचनांत अशा एका ‘मूर्ख स्त्रीबद्दल’ सांगितलंय, जिचं आमंत्रण स्वीकारणारे “कबरेच्या खोल ठिकाणांत” जातात. तसंच ‘खऱ्या बुद्धीला’ सूचित करण्यासाठी ज्या लाक्षणिक स्त्रीची उपमा देण्यात आली आहे, तिचं आमंत्रण स्वीकारणारे कायम जिवंत राहतात आणि “समजशक्तीच्या मार्गाने” पुढे चालत राहतात. (नीति. ९:१, ६, १३, १८)—टेहळणी बुरूज२३.०६, पान २२-२४.
लोटसोबत वागताना यहोवाची नम्रता आणि त्याचा समजूतदारपणा कसा दिसून आला?
यहोवाने लोटला डोंगराळ प्रदेशाकडे पळून जायला सांगितलं होतं. पण लोटने यहोवाला विनंती केली, की त्याने त्याला सोअर शहरात जाऊ द्यावं. तेव्हा यहोवाने लोटची ही विनंती मान्य केली.—टेहळणी बुरूज२३.०७, पान २१.
जर पती पोर्नोग्राफी पाहत असेल तर पत्नी काय करू शकते?
तिने हे लक्षात ठेवलं पाहिजे, की यात तिचा दोष नाही. त्याऐवजी तिने यहोवासोबतच्या तिच्या नात्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि बायबलमधल्या अशा स्त्रियांच्या उदाहरणांवर मनन केलं पाहिजे ज्या त्रासात होत्या, पण यहोवाला प्रार्थना करून त्यांना सांत्वन मिळालं. तसंच ती अशा परिस्थिती टाळायला आपल्या पतीला मदत करू शकते ज्यांमुळे त्याला पोर्नोग्राफी पाहण्याचा मोह होईल.—टेहळणी बुरूज२३.०८, पान १४-१७.
जेव्हा कोणी आपल्याला आपल्या विश्वासाबद्दल प्रश्न विचारून वाद घालायचा प्रयत्न करतो तेव्हा सखोल समज सौम्यतेने वागायला आपल्याला कशी मदत करू शकते?
अशा वेळी आपल्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून कोणती गोष्ट त्या व्यक्तीसाठी महत्त्वाची आहे आणि त्याचा हेतू काय आहे, हे आपल्याला समजेल. आणि त्यामुळे सौम्यतेने आणि प्रेमळपणे उत्तर द्यायला आपल्याला मदत होईल.—टेहळणी बुरूज२३.०९, पान १७.
बळ मिळवण्याबद्दल आपण मरीयाकडून काय शिकू शकतो?
आपण मसीहाला जन्म देणार आहोत हे कळल्यावर तिने इतरांची मदत घेतली आणि त्यामुळे तिला बळ मिळालं. गब्रीएल आणि अलीशिबामुळे मरीयाला धैर्य मिळालं आणि तिची खातरी पटली की यहोवा तिच्यासोबत आहे. आपल्यालासुद्धा आपल्या भाऊबहिणींकडून धैर्य मिळू शकतं. —टेहळणी बुरूज२३.१०, पान १५.
यहोवा आपल्या प्रार्थनांचं कदाचित कसं उत्तर देईल?
तो आपल्या प्रार्थना नक्कीच ऐकतो आणि आपण केलेल्या प्रार्थनांचा त्याच्या एकंदर उद्देशाशी कसा संबंध आहे हेही तो लक्षात घेतो. (यिर्म. २९:१२) तो एकसारख्या प्रार्थनांची कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरं देईल. पण काहीही असलं तरी तो आपल्याला मदत करेल.—टेहळणी बुरूज२३.११, पान २१-२२.
रोमकर ५:२ मध्ये ‘आशेबद्दल’ सांगितलेलं असतानाही पुन्हा चौथ्या वचनात त्यावर चर्चा का करण्यात आली आहे?
आनंदाचा संदेश ऐकल्यावर एका व्यक्तीला नंदनवन पृथ्वीवर कायमचं जीवन जगण्याची आशा मिळू शकते. पण जसजसं तो संकटांचा धैर्याने सामना करत जातो, तसतसं त्याची ही आशा आणखी मजबूत होत जाते आणि ती त्याला जास्त खरीखुरी वाटू लागते.—टेहळणी बुरूज२३.१२, पान १२-१३.