अभ्यास लेख ५१
निराश न होता आपल्या आशेबद्दल आनंदी असा
“आशेमुळे पुढे आपली निराशा होणार नाही.”—रोम. ५:५.
गीत १४७ सर्वकाळाच्या जीवनाचं वचन
सारांश a
१. अब्राहामची आशा पक्की होती असं का म्हणता येईल?
यहोवाने आपला मित्र अब्राहामला असं अभिवचन दिलं, की त्याच्या संततीमुळे पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. (उत्प. १५:५; २२:१८) अब्राहामचा यहोवावर भक्कम विश्वास होता आणि त्यामुळे त्याला याची पूर्ण खातरी होती, की देव त्याने दिलेलं अभिवचन नक्की पूर्ण करेल. पुढे अब्राहाम १०० वर्षांचा आणि त्याची पत्नी ९० वर्षांची झाली तरी या विश्वासू जोडप्याला मुलगा झाला नव्हता. (उत्प. २१:१-७) पण बायबल म्हणतं, की त्याने “आशेच्या आधारावर असा विश्वास ठेवला की तो पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनेल. कारण असं सांगण्यात आलं होतं.” (रोम. ४:१८) आणि तुम्हाला माहीतच आहे, की अब्राहामची आशा फोल ठरली नाही. बराच काळ वाट पाहिल्यानंतर तो खरंच एका मुलाचा पिता बनला. आणि तो मुलगा होता इसहाक. पण कोणत्या गोष्टीमुळे अब्राहामला देवाने दिलेलं वचन पूर्ण होईल याची पक्की खातरी होती?
२. यहोवाने दिलेलं अभिवचन नक्की पूर्ण होईल याची अब्राहामला खातरी का होती?
२ यहोवासोबत अब्राहामचं एक वैयक्तिक नातं असल्यामुळे, “जे वचन देवाने दिलं होतं, ते पूर्ण करायला तो समर्थ आहे, अशी पक्की खातरी त्याला होती.” (रोम. ४:२१) आणि त्याच्या विश्वासामुळेच त्याला यहोवाची मान्यता मिळाली आणि त्याला नीतिमान ठरवण्यात आलं. (याको. २:२३) रोमकर ४:१८ या वचनातून हे स्पष्ट होतं, की अब्राहामचा विश्वास आणि त्याची आशा यांचा एकमेकांशी संबंध होता. आता रोमकर पुस्तकाच्या पाचव्या अध्यायात प्रेषित पौल आशेबद्दल काय सांगतो याकडे लक्ष देऊ या.
३. पौलने आशेबद्दल आणखी काय सांगितलं?
३ पौल या अध्यायात “आशेमुळे पुढे आपली निराशा होणार नाही,” अशी खातरी आपण का बाळगू शकतो हे स्पष्ट करतो. (रोम. ५:५) तसंच, आपली ख्रिस्ती आशा आणखी मजबूत कशी होऊ शकते, हे समजून घ्यायलाही तो आपली मदत करतो. रोमकर ५:१-५ मध्ये पौलने जे सांगितलं त्याचं परीक्षण करत असताना, या गोष्टीचा तुम्ही स्वतःही कसा अनुभव घेतलाय याचा विचार करा. असं केल्यामुळे काळाच्या ओघात तुमची ख्रिस्ती आशासुद्धा कशी मजबूत होत गेली, हे तुम्हाला जाणवेल. तसंच, या चर्चेतून तुमची आशा तुम्हाला आणखी मजबूत कशी करता येईल हेसुद्धा समजेल. आता, ज्या सुंदर आशेबद्दल पौल बोलत होता त्याबद्दल आपण पाहू या.
आपली सुंदर आशा
४. रोमकर ५:१, २ मध्ये प्रेषित पौलने काय सांगितलं?
४ रोमकर ५:१, २ वाचा. पौलने हे शब्द रोममधल्या मंडळीला लिहिले. तिथल्या भाऊबहिणींना जेव्हा यहोवाबद्दल आणि येशूबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला आणि ते ख्रिस्ती बनले. म्हणूनच देवाने त्यांना विश्वासामुळे नीतिमान ठरवलं आणि आपल्या पवित्र शक्तीने त्यांचा अभिषेक केला. आणि अशा प्रकारे त्यांना एक खरीखुरी आणि सुंदर आशा मिळाली.
५. अभिषिक्त जणांना कोणती आशा आहे?
५ पौलने नंतर इफिसमधल्या अभिषिक्त ख्रिश्चनांना एक पत्र लिहिलं. आणि या पत्रात देवाने त्यांना जी आशा दिली होती त्याबद्दल सांगितलं. या आशेप्रमाणे त्यांना ‘पवित्र जणांसाठी राखून ठेवलेला’ वारसाही मिळणार होता. (इफिस. १:१८) तसंच, पौलने कलस्सैकरांनाही त्यांची ही आशा कुठे पूर्ण होणार आहे याबद्दल सांगितलं. त्याने म्हटलं, की ही आशा त्यांच्यासाठी स्वर्गात राखून ठेवण्यात आली आहे. (कलस्सै. १:४, ५) यावरून म्हणता येईल, अभिषिक्त ख्रिश्चनांचं सर्वकाळच्या जीवनासाठी स्वर्गात पुनरुत्थान करण्यात येईल आणि तिथे ते येशूसोबत राज्य करतील. याच आशेबद्दल पौल बोलत होता.—१ थेस्सलनी. ४:१३-१७; प्रकटी. २०:६.
६. एक अभिषिक्त भाऊ त्यांच्या आशेबद्दल काय म्हणतात?
६ अभिषिक्त ख्रिश्चनांना मिळालेली ही आशा त्यांच्यासाठी खूप खास आहे. ब्रदर फ्रेडरीक फ्रान्झ हे त्यांच्यापैकीच एक होते. या आशेबद्दल त्यांना कसं वाटतंय हे सांगताना ते म्हणाले: “आमची आशा माझ्यासाठी एक कल्पना नाही, तर एक निश्चित गोष्ट आहे. आणि ही आशा १,४४,००० जणांपैकी असलेल्या लहान कळपातल्या प्रत्येक सदस्यासाठी अगदी पूर्णपणे खरी ठरेल. आणि आम्ही कल्पनाही केली नाही अशा प्रकारे ती पूर्ण होईल.” कित्येक दशकं यहोवाची विश्वासूपणे सेवा केल्यानंतर १९९१ मध्ये ब्रदर फ्रान्झ यांनी असं म्हटलं: “या आशेची किंमत [आमच्या] नजरेत जराही कमी झालेली नाही. . . . आम्हाला या आशेसाठी कितीही वाट पाहावी लागली, तरी आमच्या मनात या आशेबद्दल असलेली कदर आणखी वाढतच जाईल. ही आशा पूर्ण व्हायला करोडो वर्षं जरी लागली तरी तिची वाट पाहणं कधीच व्यर्थ ठरणार नाही. आम्हाला मिळालेल्या या आशेची किंमत आज माझ्या नजरेत पूर्वीपेक्षाही जास्त आहे.”
७-८. आपल्यापैकी बहुतेक जणांना कोणती आशा आहे? (रोमकर ८:२०, २१)
७ पण आज यहोवाची उपासना करणाऱ्या बहुतेकांना वेगळी आशा आहे. ती म्हणजे, देवाच्या राज्यात या पृथ्वीवर अनंतकाळाचं जीवन जगणं. अब्राहामलासुद्धा हीच आशा होती. (इब्री ११:८-१०, १३) पौलने याच सुंदर आशेबद्दल लिहिलं. (रोमकर ८:२०, २१ वाचा.) तुम्ही जेव्हा पहिल्यांदा या आशेबद्दल ऐकलं, तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडली? तुम्ही परिपूर्ण व्हाल आणि तुमच्याकडून एकही चूक होणार नाही, ही गोष्ट तुम्हाला आवडली होती का? की तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना नंदनवन पृथ्वीवर पुन्हा भेटाल, यामुळे तुम्ही भारावून गेला होता? “आशेच्या आधारावर” भविष्यात होणाऱ्या बऱ्याच चांगल्या गोष्टींची तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल.
८ आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या, या आशेमुळे आपल्याला आनंदी राहायचं आणखी एक कारण मिळतं. तसंच, आपली ही आशा आणखी मजबूत होऊ शकते. आणि हे कसं होऊ शकतं, याबद्दल पौलने पुढे सांगितलं. त्याचाच आता आपण विचार करू या. असं केल्यामुळे आपल्याला याची खातरी मिळेल की आपली आशा मजबूत होईल आणि आपली कधीच निराशा होणार नाही.
आपली आशा कशी मजबूत होत जाते
९-१०. पौलप्रमाणेच आपणसुद्धा कोणत्या गोष्टीची अपेक्षा केली पाहिजे? (रोमकर ५:३) (चित्रंसुद्धा पाहा.)
९ रोमकर ५:३ वाचा. लक्ष द्या की संकटांमुळे आपली आशा मजबूत होऊ शकते. ही गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, ख्रिस्ताच्या सर्वच अनुयायांना संकटं सोसावी लागणार आहेत. पौलचंच उदाहरण घ्या. त्याने थेस्सलनीका मंडळीला म्हटलं, “आपल्याला संकटं सोसावी लागतील हे तुमच्यासोबत असताना आम्ही तुम्हाला आधीच सांगत होतो आणि अगदी तसंच घडलं.” (१ थेस्सलनी. ३:४) आणि करिंथकरांना त्याने म्हटलं, “आम्हाला जे संकट सोसावं लागलं, त्याबद्दल तुम्हाला माहीत असावं असं आम्हाला वाटतं. . . . आमच्या जिवाचीही आम्हाला खातरी नव्हती.”—२ करिंथ. १:८; ११:२३-२७.
१० म्हणून आज आपल्यालाही कोणत्या न् कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल याची आपण अपेक्षा करू शकतो. (२ तीम. ३:१२) येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आणि त्याने जे काही सांगितलं त्याप्रमाणे केल्यामुळे तुम्हाला कधी समस्येचा सामना करावा लागला आहे का? कदाचित मित्रांनी आणि नातेवाइकांनी तुमची थट्टा केली असेल. त्यांनी तुम्हाला कदाचित खूप वाईट वागवलं असेल. किंवा असं कधी झालंय का, की कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबतीत प्रामाणिक असण्याच्या तुमच्या निर्धारामुळे तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागलाय? (इब्री १३:१८) किंवा आपल्या आशेबद्दल इतरांना सांगितल्यामुळे सरकारकडून तुम्हाला कधी विरोधाचा सामना करावा लागला आहे का? यांपैकी कोणत्याही संकटाचा तुम्हाला सामना करावा लागला तरी पौल म्हणतो, की आपण आनंदी असलं पाहिजे. का बरं?
११. कोणत्याही संकटाचा धीराने सामना करायचा निश्चय आपण का केला पाहिजे?
११ आपण संकटांमधून जात असताना आनंदी राहू शकतो, कारण त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचा गुण आपल्यात उत्पन्न होतो. रोमकर ५:३ मध्ये म्हटलंय, “संकटामुळे धीर उत्पन्न होतो.” सर्वच ख्रिश्चनांना संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे आपल्याला धीर या गुणाची खूप गरज आहे. आपल्यासमोर कोणतंही संकट आलं, तरी त्याचा धीराने सामना करायचा निश्चय आपण केला पाहिजे. तरच आपल्याला आपली आशा पूर्ण होताना पाहायला मिळेल. येशूने सांगितल्याप्रमाणे आपल्याला अशा लोकांसारखं व्हायचं नाही, ज्यांची तुलना त्याने खडकाळ जमिनीवर पडलेल्या बी सोबत केली. सुरुवातीला त्यांनी वचन ऐकून आनंदाने त्याचा स्वीकार केला. पण, नंतर वचन ऐकल्यावर एखादं “संकट आलं किंवा छळ झाला,” तेव्हा ते लगेच अडखळून पडले. (मत्त. १३:५, ६, २०, २१) हे खरं आहे की, संकटाचा किंवा विरोधाचा सामना करणं सोपं नाही. पण आपण धीराने त्याचा सामना केला तर आपला नक्कीच फायदा होईल. तो कसा?
१२. धीराने संकटांचा सामना केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
१२ संकटाचा सामना केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, हे शिष्य याकोबने स्पष्ट केलं. त्याने म्हटलं, “धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या म्हणजे तुम्ही सर्व बाबतींत परिपूर्ण ठराल आणि तुमच्यात कोणताही दोष राहणार नाही.” (याको. १:२-४) धीर जणू एखादं काम पूर्ण करतोय, अशा प्रकारे याकोबने धीराचं वर्णन केलंय. मग धीर कोणतं काम पूर्ण करतो? धीरामुळे सहनशीलता, विश्वास आणि देवावरचा भरवसा यांसारखे गुण आणखी जास्त वाढवायला आपल्याला मदत होते. पण यासोबतच धीरामुळे आणखी एक महत्त्वाचा फायदा होतो.
१३-१४. धीरामुळे आपल्याला कसा फायदा होतो आणि आपल्या आशेसोबत त्याचा कसा संबंध आहे? (रोमकर ५:४)
१३ रोमकर ५:४ वाचा. पौल या ठिकाणी म्हणतो की, “धीरामुळे आपल्याला देवाची मान्यता मिळते.” म्हणजेच आपण जेव्हा धीराने परीक्षेचा सामना करतो तेव्हा यहोवाला आनंद होतो. पण याचा अर्थ असा होत नाही, की आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो म्हणून यहोवा खूश होतो. तर जेव्हा संकटं येतात तेव्हा आपण धीराने आणि विश्वासूपणे त्यांचा सामना करतो म्हणून यहोवा आपल्यावर खूश होतो. जेव्हा आपण संकटांचा धीराने सामना करतो तेव्हा आपण यहोवाला आनंदित करतो, ही गोष्ट खरंच किती प्रोत्साहन देणारी आहे!—स्तो. ५:१२.
१४ अब्राहामने धीराने आणि विश्वासूपणे संकटांचा सामना केला आणि त्यामुळे देवाची मान्यता त्याला मिळाली. देवाने त्याला आपला मित्र समजलं आणि त्याला नीतिमान ठरवलं. (उत्प. १५:६; रोम. ४:१३, २२) हीच गोष्ट आपल्याबाबतीतही खरी आहे. आपण त्याच्या सेवेत किती काम करतोय किंवा आपण किती जबाबदाऱ्या सांभाळतोय या गोष्टींमुळे आपल्याला देवाची मान्यता मिळत नाही. तर संकटं असतानासुद्धा आपण जेव्हा त्याला विश्वासू राहतो, तेव्हा आपल्याला देवाची मान्यता मिळते. त्यामुळे आपलं वय, परिस्थिती, क्षमता काहीही असली, तरी आपण सर्वच जण धीराने संकटाचा सामना करू शकतो. तुम्ही आजसुद्धा विश्वासूपणे आणि धीराने एखाद्या संकटाचा सामना करत आहात का? जर करत असाल, तर या गोष्टीची खातरी बाळगा की तुम्हाला देवाची मान्यता आहे. आपल्याला देवाची मान्यता आहे ही गोष्ट माहीत असल्यामुळे त्या गोष्टीचा आपल्यावर जबरदस्त प्रभाव पडू शकतो. त्यामुळे आपली आशा आणखी मजबूत होऊ शकते.
आपली भक्कम आशा
१५. पौल पुढे काय म्हणतो आणि त्यामुळे काहींचा गोंधळ का होऊ शकतो?
१५ पौलने स्पष्ट केल्याप्रमाणे, जेव्हा आपण विश्वासूपणे आणि धीराने संकटांचा सामना करतो, तेव्हा आपल्याला यहोवाची मान्यता मिळते, म्हणजेच यहोवाला आनंद होतो. पण पौल आता पुढे काय म्हणतो याकडे लक्ष द्या. तो म्हणतो: “देवाची मान्यता मिळाल्यामुळे आशा निर्माण होते. या आशेमुळे पुढे आपली निराशा होणार नाही.” (रोम. ५:४, ५) इथे पौल जे म्हणतो त्यामुळे काही जण कदाचित गोंधळून जातील. का बरं? कारण रोमकर ५:२ मध्ये सांगितल्याप्रमाणे रोममधल्या ख्रिश्चनांकडे आधीपासूनच ‘देवाच्या गौरवाची आशा’ होती असं पौल सांगतो. त्यामुळे एखाद्याला कदाचित असा प्रश्न पडेल, ‘जर या ख्रिश्चनांकडे आधीपासूनच आशा होती, तर मग पौल इथे नंतर आशा निर्माण होते असं का म्हणतो?’
१६. एका व्यक्तीची आशा कशी मजबूत होत जाते? (चित्रंसुद्धा पाहा.)
१६ पौलने असं म्हटलं कारण आशा ही हळूहळू मजबूत होत जाते. हे समजण्यासाठी अगदी सुरुवातीला जेव्हा देवाच्या वचनात असलेल्या सुंदर आशेबद्दल तुम्हाला पहिल्यांदा समजलं, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं ते आठवायचा प्रयत्न करा. तुम्हाला नंदनवन पृथ्वीवर कायमचं जीवन जगण्याची कल्पना खूप जबरदस्त आहे असं कदाचित सुरुवातीला वाटलं असेल. पण यहोवा आणि बायबलमध्ये दिलेल्या त्याच्या अभिवचनांबद्दल तुम्हाला जसं समजत गेलं, तशी ही आशा खरोखर पूर्ण होईल या गोष्टीवरची तुमची खातरी आणखी वाढत गेली.
१७. समर्पण आणि बाप्तिस्म्यानंतर तुमची आशा कशी मजबूत होत गेली?
१७ समर्पण आणि बाप्तिस्मा झाल्यानंतरही, तुम्ही जसजसं शिकत गेला आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये प्रगती करत गेला, तसतशी तुमची आशा आणखी मजबूत होत गेली. (इब्री ५:१३–६:१) रोमकर ५:२-४ मध्ये जे म्हटलंय, त्याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल. तुमच्यासमोर वेगवेगळ्या समस्या आल्या, संकटं आली, पण तुम्ही धीराने त्यांचा सामना केला आणि त्यामुळे तुम्हाला देवाची मान्यता आहे या गोष्टीची जाणीव झाली. आणि देव तुमच्यावर खूश आहे, ही गोष्ट माहीत असल्यामुळे त्याने ज्या गोष्टींचं तुम्हाला अभिवचन दिलंय त्या गोष्टी तुम्हाला नक्की मिळतील याबद्दलची तुमची खातरी आणखी वाढली. तुमची आशा आता आधीपेक्षा जास्त मजबूत झाली. ती तुमच्यासाठी जास्त खरीखुरी आणि जणू ती खास तुमच्यासाठी आहे असं तुम्हाला वाटू लागलं. जीवनातल्या प्रत्येक पैलूवर तिचा जबरदस्त प्रभाव तुम्हाला जाणवू लागला. तुम्ही तुमच्या घरच्यांशी कसं वागता, तुम्ही काय निर्णय घेता, इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या वेळेचा कसा उपयोग करता, या सगळ्या गोष्टींवर तिचा प्रभाव होऊ लागला.
१८. यहोवा आपल्याला कोणती खातरी देतो?
१८ देवाची मान्यता मिळाल्यानंतर तुम्हाला जी आशा मिळते त्याबद्दल प्रेषित पौलने एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला. तो खातरी देतो की तुमची आशा नक्की पूर्ण होईल. हे आपण इतकं ठामपणे का म्हणू शकतो? कारण पौल देवाकडून ख्रिश्चनांना अशी खातरी देतो, की “या आशेमुळे पुढे आपली निराशा होणार नाही. कारण आपल्याला देण्यात आलेल्या पवित्र शक्तीद्वारे, आपलं हृदय देवाच्या प्रेमाने भरून टाकण्यात आलं आहे.” (रोम. ५:५) तर असं म्हणता येईल की ही आशा, म्हणजे तुम्हाला मिळालेली आशा, नक्की पूर्ण होईल अशी पक्की खातरी तुम्ही बाळगू शकता.
१९. तुमच्या आशेबद्दल तुम्ही कोणती खातरी बाळगू शकता?
१९ या गोष्टीवर विचार करा, की यहोवाने अब्राहामला काय अभिवचन दिलं होतं, त्याने त्याला आपली मान्यता असल्याचं कसं दाखवलं आणि आपला मित्र कसं समजलं. अब्राहामची आशा व्यर्थ ठरली नाही. बायबल म्हणतं: “अब्राहामने धीर धरल्यावर त्याला हे अभिवचन मिळालं.” (इब्री ६:१५; ११:९, १८; रोम. ४:२०-२२) अब्राहामची नक्कीच निराशा झाली नाही. आपणसुद्धा जर शेवटपर्यंत विश्वासू राहिलो, तर आपली आशासुद्धा पूर्ण होईल अशी पक्की खातरी आपण बाळगू शकतो. आपली आशा खरीखुरी आहे. त्यामुळे आपली निराशा होणार नाही, तर आपल्याला आनंदच होईल. (रोम. १२:१२) पौलने म्हटलं: “तुम्ही आशा देणाऱ्या देवावर भरवसा ठेवत असल्यामुळे, तो तुम्हाला भरपूर आनंद आणि शांती देवो; म्हणजे पवित्र शक्तीच्या सामर्थ्याने तुमची आशा वाढत जाईल.”—रोम. १५:१३.
गीत १३९ नव्या जगी स्वतःला पहा!
a या लेखात, आपल्या ख्रिस्ती आशेत कोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि ती नक्की पूर्ण होईल अशी खातरी आपण का बाळगू शकतो, यावर चर्चा करण्यात आली आहे. रोमकर पाचव्या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळेल की पहिल्यांदा सत्य कळलं तेव्हाच्या आशेमध्ये आणि आत्ताच्या आशेमध्ये काय फरक आहे.