मद्य आणि देवाचा दृष्टिकोन
यहोवाने आपल्याला अनेक भेटी दिल्या आहेत आणि त्या भेटींचा आनंद कसा घ्यायचा हे ठरवणंसुद्धा त्याच्याकडून मिळालेली एक भेटच आहे. बायबलमध्ये सांगितलंय की द्राक्षारस देवाकडून एक भेट आहे. त्यात असंही म्हटलंय, “अन्नामुळे मन आनंदी होतं आणि द्राक्षारसामुळे जीवनात मौज येते.” (उप. १०:१९; स्तो. १०४:१५) पण तुम्ही पाहिलं असेल, की मद्यपान केल्यामुळे काही लोकांवर समस्या आल्या आहेत. तसंच संपूर्ण जगभरात मद्य घेण्याविषयी लोकांची वेगवेगळी मतं आहेत. मग या बाबतीत योग्य निर्णय घ्यायला ख्रिश्चनांना कोणती गोष्ट मदत करेल?
आपण कुठेही राहत असलो किंवा कुठल्याही संस्कृतीत वाढलो असलो, तरी देवाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यामुळे आणि त्यानुसार निर्णय घेतल्यामुळे आपल्याला फायदा होईल आणि त्यामुळे आपण आनंदी राहू शकू.
तुम्ही कदाचित पाहिलं असेल, की जगात लोक सर्रासपणे आणि खूप जास्त प्रमाणात दारू पितात. काही लोक निवांत वाटावं म्हणून दारू पितात. तर काही जण चिंतांपासून पळवाट काढण्यासाठी दारू पितात. आणि काही ठिकाणी खूप जास्त दारू पिणं हे तुमच्यात किती हिंमत आहे हे दाखवण्याचा मार्ग आहे असं मानलं जातं.
पण ख्रिश्चनांसाठी आपल्या प्रेमळ देवाने खूप चांगला सल्ला दिला आहे. उदाहरणार्थ, अतिप्रमाणात दारू पिल्यामुळे काय वाईट परिणाम होतात याबद्दल त्याने आपल्याला सावध केलंय. नीतिवचनं २३:२९-३५ मध्ये दारूच्या नशेत धुंद असलेल्या माणसाचं वर्णन केलंय आणि दारू पिल्यामुळे काय वाईट परिणाम होतात हेसुद्धा त्यात सांगितलंय. a युरोपमधल्या एका मंडळीत वडील म्हणून सेवा करणारा डॅनिएल नावाचा एक भाऊ सत्यात येण्याआधी त्याचं जीवन कसं होतं ते सांगतो. तो म्हणतो, “मी खूप जास्त प्यायचो आणि त्यामुळे मी बरेच चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे मला खूप वाईट परिणामही भोगावे लागले. ते आठवून मला आजपण खूप त्रास होतो.”
मग याबाबतीत एक ख्रिस्ती व्यक्ती योग्य निर्णय कसे घेऊ शकते आणि जास्त प्रमाणात दारू पिल्यामुळे होणारे वाईट परिणाम कसे टाळू शकते? त्यासाठी आपल्याला देवाच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल आणि त्यानुसार वागावं लागेल.
मद्य पिण्याच्या बाबतीत बायबल काय म्हणतं, आणि काही लोक दारू का पितात याबद्दल आता आपण पाहू या.
बायबल काय म्हणतं?
योग्य प्रमाणात मद्य घेण्याबद्दल बायबल मनाई करत नाही. उलट त्यात असं सांगितलंय, की द्राक्षारसामुळे मन आनंदित होतं. त्यात असं लिहिलंय, की “आनंदाने जाऊन आपलं अन्न खा आणि खूश होऊन आपला द्राक्षारस पी.” (उप. ९:७) येशूनेही काही वेळा द्राक्षारस घेतला आणि यहोवाच्या इतर सेवकांनीसुद्धा द्राक्षारस पिल्याचं बायबलमध्ये सांगितलं आहे.—मत्त. २६:२७-२९; लूक ७:३४; १ तीम. ५:२३.
पण काही प्रमाणात दारू पिणं आणि दारूच्या नशेत धुंद होणं यांतला फरक देवाच्या वचनात स्पष्ट केला आहे. त्यात असं स्पष्टपणे म्हटलंय: “मद्य पिऊन धुंद होऊ नका.” (इफिस. ५:१८) त्यात असंही सांगितलंय, की “दारुडे . . . देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत.” (१ करिंथ. ६:१०) यावरून कळतं, की अतिप्रमाणात दारू पिणाऱ्यांचा आणि दारू पिण्याची सवय असणाऱ्यांचा यहोवाला तिटकारा आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत मद्यपान करणाऱ्यांबद्दल काय मानलं जातं, यापेक्षा यहोवा त्याबद्दल कसा विचार करतो या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.
काहींना असं वाटतं, की त्यांनी कितीही दारू पिली, तरी त्यांना चढणार नाही. पण असा विचार करणं खूप धोकादायक आहे. बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलंय, की ‘जास्त प्रमाणात मद्य घेणाऱ्या’ पुरुषाकडून (किंवा स्त्रीकडून) गंभीर पाप होऊ शकतं तीत २:३; नीति. २०:१) येशूनेही असा इशारा दिला, की जे “अतिप्रमाणात” दारू पितात त्यांना देवाच्या राज्यात जाणं कठीण आहे. (लूक २१:३४-३६) मग दारू पिल्यामुळे होणाऱ्या समस्या एक ख्रिस्ती व्यक्ती कसं टाळू शकते?
आणि त्यामुळे त्यांचं यहोवासोबतचं नातं धोक्यात येऊ शकतं. (तुम्ही का, कधी आणि किती पिता हे तपासून पाहा
मद्य पिण्याच्या बाबतीत निर्णय घेताना आपण ज्या ठिकाणी राहतो तिथले लोक त्याबद्दल काय विचार करतात, या आधारावरच आपण निर्णय घेऊ नये. खाण्याच्या आणि पिण्याच्या बाबतीत यहोवाचा जो दृष्टिकोन आहे तसाच एका ख्रिस्ती व्यक्तीचा असला पाहिजे. बायबल आपल्याला आठवण करून देतं, की “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सगळं देवाच्या गौरवासाठी करा.” (१ करिंथ. १०:३१) म्हणून आता आपण काही प्रश्नांचा विचार करू या आणि त्याबद्दल काही बायबल तत्त्वं काय आहेत यावर विचार करू या:
मी इतरांपेक्षा वेगळा वाटू नये म्हणून पितो का? निर्गम २३:२ मध्ये असं सांगितलंय: “पुष्कळ लोक करत आहेत, म्हणून एखादी वाईट गोष्ट करू नका.” यहोवा इथे इस्राएली लोकांना अशी ताकीद देत होता, की त्याला न मानणाऱ्या लोकांसारखं त्यांनी वागू नये. आज ख्रिश्चनांनाही तोच इशारा लागू होतो. आपण जर आपल्या सोबत्यांचा आपल्या विचारांवर आणि आपण घेत असलेल्या निर्णयांवर परिणाम होऊ दिला, तर आपण यहोवापासून आणि त्याच्या स्तरांपासून दूर जाऊ.—रोम. १२:२.
माझ्यात किती हिंमत आहे हे दाखवण्यासाठी मी दारू पितो का? काही संस्कृतींमध्ये सारखं दारू पिणं आणि खूप दारू पिणं ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे आणि त्याबद्दल कोणी आक्षेपही घेत नाही. (१ पेत्र ४:३) पण १ करिंथकर १६:१३ मध्ये किती चांगला सल्ला दिलाय याकडे लक्ष द्या. तिथे म्हटलंय, “जागे राहा, विश्वासात स्थिर राहा, धैर्यवान [मर्दासारखं, तळटीप] आणि सामर्थ्यशाली व्हा.” मद्यपान केल्यामुळे खरंच एक व्यक्ती सामर्थ्यशाली होते का? नक्कीच नाही. याच्या अगदी उलटच होतं. दारू पिणारी व्यक्ती भानावर राहत नाही, ती नीट विचारही करू शकत नाही आणि कामही करू शकत नाही. त्यामुळे खूप जास्त दारू पिणं हे सामर्थ्याचं नाही, तर कमजोरपणाचं लक्षण आहे. यशया २८:७ मध्ये सांगितलंय की दारू पिणारी व्यक्ती झोकांड्या खात भरकटते.
खरंतर सामर्थ्यशाली व्यक्ती नेहमी सतर्क असते आणि विश्वासात स्थिर उभी असते. अशी व्यक्ती पुढे येणाऱ्या धोक्यांपासून सावध राहते आणि नेहमी असे निर्णय घेते ज्यांमुळे यहोवासोबतचं तिचं नातं कमजोर होणार नाही. पण असं सामर्थ्य हे फक्त यहोवाकडूनच मिळतं. (स्तो. १८:३२) याबाबतीत येशूचं आपल्यासमोर खूप चांगलं उदाहरण आहे. त्याचं यहोवासोबत चांगलं नातं होतं. त्यामुळे तो धैर्य दाखवू शकला आणि नेहमी योग्य तेच करू शकला. बऱ्याच लोकांनी यामुळेच त्याचा आदर केला.
चिंता असल्यामुळे मी दारू पितो का? देवाच्या प्रेरणेने स्तोत्रकर्त्याने लिहिलं: “चिंतांनी मला सर्व बाजूंनी घेरलं, तेव्हा तू [यहोवा] मला दिलासा आणि सांत्वन दिलंस.” (स्तो. ९४:१९) जेव्हा आपल्याला चिंता सतावतात तेव्हा आपण दिलासा मिळवण्यासाठी दारूकडे नाही, तर यहोवाकडे वळलं पाहिजे. याचा एक चांगला मार्ग म्हणजे, आपण यहोवाला वारंवार प्रार्थना करू शकतो. त्यासोबतच बऱ्याच जणांना असं दिसून आलंय, की मंडळीतल्या एखाद्या प्रौढ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळेसुद्धा फायदा होऊ शकतो. खरंतर समस्येत असताना दारू पिल्यामुळे आपल्या समस्या तर कमी होतच नाहीत, उलट योग्य ते करायचा आपला निश्चय कमजोर होतो. (होशे. ४:११) आधी उल्लेख केलेले डॅनिएल नावाचे भाऊ सांगतात: “मला चितांच्या आणि दोषीपणाच्या भावनांविरुद्ध झगडावं लागायचं आणि त्यामुळेच मी दारू प्यायचो. पण त्यामुळे माझ्या समस्या आणखीनच वाढल्या. मी चांगल्या मित्रांना गमावलं आणि माझा स्वाभिमानही खचला.” मग डॅनिएलला कशामुळे मदत झाली? ते सांगतात: “मला दारूची नाही तर यहोवाची गरज आहे, हे मला जाणवलं.” शेवटी यहोवाच्या मदतीनेच ते समस्यांवर मात करू शकले. आपली परिस्थिती कितीही निराशाजनक वाटत असली, तरी यहोवा आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो.—फिलिप्पै. ४:६, ७; १ पेत्र ५:७.
तुम्ही जर मद्यपान करत असाल, तर त्याबद्दलच्या तुमच्या सवयींचं परीक्षण करण्यासाठी तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारू शकता: ‘दारू पिण्याच्या माझ्या सवयीबद्दल माझ्या कुटुंबातल्या लोकांना किंवा मित्रांना चिंता वाटते का?’ जर वाटत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो, की तुम्हाला दारू प्यायची सवय लागली आहे आणि ते अजून तुमच्या लक्षात आलेलं नाही. ‘मी आधीपेक्षा जास्त दारू पिऊ लागलोय का?’ ही परिस्थिती अशा व्यक्तीच्या बाबतीत खरी ठरू शकते जिला दारूचं व्यसन लागलेलं नाही, पण लागू शकतं. ‘मला बरेच दिवस दारू घेतली नाही तर त्रास होतो का?’ असं असेल तर कदाचित तुम्हाला दारूची सवय लागली असेल किंवा त्याचं व्यसन लागलं असेल आणि त्यासाठी कदाचित तुम्हाला डॉक्टरांच्या मदतीची गरज असेल.
मद्यपान केल्यामुळे होणाऱ्या घातक परिणामांचा विचार करून काही जणांनी मद्य न घेण्याचं ठरवलंय. तर इतर काहींनी त्याची चव आवडत नसल्यामुळे मद्य न घ्यायचं ठरवलंय. जर तुमच्या ओळखीच्या कोणीतरी असा निर्णय घेतला असेल, तर तुम्ही त्याची टीका न करता त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.
काही जण मद्यपान करण्याच्या बाबतीत ते किती प्रमाणात घ्यायचं याबद्दल स्वतःला काही मर्यादा घालतील. किंवा आपण किती वेळा प्यायचं याबद्दलही ते मर्यादा ठरवतील. उदाहरणार्थ, आठवड्यातून एकदा प्यायचं की जेवणाच्या वेळी कधीतरी प्यायचं हे ठरवतील. तर काही जण कोणत्या प्रकारचं मद्य घ्यायचं हे ठरवतील. जसं की, ते कमी प्रमाणात वाईन किंवा बिअर पितील. पण कदाचित जास्त अल्कोहोलचं प्रमाण असलेलं मद्य पिणार नाहीत; मग ते ज्यूस किंवा इतर पेयांसोबत असलं तरीही. एक व्यक्ती जेव्हा स्पष्टपणे अशा प्रकारच्या मर्यादा घालते तेव्हा त्याप्रमाणे वागणं तिला सोपं जातं. एका प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीने अशा प्रकारचा निर्णय घेतला, तर तिला इतरांसमोर अवघडल्यासारखं वाटून घ्यायची गरज नाही.
मद्यपान करण्याच्या बाबतीत निर्णय घेताना इतरांचाही विचार करा. रोमकर १४:२१ म्हणतं: “मांस न खाणं किंवा द्राक्षारस न पिणं किंवा तुझ्या भावाला अडखळण होईल असं काहीही न करणं हेच चांगलं.” तुम्ही हा सल्ला कसा लागू करू शकता? प्रेम दाखवून! जर तुम्हाला वाटलं की तुम्ही मद्यपान केल्यामुळे कोणीतरी अडखळेल तर तुम्ही त्या वेळी ते करणार नाही. अशा प्रकारे स्वतःचा नाही तर दुसऱ्यांचा फायदा बघून तुम्ही त्यांच्या भावनांचा आदर करत असता आणि तुम्हाला त्यांची काळजी आहे हे दाखवून देत असता.—१ करिंथ. १०:२४.
त्यासोबतच सरकारने मद्यपान करण्याच्या बाबतीत काही नियम घालून दिले असतील, तर त्यांचाही एका ख्रिस्ती व्यक्तीने विचार केला पाहिजे. जसं की, एका ठरावीक वयानंतरच तुम्ही मद्यपान करू शकता असा नियम असेल. किंवा पिऊन गाडी चालवणं किंवा मशीनवर काम करणं हा कायद्याने गुन्हा असेल.—रोम. १३:१-५.
यहोवाने आपल्याला बऱ्याच भेटी दिल्या आहेत आणि या भेटींचा आनंद कसा घ्यायचा हे ठरवण्याचं स्वातंत्र्यसुद्धा दिलंय. हीसुद्धा एक भेटच आहे. यात खाण्याच्या आणि पिण्याच्या बाबतीत निवड करण्याचं स्वातंत्र्यसुद्धा येतं. आपल्या निर्णयांवरून दिसून आलं पाहिजे, की आपल्याला या स्वातंत्र्याची कदर आहे आणि यातून आपल्याला आपल्या स्वर्गातल्या पित्याचं मन आनंदित करायचंय.
a अमेरिकेच्या आरोग्य संघटनेने असा अहवाल दिलाय, की एकदाच जास्त प्रमाणात दारू पिल्यामुळेसुद्धा खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. जसं की दारूच्या नशेत एक व्यक्ती दुसऱ्याचा जीव घेऊ शकते, आत्महत्या करू शकते, एखाद्याचं लैंगिक शोषण करू शकते, आपल्या जोडीदाराला मारहाण करू शकते. तसंच, दारूमुळे एखाद्या गरोदर स्त्रीच्या न जन्मलेल्या बाळाचा मृत्यू होऊ शकतो. यासोबतच, नशेत असणारी व्यक्ती अशा व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवू शकते, जिच्यामुळे तिला लैंगिक रीत्या संक्रमित होणारे रोग होऊ शकतात किंवा नको असलेली गर्भधारणा होऊ शकते.