व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५०

विश्‍वास आणि कार्यांमुळे तुम्ही नीतिमान ठरू शकता!

विश्‍वास आणि कार्यांमुळे तुम्ही नीतिमान ठरू शकता!

‘आपला पिता अब्राहाम याचं अनुकरण करा. त्याने सुंता झालेली नसतानाही विश्‍वास दाखवला.’​—रोम. ४:१२.

गीत ११९ खरा विश्‍वास बाळगू या!

सारांश a

१. अब्राहामच्या विश्‍वासाबद्दल बोलताना कदाचित आपल्या मनात कोणता प्रश्‍न येईल?

 बऱ्‍याच लोकांनी अब्राहामबद्दल ऐकलं असेल, पण खूप कमी लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे. तुम्हाला मात्र अब्राहामबद्दल बरंच काही माहीत आहे. जसं की अब्राहामला बायबलमध्ये ‘विश्‍वास दाखवणाऱ्‍या सगळ्यांचा पिता’ म्हटलंय. (रोम. ४:११) पण कदाचित तुम्ही विचार कराल, ‘मी अब्राहामचं अनुकरण करून त्याच्यासारखा विश्‍वास दाखवू शकतो का?’ हो तुम्ही दाखवू शकता.

२. अब्राहामच्या उदाहरणाचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे? (याकोब २:२२, २३)

अब्राहामसारखा विश्‍वास वाढवायचा एक मार्ग म्हणजे त्याच्या उदाहरणाचा अभ्यास करणं. देवाने सांगितल्याप्रमाणे, तो दूरच्या ठिकाणी गेला, कित्येक दशकं तबूंमध्ये राहिला आणि आपल्या एकुलत्या एका मुलाचं, इसहाकचं बलिदान द्यायलाही तयार झाला. त्याचा यहोवावर मजबूत विश्‍वास होता आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तो करू शकला. अब्राहामच्या विश्‍वासामुळे आणि त्याच्या कामांमुळे तो यहोवाला खूश करू शकला आणि त्याच्याशी मैत्री करू शकला. (याकोब २:२२, २३ वाचा.) यहोवाची इच्छा आहे की आपल्या सगळ्यांनाच, म्हणजे तुम्हालाही  तसंच करता यावं. याच कारणासाठी त्याने पौल आणि याकोबला अब्राहामबद्दल लिहायला प्रेरित केलं. रोमकरच्या चौथ्या अध्यायात आणि याकोबच्या दुसऱ्‍या अध्यायात अब्राहामबद्दल काय सांगितलंय यावर आता आपण थोडी चर्चा करू या. या दोन्ही अध्यायांमध्ये अब्राहामबद्दल एक उल्लेखनीय गोष्ट सांगितली आहे.

३. पौल आणि याकोब दोघांनीही कोणत्या वचनाचा संदर्भ दिला?

पौल आणि याकोब दोघांनीही उत्पत्ती १५:६ चा संदर्भ दिला. त्यात असं म्हटलंय: “[अब्राहामने] यहोवावर विश्‍वास ठेवला आणि त्यामुळे त्याने [त्याला] नीतिमान ठरवलं.” नीतिमान व्यक्‍तीवर देव खूश असतो, इतकंच काय तर देवाच्या नजरेत ती निर्दोष असते. अपरिपूर्ण पापी व्यक्‍ती देवाच्या नजरेत निर्दोष असणं ही खरंतर खूप मोठी गोष्ट आहे! आपल्या बाबतीतही देवाने असाच विचार करावा असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. आणि ते शक्यही आहे. आपण देवाच्या नजरेत नीतिमान असावं यासाठी आपण काय केलं पाहिजे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर सगळ्यात आधी अब्राहाम देवाच्या नजरेत नीतिमान कसा ठरला हे आपण समजून घेतलं पाहिजे.

नीतिमत्त्वासाठी विश्‍वास आवश्‍यक आहे

४. कोणत्या गोष्टीमुळे एक व्यक्‍ती नीतिमान ठरू शकत नाही?

रोमकरांना लिहिलेल्या पत्रात, पौलने म्हटलं की आपण सगळेच पापी आहोत. (रोम. ३:२३) मग एक व्यक्‍ती देवाला खूश कशी काय करू शकते आणि देवाच्या नजरेत निर्दोष किंवा नीतिमान कशी ठरू शकते? हे आपल्याला समजून घेता यावं म्हणून पौलने अब्राहामचं उदाहरण दिलं.

५. देवाने अब्राहामला कोणत्या आधारावर नीतिमान म्हटलं? (रोमकर ४:२-४)

कनानच्या प्रदेशात राहत असताना यहोवाने अब्राहामला नीतिमान म्हटलं. पण यहोवा अब्राहामला नीतिमान का म्हणू शकला? त्याने मोशेच्या नियमशास्त्राचं तंतोतंत पालन केलं होतं म्हणून? नक्कीच नाही. (रोम. ४:१३) कारण देवाने अब्राहामला नीतिमान म्हटल्याच्या ४०० पेक्षा जास्त वर्षांनंतर  यहोवाने हे नियमशास्त्र इस्राएल राष्ट्राला दिलं होतं. मग देवाने अब्राहामला कोणत्या आधारावर नीतिमान म्हटलं? यहोवाने अब्राहामला अपार कृपा दाखवून त्याच्या विश्‍वासामुळे त्याला नीतिमान म्हटलं.—रोमकर ४:२-४ वाचा.

६. कोणत्या आधारावर यहोवा पापी माणसाला नीतिमान ठरवतो?

पौल म्हणतो, देवावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या व्यक्‍तीला तिच्या “विश्‍वासामुळे नीतिमान ठरवण्यात” येतं. (रोम. ४:५) तसंच त्याने म्हटलं: “देव ज्याला कार्यांशिवाय नीतिमान ठरवतो, अशा माणसाला दावीदनेही सुखी म्हटलं. तो म्हणाला: ‘सुखी आहेत ते, ज्यांच्या अपराधांची क्षमा करण्यात आली आहे आणि ज्यांची पापं झाकण्यात आली आहेत. सुखी आहे तो माणूस, ज्याच्या पापांचा यहोवा हिशोब ठेवत नाही.’” (रोम. ४:६-८; स्तो. ३२:१, २) जो माणूस देवावर विश्‍वास ठेवतो, त्याची पापं झाकण्यात येतात. म्हणजेच देव अगदी पूर्णपणे त्याला क्षमा करतो आणि पुन्हा कधीच त्याच्या पापांचा हिशोब ठेवत नाही. अशा माणसाला देव त्याच्या विश्‍वासाच्या आधारावर निर्दोष आणि नीतिमान ठरवतो.

७. देवाचे विश्‍वासू सेवक कोणत्या अर्थाने नीतिमान होते?

अब्राहाम, दावीद आणि इतर विश्‍वासू उपासकांना नीतिमान ठरवण्यात आलं तरीसुद्धा ते अपरिपूर्ण पापी माणसंच होते. पण, खासकरून ज्या लोकांचा देवावर विश्‍वास नव्हता अशा लोकांच्या तुलनेत या लोकांच्या विश्‍वासामुळे त्यांना देवाच्या नजरेत नीतिमान ठरवण्यात आलं. (इफिस. २:१२) पौल त्याच्या पत्रात स्पष्ट करतो की जर एखाद्याला देवासोबत व्यक्‍तिगत नातं जोडायचं असेल, तर विश्‍वास असणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अब्राहाम आणि दावीदच्या बाबतीतही तीच गोष्ट खरी होती आणि आपल्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे.

विश्‍वास आणि कार्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे?

८-९. पौल आणि याकोबने लिहिलेल्या गोष्टींवरून काही लोकांनी कोणता चुकीचा निष्कर्ष काढला आणि का?

अनेक शतकांपासून ख्रिस्ती धर्मजगतात विश्‍वास आणि कार्यांचा काय संबंध आहे, हा वादाचा विषय ठरलाय. काही पाळक असं शिकवतात, की जर तुम्हाला तारण हवं असेल तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवा. तुम्ही कदाचित त्यांना असंही म्हणताना ऐकलं असेल, “प्रभू येशूचा स्वीकार करा आणि तारण मिळवा.” त्यासाठी पाळक पौलच्या शब्दांचा संदर्भ घेऊन म्हणतील: ‘देव कार्यांशिवाय नीतिमान ठरवतो.’ (रोम. ४:६) पण इतर काही जण म्हणतात, की तुम्ही धार्मिक ठिकाणी गेलात आणि चर्चने सांगितल्याप्रमाणे दान-धर्माच्या काही गोष्टी केल्या, तर तुमचं तारण होईल. आणि त्यासाठी ते कदाचित याकोब २:२४ चा संदर्भ घेतील. त्यात म्हटलंय: “माणूस फक्‍त विश्‍वासाने नाही, तर कार्यांद्वारे नीतिमान ठरतो.”

ख्रिस्ती धर्मजगतात अशी वेगवेगळी दोन मतं असल्यामुळे धार्मिक विषयांच्या काही लेखकांनी असा निष्कर्ष काढला, की विश्‍वास आणि कार्यांबद्दल पौल आणि याकोबची वेगवेगळी मतं होती. पाळक कदाचित असा दावा करतील, नीतिमान ठरवण्यासाठी एका व्यक्‍तीला फक्‍त विश्‍वास असणं गरजेचं आहे असं पौलचं म्हणणं होतं. पण दुसरीकडे याकोब असं शिकवत होता, की देवाला खूश करायचं असेल तर कार्य करणं खूप महत्त्वाचं आहे. धार्मिक विषयांचे एक प्राध्यापक असं म्हणतात: “नीतिमान ठरण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीला फक्‍त विश्‍वास असणं गरजेचं आहे, हे म्हणण्याचा पौलचा काय हेतू होता हे याकोबला कळत नव्हतं.” पण, पौल आणि याकोबने जे लिहिलं ते यहोवाच्या प्रेरणेनेच लिहिलं होतं. (२ तीम. ३:१६) त्यामुळे या दोघांनी जे लिहिलं ते एकमेकांच्या विरोधात नव्हतं. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या गोष्टी समजून घ्यायचा एक सोपा मार्ग असला पाहिजे. तो म्हणजे या दोन्ही लिखाणांचा संदर्भ समजून घेणं.

पौलने रोममधल्या यहुदी ख्रिश्‍चनांना हे स्पष्ट केलं, की नियमशास्त्रातली कार्यं करण्यापेक्षा विश्‍वास महत्त्वाचा आहे (परिच्छेद १० पाहा) b

१०. पौल खासकरून कोणत्या ‘कार्यांबद्दल’ बोलत होता? (रोमकर ३:२१, २८) (चित्रसुद्धा पाहा.)

१० रोमकर ३ आणि मध्ये पौलने ज्या कार्यांबद्दल म्हटलं ती “कार्यं” कोणती आहेत? ती कार्यं मोशेला सीनाय पर्वतावर दिलेल्या “नियमशास्त्रात सांगितलेली कार्यं” आहेत. (रोमकर ३:२१, २८ वाचा.) असं दिसून येतं, की पौलच्या दिवसांत काही यहुदी ख्रिस्ती असं मानत होते, की त्यांना मोशेचं नियमशास्त्र अजूनही पाळण्याची गरज आहे. म्हणून पौलने अब्राहामचं उदाहरण देऊन हे सिद्ध केलं की फक्‍त नियमशास्त्र पाळून एक व्यक्‍ती नीतिमान ठरत नाही, तर विश्‍वासाने ठरते. यामुळे आपल्याला किती प्रोत्साहन मिळतं! कारण यामुळे देवाला खूश करणं शक्य आहे याची आपल्याला खातरी मिळते. म्हणजेच जर आपला देवावर आणि ख्रिस्तावर विश्‍वास असेल तर आपल्याला देवाला खूश करता येऊ शकतं.

याकोबने ख्रिश्‍चनांना असं प्रोत्साहन दिलं की त्यांनी आपला विश्‍वास ‘कार्यांमधून’ दाखवावा. जसं की, कोणताही भेदभाव न करता चांगली कामं करत राहावी (परिच्छेद ११-१२ पाहा) c

११. याकोब कोणत्या ‘कार्यांबद्दल’ बोलत होता?

११ याउलट याकोबच्या दुसऱ्‍या अध्यायात ज्या ‘कार्यांबद्दल’ सांगितलंय ती पौलने सांगितलेली ‘नियमशास्त्रातली कार्यं’ नाहीत. याकोब अशा कार्यांबद्दल किंवा कामांबद्दल बोलत होता जे ख्रिस्ती दररोज आपल्या जीवनात करतात. या कामांवरूनच दिसून येणार होतं, की त्या ख्रिस्ती व्यक्‍तीचा खरंच देवावर विश्‍वास आहे की नाही. याकोबने वापरलेल्या दोन उदाहरणांवर आता विचार करा.

१२. विश्‍वास आणि कार्यांमधला संबंध याकोबने कसा स्पष्ट केला? (चित्रसुद्धा पाहा.)

१२ पहिल्या उदाहरणात याकोब सांगतो, की ख्रिश्‍चनांनी एकमेकांशी व्यवहार करताना कोणताही भेदभाव करू नये. हा मुद्दा समजावून सांगण्यासाठी त्याने एका माणसाचं उदाहरण देऊन म्हटलं, की हा माणूस एका श्रीमंत व्यक्‍तीशी चांगला वागतो. पण तो गरीब व्यक्‍तीशी चांगला वागत नाही. याकोबने सांगितलं, की असा माणूस आपला देवावर विश्‍वास असल्याचा दावा जरी करत असला, तरी त्याच्या कार्यांवरून असं म्हणता येत नाही. (याको. २:१-५, ९) दुसऱ्‍या उदाहरणात याकोबने आणखी एका माणसाबद्दल सांगितलं, जो ‘भावाकडे किंवा बहिणीकडे कपडे नाहीत आणि अन्‍न नाही’ हे पाहतो, तरी त्यांना काही मदत पुरवत नाही. तो जरी असा दावा करत असला, की त्याचा देवावर विश्‍वास आहे तरी त्याच्या कार्यांमधून ते दिसून येत नाही. असा विश्‍वास काहीच उपयोगाचा नाही. म्हणूनच याकोबने म्हटलं, “कार्यांशिवाय नुसताच विश्‍वास निर्जीव आहे.”—याको. २:१४-१७.

१३. विश्‍वासासोबत कार्यं किती महत्त्वाची आहेत, हे याकोबने कसं समजावून सांगितलं? (याकोब २:२५, २६)

१३ विश्‍वास कार्यांमधून दिसून आला पाहिजे, हे समजावून सांगण्यासाठी याकोबने एक चांगलं उदाहरण म्हणून राहाबविषयी सांगितलं. (याकोब २:२५, २६ वाचा.) तिने यहोवाबद्दल ऐकलं आणि तो इस्राएलच्या वतीने लढतोय हे ओळखलं. (यहो. २:९-११) आणि इस्राएली हेरांचा जीव धोक्यात आहे, हे जेव्हा तिने पाहिलं तेव्हा त्यांचं संरक्षण करून तिने तिचा विश्‍वास कार्यांमधून दाखवून दिला. याचा परिणाम म्हणजे एका अपरिपूर्ण विदेशी स्त्रीला अब्राहामसारखंच नीतिमान ठरवण्यात आलं. तिने मांडलेल्या उदाहरणातून विश्‍वासासोबत कार्यं किती महत्त्वाची आहेत हे दिसून येतं.

१४. पौल आणि याकोबने लिहिलेल्या गोष्टी एकमेकांच्या विरोधात नव्हत्या असं का म्हणता येईल?

१४ तर यावरून दिसून येतं, की पौल आणि याकोब वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विश्‍वास आणि कार्यं यांच्याबद्दल बोलत होते. पौल हे सांगायचा प्रयत्न करत होता, की यहुदी ख्रिश्‍चनांना फक्‍त नियमशास्त्राप्रमाणे वागून देवाला खूश करता येणार नाही. तर याकोब या गोष्टीवर जोर देत होता, की सगळ्यांशी चांगलं वागून ख्रिश्‍चनांनी देवावर असलेला आपला विश्‍वास दाखवून दिला पाहिजे.

तुमचा विश्‍वास देव खूश होईल अशी कार्यं करायला तुम्हाला प्रवृत्त करतो का? (परिच्छेद १५ पाहा)

१५. कोणकोणत्या मार्गांनी आपण आपला विश्‍वास कार्यांमधून दाखवू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)

१५ देवाच्या नजरेत नीतिमान ठरण्यासाठी अब्राहामने जे केलं, अगदी तेच आपणही केलं पाहिजे असं यहोवा म्हणत नाही. उलट आपला विश्‍वास कार्यांमधून दाखवण्याचे बरेच मार्ग आहेत. जसं की, आपण मंडळीत येणाऱ्‍या नवीन लोकांचं स्वागत करू शकतो, गरजू भाऊबहिणींना मदत करू शकतो आणि आपल्या घरच्या लोकांशी चांगलं वागू शकतो. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे यहोवा आपल्यावर खूश होईल आणि आपल्याला आशीर्वाद देईल. (रोम. १५:७; १ तीम. ५:४, ८; १ योहा. ३:१८) आणि खासकरून सगळ्यांना आवेशाने आनंदाचा संदेश सांगूनही आपण आपला विश्‍वास कार्यांमधून दाखवू शकतो. (१ तीम. ४:१६) आपण सगळेच जण आपल्या कार्यांमधून देवाची अभिवचनं नक्की खरी होतील आणि त्याचेच मार्ग सगळ्यात योग्य आहेत, असा विश्‍वास दाखवू शकतो. आपण जर असं केलं, तर यहोवा आपल्यालाही नीतिमान ठरवेल आणि आपल्यासोबत मैत्रीचं नातं जोडेल अशी खातरी आपण ठेवू शकतो.

आशेमुळे विश्‍वास मजबूत होतो

१६. आशेचा अब्राहामच्या विश्‍वासाशी कसा संबंध होता?

१६ रोमकर चौथ्या अध्यायात अब्राहामकडून शिकण्यासारखी आणखी एक गोष्ट आपल्याला वाचायला मिळते. ती म्हणजे आशेचं महत्त्व. यहोवाने वचन दिलं होतं, की अब्राहामद्वारे ‘पुष्कळ राष्ट्रं’ आशीर्वादित होतील. विचार करा अब्राहामला किती सुंदर आशा होती! (उत्प. १२:३; १५:५; १७:४; रोम. ४:१७) पण, अब्राहाम १०० वर्षांचा झाला आणि सारा ९० वर्षांची झाली, तरी त्यांना मुलगा झाला नव्हता. मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर ही गोष्ट आता अशक्यच होती. अब्राहामसाठी खरंतर ही विश्‍वासाची परीक्षा होती. तरी त्याने “आशेच्या आधारावर असा विश्‍वास ठेवला की तो पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनेल.” (रोम. ४:१८, १९) आणि पुढे ही आशा खरी ठरली. तो इसहाकचा पिता बनला आणि याच गोष्टीची तो बऱ्‍याच काळापासून वाट बघत होता.—रोम. ४:२०-२२.

१७. देव आपल्याला त्याचे मित्र मानून नीतिमान ठरवू शकतो हे कशावरून म्हणता येईल?

१७ अब्राहामसारखंच देव आपल्यावर खूश होऊ शकतो आणि आपल्याला त्याचे मित्र मानून नीतिमान ठरवू शकतो. याच गोष्टीवर भर देत पौलने म्हटलं, “‘त्याला नीतिमान ठरवण्यात आलं’ हे शब्द फक्‍त [अब्राहामसाठीच] लिहिण्यात आले नव्हते. तर ते आपल्यासाठीही लिहिण्यात आले आहेत. कारण ज्या देवाने आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून जिवंत केलं, त्याच्यावर आपला विश्‍वास असल्यामुळे आपल्यालाही नीतिमान ठरवण्यात येईल.” (रोम. ४:२३, २४) अब्राहामसारखंच आपणसुद्धा विश्‍वास ठेवला पाहिजे, तो विश्‍वास आपल्या कार्यातून दाखवला पाहिजे आणि आशा बाळगली पाहिजे. रोमकर ५ व्या अध्यायात पौल आशेविषयी आणखी बरंच काही सांगतो. यावर आपण पुढच्या लेखात चर्चा करू या.

गीत २८ यहोवाचे मित्र कोण?

a आपल्याला देवाला खूश करायचं आहे आणि त्याच्या नजरेत नीतिमान ठरायचं आहे. पौल आणि याकोब यांनी जे लिहिलं त्यावरून हे कसं शक्य आहे याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. तसंच यहोवाला खूश करायचं असेल तर विश्‍वास आणि कार्यं कशी महत्त्वाची आहेत याबद्दलसुद्धा या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

b चित्रांचं वर्णन: नियमशास्त्रात सांगितलेल्या कार्यांमध्ये निळ्या धाग्याने शिवलेले कपडे घालणं, वल्हांडण सण साजरा करणं आणि हात धुण्याच्या प्रथेचं पालन करणं, यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. पण पौलने यहुदी ख्रिश्‍चनांना ‘नियमशास्त्रात सांगितलेल्या कार्यांपेक्षा’ विश्‍वासावर आपलं लक्ष लावायला सांगितलं.

c चित्राचं वर्णन: याकोबने गरिबांना मदत करण्यासारखी चांगली कामं करून आपला विश्‍वास दाखवण्याचं प्रोत्साहन दिलं.