अभ्यास लेख ५०
गीत १३५ यहोवाची विनंती: “माझ्या मुला, सुज्ञपणे वाग”
आईवडिलांनो—आपल्या मुलांचा विश्वास मजबूत करायला त्यांना मदत करा
‘देवाची चांगली, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची खातरी करा.’—रोम. १२:२.
या लेखात:
आईवडील आपल्या मुलांशी देवाबद्दल आणि बायबलबद्दल कसं बोलू शकतात आणि त्यांचा विश्वास मजबूत करायला त्यांना कशी मदत करू शकतात ते पाहा.
१-२. जेव्हा मुलं आपल्या विश्वासाबद्दल प्रश्न विचारतात, तेव्हा आईवडिलांनी काय केलं पाहिजे?
आज मुलांना वाढवणं खूप कठीण आहे, हे बरेच जण कबूल करतील. तुम्हालाही जर मुलं असतील, तर तुम्ही त्यांचा विश्वास मजबूत करायला नक्कीच मेहनत घेत असाल. त्यासाठी आम्ही खरंच तुमची मनापासून प्रशंसा करतो. (अनु. ६:६, ७) तुमची मुलं मोठी होत असताना, ते तुम्हाला आपण जे काही मानतो त्याबद्दल बरेच प्रश्न विचारतील. जसं की, यहोवाने आपल्याला अमुक एक गोष्ट करायला का सांगितली?
२ आपली मुलं अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहेत हे पाहून सुरुवातीला कदाचित तुम्हाला काळजी वाटेल. कारण, तुम्हाला वाटेल की त्यांचा देवावरचा आणि बायबलवरचा विश्वास कमी होत चाललाय. पण खरंतर, मुलं मोठी होत असताना त्यांनी असे प्रश्न विचारले पाहिजेत. कारण त्यामुळेच त्यांचा विश्वास मजबूत होईल. (१ करिंथ. १३:११) म्हणून घाबरू नका. ती तुम्हाला मिळालेली एक संधीच आहे असं समजा. कारण, त्यामुळे तुम्हाला त्यांची विचारशक्ती वाढवायला आणि त्यांचा विश्वास मजबूत करायला मदत करता येईल.
३. या लेखात कशावर चर्चा करण्यात येईल?
३ या लेखात आपण तीन गोष्टींवर चर्चा करणार आहोत. त्या म्हणजे: आईवडील आपल्या मुलांना (१) देवावरचा आणि बायबलवरचा विश्वास मजबूत करायला, (२) बायबलच्या नैतिक स्तरांबद्दल कदर वाढवायला आणि (३) आपल्या विश्वासाबद्दल इतरांना समजावून सांगायला कशी मदत करू शकतात. तसंच, मुलांनी प्रश्न विचारणं का चांगलं आहे हेसुद्धा आपण पाहणार आहोत. शिवाय, आपल्या विश्वासाबद्दल मुलांशी बोलता येईल, यासाठी आईवडील काय करू शकतात हेही आपण पाहणार आहोत.
मुलांना देवावरचा आणि बायबलवरचा विश्वास मजबूत करायला मदत करा
४. मुलांच्या मनात कदाचित कोणते प्रश्न येतील, आणि का?
४ आईवडिलांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, तुमचा देवावर विश्वास आहे म्हणून तुमच्या मुलांचाही असेलच असं नाही. तुम्ही जन्मापासूनच यहोवावर विश्वास ठेवत नव्हता. आणि तुमच्या मुलांच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. त्यामुळे तुमच्या मुलांच्या मनात कदाचित प्रश्न येतील. जसं की: ‘देव खरंच आहे का? बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत का?’ खरंतर, बायबलमध्येसुद्धा आपल्याला आपल्या ‘तर्कबुद्धीचा’ वापर करायचं आणि ‘सगळ्या गोष्टींची खातरी करायचं’ प्रोत्साहन देण्यात आलंय. (रोम. १२:१, तळटीप; १ थेस्सलनी. ५:२१) पण तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचा विश्वास मजबूत करायला कशी मदत करू शकता?
५. आपल्या मुलांचा बायबलवरचा विश्वास मजबूत करायला, आईवडील काय करू शकतात? (रोमकर १२:२)
५ तुमच्या मुलांना स्वतःला सत्य पटवून द्यायचं प्रोत्साहन द्या. (रोमकर १२:२ वाचा.) जेव्हा तुमची मुलं प्रश्न विचारतात, तेव्हा संशोधन करून त्याचं उत्तर कसं शोधायचं हे त्यांना दाखवा. यासाठी तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांचं संशोधन मार्गदर्शक (रिसर्च गाईड) आणि वॉच टॉवर पब्लिकेशन इंडेक्स यांसारख्या संशोधनाच्या साधनांचा वापर करू शकता. मुलं संशोधन मार्गदर्शकामध्ये “बायबल” या शीर्षकाखाली “देवप्रेरित” हे उपशीर्षक पाहू शकतात. आणि बायबल हे माणसांनी लिहिलेलं फक्त एक चांगलं पुस्तक नसून, “देवाचं वचन” आहे या गोष्टीबद्दलचे पुरावे शोधू शकतात. (१ थेस्सलनी. २:१३) उदाहरणार्थ, तुमची मुलं अश्शूरच्या निनवे शहराबद्दल संशोधन करू शकतात. पूर्वी, बायबल तज्ज्ञांनी असा दावा केला होता, की निनवेचं शहर कधीच अस्तित्वात नव्हतं. पण १८५० च्या आसपास, उत्खनन करताना निनवे शहराचे अवषेश सापडले. आणि यावरून सिद्ध झालं, की बायबलमधला हा अहवाल अचूक आहे. (सफ. २:१३-१५) निनवेच्या नाशामुळे बायबलची ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली याबद्दलच्या आणखी माहितीसाठी ते नोव्हेंबर २०२१ च्या टेहळणी बुरूज अंकातला “तुम्हाला माहीत होतं का?” हा लेख पाहू शकतात. मुलं आपल्या प्रकाशनांमध्ये जे वाचतात त्याची तुलना ती एनसायक्लोपिडिया आणि इतर साहित्यांमध्ये जे वाचतात त्याच्याशी करू शकतात. असं केल्यामुळे त्यांचा विश्वास मजबूत होऊ शकतो. तसंच त्यांना याची खातरी पटू शकते की बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत.
६. आईवडील आपल्या मुलांना विचार करायला कसं शिकवू शकतात? उदाहरण द्या. (चित्रसुद्धा पाहा.)
६ तुमच्या मुलांना विचार करायला मदत करा. बायबलबद्दल किंवा देवावरच्या विश्वासाबद्दल, तुमच्या मुलांशी बोलण्यासाठी तुमच्याकडे बऱ्याच संधी आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या संग्रहालयात, बागेत किंवा यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यांलयाच्या एखाद्या संग्रहालयात जाता, तेव्हा तुमच्याकडे या संधी असतात. उदाहरणार्थ, एखाद्या संग्रहालयाला भेट देताना तुम्ही तुमच्या मुलांचं लक्ष अशा एखाद्या ऐतिहासिक वस्तूकडे किंवा घटनेकडे वळवू शकता, ज्याबद्दल बायबलमध्ये सांगितलंय. यामुळे तुमच्या मुलांची खातरी पटेल, की बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत. कदाचित तुम्ही तुमच्या मुलांना, “मवाबी दगडाबद्दल” शिकवू शकता. हा दगड तीन हजार वर्षं जुना आहे. आणि त्यावर यहोवाचं नाव कोरलंय. हा दगड, पॅरिसमधल्या लूव्र संग्रहालयात ठेवण्यात आलाय. तसंच, वॉरविकमधल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात “बायबल आणि देवाचं नाव” या संग्रहालयात या दगडाची हुबेहूब नक्कल असलेला एक दगड ठेवण्यात आलाय. मवाबचा राजा मेशा याने इस्राएलविरुद्ध बंड केलं होतं, असं या दगडावर कोरलंय. आणि बायबलमध्येही असंच सांगण्यात आलंय. (२ राजे ३:४, ५) जर तुम्हाला एखाद्या संग्रहालयात जाणं शक्य नसेल, तर मग तुम्ही तुमच्या मुलांसोबत या दगडासारख्या जुन्या गोष्टींचे फोटो इंटरनेटवर किंवा आपल्या प्रकाशनांमध्ये पाहू शकता. जेव्हा तुमची मुलं बायबलच्या अचूकतेचे पुरावे स्वतःच्या डोळ्यांनी पाहतील तेव्हा त्यांचा विश्वास आणखी मजबूत होईल.—२ इतिहास ९:६ सोबत तुलना करा.
७-८. (क) सृष्टीमध्ये दिसणाऱ्या गोष्टींच्या सुंदर डिझाइन पाहून आपण काय शिकू शकतो? उदाहरण द्या. (चित्रसुद्धा पाहा.) (ख) निर्माणकर्त्यावरचा विश्वास मजबूत करायला तुमच्या मुलांना कोणत्या प्रश्नामुळे मदत होऊ शकते?
७ मुलांना यहोवाने निर्माण केलेल्या अद्भुत गोष्टींवर विचार करायचं प्रोत्साहन द्या. तुम्ही बागेतून चालत असताना किंवा बागकाम करत असताना तुमच्या मुलांचं लक्ष सृष्टीत दिसणाऱ्या गोष्टींच्या अनोख्या डिझाइनकडे वळवा. यावरून तुमच्या मुलांना हे समजायला मदत करा, की सृष्टी एका बुद्धिमान व्यक्तीने निर्माण केली असेल. उदाहरणार्थ, सृष्टीतल्या बऱ्याच गोष्टींत स्पायरल डिझाइन (एका बिंदूपासून सुरू होऊन गोलगोल फिरणारी डिझाइन) दिसून येते. शास्त्रज्ञ बऱ्याच वर्षांपासून अशा डिझाइनवर अभ्यास करत आलेत. निकोला फमेली नावाचे एक वैज्ञानिक सांगतात, की जेव्हा आपण सृष्टीत दिसणाऱ्या एखाद्या वस्तुचं बारकाईने निरीक्षण करतो, तेव्हा आपल्याला अंकांचा एक क्रम दिसून येतो. यालाच इंग्रजीत फिबोनाची सिरीज (क्रम) म्हणतात. अशा प्रकारच्या डिझाइन सृष्टीतल्या बऱ्याच गोष्टींमध्ये दिसून येतात. जसं की, काही आकाशगंगांमध्ये, शंख-शिंपल्यांमध्ये, काही झाडांच्या पानांमध्ये आणि सूर्यफुलांमध्ये. a
८ शाळेत तुमच्या मुलांना कदाचित सृष्टीत दिसणाऱ्या गोष्टींच्या इतर डिझाइनबद्दल शिकायला मिळेल. उदाहरणार्थ, बऱ्याच झाडांच्या रचनेत एकसारखेपणा दिसून येतो. जसं की, खोडांमधून शाखा तयार होतात, शाखांमधून फांद्या आणि फांद्यांमधून आणखी छोट्या फांद्या तयार होतात. या विशिष्ट रचनेला इंग्रजीमध्ये फ्रॅक्टल म्हटलं जातं. अशा प्रकारची रचना सृष्टीतल्या इतर गोष्टींमध्येही दिसून येते. पण अशा प्रकारची सुंदर रचना करणारा कोण असेल? तुमची मुलं यहोवाने निर्माण केलेल्या अद्भुत गोष्टींवर जितका जास्त विचार करतील, तितकं जास्त त्यांना खातरी पटेल की यहोवानेच सर्वकाही निर्माण केलंय. (इब्री ३:४) तसंच, तुमची मुलं जसजशी मोठी होतात तसतसं देवाच्या आज्ञा पाळणं का महत्त्वाचं आहे हे समजून घ्यायला तुम्हाला त्यांना मदत करावी लागेल. आणि यासाठी तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारू शकता: “जर देवाने आपल्याला निर्माण केलंय तर आनंदी राहायला काय करणं गरजेचं आहे हे तोच आपल्याला सांगू शकत नाही का?” मग तुम्ही त्यांना सांगू शकता, की आपण आनंदी कसं राहू शकतो याबद्दल बायबलमध्ये सांगितलंय.
मुलांना बायबलच्या नैतिक स्तरांबद्दल कदर वाढवायला मदत करा
९. तुमची मुलं कदाचित बायबलच्या नैतिक स्तरांबद्दल प्रश्न का विचारतील?
९ बायबलमध्ये ज्या गोष्टींना चुकीचं म्हटलंय त्यांबद्दल कदाचित तुमची मुलं प्रश्न विचारतील. त्या वेळी ते असे प्रश्न का विचारत आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. त्यांना खरंच बायबलचे नैतिक स्तर मान्य नाहीत का? की फक्त इतरांना त्याबद्दल कसं समजावून सांगायचं हे त्यांना माहीत नाही? काहीही असलं तरी, तुम्ही तुमच्या मुलांसोबत कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाचा अभ्यास करून बायबलच्या नैतिक तत्त्वांबद्दलची कदर वाढवायला त्यांना मदत करू शकता. b
१०. यहोवाला आपला सगळ्यात चांगला मित्र बनवायला तुम्ही मुलांना कशी मदत करू शकता?
१० मुलांना यहोवासोबतच्या नात्याची कदर करायचं प्रोत्साहन द्या. त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घ्यायला कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकात दिलेल्या प्रश्नांचा आणि चित्रांचा वापर करा. (नीति. २०:५) उदाहरणार्थ, या पुस्तकाच्या आठव्या धड्यात यहोवाची तुलना एका प्रेमळ मित्राशी करण्यात आली आहे. एक असा मित्र जो आपल्या भल्यासाठी आणि आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला काही गोष्टींची आठवण करून देतो. १ योहान ५:३ वर चर्चा केल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना विचारू शकता: “यहोवा आपला एक चांगला मित्र आहे हे समजल्यामुळे तो आपल्याला जे करायला सांगतो, त्याबद्दल आपल्याला कसं वाटलं पाहिजे?” हा एक साधासाच प्रश्न वाटत असला, तरी तो विचारल्यामुळे तुमच्या मुलांना देवाचे नियम त्याच्या प्रेमाचा पुरावाच आहे हे समजून घ्यायला मदत होईल.—यश. ४८:१७, १८.
११. तुम्ही तुमच्या मुलांना बायबलच्या तत्त्वांबद्दलची कदर वाढवायला कशी मदत करू शकता? (नीतिवचनं २:१०, ११)
११ बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो, याबद्दल मुलांसोबत बोला. जेव्हा तुम्ही बायबल किंवा दैनिक वचन सोबत मिळून वाचता, तेव्हा बायबलच्या तत्त्वांमुळे तुमच्या कुटुंबाला कशी मदत झाली आहे यावर चर्चा करा. उदाहरणार्थ, अशा वेळी तुम्ही तुमच्या मुलांना हे समजायला मदत करू शकता, की मेहनती असल्यामुळे आणि नेहमी खरं बोलल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो. (इब्री १३:१८) यासोबत बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे आपली तब्येत चांगली राहते आणि आपण खूश असतो यावरही तुम्ही जोर देऊ शकता. (नीति. १४:२९, ३०) असं केल्यामुळे बायबलचे सल्ले किती चांगले आहेत याबद्दलची कदर आणखी वाढवायला तुमच्या मुलांना मदत होईल.—नीतिवचनं २:१०, ११ वाचा.
१२. बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे आपला फायदा होतो ही गोष्ट आपल्या मुलाला समजावून सांगायला स्टीव नावाचे भाऊ काय करतात?
१२ फ्रान्समध्ये राहणाऱ्या स्टीव नावाच्या भावाचा विचार करा. ते आणि त्यांची बायको त्यांच्या १६ वर्षांच्या मुलाला यहोवाच्या नियमांमागचं प्रेम पाहायला मदत करतात. याबद्दल बोलताना स्टीव म्हणतात: “आम्ही इथनला असे प्रश्न विचारतो, ‘आपण ही आज्ञा पाळावी असं यहोवाला का वाटतं? त्यावरून त्याचं प्रेम कसं दिसून येतं? आणि आपण तसं केलं नाही तर काय होऊ शकतं?’” अशा प्रकारे बोलल्यामुळे यहोवा जे म्हणतो ते योग्यच आहे यावरचा विश्वास मजबूत करायला इथनला मदत झाली आहे. स्टीव पुढे म्हणतात: “बायबलमध्ये सांगितलेल्या बुद्धीच्या गोष्टी मानवी बुद्धीपेक्षा खूप जास्त श्रेष्ठ आहेत हे इथनला समजावं हाच आमचा उद्देश असतो.”
१३. आईवडील आपल्या मुलांना बायबलची तत्त्वं लागू करायला कसं शिकवू शकतात? उदाहरण द्या.
१३ मुलांना बायबलची तत्त्वं लागू करायला शिकवा. उदाहरणार्थ, तुमच्या मुलांना शाळेच्या प्रोजेक्टसाठी एखादी कादंबरी किंवा गोष्टीचं पुस्तक वाचायला सांगितलं असेल. त्या पुस्तकातल्या गोष्टींमधले लोक कदाचित वाईट कामं करत असतील. जसं की, ते कदाचित अनैतिक गोष्टी करत असतील किंवा हिंसक असतील. आणि एवढं करूनसुद्धा त्यांना हिरो म्हणून दाखवलं असेल. तसंच हे पुस्तक कदाचित अशा पद्धतीने लिहिलेलं असेल, ज्यामुळे असं वाटेल की त्यातल्या गोष्टी मुळात चुकीच्या नाहीत. पण तुम्ही तुमच्या मुलांना याबद्दल यहोवाला कसं वाटतं यावर विचार करायला मदत करू शकता. (नीति. २२:२४, २५; १ करिंथ. १५:३३; फिलिप्पै. ४:८) यामुळे जेव्हा वर्गात या पुस्तकावर चर्चा होईल, तेव्हा कदाचित तुमच्या मुलांना शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांना चांगली साक्ष देता येईल.
आपल्या विश्वासाबद्दल इतरांना समजून सांगायला मुलांना तयार करा
१४. मुलांना कोणत्या विषयावर बोलायला भीती वाटू शकते, आणि का?
१४ कधीकधी आपल्या मुलांना आपल्या विश्वासाबद्दल इतरांना सांगायला भीती वाटू शकते. उदाहरणार्थ, आपण उत्क्रांतीवर विश्वास का करत नाही हे सांगायला त्यांना भीती वाटत असेल. का बरं? कारण शिक्षक कदाचित उत्क्रांतीचा विषय अशा प्रकारे शिकवत असतील की ती सिद्ध झालेली गोष्ट आहे. तर मग अशा वेळी आईवडिलांनो, तुम्ही तुमच्या मुलांना आपल्या विश्वासाबद्दल ठामपणे सांगायला कशी मदत करू शकता?
१५. आपण जे मानतो त्यावरचा विश्वास मजबूत करायला मुलांना कशामुळे मदत होईल?
१५ आपण मानत असलेल्या गोष्टींवरचा विश्वास मजबूत करायला मुलांना मदत करा. निर्माणकर्त्यावर आपला विश्वास आहे याबद्दल तुमच्या मुलाला लाज वाटून घ्यायची गरज नाही. (२ तीम. १:८) का नाही? कारण बरेच वैज्ञानिकसुद्धा हे मानतात, की सजीव सृष्टी आपोआप आली नाही. या सृष्टीतल्या जटिल रचनेमागे नक्कीच एक बुद्धिमान निर्माणकर्ता असवा असं त्यांना वाटतं. त्यामुळे तेसुद्धा शाळेतल्या पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत स्वीकारत नाहीत. मग निर्माणकर्त्यावरचा विश्वास वाढवायला तुमची मुलं काय करू शकतात? ज्या भाऊबहिणींचा आधी निर्माणकर्त्यावर विश्वास नव्हता त्यांच्याशी या विषयावर ते बोलू शकतात आणि कोणत्या गोष्टींमुळे त्या भाऊबहिणींना विश्वास ठेवायला मदत झाली यावर ते विचार करू शकतात. c
१६. निर्माणकर्त्याबद्दल इतरांना सांगायला आईवडील आपल्या मुलांना कशी मदत करू शकतात? (१ पेत्र ३:१५) (चित्रसुद्धा पाहा.)
१६ आपण निर्माणकर्त्यावर का विश्वास ठेवतो याबद्दल इतरांना सांगायला मुलांना तयार करा. (१ पेत्र ३:१५ वाचा.) jw.org या आपल्या वेबसाईटवर उत्क्रांती आणि निर्मिती या विषयावर बरेच लेख आहेत. तुम्ही तुमच्या मुलांसोबत यावर चर्चा करू शकता. आणि मग त्यांना विचारू शकता, की यातल्या कोणत्या तर्काचा वापर करून ते इतरांना निर्माणकर्त्याबद्दल चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतात. आणि मग, तुम्ही त्यांच्याकडून चांगला सराव करून घेऊ शकता. त्यासोबतच, त्यांना याचीही आठवण करून द्या की त्यांना या विषयावर वर्गातल्या इतर मुलांशी वाद घालायची गरज नाही. पण जर कोणी ऐकून घ्यायला तयार असेल, तर ते त्याच्यासोबत अगदी साध्या-सोप्या पद्धतीने कसा तर्क करू शकतात हे शिकवा. उदाहरणार्थ, वर्गातला एखादा मुलगा म्हणेल: “मला ज्या गोष्टी दिसतात त्यावरच मी भरवसा ठेवतो आणि देवाला मी कधीच पाहिलं नाही.” अशा वेळी तर्क करायला तुमची मुलं कदाचित असं म्हणू शकतात: “कल्पना कर की तू एका जंगलातून चालला आहेस आणि तुला आजूबाजूला एकही माणूस दिसत नाही. पण त्या जंगलात तुला एक लहानसं घर बांधलेलं दिसतं. मग कोणी माणूस दिसत नाही म्हणून तू असा विचार करशील का, की ते घर तिथे आपोआपच आलं? नक्कीच नाही. कारण तुला माहीत आहे की नक्कीच कोणीतरी ते घर बांधलंय. मग विचार कर निर्माणकर्ता दिसत नाही, म्हणून तू असा विचार केला पाहिजे का, की हे विश्व आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी आपोआपच आल्यात?”
१७. इतरांना बायबलबद्दल सांगायची संधी शोधायला आईवडील आपल्या मुलांना कसं प्रोत्साहन देऊ शकतात? समजावून सांगा.
१७ इतरांना बायबलमधली सत्यं सांगायच्या संधी शोधायला मुलांना प्रोत्साहन द्या. (रोम. १०:१०) इतरांना आपल्या विश्वासाबद्दल सांगायला आपण खरंतर खूप मेहनत घेत असतो. त्याची तुलना आपण एखादं संगीत वाद्य वाजवायला शिकताना जी मेहनत घेतो त्याच्याशी करू शकतो. शिकणारा सुरुवातीला सोपीसोपी गाणी वाजवतो आणि मग हळूहळू त्यात तरबेज होतो. तसंच, मुलं सुरुवातीला बायबलची सत्यं सांगताना सोप्या पद्धतीचा वापर करू शकतात. उदाहरणार्थ, तुमची मुलं एखाद्या वर्गसोबत्याला म्हणू शकतात: “तुला माहीत आहे का, वैज्ञानिकांनी निसर्गातल्या गोष्टींची नक्कल करून बऱ्याच गोष्टी बनवल्यात? याबद्दल माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. मी शाळेनंतर तुला दाखवला तर चालेल का?” मग उत्क्रांती की निर्मिती या व्हिडिओ मालिकेतला एखादा व्हिडिओ दाखवल्यानंतर ते असं म्हणू शकतात: “निसर्गातल्या गोष्टींची नक्कल करून माणसं वेगवेगळ्या गोष्टी बनवतात तेव्हा त्यांची स्तुती केली जाते. मग ज्या गोष्टींची ते नक्कल करतात त्यासाठी कोणाची स्तुती झाली पाहिजे?” अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तर्क केल्यामुळे तो वर्गसोबती यहोवाबद्दल आणखी जाणून घ्यायला कदाचित तयार होईल.
मुलांचा विश्वास मजबूत करायला त्यांना मदत करत राहा
१८. आईवडील आपल्या मुलांचा विश्वास मजबूत करत राहायला कशी मदत करू शकतात?
१८ आज आपण अशा जगात जगत आहोत जिथे लोक यहोवावर विश्वास ठेवत नाहीत. (२ पेत्र ३:३) त्यामुळे आईवडिलांनो, तुमच्या मुलांसोबत बायबलचा अभ्यास करताना देवाच्या वचनाबद्दल आणि त्याच्या नैतिक स्तरांबद्दल आदर वाढेल अशा विषयांवर अभ्यास करायचं प्रोत्साहन त्यांना द्या. त्यांच्यासोबत यहोवाच्या निर्मितीबद्दल बोला आणि त्यावर विचार करायला त्यांना उत्तेजन द्या. बायबलच्या ज्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या आहेत त्याबद्दल कदर वाढवायला त्यांना मदत करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलांसोबत प्रार्थना करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही असं कराल, तेव्हा तुमच्या मुलांचा विश्वास वाढवण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेताय त्यावर यहोवा नक्कीच आशीर्वाद देईल याची खातरी तुम्ही नक्कीच बाळगू शकता!—२ इति. १५:७.
गीत १३३ तारुण्यात यहोवाची सेवा करू!
b जर तुमच्या मुलांचा कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातून अभ्यास पूर्ण झाला असेल, तर तुम्ही त्यांच्यासोबत भाग ३ आणि ४ मधल्या काही धड्यांची उजळणी करू शकता. या धड्यांमध्ये बायबलच्या नैतिक स्तरांबद्दल सांगण्यात आलंय.
c सावध राहा! सप्टेंबर २००६ मधला “निर्माणकर्ता आहे असे आम्ही का मानतो?” हा लेख आणि जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्न हे माहितीपत्रक पाहा. आणखी उदाहरणांसाठी jw.org वर जीवनाच्या सुरुवातीबद्दल मतं ही व्हिडिओ मालिका पाहा.
d चित्राचं वर्णन: ड्रोन उडवायची आवड असलेल्या वर्गसोबत्याला एक तरुण भाऊ उत्क्रांती की निर्मिती? या व्हिडिओ मालिकेतला एक व्हिडिओ दाखवतोय.