अभ्यास लेख ५१
गीत ३ यहोवा आपलं बळ आणि आसरा
तुमचे अश्रू यहोवासाठी अनमोल आहेत
“माझे अश्रू तुझ्या बुधलीत जमा कर. तुझ्या वहीत तू त्यांचा हिशोब लिहून ठेवला आहेस.”—स्तो. ५६:८.
या लेखात:
आपण दुःखी आणि निराश असतो तेव्हा यहोवा आपल्या भावना कशा समजून घेतो आणि आपल्याला सांत्वन कसं देतो ते पाहा.
१-२. कोणत्या गोष्टींमुळे आपल्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात?
आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यांत कधी न कधी अश्रू आले असतील. आपल्या जीवनात एखादी आनंदाची गोष्ट घडते तेव्हा आपल्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू येतात. तुमच्याही जीवनात एखादी खास किंवा महत्त्वाची गोष्ट घडल्यामुळे असं झालं असेल. जसं की, तुमच्या बाळाचा जन्म झाला तेव्हा, तुमच्या आयुष्यात घडलेली एखादी खास गोष्ट आठवली असेल तेव्हा, किंवा तुमचा जवळचा मित्र बऱ्याच वर्षांनी भेटला असेल, तेव्हा तुमच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आले असतील.
२ पण बऱ्याचदा आपण दुःखी असतो किंवा निराश असतो तेव्हा आपल्या डोळ्यांत अश्रू येतात. उदाहरणार्थ, आपण ज्या व्यक्तीवर खूप भरवसा ठेवतो ती जेव्हा आपल्याला निराश करते तेव्हा आपल्या डोळ्यांत पाणी येऊ शकतं. तसंच, आपण एखाद्या गंभीर आजाराचा सामना करत असतो तेव्हा आपल्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात. किंवा मग आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हासुद्धा आपल्या डोळ्यांतून अश्रू येऊ शकतात. अशा वेळी आपल्याला यिर्मया संदेष्ट्यासारखं वाटू शकतं. बाबेलने यरुशलेमचा नाश केला तेव्हा त्याला खूप दुःख झालं होतं. त्याने म्हटलं: “माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहतात. माझ्या डोळ्यांतले अश्रू थांबत नाहीत, ते अखंड वाहत राहतात.”—विलाप. ३:४८, ४९.
३. जेव्हा यहोवा त्याच्या सेवकांना दुःख सहन करताना पाहतो, तेव्हा त्याला कसं वाटतं? (यशया ६३:९)
३ आपल्या जीवनात येणाऱ्या दुःखांमुळे आणि समस्यांमुळे आपण कितीदा डोळ्यांतून अश्रू वाहिलेत हे यहोवाला माहीत आहे. बायबल आपल्याला याची खातरी देतं, की यहोवाचे सेवक कोणत्या दुःखदायक परिस्थितीतून जात आहेत हे त्याला माहीत आहे आणि तो त्यांच्या मदतीची याचना ऐकतो. (स्तो. ३४:१५) पण यहोवा फक्त आपलं दुःखच पाहत नाही किंवा आपल्या मदतीची याचनाच ऐकत नाही, तर एका प्रेमळ पालकाप्रमाणे जेव्हा तो त्याच्या मुलांना दुःखाने रडताना पाहतो तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं. आणि त्यांना मदत करण्यासाठी तो आतुर असतो.—यशया ६३:९ वाचा.
४. या लेखात आपण कोणाच्या उदाहरणांवर विचार करणार आहोत आणि त्यांमधून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळेल?
४ यहोवाच्या सेवकांच्या डोळ्यांत जेव्हा अश्रू आले तेव्हा त्याला कसं वाटलं आणि त्याने त्यांची कशी मदत केली हे त्याने त्याच्या वचनात लिहून ठेवलंय. हीच गोष्ट आपल्याला हन्नाच्या, दावीदच्या आणि हिज्कीया राजाच्या उदाहरणांतून समजते. त्यांच्या डोळ्यांत अश्रू का आले? यहोवाने त्यांना मदत कशी केली? आणि दुःखामुळे, विश्वासघातामुळे किंवा निराशेमुळे आपल्या डोळ्यांत अश्रू येतात तेव्हा त्यांच्या उदाहरणांतून आपल्याला कसं सांत्वन मिळू शकतं?
दुःखामुळे येणारे अश्रू
५. हन्नाला तिच्या परिस्थितीमुळे कसं वाटायचं?
५ हन्नाच्या जीवनात अशा बऱ्याच समस्या होत्या, ज्यांमुळे तिच्या डोळ्यांत अश्रू आले. सर्वात मोठी समस्या म्हणजे, तिच्या नवऱ्याला आणखी एक बायको होती. तिचं नाव पनिन्ना होतं. ती हन्नाचा खूप रागराग करायची. भरीत भर म्हणजे हन्नाला मूलबाळ नव्हतं आणि पनिन्नाला बरीच मुलं होती. (१ शमु. १:१, २) त्यामुळे पनिन्ना तिला सारखं घालूनपाडून बोलायची आणि टोमणे मारायची. जरा विचार करा, तुम्ही हन्नाच्या जागी असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं? हन्नाला खूप वाईट वाटायचं. इतकं की ती “फार रडायची आणि जेवायचीही नाही.” तसंच, तिचं “मन अतिशय कटू झालं होतं.”—१ शमु. १:६, ७, १०.
६. सांत्वन मिळावं म्हणून हन्नाने काय केलं?
६ मग हन्नाला सांत्वन कसं मिळालं? एक म्हणजे, ती उपासना मंडपात गेली. कदाचित ती तिथल्या अंगणाच्या दाराजवळ उभी राहिली असावी. मग दुःख अनावर होऊन “ती तिथे घळाघळा रडू लागली आणि यहोवाला कळकळून प्रार्थना करू लागली.” तिने यहोवाला अशी विनंती केली, ‘मी खूप दुःखी आहे, तुझ्या या दासीची आठवण ठेव.’ (१ शमु. १:१०ख, ११) हन्नाने यहोवासमोर तिचं मन मोकळं केलं. आपल्या या प्रिय मुलीला रडताना पाहून यहोवाला खरंच किती वाईट वाटलं असेल!
७. यहोवासमोर मन मोकळं केल्यामुळे हन्नाला सांत्वन कसं मिळालं?
७ हन्नाने प्रार्थनेत यहोवासमोर मन मोकळं केल्यानंतर आणि यहोवा तिची प्रार्थना ऐकेल अशी महायाजक एलीकडून खातरी मिळाल्यानंतर तिला कसं वाटलं? अहवालात पुढे म्हटलंय: “ती स्त्री तिथून निघून गेली आणि जाऊन तिने जेवण केलं. त्यानंतर मात्र तिचा चेहरा उदास राहिला नाही.” (१ शमु. १:१७, १८) लक्षात घ्या की हन्नाची परिस्थिती अजूनही सुधारली नव्हती, तरीसुद्धा हन्नाला बरं वाटलं होतं. कारण तिने तिच्या मनावरचं सगळं ओझं यहोवावर टाकून दिलं होतं. यहोवाने तिचं दुःख पाहिलं होतं, तिची मदतीची याचना ऐकली होती आणि म्हणून त्याने तिला आशीर्वाद दिला. आणि पुढे तिला मुलं झाली.—१ शमु. १:१९, २०; २:२१.
८-९. इब्री लोकांना १०:२४, २५ प्रमाणे आपण सभेला जायचा पुरेपूर प्रयत्न का केला पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)
८ आपण काय शिकतो? तुम्ही अशा एखाद्या दुःखद परिस्थितीतून जात आहात का, ज्यामुळे तुमचे अश्रू थांबता थांबत नाहीत? कदाचित तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा किंवा जवळच्या एखाद्या मित्राचा मृत्यू झाला असेल. अशा वेळी एकटं राहावंसं वाटणं साहजिकच आहे. पण हन्नाला जसं उपासना मंडपात गेल्यामुळे सांत्वन आणि प्रोत्साहन मिळालं, तसंच तुम्हालाही सभांमध्ये गेल्यामुळे सांत्वन मिळू शकतं; मग तुम्ही कितीही दुःखी असला तरीही. (इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा.) सभांमध्ये आपल्याला सांत्वन देणारी वचनं वाचायला मिळतात. तेव्हा, यहोवा आपल्याला खरंतर निराश करणाऱ्या गोष्टींवर विचार करण्याऐवजी चांगल्या गोष्टींवर विचार करायला मदत करत असतो. आणि यामुळे आपली परिस्थिती अजून सुधारली नसली, तरीसुद्धा आपल्याला खूप बरं वाटतं.
९ सभांमध्ये आपले भाऊबहीण आपल्याला प्रोत्साहन देतात. त्यांचं आपल्यावर किती प्रेम आहे हे ते आपल्याला दाखवून देतात. आणि आपण जेव्हा त्यांच्यासोबत असतो तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. (१ थेस्सलनी. ५:११, १४) खास पायनियर असलेल्या एका भावाचा विचार करा. त्याच्या बायकोचा मृत्यू झाला. तो म्हणतो: “कधीकधी मला एकटं राहावंसं वाटतं, कारण मला माझ्या बायकोची इतकी आठवण येते की माझे अश्रू थांबतच नाहीत. पण सभांना गेल्यामुळे मला खूप सांत्वन मिळतं. भाऊबहिणींच्या प्रेमळ शब्दांमुळे आणि त्यांच्या उत्तरांमुळे खूप दिलासा मिळतो, खूप बरं वाटतं. सभेला जाण्याआधी मी कितीही निराश असलो तरी प्रत्येक वेळी मी सभेला जातो तेव्हा मला बरं वाटतं.” या अनुभवावरून हेच दिसून येतं, की आपण जेव्हा सभेला जातो तेव्हा यहोवा आपल्या भाऊबहिणींचा वापर करून आपल्याला मदत करतो.
१०. जेव्हा आपण खूप खचून जातो तेव्हा हन्नासारखं आपण काय करू शकतो?
१० प्रार्थनेत यहोवासमोर आपलं मन मोकळं केल्यामुळेसुद्धा हन्नाला खूप सांत्वन मिळालं. तुम्हीसुद्धा “आपल्या सगळ्या चिंता [यहोवावर] टाकून” देऊ शकता आणि याची खातरी बाळगू शकता की तो तुमची प्रार्थना ऐकेल आणि तुम्हाला मदत करेल. (१ पेत्र ५:७) एका बहिणीचा अनुभव लक्षात घ्या. तिच्या पतीला दरोडेखोरांनी मारून टाकलं होतं. ती म्हणते: “मला असं वाटलं की जणू काही माझ्या हृदयाचे तुकडे-तुकडे झालेत आणि ते पुन्हा कधीच जुळणार नाही. पण माझ्या प्रेमळ पित्याला, यहोवाला प्रार्थना केल्यामुळे मला सांत्वन मिळालं आणि मला खूप बरं वाटलं. कधीकधी नेमकं काय बोलायचं हे मला सुचायचंच नाही. पण यहोवाला माझ्या भावना समजायच्या. जेव्हा मी खूप खचून जायचे तेव्हा प्रार्थना केल्यामुळे माझं मन शांत व्हायचं. मला लगेच बरं वाटायचं आणि त्या दिवसाची कामं करायला मला ताकद मिळायची.” जेव्हा तुम्ही यहोवासमोर तुमचं मन मोकळं करता आणि तुमच्या सगळ्या चिंता त्याला सांगता, तेव्हा तुमचे अश्रू पाहून त्याला खूप वाईट वाटतं आणि तुम्हाला नेमकं कसं वाटतंय हे तो समजू शकतो. तुमच्या समस्या जरी लगेच सुटल्या नसल्या, तरी यहोवा तुम्हाला सांत्वन देऊ शकतो आणि शांत राहायला मदत करू शकतो. (स्तो. ९४:१९; फिलिप्पै. ४:६, ७) आणि तुम्ही याची खातरी बाळगू शकता की तुम्ही विश्वासूपणे जो धीर धरताय त्याबद्दल यहोवा तुम्हाला नक्कीच प्रतिफळ देईल.—इब्री ११:६.
विश्वासघातामुळे येणारे अश्रू
११. दावीदवर ज्या समस्या आल्या त्यामुळे त्याला कसं वाटलं?
११ दावीदच्या जीवनात अशा बऱ्याच कठीण समस्या आल्या, ज्यांमुळे त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. लोकांनी त्याचा द्वेष केला. इतकंच काय, तर त्याच्या जवळच्या लोकांनी त्याचा विश्वासघात केला. (१ शमु. १९:१०, ११; २ शमु. १५:१०-१४, ३०) त्याच्या आयुष्याच्या एका कठीण काळात त्याने असं म्हटलं: “मी कण्हून कण्हून थकलोय; रात्रभर माझा बिछाना अश्रूंनी ओलाचिंब होतो; माझ्या पलंगावर आसवांचा पूर येतो.” त्याला असं का वाटलं? तो पुढे म्हणतो, की त्याचा “छळ करणाऱ्यांमुळे” त्याला असं वाटलं. (स्तो. ६:६, ७) दुसऱ्यांच्या वाईट वागण्यामुळे दावीदला इतकं दुःख झालं की त्याचे अश्रू थांबत नव्हते.
१२. स्तोत्र ५६:८ मध्ये सांगितल्याप्रमाणे दावीदला कशाची खातरी होती?
१२ दावीदच्या जीवनात इतक्या समस्या आल्या तरी त्याला या गोष्टीची खातरी होती, की यहोवाचं त्याच्यावर प्रेम आहे. त्याने असं लिहिलं: “यहोवा माझ्या रडण्याचा आवाज नक्की ऐकेल.” (स्तो. ६:८) आणखी एकदा, दावीदने त्याच्या स्तोत्रात एक खूप सुंदर शब्दचित्र रेखाटलं. त्याबद्दल आपल्याला स्तोत्र ५६:८ (वाचा.) मध्ये वाचायला मिळतं. या शब्दचित्रावरून स्पष्ट होतं, की यहोवा किती प्रेमळ देव आहे. दावीदला असं वाटलं जणू काही यहोवाने त्याचे अश्रू बुधलीत जमा केलेत किंवा एका वहीत त्यांची नोंद करून ठेवली आहे. दावीदला हे माहीत होतं, की यहोवाने त्याचा त्रास पाहिलाय आणि त्याच्या तो लक्षात आहे. दावीदला एका गोष्टीची पक्की खातरी होती. ती म्हणजे, त्याच्या प्रेमळ पित्याला त्याच्या समस्याच नाही, तर त्या समस्यांमुळे त्याच्यावर जो परिणाम होतोय तोसुद्धा माहीत होता.
१३. जेव्हा कोणी आपला विश्वासघात करतं किंवा आपलं मन दुखावतं तेव्हा आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)
१३ आपण काय शिकतो? तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुमचं मन दुखावल्यामुळे किंवा तुमचा विश्वासघात केल्यामुळे तुम्ही खचून गेला आहात का? कदाचित तुमचं ठरलेलं लग्न मोडलं असेल किंवा तुमच्या जोडीदाराने तुम्हाला सोडून दिलं असेल. किंवा मग, तुमच्या एका जवळच्या व्यक्तीने यहोवाची सेवा करायचं सोडलं असेल. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला खूप दुःख होऊ शकतं. एका भावाचा विचार करा. त्याच्या बायकोने व्यभिचार केला आणि ती त्याला सोडून गेली. तो म्हणतो: “मला खूप मोठा धक्का बसला. ती माझ्यासोबत असं वागेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला असं वाटायचं की मी काहीच कामाचा नाही. मी खूप दुःखी होतो आणि मला खूप चीड यायची.” जर तुम्हीसुद्धा विश्वासघाताचा किंवा निराशेचा सामना करत असाल तर तुम्हाला हे जाणून सांत्वन मिळेल, की यहोवा तुम्हाला कधीच सोडणार नाही. तो भाऊ पुढे म्हणतो: “मला हे कळून चुकलंय की लोक आपला विश्वासघात करतील, पण यहोवा आपला खडक आहे. तो कधीच आपला विश्वासघात करणार नाही. आणि काहीही झालं तरी तो त्याच्या विश्वासू सेवकांना कधीच सोडून देणार नाही.” (स्तो. ३७:२८) हेही लक्षात असू द्या, की कोणताही माणूस करणार नाही इतकं प्रेम यहोवा तुमच्यावर करतो. हे खरंय की विश्वासघात झाल्यामुळे होणारं दुःख खूप जास्त असतं. पण लक्षात असू द्या की यहोवाचं तुमच्यावर जिवापाड प्रेम आहे. (रोम. ८:३८, ३९) थोडक्यात सांगायचं झालं तर समोरच्या व्यक्तीने तुम्हाला कसंही वागवलं असलं, तरी तुमच्या स्वर्गातल्या पित्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
१४. स्तोत्र ३४:१८ मधून आपल्याला काय खातरी मिळते?
१४ विश्वासघातामुळे होणाऱ्या दुःखाचा सामना करत असताना स्तोत्र ३४:१८ (वाचा.) मधल्या दावीदच्या शब्दांमुळेसुद्घा आपल्याला सांत्वन मिळू शकतं. याबद्दल एका पुस्तकात असं म्हटलंय, की ‘मनाने खचलेले,’ असे लोक असू शकतात, “ज्यांना काहीच आशा नाही.” मग अशा लोकांबद्दल यहोवाला कसं वाटतं? यहोवा त्यांच्या जवळ असतो. तो अशा पालकासारखा आहे जो आपल्या रडणाऱ्या मुलाला कुशीत घेतो आणि त्याला सांत्वन देतो. एखाद्याने आपला विश्वासघात केल्यामुळे आपण दुःखी होतो, तेव्हा यहोवाला आपलं दुःख जाणवतं आणि तो आपल्याला मदत करायला आतुर असतो. तो आपल्या मनावर झालेल्या जखमांवर फुंकर घालायला तयार असतो. तसंच, त्याने आपल्याला खूप सुंदर आशासुद्धा दिली आहे. त्यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करायला मदत होते.—यश. ६५:१७.
निराशेमुळे येणारे अश्रू
१५. कोणत्या गोष्टीमुळे हिज्कीयाच्या डोळ्यांत अश्रू आले?
१५ यहूदाचा राजा हिज्कीया ३९ वर्षांचा होता, तेव्हा त्याला कळलं की त्याला एक गंभीर आजार आहे. यशया संदेष्ट्याने त्याला यहोवाचा संदेश दिला. त्याने त्याला म्हटलं की त्याच्या आजारपणामुळे त्याचा मृत्यू होईल. (२ राजे २०:१) यामुळे हिज्कीयाला कोणतीच आशा दिसत नव्हती. तो इतका दुःखी झाला की ढसाढसा रडू लागला. आणि त्याने यहोवाला कळकळून प्रार्थना केली.—२ राजे २०:२, ३.
१६. यहोवाने हिज्कीयाच्या प्रार्थनेचं उत्तर कसं दिलं?
१६ हिज्कीयाने रडून यहोवाला जी प्रार्थना केली, ती ऐकून यहोवाला त्याची दया आली. त्याने त्याला म्हटलं: “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. मी तुला बरं करीन.” यशया संदेष्ट्याद्वारे यहोवाने त्याचं आयुष्य आणखी वाढवायचं आणि यरुशलेमला अश्शूरच्या राजाच्या हातून वाचवायचं वचन दिलं.—२ राजे २०:४-६.
१७. आपण जेव्हा गंभीर आजाराचा सामना करत असतो, तेव्हा त्या वाईट परिस्थितीत टिकून राहायला यहोवा आपल्याला कशी मदत करतो? (स्तोत्र ४१:३) (चित्रसुद्धा पाहा.)
१७ आपण काय शिकतो? तुम्हाला असा एखादा आजार झालाय का, ज्यावर काहीच इलाज नाही? तर मग यहोवाला प्रार्थना करा. अगदी कळकळून, रडून प्रार्थना करा. बायबल आपल्याला अशी खातरी देतं, की “जो खूप करुणामय असा पिता आहे, आणि सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे” तो सर्व परीक्षांमध्ये आपलं सांत्वन करेल. (२ करिंथ. १:३, ४) यहोवाने आपल्या सगळ्या समस्या काढून टाकाव्यात, अशी आज आपण त्याच्याकडून अपेक्षा करू शकत नाही. पण तो आपल्याला त्यांत टिकून राहायला मदत नक्कीच करू शकतो. (स्तोत्र ४१:३ वाचा.) तसंच, तो त्याच्या पवित्र शक्तीद्वारे आपल्याला समस्यांचा सामना करायला लागणारी शक्ती, बुद्धी आणि मनाची शांती देतो. (नीति. १८:१४; फिलिप्पै. ४:१३) शिवाय, भविष्यात कोणत्याही प्रकारचा आजार नसेल, ही आशा देऊनही तो आपल्याला सांत्वन देतो.—यश. ३३:२४.
१८. कठीण समस्येचा सामना करताना कोणत्या वचनामुळे तुम्हाला सांत्वन मिळतं? (“ अश्रू येतात तेव्हा सांत्वन देणारी वचनं” ही चौकट पाहा.)
१८ हिज्कीयाला यहोवाच्या शब्दांमुळे सांत्वन मिळालं. तसंच, आपल्यालाही बायबलमधून सांत्वन मिळू शकतं. कठीण समस्यांचा सामना करत असताना आपल्याला सांत्वन मिळावं यासाठी त्याने त्याच्या वचनात दिलासा देणारे शब्द लिहून ठेवलेत. (रोम. १५:४) पश्चिम आफ्रिकेत राहणाऱ्या एका बहिणीला जेव्हा कळलं, की तिला कॅन्सर झालाय, तेव्हा तिला खूप दुःख झालं. ती बऱ्याचदा रडायची. ती म्हणते: “यशया २६:३ या वचनामुळे मला खूप जास्त सांत्वन मिळालं. जरी परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसलं, तरी हे वचन आपल्याला याची खातरी देतं, की यहोवा आपल्याला शांत राहायला आणि परिस्थितीचा धीराने सामना करायला मदत करेल.” तुम्हीसुद्धा अशा परिस्थितीतून जात आहात का, जी बदलण्याची काहीच आशा वाटत नाही? मग अशा वेळी तुम्हाला कोणत्या वचनामुळे सांत्वन मिळतं?
१९. आपण कोणत्या चांगल्या गोष्टीची वाट पाहू शकतो?
१९ आपण या व्यवस्थेच्या शेवटच्या दिवसांमध्ये जगतोय. म्हणून ज्या समस्यांमुळे आपल्या डोळ्यांत अश्रू येतात, त्या समस्या वाढतच जाणार आहेत. पण हन्ना, दावीद आणि हिज्कीया राजा यांच्या उदाहरणांतून शिकल्याप्रमाणे यहोवा आपल्या डोळ्यांतून येणारे अश्रू पाहतो. आणि ते पाहून त्याला खूप दुःख होतं. आपले अश्रू यहोवासाठी खूप अनमोल आहेत. म्हणून ज्या वेळी आपल्यावर कठीण समस्या येतात, तेव्हा आपण यहोवासमोर प्रार्थनेत आपलं मन मोकळं करत राहू या. तसंच, एकटं न राहता आपण मंडळीतल्या आपल्या प्रेमळ भाऊबहिणींसोबत राहू या. आणि बायबलमधल्या यहोवाच्या दिलासादायक शब्दांमधून सांत्वन मिळवत राहू या. आपण याची खातरी ठेवू शकतो, की जर आपण विश्वासू राहून धीर धरला, तर यहोवा आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल. तसंच, दुःख झाल्यामुळे, निराशेमुळे आणि विश्वासघातामुळे आपल्या डोळ्यांत जे अश्रू येतात ते भविष्यात तो पुसून टाकणार आहे. (प्रकटी. २१:४) मग त्या वेळी आपल्या डोळ्यांतून फक्त आनंदाचेच अश्रू वाहतील!
गीत ४ “यहोवा माझा मेंढपाळ”