व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

मी शिकायचं कधीच थांबवलं नाही

मी शिकायचं कधीच थांबवलं नाही

यहोवा माझा ‘महान शिक्षक’ आहे, हा खरंतर माझ्यासाठी खूप मोठा बहुमान आहे आणि मला याची मनापासून कदर आहे. (यश. ३०:२०) तो बायबलद्वारे, त्याने बनवलेल्या अद्‌भुत सृष्टीद्वारे आणि त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला शिकवतो. आणि आपल्याला शिकवण्यासाठी तो आपल्या भाऊबहिणींचासुद्धा वापर करतो. मी आता शंभरी गाठणार आहे. पण तरीही या सगळ्या मार्गांनी मी आजही यहोवाकडून शिकतोय. तुम्ही म्हणाल कसं काय? चला, थोडं याबद्दल सांगतो.

१९४८ मध्ये माझ्या कुटुंबासोबत

अमेरिकेतल्या शिकागोजवळच्या एका छोट्या गावात १९२७ मध्ये माझा जन्म झाला. आम्ही एकूण पाच भावंडं आहोत. जेथा, डॉन, मी, कार्ल आणि जॉय. आम्ही सर्वांनी यहोवाची मनापासून सेवा करायचं ठरवलं होतं. म्हणून जेथा १९४३ मध्ये गिलियडच्या दुसऱ्‍या वर्गाला गेली. आणि डॉन, कार्ल आणि जॉय न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन बेथेलमध्ये गेले. डॉन १९४४ मध्ये, कार्ल १९४७ मध्ये आणि जॉय १९५१ मध्ये. साहजिकच त्यांचं आणि माझ्या आईवडिलांचं माझ्यासमोर एक खूप चांगलं उदाहरण होतं.

आम्ही सत्य कसं शिकलो?

माझ्या आईवडिलांचा देवावर खूप विश्‍वास होता. ते नेहमी बायबल वाचायचे. आणि तेच त्यांनी आमच्या मनातही रुजवलं. पण पहिल्या महायुद्धादरम्यान युरोपच्या सैन्यात काम केल्यानंतर माझ्या वडिलांचा चर्चवरचा विश्‍वास उडाला. पण माझ्या आईला यातच समाधान होतं की ते युद्धातून सुरक्षित परत आले. ती त्यांना म्हणाली, “आपण पहिल्यासारखं चर्चला जाऊ या का?” त्यावर ते म्हणाले, “मी तुला तिथपर्यंत सोडतो, पण आत येणार नाही.” “का?” आई म्हणाली. मग ते बोलले, “मी पाहिलंय, की युद्धादरम्यान दोन्ही बाजूचे पाळक एकाच धर्माचे असून ते आपापल्या सैनिकांवर आणि त्यांच्या शस्त्रांवर आशीर्वाद मागत होते. मग काय देव दोन्हीकडच्यांना आशीर्वाद देणार आहे का?”

नंतर एकदा आई चर्चला गेली होती तेव्हा दोन यहोवाचे साक्षीदार आमच्या घरी आले. त्यांनी वडिलांना बायबल अभ्यास करण्यासाठी लाईट पुस्तकाचे दोन खंड दिले. त्यांत प्रकटीकरण पुस्तकाबद्दल चर्चा करण्यात आली होती. वडिलांना ती पुस्तकं आवडली आणि त्यांनी ती ठेवून घेतली. एकदा आईने ती पुस्तकं पाहिली आणि ती वाचायला सुरुवात केली. मग एक दिवस न्यूजपेपरमध्ये तिने एक नोटीस वाचली. त्यात लाईट पुस्तकाचा वापर करून बायबल अभ्यास करण्यासाठी एका ठिकाणी आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे ती तिथे गेली. तिथे गेल्यानंतर एका वयस्कर स्त्रीने दार उघडलं. त्यांतलंच एक पुस्तक दाखवत आईने तिला विचारलं, “या पुस्तकातून अभ्यास इथेच केला जातो का?” त्यावर त्या म्हणाल्या, “हो बाळ, ये आत.” पुढच्या आठवडी आईने आम्हालासुद्धा नेलं. आणि त्यानंतर आम्ही नेहमी तिथे जाऊ लागलो.

एकदा सभा चालवणाऱ्‍या भावाने मला स्तोत्र १४४:१५ हे वचन वाचायला सांगितलं. त्यात म्हटलंय, की जे देवाची उपासना करतात ते आनंदी असतात. ते वचन मला खूप आवडलं. आणखी दोन वचनंसुद्धा मला खूप आवडायची. पहिलं म्हणजे १ तीमथ्य १:११. तिथे म्हटलंय, की यहोवा एक ‘आनंदी देव’ आहे. आणि दुसरं, इफिसकर ५:१. तिथे आपल्याला ‘देवाचं अनुकरण करायचं’ प्रोत्साहन देण्यात आलंय. माझ्या लक्षात आलं की माझ्या निर्माणकर्त्याची सेवा करण्यात मला आनंद वाटला पाहिजे. आणि या बहुमानाबद्दल मी त्याचे आभार मानले पाहिजेत. त्यामुळे पुढे या दोन गोष्टी माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाच्या बनल्या.

आमच्यासाठी सगळ्यात जवळची मंडळी ३२ कि.मी. अंतरावर शिकागोमध्ये होती. पण तरीसुद्धा आम्ही जायचो. आणि त्यामुळे बायबलबद्दल मला आणखी जास्त समजत गेलं. मला आठवतं, एकदा सभा चालवणाऱ्‍या भावाने जेथाला उत्तर विचारलं. तिचं उत्तर ऐकून मी मनातल्या मनात म्हटलं, ‘हे तर मलापण माहीत होतं. मीसुद्धा उत्तर द्यायला हात वर करू शकलो असतो.’ त्यानंतर मग मी सभांची चांगली तयारी करून स्वतःच्या शब्दांत उत्तर देऊ लागलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, माझ्या भावंडांसोबतच मीसुद्धा चांगली प्रगती केली. आणि १९४१ मध्ये मी बाप्तिस्मा घेतला.

अधिवेशनांमधून यहोवाबद्दल शिकायला मिळालं

क्लीवलॅन्ड, ओहायो इथे १९४२ साली झालेलं अधिवेशन मी कधीच विसरू शकणार नाही. त्या वेळी अमेरिकेतल्या ५० पेक्षा जास्त शहरांना हा कार्यक्रम ऐकता यावा म्हणून टेलिफोनद्वारे व्यवस्था केली होती. अधिवेशनापासून जवळच एका ठिकाणी राहण्यासाठी तंबू उभारण्यात आले होते. आम्हीसुद्धा तिथेच राहिलो. तो असा काळ होता जेव्हा दुसरं महायुद्ध पेटलं होतं. आणि यहोवाच्या साक्षीदारांना होणारा विरोध वाढतच चालला होता. मला आठवतं, एकदा संध्याकाळी काही बांधवांनी आपल्या कार अशा प्रकारे पार्क केल्या होत्या की त्यांच्या हेडलाईट्‌स तंबूंच्या विरुद्ध दिशेला राहतील. आणि रात्रभर पहारा देण्यासाठी प्रत्येक कारमध्ये एकजण असेल असं ठरलं होतं. धोक्याची चाहूल लागताच हल्लेखोरांच्या डोळ्यांवर अंधारी आणण्यासाठी सगळ्यांनी कारच्या हेडलाईट्‌स ऑन करायच्या होत्या आणि जोरजोरात हॉर्न वाजवायचा होता. म्हणजे ते ऐकून इतर जण लगेच मदतीला धावून येतील. हे पाहून मी मनातल्या मनात म्हटलं, ‘खरंच, यहोवाचे साक्षीदार सगळ्या गोष्टींसाठी तयार असतात!’

बऱ्‍याच वर्षांनंतर, जेव्हा मला त्या अधिवेशनाची आठवण होते तेव्हा जाणवतं, की त्या वेळी आई जराही घाबरली नव्हती, ना तिला कशाची चिंता वाटत होती. यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर तिचा पूर्ण भरवसा होता. तिचं हे चांगलं उदाहरण मी कधीच विसरू शकणार नाही.

त्या अधिवेशनाच्या काही काळाआधी आईने पायनियर सेवा सुरू केली होती. त्यामुळे अधिवेशनामध्ये पूर्णवेळेच्या सेवेबद्दल जी भाषणं दिली जात होती त्यांकडे तिचं खास लक्ष होतं. त्या अधिवेशनाहून घरी येताना ती आम्हाला म्हणाली, “मला पुढेही पायनियरिंग करायची खूप इच्छा आहे. पण पायनियरिंग करणं आणि घराची चांगली काळजी घेणं या दोन्ही गोष्टी करणं जरा मुश्‍कील आहे.” त्यामुळे आम्ही तिला काही मदत करू शकतो का असं तिने आम्हाला विचारलं. आम्ही ‘हो’ म्हणालो तेव्हा तिने आम्हा प्रत्येकाला नाष्ट्याच्या आधी एक-दोन खोल्या स्वच्छ करायची जबाबदारी दिली. आम्ही शाळेला गेल्यानंतर खोल्या नीटनेटक्या आहेत की नाही हे ती पाहायची आणि मग सेवेला जायची. ती खूप व्यस्त असायची, पण आमच्याकडे तिने कधीच दुर्लक्ष केलं नाही. आम्ही दुपारी जेवायला घरी यायचो किंवा शाळेतून यायचो तेव्हा ती कायम घरी असायची. काही वेळा शाळेनंतर आम्ही तिच्यासोबत सेवेत जायचो. त्यामुळे पायनियरिंग करणं काय असतं हे आम्हाला चांगलं समजलं.

पूर्णवेळेची सेवा सुरू केली

वयाच्या १६ व्या वर्षी मी पायनियर सेवा सुरू केली. वडील अजून साक्षीदार नव्हते. पण माझं सेवाकार्य कसं चाललंय हे जाणून घ्यायची त्यांना खूप उत्सुकता असायची. एकदा संध्याकाळी मी वडिलांना म्हणालो, “खूप प्रयत्न केले, पण मला एकही बायबल अभ्यास मिळाला नाही.” मग जरा थांबून मी त्यांना म्हणालो, “मी तुमचा बायबल अभ्यास घेतला तर चालेल का?” क्षणभर विचार करून ते म्हणाले: “तसं तर नाही म्हणायचं काही कारण दिसत नाही. हरकत नाही!” अशा प्रकारे माझा पहिला बायबल विद्यार्थी माझे वडीलच होते. आणि ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती!

आम्ही“द ट्रूथ शाल मेक यू फ्री” या पुस्तकातून अभ्यास करू लागलो. अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं, की वडील खरंतर मला बायबलचा चांगला विद्यार्थी आणि शिक्षक बनायला मदत करत होते. उदाहरणार्थ, एकदा संध्याकाळी परिच्छेद वाचल्यानंतर त्यांनी मला म्हटलं: “या पुस्तकात जे म्हटलंय ते ठीकए. पण या पुस्तकात जे लिहिलंय ते बरोबर आहे, कशावरून?” याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे मी त्यांना म्हणालो: “मला आत्ता सांगता येणार नाही. पण पुढच्या अभ्यासाच्या वेळी नक्की सांगेन.” आणि मी तसंच केलं. तो मुद्दा सिद्ध करण्यासाठी मी बायबलमधून काही वचनं शोधून काढली आणि ती त्यांना दाखवली. त्यानंतर प्रत्येक अभ्यासासाठी मी चांगली तयारी करू लागलो आणि संशोधन करायला शिकलो. त्यामुळे माझी आणि वडिलांची चांगली प्रगती होत गेली. वडील शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करू लागले आणि १९५२ मध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला.

नवीन ध्येयांमुळे आणखी शिकायला मिळालं

मी १७ वर्षांचा झाल्यानंतर दुसरीकडे राहायला गेलो. जेथा a एक मिशनरी बनली. आणि डॉन बेथेलमध्ये सेवा करू लागला. त्या दोघांनाही त्यांच्या नेमणुका खूप आवडायच्या आणि ते खूप आनंदी असायचे. त्यांना पाहून मला खूप प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे मी बेथेल सेवा आणि गिलियड प्रशाला या दोन्हींसाठी अर्ज भरला, आणि सगळं काही यहोवाच्या हातांत सोपवून दिलं. सांगायचं म्हणजे १९४६ मध्ये मला बेथेलला बोलवण्यात आलं.

गेल्या ७५ वर्षांपासून मी बेथेलमध्ये सेवा करत आहे. या संपूर्ण काळात मी वेगवेगळी कामं केली आणि त्यांतून मला बरंच काही शिकायला मिळालं. पुस्तकं कशी प्रिंट करायची, अकाउंटिंगचं काम कसं करायचं हे मी शिकलो. इतकंच नाही, तर बेथेलसाठी लागणारं सामान विकत कसं घ्यायचं आणि महत्त्वाचं सामान इतर ठिकाणी कसं पोहोचवायचं हेसुद्धा मी शिकलो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सकाळची उपासना आणि बायबलवर आधारित असलेली भाषणं यांसारख्या कार्यक्रमांमधून मला खूप काही शिकायला मिळालं.

वडिलांसाठी असलेल्या एका प्रशालेत शिकवताना

माझा लहान भाऊ कार्ल याच्याकडूनही मला बरंच शिकायला मिळालं. १९४७ मध्ये तो बेथेलला आला होता. तो बायबलचा खूप चांगला विद्यार्थी आणि शिक्षक होता. एकदा मला एक भाषण द्यायला सांगितलं होतं आणि त्यासाठी मी त्याच्याकडे थोडी मदत मागितली. मी त्याला म्हणालो: “भाषणासाठी मी बरीच माहिती गोळा केली आहे. पण यातली कोणती वापरायची आणि कोणती नाही हेच कळत नाही.” त्यावर त्याने मला फक्‍त एक प्रश्‍न विचारला: “जोएल, तुझ्या भाषणाचा विषय काय आहे?” मला लगेच त्याचा मुद्दा कळाला—भाषणाच्या विषयाला धरून असलेली माहिती ठेवायची आणि बाकीची सोडून द्यायची. ही गोष्ट मी कधीच विसरलो नाही.

बेथेलमध्ये आनंदी राहायचं असेल तर सेवाकार्यात आपण जमेल तितका सहभाग घेतला पाहिजे. यामुळे प्रोत्साहन देणारे बरेच अनुभव येतात. असाच एक अनुभव मला खूप चांगला आठवतो. एकदा संध्याकाळी मी आणि एक भाऊ न्यूयॉर्क शहरातल्या ब्रॉन्क्स या ठिकाणी प्रचार करत होतो. आम्ही एका स्त्रीला भेटायला गेलो. कारण तिने आधी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकं घेतली होती. आम्ही तिला स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणालो: “आज आम्ही लोकांना भेटून त्यांना बायबलमधून चांगल्या गोष्टी शिकायला मदत करतोय.” हे ऐकून ती म्हणाली: “बायबलबद्दल असेल, तर या आत.” मग आम्ही देवाच्या राज्याबद्दल आणि येणाऱ्‍या नवीन जगाबद्दल बायबलमधून बरीच वचनं वाचली आणि त्यांवर चर्चा केली. या गोष्टी तिला नक्कीच आवडल्या असाव्यात. कारण त्याच्या पुढच्याच आठवडी तिने तिच्या ओळखीच्या लोकांनाही या गोष्टी ऐकायला बोलावून घेतलं होतं. पुढे ती आणि तिचा पती यहोवाचे विश्‍वासू सेवक बनले.

माझ्या पत्नीकडूनही मी खूप काही शिकलो

मग मी लग्न करायचं ठरवलं आणि जवळपास १० वर्षांनंतर मला एक योग्य जोडीदार, एक चांगली पत्नी मिळाली. चांगला जोडीदार शोधण्यासाठी मला एका गोष्टीमुळे मदत झाली. ती म्हणजे, मी त्याबद्दल यहोवाला मनापासून प्रार्थना केली आणि ‘लग्नानंतर माझी आणि माझ्या पत्नीची ध्येयं काय असतील? एकत्र मिळून आम्ही कोणत्या गोष्टी करणार?’ या प्रश्‍नांवर मी खूप विचार केला.

मेरीसोबत विभागीय कार्य करताना

१९५३ मध्ये यांकी स्टेडियममध्ये झालेल्या अधिवेशनानंतर मेरी ॲन्योल या बहिणीशी माझी भेट झाली. ती आणि जेथा गिलियडच्या दुसऱ्‍या वर्गात एकत्र होत्या. खरंतर त्या दोघी मिशनरी पार्टनर होत्या. मेरी नेहमी मला कॅरिबियन बेटांवरच्या तिच्या मिशनरी नेमणुकांबद्दल आणि तिने आजपर्यंत घेतलेल्या बायबल अभ्यासांबद्दल खूप उत्साहाने सांगायची. आमची ओळख वाढत गेली आणि आमच्या लक्षात आलं, की आमच्या दोघांची आध्यात्मिक ध्येयं सारखीच आहेत. एकमेकांवरचं आमचं प्रेमही वाढत गेलं आणि शेवटी एप्रिल १९५५ मध्ये आमचं लग्न झालं. ती यहोवाकडून मला मिळालेली एक भेटच होती. तिचं उदाहरण खरंच अनुकरण करण्यासारखं आहे. दिलेली कोणतीही नेमणूक ती आनंदाने पार पाडायची. ती खूप मेहनती होती, इतरांना जीव लावायची आणि देवाच्या राज्याला तिने नेहमी पहिलं स्थान दिलं. (मत्त. ६:३३) आम्ही तीन वर्षं विभागीय कार्यात सेवा केली. मग १९५८ मध्ये आम्हाला बेथेलला बोलवण्यात आलं.

मेरीकडूनही मला खूप काही शिकायला मिळालं. जसं की, आमच्या लग्नानंतर आम्ही ठरवलं होतं, की आम्ही एकत्र मिळून बायबल वाचणार. प्रत्येक वेळी आम्ही जवळपास १५ वचनं वाचायचो. एकाने बायबलमधला काही भाग वाचल्यावर त्यातून काय शिकायला मिळालं ते आम्ही एकमेकांना सांगायचो आणि ते जीवनात कसं लागू करायचं यावर चर्चा करायचो. बऱ्‍याचदा मेरी मला, गिलियडमध्ये किंवा तिच्या मिशनरी सेवेत शिकलेल्या गोष्टी सांगायची. या चर्चांमुळे बायबलबद्दलची माझी समज आणखी वाढली. आणि त्यामुळे आणखी चांगल्या प्रकारे भाषणं तयार करण्यासाठी आणि मंडळीतल्या बहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी मला मदत झाली.—नीति. २५:११.

२०१३ मध्ये माझ्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाला. नवीन जगात तिला भेटण्यासाठी मी खूप आतुर आहे. पण तोपर्यंत मी कायम शिकत राहायचा आणि मनापासून यहोवावर भरवसा ठेवायचा पक्का निश्‍चय केलाय. (नीति. ३:५, ६) नवीन जगात देवाच्या लोकांना किती वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतील या विचाराने मला खूप दिलासा मिळतो आणि आनंद होतो. तिथे आपल्या महान शिक्षकाडून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील. तसंच त्याच्याबद्दल कितीतरी गोष्टी आपल्याला नव्याने समजतील! खरंच, आजपर्यंत यहोवाने मला खूप काही शिकवलंय आणि कितीतरी मार्गांनी माझ्यावर अपार कृपा केली आहे. या सगळ्याबद्दल त्याचे आभार मानावे तितके कमीच आहेत!

a १ मार्च २००३ च्या टेहळणी बुरूज अंकात, पानं २३-२९ वर दिलेली, जेथा सुनल यांची जीवन कथा पाहा.