व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४८

गीत ९६ देवाचं अनमोल वचन

येशूने केलेला भाकरींचा चमत्कार

येशूने केलेला भाकरींचा चमत्कार

“मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही.”योहा. ६:३५.

या लेखात:

योहानच्या सहाव्या अध्यायात येशूने केलेल्या एका चमत्काराबद्दल सांगितलंय. त्याने पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन हजारो लोकांना खाऊ घातलं. या चमत्कारातून आपल्याला काय शिकायलं मिळतं ते पाहा.

१. बायबल काळात भाकरीचं काय महत्त्व होतं?

 बायबलच्या काळात बऱ्‍याच जणांसाठी भाकर हा मुख्य आहार होता. (उत्प. १४:१८; लूक ४:४) खरंतर, त्या काळात जेवणात भाकर इतकी सर्रासपणे वापरली जायची की जेवणाचा उल्लेख करायला, बायबलमध्ये कधीकधी “भाकर” हा शब्द वापरण्यात आलाय. (मत्त. ६:११; प्रे. कार्यं २०:७) येशूनेसुद्धा त्याच्या दोन मोठ्या चमत्कारांमध्ये भाकरीचा वापर केला. (मत्त. १६:९, १०) यातल्या एका चमत्काराबद्दल आपल्याला योहानच्या सहाव्या अध्यायात वाचायला मिळतं. या चमत्काराचा अभ्यास करताना आज आपण त्यातून कोणते धडे शिकू शकतो ते पाहू या.

२. खूप जणांसाठी जेवणाची व्यवस्था करायची गरज कधी पडली?

एकदा येशूचे शिष्य प्रचार करून खूप थकले होते. त्यांना आरामाची गरज होती. म्हणून येशू त्यांना नावेतून गालीलच्या समुद्रापलीकडे घेऊन गेला. (मार्क ६:७, ३०-३२; लूक ९:१०) पलीकडे आल्यावर ते बेथसैदा इथल्या एका एकांत ठिकाणी आले. पण लवकरच तिथे हजारो लोक जमले. येशू दमला होता. पण तरी त्याने त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं नाही. त्याने त्यांना देवाच्या राज्याबद्दल शिकवलं आणि त्यांचे आजार बरे केले. पण संध्याकाळ होत असल्यामुळे, शिष्यांना प्रश्‍न पडला की इतक्या लोकांना खायला कुठून मिळणार? कदाचित काही जणांकडे खाण्या-पिण्याच्या थोड्या गोष्टी असतील. पण बहुतेकांना जवळच्या गावांमध्ये जाऊन जेवण विकत घ्यावं लागणार होतं. (मत्त. १४:१५; योहा. ६:४, ५) मग अशा वेळी येशू काय करणार होता?

येशूने चमत्कार करून भाकर दिली

३. येशूने आपल्या प्रेषितांना लोकांसाठी काय करायला सांगितलं? (चित्रसुद्धा पाहा.)

तेव्हा येशूने प्रेषितांना म्हटलं: “त्यांना जायची गरज नाही. तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.” (मत्त. १४:१६) पण हे अशक्य वाटत होतं. कारण तिथे जवळजवळ ५,००० पुरुष होते. आणि स्त्रियांना आणि मुलांना मोजलं तर तिथे जवळजवळ १५,००० लोकांना जेवू घालायचं होतं. (मत्त. १४:२१) मग अंद्रिया म्हणाला: “इथे एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. पण इतक्या लोकांना हे अन्‍न कसं पुरणार?” (योहा. ६:९) त्या काळात लोक सहसा जवाची भाकरी खायचे. आणि कदाचित लहान माशांना मीठ लावून सुकवलं जायचं. पण त्या लहान मुलाकडे असलेलं एवढंसं अन्‍न एवढ्या लोकांना कसं पुरलं असतं?

येशूने लोकांच्या आध्यात्मिक आणि शारीरिक गरजाही पूर्ण केल्या (परिच्छेद ३ पाहा)


४. योहान ६:११-१३ मधल्या घटनेमधून आपण काय शिकू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)

येशूला त्या लोकांचा पाहुणचार करायचा होता. म्हणून त्याने त्यांना सांगितलं, की त्यांनी लहान-लहान गट करून गवतावर बसावं. (मार्क ६:३९, ४०; योहान ६:११-१३ वाचा.) मग येशूने त्या भाकरींसाठी आणि माशांसाठी यहोवाचे आभार मानले. आणि हे योग्यच होतं. कारण ते अन्‍न यहोवानेच दिलं होतं. आपणसुद्धा जेवणाआधी प्रार्थना करून येशूसारखं वागू शकतो; मग आपण एकट्यात असो किंवा इतरांच्या देखत. मग प्रार्थना केल्यानंतर येशूने ते अन्‍न लोकांमध्ये वाटायला सांगितलं. आणि लोक ते खाऊन तृप्त झाले. पण बरंच अन्‍न उरलं होतं आणि ते वाया जाऊ नये असं येशूला वाटत होतं. म्हणून त्याने नंतरच्या वापरासाठी ते अन्‍न गोळा करायला सांगितलं. आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा चांगला वापर करायच्या बाबतीत, येशूने खूप चांगलं उदाहरण मांडलं. जर तुम्ही पालक असाल, तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत या अहवालाचा अभ्यास करू शकता. तसंच प्रार्थना, उदारता आणि पाहुणचार या गोष्टींच्या बाबतीत काय शिकायला मिळतं यावर त्यांच्यासोबत चर्चा करू शकता.

स्वतःला विचारा: ‘मी येशूसारखं जेवणाआधी प्रार्थना करतो का?’ (परिच्छेद ४ पाहा)


५. (क) येशूने केलेला चमत्कार पाहून लोकांनी काय केलं? (ख) पण येशूने काय केलं?

येशूची शिकवण्याची पद्धत आणि त्याचे चमत्कार पाहून लोक खूप भारावून गेले. त्या लोकांना कदाचित मोशेने दिलेलं वचन आठवलं असेल. मोशेने म्हटलं होतं, की देव त्यांच्यासाठी एक खास संदेष्टा पाठवेल. म्हणून त्यांनी विचार केला असेल, की ‘येशूच तो संदेष्टा आहे.’ (अनु. १८:१५-१८) त्यांना वाटलं असेल की येशू एक महान शासक होऊ शकतो आणि संपूर्ण राष्ट्राला अन्‍न पुरवू शकतो. म्हणून तो जमाव त्याला ‘राजा बनवायला बळजबरीने धरायला’ आला. (योहा. ६:१४, १५) जर येशू यासाठी तयार झाला असता, तर तोसुद्धा यहुद्यांच्या राजकारणामध्ये सामील झाला असता. मग त्याने असं केलं का? नाही. अहवालात आपण पुढे वाचतो, की तो एकटाच “डोंगरावर निघून गेला.” लोकांचा इतका दबाव असूनसुद्धा, त्याने राजकारणात भाग घेतला नाही. खरंच, आपल्यासाठी हा किती चांगला धडा आहे!

६. आपण येशूसारखं कसं वागू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

हे खरं आहे, की आज लोक आपल्याला चमत्काराने अन्‍न पुरवायला किंवा त्यांचे रोग बरे करायला सांगणार नाहीत. तसंच, ते आपल्याला त्यांचा शासक व्हायलाही सांगणार नाहीत. पण ते कदाचित आपल्यावर राजकारणात भाग घ्यायचा दबाव टाकतील. यासाठी ते आपल्याला मतदान करायला किंवा अशा माणसाला पाठिंबा द्यायला सांगतील, जो त्यांच्या मते चांगला शासक होऊ शकतो. पण, येशूला जे सांगायचं होतं ते अगदी स्पष्ट होतं. त्याने राजकारणात भाग घ्यायला स्पष्ट नकार दिला. इतकंच नाही, तर त्याने म्हटलं: “माझं राज्य या जगाचं नाही.” (योहा. १७:१४; १८:३६) आज ख्रिस्ती भाऊबहीणसुद्धा येशूसारखा विचार करतात आणि त्याच्यासारखं वागतात. ते देवाच्या राज्याला पाठिंबा देतात, त्याबद्दल साक्ष देतात आणि त्यासाठी प्रार्थनाही करतात. (मत्त. ६:१०) चला, आता आपण येशूने केलेल्या या चमत्काराबद्दल आणि त्यातून आणखी काय शिकता येईल त्याबद्दल पाहू या.

येशूने राजकारणात भाग घेतला नाही आणि आपणही तसंच केलं पाहिजे (परिच्छेद ६ पाहा)


“भाकरींच्या चमत्काराचा अर्थ”

७. येशूने कोणता चमत्कार केला आणि प्रेषितांनी काय केलं? (योहान ६:१६-२०)

लोकांना जेवण दिल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना नावेतून कफर्णहूमला जायला सांगितलं. आणि लोक त्याला राजा बनवायला निघाले होते म्हणून तो एकटाच डोंगरावर निघून गेला. (योहान ६:१६-२० वाचा.) प्रेषित नावेतून प्रवास करत असताना अचानक समुद्रात एक मोठं वादळ आलं. त्यामुळे वारा जोरात वाहू लागला आणि मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. मग येशू पाण्यावर चालत त्यांच्याकडे आला आणि त्याने प्रेषित पेत्रलाही तसंच करायला सांगितलं. (मत्त. १४:२२-३१) मग, येशू नावेत बसल्यावर वादळ शांत झालं. हे पाहून त्याचे शिष्य म्हणाले: “तू खरोखरच देवाचा मुलगा आहेस!” a (मत्त. १४:३३) विशेष गोष्ट म्हणजे, येशूने चमत्काराने भाकरी पुरवल्यानंतर नाही, तर तो पाण्यावर चालल्यानंतर शिष्यांनी असं म्हटलं. याबद्दल मार्क आपल्या अहवालात म्हणतो: “हे पाहून त्यांना फार आश्‍चर्य वाटलं. कारण भाकरींच्या चमत्काराचा अर्थ त्यांना कळला नव्हता आणि त्यांचं मन अजूनही अंधारात होतं.” (मार्क ६:५०-५२) यहोवाने येशूला चमत्कार करण्याची किती अफाट शक्‍ती दिली होती हे त्यांना अजून समजलं नव्हतं. पण लवकरच येशू भाकरींच्या चमत्काराबद्दल परत बोलला आणि त्याने आपल्याला आणखी एक धडा दिला.

८-९. लोकांचा जमाव येशूला का शोधत होता? (योहान ६:२६, २७)

या चमत्काराच्या दुसऱ्‍या दिवशी लोक पुन्हा तिथे आले. पण येशू आणि त्याचे प्रेषित तिथे नव्हते. म्हणून तिबिर्याहून येणाऱ्‍या नावेत बसून ते कफर्णहूमला येशूच्या शोधात गेले. (योहा. ६:२२-२४) पण येशूकडून राज्याबद्दलच्या गोष्टी शिकण्यासाठी ते तिथे गेले होते का? नाही. येशूने आपल्याला खाण्या-पिण्याच्या गोष्टी पुरवाव्यात असं त्यांना वाटत होतं. असं आपण का म्हणू शकतो?

लोकांच्या जमावाने जेव्हा येशूला कफर्णहूममध्ये गाठलं तेव्हा काय झालं याचा विचार करा. येशूने स्पष्टपणे सांगितलं, की आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करणंच त्या लोकांसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. भाकर खाऊन जरी त्यांचं पोट भरलं असलं तरी येशूने त्यांना सांगितलं, की ते ‘नाश होणारं अन्‍न’ आहे. याउलट त्याने त्यांना सांगितलं, की त्यांनी ‘अशा अन्‍नासाठी खटपट करावी, जे सर्वकाळाच्या जीवनात टिकून राहतं.’ (योहान ६:२६, २७ वाचा.) येशूने म्हटलं की असं अन्‍न त्याचा पिता पुरवू शकतो. अन्‍नामुळे सर्वकाळाचं जीवन मिळतं ही कल्पनाच त्यांच्यासाठी खूप नवीन होती. पण असं कोणतं अन्‍न आहे ज्यामुळे आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळू शकतं? आणि त्या लोकांना हे अन्‍न कसं मिळणार होतं?

१०. ‘सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी’ लोकांनी काय करणं गरजेचं होतं?

१० यहुद्यांना वाटलं असेल, की ते अन्‍न मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. त्यांनी विचार केला असेल, की नियमशास्त्रातल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ते अन्‍न मिळेल. पण येशूने त्यांना सांगितलं, की “देवाने ज्याला पाठवलं त्याच्यावर विश्‍वास ठेवा, म्हणजे तुम्हाला देवाची पसंती मिळेल.” (योहा. ६:२८, २९) ‘सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी’ यहोवाने ज्याला पाठवलं त्याच्यावर, म्हणजे येशूवर त्यांनी विश्‍वास ठेवणं गरजेचं होतं. या विषयाबद्दल येशूने लोकांना आधीही सांगितलं होतं. (योहा. ३:१६-१८, ३६) तसंच, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, याबद्दल नंतरही त्याने आणखी माहिती दिली.—योहा. १७:३.

११. यहुद्यांनी कसं दाखवून दिलं की त्यांना फक्‍त त्यांचं पोट भरायची चिंता होती? (स्तोत्र ७८:२४, २५)

११ येशूवर विश्‍वास ठेवणं गरजेचं आहे, ही गोष्ट यहुद्यांनी स्वीकारली नाही. त्यांनी त्याला विचारलं: “आम्ही पाहून विश्‍वास ठेवावा म्हणून तू कोणता चमत्कार करणार आहेस?” (योहा. ६:३०) त्यांनी म्हटलं, की मोशेच्या काळात त्यांच्या पूर्वजांना मान्‍ना मिळाला होता. तो त्यांच्यासाठी भाकरीसारखाच होता. (नहे. ९:१५; स्तोत्र ७८:२४, २५ वाचा.) हे तर स्पष्टच होतं की त्यांचं संपूर्ण लक्ष खरोखरच्या भाकरीवर म्हणजे फक्‍त त्यांचं पोट भरण्यावर होतं. येशूने जेव्हा त्यांना ‘स्वर्गातल्या खऱ्‍या भाकरीबद्दल’ सांगितलं, तेव्हा त्यांनी त्याला त्याबद्दल आणखी काहीच विचारलं नाही. त्यांच्या पूर्वजांना मान्‍नामुळे सर्वकाळाचं जीवन मिळालं नव्हतं. पण स्वर्गातल्या खऱ्‍या भाकरीमुळे त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळणार होतं. (योहा. ६:३२) आपली भूक भागवण्याकडे त्यांचं इतकं लक्ष होतं, की सर्वकाळाचं जीवन मिळवण्याबद्दल येशू त्यांना जे सांगत होता त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. मग या घटनेतून आपण कोणता धडा शिकू शकतो?

आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असली पाहिजे?

१२. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे हे येशूने कसं दाखवून दिलं?

१२ योहानच्या सहाव्या अध्यायातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे आपण आपल्या आध्यात्मिक गरजांकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा सैतानाने येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा येशूने हेच दाखवून दिलं. (मत्त. ४:३, ४) डोंगरावरच्या उपदेशातसुद्धा येशूने हे सांगितलं, की आपल्याला आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव असली पाहिजे. (मत्त. ५:३) त्यामुळे आपण स्वतःला असा प्रश्‍न विचारला पाहिजे, की ‘मी ज्या प्रकारचं जीवन जगतो त्यावरून असं दिसून येतं का, की मी माझ्या शारीरिक गरजांपेक्षा आध्यात्मिक गरजांकडे जास्त लक्ष देतोय?’

१३. (क) खाण्या-पिण्याच्या गोष्टींचा आनंद घेणं चुकीचं का नाही? (ख) पौलने आपल्याला कोणता इशारा दिला? (१ करिंथकर १०:६, ७, ११)

१३ आपल्या रोजच्या गरजांसाठी प्रार्थना करणं आणि त्या गोष्टींचा आनंद घेणं चुकीचं नाही. (लूक ११:३) बायबलमध्ये म्हटलंय, की “माणसाने खावं-प्यावं आणि आपल्या मेहनतीच्या फळाचा आनंद घ्यावा.” कारण “हे खऱ्‍या देवाकडून आहे.” (उप. २:२४; ८:१५; याको. १:१७) पण असं असलं तरी, आपण आपल्या रोजच्या गरजांना जास्त महत्त्व देऊ नये. यहुदी व्यवस्थेच्या शेवटच्या दिवसांत जगणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना पौलने याबद्दलच लिहिलं. जुन्या काळात इस्राएली लोकांनी काय केलं याची त्याने त्यांना आठवण करून दिली. तसंच सीनाय पर्वताजवळ घडलेल्या घटनांचाही त्याने उल्लेख केला. त्याने ख्रिश्‍चनांना असा इशारा दिला, की “[इस्राएली लोकांनी] जसा वाईट गोष्टींचा लोभ धरला, तसा [त्यांनी] धरू नये.” (१ करिंथकर १०:६, ७, ११ वाचा.) यहोवाने चमत्कार करून इस्राएली लोकांना अन्‍न दिलं होतं. पण लोभीपणाने वागल्यामुळे ते अन्‍नच त्यांच्यासाठी “वाईट” गोष्टीसारखं बनलं. (गण. ११:४-६, ३१-३४) तसंच, जेव्हा त्यांनी सोन्याच्या वासराची उपासना केली, तेव्हा त्यांनी हे दाखवून दिलं की त्यांच्यासाठी यहोवाच्या आज्ञा पाळण्यापेक्षा खाणं-पिणं आणि मौजमजा करणं जास्त महत्त्वाचं आहे. (निर्ग. ३२:४-६) इ.स. ७० मध्ये यहुदी व्यवस्थेच्या अंताच्या वेळी पौलने ख्रिश्‍चनांना हा इशारा दिला. आज आपणसुद्धा या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटच्या दिवसांत जगतोय. त्यामुळे आपणसुद्धा पौलचा हा सल्ला गंभीरपणे घेतला पाहिजे.

१४. नवीन जगातल्या खाण्या-पिण्याबद्दल बायबलमध्ये काय म्हटलंय?

१४ येशूने आपल्याला ‘रोजच्या भाकरीसाठी’ प्रार्थना करायला सांगितलं. त्याच वेळी त्याने आपल्याला अशीही प्रार्थना करायला सांगितलं की यहोवाची “इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.” (मत्त. ६:९-११) या शब्दांमुळे कोणतं चित्र तुमच्या डोळ्यांपुढे उभं राहतं? बायबलमध्ये सांगितलंय की जेव्हा यहोवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण होईल, तेव्हा सगळ्यांना चांगलं अन्‍नही मिळेल. तसंच, यशया २५:६-८ मध्ये असं सांगितलंय, की देवाच्या राज्यात पृथ्वीवर भरपूर प्रमाणात चांगलं अन्‍न असेल. शिवाय, स्तोत्र ७२:१६ मध्ये अशी भविष्यवाणी दिलेली आहे की “पृथ्वी भरपूर उपज देईल; पर्वतांच्या शिखरांवरही पुष्कळ धान्य उगवेल.” नवीन जगात तुमचा आवडीचा पदार्थ बनवायची तुम्ही वाट पाहताय का? किंवा असा पदार्थ बनवायची वाट पाहताय का, जो तुम्ही कधीच खाल्ला नाही? इतकंच नाही तर नवीन जगात आपण फळबागा लावून त्यांची फळंसुद्धा खाऊ. (यश. ६५:२१, २२) आणि त्या वेळी पृथ्वीवर असणाऱ्‍या सगळ्यांनाच या सुंदर गोष्टी मिळतील.

१५. नवीन जगात पुनरुत्थान झालेल्यांना काय शिकायला मिळेल? (योहान ६:३५)

१५ योहान ६:३५ वाचा. येशूने भाकरींचा चमत्कार करून ज्या लोकांना खाऊ घातलं त्यांचा पुन्हा विचार करा. त्यांनी आधी जरी येशूवर विश्‍वास ठेवला नसला, तरी त्यांच्यापैकी काहींचं कदाचित पुनरुत्थान होईल आणि आपण त्यांना भेटू. (योहा. ५:२८, २९) पण अशा लोकांना येशूच्या शब्दांचा अर्थ समजून घ्यावा लागेल. त्याने म्हटलं होतं: “मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही.” त्यांना येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवावा लागेल. येशूने त्यांच्यासाठी त्याच्या जिवाचं बलिदान दिलं या गोष्टीवर त्यांना विश्‍वास ठेवावा लागेल. तसंच, पुनरुत्थान झालेल्यांना आणि त्या वेळी जन्मलेल्या मुलांना शिकवण्यासाठी एक मोहीम राबवली जाईल. त्यांना यहोवाबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दल शिकवलं जाईल. त्या लोकांना यहोवासोबत नातं जोडायला मदत केल्यामुळे आपल्याला खूप आनंद होईल. नवीन जगात कोणत्याही प्रकारचं चविष्ट अन्‍न खाऊन आपल्याला जो आनंद मिळेल त्यापेक्षा हा आनंद खूप मोठा असेल. हो, त्या वेळी आध्यात्मिक गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतील!

१६. पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१६ योहानच्या सहाव्या अध्यायातल्या फक्‍त एका भागावर आपण या लेखात चर्चा केली. पण येशूला ‘सर्वकाळाच्या जीवनाबद्दल’ बरंच काही शिकवायचं होतं. येशू ज्या यहुद्यांशी बोलत होता, त्यांना या सगळ्या गोष्टी लक्ष देऊन ऐकायची गरज होती. आपणही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणूनच योहानच्या सहाव्या अध्यायावर आपण पुढच्या लेखात आणखी पाहणार आहोत.

गीत २० तू दिलेस अनमोल अर्पण