वाचकांचे प्रश्न
१ तीमथ्य ५:२१ मध्ये सांगितलेले ‘निवडलेले स्वर्गदूत’ कोण आहेत?
प्रेषित पौलने वडील म्हणून सेवा करणाऱ्या तीमथ्यला असं म्हटलं: “मी देवासमोर, ख्रिस्त येशूसमोर आणि निवडलेल्या स्वर्गदूतांसमोर तुला ही आज्ञा देतो, की तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता आणि कोणताही पक्षपात न करता या सूचनांचं पालन कर.”—१ तीम. ५:२१.
हे निवडलेले स्वर्गदूत कोण आहेत हे समजून घेण्यासाठी, स्वर्गदूतांच्या या गटामध्ये कोण येत नाही हे आधी आपण पाहू या. हे तर स्पष्टच आहे, की ते १,४४,००० जणांपैकी नाहीत. कारण पौलने तीमथ्यला जेव्हा हा सल्ला दिला, तेव्हा स्वर्गात अभिषिक्त ख्रिश्चनांचं पुनरुत्थान सुरू झालं नव्हतं. म्हणजे प्रेषित आणि इतर अभिषिक्त जनांना स्वर्गात अदृष्य शरीर मिळालं नव्हतं. म्हणून या लोकांना ‘निवडलेले स्वर्गदूत’ म्हणता येणार नाही.—१ करिंथ. १५:५०-५४; १ थेस्सलनी. ४:१३-१७; १ योहा. ३:२.
त्यासोबतच, जलप्रलयाच्या वेळी आज्ञा मोडणाऱ्या स्वर्गदूतांनासुद्धा ‘निवडलेले स्वर्गदूत’ म्हणता येणार नाही. कारण त्यांनी सैतानाला साथ दिली आणि ते दुष्ट स्वर्गदूत बनले. तसंच ते येशूचे शत्रू बनले. (उत्प. ६:२; लूक ८:३०, ३१; २ पेत्र २:४) भविष्यात त्यांना १,००० वर्षांसाठी अथांग डोहात टाकलं जाईल आणि त्यानंतर दियाबलासोबत त्यांचाही नाश केला जाईल.—यहू. ६; प्रकटी. २०:१-३, १०.
यावरून आपण म्हणू शकतो की ‘निवडलेले स्वर्गदूत,’ ‘देवाला आणि ख्रिस्त येशूला’ एकनिष्ठ असलेले स्वर्गदूत असतील.
स्वर्गात लाखो-करोडो विश्वासू स्वर्गदूत आहेत. (इब्री १२:२२, २३) त्यामुळे आपण असा विचार करू नये, की प्रत्येकाला एकाच वेळी एकाच प्रकारचं काम असतं (प्रकटी. १४:१७, १८) तुम्हाला आठवत असेल की एका स्वर्गदूताला १,८५,००० अश्शूरी सैनिकांना ठार मारण्याचं काम दिलं होतं. (२ राजे १९:३५) काही स्वर्गदूतांना कदाचित “[येशूच्या] राज्यातून अडखळायला लावणाऱ्या सर्व गोष्टी आणि अनीतीने वागणाऱ्या लोकांना गोळा” करायला सांगण्यात आलं असेल. (मत्त. १३:३९-४१) काही जण कदाचित “निवडलेल्या लोकांना” स्वर्गात “गोळा करतील.” (मत्त. २४:३१) तर इतर काही स्वर्गदूतांना आपलं ‘संरक्षण करायची’ आज्ञा देण्यात आली आहे.—स्तो. ९१:११; मत्त. १८:१०; मत्तय ४:११ सोबत तुलना करा; लूक २२:४३.
१ तीमथ्य ५:२१ मध्ये सांगण्यात आलेल्या ‘निवडलेल्या स्वर्गदूतांना’ कदाचित मंडळीच्या संबंधित गोष्टींचं काम दिलं होतं. संदर्भावरून कळतं, की पौल वडिलांना त्यांची जबाबदारी कशी हाताळायची हे सांगत होता. तसंच, तो मंडळीतल्या भाऊबहिणींनी वडिलांचा आदर करावा हेही सांगत होता. पौलने वडिलांना असंही सांगितलं की त्यांनी ‘पक्षपात करू नये’ किंवा ‘पूर्वग्रह बाळगू नये.’ त्यासोबतच, त्यांनी विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नये. वडिलांनी हा सल्ला का पाळला पाहिजे याचं एक महत्त्वाचं कारण पौलने दिलं. त्याने म्हटलं: वडील “देवासमोर, ख्रिस्त येशूसमोर आणि निवडलेल्या स्वर्गदूतांसमोर” भाऊबहिणींची सेवा करत आहेत. म्हणजेच यहोवा, येशू आणि निवडलेल्या स्वर्गदूतांचं वडिलांच्या कामावर लक्ष आहे. तर यावरून स्पष्ट होतं, की काही स्वर्गदूतांना मंडळीच्या संबंधित कामं दिली जातात. जसं की, भाऊबहिणींचं संरक्षण करणं, प्रचार कामाची देखरेख करणं आणि पाहिलेल्या गोष्टी यहोवाला सांगणं.—मत्त. १८:१०; प्रकटी. १४:६.