व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दयाळूपणा​—शब्दांनी आणि कार्यांनी व्यक्‍त होणारी भावना

दयाळूपणा​—शब्दांनी आणि कार्यांनी व्यक्‍त होणारी भावना

दयाळूपणा या गुणामुळे आपल्याला आश्‍वासन आणि सांत्वन मिळतं. जेव्हा एखादी व्यक्‍ती आपली काळजी घेते तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. आपल्याशी सर्वांनी दयाळूपणे वागलेलं आपल्याला आवडतं. मग आपण हा गुण कसा विकसित करू शकतो?

दया दाखवणं म्हणजे इतरांच्या भल्याचा मनापासून विचार करणं. इतरांना मदत करण्यासाठी ही दया आपण आपल्या कार्यांद्वारे आणि शब्दांद्वारे दाखवू शकतो. दया कार्यांद्वारे प्रदर्शित होत असल्यामुळे ती फक्‍त वरवरची नसावी. प्रेमामुळे आणि सहानुभूतीमुळे आपल्याला खरी दया दाखवण्याची प्रेरणा मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दयाळूपणा हा गुण देवाच्या पवित्र आत्म्याच्या फळाचा एक पैलू आहे. हा पैलू सर्व ख्रिश्‍चनांनी विकसित करणं गरजेचं आहे. (गलती. ५:२२, २३) आपण सर्वांनी दयेचा गुण विकसित केला पाहिजे. यासाठी आपल्याला यहोवा आणि त्याच्या पुत्राने दाखवलेल्या दयेच्या गुणाचं परीक्षण केलं पाहिजे. आता आपण पाहू या की त्यांनी दया कशा प्रकारे दाखवली आणि आपण त्यांचं अनुकरण कसं करू शकतो.

यहोवा सर्वांशी दयाळूपणे वागतो

यहोवा सर्वांप्रती म्हणजे “उपकार न मानणाऱ्‍यांवर व दुष्ट लोकांवरही” दया करतो. (लूक ६:३५) उदाहरणार्थ, “तो चांगल्या लोकांसोबतच दुष्टांवरही सूर्य उगवतो आणि नीतिमान लोकांसोबतच अनीतिमान लोकांवरही पाऊस पाडतो.” (मत्त. ५:४५) जे यहोवाला त्याचा निर्माणकर्ता म्हणून स्वीकारत नाही अशांनाही त्याने दिलेल्या जीवनावश्‍यक गोष्टींचा फायदा होतो आणि त्यामुळे त्यांना खूप आनंदही होतो.

यहोवाने आदाम-हव्वासाठी जे केलं त्यावरून त्याचा दयेचा उल्लेखनीय गुण दिसून येतो. पाप केल्यानंतर आदाम-हव्वाने “अंजीराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली.” पण यहोवाला माहीत होतं की एदेन बागेच्या बाहेर राहण्यासाठी त्यांना योग्य वस्त्रं लागतील कारण एदेन बागेच्या बाहेरची जमीन शापित असल्यामुळे तिथे “काटे व कुसळे” आहेत. म्हणून यहोवाने दया दाखवून त्यांच्यासाठी लांब “चर्मवस्त्रे” बनवली.​—उत्प. ३:७, १७, १८, २१.

यहोवा चांगल्या आणि दुष्ट लोकांना दया दाखवतो. पण खासकरून त्याच्या विश्‍वासू सेवकांना दया दाखवण्याची त्याची इच्छा आहे. उदाहरणार्थ, जखऱ्‍या संदेष्ट्याच्या दिवसांत यरुशलेमच्या मंदिराचं बांधकाम बंद पडल्याचं पाहून एका देवदूताला खूप चिंता वाटली. यहोवाने त्या देवदूताचं म्हणणं ऐकलं आणि तो त्याला “चांगले व सांत्वनदायक शब्द बोलला.” (जख. १:१२, १३) यहोवाने एलीया संदेष्ट्यावरही अशीच दया दाखवली. एकदा एलीया इतका निराश झाला की त्याला आपला जीव नकोसा वाटला. त्या वेळी यहोवाने त्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं आणि एका स्वर्गदूताला त्याला धीर द्यायला पाठवलं. तो एकटा नाही असं यहोवाने स्वतःही त्याला सांगितलं. दयाळूपणे बोललेले हे शब्द ऐकल्यामुळे आणि यहोवाची मदत स्वीकारल्यामुळे एलीयाला नंतर त्याची नेमणूक पार पाडायला मदत मिळाली. (१ राजे १९:१-१८) यहोवाच्या सेवकांपैकी त्याच्या दयाळूपणाच्या उल्लेखनीय गुणाचं सर्वात चांगल्या प्रकारे कोणी अनुकरण केलं?

येशू​—दयाळूपणाचं एक उत्तम उदाहरण

येशूच्या पृथ्वीवरच्या सेवाकार्यादरम्यान त्याला त्याच्या दयेसाठी ओळखलं जायचं. तो कधीच निष्ठुरपणे वागला नाही किंवा त्याने आपली इच्छा दुसऱ्‍यांवर थोपवली नाही. त्याला इतरांची काळजी होती. तो म्हणाला: “अहो कष्ट करणाऱ्‍या व ओझ्याने दबलेल्या सर्व लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. . . . कारण माझं जू वाहायला सोपं” आहे. (मत्त. ११:२८-३०) येशू दाखवत असलेल्या दयेमुळे लोक त्याच्या मागेमागे जायचे. येशूने त्यांना जेवू घातलं, आजाऱ्‍यांना व अपंगांना बरं केलं कारण त्याला “त्यांचा कळवळा आला.” तसंच, त्याने त्यांना आपल्या पित्याबद्दल “बऱ्‍याच गोष्टी” शिकवल्या.​—मार्क ६:३४; मत्त. १४:१४; १५:३२-३८.

दयाळू असल्यामुळे येशूने इतरांच्या भावना समजून घेतल्या आणि तो त्यांच्याशी दयेने वागला. विश्रांतीच्या वेळीही त्याच्याजवळ येणाऱ्‍यांशी तो दयेने वागला. (लूक ९:१०, ११) उदाहरणार्थ, एकदा रक्‍तस्त्रावाच्या आजाराने पीडित असलेली एक स्त्री बरी होण्याच्या आशेने येशूजवळ आली. तिने भीतभीत त्याच्या कपड्यांना शिवलं. ती नियमशास्त्रानुसार अशुद्ध होती पण येशूने तिला फटकारलं नाही. (लेवी. १५:२५-२८) १२ वर्षांपासून पीडित असलेल्या या स्त्रीशी येशू दयाळूपणे वागला. तो तिला म्हणाला: “मुली, तुझ्या विश्‍वासाने तुला बरं केलं आहे. जा, निश्‍चिंत हो, तुझा त्रासदायक आजार बरा झाला आहे.” (मार्क ५:२५-३४) दयाळूपणाचं किती उत्तम उदाहरण!

एक दयाळू व्यक्‍ती इतरांना मदत करते

वर दिलेल्या उदाहरणांवरून कळतं की खरी दया कार्यांवरून दिसून येते. ही गोष्ट किती गरजेची आहे ते येशूने चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्यातून सांगितली. यहुदी आणि शोमरोनी लोकांमधले संबंध चांगले नव्हते. पण जेव्हा दाखल्यातल्या यहुद्याला चोरांनी लुटलं, मारलं आणि रस्त्यावर अर्धमेल्या स्थितीत सोडलं, तेव्हा शोमरोन्याने त्याच्यावर दया केली व त्याला मदत केली. त्याने त्या यहुदी माणसाच्या जखमांवर पट्टी बांधली आणि तो त्याला एका धर्मशाळेत घेऊन गेला. मग शोमरोन्याने धर्मशाळेच्या मालकाला पैसे देऊन त्याची काळजी घ्यायला सांगितलं. तसंच त्याने जास्त खर्चासाठी आणखी पैसेही दिले.​—लूक १०:२९-३७.

दया बऱ्‍याचदा कार्यांतून दिसून येते. तसंच ती विचारपूर्वक आणि उत्तेजनात्मक शब्द बोलल्यामुळेही दिसून येते. म्हणूनच जरी “मनुष्याचे मन चिंतेने दबून” जात असलं, तरी बायबल म्हणतं “गोड शब्द त्याला आनंदित” करतात. (नीति. १२:२५) आपल्यामध्ये दयाळूपणा आणि चांगुलपणा असल्यामुळे आपण त्यांना उत्तेजन देणारे शब्द बोलू. यामुळे त्यांना खूप आनंद होईल. * आपल्या शब्दांवरून त्यांना दिसून येईल की आपल्याला त्यांची काळजी आहे. अशा प्रकारचं उत्तेजन मिळाल्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनातल्या समस्यांचा सामना करायला मदत मिळेल.​—नीति. १६:२४.

दयाळूपणा कसा विकसित कराल?

आपल्याला देवाच्या प्रतिरूपात बनवलं असल्यामुळे आपण सर्व जण दयेचा गुण विकसित करू शकतो. (उत्प. १:२७) उदाहरणार्थ, रोमला जाताना पौल, यूल्य नावाच्या एका रोमी अधिकाऱ्‍याच्या देखरेखीत होता. तो पौलशी “दयाळूपणे वागला आणि [त्याच्या] मित्रांना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने त्याला त्यांच्याकडे जाण्याची परवानगी दिली.” यामुळे तो सीदोनला जाऊ शकला. (प्रे. कार्ये २७:३) याच्या काही काळानंतर पौल आणि इतर लोक ज्या जहाजात होते ते फुटलं. अशा वेळी मिलिता बेटावरच्या रहिवाशांनी त्यांना “अतिशय दयाळूपणे” वागवलं. बेटावरच्या लोकांनी त्यांच्यासाठी शेकोटीही पेटवली. (प्रे. कार्ये २८:१, २) त्यांचं वागणं कौतुकास्पद होतं. पण आपण फक्‍त विशिष्ट वेळीच दयाळूपणा दाखवू नये.

देवाला आनंदी करण्यासाठी आपण दयाळूपणा या गुणाला आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा भाग बनवला पाहिजे. तसंच आपण नेहमी त्यानुसार जगलं पाहिजे. म्हणूनच यहोवा आपल्याला दयाळूपणा “परिधान” करायला सांगतो. (कलस्सै. ३:१२) पण आपल्याला नेहमीच दयाळूपणा विकसित करणं सोपं नाही. असं का? लाजाळूपणामुळे, आत्मविश्‍वास नसल्यामुळे, विरोधामुळे किंवा काही प्रमाणात स्वार्थ असल्यामुळे आपल्याला दयाळूपणा दाखवणं कठीण जाऊ शकतं. पवित्र आत्म्यावर विसंबून राहून आणि यहोवाच्या दयेचं अनुकरण करून आपण या सर्व समस्यांवर मात करू शकतो.​—१ करिंथ. २:१२.

आपण कुठल्या क्षेत्रात दयाळूपणा दाखवला पाहिजे हे आपण कसं ओळखू शकतो? स्वतःला विचारा: ‘मी इतरांचं लक्षपूर्वक ऐकतो का आणि त्यांच्या भावना समजून घेतो का? इतरांच्या गरजांकडे माझं लक्ष आहे का? माझ्या कुटुंबातल्या सदस्यांव्यतिरिक्‍त किंवा जवळच्या मित्रांव्यतिरिक्‍त इतर कोणाला मदत केल्याचं मला आठवतं का?’ त्यानंतर आपण काही ध्येयं ठेवू शकतो. जसं की आपल्या आवतीभोवती असलेल्या लोकांना, खासकरून ख्रिस्ती मंडळीतल्या बंधुभगिनींना आपण जाणून घेऊ शकतो. यामुळे आपल्याला त्यांची परिस्थिती आणि त्यांच्या गरजा कळतील. त्यानंतर, इतरांनी आपल्याला दया दाखवावी अशी आपली इच्छा आहे तशीच दया आपणही त्यांना दाखवू शकतो. (मत्त. ७:१२) दयाळूपणा विकसित करण्यासाठी आपण यहोवाकडे मदत मागू शकतो. तो आपल्या प्रयत्नांवर नक्की आशीर्वाद देईल.​—लूक ११:१३.

दयाळूपणाचा इतरांवर कसा परिणाम होतो?

पौलने जेव्हा देवाचा सेवक म्हणून स्वतःची ओळख करण्यासाठी जी सूची बनवली त्यात दयाळूपणाही सामील होता. (२ करिंथ. ६:३-६) लोक पौलकडे आकर्षित व्हायचे कारण त्याला त्यांच्यात आस्था होती. त्याने आपल्या प्रेमळ शब्दांद्वारे आणि कार्यांद्वारे दयाळूपणा दाखवला. (प्रे. कार्ये २८:३०, ३१) तसंच आपण दयाळूपणा दाखवत असल्यामुळे लोक सत्याकडे आकर्षित होऊ शकतात. जेव्हा आपण सर्वांना तसंच आपल्या विरोधकांना दया दाखवतो, तेव्हा त्यांचा स्वभाव बदलू शकतो आणि त्यांचा राग कमी होऊ शकतो. (रोम. १२:२०) कालांतराने ते कदाचित बायबलच्या संदेशात आवडही दाखवतील.

नंदनवनात सर्व जण एकमेकांशी दयेने वागतील. पुनरुत्थान झालेल्या अनेक लोकांप्रती दया दाखवली जाईल. काही जण तर ती पहिल्यांदाच अनुभवतील. यामुळे त्यांनाही दया दाखवण्यासाठी प्रेरणा मिळेल. दया दाखवण्याची आणि इतरांना मदत करण्याची इच्छा नसणाऱ्‍यांना देवाच्या राज्यात सर्वकाळाचं जीवन मिळणार नाही. पण जे इतरांशी प्रेमाने आणि दयेने वागतील त्यांना सर्वकाळाचं जीवन जगण्यासाठी आशीर्वादित करण्यात येईल. (स्तो. ३७:९-११) त्या वेळी जगात खऱ्‍या अर्थाने शांती आणि सुरक्षा असेल. पण तो काळ येईपर्यंत आपण आज कशा प्रकारे दयाळूपणाचे फायदे अनुभवू शकतो?

दयाळूपणा दाखवण्याचे फायदे

बायबल म्हणतं: “दयाळू मनुष्य आपल्या जिवाचे हित करतो.” (नीति. ११:१७) लोक दयाळू व्यक्‍तीकडे आकर्षित होतात आणि ते तिलाही दया दाखवतात. येशूने म्हटलं: “ज्या मापाने तुम्ही इतरांना मापून देत आहात, त्याच मापाने तेही तुम्हाला मापून देतील.” (लूक ६:३८) म्हणूनच एक दयाळू व्यक्‍ती अगदी सहजरीत्या इतरांशी मैत्री करू शकते आणि ती टिकवून ठेवू शकते.

इफिस मंडळीतल्या लोकांना प्रेषित पौलने अशी विनंती केली की “तुम्ही एकमेकांना क्षमा करावी आणि एकमेकांशी दयाळुपणे व कनवाळूपणे वागावे.” (इफिस. ४:३२, सुबोध भाषांतर) जेव्हा मंडळीतले बंधूभगिनी एकमेकांशी दयेने वागतात व एकमेकांना मदत करतात, तेव्हा मंडळी मजबूत राहते. तसंच, तिच्यात ऐक्य असतं. ते कधीच इतरांना घालून-पाडून, खोचकपणे बोलत नाहीत आणि त्यांची टीका करत नाहीत. तसंच, ते त्यांच्याबद्दल चुगली करत नाहीत. याउलट ते त्यांच्या जीभेचा वापर इतरांना मदत करण्यासाठी करतात. (नीति. १२:१८) या सर्व गोष्टींमुळे मंडळी मजबूत होते आणि आनंदाने देवाची सेवा करते.

दयेचा गुण शब्दांनी आणि कार्यांनी व्यक्‍त होतो. आपण जेव्हा दया दाखवतो तेव्हा आपण यहोवाच्या उदार आणि प्रेमळ व्यक्‍तिमत्त्वाचं अनुकरण करत असतो. (इफिस. ५:१) यामुळे आपली मंडळी मजबूत होते आणि आपण इतरांना यहोवाची सेवा करायला मदत करतो. तेव्हा, यहोवाचे साक्षीदार दयाळू लोक आहेत हे आपण नेहमी आपल्या वागण्या-बोलण्यातून दाखवत राहू या!

^ परि. 13 देवाच्या पवित्र आत्म्याच्या पैलूच्या नऊ भागाच्या शृंखलेत पुढच्या लेखात आपण चांगुलपणा या गुणाबद्दल चर्चा करणार आहोत.