व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

येशूने ज्या जनसेवकांबद्दल आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री उल्लेख केला ते कोण होते आणि त्यांना ही पदवी का देण्यात आली?

येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री प्रेषितांना सांगितलं की त्यांनी आपल्या सहविश्‍वासू बांधवांमध्ये मोठं नाव मिळवू नये. त्याने त्यांना म्हटलं: “विदेश्‍यांचे राजे त्यांच्यावर सत्ता चालवतात आणि त्यांच्यावर अधिकार गाजवणाऱ्‍यांना जनसेवक म्हटलं जातं. पण, तुमच्यामध्ये असं असू नये.”​—लूक २२:२५, २६.

येशू कोणत्या जनसेवकांबद्दल बोलत होता? ग्रीक आणि रोमी समाजात नामवंत माणसांना आणि शासकांना एव्हरीटीस  किंवा जनसेवक ही पदवी देऊन सन्मानित केलं जायचं. ही गोष्ट आपल्याला कोरीव लेख, नाणी आणि इतर लिखाण यांमधून कळते. या पदवीधारकांनी समाजासाठी काहीतरी मोठं काम केलं असल्यामुळे त्यांना ही पदवी देण्यात यायची.

अनेक राजांना जनसेवकाची पदवी देण्यात आली होती. यांपैकी टॉलमी तिसरा एव्हरीटीस (जवळपास इ.स.पू. २४७-२२२) आणि टॉलमी आठवा एव्हरीटीस दुसरा (जवळपास इ.स.पू. १४७-११७) या इजिप्तच्या शासकांना ही पदवी देण्यात आली होती. तसंच, ज्युलियस सीझर (इ.स.पू. ४८-४४) आणि औगुस्त (इ.स.पू. ३१-इ.स. १४) या रोमी शासकांनाही ही पदवी बहाल करण्यात आली होती. यांमध्ये यहूदीयाचा राजा, महान हेरोदही होता. दुष्काळाच्या वेळी हेरोदने दुसऱ्‍या राष्ट्रातून आपल्या लोकांसाठी गहू मागवले होते आणि गरजवंतांना कपडे दिले होते. हे कार्य करून कदाचित हेरोदने जनसेवकाची पदवी मिळवली असेल.

अडॉल्फ दीसमॅन या जर्मन बायबल विद्वानानुसार जनसेवक ही पदवी त्या काळात खूप सर्वसामान्यपणे वापरली जायची. त्याने म्हटलं: “जर तुम्ही ही पदवी प्राचीन हस्तलिखितांत शोधली तर ती तुम्हाला कमीतकमी १०० वेळा तरी सहजच मिळेल.”

मग जेव्हा येशूने शिष्यांना म्हटलं की “तुमच्यामध्ये असं असू नये” तर त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? शिष्यांनी लोकांच्या हिताचा विचार करू नये किंवा त्यांच्यासाठी काही करू नये असं त्याला म्हणायचं होतं का? मुळीच नाही. इथे दुसऱ्‍यांना मदत करताना त्याच्यामागे असलेल्या हेतूबद्दल येशू बोलत होता.

येशूच्या दिवसांत असणारी श्रीमंत माणसं चांगलं नाव मिळवू इच्छित होती. यासाठी ते मोठमोठ्या कार्यक्रमांचं आणि खेळांचं आयोजन करण्यासाठी पैसे द्यायचे. तसंच, बगिच्यांसाठी, मंदिराच्या बांधकामांसाठी आणि अशा प्रकारच्या इतर कामांसाठीही पैसे द्यायचे. पण हे सर्व ते स्तुती, नावलौकिकता किंवा लोकांची मतं मिळवण्यासाठी करायचे. एका संदर्भानुसार: “या दानशूरांनी केलेली कार्यं जरी मनापासून केलेल्या उदारतेची उदाहरणं असली, तरी बऱ्‍याचदा अशा कार्यांमागे राजनैतिक स्वार्थ असायचा.” येशू आपल्या अनुयायांना अशा प्रकारच्या महत्त्वाकांक्षी आणि स्वार्थी भावनेपासून दूर राहण्यासाठी सांगत होता.

याच्या काही वर्षांनंतर प्रेषित पौलने उदारतेच्या मागे असलेल्या भावनेबद्दल यासारखंच एक महत्त्वाचं सत्य सांगितलं. तो म्हणाला की उदारता दाखवताना आपला हेतू योग्य असला पाहिजे. करिंथ मधल्या आपल्या सहविश्‍वासू बांधवांना त्याने लिहिलं: “प्रत्येकाने आपल्या मनात जसे ठरवले आहे, तसेच द्यावे; त्याने कुरकुर करत किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण आनंदाने देणारा देवाला आवडतो.”​—२ करिंथ. ९:७.