व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या विचारसरणीला कोण आकार देत आहे?

तुमच्या विचारसरणीला कोण आकार देत आहे?

“या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका.”​—रोम. १२:२.

गीत क्रमांक: ११, २२

१, २. (क) पेत्रने येशूला सल्ला दिल्यावर येशूने त्याला काय उत्तर दिलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) येशूने असं उत्तर का दिलं?

येशूचे शब्द ऐकून शिष्यांना धक्काच बसला! त्यांना वाटलं होतं की येशू इस्राएलच्या राज्याची पुनःस्थापना करणार आहे. पण येशूने म्हटलं की त्याला लवकरच खूप दुःख सोसून मृत्यूचा सामना करावा लागणार आहे. सर्वात आधी प्रेषित पेत्र बोलला. त्याने म्हटलं: “हे काय बोलत आहेस प्रभू? तुला मुळीच असं काही होणार नाही.” यावर येशूने उत्तर दिलं: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू माझ्यासाठी अडखळण आहेस कारण तुझे विचार देवाचे नाहीत तर माणसांचे आहेत.”​—मत्त. १६:२१-२३; प्रे. कार्ये १:६.

असं बोलण्याद्वारे येशूने अगदी स्पष्ट केलं की यहोवाचे विचार सैतानाच्या अधिकाराखाली असलेल्या जगाच्या विचारांपेक्षा खूप वेगळे आहेत. (१ योहा. ५:१९) पेत्र येशूला जगातल्या अनेक लोकांसारखी स्वार्थी मनोवृत्ती बाळगण्याचं प्रोत्साहन देत होता. पण येशूला यहोवाची इच्छा माहीत होती. यहोवाची इच्छा होती की त्याने लवकरच येणारं दुःख आणि मृत्यू यांचा सामना करण्यासाठी तयार असावं. येशूने आपल्या उत्तरावरून स्पष्टपणे दाखवून दिलं की त्याला यहोवाची इच्छा मान्य आहे आणि त्याने जगातली विचारसरणी पूर्णपणे नाकारली आहे.

३. यहोवाची विचारसरणी स्वीकारणं आणि जगातली विचारसरणी नाकारणं का कठीण आहे?

आपल्याबाबतीत काय? आपण यहोवासारखा विचार करतो की जगातल्या लोकांसारखा? ख्रिस्ती या नात्याने आपण देवाचं मन आनंदित होईल अशी कार्यं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. पण आपल्या विचारांबाबतीत काय? आपण यहोवासारखा विचार करण्यासाठी मेहनत घेत आहोत का, म्हणजे आपण त्याच्यासारखा दृष्टिकोन बाळगतो का? असं करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण जगातल्या लोकांसारखा विचार करण्यासाठी जराही मेहनत लागत नाही; आपण खूप सहजच त्यांच्यासारखा विचार करू लागतो. आणि हे सर्वत्र पसरलेल्या जगाच्या मनोवृत्तीमुळे होत आहे. (इफिस. २:२) तसंच, जगातले लोक सहसा स्वतःचा विचार करतात आणि कदाचित आपल्यालाही त्यांच्यासारखाच विचार करण्याचा मोह होऊ शकतो. खरंच, यहोवासारखा विचार करणं कठीण आहे पण जगातल्या लोकांसारखा विचार करणं खूपच सोपं आहे.

४. (क) आपण जगाच्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव होऊ दिला तर काय होऊ शकतं? (ख) या लेखात आपण काय शिकणार आहोत?

आपण जर जगाच्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव होऊ दिला तर कदाचित आपण स्वार्थी बनू आणि आपल्यासाठी बरोबर काय व चूक काय हे स्वतःच ठरवण्याची इच्छा मनात बाळगू. (मार्क ७:२१, २२) त्यामुळे आपण माणसांची नाही तर देवाची विचारसरणी विकसित करणं खूप गरजेचं आहे. आणि असं करायला आपल्याला या लेखामुळे मदत होईल. देवासारखा दृष्टिकोन बाळगणं खूप बंधनकारक नसून फायदेकारक का आहे याची कारणं आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, जगाच्या विचारसरणीचं अनुकरण करण्याचं किंवा त्याच्या प्रभावाखाली येण्याचं आपण कसं टाळू शकतो हेदेखील आपण पाहू. अनेक गोष्टींबाबतीत आपण यहोवाचा दृष्टिकोन कसा जाणून घेऊ शकतो आणि आपली विचारसरणीही त्याच्यासारखी कशी ठेवू शकतो हे आपण पुढच्या लेखात शिकू या.

यहोवाची विचारसरणी फायदेकारक आहे

५. इतरांचा प्रभाव आपल्यावर पडू नये असं काहींना का वाटतं?

आपल्या विचारसरणीवर कोणाचाच  प्रभाव पडू नये अशी काही लोकांची इच्छा असते. ते म्हणतात: “माझे निर्णय मीच घेतो.” त्यांना कदाचित म्हणायचं असतं की त्यांचे निर्णय ते स्वतः घेतात आणि तसं करण्याचा त्यांना हक्क आहे. इतर कोणाचं त्यांच्यावर नियंत्रण असलेलं त्यांना आवडत नाही किंवा त्यांना आपला वेगळेपणा टिकवून ठेवायचा असतो. *

६. (क) यहोवा आपल्याला कोणतं स्वातंत्र्य देतो? (ख) हे स्वातंत्र्य अमर्यादित आहे का?

आपल्याला हे जाणून दिलासा मिळतो की यहोवाची विचारसरणी स्वीकारल्यावरही आपले वैयक्‍तिक विचार किंवा मतं असू शकतात. २ करिंथकर ३:१७ म्हणतं: “जिथे कुठे यहोवाचा आत्मा आहे, तिथे स्वातंत्र्य आहे.” आपल्याला कशा प्रकारची व्यक्‍ती बनायचं आहे हे निवडण्याचं स्वातंत्र्य यहोवा आपल्याला देतो. आपल्या वैयक्‍तिक आवडीनिवडी असू शकतात. यहोवाने आपली रचनाही त्याच प्रकारे केली आहे. पण याचा अर्थ असा होत नाही, की आपल्याला अमर्यादित स्वातंत्र्य आहे. (१ पेत्र २:१६ वाचा.) पण बरोबर काय आणि चूक काय हे ठरवताना मात्र आपण यहोवाचं वचन मार्गदर्शक म्हणून वापरावं अशी त्याची इच्छा आहे. पण असं करणं बंधनकारक आहे की फायदेकारक?

७, ८. यहोवासारखा दृष्टिकोन बाळगणं खूप बंधनकारक आहे का? एक उदाहरण द्या.

हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. आईवडील आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करतात. ते सहसा त्यांना प्रामाणिक राहायला, मेहनती बनायला आणि इतरांची काळजी घ्यायला शिकवतात. पण असं करणं खूप बंधनकारक आहे का? नाही. याउलट, आईवडील मुलांना यशस्वी होण्यासाठी तयार करत असतात. मुलं मोठी होतात आणि त्यांचे आईवडील त्यांच्यासोबत नसतात तेव्हा ते स्वतःचे निर्णय घेण्यासाठी तयार झालेले असतात. आईवडिलांनी शिकवल्याप्रमाणे मुलांनी चांगल्या मूल्यांनुसार जीवन जगण्याची निवड केली तर याची शक्यता जास्त आहे की ते योग्य निर्णय घेतील. तसंच, ते अनेक समस्या व नैराश्‍यही टाळू शकतील.

एका चांगल्या आईवडिलांप्रमाणे यहोवाचीदेखील इच्छा आहे की त्याच्या मुलांनी सर्वात समाधानी जीवन जगावं. (यश. ४८:१७, १८) म्हणून तो आपल्याला नैतिक गोष्टींबद्दल व इतरांशी कसं वागलं पाहिजे याबद्दल मूलभूत तत्त्वं शिकवतो. त्याच्या दृष्टिकोनासारखा आपला दृष्टिकोन असावा आणि त्याच्या मूल्यांप्रमाणे आपण जगावं हे शिकण्यासाठी तो आपल्याला आर्जवतो. आणि हे खूप बंधनकारक नाही. याउलट, असं केल्यामुळे आपण सुज्ञ बनतो आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला मदत होते. (स्तो. ९२:५; नीति. २:१-५; यश. ५५:९) अशा निर्णयांमुळे आपल्याला आनंदच होतो आणि असं करत असताना आपल्याकडे वैयक्‍तिक निवड करण्याचं स्वातंत्र्यही असतं. (स्तो. १:२, ३) यहोवासारखी विचारसरणी बाळगल्यामुळे आपल्याला बराच फायदा होतो!

यहोवाची विचारसरणी श्रेष्ठ आहे

९, १०. यहोवाची विचारसरणी जगाच्या विचारसरणीपेक्षा श्रेष्ठ आहे हे कशावरून सिद्ध होतं?

यहोवाच्या सेवकांना त्याच्या विचारसरणीनुसार जगण्याची इच्छा असण्याचं आणखी एक कारण म्हणजे यहोवाची विचारसरणी जगाच्या विचारसरणीपेक्षा श्रेष्ठ आहे. जग आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सल्ले देतं. जसं की, नैतिक आचरण, आनंदी कुटुंब, यशस्वी करियर, आणि इतर क्षेत्रं. पण सहसा ते सल्ले यहोवाच्या विचारसरणीनुसार नसतात. उदाहरणार्थ, जग लोकांना सहसा स्वतःच्याच इच्छा पूर्ण करण्याचं प्रोत्साहन देतं आणि लैंगिक अनैतिकतेला मान्यता देतं. तसंच, कधीकधी जग विवाहित जोडप्यांना सल्ला देतं की त्यांना आनंदी व्हायचं असेल तर त्यांनी एकतर विभक्‍त व्हावं किंवा घटस्फोट घ्यावा. मग ते क्षुल्लक कारणांसाठी का असेना. पण हा सल्ला बायबल जे शिकवतं त्याच्याशी मेळ खात नाही. पण जग देत असलेला सल्ला हा आज बायबल देत असलेल्या सल्ल्यापेक्षा जास्त व्यावहारिक आहे का?

१० येशूने म्हटलं: “बुद्धी ही कार्यांद्वारे सिद्ध होते.” (मत्त. ११:१९) जरी जगाने तंत्रज्ञानात भरपूर प्रगती केली असली तरी युद्ध, जातीभेद आणि गुन्हेगारी यांसारख्या मोठमोठ्या समस्या ते सोडवू शकलं नाही. यामुळे आपण आजही दुःखी आहोत. त्यासोबतच, जगात लैंगिक अनैतिकता चालवून घेतली जाते. पण बऱ्‍याच लोकांनी मान्य केलं आहे की यामुळे कुटुंबं उद्ध्‌वस्त होतात, शारीरिक समस्या निर्माण होतात आणि इतर वाईट परिणामही होतात. पण यहोवाच्या सल्ल्यांबद्दल काय? यहोवाचा दृष्टिकोन स्वीकारलेल्या ख्रिस्ती बंधुभगिनींची कुटुंबं आनंदी आहेत व त्यांना अनेक शारीरिक समस्या टाळणं शक्य झालं आहे. तसंच, जगभरातल्या बंधुभगिनींसोबत त्यांचे शांतीपूर्ण नातेसंबंध आहेत. (यश. २:४; प्रे. कार्ये १०:३४, ३५; १ करिंथ. ६:९-११) यावरून स्पष्टच आहे, की यहोवाची विचारसरणी जगाच्या विचारसरणीपेक्षा श्रेष्ठ आहे.

११. मोशेच्या विचारसरणीला कोणी आकार दिला आणि त्याचा काय परिणाम झाला?

११ प्राचीन काळातल्या यहोवाच्या विश्‍वासू सेवकांना माहीत होतं की यहोवाची विचारसरणी श्रेष्ठ आहे. उदाहरणार्थ, “मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण” मिळालं होतं तरी त्याला माहीत होतं की “सुज्ञ अंतःकरण” यहोवा देतो. (प्रे. कार्ये ७:२२; स्तो. ९०:१२) म्हणून त्याने यहोवाला सांगितलं: “तुझे मार्ग मला दाखव.” (निर्ग. ३३:१३) मोशेने यहोवाला त्याच्या विचारांना आकार देऊ दिला. म्हणून यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर केला. तसंच, बायबलमध्ये विश्‍वासू व्यक्‍ती म्हणून त्याचा उल्लेख करून यहोवाने त्याला सन्मानित केलं.​—इब्री ११:२४-२७.

१२. पौलचे निर्णय कशावर आधारित होते?

१२ प्रेषित पौल खूप बुद्धिमान व सुशिक्षित होता. त्याला हिब्रू आणि ग्रीक भाषा यायच्या. (प्रे. कार्ये ५:३४; २१:३७, ३९; २२:२, ३) पण त्याने जगातली विचारसरणी नाकारली आणि देवाच्या वचनांवर आधारित निर्णय घेतले. (प्रेषितांची कार्ये १७:२; १ करिंथकर २:६, ७, १३ वाचा.) याचा परिणाम म्हणजे, त्याने यशस्वीपणे सेवाकार्य केलं आणि अशा प्रतिफळाची वाट पाहिली जे कायमस्वरूपी टिकणार होतं.​—२ तीम. ४:८.

१३. यहोवाच्या विचारसरणीनुसार आपल्या विचारसरणीमध्ये फेरबदल करण्याची जबाबदारी कोणाची आहे?

१३ हे स्पष्टच आहे की देवाची विचारसरणी जगाच्या विचारसरणीपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. जर आपण देवाच्या स्तरांनुसार चाललो तर आपल्याला खरा आनंद आणि यश मिळेल. पण यहोवा आपल्यावर त्याचे विचार थोपवत नाही. तसंच, “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” आणि मंडळीतले वडीलही आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत. (मत्त. २४:४५; २ करिंथ. १:२४) यहोवाच्या विचारसरणीनुसार आपल्या विचारसरणीमध्ये फेरबदल करणं ही प्रत्येकाची वैयक्‍तिक जबाबदारी आहे. हे आपण कसं करू शकतो?

जगाचं अनुकरण करण्याचं टाळा

१४, १५. (क) यहोवासारखा विचार करण्यासाठी आपण कशावर मनन करणं गरजेचं आहे? (ख) जगाच्या विचारसरणीचा प्रभाव आपण का टाळला पाहिजे? एक उदाहरण द्या.

१४ रोमकर १२:२ मध्ये आपल्याला सल्ला दिला आहे: “या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका, तर आपली विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.” या वचनावरून आपल्याला शिकायलं मिळतं की सत्य शिकण्याआधी कदाचित आपल्या विचारांना जगाने आकार दिला असेल. असं असलं तरी आपण आपले विचार बदलून देवाच्या विचारांसारखे करू शकतो. आपली जडणघडण आणि आपले अनुभव यांचा आपल्या विचारसरणीवर काही अंशी प्रभाव असला तरी आपले विचार बदलत राहू शकतात. आणि आपण ज्या गोष्टींवर जास्त विचार करण्याची निवड करतो त्यांवर हे सहसा अवलंबून असतं. जर आपण यहोवाच्या विचारसरणीवर मनन केलं तर त्याचा दृष्टिकोन नेहमी योग्यच असतो हे आपल्याला पटेल. मग त्याच्या दृष्टिकोनासारखाच आपला दृष्टिकोन असावा असं आपल्याला वाटू लागेल.

१५ पण यहोवाच्या विचारसरणीनुसार आपल्या विचारसरणीला आकार देण्यासाठी आपण “जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण” करण्याचं थांबवलं पाहिजे. याचा अर्थ आपण देवाच्या विचारसरणीनुसार नसणाऱ्‍या गोष्टी वाचण्याचं, पाहण्याचं आणि ऐकण्याचं टाळलं पाहिजे. हे किती महत्त्वाचं आहे हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. समजा एखाद्याला सुदृढ व्हायचं असेल तर तो कदाचित पौष्टिक अन्‍नाचं सेवन करेल. पण जर त्याने त्यासोबतच नियमितपणे दूषित अन्‍नाचंही सेवन केलं तर त्याची सर्व मेहनत वाया जाईल. त्याच प्रकारे, जर आपण जगातल्या विचारसरणीचा आपल्या मनावर प्रभाव होऊ दिला तर यहोवाची विचारसरणी शिकून घेण्याचे आपले प्रयत्न निष्फळ ठरतील.

१६. आपण कशापासून स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे?

१६ आपण पूर्णपणे जगाची विचारसरणी टाळू शकतो का? नाही. कारण आपण या जगातून प्रत्यक्षपणे बाहेर जाऊ शकत नाही, म्हणून काही अंशी तरी आपल्यावर त्याचा परिणाम होणार. (१ करिंथ. ५:९, १०) जेव्हा आपण प्रचाराला जातो तेव्हा लोक त्यांचे चुकीचे विचार आणि खोटे विश्‍वास आपल्याला सांगतात. हे टाळणं आपल्याला शक्य नसलं तरी आपण त्यांवर विचार करत बसत नाही किंवा ते स्वीकारत नाही. येशूप्रमाणे आपणही सैतानाचे विचार लगेच फेटाळून लावले पाहिजे. तसंच, अनावश्‍यकपणे जगाच्या विचारसरणीच्या प्रभावाखाली येण्याचं टाळल्याने आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो.​—नीतिसूत्रे ४:२३ वाचा.

१७. आपण अनावश्‍यकपणे जगाच्या विचारसरणीच्या प्रभावाखाली येण्याचं कसं टाळू शकतो?

१७ उदाहरणार्थ, आपण विचारपूर्वक आपल्या मित्रांची निवड केली पाहिजे. बायबल आपल्याला इशारा देतं की जर आपण यहोवाचे उपासक नसलेल्या लोकांसोबत घनिष्ठ मैत्री केली तर आपणही त्यांच्यासारखा विचार करायला लागू. (नीति. १३:२०; १ करिंथ. १५:१२, ३२, ३३) तसंच, आपण मनोरंजनाची निवडही काळजीपूर्वक केली पाहिजे. उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त, हिंसा किंवा अनैतिकता यांना बढावा देणारं मनोरंजन विषासारखं आहे. तेव्हा, “देवाच्या ज्ञानाच्या विरोधात” असलेल्या या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत.​—२ करिंथ. १०:५.

हानीकारक मनोरंजन नाकारण्यासाठी आपण मुलांना मदत करतो का? (परिच्छेद १८, १९ पाहा)

१८, १९. (क) पटकन लक्षात न येणाऱ्‍या जगातल्या विचारांबद्दल आपण सावधगिरी का बाळगली पाहिजे? (ख) आपण स्वतःला कोणते प्रश्‍नं विचारले पाहिजेत व का?

१८ पटकन लक्षात न येणाऱ्‍या जगातल्या विचारांनाही आपण ओळखायला आणि टाळायला शिकलं पाहिजे. जसं की, काही बातम्या विशिष्ट राजनैतिक पक्षाच्या मतांची फक्‍त सकारात्मक बाजूच मांडतात. आणि काही बातम्यांमध्ये जगाला पसंत असलेली ध्येयं आणि साध्य केलेल्या गोष्टींना बढावा दिला जातो. काही चित्रपटांमध्ये आणि पुस्तकांमध्ये “आधी स्वतःचा विचार करा” व “आधी कुटुंबाचा विचार करा” असा बढावा दिला जातो. यामुळे आपल्याला ते वाजवी, पटणारं आणि योग्य असल्याचं वाटू शकतं. पण ही विचारसरणी बायबलनुसार नाही. त्यात म्हटलं आहे की जर आपण यहोवाला सर्वात जास्त प्रेम केलं तरच खऱ्‍या अर्थाने आपण आणि आपलं कुटुंब आनंदी होऊ शकतं. (मत्त. २२:३६-३९) तसंच, मुलांसाठी असलेल्या कहाण्यांमध्ये वरवर काही चुकीचं वाटत नसलं तरी त्यात अशा काही गोष्टी सामील असू शकतात ज्यांमुळे हळूहळू मुलांना अनैतिक विचार स्वीकारण्याचा बढावा मिळू शकतो.

१९ याचा अर्थ असा होत नाही की आपण योग्य मनोरंजनाचा आनंद घेऊ नये. असं असलं तरी, आपण स्वतःला पुढील प्रश्‍नं विचारले पाहिजेत: ‘जगातल्या विचारांना अप्रत्यक्ष रीतीने बढावा दिला जात असला तरी मी त्यांना ओळखतो का? टिव्हीवरचे विशिष्ट कार्यक्रम किंवा आक्षेपार्ह साहित्य यांपासून मी स्वतःचं आणि माझ्या मुलांचं रक्षण करतो का? माझ्या मुलांवर जगातल्या विचारांचा प्रभाव होऊ नये म्हणून मी त्यांना यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्यासाठी मदत करतो का?’ जर आपण देवाची विचारसरणी आणि जगाची विचारसरणी यांमधला फरक जाणला तर आपण “जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण” करण्यापासून दूर राहू.

तुमच्या विचारसरणीला कोण आकार देत आहे?

२०. आपल्याला कोण आकार देत आहे हे कशावरून ठरेल?

२० आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की माहिती मिळवण्याचे फक्‍त दोनच मार्ग आहेत. पहिला म्हणजे यहोवा आणि दुसरा सैतान व त्याचं जग. मग तुमच्या विचारसरणीला कोण आकार देत आहे? ज्याच्याकडून तुम्ही माहिती मिळवता तोच तुमच्या विचारसरणीला आकार देतो. पण जर आपण जगाचे विचार स्वीकारले तर जग आपल्या विचारसरणीला आकार देईल आणि आपल्या वागण्या-बोलण्यात स्वार्थीपणा दिसून येईल. त्यामुळे आपण काय पाहतो, वाचतो, ऐकतो आणि कशावर विचार करतो यांची काळजीपूर्वक निवड करणं खूप महत्त्वाचं आहे.

२१. आपण पुढच्या लेखात काय पाहणार आहोत?

२१ या लेखात आपण शिकलो की यहोवाची विचारसरणी अनुसरण्यासाठी आपण जगाची विचारसरणी नाकारली पाहिजे आणि देवाच्या विचारांवर मनन करत राहिलं पाहिजे. यामुळे आपण त्याच्यासारखा विचार करायला लागू. हे आपण कसं करू शकतो ते आपण पुढच्या लेखात पाहू या.

^ परि. 5 खरं पाहिलं तर अगदी स्वावलंबी व्यक्‍तीवरही इतरांच्या विचारसरणीचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ, जीवनाचा उगम कसा झाला किंवा कोणते कपडे घालायचे यांवर विचार करताना आपल्यावर इतरांचा काही प्रमाणात तरी प्रभाव असतोच. पण असं असलं तरी कोणाचा आपल्यावर प्रभाव होऊ द्यायचा हे निवडणं मात्र आपल्या हाती असतं.