व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही यहोवाची विचारसरणी आत्मसात करत आहात का?

तुम्ही यहोवाची विचारसरणी आत्मसात करत आहात का?

“आपली विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर होऊ द्या.”​—रोम. १२:२.

गीत क्रमांक: ३४, ४३

१, २. सत्यात प्रगती करत असताना आपण काय शिकतो? उदाहरण द्या.

कल्पना करा की एका लहान मुलाला एक व्यक्‍ती भेटवस्तू देते. त्या मुलाचे आईवडील लगेच त्याला त्या व्यक्‍तीचे आभार मानायला सांगतात. आणि तो मुलगा तसं करतोही कारण त्याच्या आईवडिलांनी त्याला तसं करायला सांगितलेलं असतं. पण जसजसा तो मुलगा मोठा होतो तसतसं त्याला कळतं की एखाद्याने आपल्यासाठी काही केल्यावर त्याचे आभार मानणं गरजेचं का आहे. त्याचे आईवडील त्याला लहानपणापासून असं करायला का शिकवत आहेत याची जाणीव त्याला होते. मग एक वेळ अशी येते जेव्हा तो स्वतःहून इतरांचे आभार मानू लागतो.

आपल्याबाबतीतही काहीसं असंच घडलं. आपण सत्य शिकू लागलो तेव्हा सुरुवातीला आपण शिकलो की यहोवाने दिलेल्या आज्ञा पाळणं खूप गरजेचं आहे. पण जसजशी आपण प्रगती केली तसतशी आपल्याला यहोवाची विचार करण्याची पद्धत समजू लागली. यहोवाला काय आवडतं, त्याला काय आवडत नाहीत, आणि जीवनातील वेगवेगळ्या पैलूंबद्दल त्याचा दृष्टिकोन काय आहे हे आपल्याला समजलं. वैयक्‍तिक निर्णय घेताना आणि कार्यं करताना आपण जेव्हा यहोवाची विचारसरणी लक्षात घेतो तेव्हा आपण यहोवासारखा विचार करू लागतो.

३. आपल्याला यहोवासारखा विचार करणं कठीण का जाऊ शकतं?

यहोवासारखा विचार करणं आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे आणि यामुळे आपल्याला आनंद मिळतो. पण अपरिपूर्ण असल्यामुळे असं करणं नेहमीच इतकं सोपं नसतं. उदाहरणार्थ, आपल्या सगळ्यांनाच नैतिक शुद्धता, भौतिक गोष्टी, प्रचारकार्य, रक्‍ताचा गैरवापर आणि इतर गोष्टींबद्दल यहोवाचा दृष्टिकोन माहीत आहे. पण या गोष्टींबद्दल यहोवाचे विचार समजून घेणं कधीकधी आपल्याला कठीण जाऊ शकतं. तर मग आपण यहोवासारखा विचार करण्याचं कसं शिकू शकतो? आणि असं केल्यामुळे आपल्याला आता आणि भविष्यातही योग्य ते करण्यासाठी कशी मदत होईल?

यहोवासारखा विचार करायला शिकणं

४. विचारसरणी बदलणं याचा काय अर्थ होतो?

रोमकर १२:२ वाचा. आपण यहोवासारखा विचार करायला कसं शिकू शकतो हे प्रेषित पौलने या वचनात आपल्याला सांगितलं आहे. त्याने म्हटलं की “या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका.” आपण मागच्या लेखात शिकलो की असं करण्याचा अर्थ जगातील विचारसरणी नाकारणं असा होतो. पण पौलने असंदेखील म्हटलं की आपण आपली विचारसरणी बदलली पाहिजे. याचाच अर्थ आपण देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे, त्याचे विचार समजून घेतले पाहिजेत, त्यांवर मनन केलं पाहिजे आणि मग देवासारखा विचार करायला शिकलं पाहिजे.

५. वाचन आणि अभ्यास यात काय फरक आहे ते सांगा.

अभ्यास करण्यात फक्‍त माहिती वाचणं किंवा प्रश्‍नांची उत्तरं शोधणं इतकंच सामील नाही. तर एखाद्या माहितीवर अभ्यास करताना आपण स्वतःला पुढील प्रश्‍न विचारू शकतो, जसं की यहोवा कोण आहे? त्याची कार्यं कशी आहेत? त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे? याबद्दल मला काय शिकायला मिळतं? यहोवा आपल्याला एखादी गोष्ट का  करायला सांगतो, किंवा ती करायला मनाई का करतो हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तसंच अभ्यास करताना, आपल्याला आपल्या जीवनात आणि विचारसरणीत कुठे बदल करण्याची गरज आहे हेदेखील कळतं. हे खरं आहे की अभ्यास करताना प्रत्येक वेळी या सर्व मुद्यांवर विचार करणं कदाचित आपल्याला शक्य होणार नाही. पण आपण जी माहिती वाचतो त्यावर मनन करण्यासाठी वेळ काढणं आपल्या फायद्याचं आहे. म्हणून मग आपण अभ्यासासाठी जितका वेळ ठरवला आहे त्यातला कमीतकमी अर्धा वेळ मनन करण्यासाठी दिला पाहिजे.​—स्तो. ११९:९७; १ तीम. ४:१५.

६. देवाच्या वचनावर मनन केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

आपण नियमितपणे देवाच्या वचनावर मनन केलं तर त्याचा आपल्याला एक खूप मोठा फायदा होतो. तो म्हणजे, आपल्याला ‘खातरी पटते’ की यहोवाची विचार करण्याची पद्धत ही सर्वोत्तम आहे. यहोवा असा दृष्टिकोन का बाळगतो हे आपल्याला समजू लागतं आणि कालांतराने आपल्याला ते पटतंही. यामुळे आपण आपली विचारसरणी बदलून हळूहळू जीवनातील प्रत्येक पैलूत यहोवासारखा विचार करू लागतो.

आपल्या विचारांचा आपल्या कार्यांवर परिणाम होतो

७, ८. (क) भौतिक गोष्टींबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेली चित्रं पाहा.) (ख) भौतिक गोष्टींबद्दल आपण यहोवासारखा विचार केला, तर आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाच्या स्थानी काय असेल?

आपल्या विचारांचा आपल्या कार्यांवर प्रभाव पडतो. (मार्क ७:२१-२३; याको. २:१७) हे कसं घडतं हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणं पाहू या. येशूच्या जन्माबद्दलच्या अहवालावरून यहोवाचा भौतिक गोष्टींबद्दलचा दृष्टिकोन स्पष्टपणे कळून येतो. योसेफ आणि मरीया हे श्रीमंत नव्हते, पण तरीदेखील स्वतः यहोवा देवाने येशूचे आईवडील बनण्यासाठी त्यांची निवड केली. (लेवी. १२:८; लूक २:२४) येशूचा जन्म झाला तेव्हा मरीयाने त्याला “गव्हाणीत ठेवले, कारण मुक्काम करण्यासाठी त्यांना कुठेही जागा मिळाली नाही.” (लूक २:७) यहोवाची इच्छा असती तर येशूचा जन्म एका चांगल्या ठिकाणी होऊ शकला असता. पण त्याची इच्छा होती की येशूचा जन्म अशा कुटुंबात व्हावा जिथे देवाच्या उपासनेला पहिलं स्थान दिलं जातं. ही गोष्ट यहोवासाठी सर्वात महत्त्वाची होती.

येशूच्या जन्माच्या अहवालावरून आपल्याला यहोवाचा भौतिक गोष्टींबद्दलचा दृष्टिकोन कळतो. काही आईवडिलांना वाटतं की त्यांच्या मुलांना सर्वात चांगल्या भौतिक गोष्टी मिळाल्या पाहिजेत. मग असं करण्यात मुलांचा यहोवासोबतचा नातेसंबंध कमकुवत झाला तरी त्यांना काही हरकत नसते. पण यहोवासाठी त्याच्यासोबत असलेला आपला नातेसंबंध हा सर्वात मोलाचा आहे. या बाबतीत तुम्ही यहोवासारखा विचार करता का? तुमच्या कार्यांवरून काय दिसून येतं?​—इब्री लोकांना १३:५ वाचा.

९, १०. इतरांना अडखळण ठरण्याच्या बाबतीत आपला दृष्टिकोन यहोवासारखाच आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

आणखी एक उदाहरण म्हणजे, इतरांना अडखळण ठरणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल यहोवाचा दृष्टिकोन. अशी व्यक्‍ती इतरांना पाप करायला किंवा यहोवाची सेवा सोडून द्यायला प्रवृत्त करते. येशूने अशा व्यक्‍तीबद्दल म्हटलं: “माझ्यावर विश्‍वास असलेल्या अशा लहानांपैकी एकालाही जो अडखळायला लावतो त्याच्या गळ्यात, गाढव ओढतो तसा जात्याचा दगड बांधून त्याला समुद्रात टाकून दिलं जावं, हेच त्याच्यासाठी चांगलं ठरेल.” (मार्क ९:४२) येशूच्या शब्दांवरून आपल्याला याची गंभीरता कळते. आणि येशू हा विचार करण्याच्या बाबतीत आपल्या पित्यासारखाच आहे. त्यामुळे एखादी व्यक्‍ती जर येशूच्या शिष्याला अडखळण ठरली तर यहोवाला नक्कीच त्या व्यक्‍तीचा खूप राग येईल.​—योहा. १४:९.

१० एखाद्याला अडखळण ठरणं या गोष्टीला आपण यहोवा आणि येशूसारखंच गंभीर लेखतो का? आपल्या कार्यांवरून काय दिसून येतं? उदाहरणार्थ, आपल्याला एका विशिष्ट प्रकारचे कपडे आणि केशभूषा आवडत असेल. पण जर आपली निवड मंडळीतील बंधुभगिनींना खटकली तर? किंवा आपल्या पेहरावामुळे इतरांच्या मनात चुकीचे विचार आले तर? अशा वेळी बंधुभगिनींसाठी असलेल्या प्रेमामुळे आपल्याला आवडणाऱ्‍या गोष्टी सोडून द्यायला आपण तयार असू का?​—१ तीम. २:९, १०.

११, १२. यहोवासारखंच वाईट गोष्टींचा द्वेष करायला शिकल्यामुळे आणि आत्मसंयम विकसित केल्यामुळे आपलं संरक्षण कसं होईल?

११ आणखी एक उदाहरण म्हणजे अनीतीबद्दल यहोवाचा दृष्टिकोन. (रोम. १:१८) आपण अपरिपूर्ण असल्यामुळे यहोवाला याची जाणीव आहे की प्रत्येक वेळी योग्य ते करणं कदाचित आपल्याला जमणार नाही. तरीदेखील तो आपल्याकडून अपेक्षा करतो की आपणही त्याच्यासारखंच वाइटाचा द्वेष करावा. (स्तोत्र ९७:१० वाचा.) यहोवा वाईट गोष्टींचा द्वेष का करतो यावर आपण मनन केलं, तर आपल्याला त्याच्यासारखा दृष्टिकोन बाळगायला मदत होईल. तसंच यामुळे आपल्याला वाईट कार्यांचा प्रतिकार करणं शक्य होईल.

१२ आपण वाइटाचा द्वेष करायला शिकलो, तर यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत हे ठरवायलाही मदत होईल. मग अशा गोष्टींबद्दल बायबलमध्ये स्पष्टपणे काही नियम दिलेले नसले तरीही. उदाहरणार्थ, आजकाल जगात नृत्याचा एक अनैतिक प्रकार खूप प्रचलित होत आहे. यात लोक अर्ध-नग्न अवस्थेत नाचतात. काही लोकांना वाटू शकतं की यात लोक शारीरिक संबंध ठेवत नसल्यामुळे अशा गोष्टींत भाग घेणं चुकीचं नाही. * पण याबद्दल यहोवाचादेखील दृष्टिकोन असाच आहे का? हे लक्षात असू द्या की यहोवा सर्व प्रकारच्या वाइटाचा द्वेष करतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीपासून आपण पूर्णपणे दूर राहिलं पाहिजे. यासाठी आपण आत्मसंयम विकसित केला पाहिजे आणि यहोवासारखंच वाईट गोष्टींचा द्वेष केला पाहिजे.​—रोम. १२:९.

भविष्यात तुम्ही काय कराल याचा आताच विचार करा

१३. भविष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी आपण आताच यहोवाचा दृष्टिकोन समजून घेणं का गरजेचं आहे?

१३ अभ्यास करताना आपण यहोवाचा दृष्टिकोन सजमून घेतला पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याला सुज्ञ निर्णय घ्यायला मदत मिळेल. यामुळे जर एखाद्या परिस्थितीत आपल्याला लगेच निर्णय घेण्याची वेळ आली तर आपण गोंधळून जाणार नाही. (नीति. २२:३) हे फायदेकारक का आहे याची आता आपण बायबलमधून काही उदाहरणं पाहू या.

१४. पोटीफरच्या पत्नीला योसेफने जे उत्तर दिलं त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१४ पोटीफरच्या पत्नीने योसेफला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला लगेच नकार दिला. तो हे यासाठी करू शकला कारण त्याने विवाहाबद्दल असलेल्या यहोवाच्या दृष्टिकोनावर आधीच मनन केलं होतं. (उत्पत्ति ३९:८, ९ वाचा.) योसेफने पोटीफरच्या पत्नीला म्हटलं: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” या शब्दांवरून कळतं की योसेफचा दृष्टिकोन यहोवासारखा होता. आपल्या बाबतीत काय? कामाच्या ठिकाणी जर एखाद्याने तुमच्याशी इश्‍कबाजी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल? किंवा तुम्हाला जर कोणी मोबाईलवर उत्तेजक मेसेज किंवा फोटो पाठवला तर तुम्ही काय कराल? * आपण जर आधीच यहोवासारखा विचार करायला शिकलो आणि अशा गोष्टींबद्दल त्याचा दृष्टिकोन स्वीकारला, तर प्रलोभन आल्यावर आपल्याला यहोवाला एकनिष्ठ राहायला सोपं जाईल.

१५. तीन इब्री तरुणांसारखं आज आपणही यहोवाला एकनिष्ठ कसं राहू शकतो?

१५ शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो या तीन इब्री तरुणांच्या उदाहरणावर विचार करा. नबुखद्‌नेस्सर राजाने त्यांना सोन्याच्या मूर्तीची उपासना करायला सांगितली तेव्हा त्यांनी तसं करायला ठामपणे नकार दिला. त्यांच्या स्पष्ट उत्तरावरून कळतं की यहोवाला एकनिष्ठ राहिल्याने त्यांच्यासोबत काय घडू शकतं याचा त्यांनी आधीच विचार केला होता. (निर्ग. २०:४, ५; दानी. ३:४-६, १२, १६-१८) आज आपल्या बाबतीत काय? जर तुमच्या मालकाने तुम्हाला खोट्या धार्मिक सणांसाठी वर्गणी मागितली तर तुम्ही काय कराल? अशी एखादी परिस्थिती येण्याची वाट पाहण्यापेक्षा, आपण आताच  अशा गोष्टींबद्दल यहोवाचा दृष्टिकोन जाणून घेतला पाहिजे. आपण आज असं केलं, तर मग भविष्यात अशी परिस्थिती उद्‌भवल्यास आपल्याला त्या तीन इब्री तरुणांसारखं योग्य उत्तर देऊन कार्य करता येईल.

संशोधन करा, वैद्यकीय कागदपत्रं भरा आणि आपल्या डॉक्टरांशी बोला (परिच्छेद १६ पाहा)

१६. यहोवाची विचारसरणी अचूकपणे समजून घेतल्यामुळे आपल्याला तातडीच्या प्रसंगासाठी आधीच तयारी करायला कशी मदत होते?

१६ यहोवाच्या विचारसरणीवर मनन केल्यामुळे आपल्याला एखाद्या तातडीच्या वैद्यकिय प्रसंगातही त्याला एकनिष्ठ राहायला मदत होईल. आपल्या सर्वांनीच निर्धार केला आहे की आपण कधीच रक्‍ताचं किंवा त्याच्या चार मूळ घटकांचं संक्रमण करणार नाही. (प्रे. कार्ये १५:२८, २९) पण काही अशा वैद्यकिय पद्धती आहेत ज्यांत रक्‍ताच्या अंशांचा किंवा आपल्या स्वतःच्या रक्‍ताचा उपयोग केला जातो. आणि अशा पद्धती स्वीकारायच्या की नाहीत याबद्दल प्रत्येक ख्रिस्तीने बायबल तत्त्वांच्या आधारावर निर्णय घेण्याची गरज आहे. असे निर्णय तुम्ही कधी घेतले पाहिजेत? अपघात झाल्यावर किंवा हॉस्पिटलमध्ये तातडीचा प्रसंग उद्‌भवल्यावर असे निर्णय घेणं सुज्ञपणाचं ठरेल का? याऐवजी आपण आताच त्याबद्दल संशोधन केलं पाहिजे आणि वैद्यकीय उपचारांची कागदपत्रं, जसं की DPA कार्ड आधीच भरलं पाहिजे. आपल्याला कोणत्या वैद्यकीय पद्धती मान्य आहेत याचा आपण त्यात उल्लेख करू शकतो आणि आपल्या डॉक्टरांशीही आधीच त्याबद्दल बोलू शकतो. *

१७-१९. आपण आताच  यहोवाची विचारसरणी जाणून का घेतली पाहिजे? उदाहरण द्या.

१७ पेत्रने दिलेल्या चुकीच्या सल्ल्यावर येशूने जी प्रतिक्रिया दिली त्यावरही विचार करा. पेत्रने येशूला स्वतःवर दया करायला सांगितली. यहोवाच्या अपेक्षेवर आणि त्याचं जीवन व मृत्यू याबद्दल दिलेल्या भविष्यवाण्यांवर येशूने आधीच बराच काळ मनन केलं होतं. या ज्ञानामुळे येशू यहोवाला एकनिष्ठ राहू शकला. यामुळेच त्याने आपल्या सर्वांसाठी स्वतःचं जीवन बलिदान म्हणून दिलं.​—मत्तय १६:२१-२३ वाचा.

१८ यहोवाची इच्छा आहे की आपण त्याच्यासोबत मैत्री करावी आणि आनंदाची बातमी सांगण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावेत. (मत्त. ६:३३; २८:१९, २०; याको. ४:८) पण काही लोक आपल्याला निराश करण्याचा प्रयत्न करू शकतात. पेत्रसारखेच त्यांचे हेतू कदाचित चांगले असतील. उदाहरणार्थ, कदाचित तुमचा बॉस तुम्हाला पगार वाढवून देत असेल, पण यामुळे तुम्हाला कामात जास्त वेळ द्यावा लागेल. मग तुम्हाला सभांसाठी किंवा मंडळीसोबत प्रचारासाठी वेळ मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? किंवा कदाचित शाळेत तुमचे शिक्षक तुम्हाला आणखी जास्त शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्‍या शहरात जाण्याचं उत्तेजन देतील. असं झालं तर निर्णय घेण्याआधी तुम्ही प्रार्थनापूर्वक यावर विचार केला पाहिजे. तुम्ही याबद्दल संशोधन केलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत किंवा मंडळीतील वडिलांसोबत याविषयावर बोललं पाहिजे. तुम्ही आताच  या गोष्टींबद्दल यहोवाचा दृष्टिकोन जाणून घेतला आणि त्याच्यासारखा विचार करायला शिकलात तर ते तुमच्या फायद्याचं ठरेल. असं केल्यामुळे भविष्यात तुमच्यासमोर अशी परिस्थिती आली तर तुम्ही त्या प्रलोभनाला बळी पडणार नाही. अशा परिस्थितीत काय करायचं हे आधीच ठरवल्यामुळे तुम्ही यहोवाच्या सेवेवर आपलं लक्ष केंद्रित करू शकाल.

१९ आपल्या एकनिष्ठेची परीक्षा होईल अशा इतर परिस्थितींचा तुम्ही आधीच विचार करू शकता. हे खरं आहे की काही परिस्थिती अनपेक्षित असतील. पण आपण आपल्या वैयक्‍तिक अभ्यासात यहोवाच्या विचारसरणीवर मनन केलं, तर मग एखादी परिस्थिती उद्‌भवल्यावर शिकलेली तत्त्वं कशी लागू करायची हे आपल्याला आठवेल. म्हणून मग अभ्यास करताना आपण यहोवाचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याची विचारसरणी स्वीकारली पाहिजे. तसंच, आपल्याला आता आणि भविष्यात सुज्ञ निर्णय घ्यायला कशी मदत मिळेल यावरही आपण विचार केला पाहिजे.

उज्ज्वल भविष्यासाठी यहोवाची विचारसरणी स्वीकारा

२०, २१. (क) आपण नवीन जगात स्वातंत्र्याचा आनंद का घेऊ शकू? (ख) आपण आजही आनंदी कसे होऊ शकतो?

२० आपण सर्व जण नवीन जगात जाण्यासाठी आतुर आहोत. आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना पृथ्वीवरील नंदनवनात राहण्याची आशा आहे. आजच्या जगात आपण जो त्रास आणि दुःख अनुभवतो त्यापासून देवाच्या राज्यात आपली सुटका होणार. नवीन जगात आपल्याला आपल्या आवडी आणि इच्छांनुसार निवड करण्याचं स्वातंत्र्यही असणार.

२१ पण याचा अर्थ आपल्या स्वातंत्र्याला काहीच मर्यादा नसणार असं नाही. नम्र लोक यहोवाच्या नियमांच्या आणि विचारसरणीच्या आधारावरच निर्णय घेतील. आणि यामुळे संपूर्ण पृथ्वीवर आनंद आणि शांती असेल. (स्तो. ३७:११) तो काळ येईपर्यंत आपण यहोवासारखा विचार करायला शिकून आजच्या जीवनाचा आनंद घेऊ या.

^ परि. 12 नृत्याच्या काही प्रकारांमध्ये अर्ध-नग्न अवस्थेत नाचणारी व्यक्‍ती ग्राहकाच्या मांडीवर बसून उत्तेजक नृत्य करते. जर एखाद्या साक्षीदाराने अशा प्रकारच्या कार्यांत सहभाग घेतला, तर या गोष्टीला अनैतिक लैंगिक कृत्यं म्हणून लेखलं जाऊ शकतं आणि यामुळे मंडळीतील वडील त्याच्यावर न्यायिक खटलादेखील चालवू शकतात. जर एखादा ख्रिस्ती अशा प्रकारच्या कार्यांमध्ये सहभागी झाला असेल तर त्याने वडिलांकडे मदत मागावी.​—याको. ५:१४, १५.

^ परि. 14 मोबाईल फोनवरून एखाद्याला उत्तेजक मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्याला सेक्सटिंग असं म्हणतात. घडलेला प्रकार आणि परिस्थिती लक्षात घेता मंडळीतील वडील कदाचित न्यायिक समिती नेमू शकतात. काही ठिकाणी सेक्सटिंगमध्ये सामील असलेल्या तरुणांवर सरकारी अधिकाऱ्‍यांनी कार्यवाही केली आहे. याविषयावर अधिक माहिती मिळवण्यासाठी jw.org या वेबसाईटवर जाऊन पुढील लेख पाहा “यंग पिपल आस्क​—व्हॉट शूड आय नो अबाऊट सेक्सटिंग?” (BIBLE TEACHINGS > TEENAGERS यात पाहा.) किंवा सजग होइए!  जानेवारी २०१४ पृ. ४-५ वर असलेला “अपने किशोर से सैक्सटिंग के बारे में कैसे बात करें” हा लेख पाहा.

^ परि. 16 या विषयावर आपल्या प्रकाशनांमध्ये आणखी बायबल तत्त्वं दिली आहेत. उदाहरणार्थ, देवाच्या प्रेमात टिकून राहा  या पुस्तकात पृष्ठ २४६-२४९ पाहा.