व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवावर भरवसा ठेवा!

यहोवावर भरवसा ठेवा!

“तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.”​—नीति. ३:५.

गीत क्रमांक: २३, ४९

१. आपल्या सर्वांना सांत्वनाची गरज का आहे?

आपल्या सर्वांनाच सांत्वनाची गरज आहे. कदाचित आपल्या जीवनात बऱ्‍याच चिंता, नैराश्‍य आणि दुःखं असतील. आपल्याला कदाचित आजारामुळे, वाढत्या वयामुळे किंवा आपल्या प्रिय व्यक्‍तीला मृत्यूत गमावल्यामुळे खूप दुःख होत असेल. काही जणांना खूप वाईट वागणूक दिली जाते त्यामुळेही ते दुःखी असतील. त्यासोबतच, आपल्या अवतीभवती असलेले लोक दिवसेंदिवस आणखी हिंसक होत चालले आहेत याकारणानेही आपण दुःखी असू. खरंच, या ‘अतिशय कठीण काळावरून’ आपल्याला खातरी पटते, की आपण “शेवटच्या दिवसांत” जगत आहोत आणि प्रत्येक दिवस आपल्याला नवीन जगाच्या अगदी जवळ नेत आहे. (२ तीम. ३:१) आपण बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची वचनं पूर्ण होण्याची वाट बघत असू आणि यादरम्यान कदाचित आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला असेल. मग अशा वेळी आपल्याला सांत्वन कुठून मिळू शकतं?

२, ३. (क) हबक्कूकबद्दल आपल्याला काय माहीत आहे? (ख) आपण हबक्कूकच्या पुस्तकाचं परीक्षण का करणार आहोत?

आपल्याला सांत्वन कुठून मिळू शकतं हे जाणून घेण्यासाठी आपण हबक्कूक पुस्तकाचं परीक्षण करू या. या पुस्तकात हबक्कूकच्या जीवनाबद्दल जास्त माहिती दिली नसली तरी त्यातून आपल्याला प्रोत्साहन मिळतं. हबक्कूकच्या नावाचा अर्थ कदाचित ‘घट्ट मिठी’ असा होऊ शकतो. यहोवा आपल्या उपासकांना सांत्वन मिळावं यासाठी त्यांना प्रेमळपणे जवळ घेतो याला हे सूचित करत असावं. किंवा जसं एक लहान मूल आपल्या वडिलांना बिलगून राहतं, तसंच यहोवाचे उपासक त्याला घट्ट धरून राहतात यालाही हे सूचित करत असावं. हबक्कूक देवाशी बोलला आणि त्याने त्याला काही प्रश्‍नं विचारले. यहोवाने त्याला त्यांच्यात झालेलं संभाषण लिहून काढायला प्रेरित केलं. कारण यहोवाला माहीत होतं की यामुळे त्याच्या सेवकांना फायदा होईल.​—हब. २:२.

हबक्कूकच्या पुस्तकात आपल्याला निराश झालेला हबक्कूक आणि यहोवा यांच्यामध्ये झालेलं संभाषण वाचायला मिळतं. फक्‍त या संभाषणावरूनच आपल्याला या संदेष्ट्याबद्दल माहिती मिळते. पण त्याने लिहिलेलं हे पुस्तक देवाच्या वचनात “आधीपासूनच लिहून ठेवलेल्या” सर्व गोष्टींचा भाग आहे. “यासाठी की आपल्या धीराने आणि शास्त्रवचनांतून मिळणाऱ्‍या सांत्वनाने आपल्याला आशा मिळावी.” (रोम. १५:४) हबक्कूकच्या पुस्तकामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला कशी मदत मिळू शकते? यामुळे यहोवावर भरवसा ठेवण्याचा काय अर्थ होतो हे आपल्याला समजायला मदत होऊ शकते. तसंच, आपण कोणत्याही समस्येचा किंवा परीक्षेचा सामना करत असलो तरी हबक्कूकच्या भविष्यवाणीमुळे आपण मनाची शांती अनुभवू शकतो.

यहोवाला प्रार्थना करा

४. हबक्कूक का निराश झाला होता?

हबक्कूक १:२, ३ वाचा. हबक्कूकच्या काळात परिस्थिती फार कठीण होती. त्याच्या अवतीभवती दुष्ट आणि हिंसक लोक होते आणि यामुळे त्याला फार दुःख झालं. इस्राएली लोक एकमेकांशी क्रूरतेने वागायचे आणि अन्याय करायचे. हबक्कूकला वाटायचं: ‘हा दुष्टपणा कधी संपणार? यहोवा हे सर्व दूर करण्यासाठी एवढा उशीर का लावतोय?’ यहोवाने काहीतरी पाऊल उचलावं यासाठी त्याने यहोवाकडे याचना केली. कारण त्याला त्या वेळी अगदी हतबल झाल्यासारखं वाटलं होतं. यहोवाला आता आपल्या लोकांची काळजी नाही किंवा तो काहीच करणार नाही असं कदाचित त्याला वाटलं असावं. तुमच्या मनातही कधी असा विचार आला आहे का?

५. आपण हबक्कूकच्या पुस्तकातून काय शिकू शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

हबक्कूकचा आता यहोवावर आणि त्याच्या अभिवचनांवर भरवसा नव्हता म्हणून त्याने हे प्रश्‍नं विचारले का? मुळीच नाही! खरंतर, त्याला ज्या शंका आणि समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी तो यहोवाकडे मदत मागत होता. यावरून कळतं की त्याने धीर सोडला नव्हता आणि त्याला अजूनही यहोवावर भरवसा होता. हबक्कूक चिंतित होता हे स्पष्टच होतं, कारण त्याला हे समजत नव्हतं की समस्या सोडवण्यासाठी यहोवा इतका उशीर का लावत आहे आणि त्याला हे सर्व का सहन करू देत आहे. यहोवाने त्याला हे सर्व लिहिण्याची प्रेरणा दिली यावरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. तो म्हणजे, आपण आपल्या चिंता किंवा शंका यहोवाला सांगायला कधीही कचरू नये. खरंतर, आपण त्याला प्रार्थना करावी आणि आपल्या मनातल्या भावना त्याला सांगाव्यात यासाठी तो आपल्याला प्रेमळपणे आर्जवतो. (स्तो. ५०:१५; ६२:८) नीतिसूत्रे ३:५ मध्ये आपल्याला असं प्रोत्साहन देण्यात आलं आहे की “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.” हबक्कूकने हे शब्द आपल्या जीवनात लागू केले.

६. प्रार्थना करणं इतकं महत्त्वाचं का आहे?

हबक्कूकने आपल्या मित्रावर व पित्यावर म्हणजे यहोवावर भरवसा ठेवला आणि त्याच्याशी जवळचा नातेसंबंध जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तो आपल्या परिस्थितीविषयी चिंता करत बसला नाही किंवा त्याने स्वतःच्या बळावर समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट, त्याने प्रार्थनेत त्याच्या भावना आणि चिंता यहोवासमोर मांडल्या. हबक्कूकने खरंच आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडलं आहे! प्रार्थना ऐकणारा यहोवा देव आपल्याला आर्जवतो, की प्रार्थना करून आपण त्याला आपल्या चिंता सांगाव्यात. असं करण्याद्वारे आपण त्याच्यावर भरवसा असल्याचं दाखवतो. (स्तो. ६५:२) यामुळे यहोवा आपल्या प्रार्थनांचं कसं उत्तर देतो हे आपल्याला समजायला मदत होईल. जेव्हा तो आपल्याला सांत्वन देतो आणि आपलं मार्गदर्शन करतो, तेव्हा त्याने आपल्याला प्रेमळपणे जवळ घेतलं आहे याची जाणीव आपल्याला होईल. (स्तो. ७३:२३, २४) आपल्या परिस्थितीबद्दल, आपल्या समस्येबद्दल त्याला काय वाटतं हे समजायला तो आपल्याला मदत करेल. आपला यहोवावर भरवसा आहे हे दाखवण्यासाठी सर्वात उत्तम मार्गांपैकी एक म्हणजे त्याला प्रार्थना करणं.

यहोवाचं ऐका

७. हबक्कूकने आपल्या चिंता यहोवाला सांगितल्या तेव्हा यहोवाची काय प्रतिक्रिया होती?

हबक्कूक १:५-७ वाचा. आपल्या चिंता ऐकून यहोवा काय प्रतिक्रिया देईल असा प्रश्‍न कदाचित हबक्कूकला पडला असावा. पण एका प्रेमळ पित्याप्रमाणे यहोवाने हबक्कूकच्या भावना समजून घेतल्या. त्याला माहीत होतं की हबक्कूक दुःखात आहे आणि मदतीसाठी त्याच्याकडे याचना करत आहे. यहोवा त्याला ओरडला नाही. याउलट, त्याने हबक्कूकला सांगितलं की तो लवकरच अविश्‍वासू यहुदी लोकांना शिक्षा करणार आहे. खरंतर, हबक्कूक हा पहिला संदेष्टा असावा ज्याला याबद्दल माहिती मिळाली.

८. यहोवाने दिलेलं उत्तर हबक्कूकला का अपेक्षित नव्हतं?

यहोवा लवकरच कार्य करणार आहे हे त्याने हबक्कूकला समजावलं. तो यहूदातल्या दुष्ट आणि हिंसक लोकांना शिक्षा करणार होता. हे “तुमच्या काळी” होईल असं सांगून यहोवाने दाखवलं की हा न्यायदंड हबक्कूक किंवा त्याच्या काळातले यहूदातले लोक जिवंत असेपर्यंत येईल. यहोवाने जे उत्तर दिलं ते हबक्कूकला अपेक्षित नव्हतं. खासदी किंवा बाबेलचे लोक यहूदातल्या लोकांपेक्षाही खूप क्रूर होते. यहूदातल्या लोकांना कमीतकमी यहोवाचे स्तर तरी माहीत होते, पण त्यांच्याबाबतीत तसं नव्हतं. मग यहोवा आपल्या लोकांना शिक्षा करण्यासाठी क्रूर मूर्तीपूजक राष्ट्राचा वापर का करणार होता? यामुळे तर यहूदात आणखीनच दुःख-त्रास वाढला असता. जर तुम्ही हबक्कूकच्या जागी असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं?

९. हबक्कूकने आणखी कोणते प्रश्‍नं विचारले?

हबक्कूक १:१३-१४, १७ वाचा. हबक्कूकला जरी समजलं असेल की यहोवा बाबेलच्या लोकांचा वापर करून त्याच्या अवतीभवती असलेल्या दुष्ट लोकांना शिक्षा करणार तरी तो गोंधळलेला होता. (हब. १:१२) पण त्याने नम्र राहून यहोवावर भरवसा ठेवण्याचा निर्धार केला. इतकंच काय, तर त्याने असंही म्हटलं की यहोवा त्याच्यासाठी “दुर्ग” आहे. (अनु. ३२:४; यश. २६:४) हबक्कूकला खातरी होती की देव प्रेमळ व दयाळू आहे आणि म्हणून तो यहोवाला आणखी प्रश्‍नं विचारायला घाबरला नाही. त्याने विचारलं: यहोवा यहूदातली परिस्थिती इतकी वाईट का होऊ देत आहे आणि त्याच्या लोकांना इतकं दुःख का सहन करू देत आहे?, सर्वशक्‍तिमान देव का ‘शांत’ आहे आणि सर्वत्र जी दुष्टता पसरली आहे ती तो का खपवून घेत आहे? यहोवा तर “पवित्र प्रभू” आहे आणि त्याचे ‘डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता त्याच्याने पाहवत नाही.’

१०. आपल्यालाही कधीकधी हबक्कूकसारखं का वाटू शकतं?

१० कधीकधी आपल्यालाही कदाचित हबक्कूकसारखं वाटेल. आपण यहोवाचं ऐकतो आणि त्याच्यावर भरवसा ठेवतो. बायबल वाचल्यामुळे आणि त्याचा अभ्यास केल्यामुळे आपली आशा आणखी बळकट होते. त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला जी निर्देशनं मिळतात त्यांवरून आपल्याला त्याच्या अभिवचनांबद्दल आणखी माहिती मिळते. पण तरी तुम्ही विचार कराल, ‘आपले दुःख-त्रास कधी संपणार?’ हबक्कूकने पुढे जे केलं त्यावरून आपण खूपकाही शिकू शकतो.

यहोवाची वाट पाहा

११. हबक्कूकने काय करण्याचा निर्धार केला होता?

११ हबक्कूक २:१ वाचा. यहोवासोबत झालेल्या संभाषणामुळे हबक्कूकला मनाची शांती मिळाली. यामुळे त्याने यहोवाची वाट पाहण्याचा निर्धार केला. त्याचा निर्धार पक्का असल्याचं त्याने आपल्या शब्दांद्वारे व्यक्‍त केलं. त्याने म्हटलं: “त्या दिवसाची मी शांतपणे वाट पाहत राहीन.” (हब. ३:१६, सुबोध भाषांतर) देवाच्या इतर विश्‍वासू सेवकांनीसुद्धा, यहोवा कार्य करेल याची धीराने वाट पाहिली. त्यांच्या उदाहरणांमुळे आपल्यालाही तसंच करत राहण्याचं प्रोत्साहन मिळतं.​—मीखा ७:७; याको. ५:७, ८.

१२. आपण हबक्कूककडून काय शिकू शकतो?

१२ हबक्कूकने केलेल्या निर्धारावरून आपण काय शिकू शकतो? पहिलं हे, की आपल्यासमोर कोणतीही समस्या आली तरी आपण कधीच प्रार्थना करण्याचं थांबवू नये. दुसरं, यहोवा त्याच्या वचनाद्वारे आणि संघटनेद्वारे जे सांगतो ते आपण ऐकलं पाहिजे. आणि तिसरं, यहोवा कार्य करेल यासाठी आपण त्याची धीराने वाट पाहिली पाहिजे व त्याने ठरवलेल्या वेळी तो आपल्याला दुःखातून बाहेर काढेल हा भरवसा ठेवला पाहिजे. जर आपण हबक्कूकचं अनुकरण केलं तर आपल्याला मनाची शांती लाभेल आणि धीर धरायला मदत मिळेल. तसंच, आपण कोणत्याही समस्येत असलो तरीही आशेमुळे आपल्याला टिकून राहण्यासाठी व आनंदी राहण्यासाठी मदत होईल. आपल्याला भरवसा आहे की स्वर्गात राहणारा आपला पिता नक्कीच कार्य करेल.​—रोम. १२:१२.

१३. यहोवाने हबक्कूकला कसं सांत्वन दिलं?

१३ हबक्कूक २:३ वाचा. आपण खातरी बाळगू शकतो की हबक्कूकने यहोवाची वाट पाहण्याचा निर्धार केला म्हणून यहोवाला नक्कीच आनंद झाला असेल. हबक्कूकला कोणत्या दुःखाचा सामना करावा लागत आहे हे सर्वशक्‍तिमान देवाला खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं. त्यामुळे त्याने संदेष्ट्याला सांत्वन दिलं. तसंच, त्याला प्रेमळपणे आश्‍वासन दिलं की तो त्याच्या प्रामाणिक प्रश्‍नांची उत्तरं नक्कीच देईल. हबक्कूकच्या सर्व चिंता लवकरच दूर होणार होत्या. जणू यहोवा त्याला म्हणत होता: “धीर धर आणि माझ्यावर भरवसा ठेव. जरी तुला उशीर वाटत असला तरी मी तुझ्या प्रार्थनेचं नक्की उत्तर देईन.” यहोवाने आपली अभिवचनं पूर्ण करण्याची एक वेळ ठरवली आहे, हे त्याने हबक्कूकला सांगितलं. म्हणून त्याने हबक्कूकला वाट पाहण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तो निराश होणार नव्हता.

आपण यहोवाला सर्वोत्तम देण्याचा निर्धार का केला आहे? (परिच्छेद १४ पाहा)

१४. समस्येचा सामना करताना आपण कोणता निर्धार केला पाहिजे?

१४ यहोवा कार्य करेल याची आपणही वाट पाहिली पाहिजे. तो आपल्याला काय सांगतो हेसुद्धा आपण नीट लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. मग आपण कोणत्याही समस्येत असू तरी आपला भरवसा वाढेल आणि आपल्याला मनाची शांती मिळेल. येशूने आपल्याला प्रोत्साहन दिलं, की देवाने “जे काळ व जे समय” आपल्याला कळवलेलं नाही त्यावर आपण लक्ष केंद्रित करू नये. (प्रे. कार्ये १:७) यहोवाला कार्य करण्याची योग्य वेळ माहीत आहे यावर आपला भरवसा असला पाहिजे. त्यामुळे हार न मानता आपण नम्रता, विश्‍वास आणि धीर धरला पाहिजे. तोपर्यंत आपण वेळेचा सदुपयोग करून आपल्या क्षमतांचा होता होईल तितका वापर यहोवाच्या सेवेसाठी केला पाहिजे.​—मार्क १३:३५-३७; गलती. ६:९.

यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना तो सर्वकाळाचं जीवन देतो

१५, १६. (क) हबक्कूकच्या पुस्तकात आपल्याला कोणती अभिवचनं मिळतात? (ख) या अभिवचनांवरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१५ यहोवाने वचन दिलं की “धार्मिक तर आपल्या विश्‍वासाने वाचेल” आणि “पृथ्वी परमेश्‍वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल.” (हब. २:४, १४) हो, यहोवा धीर धरणाऱ्‍यांना आणि त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना सर्वकाळाचं जीवन देण्याचं अभिवचन देतो.

१६ हबक्कूक २:४ मध्ये दिलेलं अभिवचन इतकं महत्त्वाचं आहे की प्रेषित पौलने त्याच्या पत्रांत याचा तीन वेळा उल्लेख केला! (रोम. १:१७; गलती. ३:११; इब्री १०:३८) आपण खातरी बाळगू शकतो की आपल्याला कितीही समस्यांचा सामना करावा लागला, तरी यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे आपण त्याची अभिवचनं पूर्ण होताना पाहू. भविष्यासाठी असलेल्या आशेवर आपलं लक्ष केंद्रित असावं अशी त्याची इच्छा आहे.

१७. हबक्कूकच्या पुस्तकातून आपल्याला कोणती आश्‍वासनं मिळतात?

१७ शेवटच्या दिवसांत राहणाऱ्‍या आपल्या सर्वांसाठी हबक्कूकच्या पुस्तकात महत्त्वाचा धडा दिला आहे. यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍या प्रत्येक नीतिमान व्यक्‍तीला सर्वकाळाचं जीवन देण्याचं अभिवचन तो देतो. तेव्हा, आज आपल्याला कोणत्याही समस्यांचा व चिंतांचा सामना करावा लागत असला तरी आपण यहोवावर असलेला भरवसा आणखी वाढवत राहू या. यहोवाने हबक्कूकला जे म्हटलं त्यावरून आपल्याला खातरी पटते की तो आपल्याला मदत आणि संरक्षण पुरवेल. तो आपल्याला प्रेमळपणे आर्जवतो की आपण त्याच्यावर भरवसा ठेवावा आणि त्याचं राज्य पृथ्वीवर स्थापित करण्याची ठरवलेली वेळ येईपर्यंत धीराने वाट पाहावी. त्या वेळी पृथ्वी यहोवाच्या आनंदी आणि शांतीप्रिय उपासकांनी भरून जाईल.​—मत्त. ५:५; इब्री १०:३६-३९.

यहोवावर भरवसा ठेवा आणि आनंदित राहा

१८. यहोवाच्या शब्दांचा हबक्कूकवर कसा परिणाम झाला?

१८ हबक्कूक ३:१६-१९ वाचा. यहोवाने हबक्कूकला जे म्हटलं ते त्याच्या मनाला भिडलं. यहोवाने प्राचीन काळात त्याच्या लोकांसाठी ज्या अद्‌भुत गोष्टी केल्या त्यावर हबक्कूकने मनन केलं. यामुळे त्याचा यहोवावर भरवसा आणखी वाढला. त्याला पक्की खातरी होती की यहोवा लवकरच कार्य करेल. आपल्याला काही काळासाठी दुःख सोसावं लागेल हे माहीत असूनही संदेष्ट्याला यामुळे सांत्वन मिळालं. आता त्याच्या मनातल्या सर्व शंका दूर झाल्या होत्या. याउलट, यहोवा आपल्याला वाचवेल असा पूर्ण भरवसा त्याला होता. त्याने १८व्या वचनात जे म्हटलं आहे त्यावरून त्याला यहोवावर किती भरवसा होता हे दिसून येतं. बायबलमध्ये नमूद केलेले त्याचे हे शब्द खूप उल्लेखनीय आहेत. काही विद्वान या वचनाचा शब्दशः अर्थ असा काढतात: “मी प्रभूसाठी आनंदाने उड्या मारीन; मी देवासाठी प्रसन्‍न होऊन गिरक्या घालीन.” आपल्या सर्वांसाठीच हा खरंच खूप महत्त्वाचा धडा आहे! यहोवाने आपल्याला भविष्यासाठी सुंदर अभिवचनं दिली आहेत पण त्यासोबतच त्याने आपल्याला भरवसाही दिला आहे की तो लवकरच ती अभिवचनं पूर्ण करेल.

१९. यहोवाने हबक्कूकला जसं सांत्वन दिलं तसं तो आपल्यालाही कसं देऊ शकतो?

१९ हबक्कूकच्या पुस्तकातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. तो म्हणजे यहोवावर भरवसा ठेवणं. (हब. २:४) यहोवावरचा भरवसा टिकवून ठेवण्यासाठी आपण त्याच्यासोबत असलेला आपला नातेसंबंध घनिष्ठ करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या गोष्टी करू शकता. (१) प्रार्थना करत राहा. यहोवाला आपल्या सर्व चिंता आणि समस्या सांगा. (२) यहोवा त्याच्या वचनाद्वारे जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका आणि त्याच्या संघटनेद्वारे जे मार्गदर्शन देतो त्याचं पालन करा. (३) यहोवा आपली अभिवचनं पूर्ण करेल याची वाट पाहत असताना धीर धरा आणि विश्‍वासू राहा. हबक्कूकनेसुद्धा हेच केलं. यहोवासोबत त्याने संभाषण सुरू केलं तेव्हा जरी तो निराश होता तरी शेवटी त्याला प्रोत्साहन मिळालं आणि तो आनंदी झाला. जर आपण हबक्कूकचं अनुकरण केलं तर आपल्या पित्याने, यहोवाने आपल्यालाही प्रेमळपणे जवळ घेतलं आहे हे जाणल्यामुळे सांत्वन मिळेल. खरंच, या दुष्ट जगात आपल्याला यापेक्षा जास्त सांत्वन कोणीच देऊ शकत नाही!