व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सत्य विकत घे, ते कधीच विकू नको

सत्य विकत घे, ते कधीच विकू नको

“सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नको.”​—नीति. २३:२३.

गीत क्रमांक: ३७, ३४

१, २. (क) तुमच्या जीवनात सर्वात मौल्यवान काय आहे? (ख) आपण कोणत्या सत्यांबद्दल मनापासून कदर बाळगतो आणि का? (लेखाच्या सुरुवातीला दिलेली चित्रं पाहा.)

तुमच्या जीवनात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे? यहोवाचे सेवक या नात्याने आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपलं यहोवासोबतचं नातं. आपण हे नातं धोक्यात घालून कोणतीही गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. बायबलमधील सत्यंदेखील आपल्यासाठी खूप मौल्यवान आहेत. कारण त्यामुळे आपल्याला यहोवासोबत मैत्री करायला मदत होते.​—कलस्सै. १:९, १०.

यहोवा आपला महान शिक्षक आहे आणि तो आपल्याला त्याच्या वचनातून, बायबलमधून अनेक मौल्यवान सत्यं शिकवतो. तो आपल्याला त्याच्या नावाच्या महत्त्वाबद्दल आणि त्याच्या सुंदर गुणांबद्दल शिकवतो. तसंच, तो आपल्याला शिकवतो की त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे, इतकं की त्याने आपल्या प्रिय मुलाचं जीवन आपल्या सर्वांसाठी दिलं. यहोवा आपल्याला मसीही राज्याबद्दलही शिकवतो. तो आपल्याला भविष्यासाठी आशा देतो; आपण अभिषिक्‍त असल्यास स्वर्गात जगण्याची आणि दुसऱ्‍या मेंढरांमधून असल्यास पृथ्वीवर जगण्याची. (योहा. १०:१६) आपण जीवन कसं जगावं हे यहोवा आपल्याला शिकवतो. आपल्यासाठी ही सर्व सत्यं खूप मौल्यवान आहेत कारण ती आपल्याला आपल्या निर्माणकर्त्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडायला मदत करतात. तसंच, यामुळे आपल्या जीवनाला एक उद्देश लाभतो.

३. सत्य शिकण्यासाठी यहोवा आपल्याकडून पैसे मागतो का?

यहोवा खूप उदार देव आहे. तो इतका उदार आहे की त्याने आपल्यासाठी त्याच्या पुत्राचं बलिदान दिलं. यहोवा जेव्हा एखाद्या व्यक्‍तीला सत्याचा शोध घेताना पाहतो, तेव्हा तो त्याला सत्य मिळवण्यासाठी मदत करतो. सत्य शिकण्यासाठी यहोवा कधीही आपल्याकडून पैसे मागणार नाही. एकदा शिमोन नावाच्या एका व्यक्‍तीने इतरांना पवित्र आत्मा देण्याचा अधिकार मिळवण्यासाठी प्रेषित पेत्रला पैसे देण्याचा प्रयत्न केला. पेत्रने त्याला सांगितलं की तो चुकीचा विचार करत आहे आणि त्याला म्हटलं: “तुझ्या चांदीचा तुझ्यासोबत नाश होवो, कारण देवाचं हे कृपादान पैशांनी विकत घेण्याचा तू विचार केला.” (प्रे. कार्ये ८:१८-२०) मग सत्य “विकत” घेण्याचा काय अर्थ होतो?

सत्य “विकत” घेण्याचा काय अर्थ होतो?

४. या लेखात आपण सत्याबद्दल काय शिकणार आहोत?

नीतिसूत्रे २३:२३ वाचा. बायबलमधून सत्य शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. यासाठी आपल्याला बऱ्‍याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. म्हणून ‘सत्य विकत’ घेतल्यावर म्हणजे सत्य शिकून घेतल्यावर आपण नेहमी एका गोष्टीची दक्षता बाळगली पाहिजे. ती म्हणजे आपण कधीही ते “विकू” नये म्हणजेच सोडू नये. आपण बायबलमधलं सत्य कसं “विकत” घेतो? त्याची किंमत किती आहे? या प्रश्‍नांची उत्तरं जाणल्यामुळे सत्याबद्दल आपली कदर आणखी वाढेल आणि आपण ते कधीही सोडणार नाही. तसंच, आपल्याला समजेल की यहोवाकडून मिळणारं सत्य दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप मौल्यवान आहे.

५, ६. (क) आपण पैसे न देता सत्य कसं विकत घेऊ शकतो? स्पष्ट करा. (ख) सत्य शिकून घेतल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

एखादी गोष्ट मोफत आहे याचा अर्थ असा होत नाही की त्याची काहीच किंमत नाही. नीतिसूत्रे २३:२३ या वचनात “विकत घे” यासाठी असलेल्या मूळ इब्री शब्दाचा अर्थ “मिळवणं” असादेखील होऊ शकतो. या दोन्ही शब्दांवरून आपल्याला कळतं की एखाद्या मौल्यवान गोष्टीला मिळवण्यासाठी एका व्यक्‍तीला परिश्रम घ्यावे लागतात किंवा मग त्याग करावे लागतात. आपण सत्य कसं विकत घेतो हे समजून घेण्यासाठी एका उदाहरणाचा विचार करा. कल्पना करा की एक दुकानदार फुकटात फळं वाटत आहे. ही फळं आपोआप आपल्या घरी येतील अशी अपेक्षा आपण करू शकतो का? मुळीच नाही. फळं मिळवण्यासाठी आपल्याला त्या दुकानात जावं लागेल. त्या फळांसाठी आपल्याला काहीच पैसे मोजावे लागत नसले, तरी ती मिळवण्यासाठी आपल्याला काही परिश्रम घेणं भाग आहे. अशा प्रकारेच सत्य शिकण्यासाठी आपल्याला पैसे देण्याची गरज नसली, तरी आपल्याला परिश्रम आणि त्याग करणं गरजेचं आहे.

यशया ५५:१-३ वाचा. सत्य विकत घेण्याचा अर्थ आपल्याला या वचनातील यहोवाच्या शब्दांवरून कळतो. या वचनात यहोवा सत्याची तुलना पाणी, दूध आणि द्राक्षारस यांसोबत करतो. एका तहानलेल्या व्यक्‍तीला जसं थंड पाणी तजेला देतं, तसंच सत्य आपल्याला तजेला देतं. आणि दूध जसं लहान मुलाला वाढण्यासाठी आणि शक्‍ती मिळवण्यासाठी मदत करतं, तसंच बायबलची सत्यं यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आणखी मजबूत करण्यासाठी मदत करतात. यहोवाने त्याच्या वचनाची तुलना द्राक्षारसासोबतही केली आहे. असं का? बायबल सांगतं की द्राक्षारसामुळे मनुष्याच्या मनाला आनंद होतो. (स्तो. १०४:१५) त्यामुळे जेव्हा यहोवा आपल्याला द्राक्षारस विकत घ्यायला सांगतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की जर आपण जीवनात त्याचं मार्गदर्शन पाळलं तर आपण आनंदी होऊ. (स्तो. १९:८) या उदाहरणांचा उपयोग करून यहोवा आपल्याला सत्य शिकून घेण्याचे आणि ते लागू करण्याचे फायदे समजण्यास मदत करतो. आता आपण अशा पाच गोष्टींबद्दल चर्चा करू या ज्या आपल्याला कदाचित सत्य विकत घेण्यासाठी सोडाव्या लागतात.

सत्य विकत घेण्यासाठी तुम्ही कशाचा त्याग केला आहे?

७, ८. (क) सत्य शिकून घेण्यासाठी वेळ का द्यावा लागतो? (ख) एका तरुण मुलीने कोणता त्याग केला आणि त्याचे कोणते चांगले परिणाम झाले?

वेळ. राज्याचा संदेश ऐकण्यासाठी, बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनं वाचण्यासाठी आणि यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तसंच, सभांसाठी तयारी करायला आणि तिथे उपस्थित राहायलाही वेळ द्यावा लागतो. या सर्व गोष्टी करण्यासाठी आपण कमी महत्त्वाच्या इतर गोष्टींमधून वेळ काढला पाहिजे. (इफिसकर ५:१५, १६ आणि तळटीप वाचा.) बायबलची मूलभूत सत्यं शिकून घेण्यासाठी किती वेळ लागतो? हे प्रत्येक व्यक्‍तीवर अवलंबून आहे. यहोवाच्या बुद्धीबद्दल, त्याच्या मार्गांबद्दल आणि त्याने केलेल्या कार्यांबद्दल शिकण्याला कोणतीच मर्यादा नाही. (रोम. ११:३३) इंग्रजीमधील टेहळणी बुरूजच्या पहिल्या अंकात सत्याची तुलना “एका लहान फुलाशी” करण्यात आली होती. त्यात असं म्हटलं होतं: “सत्याच्या फक्‍त एका  फुलानेच संतुष्ट होऊ नका. जर एकच फूल पुरेसं असतं, तर इतर फुलांची गरजच पडली नसती. नेहमी फुलं वेचत राहा आणि शोधत राहा.” आपण स्वतःला विचारू शकतो, ‘मी यहोवाबद्दल किती शिकलो आहे?’ आपण जरी सदासर्वकाळ जगलो तरी यहोवाबद्दल शिकणं संपणार नाही. पण आज खासकरून हे खूप गरजेचं आहे की आपण आपल्याजवळ असलेल्या वेळेत यहोवाबद्दल होईल तितकं शिकत राहावं. असं करणाऱ्‍या एका व्यक्‍तीचं आपण उदाहरण पाहू या.

जापानमध्ये राहणारी मारीको * नावाची तरुण मुलगी न्यूयॉर्क शहरात शिकण्यासाठी गेली. एक दिवशी एका पायनियर बहिणीने घरोघरच्या प्रचारात तिला राज्याचा संदेश सांगितला. मारीको एका धर्माला मानत होती, पण तरी तिने आपल्या बहिणीसोबत बायबल अभ्यास सुरू केला. शिकत असलेल्या गोष्टी तिला इतक्या आवडू लागल्या की तिने आठवड्यातून दोन वेळा अभ्यास करण्याची विनंती केली. मारीको तिच्या शिक्षणात आणि पार्ट-टाईम नोकरीत व्यस्त होती, पण तरी ती वेळ काढून मंडळीच्या सभांना जाऊ लागली. तिने मनोरंजनातून वेळ काढून तो वेळ सत्याबद्दल जास्त शिकून घेण्यासाठी वापरला. हे त्याग केल्यामुळे मारीकोला यहोवासोबत एक जवळचा नातेसंबंध जोडणं शक्य झालं. अभ्यास सुरू केल्यानंतर एका वर्षाच्या आतच तिने बाप्तिस्मा घेतला. याच्या सहा महिन्यांनंतर, २००६ मध्ये तिने पायनियर सेवा सुरू केली आणि आजही ती पायनियर म्हणून सेवा करत आहे.

९, १०. (क) सत्य शिकल्यामुळे भौतिक गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो? (ख) एका तरुण स्त्रीने कशाचा त्याग केला आणि त्याबद्दल तिला कसं वाटतं?

भौतिक गोष्टी. सत्य शिकण्यासाठी कधीकधी आपल्याला एखादी लठ्ठ पगाराची नोकरी किंवा यशस्वी करियर सोडावं लागू शकतं. उदाहरणार्थ, पेत्र आणि अंद्रिया मासेमारी करणारे होते. पण जेव्हा येशूने त्यांना शिष्य बनण्यासाठी बोलवलं, तेव्हा ते आपला मासेमारीचा व्यवसाय सोडून त्याच्या मागे गेले. (मत्त. ४:१८-२०) अर्थात सत्य शिकल्यामुळे तुम्हाला तुमची नोकरी सोडावीच लागेल असं नाही. एका व्यक्‍तीला आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करणं गरजेचं आहे. (१ तीम. ५:८) पण सत्य शिकल्यामुळे भौतिक गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. जीवनात खरोखर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला समजतं. येशूने म्हटलं: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका.” याऐवजी त्याने आपल्याला उत्तेजन दिलं: “स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा.” (मत्त. ६:१९, २०) मारीया नावाच्या एका तरुण स्त्रीनेसुद्धा हेच केलं.

१० लहानपणापासूनच मारीयाला गॉल्फ खेळायला खूप आवडायचं. शाळेत असताना ती या खेळात आणखी तरबेज होत गेली. ती इतकं चांगलं गॉल्फ खेळायची की तिला युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. मारीयाला या खेळात करियर करून भरपूर पैसे मिळवायचे होते. मग नंतर तिने बायबल अभ्यास सुरू केला. शिकलेल्या गोष्टी तिला खूप आवडू लागल्या आणि ती त्यांना जीवनात लागूही करू लागली. ती म्हणते की “मी जसजसं बायबलच्या स्तरांनुसार माझ्या विचारांत आणि जीवनशैलीत बदल करत गेले, तसतसं मी आनंदी होत गेले.” मारीयाला जाणीव झाली की यहोवासोबत असलेल्या तिच्या नातेसंबंधावर आणि खेळावर एकाच वेळी लक्ष केंद्रित करणं तिला शक्य होणार नाही. (मत्त. ६:२४) म्हणून तिने काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी गॉल्फमध्ये करियर करण्याचा विचार सोडून दिला. आज मारीया पायनियर म्हणून सेवा करत आहे आणि ती म्हणते की ती “सर्वात आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन जगत आहे.”

११. सत्य शिकल्यामुळे इतरांसोबतच्या आपल्या नातेसंबंधावर काय परिणाम होऊ शकतो?

११ इतरांसोबत आपले नातेसंबंध. बायबलमधून शिकलेल्या गोष्टी आपण लागू करू लागतो तेव्हा आपल्या मित्रांसोबतच्या आणि कुटुंबातील सदस्यांसोबतच्या आपल्या नातेसंबंधावर त्याचा परिणाम होऊ शकतो. येशूने आपल्या शिष्यांसाठी जी प्रार्थना केली त्याच्या शब्दांवरून आपल्याला याचं कारण समजतं. त्याने म्हटलं: “सत्याद्वारे त्यांना पवित्र कर, तुझं वचन सत्य आहे.” (योहा. १७:१७; तळटीप) “पवित्र” करण्याचा अर्थ “वेगळं” करणं असा होतो. आपण जीवनात सत्य लागू करू लागतो तेव्हा आपण बायबलमध्ये दिलेले स्तर पाळू लागतो. आपण आपल्या मित्रांसोबत, नातेवाइकांसोबत चांगले संबंध टिकवून ठेवण्याचा होईल तितका प्रयत्न करतो. पण सत्य शिकल्यामुळे आपल्याप्रती त्यांच्या भावना बदलू शकतात आणि काही जण तर आपला विरोधही करू शकतात. या गोष्टीचं आपण आश्‍चर्य करू नये, कारण येशूने म्हटलं होतं: “खरोखर, मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे शत्रू होतील.” (मत्त. १०:३६) पण येशूने आपल्याला वचन दिलं आहे की आपण सत्यासाठी जितके त्याग करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आशीर्वाद आपल्याला मिळतील.​—मार्क १०:२८-३० वाचा.

१२. सत्यासाठी एका यहुदी व्यक्‍तीने कोणता त्याग केला?

१२ एरन नाव असलेल्या यहुदी व्यक्‍तीला आयुष्यभर वाटायचं की देवाचं नाव घेणं चुकीचं आहे. पण त्याला देवाबद्दल सत्य जाणून घ्यायचं होतं. एक दिवस साक्षीदारांनी त्याला दाखवलं की देवाचं नाव असलेल्या चार हिब्रू अक्षरांत जर आपण स्वर जोडले तर “जेहोवा” असा त्याचा उच्चार होतो. हे जेव्हा एरनला कळलं तेव्हा तो इतका उत्साहित झाला की त्याने सभास्थानात जाऊन यहुदी धर्मगुरूंना याविषयी सांगितलं. त्याला वाटलं की देवाच्या नावाबद्दल सत्य कळल्यावर ते आनंदित होतील. पण तसं झालं नाही. याउलट, ते त्याच्यावर थुंकले आणि त्यांनी त्याला बाहेर हाकलून दिलं. एरनचं कुटुंबही त्याच्यावर नाराज झालं. पण यामुळे त्याने यहोवाबद्दल आणखी शिकण्याचं थांबवलं नाही. पुढे एरन एक यहोवाचा साक्षीदार बनला आणि त्याने संपूर्ण आयुष्य विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली. त्याच प्रकारे, आपण जेव्हा सत्य शिकतो तेव्हा लोकांसोबतचे आपले नातेसंबंध कदाचित बदलू शकतात.

१३, १४. सत्य शिकल्यावर आपल्या वागण्या-बोलण्यात आपल्याला कोणते बदल करण्याची गरज आहे? एक अनुभव सांगा.

१३ अशुद्ध विचार आणि कार्यं. सत्य शिकून बायबल स्तरांनुसार जीवन जगण्यासाठी आपण आपल्या विचारांमध्ये आणि कार्यांमध्ये बदल करायला तयार असलं पाहिजे. प्रेषित पेत्रने लिहिलं: “आज्ञाधारक मुलांप्रमाणे व्हा आणि पूर्वी अज्ञानात असताना ज्या इच्छा तुम्ही बाळगत होता, त्यांनुसार वागण्याचे सोडून द्या.” पुढे त्याने म्हटलं: “आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा.” (१ पेत्र १:१४, १५) प्राचीन करिंथ शहरात बरेच लोक अनैतिक कार्यं करायचे. पण यहोवाच्या नजरेत शुद्ध होण्यासाठी त्या लोकांना मोठमोठे बदल करण्याची गरज होती. (१ करिंथ. ६:९-११) आजही सत्य शिकल्यावर अनेक जण तसेच बदल करतात. पेत्रने याबद्दल लिहिलं: “जगाच्या लोकांच्या इच्छेनुसार वागण्यात आतापर्यंत तुम्ही जो वेळ घालवला तो पुरे झाला. कारण तेव्हा तुम्ही निर्लज्ज वर्तन करत होता, अनियंत्रित वासनांच्या आहारी गेला होता, तसेच प्रमाणाबाहेर पिणे, बेलगाम मौजमस्ती, दारूबाजी आणि घृणित मूर्तिपूजा यांसारख्या गोष्टी करत होता.”​—१ पेत्र ४:३.

१४ डेविन आणि जॅसमिन यांना बऱ्‍याच वर्षांपासून अती प्रमाणात दारू पिण्याचं व्यसन होतं. डेविन हा अकाउंट्‌सच्या कामात खूप हुशार होता, पण पिण्याच्या सवयीमुळे तो कोणत्याही नोकरीवर टिकू शकला नाही. जॅसमिन स्वभावाने खूप रागीट आणि हिंसक होती. एक दिवशी दारूच्या नशेत असताना तिला एक मिशनरी जोडपं रसत्यावर भेटलं. त्यांनी तिला बायबल अभ्यासाबद्दल सांगितलं. पण जेव्हा ते पुढच्या आठवडी त्यांच्या घरी गेले तेव्हा जॅसमिन आणि डेविन दोघंही दारूच्या नशेत होते. त्यांना वाटलं होतं की ते मिशनरी त्यांच्या घरी येणार नाहीत. पण पुढच्या वेळी मिशनरी परत आले तेव्हा मात्र परिस्थिती वेगळी होती. जॅसमिन आणि डेविन दोघांनाही बायबल अभ्यास करायचा होता. मग शिकलेल्या गोष्टी ते जीवनात लगेच लागू करू लागले. तीन महिन्याच्या आतच त्यांनी दारूची सवय सोडून दिली आणि नंतर त्यांनी कायदेशीर रीत्या लग्नही केलं. या दोघांनी केलेले मोठे बदल त्यांच्या गावातल्या बऱ्‍याच लोकांच्या लक्षात आले, आणि यामुळे त्यांनीही बायबल अभ्यास सुरू केला.

१५. आपल्याला सत्यासाठी कोणता एक बदल करणं सर्वात कठीण जाऊ शकतं आणि का?

१५ देवाला न आवडणाऱ्‍या प्रथा. आपल्या सर्वांना कराव्या लागणाऱ्‍या कठीण बदलांपैकी एक म्हणजे यहोवाला न आवडणाऱ्‍या प्रथा सोडून देणं. यहोवाला याबद्दल काय वाटतं हे जाणल्यावरही काहींना त्या प्रथा सोडून देणं कठीण जातं. कुटुंबातले सदस्य, कामावरचे लोक किंवा मित्र आपल्याबद्दल काय विचार करतील याची त्यांना भीती असते. त्यांना माहीत असतं की काही प्रथांबद्दल इतरांच्या मनात खूप आदर असतो, जसं की मृत लोकांसाठी पाळल्या जाणाऱ्‍या प्रथा. (अनु. १४:१) मग योग्य ते बदल करण्यासाठी कोणती गोष्ट आपली मदत करेल? प्राचीन काळातील काही लोकांनी सत्य शिकल्यावर बदल केले. आपण त्यांच्या चांगल्या उदाहरणांपासून शिकू शकतो. इफिसमधील ख्रिश्‍चनांनी कोणते त्याग केले हे आता आपण पाहू या.

१६. इफिसमधील काही लोकांनी कोणता त्याग केला?

१६ प्राचीन इफिस शहरात जादूटोणा करणं सर्वसामान्य होतं. जादूटोणा करणारे काही लोक ख्रिस्ती बनले तेव्हा त्यांनी काय केलं? बायबल सांगतं: “जादूटोणा करणाऱ्‍या पुष्कळ लोकांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांसमोर जाळून टाकली. हिशोब केल्यावर, त्यांची किंमत पन्‍नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी असल्याचे दिसून आले. अशा रीतीने, यहोवाच्या वचनाचा अतिशय सामर्थ्यशाली पद्धतीने प्रसार होत गेला व त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला.” (प्रे. कार्ये १९:१९, २०) ते विश्‍वासू ख्रिस्ती आपली मौल्यवान पुस्तकं नष्ट करायला तयार होते आणि यहोवाने त्यांच्या या त्यागासाठी त्यांना खूप आशीर्वाद दिले.

१७. (क) सत्यासाठी आपण कदाचित कोणत्या गोष्टींचा त्याग केला असेल? (ख) पुढच्या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

१७ सत्य शिकण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचा त्याग केला आहे? आपल्यापैकी प्रत्येकाने त्यासाठी आपला वेळ दिला आहे. काही लोकांनी श्रीमंत होण्याच्या संधीचा त्याग केला आहे. आणि सत्य शिकल्यामुळे काही लोकांचे इतरांसोबतचे नातेसंबंध कदाचित बदलले आहेत. आपल्यापैकी बऱ्‍याच लोकांनी आपल्या विचार करण्याच्या आणि कार्यं करण्याच्या पद्धतीत बदल केले आहेत. तसंच, यहोवाला न आवडणाऱ्‍या प्रथाही आपण सोडून दिल्या आहेत. पण आपल्या सर्वांना पक्की खातरी आहे की आपण जे काही त्याग केले आहेत, त्यांच्या तुलनेत बायबलमधील सत्याचं मूल्य खूप जास्त आहे. बायबलमधील सत्य शिकल्यामुळे आपल्याला यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडणं शक्य झालं आहे. ही खरंतर आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. सत्य शिकल्यामुळे मिळालेल्या सर्व आशीर्वादांचा आपण विचार केला, तर आपण कधीच हे सत्य विकणार नाही. पण असं होणं शक्य आहे का? आणि सत्य विकण्याची गंभीर चूक करण्याचं आपण कसं टाळू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला पुढच्या लेखात मिळतील.

^ परि. 8 काही नावं बदलण्यात आली आहेत.