व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४६

घाबरू नका—यहोवा तुम्हाला साहाय्य करेल

घाबरू नका—यहोवा तुम्हाला साहाय्य करेल

“मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.”—इब्री १३:५.

गीत ३३ वैऱ्‍यांना भिऊ नको!

सारांश *

१. एखाद्या समस्येचा सामना करताना आपण एकटेच आहोत असं वाटतं, तेव्हा कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला सांत्वन मिळू शकतं? (स्तोत्र ११८:५-७)

एखाद्या समस्येचा सामना करत असताना आपण एकटेच आहोत, आपल्याला मदत करणारा कोणीच नाही, असं कधी तुम्हाला वाटलं आहे का? अनेकांना असं वाटलं आहे; अगदी यहोवाच्या विश्‍वासू सेवकांनासुद्धा. (१ राजे १९:१४) तुम्हाला जर कधी असं वाटलं, तर यहोवाचं हे अभिवचन नेहमी लक्षात ठेवा: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” त्यामुळे आपण पूर्ण भरवशाने असं म्हणू शकतो, की “यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही.” (इब्री १३:५, ६) प्रेषित पौलने हे शब्द इ.स. ६१ च्या आसपास, यहूदीयामध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना लिहिले होते. त्याच्या या शब्दांमुळे आपल्याला स्तोत्र ११८:५-७ (वाचा.) या वचनांत लिहिलेल्या शब्दांची आठवण होते.

२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत, आणि यामुळे आपल्याला कसा फायदा होईल?

स्तोत्रकर्त्याप्रमाणेच, पौलला याची खातरी होती, की यहोवा त्याला साहाय्य करेल. कारण यहोवाने त्याला अनेकदा मदत केली होती. उदाहरणार्थ, पौलने इब्री ख्रिश्‍चनांना पत्र लिहिलं त्याच्या दोन वर्षांआधी, तो जेव्हा जहाजाने प्रवास करत होता तेव्हा समुद्रात अचानक एक मोठं वादळ आलं. (प्रे. कार्यं २७:४, १५, २०) त्या संपूर्ण प्रवासादरम्यान आणि त्याआधीसुद्धा यहोवाने वेगवेगळ्या मार्गांनी पौलला मदत केली. त्यांपैकी तीन मार्ग आता आपण पाहू या. पहिला मार्ग, येशू आणि स्वर्गदूतांद्वारे. दुसरा मार्ग, काही अधिकाऱ्‍यांद्वारे. आणि तिसरा मार्ग, भाऊबहिणींद्वारे. पौलच्या जीवनात घडलेल्या घटनांवर मनन केल्यामुळे यहोवाच्या अभिवचनावरचा आपला भरवसा आणखी वाढेल. त्याने आपल्याला असं अभिवचन दिलं आहे, की तो आपल्याला कधीच सोडणार नाही. आणि जेव्हा आपण मदतीसाठी त्याच्याकडे प्रार्थना करतो, तेव्हा तो आपल्याला नक्की मदत करेल.

येशू आणि स्वर्गदूतांद्वारे मदत

३. पौलने कदाचित काय विचार केला असेल, आणि का?

इ.स. ५६ च्या आसपास एका जमावाने पौलला यरुशलेममधल्या मंदिराबाहेर ओढत नेलं आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी त्याची खूप वाईट दशा केली. आणि त्याच अवस्थेत दुसऱ्‍या दिवशी पौलला यहुदी न्यायसभेसमोर नेण्यात आलं. (प्रे. कार्यं २१:३०-३२; २२:३०; २३:६-१०) त्या वेळी पौलने कदाचित असा विचार केला असेल, की ‘मला आणखी किती काळ हे सगळं सोसावं लागेल?’ त्यामुळे त्याला मदतीची खूप गरज होती.

४. यहोवाने पौलला येशूद्वारे कशी मदत केली?

पौलला कशी मदत मिळाली?  पौलला अटक करण्यात आलं त्या रात्री “प्रभू” येशू त्याच्याजवळ उभा राहून त्याला म्हणाला: “हिंमत धर! कारण माझ्याबद्दल तू जशी यरुशलेममध्ये अगदी पूर्णपणे साक्ष देत आहेस, तशीच तुला रोममध्येसुद्धा द्यावी लागेल.” (प्रे. कार्यं २३:११) खरंच, पौलला किती योग्य वेळी प्रोत्साहन मिळालं होतं! पौलने यरुशलेममध्ये जी साक्ष दिली होती, त्याबद्दल येशूने त्याची प्रशंसा केली. तसंच, येशूने त्याला असंही अभिवचन दिलं, की तो सुरक्षितपणे रोमला पोचेल. आणि तिथेही तो आणखी मोठ्या प्रमाणात साक्ष देईल. हे आश्‍वासन मिळाल्यामुळे पौलला खरंच किती बरं वाटलं असेल! एका बाळाला जसं आपल्या वडिलांच्या कुशीत सुरक्षित वाटतं, अगदी तसंच त्याला वाटलं असेल.

समुद्रात भयंकर वादळ आलं तेव्हा स्वर्गदूताने पौलला असं आश्‍वासन दिलं, की त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्‍या सगळ्यांचा जीव वाचेल (परिच्छेद ५ पाहा)

५. यहोवाने एका स्वर्गदूताद्वारे पौलला कशी मदत केली? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)

यरुशलेममधल्या या घटनांनंतर जवळपास दोन वर्षांनी पौलला आणखी काही समस्यांचा सामना करावा लागला. पौल समुद्राने रोमला जात होता, तेव्हा एक भयंकर वादळ आलं. वादळ इतकं भयंकर होतं, की जहाजावर काम करणाऱ्‍यांना आणि प्रवाशांना असं वाटलं, की ते आता वाचणार नाहीत. पण पौल मात्र घाबरला नव्हता. याचं कारण पौलनेच सांगितलं. जहाजावर असलेल्या लोकांना तो म्हणाला: “मी ज्या देवाचा उपासक आहे आणि ज्याची पवित्र सेवा करतो त्याचा दूत काल रात्री माझ्याजवळ उभा राहून मला म्हणाला: ‘पौल, घाबरू नकोस. तू कैसरापुढे नक्की उभा राहशील. आणि पाहा! देव तुझ्यासोबत प्रवास करणाऱ्‍या सगळ्यांचा जीव वाचवेल.’” यहोवाने येशूद्वारे पौलला जे आश्‍वासन दिलं होतं, तेच पुन्हा एकदा एका स्वर्गदूताद्वारे त्याला दिलं. पौल सुरक्षितपणे रोमला पोचेल असं यहोवाने सांगितलं होतं. आणि तसंच घडलं. पौल सुरक्षित रोमला पोचला.—प्रे. कार्यं २७:२०-२५; २८:१६.

६. येशूने दिलेल्या कोणत्या अभिवचनामुळे आपल्याला धीर मिळतो, आणि का?

आज आपल्याला कशी मदत मिळते?  येशूने पौलला मदत केली तशीच तो आज आपल्यालाही मदत करतो. कारण येशूने आपल्याला असं अभिवचन दिलं आहे: “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत मी नेहमी  तुमच्यासोबत असेन.” (मत्त. २८:२०) येशूच्या या शब्दांमुळे आपल्याला खूप धीर मिळतो. कारण, जीवनातल्या काही समस्यांचा सामना करणं आपल्याला खूप कठीण जाऊ शकतं. जसं की, जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचं दुःख आपल्याला फक्‍त काही दिवस नाही, तर बरीच वर्षं सोसावं लागू शकतं. किंवा काहींना वाढत्या वयामुळे येणाऱ्‍या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर असेही काही आहेत ज्यांना नैराश्‍याचा सामना करावा लागतो. असं असलं, तरी अशा समस्यांचा आपण धीराने सामना करू शकतो. कारण आपल्याला माहीत आहे, की येशू नेहमी आपल्यासोबत आहे; अगदी आपल्या दुःखाच्या काळातसुद्धा.—मत्त. ११:२८-३०.

प्रचारकार्य करताना स्वर्गदूत आपल्याला मदत करतात आणि आपलं मार्गदर्शन करतात (परिच्छेद ७ पाहा)

७. प्रकटीकरण १४:६ या वचनानुसार आज यहोवा आपल्याला कशी मदत करतो?

बायबल आपल्याला हे आश्‍वासन देतं, की आज यहोवा त्याच्या स्वर्गदूतांद्वारे आपल्याला मदत करतो. (इब्री १:७, १४) उदाहरणार्थ, आपण जेव्हा प्रत्येक “राष्ट्राच्या, वंशाच्या आणि भाषेच्या लोकांना” राज्याचा “आनंदाचा संदेश” सांगतो, तेव्हा स्वर्गदूत आपल्याला मदत करतात, आपलं मार्गदर्शन करतात.—मत्त. २४:१३, १४; प्रकटीकरण १४:६ वाचा.

अधिकाऱ्‍यांद्वारे मदत

८. यहोवाने एका सेनापतीद्वारे पौलला कशी मदत केली?

पौलला कशी मदत मिळाली?  इ.स. ५६ मध्ये येशूने पौलला आश्‍वासन दिलं होतं, की तो सुरक्षितपणे रोमला पोचेल. पण यरुशलेममधल्या काही यहुद्यांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला मारून टाकायचा कट रचला होता. जेव्हा रोमी सेनापती क्लौद्य लुसिया याला या कटाबद्दल समजलं, तेव्हा त्याने पौलला मदत केली. त्याने लगेच, सैनिकांच्या एका मोठ्या गटाला असा हुकूम दिला, की त्यांनी पौलला एका वेगळ्या मार्गाने सुरक्षितपणे कैसरीयाला न्यावं. हे ठिकाण यरुशलेमपासून जवळजवळ १०५ किलोमीटर लांब होतं. तिथे पोचल्यावर राज्यपाल फेलिक्सनेसुद्धा “पौलला हेरोदच्या वाड्यात पहाऱ्‍याखाली ठेवायचा हुकूम दिला.” त्यामुळे जे यहुदी पौलच्या जिवावर टपले होते, ते त्याचं काहीच बरंवाईट करू शकले नाहीत.—प्रे. कार्यं २३:१२-३५.

९. राज्यपाल फेस्तने पौलला कशी मदत केली?

पुढे दोन वर्षांनंतर, म्हणजे इ.स. ५८ मध्ये पौल अजूनही कैसरीयात तुरुंगातच होता. तोपर्यंत फेलिक्सच्या जागी फेस्त राज्यपाल बनला होता. त्या वेळी यहुद्यांनी फेस्तकडे अशी विनंती केली, की पौलची न्यायचौकशी करण्यासाठी त्याने त्याला यरुशलेमला पाठवून द्यावं. पण फेस्तने त्यांची मागणी नाकारली. कारण फेस्तला कदाचित हे माहीत असावं, की रस्त्यातच पौलवर हल्ला करून त्याला ठार मारायचा यहुद्यांचा कट आहे.—प्रे. कार्यं २४:२७–२५:५.

१०. कैसराने आपला न्याय करावा अशी मागणी पौलने केली तेव्हा राज्यपाल फेस्तने काय केलं?

१० नंतर, कैसरीयातच पौलवर खटला चालवण्यात आला. पण यहुद्यांना खूश करण्यासाठी फेस्त पौलला म्हणाला: “यरुशलेमला जाऊन या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्यासमोर तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे का?” पौलला मात्र माहीत होतं, की तो जर यरुशलेमला गेला, तर तिथे कदाचित त्याला मारून टाकलं जाईल. तसंच, त्याला हेसुद्धा माहीत होतं, की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, रोमला पोचण्यासाठी आणि तिथे प्रचाराचं काम करत राहण्यासाठी आपल्याला काय करायची गरज आहे. म्हणून तो फेस्तला म्हणाला: “मी कैसराकडे न्याय मागतो!” मग फेस्त आपल्या सल्लागारांशी बोलला आणि पौलला म्हणाला: “तू कैसराकडे न्याय मागितला आहेस, म्हणून तू कैसराकडे जाशील.” फेस्तने पौलच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयामुळे पौलचा जीव वाचला. लवकरच पौल रोमला पोचणार होता. तिथे, त्याच्या जिवावर टपलेल्या शत्रूंपासून तो खूप लांब असणार होता.—प्रे. कार्यं २५:६-१२.

११. पौलने यशयाच्या कोणत्या शब्दांवर मनन केलं असेल?

११ लवकरच पौल समुद्रप्रवास करून रोमला जायला निघणार होता. पण त्याआधी त्याने यशया संदेष्ट्याने लिहिलेल्या शब्दांवर मनन केलं असेल. यहोवाचा विरोध करणाऱ्‍या लोकांना यशया संदेष्ट्याने कडक शब्दांत असं म्हटलं होतं: “तुम्हाला काय योजना आखायची ती आखा, पण ती निष्फळ होईल! तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण तसं मुळीच घडणार नाही. कारण देव आमच्यासोबत आहे!” (यश. ८:१०) या शब्दांमुळे, देव आपल्याला मदत करेल याची पौलला आणखी खातरी पटली असेल. आणि पुढे येणाऱ्‍या संकटांचा धीराने सामना करायचं बळ त्याला मिळालं असेल.

पूर्वीसारखंच, आजसुद्धा यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी अधिकाराऱ्‍यांचा उपयोग करू शकतो (परिच्छेद १२ पाहा)

१२. यूल्य पौलशी कसा वागला, आणि त्यामुळे पौलला कशाची जाणीव झाली असेल?

१२ मग इ.स. ५८ मध्ये पौल जहाजाने रोमला जायला निघाला. कैदी असल्यामुळे त्याला यूल्य नावाच्या सैन्यातल्या अधिकाऱ्‍याच्या हवाली केलं होतं. आता पौल यूल्यच्या हातात होता. त्यामुळे यूल्य पौलशी एकतर चांगल्या प्रकारे वागू शकत होता, किंवा त्याच्याशी वाईट वागून त्याचं जगणं मुश्‍किल करू शकत होता. मग यूल्यने आपल्या अधिकाराचा वापर कसा केला? दुसऱ्‍याच दिवशी, जेव्हा त्यांचं जहाज सीदोनला पोचलं, तेव्हा “यूल्य पौलसोबत दयाळूपणे वागला.” त्याने पौलला त्याच्या मित्रांकडे जायची परवानगी दिली. पुढे यूल्यने पौलचा जीवसुद्धा वाचवला. तो कसा? प्रवासात जेव्हा त्यांचं जहाज फुटलं आणि सैनिकांनी सगळ्या कैद्यांना ठार मारायचं ठरवलं, तेव्हा यूल्यने त्यांना रोखलं. कारण त्याला “कसंही करून पौलला वाचवायचं” होतं. त्या वेळी पौलला नक्कीच याची जाणीव झाली असेल, की यहोवा या अधिकाऱ्‍याद्वारे त्याला मदत करत आहे आणि त्याचं संरक्षण करत आहे.—प्रे. कार्यं २७:१-३, ४२-४४.

परिच्छेद १३ पाहा

१३. आपल्याला मदत करण्यासाठी यहोवा अधिकाऱ्‍यांचा वापर कसा करू शकतो?

१३ आज आपल्याला कशी मदत मिळते?  एखादी गोष्ट जर यहोवाच्या उद्देशाप्रमाणे असेल, तर ती तो अधिकाऱ्‍यांकडूनसुद्धा करवून घेऊ शकतो. आणि त्यासाठी तो आपल्या पवित्र शक्‍तीचा उपयोग करतो. शलमोन राजाने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या: “राजाचं मन यहोवाच्या हातात पाटांच्या पाण्यासारखं असतं. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.” (नीति. २१:१) याचा काय अर्थ होतो? ज्याप्रमाणे, लोक पाटाचं पाणी पाहिजे त्या दिशेला वळवू शकतात, अगदी त्याचप्रमाणे यहोवासुद्धा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी पवित्र शक्‍तीचा उपयोग करून अधिकाऱ्‍यांचं मन पाहिजे तसं वळवू शकतो. आणि असं जेव्हा होतं तेव्हा अधिकारपदावर असलेले लोक असे निर्णय घेतात ज्यांमुळे यहोवाच्या लोकांना फायदाच होतो.—एज्रा ७:२१, २५, २६ पडताळून पाहा.

१४. प्रेषितांची कार्यं १२:५ या वचनाप्रमाणे आपण कोणासाठी प्रार्थना करू शकतो?

१४ आपण काय करू शकतो?  ज्या वेळी “राजे आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी” आपल्या उपासनेच्या बाबतीत काही निर्णय घेतात, त्या वेळी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. (१ तीम. २:१, २; नहे. १:११) तसंच, पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांप्रमाणेच आपण तुरुंगात असलेल्या आपल्या भाऊबहिणींसाठीही देवाला कळकळून प्रार्थना केली पाहिजे. (प्रेषितांची कार्यं १२:५ वाचा; इब्री १३:३) याशिवाय, आपण तुरुंग अधिकाऱ्‍यांसाठीसुद्धा प्रार्थना करू शकतो. यहोवाने त्यांचं मन वळवावं अशी आपण त्याच्याकडे याचना करू शकतो. म्हणजे मग, रोमी अधिकारी यूल्य याच्याप्रमाणेच तेसुद्धा तुरुंगातल्या आपल्या भाऊबहिणींशी “दयाळूपणे” वागतील.—प्रे. कार्यं २७:३ तळटीप पाहा.

भाऊबहिणींद्वारे केलेली मदत

१५-१६. यहोवाने अरिस्तार्ख आणि लूकद्वारे पौलला कशी मदत केली?

१५ पौलला कशी मदत मिळाली?  पौल जेव्हा रोमला चालला होता, तेव्हा त्या प्रवासादरम्यान यहोवाने अनेकदा ख्रिस्ती भाऊबहिणींद्वारे त्याला मदत केली. याची काही उदाहरणं आता आपण पाहू या.

१६ पौल रोमला जायला निघाला तेव्हा अरिस्तार्ख आणि लूक या दोघांनीही त्याच्यासोबत जायचं ठरवलं. * पण पौलला जसं येशूकडून आश्‍वासन मिळालं होतं, की तो रोमला सुरक्षितपणे पोचेल, तसं आश्‍वासन या दोघांना मिळाल्याचं बायबलमध्ये सांगितलेलं नाही. तरीसुद्धा ते आपला जीव धोक्यात घालून पौलसोबत जायला तयार झाले. पुढे जेव्हा समुद्रात वादळ आलं, तेव्हाच त्यांना हे समजलं की त्यांचा जीव वाचेल. त्यामुळे जेव्हा अरिस्तार्ख आणि लूक कैसरीयात जहाजात चढले, तेव्हा पौलने यहोवाला प्रार्थना केली असेल. आणि या धाडसी भावांद्वारे आपल्याला मदत केल्याबद्दल, त्याने त्याचे मनापासून आभार मानले असतील.—प्रे. कार्यं २७:१, २, २०-२५.

१७. यहोवाने भाऊबहिणींद्वारे पौलला कशी मदत केली?

१७ त्या प्रवासादरम्यान मंडळीतल्या भाऊबहिणींनी बऱ्‍याच वेळा पौलला मदत केली. उदाहरणार्थ, सीदोनला पोचल्यावर “पौलच्या मित्रांना त्याची कळजी घेता यावी,” म्हणून यूल्यने “त्याला त्यांच्याकडे जायची परवानगी दिली.” पुढे पुत्युला शहरात पोचल्यावर पौलला आणि त्याच्या सोबत्यांना बांधव भेटले आणि या बांधवांच्या आग्रहावरून त्यांनी “सात दिवस त्यांच्याकडे मुक्काम केला.” प्रवासात भेटलेल्या या भाऊबहिणींनी पौलची आणि त्याच्या सोबत्यांची चांगली काळजी घेतली. त्या वेळी, पौलनेसुद्धा त्यांना प्रोत्साहन देणारे अनेक अनुभव सांगितले असतील. आणि ते ऐकून त्या भाऊबहिणींना नक्कीच खूप आनंद झाला असेल. (प्रेषितांची कार्यं १५:२, ३ पडताळून पाहा.) अशा प्रकारे, बांधवांना भेटून मिळालेल्या प्रोत्साहनानंतर पौल आणि त्याचे सोबती पुढच्या प्रवासाला निघाले.—प्रे. कार्यं २७:३; २८:१३, १४.

यहोवाने भाऊबहिणींद्वारे पौलला मदत केली, तशीच तो आज आपल्यालाही करतो (परिच्छेद १८ पाहा)

१८. पौलने देवाचे आभार का मानले?

१८ पुढे रोमला पायी जात असताना, पौलने तीन वर्षांपूर्वी रोमच्या मंडळीला पत्रात जे लिहिलं होतं, ते कदाचित त्याला आठवलं असेल. पत्रात त्याने म्हटलं होतं: “बऱ्‍याच वर्षांपासून मी तुम्हाला भेटायला आतुर आहे.” (रोम. १५:२३) पण आपण एक कैदी म्हणून त्यांना भेटू असा त्याने कधीच विचार केला नसेल. त्यामुळे, रोममधले बांधव त्याला भेटण्यासाठी रस्त्यावर त्याची वाट पाहत आहेत, हे जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा त्याला खरंच किती बरं वाटलं असेल! बायबल म्हणतं: “त्यांना पाहताच पौलने देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला.” (प्रे. कार्यं २८:१५) पण त्या बांधवांना पाहून पौलने देवाचे आभार का मानले? कारण, पुन्हा एकदा त्याला हे जाणवलं, की यहोवाच त्या बांधवांद्वारे त्याला मदत करत आहे.

परिच्छेद १९ पाहा

१९. १ पेत्र ४:१० या वचनानुसार, गरज असलेल्यांना मदत करण्यासाठी यहोवा आपला उपयोग कसा करू शकतो?

१९ आपण काय करू शकतो?  तुमच्या मंडळीत असा एखादा भाऊ किंवा बहीण आहे का, जी आजारामुळे किंवा जवळच्या व्यक्‍तीच्या मृत्यूमुळे, किंवा मग दुसऱ्‍या एखाद्या समस्येमुळे दुःखी आहे? असेल, तर त्यांना धीर देण्यासाठी आपल्याला काय बोलता येईल किंवा काय करता येईल हे सुचवण्यासाठी आपण यहोवाला मदत मागू शकतो. आपल्या प्रेमळ शब्दांमुळे किंवा आपण केलेल्या मदतीमुळे त्यांना खरंच खूप धीर मिळू शकतो; कदाचित त्या भावाला किंवा बहिणीला त्याचीच गरज असेल. (१ पेत्र ४:१० वाचा.) * तसंच, यहोवाने जे अभिवचन दिलं आहे, की “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही,” या शब्दांवर त्यांना पुन्हा एकदा भरवसा ठेवायलाही मदत होईल. आणि हे पाहून तुम्हाला आनंद होणार नाही का?

२०. आपण पूर्ण भरवशाने असं का म्हणू शकतो, की “यहोवा मला साहाय्य करतो”?

२० पौल आणि त्याच्या सोबत्यांप्रमाणेच आपल्याही जीवनात भयंकर वादळं येऊ शकतात. पण आपल्याला घाबरायची गरज नाही, कारण यहोवा आपल्यासोबत आहे. तो आपल्याला येशू आणि स्वर्गदूतांद्वारे मदत करतो. तसंच, आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवा कधीकधी अधिकाऱ्‍यांद्वारेसुद्धा आपल्याला मदत करू शकतो. याशिवाय, तो आपल्या भाऊबहिणींद्वारेही आपल्याला मदत करतो. आणि ही गोष्ट आपल्यापैकी अनेकांनी स्वतः अनुभवली आहे. त्यामुळे पौलसारखंच आपणही पूर्ण भरवशाने असं म्हणू शकतो: “यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही. माणूस माझं काय बिघडवू शकतो?”—इब्री १३:६.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

^ परि. 5 यहोवाने प्रेषित पौलला कोणत्या तीन मार्गांनी मोठमोठ्या समस्यांचा सामना करायला मदत केली, याची चर्चा या लेखात केली जाईल. त्यांवर मनन केल्यामुळे आपला हा भरवसा वाढेल, की समस्यांचा सामना करण्यासाठी आज यहोवा आपल्यालाही नक्कीच मदत करेल.

^ परि. 16 अरिस्तार्ख आणि लूक हे काही पहिल्यांदाच पौलसोबत प्रवास करत होते असं नाही. रोमचा हा प्रवास सुरू करण्याआधीसुद्धा त्यांनी पौलसोबत प्रवास केला होता. आणि पौल जेव्हा रोममध्ये कैदेत होता, तेव्हाही त्याचे हे विश्‍वासू मित्र त्याच्यासोबत होते.—प्रे. कार्यं १६:१०-१२; २०:४; कलस्सै. ४:१०, १४.