व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४७

तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत राहाल का?

तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत राहाल का?

“बांधवांनो, शेवटी इतकंच सांगतो, की नेहमी आनंदी राहा, स्वतःमध्ये सुधारणा करत राहा.”—२ करिंथ. १३:११.

गीत ३२ निर्भय व निश्‍चयी राहा!

सारांश *

१. मत्तय ७:१३, १४ या वचनांप्रमाणे कोणत्या अर्थाने आपण प्रवास करत आहोत?

आपण सगळेच एका अर्थाने प्रवास करत आहोत. आणि शेवटी, आपल्या सगळ्यांना नवीन जगात पोचायचं आहे. ते असं जग असेल जिथे यहोवा प्रेमाने आपल्यावर राज्य करेल. म्हणून जीवनाकडे जाणाऱ्‍या या रस्त्यावर चालत राहण्यासाठी आपण दररोज प्रयत्न करतो. पण येशूने म्हटलं, की हा रस्ता छोटा आहे. त्यामुळे त्यावर चालत राहणं काही वेळा कठीण जाऊ शकतं. (मत्तय ७:१३, १४ वाचा.) तसंच, आपण अपरिपूर्णही आहोत. त्यामुळे या मार्गावरून सहज आपली पावलं भरकटू शकतात.—गलती. ६:१.

२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत? (“ जीवनाकडे जाणाऱ्‍या छोट्या रस्त्यावर चालत राहण्यासाठी नम्रता आपल्याला मदत करते,” ही चौकटसुद्धा पाहा.)

जीवनाकडे जाणाऱ्‍या या छोट्या रस्त्यावर चालत राहायचं असेल, तर आपण आपल्या विचारांमध्ये, वृत्तीमध्ये आणि वागण्यामध्ये सुधारणा करायला तयार असलं पाहिजे. प्रेषित पौलने करिंथमध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना “स्वतःमध्ये सुधारणा” करत राहायचा सल्ला दिला होता. (२ करिंथ. १३:११) तो सल्ला आज आपल्यालाही लागू होतो. त्यामुळे, या लेखात आपण यावर चर्चा करणार आहोत, की स्वतःमध्ये सुधारणा करायला बायबल आणि प्रौढ भाऊबहीण आपल्याला कशी मदत करू शकतात. तसंच, यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या सूचनांचं पालन करणं कधीकधी आपल्याला कठीण का जाऊ शकतं. शेवटी आपण हे पाहू, की स्वतःमध्ये बदल करून आनंदाने यहोवाची सेवा करत राहायला नम्रता आपल्याला कशी मदत करू शकते.

बायबल वाचा आणि स्वतःमध्ये सुधारणा करा

३. देवाचं वचन आपल्याला कशी मदत करतं?

स्वतःच्या विचारांचं आणि भावनांचं परीक्षण करणं सोपं नसतं. कारण आपलं हृदय धोका देणारं आहे. ते आपल्याला कोणत्या मार्गावर नेईल, हे आपण सांगू शकत नाही. (यिर्म. १७:९) आणि आपण खोटे तर्क करून सहज स्वतःची फसवणूक करू शकतो. (याको. १:२२) म्हणून स्वतःचं परीक्षण करण्यासाठी आपण देवाचं वचन वाचलं पाहिजे. ते आपल्याला आपल्या “हृदयातले विचार आणि हेतू” समजून घ्यायला मदत करतं. (इब्री ४:१२, १३) ज्याप्रमाणे एक एक्स-रे मशीन शरीराचे आतले भाग पाहायला मदत करते, त्याचप्रमाणे देवाचं वचन आपण आतून कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत, हे पाहायला आपल्याला मदत करतं. आणि स्वतःमध्ये सुधारणा करायला सल्ले देतं. पण आपल्याला जर बायबलमधून किंवा जबाबदार बांधवांकडून मिळणाऱ्‍या सल्ल्याचा फायदा घ्यायचा असेल तर आपण नम्र असलं पाहिजे.

४. शौल राजा गर्विष्ठ बनला असं का म्हणता येईल?

आपल्यात जर नम्रतेचा गुण नसेल तर काय होऊ शकतं, हे शौल राजाच्या उदाहरणातून दिसून येतं. तो इतका गर्विष्ठ झाला होता, की आपल्याला आपल्या विचारात आणि वागण्यात बदल करायची गरज आहे, ही गोष्ट तो मनातल्या मनातही मान्य करायला तयार नव्हता. (स्तो. ३६:१, २; हब. २:४) हे कशावरून दिसून येतं? अमालेकी लोकांना हरवल्यानंतर काय करायचं याबद्दल यहोवाने शौलला एक स्पष्ट सूचना दिली होती. पण शौलने यहोवाचं ऐकलं नाही. याबद्दल शमुवेल संदेष्ट्याने त्याला विचारलं तेव्हा त्याने आपली चूक मान्य केली नाही. उलट, आपण असं का केलं याची त्याने कारणं दिली. आणि आपण काही मोठी चूक केलेली नाही हे दाखवायचा आणि इतरांना दोषी ठरवायचा त्याने प्रयत्न केला. (१ शमु. १५:१३-२४) याआधीसुद्धा शौलने अशीच वृत्ती दाखवली होती. (१ शमु. १३:१०-१४) तो इतका गर्विष्ठ बनला की तो आपली विचारसरणी बदलायला तयार नव्हता. त्यामुळे यहोवाने त्याला ताडन दिलं आणि नाकारलं.

५. शौलकडून आपण कोणता धडा शिकू शकतो?

आपल्याला नक्कीच शौलसारखं व्हायचं नाही. त्यामुळे आपण स्वतःला असे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘बायबलमधला हा सल्ला मला लागू होत नाही असाच मी सहसा विचार करतो का? मी जे काही करतोय ते इतकं चुकीचं नाहीए असं मला वाटतं का? माझ्या चुकांसाठी मी दुसऱ्‍यांना दोषी ठरवतो का?’ यांपैकी एकाही प्रश्‍नाचं उत्तर ‘हो’ असेल, तर आपण आपल्या विचारसरणीत आणि वृत्तीत बदल केला पाहिजे. नाहीतर आपण इतके गर्विष्ठ होऊ की यहोवा आपल्याला नाकारेल, आणि त्याच्यासोबतची आपली मैत्री तुटेल.—याको. ४:६.

६. शौल राजापेक्षा दावीद राजा वेगळा कसा होता?

शौलनंतर दावीद राजा बनला. पण त्या दोघांमध्ये खूप फरक होता. “यहोवाच्या नियमशास्त्रावर” दावीदचं मनापासून प्रेम होतं. (स्तो. १:१-३) यहोवा गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांना वाचवतो हे दावीदला माहीत होतं. (२ शमु. २२:२८) त्यामुळे त्याने देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे आपल्या विचारसरणीत बदल केला. त्याने म्हटलं: “मी यहोवाची स्तुती करीन, कारण त्याने मला सल्ला दिलाय. रात्रीच्या वेळीही माझ्या मनातले खोल विचार मला मार्गदर्शन करतात.”—स्तो. १६:७.

देवाचं वचन

आपली पावलं भरकटू लागली तर देवाचं वचन आपल्याला सावध करतं. आपण जर नम्र असलो तर देवाच्या वचनाप्रमाणे आपण लगेच आपली चुकीची विचारसरणी बदलू (परिच्छेद ७ पाहा)

७. आपण नम्र का असलं पाहिजे?

आपले विचार जर चुकीचे असतील तर वाईट कामं करायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आपण नम्र असलं पाहिजे आणि देवाचं वचन वाचून त्याप्रमाणे आपली चुकीची विचारसरणी लगेच बदलली पाहिजे. देवाचं वचन जसं काय आपल्याला आवाज देऊन म्हणतं: “योग्य मार्ग हा आहे. यावर चाला.” या मार्गावरून आपली पावलं उजवीकडे किंवा डावीकडे भरकटू लागली, तर देवाचं वचन लगेच आपल्याला सावध करतं. (यश. ३०:२१) आणि यहोवा बायबलद्वारे जे काही सांगतो, ते जर आपण ऐकलं तर आपलं भलंच होईल. (यश. ४८:१७) जसं की, दुसऱ्‍याला आपली चूक सुधारावी लागेल आणि आपल्याला लाज वाटेल, अशी वेळ आपण स्वतःवर येऊ देणार नाही. आणि यहोवा आपल्याला त्याची मुलं समजून प्रेमाने आपल्याला सुधारतो, या जाणीवेमुळे त्याच्यासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होईल.—इब्री १२:७.

८. याकोब १:२२-२५ यात सांगितल्याप्रमाणे देवाचं वचन एका आरशासारखं कसं आहे?

देवाचं वचन एका आरशासारखं आहे. (याकोब १:२२-२५ वाचा.) दररोज सकाळी घराबाहेर पडण्याआधी आपण सगळेच आरशात आपला चेहरा पाहतो. आपल्या चेहऱ्‍याला काही लागलं तर नाही ना, केस विसकटले तर नाहीत ना, हे आपण पाहतो. अगदी तसंच, आपण रोज बायबल वाचतो तेव्हा आपल्या विचारसरणीत आणि वृत्तीत कुठे काही बदल करायची गरज आहे का, ते आपल्या लक्षात येतं. बरेच भाऊबहीण दररोज घराबाहेर पडण्याआधी सकाळीच दैनिक वचन वाचतात. आणि त्यातून मिळालेल्या सल्ल्यावर विचार करतात. मग दिवसभरात वेगवेगळ्या मार्गांनी ते तो सल्ला लागू करायचा प्रयत्न करतात. आपणही तसंच करायचा प्रयत्न करू शकतो. याशिवाय, आपण दररोज देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यावर मनन केलं पाहिजे. ही गोष्ट साधी वाटत असल्यामुळे कदाचित काहींचं त्याकडे दुर्लक्ष होईल. पण हे करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे जीवनाकडे जाणाऱ्‍या छोट्या रस्त्यावर चालत राहायला आपल्याला मदत होईल.

प्रौढ भाऊबहिणींचं ऐका

प्रौढ भाऊबहीण

एखाद्या प्रौढ भावाने किंवा बहिणीने धैर्य एकवटून प्रेमाने आपली चूक आपल्या लक्षात आणून दिली, तर आपण त्यांचे मनापासून आभार मानू का? (परिच्छेद ९ पाहा)

९. एखाद्या भावाला किंवा बहिणीला तुम्हाला सल्ला का द्यावा लागू शकतो?

तुमच्या बाबतीत कधीतरी असं घडलं असेल की जीवनाकडे जाणाऱ्‍या मार्गावरून तुमची पावलं भरकटू लागली. (स्तो. ७३:२, ३) पण त्याच वेळी एखाद्या प्रौढ भावाने किंवा बहिणीने धैर्य एकवटून तुम्हाला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला असेल. त्या वेळी तुम्ही त्यांचं ऐकलं का? त्यांनी दिलेला सल्ला तुम्ही लागू केला का? असेल, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. त्यांनी वेळीच तुम्हाला सावरलं याबद्दल तुम्ही मनापासून त्यांचे आभारी असाल यात शंका नाही.—नीति. १:५.

१०. एखाद्या भावाने किंवा बहिणीने जर तुम्हाला सल्ला दिला तर तुम्ही काय करू नये?

१० बायबल म्हणतं: “मित्राने केलेले घाव विश्‍वासू असतात.” (नीति. २७:६) याचा काय अर्थ होतो? हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. कल्पना करा, की गाड्यांची सतत ये-जा चालू असलेला रस्ता ओलांडण्यासाठी तुम्ही थांबला आहात. पण अचानक तुमच्या मोबाईलमुळे तुमचं लक्ष भरकटतं. आणि वर न पाहताच तुम्ही रस्ता ओलांडू लागता. इतक्यात तुमचा मित्र तुमचा हात धरून तुम्हाला मागे खेचतो. तो तुम्हाला इतक्या जोरात ओढतो की तुमच्या हाताला हिसका बसतो. पण त्याने वेळीच केलेल्या मदतीमुळे अपघात टळतो. हाताला हिसका बसल्यामुळे कदाचित बरेच दिवस तुमचा हात दुखत असेल. पण त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रावर रागवाल का? मुळीच नाही! उलट, वेळीच मदत केल्यामुळे तुम्ही त्याचे आभार मानाल. अगदी त्याचप्रमाणे, एखाद्या भावाने किंवा बहिणीने जर तुम्हाला सांगितलं, की तुमचं वागणं किंवा बोलणं यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे नाही, तर सुरुवातीला कदाचित तुम्हाला वाईट वाटेल. पण त्यांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्यांच्यावर रागावू नका. कारण असं करणं मूर्खपणाचं ठरेल. (उप. ७:९) उलट, त्या भावाने किंवा बहिणीने ही गोष्ट तुम्हाला सांगायचं धैर्य केलं, याबद्दल त्यांचे आभार माना.

११. चांगला सल्ला स्वीकारणं एखाद्याला कठीण का जाऊ शकतं?

११ एखाद्या भावाने किंवा बहिणीने प्रेमळपणे दिलेला सल्ला स्वीकारणं एखाद्याला कठीण का वाटू शकतं? गर्वामुळे. कारण गर्विष्ठ लोकांना सहसा अशाच गोष्टी ऐकायला आवडतात, ज्या त्यांना ऐकायच्या असतात. आणि म्हणून जे खरं आहे त्याकडे ते पाठ फिरवतात. (२ तीम. ४:३, ४) आपल्याला कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही असं त्यांना वाटतं. कारण आपण कोणीतरी खास आहोत आणि इतरांपेक्षा बुद्धिमान आहोत, अशी त्यांची समजूत असते. पण प्रेषित पौलने म्हटलं: “काहीही नसताना जर आपण काहीतरी आहोत असा कोणी विचार करत असेल, तर तो स्वतःलाच फसवत आहे.” (गलती. ६:३) तसंच, शलमोन राजानेही ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजावली. तो म्हणाला: “सल्ला न मानणाऱ्‍या वृद्ध आणि मूर्ख राजापेक्षा, गरीब आणि बुद्धिमान तरुण चांगला!”—उप. ४:१३.

१२. गलतीकर २:११-१४ या वचनांप्रमाणे चूक सुधारल्यावर पेत्रने जी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपण काय शिकतो?

१२ सल्ला स्वीकारण्याच्या बाबतीत पेत्रने एक चांगलं उदाहरण मांडलं. एकदा पौलने सगळ्यांसमोर त्याची चूक सुधारली आणि त्याला कडक शब्दांत सल्ला दिला. (गलतीकर २:११-१४ वाचा.) पौलने ज्या पद्धतीने आणि ज्या ठिकाणी पेत्रला सल्ला दिला, त्या गोष्टीचा तो राग मानू शकला असता. पण पेत्र समजूतदारपणे वागला. त्याने पौलचा सल्ला स्वीकारला आणि त्याच्याबद्दल त्याने मनात राग बाळगला नाही. उलट, नंतर त्याने त्याला आपला “प्रिय बांधव” असं म्हटलं.—२ पेत्र ३:१५.

१३. एखाद्याला सल्ला देण्याआधी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

१३ तुम्हाला कधी कोणाला सल्ला द्यायची गरज वाटली, तर कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत? त्या भावाशी किंवा बहिणीशी बोलण्याआधी स्वतःला विचारा: ‘मी स्वतःला “खूप जास्त नीतिमान” समजतोय का?’ (उप. ७:१६) स्वतःला नीतिमान समजणारी व्यक्‍ती इतरांना यहोवाच्या स्तरांप्रमाणे नाही, तर स्वतःच्या स्तरांप्रमाणे चुकीचं ठरवत असते. आणि ती इतरांशी सहसा दयाळूपणे वागत नाही. त्यामुळे स्वतःचं परीक्षण केल्यानंतरही तुम्हाला जर असं वाटलं की त्यांना सल्ला द्यायची गरज आहे, तर त्यांचं नेमकं कुठे चुकत आहे ते त्यांना सांगा. आणि असे प्रश्‍न विचारा ज्यांवरून त्यांना समजेल की त्यांनी जे केलं ते खरंच चुकीचं आहे. तसंच, तुम्ही जो काही सल्ला द्याल तो बायबलवर आधारित असला पाहिजे. त्यामुळे ते जे काही करत आहेत त्याबद्दल यहोवाला कसं वाटतं ते त्यांना समजेल. कारण शेवटी त्यांना यहोवाला हिशोब द्यायचा आहे, तुम्हाला नाही. (रोम. १४:१०) याशिवाय, त्यांना सल्ला देताना स्वतःच्या बुद्धीवर नाही तर देवाच्या वचनातून मिळणाऱ्‍या बुद्धीवर अवलंबून राहा. आणि येशूप्रमाणे त्यांच्याशी दयाळूपणे वागा. (नीति. ३:५; मत्त. १२:२०) कारण आपण इतरांशी जसं वागतो, तसंच यहोवासुद्धा आपल्याशी वागेल.—याको. २:१३.

यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या सूचनांचं पालन करा

देवाची संघटना

देवाची संघटना व्हिडिओद्वारे, प्रकाशनांद्वारे आणि सभांद्वारे त्याच्या वचनातला सल्ला लागू करायला आपल्याला मदत करते. काही वेळा, नियमन मंडळ संघटनेच्या काम करण्याच्या पद्धतीत फेरबदल करतं (परिच्छेद १४ पाहा)

१४. आज यहोवा आपल्याला कशा प्रकारे शिकवतो?

१४ जीवनाकडे जाणाऱ्‍या मार्गावर चालत राहण्यासाठी आज यहोवा त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला वेळोवेळी सूचना आणि मार्गदर्शन देतो. तो हे मार्गदर्शन व्हिडिओद्वारे, प्रकाशनांद्वारे आणि सभांद्वारे देतो. या मार्गांनी पुरवलेली माहिती भरवशालायक आहे, कारण ती देवाच्या वचनावर आधारित असते. प्रचाराचं काम चांगल्या प्रकारे कसं पूर्ण करता येईल या बाबतीत कोणतेही निर्णय घेताना नियमन मंडळ पवित्र शक्‍तीवर विसंबून राहतं. असं असलं, तरी आपण घेतलेल्या निर्णयांमध्ये काही बदल करायची गरज आहे का, हे नियमन मंडळ वेळोवेळी पाहतं. “कारण या जगाचं दृश्‍य बदलत आहे.” आणि त्यामुळे देवाच्या संघटनेला नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं.—१ करिंथ. ७:३१.

१५. काही प्रचारकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला आहे?

१५ बायबलच्या एखाद्या शिकवणीबद्दल देवाची संघटना काही नवीन स्पष्टीकरण देते किंवा नैतिक स्तरांबद्दल काही मार्गदर्शन देते, तेव्हा आपण ते लगेच स्वीकारतो आणि लागू करतो. पण इतर गोष्टींच्या बाबतीत संघटना काही बदल करते आणि त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो, तेव्हा काय? उदाहरणार्थ अलीकडे, राज्य सभागृहं बांधायचा आणि दुरुस्त करायचा खर्च बराच वाढला आहे. म्हणून नियमन मंडळाने अशी सूचना दिली, की जास्तीत जास्त मंडळ्यांनी एकच सभागृह वापरावं. यासाठी काही मंडळ्यांना एकत्र करण्यात आलं आणि काही सभागृहं विकण्यात आली. त्यातून मिळालेल्या पैशाचा उपयोग जास्त गरज असलेल्या ठिकाणी सभागृहं बांधण्यासाठी केला जात आहे. तुम्ही जर अशा ठिकाणी राहत असाल जिथली राज्य सभागृहं विकली जात आहेत आणि मंडळ्यांना एकत्र केलं जात आहे, तर नवीन परिस्थितीशी जुळवून घेणं तुम्हाला कदाचित कठीण जात असेल. काही प्रचारकांना आता सभांसाठी जास्त प्रवास करावा लागत असेल. तर काहींना असा प्रश्‍न पडत असेल, की हे सभागृह का विकलं जात आहे. कारण ते बांधायला किंवा दुरुस्त करायला त्यांनी खूप मेहनत घेतली होती. आपला वेळ आणि मेहनत वाया गेली असं त्यांना कदाचित वाटत असेल. पण तरी त्यांनी ही नवीन व्यवस्था स्वीकारली आहे. आणि यासाठी आपण त्यांची प्रशंसाच केली पाहिजे.

१६. कलस्सैकर ३:२३, २४ या वचनांमधला सल्ला लागू केल्यामुळे आनंद टिकवून ठेवायला आपल्याला कशी मदत होईल?

१६ आपण यहोवासाठी काम करतो आणि यहोवा त्याची संघटना चालवतो ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली, तर आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो. (कलस्सैकर ३:२३, २४ वाचा.) मंदिराच्या बांधकामासाठी दान देण्याच्या बाबतीत दावीद राजाने एक चांगलं उदाहरण मांडलं. त्याने म्हटलं: “तुला स्वखुशीने दान देणारा मी कोण? आणि माझे लोक तरी काय? कारण, आम्हाला सगळं काही तुझ्याकडूनच मिळालंय. आणि जे काही आम्ही तुला दिलंय, ते तूच आम्हाला दिलं आहेस.” (१ इति. २९:१४) आपणसुद्धा जेव्हा अनुदान देतो तेव्हा खरंतर यहोवाने आपल्याला जे दिलं आहे तेच त्याला देत असतो. असं असलं, तरी यहोवासाठी आपण जो वेळ, शक्‍ती आणि पैसा खर्च करतो, त्याची तो मनापासून कदर करतो.—२ करिंथ. ९:७.

जीवनाकडे जाणाऱ्‍या छोट्या रस्त्यावर चालत राहा

१७. आपल्याला स्वतःमध्ये काही सुधारणा किंवा बदल करावा लागला तर आपण निराश का होऊ नये?

१७ जीवनाकडे जाणाऱ्‍या छोट्या रस्त्यावर चालत राहण्यासाठी आपण येशूचं जवळून अनुकरण केलं पाहिजे. (१ पेत्र २:२१) त्या मार्गावरून चालताना काही सुधारणा कराव्या लागल्या तर निराश होऊ नका. कारण स्वतःमध्ये काही सुधारणा करायची गरज आहे याची जर तुम्हाला जाणीव होत असेल, तर ती एक चांगलीच गोष्ट आहे. त्यावरून दिसून येईल, की यहोवाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचं आणि सूचनांचं पालन करायची तुमची मनापासून इच्छा आहे. शिवाय, हे कधीही विसरू नका की आपण अपरिपूर्ण आहोत हे यहोवाला माहीत आहे. त्यामुळे आपण येशूचं जसंच्या तसं अनुकरण करावं अशी अपेक्षा तो आपल्याकडून करत नाही.

१८. नवीन जगात पोचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१८ तर मग भाऊबहिणींनो, आपण आपलं सगळं लक्ष सर्वकाळाच्या जीवनावर ठेवू या. आणि त्यासाठी आपल्या विचारसरणीत, वृत्तीत आणि वागण्यात बदल करायला तयार असू या. (नीति. ४:२५; लूक ९:६२) तसंच, आपण नेहमी नम्र आणि आनंदी राहू या. आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहू या. (२ करिंथ. १३:११) मग “प्रेमाचा आणि शांतीचा देव [आपल्यासोबत] राहील.” आणि नवीन जगात पोचण्याचा आपला प्रवास आपण आनंदाने पूर्ण करू!

गीत २९ खरेपणाने चालणे

^ परि. 5 आपल्यापैकी काहींना स्वतःची विचारसरणी, वृत्ती आणि वागणं बदलणं कठीण वाटू शकतं. पण आपल्या सगळ्यांनाच स्वतःमध्ये सुधारणा करायची गरज का आहे, आणि आपण त्या आनंदाने कशा करू शकतो, याची चर्चा या लेखात केली जाईल.

^ परि. 76 चित्राचं वर्णन: चुकीचा निर्णय घेतल्यामुळे आपल्यासोबत काय घडलं हे एक तरुण भाऊ सांगत असताना, दुसरा भाऊ शांतपणे त्याचं ऐकतो आणि त्याला काही सल्ला द्यायची गरज आहे का, याचा विचार करतो.