व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ओनेसिम आणि जेरालडिन

मायदेशात परत आलेल्यांना यहोवा भरपूर आशीर्वाद देतो

मायदेशात परत आलेल्यांना यहोवा भरपूर आशीर्वाद देतो

मागच्या काही दशकांमध्ये आपले काही भाऊबहीण जास्त पैसे कमावण्यासाठी दुसऱ्‍या देशात गेले होते. पण त्यांपैकी अनेक जण आपल्या मायदेशात परत आले. यहोवावर आणि लोकांवर प्रेम असल्यामुळे आपल्याच देशात प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी ते सेवा करत आहेत. (मत्त. २२:३७-३९) यासाठी त्यांना कोणते त्याग करावे लागले? आणि त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले? हे जाणून घेण्यासाठी पश्‍चिम आफ्रिकेतल्या कॅमेरून देशातले काही अनुभव आपण पाहू या.

“‘मासे धरण्यासाठी’ मी योग्य ठिकाणी आहे”

कॅमेरूनमध्ये राहणारा ओनेसिम नावाचा बांधव १९९८ मध्ये दुसऱ्‍या देशात राहायला गेला होता. तिथे तो १४ वर्षं राहिला. एकदा सभेत त्याने प्रचारकार्याबद्दल एक उदाहरण ऐकलं. वक्त्याने असं उदाहरण दिलं: “कल्पना करा, की दोन मित्र वेगवेगळ्या ठिकाणी मासे पकडत आहेत. एका मित्राला भरपूर मासे मिळतात, तर दुसऱ्‍याला फार कमी. अशा वेळी हा दुसरा मित्र जिथे जास्त मासे मिळतात तिथे जाणार नाही का?”

या उदाहरणाचा ओनेसिमवर इतका प्रभाव पडला, की कॅमेरूनमधल्या आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी त्याने आपल्या मायदेशात परत जायचा विचार केला. कारण तिथे बऱ्‍याच लोकांना बायबल अभ्यास करायची इच्छा होती. पण त्याला काही गोष्टींची भीती वाटत होती. जसं की, ‘इतकी वर्षं परदेशात राहिल्यानंतर आपल्याला कॅमेरूनमधल्या राहणीमानाशी जुळवून घेता येईल का?’ म्हणून आधी तो सहा महिन्यांसाठी कॅमेरूनमध्ये राहायला आला. मग २०१२ मध्ये तो नेहमीसाठी परत आला.

ओनेसिम म्हणतो: “मला इथल्या उष्ण हवामानाशी आणि राहणीमानाशी जळवून घ्यावं लागलं. तसंच, मला पुन्हा सभागृहात लाकडी बाकांवर बसायची सवय लावून घ्यावी लागली. पण सभांवर लक्ष लावल्यामुळे,” पुढे तो हसून म्हणतो, “आधीच्या मंडळीत ज्या आरामदायी खुर्च्या होत्या त्यांचा मला विसर पडायला लागला.”

२०१३ मध्ये ओनेसिमने जेरालडिन नावाच्या बहिणीशी लग्न केलं. नऊ वर्षं फ्रान्समध्ये राहिल्यानंतर तीसुद्धा आपल्या मायदेशात कॅमेरूनमध्ये परत आली होती. या जोडप्याने आपल्या जीवनात यहोवाच्या सेवेला महत्त्वाचं स्थान दिल्यामुळे यहोवाने त्यांना कोणते आशीर्वाद दिले? ओनेसिम म्हणतो: “आम्ही दोघंही सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला उपस्थित राहू शकलो आणि बेथेलमध्ये सेवा करू शकलो. गेल्या एका वर्षात आमच्या मंडळीतल्या २० बायबल विद्यार्थ्यांनी बाप्तिस्मा घेतला. आता मला वाटतं, की ‘मासे धरण्यासाठी’ मी योग्य ठिकाणी आहे.” (मार्क १:१७, १८) जेरालडिन म्हणते: “मी कल्पनाही केली नव्हती इतके आशीर्वाद मला मिळाले आहेत!”

आध्यात्मिक मुलं मिळाल्याचा आनंद

जुडीथ आणि सॅमकॅस्टल

जुडीथ नावाची बहीण अमेरिकेला राहायला गेली होती. पण तिला तिची सेवा वाढवायची खूप इच्छा होती. ती म्हणते: “मी अधूनमधून माझ्या कुटुंबाला भेटायला कॅमेरूनला जायचे. पण दर वेळी तिथून निघताना मला खूप रडायला यायचं. कारण तिथे मी ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करायचे अशा बऱ्‍याच लोकांना मला सोडून यावं लागायचं.” पण कॅमेरूनला नेहमीसाठी यायला जुडीथ कचरायची. कारण तिला अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी होती. आणि यामुळे कॅमेरूनमध्ये असलेल्या आपल्या वडिलांच्या आजाराचा खर्च ती भागवू शकत होती. असं असलं, तरी तिने यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवून नेहमीसाठी कॅमेरूनला परत यायचा निर्णय घेतला. ती मान्य करते, की अमेरिकेत जे सुखसोयींचं जीवन होतं, त्याची तिला खूप आठवण यायची. पण इकडच्या परिस्थितीशी जुळवून घेता यावं म्हणून तिने मदतीसाठी यहोवाकडे प्रार्थना केली. याशिवाय, विभागीय पर्यवेक्षकांनी आणि त्यांच्या पत्नीनेही तिला इथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला प्रोत्साहन दिलं आणि मदत केली.

कॅमेरूनमध्ये आल्यानंतर जुडीथ म्हणते: “तीन वर्षांतच मला चार आध्यात्मिक मुलं मिळाल्याचा आनंद झाला.” तिने त्यांना यहोवाला आपलं जीवन समर्पित करायला मदत केली. जुडीथने खास पायनियर म्हणून सेवा सुरू केली. आणि आज ती आपले पती, सॅमकॅस्टल यांच्यासोबत विभागीय कार्यात सेवा करत आहे. पण जुडीथच्या वडिलांचं काय झालं? त्यांना दुसऱ्‍या देशात असं एक हॉस्पिटल मिळालं जे त्यांच्या ऑपरेशनचा खर्च उचलायला तयार होतं. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे, त्यांचं ऑपरेशनसुद्धा व्यवस्थित झालं.

यहोवाची मदत त्यांनी अनुभवली

कॅरोलीन आणि व्हिक्टर

व्हिक्टर नावाचा बांधव कॅनडामध्ये राहायला गेला. तिथे तो उच्च शिक्षण घेऊ लागला. नंतर उच्च शिक्षणाबद्दल टेहळणी बुरूज  मधला एक लेख वाचल्यावर त्याने विचार केला आणि आपलं उच्च शिक्षण सोडून दिलं. त्याऐवजी त्याने एक छोटा कोर्स केला. तो म्हणतो: “यामुळे मला लवकरच एक नोकरी मिळाली. आणि मी पायनियरिंगही सुरू करू शकलो. याची मी खूप आतूरतेने वाट पाहत होतो.” नंतर व्हिक्टरचं लग्न कॅरोलीन नावाच्या मुलीशी झालं. लग्नानंतर, ते दोघं कॅमेरूनला भेट द्यायला गेले आणि त्या वेळी त्यांनी तिथल्या बेथेललाही भेट दिली. तिथल्या बांधवांनी त्यांना विचारलं, की ते कॅमेरूनमध्ये परत येऊन सेवा करू शकतात का? व्हिक्टर म्हणतो: “आमच्याकडे ‘नाही’ म्हणायचं एकही कारण नव्हतं. आम्ही आमचं जीवन खूप साधं ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही कॅमेरूनला यायला तयार झालो.” कॅरोलीनची तब्येत इतकी काही बरी नसायची. पण तरीही त्यांनी कॅमेरूनला यायचा निर्णय घेतला.

बायबलमध्ये आवड दाखवणाऱ्‍या लोकांना मदत करण्यासाठी व्हिक्टर आणि कॅरोलीन, नियमित पायनियर म्हणून सेवा करू लागले. सुरुवातीला त्यांना काम करायची गरज पडली नाही, कारण त्यांनी थोडेफार पैसे जमवले होते. पण नंतर काही महिने काम करण्यासाठी ते कॅनडाला परत गेले. यामुळे त्यांना कॅमेरूनमध्ये परत येऊन पायनियरिंग सुरू ठेवता आली. त्यांच्या या त्यागामुळे त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले? ते सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेत उपस्थित राहू शकले, खास पायनियर म्हणून सेवा करू शकले आणि आज ते बांधकाम प्रकल्पांवर काम करत आहेत. व्हिक्टर म्हणतो: “आरामदायी जीवनाचा त्याग केल्यामुळे आम्हाला यहोवावर विसंबून राहावं लागलं आणि त्यामुळे यहोवाची मदत आम्ही अनुभवू शकलो.”

यहोवाला जीवन समर्पित करायला लोकांना मदत केल्यामुळे मिळालेला आनंद

स्टॅफनी आणि ॲलन

२००२ मध्ये ॲलन या बांधवाने, नौजवानोआप अपनी ज़िंदगी का क्या करेंगे?  ही पत्रिका वाचली. तेव्हा तो जर्मनीतल्या एका विद्यापीठात शिकत होता. या पत्रिकेत दिलेल्या माहितीमुळे ॲलनला आपल्या जीवनात काही ध्येयं ठेवायला प्रोत्साहन मिळालं. मग २००६ मध्ये तो सेवा प्रशिक्षण प्रशालेला उपस्थित राहिला. तेव्हा त्याला कॅमेरूनमध्ये, म्हणजे जिथे त्याचा जन्म झाला होता, तिथेच सेवा करायला पाठवण्यात आलं.

कॅमेरूनमध्ये ॲलनला एक पार्ट-टाईम नोकरी मिळाली. पुढे त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. पण आधी आपण सेवाकार्यासाठी जितका वेळ द्यायचो तितका वेळ आता आपल्याला देता येणार नाही, याची त्याला काळजी वाटायची. त्यामुळे जेव्हा त्याला खास पायनियर म्हणून सेवा करायची संधी मिळाली, तेव्हा त्याने मागे-पुढे न पाहता ती स्वीकारली. त्याने नोकरी सोडून जाऊ नये, म्हणून त्याच्या बॉसने पगार वाढवून देतो, असं त्याला सांगितलं. ॲलन मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिला. पुढे ॲलनने स्टॅफनी नावाच्या बहिणीशी लग्न केलं. तीसुद्धा अनेक वर्षं फ्रान्समध्ये राहिली होती. कॅमेरूनमध्ये परत आल्यानंतर तिला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?

स्टॅफनी म्हणते: “इथे आल्यानंतर मला आरोग्याच्या अनेक छोट्या-मोठ्या समस्या निर्माण झाल्या. त्यासोबतच मला काही ॲलर्जीही सुरू झाल्या. पण नियमितपणे उपचार घेतल्यामुळे मला आता बरं वाटतं.” या जोडप्याने दाखवलेल्या धीरामुळे यहोवाने त्यांना बरेच आशीर्वाद दिले. ॲलन म्हणतो: “जेव्हा आम्ही केट नावाच्या एका लांबच्या गावात प्रचार करायला गेलो, तेव्हा आम्हाला असे अनेक लोक भेटले ज्यांना बायबल अभ्यास करायची इच्छा होती. पुढे आम्ही त्यांच्यासोबत फोनवर बायबल अभ्यास करू लागलो. यांच्यापैकी दोन जणांनी बाप्तिस्मा घेतला आणि तिथे प्रचारकांचा एक गट तयार झाला.” स्टॅफनी म्हणते: “यहोवाला आपलं जीवन समर्पित करायला लोकांना मदत केल्यामुळे जो आनंद मिळतो, त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. इथे सेवा केल्यामुळे अशा प्रकारचा आनंद आम्ही अनेकदा अनुभवलाय.” आज ॲलन आणि स्टॅफनी विभागीय कार्यात सेवा करत आहेत.

“आम्ही जो निर्णय घेतला तो योग्यच होता”

लिऑन्स आणि झॅजेल

झॅजेल नावाची बहीण जेव्हा इटलीमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत होती, तेव्हा तिचा बाप्तिस्मा झाला. जे पायनियर जोडपं तिच्यासोबत बायबल अभ्यास करत होतं, त्यांचं साधं राहणीमान तिला खूप आवडलं. आणि तिलाही त्यांच्यासारखंच आपलं सेवाकार्य वाढवायचं होतं. त्यामुळे शिक्षण चालू असतानाच तिने पायनियर सेवा सुरू केली.

झॅजेलला कॅमेरूनमध्ये जाऊन आपली सेवा आणखी वाढवायची होती. पण तिला काही गोष्टींची काळजी होती. ती म्हणते: “कॅमेरूनला जाण्यासाठी मला इटलीचं नागरिकत्व कायमचं गमवावं लागणार होतं. याशिवाय, इटलीमध्ये जे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक होते, त्यांच्यापासूनही मला दूर जावं लागणार होतं.” असं असतानाही, मे २०१६ मध्ये झॅजेल कायमसाठी कॅमेरूनला आली. इथे आल्यानंतर काही काळाने, लिऑन्स नावाच्या भावाशी तिचं लग्न झालं. या जोडप्याला कॅमेरूनच्या शाखाकार्यालयाने प्रचारकांची जास्त गरज असलेल्या, आयोस नावाच्या एका छोट्याशा शहरात जाऊन सेवा करायचं प्रोत्साहन दिलं.

आयोसमधलं त्यांचं जीवन कसं होतं? झॅजेल म्हणते: “तिथे आठवडे-आठवडे लाईट नसायची. त्यामुळे आम्ही आमचे फोन चार्ज करू शकत नव्हतो. आणि बऱ्‍याचदा तर ते चालायचेही नाहीत. तिथे मी चुलीवर स्वयंपाक करायला शिकले. आणि आम्ही रात्रीच्या वेळी छोटी हातगाडी आणि टॉर्च घेऊन पाणी भरायला जायचो. कारण त्या वेळी तिथे कमी गर्दी असायची.” असं असतानाही तिथे राहून सेवा करत राहायला या जोडप्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली? झॅजेल म्हणते: “यहोवाच्या पवित्र शक्‍तीमुळे, एकमेकांच्या मदतीमुळे, नातेवाइकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या प्रोत्साहनामुळे; तसंच त्यांनी अधूनमधून केलेल्या आर्थिक मदतीमुळे आम्ही हे करू शकलो.”

आपल्या मायदेशात परत आल्यामुळे झॅजेल आनंदी आहे का? ती म्हणते: “हो नक्कीच! यात काहीच शंका नाही. हे खरंय की सुरुवातीला काही अडचणी होत्या, निराशेच्या भावना होत्या. पण त्या पार केल्यानंतर, मला आणि माझ्या पतीला वाटतं, आम्ही जो निर्णय घेतला तो योग्यच होता. आणि आता यहोवावरचा आमचा भरवसा वाढलाय आणि त्याच्यासोबतची आमची मैत्री आणखी घट्ट झालीए.” पुढे लिऑन्स आणि झॅजेल सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला उपस्थित राहिले. आज ते खास पायनियर म्हणून सेवा करत आहेत.

मासेमारी करणाऱ्‍यांसमोर वेगवेगळ्या अडचणी असल्या तरी जास्तीत जास्त मासे पकडण्यासाठी ते धाडस दाखवतात. अगदी तसंच, आपल्या मायदेशात येऊन जास्तीत जास्त लोकांना शिष्य बनायला मदत करण्यासाठी अनेक भाऊबहीण खूप धाडस दाखवतात. ते आपल्या जीवनात बरेच त्याग करतात. यहोवाच्या नावासाठी प्रेम दाखवणाऱ्‍या या मेहनती प्रचारकांना यहोवा कधीच विसरणार नाही. (नहे. ५:१९; इब्री ६:१०) तुम्ही जर परदेशात राहत असाल आणि जर तुमच्या मायदेशात प्रचारकांची जास्त गरज असेल, तर तुम्ही परत तिथे जायचा विचार करू शकता का? केला, तर यहोवाकडून तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतील.—नीति. १०:२२.