अभ्यास लेख ४८
एकनिष्ठतेची परीक्षा होते तेव्हा योग्यपणे विचार करा
“सगळ्या बाबतींत सावध राहा.”—२ तीम. ४:५.
गीत १०७ देवाच्या प्रीतीचा आदर्श
सारांश a
१. ‘सावध राहणं’ याचा काय अर्थ होतो? (२ तीमथ्य ४:५)
जेव्हा आपल्यापुढे समस्या येतात तेव्हा यहोवाला आणि त्याच्या संघटनेला एकनिष्ठ राहणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. मग या समस्यांवर आपण मात कशी करू शकतो. त्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे, जागं राहिलं पाहिजे आणि विश्वासात स्थिर राहिलं पाहिजे. (२ तीमथ्य ४:५ वाचा.) सावध राहण्याचा अर्थ होतो, की आपण शांत राहून स्पष्टपणे विचार करतो आणि सर्व गोष्टींच्या बाबतीत यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करतो. असं केल्यामुळे आपल्याला भावनांच्या आहारी न जाता योग्यपणे विचार करायला मदत होईल.
२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
२ मागच्या लेखात आपण मंडळीच्या बाहेरून येणाऱ्या तीन समस्यांवर चर्चा केली. या लेखात आपण मंडळीच्या आतून येणाऱ्या अशा तीन समस्यांवर चर्चा करू ज्यामुळे आपल्या एकनिष्ठतेची परीक्षा होऊ शकते. त्या म्हणजे (१) एखादा भाऊ किंवा बहीण आपल्याशी चुकीचं वागली असं आपल्याला वाटतं. (२) जेव्हा आपल्याला ताडन दिलं जातं. (३) जेव्हा संघटनेत होणाऱ्या बदलांशी जुळवून घेणं आपल्याला कठीण जातं. अशा समस्या येतात तेव्हा आपण योग्यपणे विचार करून यहोवाला आणि त्याच्या संघटनेला एकनिष्ठ कसे राहू शकतो.
एखादा भाऊ किंवा बहीण आपल्याशी चुकीचं वागली असं आपल्याला वाटतं तेव्हा
३. मंडळीतलं कोणी आपल्याशी चुकीचं वागलं असं आपल्याला वाटलं तर आपल्या मनात कोणते विचार येऊ शकतात?
३ एखादा भाऊ किंवा बहीण किंवा मग एखादा जबाबदार बांधव तुमच्याशी चुकीचं वागलाय असं कधी तुम्हाला वाटलंय का? कदाचित त्या बांधवाला तुम्हाला मुद्दाम दुखवायचं नसेल. (रोम. ३:२३; याको. ३:२) असं असलं तरी त्याच्या वागण्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल. त्याबद्दल विचार करून-करून कदाचित तुमची झोप उडाली असेल. तुम्ही असासुद्धा विचार केला असेल, ‘एक भाऊ असं कसं काय वागू शकतो? ही खरंच यहोवाची संघटना आहे का?’ खरंतर आपण असाच विचार करावा अशी सैतानाची इच्छा आहे. (२ करिंथ. २:११) पण असा चुकीचा विचार केल्यामुळे आपण यहोवापासून आणि त्याच्या संघटनेपासून दूर जाऊ शकतो. तर मग, मंडळीतलं कोणी आपल्याशी वाईट वागलंय असं आपल्याला वाटलं, तर चुकीचा विचार करायचं टाळून आपण योग्यपणे कसा विचार करू शकतो?
४. योसेफचे भाऊ त्याच्याशी वाईट वागले तेव्हा त्याने योग्यपणे कसा विचार केला? आणि त्याच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? (उत्पत्ती ५०:१९-२१)
४ मनात राग ठेवू नका. योसेफ लहान होता तेव्हा त्याच्या मोठ्या भावांनी त्याला खूप वाईट वागणूक दिली. ते त्याचा द्वेष करायचे. त्यांच्यापैकी काहींना तर त्याला मारून टाकायचं होतं. (उत्प. ३७:४, १८-२२) शेवटी त्यांनी त्याला एक गुलाम म्हणून विकून टाकलं. यामुळे जवळजवळ १३ वर्ष योसेफला खूप कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. योसेफ असा विचार करू शकला असता: ‘यहोवाचं खरंच माझ्यावर प्रेम आहे का? मला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याने मला का सोडून दिलं?’ पण योसेफने असा विचार केला नाही आणि मनात रागही ठेवला नाही. उलट त्याने शांत राहून योग्यपणे विचार केला. आणि जेव्हा त्याला त्याच्या भावांचा बदला घेण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने तसं केलं नाही. उलट तो त्यांच्याशी प्रमाने वागला आणि त्याने त्यांना क्षमा केली. (उत्प. ४५:४, ५) योसेफ अशा प्रकारे का वागू शकला? कारण त्याने स्पष्टपणे विचार केला. फक्त स्वतःच्या समस्यांबद्दल विचार करण्याऐवजी यहोवाची इच्छा काय आहे याबदद्ल त्याने विचार केला. (उत्पत्ती ५०:१९-२१ वाचा.) मग यावरून आपण काय शिकू शकतो? जर कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं तर यहोवावर रागवू नका किंवा त्याने आपल्याला सोडून दिलंय असा विचार करू नका. उलट तुमच्या समस्येचा सामना करायला तो तुम्हाला कशी मदत करत आहे याबद्दल विचार करा. तसंच इतर जण तुमच्याशी वाईट वागतात तेव्हा क्षमा करायला तयार असा आणि “प्रेम पुष्कळ पापांना झाकून टाकतं” हे लक्षात ठेवा.—१ पेत्र ४:८.
५. आपल्याला चुकीची वागणूक मिळाली असं मिकेयास यांना वाटलं तेव्हा योग्यपणे विचार करण्यासाठी त्यांनी काय केलं?
५ दक्षिण अमेरिकेत राहणाऱ्या मिकेयास b नावाच्या एका भावाच्या उदाहरणावर विचार करा. ते वडील म्हणून सेवा करत होते. ते सांगतात की एकदा काही जबाबदार बांधव त्यांच्याशी कठोरपणे वागले असं त्यांना वाटलं. ते म्हणतात: “मला इतकं टेन्शन कधीच आलं नव्हतं. मी घाबरून गेलो होतो. मला रात्री झोप लागायची नाही. आणि मी अक्षरक्ष: रडायचो कारण या बाबतीत मी काहीच करू शकत नव्हतो.” असं असलं तरी बंधू मिकेयास योग्यपणे विचार करत राहिले आणि त्यांनी आपल्या भावनांवर ताबा ठेवायचा प्रयत्न केला. ते सतत यहोवाला प्रार्थना करायचे आणि या समस्येचा सामना करायला त्याने आपल्याला पवित्र शक्ती द्यावी अशी त्याला विनंती करत राहायचे. तसंच त्यांना मदत करू शकतील असे लेखसुद्धा त्यांनी आपल्या प्रकाशनांमधून शोधून काढले. यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? मंडळीतलं कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर शांत राहायचा प्रयत्न करा आणि चुकीच्या विचारांना मनात थारा देऊ नका. ती व्यक्ती नेमक्या कोणत्या परिस्थितीमुळे तसं वागली किंवा बोलली हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. म्हणून तुम्हाला कसं वाटतंय हे प्रार्थनेत यहोवाला सांगा आणि त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून या समस्येकडे पाहण्यासाठी त्याला मदत मागा. असं केल्यामुळे त्या भावाचा किंवा बहिणीचा मुळात तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता असा विचार करायला आणि त्यांना क्षमा करायला तुम्हाला मदत होईल. (नीति. १९:११) यहोवाला तुमच्या परिस्थितीची जाणीव आहे हे विसरू नका. तो तुम्हाला या समस्येचा सामना करायला नक्कीच ताकद देईल.—२ इति. १६:९; उप. ५:८.
आपल्याला ताडन दिलं जातं तेव्हा
६. यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच तो आपल्याला ताडन देतो ही गोष्ट ओळखणं इतकं महत्त्वाचं का आहे? (इब्री लोकांना १२:५, ६, ११)
६ ताडन दिलं जातं तेव्हा साहजिकच आपल्याला दुःख होतं. पण जर आपण त्या दुःखाकडेच लक्ष देत राहिलो तर आपल्याला मिळालेलं ताडन योग्य नव्हतं, आपल्यावर अन्याय झाला आहे किंवा आपल्याशी खूप कठोरपणे व्यवहार करण्यात आला असं आपल्याला वाटू शकतं. आणि यामुळे एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. ती म्हणजे, यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे तो आपल्याला हे ताडन देतो. (इब्री लोकांना १२:५, ६, ११ वाचा.) आपल्याला किती वाईट वाटलं याचाच जर आपण विचार करत राहिलो तर सैतानाला आपल्या या भावनांचा गैरफायदा घ्यायची संधी मिळेल. आपण यहोवाकडून मिळणारं ताडन स्वीकारू नये आणि इतकंच काय तर यहोवाशी आणि मंडळीशी आपण संबंध तोडून टाकावा अशी सैतानाची इच्छा आहे. तुम्हाला जर ताडन मिळालं असेल तर तुम्ही योग्यपणे विचार कसा करू शकता?
७. (क) चित्रात दाखवल्याप्रमाणे पेत्रने ताडन स्वीकारल्यानंतर यहोवाने आपल्या सेवेसाठी त्याचा कशा प्रकारे उपयोग केला? (ख) पेत्रच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
७ ताडन स्वीकारा आणि स्वतःमध्ये सुधारणा करा. काही वेळा येशूने इतर प्रेषितांसमोर पेत्रला त्याची चूक लक्षात आणून दिली. (मार्क ८:३३; लूक २२:३१-३४) पेत्रला त्या वेळी नक्कीच खूप लाज वाटली असेल. पण तरीसुद्धा तो येशूला एकनिष्ठ राहिला. त्याने ताडन स्वीकारलं आणि आपल्या चुकांमधून धडा घेतला. पेत्रच्या या एकनिष्ठतेमुळे यहोवाने त्याला आशीर्वाद दिला आणि मंडळीत त्याला बऱ्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. (योहा. २१:१५-१७; प्रे. कार्यं १०:२४-३३; १ पेत्र १:१) पेत्रच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? ताडन दिलं जातं तेव्हा आपल्याला लाज वाटते आणि वाईटही वाटतं. पण फक्त त्याचाच विचार करण्याऐवजी जेव्हा आपण ते ताडन स्वीकारतो आणि स्वतःमध्ये सुधारणा करतो तेव्हा आपल्याला आणि इतरांनाही फायदा होतो. ताडनाबद्दल जर आपण योग्य दृष्टिकोन ठेवला तर आपल्याला यहोवाची आणि आपल्या भाऊबहिणींची आणखी मोठ्या प्रमाणात सेवा करता येईल.
८-९. (क) ताडन देण्यात आलं तेव्हा बर्नाडो यांना सुरुवातीला कसं वाटलं? (ख) पण योग्यपणे विचार करायला त्यांना कशामुळे मदत झाली?
८ मोझांबिक इथे राहणाऱ्या बर्नाडो नावाच्या एका भावासोबत काय घडलं याचा विचार करा. ते वडील म्हणून सेवा करत होते पण काही काळाने त्यांच्याकडून ती जबाबदारी काढून घेण्यात आली. असं झालं तेव्हा सुरुवातीला त्यांना कसं वाटलं? ते सांगतात: “माझ्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली तेव्हा मला ते अजिबात आवडलं नाही. आणि त्यामुळे माझ्या मनात खूप राग होता.” मंडळीतले भाऊबहीण आपल्याबद्दल काय विचार करतील याची बर्नाडो यांना चिंता होती. ते म्हणतात: “माझ्या परिस्थितीबद्दल योग्य दृष्टिकोनाने विचार करायला आणि यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर पुन्हा भरवसा ठेवायला मला काही महिने लागले.” पण योग्य प्रकारे विचार करायला बर्नाडो यांना कशामुळे मदत झाली?
९ बर्नाडो यांनी आपला चुकीचा दृष्टिकोन बदलला. याबद्दल ते सांगतात: “मी वडील म्हणून सेवा करत होतो तेव्हा मी बऱ्याचदा इब्री लोकांना १२:७ हे वचन वापरलं होतं. यहोवाकडून मिळणाऱ्या ताडनाबद्दल आपण योग्य दृष्टिकोन कसा ठेवू शकतो हे भाऊबहिणींना समजवण्यासाठी मी हे वचन वापरायचो. आता मी स्वतःला हा प्रश्न विचारला, की ‘या वचनातला सल्ला मुळात कोणासाठी आहे?’ तो यहोवाच्या सगळ्या सेवकांसाठी आहे आणि त्यांत मीसुद्धा आहे.” यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर आपला भरवसा पुन्हा मजबूत करण्यासाठी बर्नाडो यांनी आणखी काही पावलं उचलली. ते आधीसुद्धा बायबल वाचायचे आणि त्यावर मनन करायचे. पण आता त्यांनी ते जास्त प्रमाणात करायला सुरुवात केली. भाऊबहीण आपल्याबद्दल काय विचार करत असतील याची त्यांना अजूनही चिंता वाटत होती. पण तरीसुद्धा ते त्यांच्यासोबत प्रचार कार्य करत राहिले आणि मंडळीच्या सभांमध्येही ते सहभाग घेत राहिले. काही काळाने त्यांना पुन्हा वडील म्हणून नियुक्त करण्यात आलं. या भावाप्रमाणे जर तुम्हालाही ताडन देण्यात आलं असेल, तर सुरुवातील कदाचित तुम्हाला लाजल्यासारखं वाटलं असेल. पण फक्त त्याचाच विचार करण्याऐवजी तुम्हाला देण्यात आलेला सल्ला स्वीकारा. आणि स्वतःमध्ये आवश्यक असलेले बदल करा. c (नीति. ८:३३; २२:४) जर तुम्ही असं केलं तर यहोवाला आणि त्याच्या संघटनेला एकनिष्ठ राहिल्याबद्दल तो नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल.
संघटनेत होणाऱ्या बदलांशी आपल्याला जुळवून घेणं कठीण जातं तेव्हा
१०. यहोवाच्या संघटनेत झालेल्या कोणत्या बदलांमुळे काही इस्राएली पुरुषांच्या एकनिष्ठतेची परीक्षा झाली असेल?
१० संघटनेत बदल होतात तेव्हा काही वेळी आपल्या एकनिष्ठतेची परीक्षा होऊ शकते. आणि जर आपण सावध राहिलो नाही तर यामुळे आपण यहोवापासून दूरही जाऊ शकतो. उदाहरणार्थ, जुन्या काळात मोशेच्या नियमशास्त्रामुळे यहोवाच्या संघटनेत उपासनेसंबंधी एक बदल झाला. या बदलांमुळे काही इस्राएली लोकांवर कसा परिणाम झाला असेल याचा विचार करा. मोशेचं नियमशास्त्र देण्यात आल्यानंतर याजक उपासनेच्या बाबतीत पुढाकार घेऊ लागले. पण त्याआधी कुटुंबप्रमुख ही जबाबदारी पार पाडायचे. ते आपल्या कुटुंबाच्या वतीने यहोवासाठी वेदी बांधून त्यावर बलिदानं अर्पण करायचे. (उत्प. ८:२०, २१; १२:७; २६:२५; ३५:१, ६, ७; ईयो. १:५) पण नियमशास्त्र देण्यात आल्यानंतर कुटुंबप्रमुखांना हा खास सन्मान सोडून द्यावा लागला. कारण यहोवाने आता बलिदानं अर्पण करण्यासाठी अहरोनच्या कुटुंबाच्या याजकांना नेमलं होतं. हा बदल लागू केल्यानंतर अहरोनच्या कुटुंबातून नसलेल्या एखाद्या कुटुंबप्रमुखाने जर याजकाची कामं करायचा प्रयत्न केला, तर त्याला मृत्यूदंड दिला जायचा. d (लेवी. १७:३-६, ८, ९) कोरह, दाथान, अबीराम आणि २५० प्रधानांनी मोशेच्या आणि अहरोनच्या अधिकारावर प्रश्न उचलला त्यामागे हेसुद्धा एक कारण असावं का? (गण. १६:१-३) आपल्याला हे नक्की सांगता येणार नाही. पण कारण कोणतंही असलं तरीसुद्धा कोरह आणि त्याचे साथीदार यहोवाला एकनिष्ठ राहिले नाहीत. जर संघटनेत झालेल्या बदलांमुळे तुमच्या एकनिष्ठतेची परीक्षा झाली तर तुम्ही काय करू शकता?
११. कहाथी लोकांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?
११ संघटनेत बदल होतात तेव्हा मनापासून सहकार्य करा. इस्राएली लोक ओसाड रानातून प्रवास करत होते तेव्हा, त्यांच्यातले कहाथी लोक एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडायचे. जेव्हा-जेव्हा इस्राएली लोक आपली छावणी दुसरीकडे हलवायचे तेव्हा कहाथी लोकांपैकी काही जण कराराची पेटी घेऊन सर्व लोकांच्या पुढे चालायचे. (गण. ३:२९, ३१; १०:३३; यहो. ३:२-४) हा खरंच त्यांच्यासाठी एक मोठा सन्मान होता! पण जेव्हा इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात राहू लागले तेव्हा परिस्थिती बदलली. आता कराराची पेटी सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे शलमोनने त्याचं राज्य सुरू केलं, तोपर्यंत कहाथी लोकांपैकी काहींना गायक म्हणून तर काहींना द्वारपाल म्हणून नेमण्यात आलं. आणि त्यांच्यापैकी काहींना कोठारं सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. (१ इति. ६:३१-३३; २६:१, २४) हा बदल झाला तेव्हा कहाथी लोकांनी कुरकुर केली का किंवा पूर्वी आम्ही इतकी खास जबाबदारी पार पाडायचो, त्यामुळे आता आम्हाला आणखी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाव्यात अशी मागणी त्यांनी केली का? बायबलमध्ये असं कुठंही सांगितलेलं नाही. मग यातून आपण काय शिकू शकतो? यहोवाच्या सेवेत जेव्हा बदल केले जातात तेव्हा कधी-कधी त्यांचा तुमच्या नेमणुकीवरही परिणाम होऊ शकतो. असं असलं तरी या सगळ्या बदलांना मनापासून सहकार्य करा. तुम्हाला जी काही जबाबदारी दिली जाते ती आनंदाने पार पाडा. संघटनेत तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडता यावरून यहोवाच्या नजरेत तुमचं मोल ठरत नाही, हे नेहमी लक्षात असू द्या. तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडता यापेक्षा तुम्ही किती मनापासून यहोवाच्या आज्ञा पाळता, हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचंय.—१ शमु. १५:२२.
१२. बेथेलमध्ये काम करणाऱ्या सायनाची नेमणूक बदलली तेव्हा तिला कसं वाटलं?
१२ सायना नावाच्या एका बहिणीच्या उदाहरणावर विचार करा. तिची नेमणूक बदलण्यात आली तेव्हा तिला मनापासून आवडणारं काम सोडून द्यावं लागलं. बेथेलमध्ये २३ पेक्षा जास्त वर्ष सेवा केल्यानंतर तिला खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. ती म्हणते: “माझी नेमणूक बदलली तेव्हा मला धक्काच बसला. मी काहीच कामाची नाही असं मला वाटू लागलं. आणि माझ्या मनात सारखा हा विचार यायचा, की ‘मी कुठे कमी पडले?’” दुःखाची गोष्ट म्हणजे मंडळीतल्या काही भाऊबहिणींच्या वागण्यामुळे तिला आणखीनच वाईट वाटलं ते तिला म्हणाले: “तू जर चांगलं काम करत असतीस, तर तुला बेथेलमधून काढलंच नसतं.” काही काळासाठी सायना इतकी निराश झाली होती की ती रोज रात्री रडायची. पण ती म्हणते: “मी यहोवाच्या संघटनेबद्दल किंवा त्याच्या प्रेमाबद्दल कधीच मनात शंका येऊ दिली नाही.” सायनाला योग्यपणे विचार करायला कशामुळे मदत झाली?
१३. सायनाने आपल्या निराशेवर कशी मात केली?
१३ सायना तिच्या निराशेवर कशी मात करू शकली? ती ज्या नकारात्मक भावनांचा सामना करत होती त्याविषयी आपल्या प्रकाशनांमध्ये असलेले लेख तिने वाचले. १ फेब्रुवारी, २००१ च्या टेहळणी बुरूज अंकातला “निराशेवर औषध आहे!” या लेखामुळे तिला खूप मदत झाली. बायबलचा एक लेखक मार्क याची नेमणूक बदलण्यात आली, तेव्हा त्यालासुद्धा अशाच प्रकारच्या भावनांचा सामना करावा लागला असेल असं त्या लेखात सांगण्यात आलं होतं. सायना सांगते: “मार्कचं उदाहरण खरंच माझ्यासाठी एखाद्या औषधासारखं होतं. यामुळे मला माझ्या निराशेवर मात करता आली.” यासोबतच सायनाने आणखी एक गोष्ट केली. ती एकटी-एकटी राहिली नाही, उलट ती मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवायची. तसंच, ती स्वतःची कीव करत बसली नाही. तिला एक गोष्ट समजली, की यहोवाची पवित्र शक्ती त्याच्या संघटनेद्वारे काम करते आणि संघटनेतल्या जबाबदार बांधवांना तिची मनापासून काळजी आहे. तिला याचीही जाणीव झाली, की यहोवाचं काम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी संघटनेला असे निर्णय घ्यावे लागतात.
१४. संघटनेत झालेल्या कोणत्या बदलांशी व्लादो यांना जुळवून घ्यायला कठीण गेलं? आणि त्यांना कशामुळे मदत झाली?
१४ स्लोव्हेनियामध्ये राहणारे ७३ वर्षांचे व्लादो नावाचे भाऊ मंडळीत वडील म्हणून सेवा करतात. त्यांच्या मंडळीला दुसऱ्या एका मंडळीसोबत जोडण्यात आलं आणि त्यांचं राज्यसभागृह बंद करण्यात आलं तेव्हा त्यांना सोपं गेलं नाही. ते म्हणतात: “इतकं सुंदर किंग्डम हॉल बंद करायची काय गरज होती हे मला कळतच नव्हतं. आम्ही अलिकडेच आमच्या हॉलची दुरूस्ती केली होती. आणि मी सुतारकाम करत असल्यामुळे हॉलमधलं काही फर्निचर मीसुद्धा तयार केलं होतं. त्यामुळे मला आणखीनच वाईट वाटलं. तसंच दोन मंडळ्यांना जोडल्यामुळे जे बदल करण्यात आले त्यांच्याशी जुळवून घेणं माझ्यासारख्या वयस्कर प्रचारकांसाठी सोपं नव्हतं.” पण संघटनेच्या मार्गदर्शनाला सहकार्य करायला व्लादो यांना कशामुळे मदत झाली? ते सांगतात: “यहोवाच्या संघटनेने केलेल्या बदलांशी जुळवून घेतल्यामुळे आपल्याला नेहमीच आशीर्वाद मिळतात. खरंतर हे बदल आपल्याला पुढे होणाऱ्या आणखी मोठ्या बदलांसाठी तयार करत आहेत.” कदाचित तुमच्या मंडळीलाही दुसऱ्या एखाद्या मंडळीसोबत जोडण्यात आलं असेल किंवा तुमची नेमणूक बदलण्यात आली असेल. तुम्हाला अशा बदलांशी जुळवून घेणं कठीण जात आहे का? तुम्हाला नेमकं कसं वाटतंय हे यहोवाला कळतं, हे लक्षात असू द्या. या सगळ्या बदलांना तुम्ही सहकार्य केलं आणि यहोवाला आणि त्याच्या संघटनेला एकनिष्ठ राहिलात, तर यहोवा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल.—स्तो. १८:२५.
सर्व बाबतीत योग्यपणे विचार करा
१५. मंडळीच्या आतून समस्या निर्माण होतात तेव्हा आपण योग्यपणे विचार कसा करू शकतो?
१५ या जगाचा अंत जसजसा जवळ येत आहे तसतशा मंडळीच्या आतून वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात. या समस्यांमुळे यहोवाला एकनिष्ठ राहणं आपल्याला कठीण वाटू शकतं. म्हणूनच आपण सर्व बाबतीत योग्यपणे विचार करायला शिकलं पाहिजे. जर मंडळीतलं कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं असं तुम्हाला वाटलं, तर मनात राग ठेवू नका. जर तुम्हाला ताडन देण्यात आलं असेल तर कदाचित तुम्हाला लाजल्यासारखं वाटेल. पण त्याचाच विचार करत राहण्याऐवजी तुम्हाला देण्यात आलेला सल्ला स्वीकारा आणि आवश्यक ते बदल करा. आणि जेव्हा यहोवाच्या संघटनेत झालेल्या बदलांमुळे तुमच्यावर परिणाम होतो तेव्हासुद्धा ते बदल मनापासून स्वीकारा आणि मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे वागा.
१६. तुम्ही यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर असलेला भरवसा कसा टिकवून ठेवू शकता?
१६ तुमच्या एकनिष्ठतेची परीक्षा होते तेव्हासुद्धा तुम्ही यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर असलेला तुमचा भरवसा टिकवून ठेवू शकता. पण असं करण्यासाठी तुम्ही योग्यपणे विचार करत राहणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही शांत राहून स्पष्टपणे विचार केला पाहिजे आणि सर्व गोष्टींकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न केला पाहिजे. बायबलमधल्या ज्या व्यक्तींनी तुमच्यासारख्याच समस्यांचा सामना केला आणि त्यांवर मात केली, त्यांच्याबद्दल अभ्यास करा आणि त्यांच्या उदाहरणांवर मनन करा. मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा आणि मंडळीतल्या भाऊबहिणींपासून दूर राहू नका. जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर तुमच्यासमोर कोणत्याही प्रकारच्या समस्या आल्या, तरीसुद्धा सैतान कधीही तुम्हाला यहोवापासून किंवा त्याच्या संघटनेपासून दूर करू शकणार नाही.—याको. ४:७.
गीत १२६ जागे राहा, सावध व बलशाली व्हा!
a जेव्हा मंडळीच्या आतून आपल्यावर समस्या येतात तेव्हा यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर आपल्याला भरवसा ठेवणं कठीण जाऊ शकतं आणि आपल्या एकनिष्ठतेची परीक्षा होऊ शकते. या लेखात आपण अशा तीन समस्यांवर चर्चा करणार आहोत. तसंच, अशा समस्या येतात तेव्हा यहोवाला आणि त्याच्या संघटनेला आपण एकनिष्ठ कसं राहू शकतो हेसुद्धा पाहणार आहोत.
b काही नावं बदलण्यात आली आहेत.
c याबद्दल तुम्हाला आणखी काही उपयोगी सल्ले १५ ऑगस्ट २००९ च्या टेहळणी बुरूज अंकात पान क्रमांक ३० वर असलेल्या, “एके काळी तुमच्याजवळ असलेला विशेषाधिकार तुम्ही पुन्हा मिळवू शकता का?” या लेखात मिळतील.
d नियमशास्त्राप्रमाणे जेव्हा कुटुंबप्रमुखांना मांसासाठी एखाद्या प्राण्याला कापायचं असेल, तर त्यांना तो प्राणी पवित्र ठिकाणी न्यावा लागायचा. पण जी कुटुंब पवित्र ठिकाणापासून खूप दूर राहायची त्यांना असं करण्याची गरज नव्हती.—अनु. १२:२१.