व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४७

कोणत्याही गोष्टीमुळे यहोवापासून दूर जाऊ नका

कोणत्याही गोष्टीमुळे यहोवापासून दूर जाऊ नका

“हे यहोवा, माझा तुझ्यावर भरवसा आहे.”​—स्तो. ३१:१४.

गीत १२२ निर्भय व निश्‍चयी राहा!

सारांश a

१. आपण यहोवाच्या जवळ यावं अशी त्याची इच्छा आहे हे कशावरून कळतं?

 यहोवा आपल्याला त्याच्या जवळ यायचं प्रोत्साहन देतो. (याको. ४:८) आपण त्याला आपला देव, पिता आणि मित्र समजावं अशी त्याची इच्छा आहे. तो आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो आणि आपल्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा आपल्याला मदत करतो. तसंच त्याच्या संघटनेद्वारे तो आपल्याला मार्गदर्शन देतो आणि आपलं संरक्षण करतो. पण यहोवाच्या जवळ जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

२. आपण यहोवाच्या जवळ कसं जाऊ शकतो?

यहोवाच्या जवळ जाण्यासाठी आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे आणि त्याचं वचन वाचून त्यावर मनन केलं पाहिजे. असं केल्यामुळे त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम आणि कदर वाढेल. तसंच यामुळे आपल्याला त्याच्या आज्ञा पाळायची आणि त्याची स्तुती करायची प्रेरणा मिळेल. यासाठी फक्‍त तोच योग्य आहे. (प्रकटी. ४:११) आपण यहोवाला जितकं जास्त जाणून घेऊ तितकाच आपला त्याच्यावर असलेला भरवसा वाढेल. तसंच आज ज्या संघटनेद्वारे तो आपल्याला मदत करत आहे त्या संघटनेवरचाही आपला भरवसा वाढेल.

३. सैतान आपल्याला यहोवापासून दूर न्यायचा कसा प्रयत्न करतो, पण आपण त्याच्या कुयुक्त्यांचा प्रतिकार कसा करू शकतो? (स्तोत्र ३१:१३, १४)

सैतान आपल्याला यहोवापासून दूर न्यायचा प्रयत्न करतो; खासकरून आपल्यावर समस्या येतात तेव्हा. तो हे कसं करतो? यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर असलेला आपला भरवसा तो हळूहळू कमजोर करायचा प्रयत्न करतो. पण सैतानाच्या अशा कुयुक्त्यांचा आपण प्रतिकार करू शकतो. जर आपण आपला विश्‍वास मजबूत केला आणि यहोवावर असलेला आपला भरवसा डळमळू दिला नाही, तर आपण कधीही यहोवापासून आणि त्याच्या संघटनेपासून दूर जाणार नाही.​—स्तोत्र ३१:१३, १४ वाचा.

४. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

या लेखात आपण अशा तीन समस्यांबद्दल चर्चा करणार आहोत ज्या मंडळीच्या बाहेरून आपल्यावर येऊ शकतात. यांपैकी प्रत्येक समस्या यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर असलेला आपला भरवसा कमजोर करू शकते. या समस्या आपल्याला कशा प्रकारे यहोवापासून दूर नेऊ शकतात आणि असं करण्यात सैतान यशस्वी होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?

आपल्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा

५. कठीण समस्यांमुळे यहोवावरचा आणि संघटनेवरचा आपला भरवसा कसा डळमळू शकतो?

कधीकधी आपल्यावर कठीण समस्या येऊ शकतात. जसं की, कुटुंबाकडून आपला विरोध होऊ शकतो किंवा आपली नोकरी जाऊ शकते. आपल्यावर अशा समस्या येतात तेव्हा यहोवाच्या संघटनेवरचा आपला भरवसा कमजोर होऊ शकतो आणि आपण यहोवापासून दूर जाऊ शकतो. पण हे नेमकं कसं घडतं? जेव्हा आपल्याला बऱ्‍याच काळापासून एखाद्या समस्येचा सामना करावा लागतो, तेव्हा आपण निराश होऊ शकतो आणि खचून जाऊ शकतो. सैतान अशा परिस्थितीचा फायदा घेतो आणि यहोवाचं खरंच आपल्यावर प्रेम आहे की नाही याबद्दल आपल्या मनात शंका निर्माण करतो. ‘यहोवामुळे किंवा त्याच्या संघटनेमुळे तर आपल्यावर ही समस्या आली नसेल ना?,’ असे प्रश्‍न तो आपल्या मनात निर्माण करायचा प्रयत्न करतो. इजिप्तमध्ये राहणाऱ्‍या इस्राएली लोकांच्या बाबतीतही असंच काहीतरी घडलं. त्यांना गुलामीतून सोडवण्यासाठी यहोवाने मोशे आणि अहरोनला नेमलं आहे या गोष्टीवर सुरुवातीला त्यांचा भरवसा होता. (निर्ग. ४:२९-३१) पण नंतर जेव्हा फारो त्यांच्यावर जास्तच अत्याचार करायला लागला तेव्हा त्यांनी मोशेला आणि अहरोनला आपल्या समस्यांसाठी दोषी ठरवलं. आणि ते म्हणाले, “तुमच्यामुळेच  फारो आणि त्याचे सेवक आमचा द्वेष करू लागले आहेत. आम्हाला मारून टाकण्यासाठी तुम्ही  त्यांच्या हातात तलवार दिली आहे.” (निर्ग. ५:१९-२१) असं म्हणून त्यांनी देवाच्या विश्‍वासू सेवकांना दोष दिला. ही खरंच किती दुःखाची गोष्ट होती! जर तुम्हीही बऱ्‍याच काळापासून कठीण समस्यांचा सामना करत असाल, तर यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर असलेला तुमचा भरवसा तुम्ही कसा टिकवून ठेवू शकता?

६. कठीण प्रसंगांचा सामना करायच्या बाबतीत आपण हबक्कूक संदेष्ट्याकडून काय शिकतो? (हबक्कूक ३:१७-१९)

प्रार्थनेत यहोवाजवळ आपलं मन मोकळं करा आणि मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहा.  हबक्कूक संदेष्ट्याला बऱ्‍याच कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. एकदा तर त्याला अशी शंका वाटू लागली, की यहोवाला त्याची खरंच काळजी आहे का? म्हणून त्याने यहोवाला प्रार्थना केली आणि आपल्याला कसं वाटतंय हे त्याला सांगितलं. तो म्हणाला, “हे यहोवा, मी मदतीसाठी तुला कुठपर्यंत हाक मारू? तू कधी माझं ऐकशील? . . . तू अत्याचार का खपवून घेतोस?” (हब. १:२, ३) आपल्या या विश्‍वासू सेवकाने मनापासून केलेली प्रार्थना यहोवाने ऐकली. (हब. २:२, ३) यहोवाने आपल्या लोकांना आधी कसं वाचवलं होतं याबद्दल विचार केल्यावर हबक्कूक पुन्हा आनंदी झाला. त्याला याची खातरी पटली की यहोवाला त्याची काळजी आहे आणि त्याच्यावर कोणतीही समस्या आली तरी यहोवा त्याला त्या समस्येचा धीराने सामना करायला मदत करेल. (हबक्कूक ३:१७-१९ वाचा.) यातून आपण काय शिकू शकतो? तुमच्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा यहोवाला प्रार्थना करा आणि तुम्हाला नेमकं कसं वाटतंय हे त्याला सांगा. आणि मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहा. जर तुम्ही असं केलं तर तुमच्यासमोर असलेल्या समस्येचा धीराने सामना करण्यासाठी यहोवा तुम्हाला ताकद देईल याची तुम्ही खातरी बाळगू शकता. आणि यहोवा तुम्हाला कशी मदत करतो हे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा त्याच्यावर असलेला तुमचा विश्‍वास आणखी मजबूत होईल.

७. शर्लीच्या नातेवाइकांनी तिला काय पटवून द्यायचा प्रयत्न केला, पण ती यहोवावरचा आपला विश्‍वास कशामुळे टिकवून ठेवू शकली?

उपासनेशी संबंधित गोष्टी नियमितपणे करत राहा.  पापुआ न्यू गिनी इथे राहणाऱ्‍या शर्ली नावाच्या एका बहिणीला असं केल्यामुळे कशी मदत झाली यावर विचार करा. b तिचं कुटुंब खूप गरीब होतं आणि कधीकधी तर त्यांना पुरेसं अन्‍न मिळवणंही खूप कठीण जायचं. अशा परिस्थितीत तिच्या एका नातेवाइकाने यहोवावर असलेला तिचा भरवसा कमजोर करायचा प्रयत्न केला. तो म्हणाला: “तू तर म्हणते की देव तुम्हाला मदत करतोय. पण मग तुझ्या कुटुंबाकडे पाहा. किती वाईट परिस्थितीत राहत आहात तुम्ही! कशाला उगाच प्रचार वगैरे करण्यात वेळ घालवतेस?” शर्ली सांगते: “एका क्षणासाठी माझ्या मनातही हा प्रश्‍न आला, की ‘देवाला खरंच आमची काळजी आहे का?’ म्हणून मी लगेच यहोवाला प्रार्थना केली आणि माझ्या मनात जे काही चाललं होतं ते सगळं त्याला सांगितलं. शिवाय, मी बायबलचं आणि आपल्या प्रकाशनांचं वाचन करायचंही बंद केलं नाही. तसंच मी प्रचार करत राहिले आणि सभांनाही जात राहिले.” काही काळाने शर्लीला जाणीव झाली की यहोवा तिच्या कुटुंबाची काळजी घेत आहे. तिने पाहिलं की तिच्या कुटुंबाला कधीच उपाशी राहावं लागलं नाही आणि गरीब असूनही ते आनंदी होते. शर्ली सांगते: “मला जाणवलं की यहोवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर देतोय.” (१ तीम. ६:६-८) जर तुम्हीसुद्धा यहोवाची उपासना नियमितपणे करत राहिलात तर समस्यांमुळे किंवा मनात येणाऱ्‍या शंकांमुळे तुम्ही कधीही यहोवापासून दूर जाणार नाही.

जबाबदार बांधवांना चुकीची वागणूक दिली जाते तेव्हा

८. यहोवाच्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांसोबत कधीकधी काय होऊ शकतं?

कधीकधी प्रसार माध्यम आणि सोशल नेटवर्कद्वारे आपले शत्रू यहोवाच्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांबद्दल खोटी माहिती किंवा अफवा पसरवतात. (स्तो. ३१:१३) काही बांधवांना तर अटक करून गुन्हेगारही ठरवण्यात आलंय. पहिल्या शतकात पौलवर खोटे आरोप लावून त्याला अटक करण्यात आली तेव्हा त्या काळातल्या ख्रिश्‍चनांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. मग त्यांनी काय केलं?

९. प्रेषित पौलला कैद करण्यात आलं तेव्हा काही बांधव त्याच्याशी कसं वागले?

प्रेषित पौल रोममध्ये कैदेत होता तेव्हा काही ख्रिस्ती बांधवांनी त्याला मदत करायचं सोडून दिलं. (२ तीम. १:८, १५) त्यांनी असं का केलं? लोकांच्या नजरेत पौल एक गुन्हेगार असल्यामुळे त्यांना त्याची लाज वाटली असेल का? (२ तीम. २:८, ९) किंवा आपलाही छळ केला जाईल या विचाराने ते घाबरले असतील का? याचं नेमकं कारण काय असेल हे तर आपल्याला माहीत नाही. पण त्यांच्या अशा वागण्यामुळे पौलला कसं वाटलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. या बांधवांसाठी पौलने बऱ्‍याच कठीण समस्यांना तोंड दिलं होतं. आणि त्यांच्यासाठी स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात घातला होता. (प्रे. कार्यं २०:१८-२१; २ करिंथ. १:८) पण पौलला नेमकी त्यांच्या मदतीची गरज होती तेव्हा त्यांनी त्याला सोडून दिलं. आपण त्या बांधवांसारखं कधीही होऊ नये. मग, आजसुद्धा जेव्हा जबाबदार बांधवांचा छळ केला जातो तेव्हा आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?

१०. जबाबदार बांधवांचा छळ केला जातो तेव्हा आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे आणि का?

१० आपला छळ का केला जातो आणि त्यामागे कोणाचा हात आहे, हे लक्षात असू द्या.  दुसरे तीमथ्य ३:१२ मध्ये असं म्हटलंय: “ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्‍ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्‍या सगळ्यांचा छळ केला जाईल.” त्यामुळे आज सैतान यहोवाच्या संघटनेतल्या जबाबदार बांधवांना आपला खास निशाणा बनवतो, याचं आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. या बांधवाचा छळ केल्यामुळे त्यांनी यहोवाला सोडून द्यावं आणि इतर भाऊबहिणींनीही घाबरून जावं अशी सैतानाची इच्छा आहे.​—१ पेत्र ५:८.

पौल कदैत होता तेव्हा अनेसिफरने न घाबरता त्याला मदत केली. या नाट्यरूपांतरात दाखवल्याप्रमाणे, आजसुद्धा जेव्हा आपल्या भाऊबहिणींना तुरुंगात टाकलं जातं तेव्हा इतर भाऊबहीण त्यांच्या पाठीशी उभे राहतात (परिच्छेद ११-१२ पाहा)

११. अनेसिफरच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं? (२ तीमथ्य १:१६-१८)

११ आपल्या बांधवांना मदत करत राहा आणि सतत त्यांच्या पाठीशी उभे राहा.  (२ तीमथ्य १:१६-१८ वाचा.) पौलला कैद करण्यात आलं तेव्हा अनेसिफर नावाचा भाऊ इतर बांधवांसारखा वागला नाही. “[पौलच्या] बेड्यांची त्याला लाज वाटली नाही.” उलट, त्याने पौलचा शोध घेतला आणि त्याची भेट झाल्यावर त्याने वेगवेगळ्या मार्गांनी त्याला मदत केली. पौलला मदत करण्यासाठी अनेसिफरने आपला जीवसुद्धा धोक्यात घातला. मग यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपल्या बांधवांचा छळ केला जातो तेव्हा आपण माणसांच्या भीतीला बळी पडू नये. उलट, आपण आपल्या बांधवांना मदत करत राहिलं पाहिजे. आपण सतत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि व्यावहारिक मार्गांनी त्यांना मदत करायचा प्रयत्न केला पाहिजे. (नीति. १७:१७) छळाचा सामना करत असताना या बांधवांना आपल्या प्रेमाची आणि आपल्या मदतीची गरज आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

१२. रशियातल्या आपल्या भाऊबहिणींकडून आपण काय शिकू शकतो?

१२ रशियातल्या आपल्या प्रिय भाऊबहिणींना तुरुंगात टाकण्यात आलं, तेव्हा तिथले इतर भाऊबहीण त्यांची मदत करण्यासाठी कसे पुढे आले याचा विचार करा. या भाऊबहिणींवर खटला सुरू असताना त्यांना आपला पाठिंबा दाखवण्यासाठी बरेच भाऊबहीणसुद्धा कोर्टात यायचे. त्यांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? जेव्हा जबाबदार बांधवांची बदनामी केली जाते, किंवा त्यांना अटक केली जाते, किंवा त्यांचा छळ केला जातो, तेव्हा आपण घाबरून जाऊ नये. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांची काळजी घेतली पाहिजे आणि इतर व्यावहारिक मार्गांनी त्यांना कशी मदत करता येईल, याचा विचार केला पाहिजे.​—प्रे. कार्यं १२:५; २ करिंथ. १:१०, ११.

आपली थट्टा किंवा टीका केली जाते तेव्हा

१३. लोक आपली थट्टा किंवा टीका करतात तेव्हा यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर असलेला आपला भरवसा कसा डळमळू शकतो?

१३ आपण प्रचाराचं काम करतो आणि यहोवाच्या तत्त्वांप्रमाणे जगतो. त्यामुळे सत्यात नसलेले नातेवाईक, कामावरचे लोक किंवा शाळेतले मित्र कदाचित आपली चेष्टा करतील. (१ पेत्र ४:४) कदाचित ते म्हणतील: “तू तसा चांगला आहेस पण तुमचा धर्म खूपच कडक आहे. आजच्या जगात असं चालत नाही.” आपण बहिष्कृत लोकांसोबत जसं वागतो, त्याबद्दल काही जण आपली टीका करतील. कदाचित ते म्हणतील, “तुम्ही तर म्हणता तुमचं सगळ्यांवर प्रेम आहे, मग तुम्ही असं कसं वागता?” असं बोलणं ऐकल्यावर आपल्या मनातही शंका येऊ शकते. कदाचित आपण विचार करू, की “यहोवाचे नियम खरंच योग्य आहेत का? त्याची संघटना खूप कडक आहे का?” जर तुम्हीही अशा परिस्थितीचा सामना करत असाल, तर यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर तुम्ही आपला भरवसा कसा टिकवून ठेवू शकता?

ईयोबच्या मित्रांनी त्याची टीका केली तेव्हा त्याने त्यांच्या खोट्या गोष्टींवर विश्‍वास ठेवला नाही. उलट, त्याने यहोवाला एकनिष्ठ राहायचा आपला निश्‍चय पक्का केला (परिच्छेद १४ पाहा)

१४. यहोवाच्या स्तरांप्रमाणे वागत असल्यामुळे इतरांनी आपली थट्टा केली तर आपण काय केलं पाहिजे? (स्तोत्र ११९:५०-५२)

१४ यहोवाच्या स्तरांप्रमाणे वागत राहायचा निश्‍चय करा.  ईयोबची थट्टा करण्यात आली तरी तो यहोवाच्या स्तरांप्रमाणे वागत राहिला. त्याच्या एका मित्राने तर त्याला असं पटवून द्यायचा प्रयत्न केला, की ‘तू देवाच्या नियमांप्रमाणे चाललास काय किंवा नाही चाललास काय, त्यामुळे देवाला काही फरक पडत नाही.’ (ईयो. ४:१७, १८; २२:३) पण ईयोबने अशा खोट्या गोष्टींवर विश्‍वास ठेवला नाही. यहोवाचे स्तर योग्य आहेत हे त्याला माहीत होतं. आणि त्यांप्रमाणे वागायचा त्याने निश्‍चय केला होता. इतरांच्या बोलण्यामुळे त्याने आपला खरेपणा सोडला नाही. (ईयो. २७:५, ६) यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? इतरांनी थट्टा केली तरीही आपण यहोवाच्या स्तरांबद्दल कधीही शंका घेऊ नये. याबद्दल तुम्हाला स्वतःला आजपर्यंत काय अनुभव आलाय याचा विचार करा. यहोवाचे स्तर नेहमी योग्य असतात आणि त्यांप्रमाणे वागल्यामुळे आपला फायदाच होतो, हे तुम्ही आपल्या जीवनात बऱ्‍याचदा अनुभवलं नाही का? तर मग, यहोवाच्या या स्तरांप्रमाणे चालणाऱ्‍या संघटनेला पाठिंबा द्यायचं कधीही सोडू नका. जर तुम्ही असं केलं, तर इतरांनी कितीही थट्टा केली तरीसुद्धा तुम्ही यहोवापासून कधीही दूर जाणार नाही.​—स्तोत्र ११९:५०-५२ वाचा.

१५. ब्रिजिटची थट्टा आणि विरोध का करण्यात आला?

१५ भारतात राहणाऱ्‍या ब्रिजिट नावाच्या बहिणीच्या अनुभवावर विचार करा. ती यहोवाची साक्षीदार असल्यामुळे तिच्या कुटुंबातले लोक तिची थट्टा करायचे. तिचा बाप्तिस्मा १९९७ मध्ये झाला होता. पण तिचे पती सत्यात नव्हते. तिचा बाप्तिस्मा झाल्याच्या काही दिवसांनी तिच्या पतीची नोकरी गेली. त्यामुळे त्यांनी पूर्ण कुटुंबाला घेऊन, आपल्या आईवडिलांकडे दुसऱ्‍या शहरात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. पण ब्रिजिटच्या समस्या इथेच संपल्या नाहीत. पतीची नोकरी नसल्यामुळे कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी तिला पूर्ण वेळ काम करावं लागायचं. शिवाय, ते ज्या ठिकाणी राहत होते, तिथून सर्वात जवळची मंडळी ३५० किलोमीटर लांब होती. दुःखाची गोष्ट म्हणजे तिच्या सासरचे लोकसुद्धा तिच्या विश्‍वासामुळे तिचा विरोध करायचे. परिस्थिती इतकी वाईट झाली की ब्रिजिटच्या कुटुंबाला पुन्हा एकदा दुसऱ्‍या ठिकाणी राहायला जावं लागलं. मग अचानक तिचे पती वारले. नंतर, फक्‍त १२ वर्षांची असलेली तिची एक मुलगीसुद्धा कॅन्सरने वारली. आणि या सगळ्या वाईट गोष्टींचं खापर तिच्या नातेवाइकांनी तिच्याच डोक्यावर फोडलं. त्यांचं असं म्हणणं होतं, की ती जर साक्षीदार बनली नसती तर या सगळ्या वाईट घटना घडल्याच नसत्या. इतकं सगळं होऊनही ब्रिजिटने यहोवाला किंवा त्याच्या संघटनेला सोडलं नाही.

१६. यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर पूर्ण भरवसा ठेवल्यामुळे ब्रिजिटला कोणते आशीर्वाद मिळाले?

१६ ब्रिजिट मंडळीपासून खूप लांब राहत असल्यामुळे, एका विभागीय पर्यवेक्षकाने तिला तिच्या क्षेत्रातच प्रचार करण्याचं आणि तिच्या घरी सभा चालवण्याचं प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला तिला वाटलं की आपल्याला हे जमणारच नाही. पण तरीसुद्धा तिने दिलेल्या मार्गदर्शनाचं पालन केलं. ती प्रचार करू लागली आणि आपल्या घरीच मंडळीच्या सभा घेऊ लागली. तसंच, ती आपल्या मुलींसोबत नियमितपणे कौटुंबिक उपासनाही करत राहिली. याचा काय परिणाम झाला? ब्रिजिट बरेच बायबल अभ्यास सुरू करू शकली आणि तिच्या बऱ्‍याच बायबल विद्यार्थ्यांनी बाप्तिस्मासुद्धा घेतला. २००५ पासून ती पायनियर म्हणून सेवा करू लागली. यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे आणि त्याच्या संघटनेला एकनिष्ठ राहिल्यामुळे तिला बरेच आशीर्वाद मिळाले. आज तिच्या मुली विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत. आणि ती राहते त्या ठिकाणी आता दोन मंडळ्या आहेत. ब्रिजिटला पूर्ण खातरी आहे, की तिच्यासमोर आलेल्या सगळ्या समस्यांचा आणि कुटुंबाकडून होणाऱ्‍या थट्टेचा सामना करण्यासाठी यहोवानेच तिला ताकद दिली.

यहोवाला आणि त्याच्या संघटनेला एकनिष्ठ राहा

१७. आपण काय करायचा निश्‍चय केला पाहिजे?

१७ सैतान आपल्याला असं पटवून देण्याचा प्रयत्न करतो, की आपल्यावर समस्या येतात तेव्हा यहोवा आपल्याला सोडून देईल. आणि जर आपण यहोवाच्या संघटनेला पाठिंबा दिला, तर आपल्यासमोर आणखी जास्त समस्या येतील. जेव्हा जबाबदार बांधवांची बदनामी केली जाते, त्यांचा छळ केला जातो किंवा त्यांना तुरुंगात टाकलं जातं, तेव्हा आपण निराश व्हावं आणि घाबरून जावं असं सैतानाला वाटतं. आणि जेव्हा आपल्या विश्‍वासामुळे आपली थट्टा केली जाते, तेव्हा यहोवाच्या स्तरांवरचा आणि त्याच्या संघटनेवरचा आपला भरवसा कमी व्हावा अशी सैतानाची इच्छा आहे. पण सैतानाचे हे सगळे डावपेच आपल्याला चांगले माहीत आहेत आणि त्यामुळे आपण त्यांना बळी पडत नाही. (२ करिंथ. २:११) म्हणून सैतानाच्या या खोट्या गोष्टींचा विरोध करा आणि यहोवाला आणि त्याच्या संघटनेला नेहमी एकनिष्ठ राहा. यहोवा तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही हे लक्षात असू द्या. (स्तो. २८:७) आणि तुम्हीसुद्धा कोणत्याही गोष्टीमुळे यहोवापासून दूर जाऊ नका.​—रोम. ८:३५-३९.

१८. आपण पुढच्या लेखात कशावर चर्चा करणार आहोत?

१८ या लेखात आपण अशा काही समस्यांबद्दल चर्चा केली, ज्या मंडळीच्या बाहेरून येऊ शकतात. पण कधी-कधी मंडळीच्या आतूनच आपल्यावर समस्या येतात. आणि या समस्यांमुळेही यहोवावरचा आणि त्याच्या संघटनेवरचा आपला विश्‍वास कमजोर होऊ शकतो. मग या समस्यांवर आपण कशी मात करू शकतो? यावर पुढच्या लेखात आपण चर्चा करू या.

गीत ११९ खरा विश्‍वास बाळगू या!

a या शेवटच्या काळात येणाऱ्‍या समस्यांचा धीराने सामना करण्यासाठी आणि शेवटपर्यंत विश्‍वासात टिकून राहण्यासाठी, आपण यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर असलेला आपला भरवसा मजबूत करत राहिलं पाहिजे. पण जेव्हा आपल्यावर समस्या येतात तेव्हा सैतान आपला हा भरवसा कमजोर करायचा प्रयत्न करतो. या लेखात आपल्यावर येणाऱ्‍या अशा तीन समस्यांबद्दल आपण पाहू ज्यांचा गैरफायदा घ्यायचा सैतान प्रयत्न करतो. तसंच, या समस्यांचा सामना करत असतानाही आपण यहोवाला आणि त्याच्या संघटनेला विश्‍वासू कसं राहू शकतो हेसुद्धा आपण पाहू या.

b काही नावं बदलण्यात आली आहेत.