तुम्हाला माहीत होतं का?
मर्दखय हा इतिहासात होऊन गेलेला एक खरोखरचा व्यक्ती होता का?
बायबलमधल्या एस्तेर या पुस्तकात सांगितलेल्या घटनांमध्ये मर्दखय नावाच्या एका यहुदी माणसाची महत्त्वाची भूमिका होती. तो बंदिवासात असलेल्या यहुद्यांपैकी एक होता आणि पर्शियाच्या राजदरबारात काम करायचा. या घटना इ.स.पू. पाचव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजेच “अहश्वेरोश राजाच्या काळात” घडल्या. (हा राजा झर्कसीझ पहिला होता असं आज मानलं जातं.) राजाच्या हत्येचा कट मर्दखयने हाणून पाडला. त्यामुळे राजाने खूश होऊन मर्दखयचा जाहीर सत्कार करण्याचा आदेश दिला. मर्दखय आणि इतर यहुद्यांचा शत्रू हामान याचा मृत्यू झाल्यानंतर राजाने मर्दखयला प्रधानमंत्री बनवलं. हे पद मिळाल्यामुळे मर्दखय एक फर्मान काढू शकला आणि त्या फर्मानामुळे पर्शियाच्या साम्राज्यात राहणाऱ्या यहुद्यांचा मोठ्या प्रमाणात संहार होण्यापासून बचाव झाला.—एस्ते. १:१; २:५, २१-२३; ८:१, २; ९:१६.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला काही इतिहासकारांचं असं म्हणणं होतं, की एस्तेर पुस्तकातल्या घटना काल्पनिक आहेत आणि मर्दखय नावाचा माणूस कधीच अस्तित्वात नव्हता. पण १९४१ मध्ये पुरातन वस्तूंचा शोध घेणाऱ्यांना असे काही पुरावे सापडले ज्यांमुळे मर्दखयबद्दल बायबलमध्ये दिलेली माहिती खरी आहे असं म्हणता येईल. त्यांना नेमकं काय सापडलं?
या संशोधन करणाऱ्यांना पर्शियन भाषेतले असे काही ऐतिहासिक लेख सापडले ज्यात मारडूका (इंग्रजीत मॉर्डीकाय) नावाच्या एका माणसाचा उल्लेख आहे. तो शूशन शहरात एक प्रशासकीय अधिकारी होता. कदाचित तो जमाखर्च अहवाल तपासण्याचं काम करत असेल. या लेखांचा शोध लागला तेव्हा पूर्वेकडच्या देशाच्या इतिहासाचा अभ्यास करणारे विद्वान आर्टूर अंगनाड यांनी असं म्हटलं, की “बायबलच्या बाहेर मर्दखयचा उल्लेख येण्याची” ही पहिलीच वेळ आहे.
अंगनाड यांचा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून आजपर्यंत विद्वानांनी पर्शियाच्या हजारो ऐतिहासिक लेखांचं भाषांतर केलं आहे. यांचं एक उदाहरण म्हणजे पर्सिपोलिस शहराजवळ सापडलेल्या छोट्या-छोट्या मातीच्या पाट्या. या पाट्या त्यांना शहराच्या भिंतींजवळ असलेल्या शाही खजिन्याच्या अवशेषांमधून सापडल्या. आणि त्या झर्कसीझ पहिला याच्या शासनकाळातल्या आहेत. या पाट्यांवरचं लिखाण एलामी भाषेत आहे आणि एस्तेर पुस्तकात उल्लेख केलेली बरीच नावं त्यांत आढळतात. a
पर्सिपोलिसमध्ये सापडलेल्या बऱ्याच मातीच्या पाट्यांवर मारडूका या नावाचा उल्लेख आहे. तो झर्कसीझ पहिला याच्या शासनकाळात शूशनच्या राजदरबारात राजाचा सचिव म्हणून काम करत होता. एका पाटीवर मारडूका हा भाषांतरकार होता असं म्हटलंय. बायबलमध्ये मर्दखयबद्दल जी माहिती दिली आहे त्याच्याशी ही माहिती जुळते. बायबलमध्ये सांगितलंय, की तो अहश्वेरोश (झर्कसीझ पहिला) राजाच्या दरबारात एक अधिकारी होता आणि त्याला कमीत कमी दोन भाषा बोलता येत होत्या. तसंच मर्दखय शूशनच्या राजमहालाच्या दरवाजाजवळ नेहमी बसायचा असंही बायबलमध्ये सांगितलंय. (एस्ते. २:१९, २१; ३:३) राजमहालाचा हा दरवाजा म्हणजे एक मोठी इमारत होती आणि इथे राजदरबारातल्या बऱ्याच अधिकाऱ्यांचं कामकाज चालायचं.
ऐतिहासिक लेखांमध्ये उल्लेख केलेला मारडूका आणि बायबलमध्ये सांगण्यात आलेला मर्दखय यांच्यात बऱ्याच लक्षवेधक साम्यता दिसून येतात. ते एकाच काळात, एकाच शहरात आणि एकाच कामाच्या ठिकाणी अधिकारी म्हणून सेवा करत होते. या सगळ्या गोष्टींवरून दिसून येतं, की ऐतिहासिक लेखांमध्ये उल्लेख केलेला मारडूका आणि बायबलमधल्या एस्तेरच्या पुस्तकात सांगितलेला मर्दखय हे दोघंही कदाचित एकच व्यक्ती असावेत.
a १९९२ मध्ये प्रोफेसर एडविन एम. येमाऊची यांनी एक लेख प्रकाशित केला ज्यात पर्सिपोलिसमध्ये सापडलेल्या ऐतिहासिक लेखात असलेली अशी दहा नावं आहेत ज्यांचा उल्लेख एस्तेरच्या पुस्तकातसुद्धा सापडतो.