व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४६

यहोवा आपल्याला आनंदाने त्याची सेवा करत राहायला कशी मदत करतो?

यहोवा आपल्याला आनंदाने त्याची सेवा करत राहायला कशी मदत करतो?

“तुमच्यावर कृपा करण्यासाठी यहोवा धीराने वाट पाहत आहे, तुम्हाला दया दाखवण्यासाठी तो पाऊल उचलेल.”​—यश. ३०:१८.

गीत ३ यहोवा आपलं बळ आणि आसरा

सारांश a

१-२. (क) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत? (ख) आपली मदत करायला यहोवा उत्सुक आहे, हे कशावरून दिसून येतं?

 यहोवा आपल्याला जीवनातल्या समस्यांचा सामना करायला आणि आनंदाने त्याची सेवा करत राहायला मदत करतो. तो कोणत्या मार्गांनी आपल्याला मदत करतो? आणि यहोवा देत असलेल्या मदतीचा आपण पूर्ण फायदा कसा घेऊ शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला या लेखात मिळतील. पण त्याआधी आपण या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घेऊ या, की यहोवाला खरंच आपली मदत करायची इच्छा आहे का?

हे जाणून घेण्यासाठी प्रेषित पौलने इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात वापरलेल्या एका वाक्यांशाकडे आपण लक्ष देऊ या. पौलने लिहिलं: “यहोवा मला साहाय्य करतो;  मी घाबरणार नाही. माणूस माझं काय बिघडवू शकतो?” (इब्री १३:६) बायबलवर आधारित असलेल्या एका पुस्तकात “साहाय्य करतो” या वाक्यांशाचा अर्थ स्पष्ट केलाय. त्यात म्हटलंय, की हे शब्द अशा व्यक्‍तीला सूचित करतात, जो मदतीसाठी हाक मारणाऱ्‍या एखाद्याला संकटातून सोडवायला धावून येतो. यहोवा संकटात असलेल्या एखाद्या व्यक्‍तीच्या मदतीला धावून जातोय, असं चित्र तुमच्या डोळ्यांपुढे उभं करा. यावरून यहोवाला आपली मदत करायची खरंच मनापासून इच्छा आहे, आणि तो असं करायला उत्सुक आहे, हेच दिसून येत नाही का? यहोवा आपल्यासोबत असल्यामुळे आपण कोणत्याही समस्यांचा सामना करत असताना आनंदी राहू शकतो.

३. आपल्यासमोर येणाऱ्‍या परीक्षांचा धीराने सामना करायला आणि आनंदी राहायला यहोवा कोणत्या तीन मार्गांनी आपली मदत करतो?

आपल्या जीवनात येणाऱ्‍या परीक्षांचा धीराने सामना करायला आणि आनंदी राहायला यहोवा कोणत्या काही मार्गांनी आपल्याला मदत करतो याचं उत्तर आपल्याला यशयाच्या पुस्तकातून मिळतं. असं आपण का म्हणतो? कारण यशयाने देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या बऱ्‍याच भविष्यवाण्या आजच्या काळातल्या देवाच्या सेवकांच्या बाबतीत पूर्ण होत आहेत. शिवाय बऱ्‍याच ठिकाणी यशयाने आपल्याला समजू शकेल अशा शब्दांत यहोवाचं वर्णन केलंय. याची काही उदाहरणं आपण यशयाच्या ३० व्या अध्यायात पाहू शकतो. यहोवा आपल्याला कशी मदत करतो हे स्पष्ट करण्यासाठी यशया काही शब्दचित्रं आपल्या डोळ्यांसमोर उभी करतो. तो सांगतो, की यहोवा (१) आपल्या प्रार्थना लक्षपूर्वक ऐकून आणि त्यांचं उत्तर देऊन (२) आपलं मार्गदर्शन करून आणि (३) आपल्याला आज आणि भविष्यातही आशीर्वाद देऊन मदत करतो. या तीन मार्गांनी यहोवा आपली नेमकी कशी मदत करतो, हे आता आपण पाहू या.

यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो

४. (क) यशयाच्या काळातल्या यहुद्यांबद्दल यहोवाने काय म्हटलं आणि त्याने त्यांच्या बाबतीत काय होऊ दिलं? (ख) त्यांच्यापैकी विश्‍वासू असलेल्यांना यहोवाने कोणता आशेचा संदेश दिला? (यशया ३०:१८, १९)

यशयाच्या ३० व्या अध्यायाच्या सुरवातीला यहोवा यहुद्यांना ‘हट्टी मुलं’ म्हणतो. आणि “ते आपल्या पापात आणखी भर घालतात,” असं तो म्हणतो. तो पुढे म्हणतो: “ते बंडखोर लोक आहेत, . . . यहोवाची शिकवण ऐकायची त्यांची मुळीच इच्छा नाही.” (यश. ३०:१, ९) त्या लोकांनी यहोवाचं ऐकायला नकार दिल्यामुळे यशयाने सांगितलं, की यहोवा त्यांच्यावर संकट येऊ देईल. (यश. ३०:५, १७; यिर्म. २५:८-११) आणि अगदी तसंच झालं. त्या लोकांना बंदी बनवून बाबेलला नेण्यात आलं. पण त्या यहुद्यांपैकी काही जण विश्‍वासू होते. आणि यशयाने त्यांच्यासाठी एक आशेचा संदेश दिला. त्याने त्यांना सांगितलं, की यहोवा एक दिवस त्यांना यरुशलेमला पुन्हा परत आणेल आणि ते तिथे राहू शकतील. (यशया ३०:१८, १९ वाचा.) यशयाचे हे शब्द पूर्ण झाले. यहोवाने त्यांना बंदिवासातून सोडवलं. पण त्यांची सुटका लगेच झाली नाही. यशयाने म्हटलं होतं, की “तुमच्यावर कृपा करण्यासाठी यहोवा धीराने वाट पाहत आहे.” या शब्दांवरून कळतं, की विश्‍वासू यहुद्यांची सुटका होण्याआधी काही काळ जाणार होता. खरंतर इस्राएली लोकांना ७० वर्षं बाबेलमध्ये राहावं लागलं आणि त्यानंतरच त्यांच्यापैकी उरलेले काही लोक यरुशलेमला परत येऊ शकले. (यश. १०:२१; यिर्म. २९:१०) बंदिवासात असताना ते दुःखाचे अश्रू गाळत होते. पण आपल्या मायदेशी परत आल्यावर त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले.

५. यशया ३०:१९ मधून आपल्याला कोणती खातरी मिळते?

आज आपल्याला यशयाच्या या शब्दांतून सांत्वन मिळतं: “तू मदतीसाठी हाक मारताच  देव तुझ्यावर कृपा करेल.” (यश. ३०:१९) यशया आपल्याला ही खातरी देतो, की जेव्हा आपण यहोवाला मदतीसाठी हाक मारतो, तेव्हा तो लक्ष देऊन ऐकेल. आणि आपल्या प्रार्थनांचं लवकर उत्तर देईल. यशया पुढे म्हणतो: “तुझी हाक ऐकताच तो तुला उत्तर देईल.” हे शब्द आपला भरवसा वाढवतात आणि आपल्याला याची आठवण करून देतात, की आपला पिता त्याला हाक मारणाऱ्‍यांना मदत करायला उत्सुक आहे. ही गोष्ट समजल्यामुळे आपल्याला आपल्या समस्यांचा धीराने सामना करायला आणि आनंदी राहायला मदत मिळते.

६. यहोवा त्याच्या प्रत्येक सेवकाची प्रार्थना ऐकतो, हे यशयाच्या शब्दांवरून कसं कळतं?

या वचनातून आपल्याला आपल्या प्रार्थनांबद्दल आणखी काय शिकायला मिळतं? हेच, की यहोवा आपल्यापैकी प्रत्येकाच्या प्रार्थनेकडे लक्ष देतो. आपण असं का म्हणू शकतो? यशयाच्या ३० व्या अध्यायाच्या सुरवातीला “तुम्ही” हे सर्वनाम वापरलेलं आहे. कारण तिथे यहोवा आपल्या सर्व लोकांना उद्देशून बोलत आहे. पण १९ व्या वचनात “तू” हे सर्वनाम वापरलं आहे. यावरून कळतं, की यातला संदेश यहोवाच्या प्रत्येक सेवकाला उद्देशून लिहिला आहे. यशया लिहितो, की “तू  मुळीच शोक करणार नाहीस”; “देव तुझ्यावर  कृपा करेल”; “तो तुला  उत्तर देईल.” यहोवा कधीही आपली तुलना इतरांशी करत नाही. एका प्रेमळ पित्याप्रमाणे तो आपल्या निराश झालेल्या मुलाला किंवा मुलीला असं म्हणत नाही, की ‘तू तुझ्या भावासारखं किंवा बहिणीसारखं मजबूत आणि खंबीर असलं पाहिजे.’ उलट, आपल्या प्रत्येकाबद्दल त्याला काळजी आहे. आणि तो आपल्या प्रत्येकाच्या प्रार्थना लक्ष देऊन ऐकतो.​—स्तो. ११६:१; यश. ५७:१५.

“[यहोवाला] स्वस्थ बसू देऊ नका” असं यशया म्हणाला त्याचा काय अर्थ होतो? (परिच्छेद ७ पाहा)

७. वारंवार प्रार्थना करत राहणं किती महत्त्वाचं आहे, हे यशयाच्या आणि येशूच्या शब्दांवरून कसं कळतं?

जेव्हा आपण यहोवाला प्रार्थना करून आपली एखादी चिंता त्याला सांगतो, तेव्हा यहोवा कदाचित आधी आपल्याला त्या समस्येचा सामना करण्यासाठी ताकद देईल. आणि जर आपल्या अपेक्षेप्रमाणे आपली समस्या लगेच दूर झाली नाही, तर तिचा सामना करण्यासाठी आपण वारंवार यहोवाला प्रार्थना करून ताकद मागितली पाहिजे. यहोवा स्वतः आपल्याला असं करायचं प्रोत्साहन देतो. हे यशयाच्या या शब्दांवरून आपल्याला कळतं: “[यहोवाला] स्वस्थ बसू देऊ नका.” (यश. ६२:७) या शब्दांचा काय अर्थ होतो? याचा असा अर्थ होतो, की आपण यहोवाला सतत प्रार्थना करत राहिलं पाहिजे. इतक्या वेळा, की जणू त्याला जराही स्वस्थ बसता येणार नाही. यशयाच्या या शब्दांवरून आपल्याला येशूने दिलेल्या एका उदाहरणाचीही आठवण होते. प्रार्थनेबद्दल असलेलं ते उदाहरण आपल्याला लूक ११:८-१०, १३ या वचनांत वाचायला मिळतं. तिथे येशू आपल्याला सांगतो, की पवित्र शक्‍ती मिळावी म्हणून आपण ‘न लाजता वारंवार’ यहोवाकडे ‘मागत राहिलं’ पाहिजे. तसंच योग्य निर्णय घेता यावेत म्हणून आपण मार्गदर्शनासाठीही यहोवाला विनंती करू शकतो.

यहोवा आपलं मार्गदर्शन करतो

८. प्राचीन काळात यशया ३०:२०, २१ मध्ये दिलेले शब्द कसे पूर्ण झाले?

यशया ३०:२०, २१ वाचा. बाबेलच्या सैन्याने जेव्हा यरुशलेमला दीड वर्षापर्यंत वेढा घातलेला होता, तेव्हा लोकांना खूप दुःख सहन करावं लागलं होतं. भाकर आणि पाणी यासारख्या रोजच्या गोष्टींप्रमाणे त्यांच्यासाठी दुःख सोसणं हे सर्वसामान्य झालं होतं. पण २० आणि २१ वचनांप्रमाणे यहोवाने यहुद्यांना असं वचन दिलं, की जर त्यांनी पश्‍चात्ताप केला आणि आपल्या वागण्यात बदल केला तर तो त्यांची सुटका करेल. यहोवाला “महान शिक्षक” असं म्हणून यशयाने लोकांना वचन दिलं, की यहोवा त्यांना योग्य प्रकारे उपासना करायला शिकवेल. हे शब्द यहुद्यांची बंदिवासातून सुटका झाली तेव्हा पूर्ण झाले. यहोवाच्या मार्गदर्शनाने त्याचे लोक शुद्ध उपासना पुन्हा सुरू करू शकले. आणि अशा रीतीने यहोवाने हे दाखवून दिलं, की तो खरंच एक महान शिक्षक आहे. आज यहोवा आपलाही महान शिक्षक आहे, हा खरंच किती मोठा आशीर्वाद आहे!

९. यहोवा आज आपल्याला कोणत्या एका मार्गाने शिकवतो?

पुढे आणखी एका शब्दचित्राचा वापर करून यशया आपली तुलना विद्यार्थ्यांशी करतो. आणि आपला शिक्षक यहोवा दोन मार्गांनी शिकवत आहे असं तो सांगतो. यांपैकी पहिला मार्ग कोणता? आधी यशया असं म्हणतो: “तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तुमच्या महान शिक्षकाला पाहाल.” या शब्दचित्रात यहोवा जणू आपल्या समोर उभा राहून आपल्याला शिकवतोय. हा आपल्यासाठी खरंच खूप मोठा बहुमान आहे. आणि त्याच्याकडून मिळणाऱ्‍या शिक्षणामुळे आपल्याला खूप फायदा होतो. पण आज यहोवाचं मार्गदर्शन आपल्याला कसं मिळतं? त्याच्या संघटनेद्वारे. संघटनेकडून आपल्याला जे स्पष्ट मार्गदर्शन मिळतं, त्याबद्दल आपण खरंच किती आभारी आहोत! हे मार्गदर्शन आपल्याला मंडळीच्या सभांमधून, अधिवेशनांमधून, तसंच प्रकाशनांमधून, ब्रॉडकास्टिंगच्या कार्यक्रमांमधून आणि अशा इतर बऱ्‍याच मार्गांनी मिळतं. या मार्गदर्शनामुळे आपल्याला कठीण परिस्थितीचा धीराने सामना करता येतो आणि आनंदी राहता येतं.

१०. “मागून एक आवाज तुमच्या कानांवर पडेल,” या शब्दांचा काय अर्थ होतो?

१० यहोवा आपल्याला आणखी एका मार्गाने शिकवतो असं यशया सांगतो. तो म्हणतो: “मागून एक आवाज तुमच्या कानांवर पडेल.” या शब्दचित्रात यशया यहोवाची तुलना अशा एका शिक्षकाशी करतो, जो आपल्या विद्यार्थ्यांच्या मागेमागे चालत आहे आणि कोणत्या मार्गाने जायचं हे त्यांना सांगत आहे. आजसुद्धा यहोवाचा आवाज मागून आपल्या कानांवर पडतो. तो कसा? देवाचे प्रेरित शब्द बायबलमध्ये बऱ्‍याच काळाआधी लिहून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे, जेव्हा आपण बायबल वाचतो, तेव्हा एका अर्थाने देवाचा आवाज मागून आपल्या कानांवर पडतो.​—यश. ५१:४.

११. यहोवाची सेवा आनंदाने करत राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि का?

११ यहोवा त्याच्या संघटनेद्वारे आणि त्याच्या वचनाद्वारे आपल्याला जे मार्गदर्शन देत आहे, त्याचा पूर्णपणे फायदा घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? याबद्दल यशया कोणत्या दोन गोष्टी सांगतो त्याकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे “योग्य मार्ग हा आहे,” असं तो म्हणतो. आणि दुसरी म्हणजे “यावर चाला.” (यश. ३०:२१) “योग्य मार्ग” माहीत असणं पुरेसं नाही, तर आपण ‘त्यावर चाललंही’ पाहिजे. आज यहोवाची संघटना त्याच्या वचनाचा अर्थ आपल्याला समजावून सांगते. आणि त्यावरून आपल्याला कळतं, की यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो. तसंच, आपण जे काही शिकतो ते आपण आपल्या जीवनात कसं लागू करू शकतो हेही आपल्याला समजतं. यहोवाची सेवा कोणत्याही परिस्थितीत आनंदाने करत राहण्यासाठी आपण या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत. असं केल्यामुळेच आपण ही खातरी ठेवू शकतो, की यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल.

यहोवा आपल्याला आशीर्वाद देतो

१२. यशया ३०:२३-२६ यांत सांगितल्याप्रमाणे यहोवा कशा प्रकारे त्याच्या लोकांना आशीर्वाद देणार होता?

१२ यशया ३०:२३-२६ वाचा. बाबेलच्या बंदिवासातून इस्राएलला परत आलेल्या यहुद्यांच्या बाबतीत ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? त्यांना शारीरिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही प्रकारचे आशीर्वाद भरपूर प्रमाणात मिळाले. यहोवाने आपल्या लोकांना खायला प्यायला भरपूर प्रमाणात अन्‍न दिलं. पण याहून महत्त्वाचं म्हणजे, जसजशी शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यात आली, तसतसं यहोवाने त्यांना आध्यात्मिक अन्‍न मोठ्या प्रमाणात दिलं. देवाच्या उपासनेत त्यांनी पूर्वी कधीही अनुभवले नव्हते, इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना आशीर्वाद मिळाले. २६ व्या वचनात सांगितलंय, की यहोवाने त्यांना आणखी मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक प्रकाश दिला, म्हणजेच त्याचं वचन आणखी स्पष्टपणे समजून घ्यायला त्यांना मदत केली. (यश. ६०:२) यहोवाने दिलेल्या या सगळ्या आशीर्वादांमुळे त्याच्या लोकांचं मन आनंदित झालं. आणि यामुळे त्यांना आनंदाने आणि मनापासून त्याची सेवा करायचं बळ मिळालं.​—यश. ६५:१४.

१३. शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दलची भविष्यवाणी आज आपल्या काळात कशी पूर्ण झाली आहे?

१३ शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दलची ही भविष्यवाणी आज आपल्यालाही लागू होते का? हो नक्कीच! पण कशी? १९१९ पासून मोठी बाबेल म्हणजे जगभरातल्या खोट्या धर्मांच्या साम्राज्यातून लाखो लोकांची सुटका झाली आहे. जुन्या काळातल्या वचन दिलेल्या देशापेक्षाही एका चांगल्या देशात या लोकांना आणण्यात आलंय. हा देश म्हणजे आपलं आध्यात्मिक नंदनवन. (यश. ५१:३; ६६:८) पण हे आध्यात्मिक नंदनवन म्हणजे नेमकं काय?

१४. आध्यात्मिक नंदनवन म्हणजे नेमकं काय आणि आज त्यात कोण राहत आहेत? (शब्दांचा अर्थ पाहा)

१४ १९१९ पासून अभिषिक्‍त जन आध्यात्मिक नंदनवनात राहत आहेत. b पुढे, पृथ्वीवर राहण्याची आशा असलेली ‘दुसरी मेंढरंसुद्धा’ या आध्यात्मिक देशात राहू लागली आणि त्यांनासुद्धा यहोवाकडून भरपूर आशीर्वाद मिळाले आहेत.​—योहा. १०:१६; यश. २५:६; ६५:१३.

१५. आज आध्यात्मिक नंदनवन पृथ्वीवर कुठे आहे?

१५ हा आध्यात्मिक देश किंवा नंदनवन आज पृथ्वीवर कुठे आहे? यहोवाचे उपासक आज पृथ्वीच्या सर्व भागांत राहत आहेत. त्यामुळे त्यांचं हे आध्यात्मिक नंदनवनसुद्धा सबंध जगभरात पसरलेलं आहे. म्हणून आपण पृथ्वीवर कुठेही राहत असलो, तरी आपण या देशात म्हणजे आध्यात्मिक नंदनवनात राहू शकतो. पण त्यासाठी आपल्याला आपल्या वागण्या-बोलण्यातून शुद्ध उपासनेला नेहमी पाठिंबा देत राहावा लागेल.

आपल्यापैकी प्रत्येक जण आध्यात्मिक नंदनवनाची सुंदरता कशी वाढवू शकतो? (परिच्छेद १६-१७ पाहा)

१६. आध्यात्मिक नंदनवनातल्या कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे?

१६ आध्यात्मिक नंदनवनात राहण्यासाठी आपण सबंध जगात असलेल्या ख्रिस्ती मंडळीबद्दल मनापासून कदर बाळगली पाहिजे. आपण हे कसं करू शकतो? यासाठी आपण या नंदनवनात राहणाऱ्‍यांच्या कमतरतांकडे नाही, तर त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष दिलं पाहिजे. (योहा. १७:२०, २१) हे इतकं महत्त्वाचं का आहे? हे समजून घेण्यासाठी एका खऱ्‍याखुऱ्‍या बागेचा विचार करा. तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात. तसंच आध्यात्मिक नंदनवनातसुद्धा वेगवेगळ्या स्वभावांचे आणि संस्कृतींचे भाऊबहीण आहेत. (यश. ४४:४; ६१:३) आपल्याला जवळून जी “झाडं” दिसतात त्यात असलेल्या दोषांकडे नाही, तर संपूर्ण “बाग” किती सुंदर दिसते याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या किंवा मंडळीतल्या इतरांच्या कमतरतांमुळे, आपलं संपूर्ण जगभरातलं ख्रिस्ती कुटुंब किती सुंदर आहे याकडे दुर्लक्ष करू नये.

१७. मंडळीतली एकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण काय करू शकतो?

१७ मंडळीतली एकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण काय करू शकतो? यासाठी आपण स्वतः सर्वांसोबत शांतीने राहू शकतो आणि इतरांनाही तसं करायला मदत करून शकतो. (मत्त. ५:९; रोम. १२:१८) जेव्हा-जेव्हा आपण मंडळीतल्या इतरांसोबत शांतीचे संबंध टिकवून ठेवायला पुढाकार घेतो, तेव्हा-तेव्हा आपण आध्यात्मिक नंदनवनाची सुंदरता आणखी वाढवत असतो. या आध्यात्मिक नंदनवनात राहत असलेल्या प्रत्येकाला यहोवाने खऱ्‍या उपासनेकडे आकर्षित केलं आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवतो. (योहा. ६:४४) यहोवाच्या नजरेत त्याचा प्रत्येक सेवक खूप मौल्यवान आहे. त्यामुळे जेव्हा आपण यहोवाच्या या मौल्यवान सेवकांसोबत म्हणजेच आपल्या भाऊबहिणींसोबत शांती आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घेतो, तेव्हा हे पाहून यहोवाला किती आनंद होत असेल याची कल्पना करा!​—यश. २६:३; हाग्ग. २:७.

१८. आपण कोणत्या गोष्टींवर नेहमी मनन केलं पाहिजे आणि का?

१८ यहोवा त्याच्या सेवकांना भरपूर आशीर्वाद देतो. मग आपण या आशीर्वादांचा पूर्ण फायदा कसा घेऊ शकतो? यासाठी आपण बायबलमध्ये आणि बायबलवर आधारित असलेल्या प्रकाशनांमध्ये जे काही वाचतो, त्यावर खोलवर विचार केला पाहिजे. अशा प्रकारे अभ्यास आणि मनन केल्यामुळे आपल्यामध्ये ख्रिस्ती गुण विकसित होतील. आणि यामुळे आपल्याला मंडळीत सर्वांवर ‘भावाभावांसारखं प्रेम करून एकमेकांबद्दल आपुलकी बाळगता येईल.’ (रोम. १२:१०) यहोवाने आज आपल्याला जे आशीर्वाद दिले आहेत त्यावर मनन केल्यामुळे त्याच्यासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होतं. आणि पुढे यहोवा आपल्याला जे आशीर्वाद देणार आहे, त्यावर मनन केल्यामुळे कायम त्याची सेवा करत राहण्याची आपली आशा आणखी मजबूत होते. आणि या सर्व गोष्टींमुळे आपण आता आनंदाने यहोवाची सेवा करू शकतो.

शेवटपर्यंत टिकून राहण्याचा निश्‍चय करा

१९. (क) यशया ३०:१८ या वचनात सांगितल्याप्रमाणे आपण कोणती खातरी ठेवू शकतो? (ख) यहोवाच्या सेवा आनंदाने करत राहायला आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

१९ यहोवा या दुष्ट जगाचा अंत करेल तेव्हा आपल्याला वाचवण्यासाठी तो “पाऊल उचलेल.” (यश. ३०:१८) यहोवा “न्यायी देव” आहे, त्यामुळे आपण ही खातरी बाळगू शकतो, की तो सैतानाच्या जगाचा नाश करण्यासाठी एक दिवसही उशीर लावणार नाही. (यश. २५:९) आपल्या सुटकेच्या त्या दिवसाची आपण यहोवासोबत मिळून धीराने वाट पाहत आहोत. पण तो दिवस येईपर्यंत आपण सतत प्रार्थना करत राहू या, देवाच्या वचनाचा अभ्यास करून ते लागू करत राहू या आणि आपल्या आशीर्वादांवर मनन करत राहू या. जर आपण असं केलं तर यहोवा आपल्याला शेवटपर्यंत त्याच्या सेवेत टिकून राहायला आणि आनंदाने त्याची उपासना करत राहायला मदत करेल.

गीत १४६ सर्व काही नवीन झालं आहे!

a यहोवा आपल्या उपासकांना जीवनातल्या समस्यांचा धीराने सामना करायला आणि आनंदी राहायला मदत करतो. तो हे कोणत्या तीन मार्गांनी करतो याबद्दल आपण या लेखात यशयाच्या ३० व्या अध्यायातून पाहू या. या अध्यायावर चर्चा करत असताना यहोवाला प्रार्थना करणं, त्याच्या वचनाचा अभ्यास करणं आणि आजच्या आणि भविष्यातल्या आशीर्वादांवर मनन करणं इतकं महत्त्वाचं का आहे, हे आपल्याला समजेल.

b शब्दांचा अर्थ: “आध्यात्मिक नंदनवन” म्हणजे अशी स्थिती किंवा वातावरण ज्यात आपल्याला सुरक्षित वाटतं आणि ज्यात आपण आपल्या भाऊबहिणींसोबत मिळून एकत्रितपणे यहोवाची उपासना करतो. या आध्यात्मिक नंदनवनात आपल्याला भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न मिळतं आणि त्यात कोणत्याही प्रकारच्या खोट्या शिकवणी मिसळलेल्या नसतात. तसंच आपल्याजवळ भरपूर प्रमाणात समाधान देणारं कामसुद्धा आहे. कारण आपण देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश लोकांना सांगतो. आपलं यहोवासोबत जवळचं नातं आहे आणि आपल्या भाऊबहिणींसोबत आपण प्रेमाने आणि शांतीने राहतो. आपल्या जीवनात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा हे भाऊबहीण आपल्याला त्यांचा धीराने सामना करायला आणि आनंदी राहायला मदत करतात. आपण जेव्हा यहोवाची योग्य प्रकारे उपासना करायला सुरवात करतो आणि त्याचं अनुकरण करायचा होईल तितका प्रयत्न करतो तेव्हा आपण या आध्यात्मिक नंदनवनात राहू लागतो.