अभ्यास लेख ४५
यहोवा आपल्याला आपली सेवा पूर्ण करायला कशी मदत करतो?
‘त्यांना समजेल, की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा होता.’—यहे. २:५.
गीत ६७ संदेश सांगू या!
सारांश a
१. आपल्याला काय माहीत आहे आणि तरी आपण कोणती खातरी ठेवू शकतो?
आपलं प्रचाराचं काम करत असताना लोक आपला विरोध करतील हे आपल्याला माहीतच आहे. आणि भविष्यात आपल्याला जास्त विरोधाचा सामना करावा लागू शकतो. (दानी. ११:४४; २ तीम. ३:१२; प्रकटी. १६:२१) पण असं असलं तरी यहोवा आपल्याला लागणारी सगळी मदत नक्की पुरवेल. असं आपण का म्हणू शकतो? कारण यहोवाने त्याच्या सेवकांना आजपर्यंत नेहमीच मदत केली आहे; मग त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या कितीही कठीण असल्या तरीही. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे बाबेलमधल्या यहुदी बंदिवानांना प्रचार करणारा यहेज्केल संदेष्टा. चला, आपण त्याच्या जीवनातल्या काही घटनांवर चर्चा करू या.
२. (क) यहेज्केलच्या काळातल्या लोकांबद्दल यहोवाने काय म्हटलं? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत? (यहेज्केल २:३-६)
२ यहेज्केलला कशा प्रकारच्या लोकांना प्रचार करायचा होता? यहोवाने त्या लोकांबद्दल म्हटलं, की ते “मगरूर,” ‘कठोर मनाचे’ आणि “बंडखोर” आहेत. ते लोक इतके दुष्ट आणि क्रूर होते की यहोवाने त्यांची तुलना काट्या-कुट्यांशी आणि विंचवांशी केली. आणि म्हणूनच यहोवाने पुन्हा-पुन्हा यहेज्केलला सांगितलं: “भिऊ नकोस”! (यहेज्केल २:३-६ वाचा.) यहेज्केलला अशा प्रकारच्या लोकांमध्ये प्रचाराचं काम करायचं होतं, तरीसुद्धा तो आपलं काम पूर्ण करू शकला. कारण (१) यहोवाने त्याला पाठवलं होतं, (२) देवाच्या पवित्र शक्तीमुळे त्याला ताकद मिळाली आणि (३) देवाच्या शब्दांमुळे त्याचा विश्वास मजबूत झाला. या तीन गोष्टींमुळे यहेज्केलला नेमकी कशी मदत झाली आणि या गोष्टी आज आपल्याला कशा मदत करू शकतात, हे आता आपण पाहू या.
यहेज्केलला यहोवाने पाठवलं होतं
३. यहेज्केलला कोणत्या शब्दांमुळे प्रोत्साहन मिळालं असेल? आणि यहोवा आपल्याला मदत करेल अशी खातरी त्याला कशी मिळाली?
३ यहोवाने यहेज्केलला म्हटलं: ‘मी तुला पाठवतोय.’ (यहे. २:३, ४) यहोवाच्या या शब्दांमुळे यहेज्केलला नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल. असं का? कारण यहोवाने मोशे आणि यशया यांना आपले संदेष्टे म्हणून निवडलं, तेव्हासुद्धा त्याने अशाच प्रकारचे शब्द वापरले होते हे त्याला आठवलं असेल. (निर्ग. ३:१०; यश. ६:८) तसंच या दोन्ही संदेष्ट्यांना त्यांच्या कठीण जबाबदाऱ्या पूर्ण करायला यहोवाने कशी मदत केली होती हेसुद्धा यहेज्केलला माहीत होतं. म्हणून ‘मी तुला पाठवतोय’ असं यहोवा जेव्हा दोनदा यहेज्केलला म्हणाला तेव्हा त्याला या गोष्टीची खातरी पटली असेल, की यहोवा नक्की त्याला मदत करेल. इतकंच नाही तर यहेज्केलच्या पुस्तकात “मला यहोवाकडून असा संदेश मिळाला” आणि “यहोवाकडून मला पुन्हा एकदा असा संदेश मिळाला” ही वाक्यं बऱ्याचदा वाचायला मिळतात. (यहे. ३:१६; ६:१) या सर्व गोष्टींमुळे यहेज्केलची पक्की खातरी पटली असेल, की यहोवाच त्याला पाठवत आहे. तसंच, यहेज्केल एका याजकाचा मुलगा होता. त्यामुळे आधीच्या काळात यहोवाने आपल्या संदेष्ट्यांना मदत करायचं वचन कसं दिलं होतं हे त्याच्या वडिलांनी त्याला शिकवलं असेल. यहोवाने इसहाक, याकोब आणि यिर्मया यांना म्हटलं होतं: “मी तुझ्यासोबत आहे.”—उत्प. २६:२४; २८:१५; यिर्म. १:८.
४. कोणत्या गोष्टींवर विचार केल्यामुळे यहेज्केलला सांत्वन मिळालं असेल?
४ यहेज्केलचा संदेश इस्राएली लोक ऐकणार होते का? यहोवाने म्हटलं: “इस्राएलचं घराणं मात्र तुझं ऐकणार नाही, कारण त्यांना माझं ऐकायचंच नाही.” (यहे. ३:७) यहेज्केलला नाकारून खरंतर लोक यहोवाला नाकारत होते. यहोवाच्या शब्दांमुळे यहेज्केलला सांत्वन मिळालं असेल. कारण लोकांनी त्याचा संदेश ऐकला नाही तरी तो संदेष्टा म्हणून कुठेतरी कमी पडला होता, असा त्याचा अर्थ होत नव्हता. यहोवाने त्याला असंही सांगितलं की त्याने घोषित केलेले न्यायदंड खरे ठरतील तेव्हा लोकांना कळेल, की “त्यांच्यामध्ये खरोखर एक संदेष्टा होता.” (यहे. २:५; ३३:३३) या सगळ्या गोष्टींवर विचार केल्यामुळे यहेज्केलला सांत्वन मिळालं असेल. आणि आपलं प्रचाराचं काम पूर्ण करण्यासाठी ताकद मिळाली असेल.
आज आपल्यालाही यहोवाने पाठवलं आहे
५. यशया ४४:८ प्रमाणे आपल्याला कशामुळे धैर्य मिळतं?
५ आज आपल्यालासुद्धा यहोवाने पाठवलं आहे हे समजल्यामुळे आपल्याला धैर्य मिळतं. तो आपल्याला त्याचे “साक्षीदार” म्हणतो. (यश. ४३:१०) हा आपल्यासाठी खरंच किती मोठा सन्मान आहे! जसं यहोवाने यहेज्केलला म्हटलं: “भिऊ नकोस,” तसंच यहोवा आपल्यालासुद्धा म्हणतो: “घाबरू नका.” आपल्याला आपल्या विरोधकांना घाबरण्याची गरज नाही. असं आपण का म्हणू शकतो? कारण यहेज्केलप्रमाणे यहोवानेच आपल्याला पाठवलं आहे आणि तो नेहमी आपल्याला मदत करेल.—यशया ४४:८ वाचा.
६. (क) यहोवा कशा प्रकारे आपल्याला मदत करायचं वचन देतो? (ख) आपल्याला सांत्वन आणि बळ कशामुळे मिळतं?
६ यहोवा आपल्याला वचन देतो की तो आपल्याला मदत करेल. उदाहरणार्थ, “तुम्ही माझे साक्षीदार आहात,” असं म्हणण्याआधी यहोवाने असं वचन दिलं: “तू जलाशय ओलांडशील तेव्हा मी तुझ्यासोबत असेन, तू नद्यांमधून जाशील तरी तू बुडणार नाहीस, तू आगीतून चालशील तरी तुला भाजणार नाही, आगीच्या ज्वालांची तुला झळ बसणार नाही.” (यश. ४३:२) आपलं प्रचाराचं काम करताना कधीकधी आपल्यासमोर अशा समस्या येतात ज्या नदीच्या पुरासारख्या आणि आगीच्या ज्वालांसारखा असतात. पण तरीसुद्धा यहोवाच्या मदतीने आपण प्रचाराचं हे काम करत राहतो. (यश. ४१:१३) यहेज्केलच्या काळाप्रमाणेच आजसुद्धा बहुतेक लोक आपला संदेश ऐकत नाहीत. पण आपण ही गोष्ट लक्षात ठेवतो, की लोकांनी आपला संदेश ऐकला नाही तरीसुद्धा देवाचे साक्षीदार म्हणून आपण कुठेतरी कमी पडलो आहोत असा याचा अर्थ होत नाही. उलट, आपण आपला संदेश विश्वासूपणे सांगत राहतो, तेव्हा यहोवाला आनंद होतो. ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला सांत्वन आणि बळ मिळतं. प्रेषित पौलने म्हटलं: “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे प्रतिफळ मिळेल.” (१ करिंथ. ३:८; ४:१, २) बऱ्याच वर्षांपासून पायनियर सेवा करणारी एक बहीण म्हणते: “मला माहितीए की यहोवा आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ देतो. आणि म्हणून मी आनंदाने त्याची सेवा करते.”
यहेज्केलला देवाच्या पवित्र शक्तीमुळे बळ मिळालं
७. यहेज्केलला दिसलेल्या दृष्टान्ताबद्दल त्याने जेव्हा-जेव्हा विचार केला असेल तेव्हा-तेव्हा त्याच्यावर काय परिणाम झाला असेल? (सुरुवातीचं चित्र पाहा.)
७ देवाची पवित्र शक्ती किती ताकदवान आहे हे यहेज्केलने पाहिलं. पवित्र शक्ती सामर्थ्यशाली स्वर्गदूतांवर आणि यहोवाच्या स्वर्गीय रथाच्या भल्या मोठ्या चाकांवर कशी कार्य करते हे त्याने दृष्टान्तात पाहिलं. (यहे. १:२०, २१) हे पाहून यहेज्केलवर काय परिणाम झाला? त्याबद्दल त्याने लिहिलं: “मी ते पाहिलं, तेव्हा मी जमिनीवर पालथा पडलो.” यहेज्केल आश्चर्यचकित होऊन जमिनीवर पालथा पडला. (यहे. १:२८) यानंतर जेव्हा-जेव्हा त्याने या जबरदस्त दृष्टान्तावर विचार केला असेल तेव्हा-तेव्हा त्याला ताकद मिळाली असेल. आणि त्याची खातरी पटली असेल, की देवाच्या पवित्र शक्तीच्या मदतीने तो आपलं प्रचाराचं काम पूर्ण करू शकतो.
८-९. (क) यहोवाच्या आज्ञेमुळे यहेज्केलला काय मिळालं? (ख) अडेल वृत्तीच्या लोकांना प्रचार करण्यासाठी यहोवाने यहेज्केलला आणखीन मदत कशी केली?
८ यहोवाने यहेज्केलला आज्ञा दिली: “मनुष्याच्या मुला! उठून उभा राहा, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन.” या आज्ञेमुळे आणि ‘पवित्र शक्तीमुळे’ यहेज्केलला पुन्हा उठून उभं राहण्यासाठी बळ मिळालं. याबद्दल यहेज्केलने लिहिलं: “पवित्र शक्ती माझ्यामध्ये आली आणि तिने मला माझ्या पायांवर उभं केलं.” (यहे. २:१, २) यानंतर पुढेही यहेज्केलला त्याच्या सेवाकार्यात ‘देवाच्या हाताने’ म्हणजेच त्याच्या पवित्र शक्तीने मार्गदर्शन दिलं. (यहे. ३:२२; ८:१; ३३:२२; ३७:१, तळटीप; ४०:१) ‘कठोर मनाच्या आणि अडेल वृत्तीच्या’ लोकांना प्रचार करण्याचं जे कामे त्याला देण्यात आलं होतं ते करण्यासाठी देवाच्या पवित्र शक्तीनेच त्याला ताकद दिली. (यहे. ३:७) यहोवा यहेज्केलला म्हणाला: “बघ! मी तुझा चेहरा त्यांच्या चेहऱ्याइतकाच कठोर आणि तुझं कपाळ त्यांच्या कपाळाइतकंच कठीण केलंय. मी तुझं कपाळ हिऱ्यासारखं कठीण, गारगोटीच्या दगडापेक्षाही कठीण केलंय. तू त्यांना घाबरू नकोस किंवा त्यांचे चेहरे पाहून भिऊ नकोस.” (यहे. ३:८, ९) एका अर्थाने यहोवा यहेज्केलला म्हणत होता: ‘हे लोक अडेल वृत्तीचे असले तरी निराश होऊ नको. मी तुला मदत करीन.’
९ यानंतर देवाची पवित्र शक्ती यहेज्केलला त्या ठिकाणी घेऊन गेली जिथे त्याला प्रचार करायचा होता. याबद्दल यहेज्केलने लिहिलं: “यहोवाची शक्ती माझ्यावर जोरदारपणे कार्य करू लागली.” यहोवाने सांगितलेला संदेश लोकांना खातरीने सांगता यावा म्हणून तो पूर्णपणे समजून घ्यायला यहेज्केलला एक आठवडा लागला. (यहे. ३:१४, १५) मग यहोवाने त्याला एका खोऱ्यामध्ये जायला सांगितलं. तिथे “पवित्र शक्ती [त्याच्यामध्ये] आली.” (यहे. ३:२३, २४) आता यहेज्केल आपलं प्रचाराचं काम करायला तयार होता.
आज आपल्यालाही देवाच्या पवित्र शक्तीमुळे बळ मिळतं
१०. आपलं प्रचाराचं काम करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे आणि का?
१० आज आपलं प्रचाराचं काम करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी यहेज्केलच्या बाबतीत काय घडलं याचा विचार करा. त्याचं प्रचाराचं काम सुरू करण्याआधी देवाच्या पवित्र शक्तीने त्याला त्या कामासाठी लागणारं बळ दिलं. यहेज्केलप्रमाणेच आज आपणसुद्धा यहोवाच्या पवित्र शक्तीच्या मदतीनेच आपलं प्रचाराचं काम करू शकतो. आपण असं का म्हणतो? विचार करा, आपलं हे काम थांबवण्यासाठी सैतान आपल्याविरूद्ध लढत आहे. (प्रकटी. १२:१७) मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर सैतान इतका शक्तिशाली आहे की आपण त्याचा सामना करूच शकत नाही. पण आपल्या प्रचाराच्या कामाने आपण त्याच्यावर विजय मिळवत आहोत. (प्रकटी. १२:९-११) तो कसा? आपण प्रचार करतो तेव्हा आपण हे दाखवतो, की आपण सैतानाच्या धमक्यांना घाबरत नाही. जेव्हा-जेव्हा आपण प्रचाराला जातो तेव्हा एका अर्थाने आपण सैतानाला हरवतो. तर मग, विरोध होत असतानाही आपण आपलं प्रचाराचं काम करत आहोत यावरून काय दिसून येतं? यावरून हेच दिसून येतं की पवित्र शक्ती आपल्याला बळ देते आणि आपल्या कामाने यहोवा खूश आहे.—मत्त. ५:१०-१२; १ पेत्र ४:१४.
११. पवित्र शक्ती आपल्याला काय करायला मदत करेल? आणि ती मिळवत राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
११ यहोवाने यहेज्केलला प्रचार करण्यासाठी लागणारी ताकद दिली, यावरून आपण आणखीन काय शिकू शकतो? आपलं प्रचाराचं काम करताना कुठल्याही प्रकारची परीक्षा आली तरी तिच्यावर मात करायला देवाची पवित्र शक्ती आपल्याला मदत करेल. (२ करिंथ. ४:७-९) मग देवाची पवित्र शक्ती आपल्याला मिळत राहावी म्हणून आपण काय करू शकतो? कुठल्याही प्रकारची समस्या आली तरी आपण सतत प्रार्थना केली पाहिजे. आणि हा भरवसा ठेवला पाहिजे की यहोवा आपल्या प्रार्थना नक्की ऐकेल. येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं: “मागत राहा . . . शोधत राहा . . . ठोठावत राहा.” म्हणजे ‘जे मागतात त्यांना यहोवा पवित्र शक्ती देईन.’—लूक ११:९, १३; प्रे. कार्यं १:१४; २:४.
देवाच्या शब्दांमुळे यहेज्केलचा विश्वास मजबूत झाला
१२. यहेज्केल २:९–३:३ या वचनांप्रमाणे यहेज्केलला गुंडाळी कोणी दिली होती आणि त्यात कोणता संदेश होता?
१२ देवाच्या पवित्र शक्तीमुळे यहेज्केलला प्रचाराचं काम करण्यासाठी धैर्य तर मिळालंच, पण देवाच्या शब्दांमुळेसुद्धा यहेज्केलचा विश्वास मजबूत झाला. दृष्टान्तात यहेज्केलला एका हातात एक गुंडाळी दिसली. (यहेज्केल २:९–३:३ वाचा.) ही गुंडाळी यहेज्केलला कोणी दिली होती? त्यात काय लिहिलं होतं? आणि त्यामुळे यहेज्केलचा विश्वास कसा मजबूत झाला? चला, आपण पाहू या. कदाचित यहेज्केलने आधी पाहिलेल्या चार स्वर्गदूतांपैकी एकाच्या हातून यहोवाने ती त्याला दिली असेल. (यहे. १:८; १०:७, २०) या गुंडाळीत देवाचे शब्द होते म्हणजे, बंडखोर यहुदी बंदिवानांना सांगण्यासाठी न्यायदंडाचा एक भला मोठा संदेश त्यात होता. (यहे. २:७) हा संदेश गुंडाळीच्या मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही बाजूंना लिहिलेला होता.
१३. यहोवाने यहेज्केलला काय सांगितलं आणि यहेज्केलला गुंडाळी गोड लागली यावरून काय कळतं?
१३ यहोवाने दृष्टान्तात यहेज्केलला म्हटलं: “ही जी गुंडाळी मी तुला दिली आहे ती खाऊन आपलं पोट भर.” यहोवाने सांगितल्याप्रमाणे यहेज्केलने ती पूर्ण गुंडाळी खाल्ली. याचा काय अर्थ होता? यहेज्केलला जो संदेश घोषित करायचा होता, तो त्याने पूर्णपणे समजून घेणं गरजेचं होतं. तो संदेश त्याच्या अगदी मनापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. कारण यामुळेच त्याला तो इतरांना सांगण्याची प्रेरणा मिळणार होती. मग एक आश्चर्याची गोष्ट घडली. यहेज्केलने ती गुंडाळी खाल्ली तेव्हा त्याला ती “मधासारखी गोड लागली.” (यहे. ३:३) यावरून काय सूचित होतं? हेच की यहोवाच्या वतीने लोकांना एक संदेश सांगणं हा यहेज्केलसाठी एक सुंदर, सुखद आणि आनंद देणारा अनुभव होता. (स्तो. १९:८-११) यहोवाने त्याला आपला संदेष्टा म्हणून सेवा करण्यासाठी निवडलं होतं याबद्दल तो खूप आभारी होता.
१४. यहेज्केल त्याची जबाबदारी पूर्ण करायला कसा तयार झाला?
१४ मग यहोवा यहेज्केलला म्हणाला: “मी जे काही तुला सांगतोय ते सगळं लक्षपूर्वक ऐक आणि त्याकडे आपलं मन लाव.” (यहे. ३:१०) असं म्हणून यहोवाने यहेज्केलला गुंडाळीतले सगळे शब्द लक्षात ठेवायला आणि त्यांवर मनन करायला सांगितलं. असं केल्यामुळे यहेज्केलचा स्वतःचा विश्वास तर मजबूत झालाच, पण त्यासोबत लोकांना कोणता जबरदस्त संदेश सांगायचा आहे हेसुद्धा त्याला कळलं. (यहे. ३:११) अशा रीतीने यहेज्केलला देवाचा संदेश पूर्णपणे समजला आणि त्यावर त्याचा विश्वास बसला. आणि यामुळे आता तो इतरांना जाऊन हा संदेश सांगायला तयार होता.—स्तोत्र १९:१४ सोबत तुलना करा.
आज यहोवाच्या शब्दांमुळे आपलाही विश्वास मजबूत होतो
१५. सेवाकार्यात टिकून राहण्यासाठी आपण कशावर ‘मन लावलं’ पाहिजे?
१५ आपल्या सेवाकार्यात टिकून राहण्यासाठी यहोवाच्या शब्दांमुळे आपला विश्वास मजबूत होणं गरजेचं आहे. त्यासाठी आज यहोवा आपल्याला आज जे काही सांगतो त्याकडे आपण ‘मन लावलं’ पाहिजे. आज यहोवा आपल्याशी त्याच्या वचनातून म्हणजेच बायबलमधून बोलतो. मग देवाच्या वचनाचा आपल्या विचारांवर, भावनांवर आणि इच्छा-आकांक्षांवर प्रभाव पडावा म्हणून आपण काय केलं पाहिजे?
१६. देवाचं वचन आपल्या मनात अगदी खोलपर्यंत जावं म्हणून आपण काय केलं पाहिजे?
१६ जेव्हा आपण अन्न खातो आणि आपलं शरीर ते पचवतं तेव्हा आपल्याला त्यापासून पोषण मिळतं. त्याच प्रकारे जेव्हा आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो आणि त्यावर मनन करतो तेव्हा आपला विश्वास मजबूत होतो. गुंडाळीच्या दृष्टान्तातून आपल्याला जे शिकायला मिळालं ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यहोवाची इच्छा आहे की आपण ‘त्याच्या वचनाने आपलं पोट भरावं,’ म्हणजेच आपण ते चांगल्या प्रकारे समजून घ्यावं. यासाठी आपण प्रार्थना, वाचन आणि मनन केलं पाहिजे. बायबल वाचण्याआधी देवाचे विचार जाणून घेण्यासाठी आपलं मन तयार व्हावं म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. यानंतर आपण बायबलमधला काही भाग वाचू शकतो. मग थोडं थांबून आपण आत्ताच जे वाचलंय त्यावर मनन केलं पाहिजे, म्हणजेच खोलवर विचार केला पाहिजे. असं केल्यामुळे काय होईल? आपण जितकं जास्त मनन करू तितकंच देवाचं वचन आपल्या मनात अगदी खोलपर्यंत जाईल.
१७. बायबलमध्ये आपण जे वाचतो त्यावर मनन करणं महत्त्वाचं का आहे?
१७ बायबल वाचणं आणि त्यावर मनन करणं का महत्त्वाचंय? कारण असं केल्यामुळे आज आपल्याला राज्याचा संदेश लोकांना सांगण्याचं बळ मिळतं. तसंच यामुळे भविष्यात लवकरच देवाचा कठोर न्यायाचा संदेश लोकांना सांगण्याचं धैर्यही आपल्याला मिळेल. शिवाय यहोवाच्या सुंदर गुणांवर मनन केल्यामुळे त्याच्यासोबतचं आपण नातं दिवसेंदिवस घट्ट होत जाईल. आणि यामुळे आपल्याला मनाची शांती, आनंद आणि समाधान मिळेल.—स्तो. ११९:१०३.
प्रचाराचं काम करत राहायचा निश्चय
१८. आपल्या क्षेत्रातल्या लोकांना काय मान्य करावं लागेल आणि का?
१८ यहेज्केलला देवाने स्वतः एक संदेश दिला होता. पण आज आपण यहोवाच्या वचनात म्हणजेच बायबलमध्ये लिहून ठेवलेला प्रेरित संदेश लोकांना सांगत आहोत. आणि जोपर्यंत यहोवा आपल्याला थांबायला सांगत नाही तोपर्यंत हे काम करत राहायचा आपला निश्चय आहे. देवाची न्याय करायची वेळ येईल तेव्हा आपल्या क्षेत्रातले लोक असं म्हणू शकणार नाहीत, की त्यांना काहीच माहीत नव्हतं किंवा देवाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. (यहे. ३:१९; १८:२३) उलट त्यांना हे मान्य करावाच लागेल, की आपण त्यांना एक संदेश सांगितला होता आणि तो देवाकडून होता.
१९. प्रचाराचं काम करत राहायचं बळ आपल्याला कशामुळे मिळेल?
१९ प्रचाराचं काम करत राहायचं बळ आपल्याला कशामुळे मिळेल? यहेज्केलला ज्यांमुळे बळ मिळालं त्या तीन गोष्टींमुळे आपल्यालाही बळ मिळेल. आपल्याला माहीत आहे, की आपल्याला यहोवाने हे काम करण्यासाठी पाठवलंय. तसंच देवाची पवित्र शक्ती आपल्याला ताकद देते. आणि देवाच्या वचनामुळे आपला विश्वास मजबूत होतो. या सर्व गोष्टींमुळे आपण प्रचाराचं काम करत राहू शकतो. चला तर मग, यहोवाच्या मदतीने आपण हे प्रचाराचं काम करत राहू या आणि अगदी “शेवटपर्यंत” त्यात टिकून राहू या.—मत्त. २४:१३.
गीत ६५ उन्नती करू या!
a यहेज्केलला त्याचं प्रचाराचं काम करायला कोणत्या तीन गोष्टींमुळे मदत झाली यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत. यहोवाने आपल्या या संदेष्ट्याला कशी मदत केली हे आपण पाहू या. त्यामुळे आपलं प्रचाराचं काम करण्यासाठी यहोवा आपल्यालाही मदत करेल यावरचा आपला भरवसा वाढेल.